संपादकीय

संकल्पना संसर्ग

संपादकीय

गेले काही महिने कोरोनाच्या महासाथीनं सर्वच क्षेत्रांत खळबळ माजवली आहे. मराठी प्रकाशनविश्व त्याला अपवाद असणं शक्यच नव्हतं. टाळेबंदीमुळे पुस्तकांची दुकानं, प्रदर्शनं, छापखाने, पोस्ट ऑफिस, इ. सगळंच बंद झालं. वाचकांपर्यंत पोचण्याचे सगळेच पारंपरिक मार्ग बंद झाल्याचं लक्षात आल्यावर या छोट्याशा विश्वातल्या अनेकांना ऑनलाईन विश्वाची दखल घ्यावी लागली. मग कुणी आपल्या नियतकालिकांच्या पीडीएफ वाटल्या, कुणी इ-पुस्तकं उपलब्ध करून दिली (ज्यांच्या पायरेटेड प्रती तात्काळ उपलब्ध झाल्या!), तर कुणी छोट्यामोठ्या सेलेब्रिटी लेखकांना फेसबुक लाईव्हवर गाजवून सोडण्यासाठी आकाशपाताळ एक केलं. आता टाळेबंदी संपली म्हटल्यावर मराठी प्रकाशनविश्वाचा अजगर आपल्या सुस्तावलेल्या स्टेडी-स्टेट विश्वात पुन्हा एकदा विसावेल अशी चिन्हं आहेत.

ह्याचं दुसरं टोक म्हणजे सोशल मीडियावर मराठीत व्यक्त होणाऱ्या लोकांचं विश्व. तिथेही आपली उदाहरणार्थ अभिमानास्पद वगैरे परंपरा जपत तेच तेच दळण दळणारे आहेतच, पण त्या व्यतिरिक्त एक मोठा वर्ग आता तिथे लिहिता झाला आहे. आपल्या सतत विस्तारत्या मित्रविश्वात आपल्याला मिळणारे शेकडो लाईक्स चघळत तिथेही कित्येक लोक मजेत जगतात. आणि त्यात काही गैरही नाही.

'ऐसी अक्षरे' मात्र सुरुवातीपासून ह्या दोन्ही विश्वांपेक्षा वेगळं काही तरी करू पाहत आहे. छापील दिवाळी अंकांना आपला अंक खपावा यासाठी (शक्यतो गुळगुळीत कागदावर) खूप लेख आणि जाहिराती देण्याचं बंधन असतं. त्यामुळे प्रत्येक लेखकाला कठोर शब्दमर्यादा पाळावी लागते, कारण (काही नेहमीचेच यशस्वी अपवाद वगळता इतर कुणासाठी) अंकात तितकी जागाच नसते. फेसबुकवर तर दीड-दोनशे शब्दांहून मोठी पोस्ट आली तर लोक TL;DR करून मोकळे तरी होतात, किंवा बदाम देऊन सोडून देतात. अशा परिस्थितीत लोकांना दीर्घ आणि सकस (तेही ऑनलाईन!) वाचायला देऊन पाहिलं तर लोक वाचतील का, ह्या प्रश्नाचं उत्तर आमच्यापुरतं आम्ही शोधत राहतो आणि त्यासाठी दर वर्षी काही तरी करून पाहत राहतो. ऐसीचे दिवाळी अंक आणि वेळोवेळी आलेले विशेषांक ह्याची साक्ष देतात. जेव्हा आमच्या रेसिडेंट विदा-वैज्ञानिक त्यावर आपल्या विश्लेषणाची धारदार सुरी चालवतात, तेव्हा आम्ही प्रोत्साहित होतो, कारण २०११ला 'ऐसी अक्षरे' सुरू झालं तेव्हापासून ते आत्ताआत्तापर्यंतचे अनेक लेख लोक कुठून कुठून येऊन वाचत असतात हे त्या विश्लेषणात दिसत राहतं. हे भाग्य छापील अंकांना मिळू शकत नाही, कारण गेल्या वर्षीचा दिवाळी अंक एव्हाना रद्दीत जाऊन रीसायकलसुद्धा झालेला असतो. तसंच, अगदी प्रत्येक पोस्टवर हुकमी लाईक्स मिळवत सतत चमकत राहणाऱ्या सोशल मीडियावरच्या लोकप्रिय लेखकांनाही हे भाग्य लाभत नाही, कारण प्रदीर्घ शेल्फ लाइफ हे त्या माध्यमाचं उद्दिष्ट नाही, आणि त्यामुळे तशी त्याची संरचनाच नाही.

दर वर्षी आम्हाला मात्र हे शक्य होतं, कारण 'ऐसी अक्षरे'ची धाटणी वेगळी आहे आणि त्यामुळे त्याला मिळणारा वाचकवर्गही वेगळा आहे हे लक्षात घेऊन अनेक लेखक आपलं वेचक लिखाण अंकासाठी आवर्जून देतात. आमच्यावर विश्वास टाकणारे हे लेखक आणि बॅकस्टेजला अंकावर खूप कष्ट घेणारे आमचे सहकारी ह्यांचं महासाथीच्या ह्या वर्षी तर आमच्यावर विशेष ऋण आहे, कारण त्यांच्यापैकी कित्येकांना आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना करोनाला तोंड द्यावं लागलंय.

तर, अशा या अनिश्चिततेच्या सावटाखालीही अंकाचं सातत्य राखण्यात आम्ही यशस्वी झालो ह्याचा आम्हाला आनंद आहे. वाचकांनाही अंक आवडेल आणि दर वर्षीप्रमाणे ते भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा आहे. वाचत राहा आणि आवडलेलं शेअर करत राहा अशी सगळ्यांना विनंती, कारण आमची भिस्त तुमच्यावरच आहे! Smile

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अभिनंदन आणि आभार!
सर्वांगसुंदर अंक निर्मितीसाठी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दरवर्षी प्रमाणेच अंकाचा दर्जा चढता आहे. पूर्वी काही खास दिवाळी अंक मुद्दामहून विकत घेऊन वाचायचो. तुलनेने त्यांत चांगले साहित्य मोठ्या प्रमाणावर असायचे. पण ऐसीची गोष्टच वेगळी आहे. यांत वाचन टाळण्यासारखे काही नाहीच. त्यामुळे एकच तक्रार (गोड) करावीशी वाटते की संपूर्ण अंक वाचायला खूप वेळ लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेळ काढुन नक्की पुर्ण अंक वाचेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दर्जेदार दिवाळी अंकासाठी सर्व चमूचे अभिनंदन आणि आभार. सवडीने एक एक लेख वाचणे सुरु आहे. 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

अजून वाचतो आहे.
पण एकंदरीत ह्या अंकातल्या तंत्रज्ञान-विज्ञान-सांख्यिकी-विदा ह्या आणि अशा विषयांवर लेख/कथा असलेले पाहून खूप छान वाटलं.
ब्राव्हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0