घरटं

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

घरटं

- स्वाती भट गानू

'टैमप्लीज' पालथी मूठ तोंडाकडे नेत मनू म्हणाली. 'ए मने, लवकर ये गं.' 'हो हो,' नळाच्या दिशेने धूम ठोकताना मनूने उत्तर दिलं. आणि बाकीच्यांचा जोडीसाखळीचा खेळ परत सुरू झाला.

खरं तर तिथून वाड्यातल्या खोलीपर्यंतचं अंतर काही फार नव्हतं; पण मनूला नळावर पाणी प्यायला जायला फार मज्जा वाटायची. हाताच्या ओंजळीचं एक टोक नळाला लावायचं आणि दुसरीकडून पाणी प्यायचं. त्यात नळाची उंची मनूएवढीच असल्यामुळे थोडं पाणी अंगावर पण सांडायचं आणि मस्त गारेगार वाटायचं.

मनू राहायची तो वाडा खरंतर जुनाच होता. मूळ आयताकृती बंदिस्त रचना असलेल्या वाड्याचा एक पूर्ण भाग पडला होता. त्यामुळेच त्याला लागून असलेल्या मोकळ्या जागी मुलं खेळत. पडक्या भागातून तिकडे जायला वाट होती. तिथूनच पुढे गेल्यावर पाण्याचा नळ होता. ६-७ बिऱ्हाडांत मिळून हा एकच नळ. घरात लागणारं पाणी इथूनच भरावं लागे. नळाच्या थोड्या पुढून एका मातीच्या ढिगाऱ्यावरून चढून गेल्यावर एक दगडी भिंत होती. ती म्हणजे अण्णा आजोबांची खोली. अण्णा तिथे एकटेच राहात. त्यामुळे त्यांच्या घरी सामान फार नव्हतं. पण ते दुसऱ्या वाड्याचे बिऱ्हाडकरू. तोही बाकी पडलेलाच होता. फक्त अण्णा आजोबा आणि शेजारी गणूची खोली शिल्लक होती. ती मात्र अगदी व्यवस्थित होती. जुनं असलं तरी भक्कम दगडी बांधकाम होतं.

तर अण्णांच्या दगडी भिंतीला लागून एक अरुंद पायवाट होती. त्यावरून गेल्यावर पुढे वाड्याचं बाथरूम आणि संडास अशी रचना होती. जे जे पडलं ते जसं जमेल तसं, जिथे वाटलं तिथे बांधल्याने, वाड्याची ही अशी रचना झाली होती. पण मध्यवस्तीत असल्याने आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वर्षानुवर्षं भाडेकरू तिथे राहात होते. त्यामुळे तीच वहिवाटीची बनली होती.

खेळताना तहान लागली तर पाणी प्यायला नळावर येणं हे मुलांचं नेहेमीचंच. त्यात दुपारच्या वेळात नळ रिकामाही असे. दोन-तीन दिवसांपूर्वी आंघोळीला जाताना मनूने नेहेमीप्रमाणे पायरीवरून वाटेवर जोरात उडी मारली. तेव्हा प्रथमच दगडी भिंतीतल्या मधल्या भोकातून एक चिमणी भुर्रकन उडाली. तशी मनू परत मागे आली आणि तिने परत पायरीवरून जरा उंच उडी मारली. या वेळी तिला तिथे जमलेल्या काड्या, वाळकी पानं आणि आत अजून एक चिमणी दिसली. आणि दोन-तीन दिवसांत तिने किती तरी वेळेला तिकडे चक्कर मारली.

वाड्यातून नळावर आणि बाथरूमकडे जायला एक रीतसर वाट होती, पण एवढा वळसा घालण्याऐवजी पडक्या भागातून नळाकडे जाणं आणि तिथूनच मातीच्या ढिगाऱ्यावरून बाथरूमच्या पायवाटेकडे जाणं सोयीचं होतं.

मनू राहायची वाड्यातल्या एका खोलीत. मनूची शाळा जवळच होती. मनू शाळेतही उत्साहाने जात असे. शाळेची इमारत प्रशस्त आणि हवेशीर होती. शाळेला मोठं मैदान होतं. आवळ्याची, चिंचेची, बुचाची आणि इतर कितीतरी झाडंही होती मैदानाभोवती. उत्तम शिक्षक आणि हुंदडायला भरपूर जागा आणि बालसवंगडी! मनू त्यामुळेच फार रमली होती शाळेत. शिवाय वाड्यातली सगळी मुलं त्याच शाळेत, त्यामुळे सगळे एकदमच दंगा करत निघत.

मनूचे वडील एका बी-बियाणाच्या दुकानात नोकरीला होते. पगार काही फार नव्हता. मनूला आजी-आजोबा नव्हते. तशी काका-काकू आणि चुलत भावंडं होती. ती दोन गल्ल्या सोडून पलीकडेच राहात. काका पुस्तकांच्या दुकानात कामाला होते. आणि काकू डबे करून देत असे. लग्न झाल्यावर मनूच्या वडिलांनी ही खोली भाड्याने घेतली होती. लहान असली तरी वाड्यातली जागा सोयीची होती. नवीन संसार उभा करताना कशीबशी शिल्लक पडायची थोडी. दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती तरी कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे होते. आणि आर्थिक भार एकमेकांवर न टाकता ते दोन्ही घरांनी जपले होते. मनूचं आजोळ म्हणजे परगावचा मामा-मामी आणि त्यांची मुलं, आणि इतर, लग्न होऊन वेगवेगळ्या गावात असलेल्या पाच मावशा. सगळेच नोकरदार मध्यमवर्गीय. तर दोन दिवसांपूर्वी मनूच्या वाड्याच्या मालकीण आजींनी सर्व भाडेकरूंना बोलावलं होतं. तिथून आल्यावर बाबा चिंतेत पडले होते. रात्री उशिराने नवरा-बायको बरेच बोलत बसले होते.

वाडा म्हणजे मालकीण आजींना माहेरून मिळालेली ही इस्टेट. सासरची सांपत्तिक स्थितीही उत्तम. त्यामुळे वाड्यात येऊन अरेरावी करणं, भाड्याच्या पैशांचा तगादा लावणं, अपमान करणं असले प्रकार कधीच नव्हते. पण आता मात्र त्यांचा धाकटा मुलगा नवीन व्यवसाय सुरू करणार होता. वाडा, शेजारचं मैदान असं मिळून एक नवीन बिल्डिंग बांधायचा त्याचा प्लॅन होता. त्यासाठीच मालकीण आजींनी सर्व भाडेकरूंना बोलावलं होतं. सर्व भाडेकरूंना नव्या बिल्डिंगमध्ये सध्या आहे एवढी जागा मिळणार होती. एक मनूचे बाबा आणि दामले दादा या दोनच भाडेकरूंची जागा अगदीच लहान होती. दहा बाय दहाची एक खोली. नव्या आराखड्यात तेवढी लहान सदनिका मुळातच नव्हती. त्यामुळे वरची जागा विकत घेणे किंवा आपल्या जागेच्या मोबदल्यात पैसे घेऊन हक्क सोडणे असे दोन पर्याय होते. दामले दादा एका राम मंदिरात पुजाऱ्याचं काम करीत आणि कोकणात त्यांचं घर आणि थोडी शेती होती वाट्याची. मंदिराच्या आवारातल्या खोलीमध्ये राहण्याविषयी ते विचारणार होते. आणि नाहीच जमलं तर कोकणात गावी राहायला जाणार होते.

साधारण एका महिन्याच्या मुदतीत निर्णय घ्यायचा होता. मनूचे आई-वडील चिंतेत होते ते यामुळेच. जमवलेली शिल्लक आणि घरचे दागिने पूर्ण विकून तिथेच छोटा फ्लॅट घेता आला असता, पण मग सगळीच शिल्लक शून्यावर आली असती. शिवाय नव्या फ्लॅटचा मेंटेनन्स आत्ताच्या भाड्यापेक्षा जास्त होता. त्यातच चुलत घरात एक मुंज आणि मामाकडे लग्न, असे नजीकचे खर्च तर अगदी तोंडावर होते. आणि त्यामुळे तिथून आर्थिक मदतीबद्दल विचारणंसुद्धा शक्य नव्हतं.

या कशाचाच थांगपत्ता नसलेली मनू आज नेहेमीप्रमाणेच मैदानात खेळायला गेली होती. आणि दर थोड्या वेळाने मुद्दाम पाणी प्यायला जाऊन चिमणा-चिमणीची घरट्याची तयारी बघून येत होती. चोचीतून लहानलहान काटक्या, दोरे, कापूस, गवत आणायची लगबग आता वाढली होती. मनूला वाटे, आपण एवढं सामान एकाच हेलपाट्यात आणू शकतो; पण ते शोधणं आणि त्या भोकात ठेवणं जरा अवघड होतं. पण चिमणा-चिमणीला मात्र कुणाच्या मदतीची गरज, शक्यता वाटत नव्हती. त्यांचं अखंड काम चालूच होतं.

'जागा तशी वाईट नाहीये खरं तर', मनूच्या आईचे विचार सुरू झाले. सकाळीच जागा बघायला दोघं नवरा-बायको जाऊन आले होते. दोन रूमचा फ्लॅट होता. वाड्याच्या जागेच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशात आणखी थोडीशी भर घालून आर्थिक गणित जमत होतं. दोन प्रशस्त खोल्या, किचनला लागून बाहेर छोटी गॅलरी असा पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट होता. होता रिसेलचाच. पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, सांगत होता आधीचा मालक. पण मनूच्या आईला काही तो फारसा भावला नव्हता. ही जागा जरा लांबच्या उपनगरात होती. आसपासचा परिसर धूळ भरलेला आणि एक प्रकारचा बेशिस्तपणा असलेला. बिल्डिंगच्या पलीकडेच उघड्यावर पडलेला कचरा, त्यात चरणारी डुकरं. जातानाच शेजारपाजारचे, बाहेरच कसेही वाळत टाकलेले कपडे, नाकात गेलेला उग्र फोडणीचा वास यांमुळे खरं तर मनूची आई उदास झाली होती. तशी खात्या-पित्या घरची लेक, पण एकच भाऊ आणि सहा बहिणी. हिच्या लग्नापर्यंत आई-वडील नव्हतेच. चांगली माणसं बघून दादा-वहिनीने हे लग्न करून दिलं, तेव्हासुद्धा मनूची आई धास्तावलीच होती. पण जाऊ, दीर आपुलकीने वागणारे होते. मुळात नवराही सुस्वभावी होता. त्यामुळे लग्नानंतर थोड्या दिवसांतच वाड्यात संसार करताना ती अगदी छान रुळली. लहान जागा, पाणी भरायला एकच नळ, सर्व बिऱ्हाडांत मिळून असलेले संडास - बाथरूम अशा गैरसोयी असल्या तरी मोकळी हवा, आसपास खूपशी फुलझाडं, मनूच्या जन्मानंतर मनूसाठी उत्तम शाळा जवळच, खेळायला भरपूर जागा आणि मुलं, पायी जाण्याच्या अंतरावर नवऱ्याची नोकरी अशा खूपशा जमेच्या बाजू होत्या. खोलीसमोर तुळस आणि रांगोळी येताना मन प्रसन्न करीत. जवळजवळ सगळ्याच शेजारणी सकाळी उठून अंगण झाडून सडा-रांगोळी करीत. दामले दादांच्या मंदिरात काकडआरतीला आणि नवरात्रीत देवीच्या देवळात ओटी भरायला सगळ्या एकत्र जात. वाळवणं करताना हक्काने मदतीला बोलावत. अर्थात त्यातही गट, तंटे होते. नळावरची भांडणं होती. पण कारणाशिवाय कोणाच्या फारसं अध्यात-मध्यात नसणारं हे कुटुंब वाड्यात सहज सामावलं. हे असं कधीतरी इथून जावं लागेल असं ध्यानीमनीही नसताना आता नव्या जागेत जायचा निर्णय घेतला होता दोघांनी.

पण नवीन जागेतल्या टोचणाऱ्या गोष्टी काही केल्या शांत बसू देत नव्हत्या. तशी मनूच्या वडलांनाही स्वच्छतेची फार आवड. नोकरीनंतर उरलेल्या वेळात जमेल तेव्हा पाणी भरणं, भाजी निवडणं, स्वतःच्या कपड्यांना आणि मनूच्या ड्रेसला इस्त्री करणं, अशी कामं बाबांची होती. मनूच्या आईला आवडतं म्हणून वाट वाकडी करून लांबच्या हलवायाकडचे मलई पेढे आणीत, चतुर्थीचा उपास सोडताना. प्रत्येक काम अगदी सुबक आणि मनापासून. पण मुळात स्वभाव मात्र अबोल. कामाशिवाय फारसं भरभरून बोलणार मात्र नाहीत. ही नवीन जागा त्यांनाही फारशी आवडली नसणार, हे मनूच्या आईला पक्कं माहीत होतं. दुसरा कुठला चांगला पर्यायपण दिसत नव्हता. त्यामुळे तिनेही नव्या जागेसाठी नाही म्हणलं नाही.

दुसऱ्या दिवशी शनिवार होता, त्यामुळे सकाळची शाळा होती. मनू शाळेतून परस्पर आईबरोबर काकूकडे गेली. मुंजीच्या करंज्या, चिवडा, लाडू इत्यादी लगबग सुरू होती. मावशी, म्हणजे काकूची बहीणपण मुलींना घेऊन मदतीला आली होती. मुलं खेळायला बाहेर पळाली तशी मनूच्या आईने हा विषय जावेच्या कानावर घातला. जाऊबाईंनी धीर दिला. म्हणाल्या, होईल सगळं नीट. जोड उत्पन्नासाठी मीसुद्धा डबे सुरू करू का, विचारल्यावरसुद्धा पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं. जावेची बहीण नवीन घराजवळच होती राहायला. तिनेसुद्धा डबे मिळवण्यासाठी मदत करायची तयारी दाखवली. ती पाळणाघर चालवीत होती, त्यामुळे तिचा संपर्क होता बराच. मनूला शाळा लांब पडली असती. शाळेच्या वेळेत बाबांबरोबर मनू बसने पोचली असती वेळेत, पण परत येतानाचा प्रश्न होता. शिवाय तिच्या बाबांना उशिरापर्यंत दुकानात थांबावे लागे. "शाळा सुटल्यावर मनू थांबेल इकडे. भावजींबरोबर घरी जाईल," जाऊबाईंनी अगदी सहज प्रश्न सोडवला. त्यामुळे तिची उमेद वाढली होती. पण तरीही नवीन जागेचा आसपासचा परिसर आठवून मन खटटू होत होतं.

भावंडांबरोबर मस्त धमाल करत मनूचा दिवस कसा गेला कळालंच नाही. घरी यायला रात्र झाली.

रविवारी जरा उशिराच जाग आल्यावर मनूला एकदमच चिमणाचिमणीची आठवण आली. आणि ती पटकन आंघोळीसाठी तयार झाली. आईने गरम पाण्याची बादली घेईपर्यंतचा वेळ पण तिला जास्त वाटला. ती धावतच पुढे गेली. पायरीवरून जोरात उडी मारताना जरा धडपडली. “मने, अगं हळू की जरा. लागलं का?” अण्णा आजोबांनी विचारलं.
तेवढ्यात मनूची आई आलीच. म्हणाली, "अण्णा, आज सुट्टी ना?"
"हो. जरा काम करणार आहे आज भिंतीचं. माणसं बोलावल्येत. येतीलच आता."
"कसलं काम?" आईनं विचारलं.
"भिंतीत मध्येमध्ये पाणी मुरतं ना, त्याने फार गारठा येतो. म्हणून जरा भिंतीला बाहेरून प्लास्टर करणारे." हे बोलणं होईपर्यंत मनूच्या चार उड्या होऊन चारदा घरटं बघून झालं होतं. बादली मोरीत ठेवून आईने, "मनू, ये लवकर," म्हणून हाक मारली तरी तिचं लक्षच नाही. शेवटी आईने ओरडून हाक मारली तेव्हा मनू आंघोळीला गेली.

अभ्यास, जेवण वगैरे झाल्यावर दुपारी मनू नळावर आणि मग घरटं बघायला म्हणून गेली. पण बापरे. तिथे घरट्याच्या भिंतीवर शिडी लावून एक माणूस वर चढला होता आणि सगळीकडे सिमेंट लावत होता. त्यात घरट्याची जागा पण लिंपून झाली होती. भिंतीचा वरचा अगदी थोडा भाग शिल्लक होता. मनूला त्याला ओरडून सांगावसं वाटलं, पण काय सांगावं कळेना. ती नुसतीच पायरीवर उभी राहिली वर बघत. तेवढ्यात आण्णा आजोबा आले. "मने, लांब हो बघू. सिमेंट पडेल डोक्यावर," आणि त्या माणसाशी बोलायला लागले. तितक्यात समोरच्या गुलबक्षीच्या झुडपाजवळ चोचीत कापूस घेतलेली चिमणी दिसली. तिचीही अवस्था मनूसारखीच झाली होती. मनूला कसंतरीच झालं. ती परत घरात आली आणि नुसतीच बसून राहिली. दुपारचा चहा झाल्यावर "साय-साखर देऊ का," म्हणून आईने विचारल्यावर तिने मानेनंच उंहू केलं. खरं तर राहिलेल्या थोड्याशा सायीच्या दुधात साखर घालून खायला मनूला फार आवडत असे. पण आज काही खावंसंही वाटेना. आईनेही फार आग्रह केला नाही. म्हणाली, "मनू, आवर लवकर."

मनू आईबाबांबरोबर बसने कुठल्यातरी स्टॉपवर उतरून एका बिल्डिंगमध्ये शिरली. आज चांगला दिवस असल्याने नवीन घरासाठी मालकाला आजच निर्णय सांगून थोडी आगाऊ रक्कम देण्यासाठी म्हणून तिथे जमायचं ठरलं होतं. मनूचे काका-काकूपण येणार होते. बिल्डिंगसमोर मोकळ्या जागेत दोन मुलं क्रिकेट खेळत होती. मनू नकळत तिथे रेंगाळली. तितक्यात बॉल तिच्या पायाजवळ आला. "पऱ्या, वाईडे हा. नीट टाक ना." मनूने बॉल उचलून त्या मुलाकडे टाकला. "तुम्ही राहायला येणारे ना इकडे?" त्या मुलाने विचारलं. मनूने मानेनंच होकार दिला.
"नाव काय?"
"मनू. म्हंजे शाळेतलं दीप्ती. पण मनूच म्हणतात सगळे."
"येती का खेळायला," पऱ्याने विचारलं. जावं की नाही मनूला कळेना. इतक्यात आईची हाक ऐकू आली वरून. मनू वर घरात गेली. तिथे बाबा एका माणसाबरोबर बोलत बसले होते. आईने आतल्या खोलीतल्या ओट्यावर गणपतीची छोटी फ्रेम ठेवली होती. तिथे मनूला नमस्कार करायला सांगितला आणि वाटीत ठेवलेली साखर तिच्या हातावर ठेवली. मनू परत बाहेर येऊन गॅलरीतून खालचा खेळ पहायला लागली. तितक्यात तिचं लक्ष समोरच्या झाडावरच्या फांदीवर गेलं. एक चिमणी चोचीत वाळलेलं गवत घेऊन तिथे बसली होती. ते पाहून मनूला खुद्‌कन हसायला आलं. दारातून जेमतेम डोकं आत नेऊन, "आई, मी खाली खेळत्ये," असं सांगून वरूनच ओरडली, "पऱ्या, मी पण येते खेळायला."

नवीन डाव सुरू झाला.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कथा आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0