कौन बनेगा करोडपती

जगजित हा एक 20-22 वर्षाचा तरूण. त्याला अगदी बालपणापासून गाण्याची आवड. त्याचा आवाजही बऱ्यापैकी होता. त्यातही गजल प्रकार त्याचा अत्यंत आवडीचा. मोठमोठ्या गजल गायकांचे गजल तो हुबेहूब गायचा. मित्र तर त्याला जगजितसिंग म्हणूनच हाक मारायचे. शाळा-कॉलेजच्या वा घरगुती कार्यक्रमात त्याची हजेरी असायची. घरातले, इतर नातेवाईक, शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी त्याच्या गाण्याचे कौतुक करायचे. टीव्हीवरील कार्यक्रमात एक-दोनदा तो भागही घेतला होता. आई-वडीलसुद्धा त्याच्या गाण्याला उत्तेजन द्यायचे. शाळा-कॉलेज संपल्यानंतर त्याला आपणही मोठा गायक होण्याची स्वप्नं पडू लागली. चित्रपट संगीतकारांकडे कुणाच्या तरी ओळखी-पाळखीने तो दोन-चार चकराही मारून आला. खोट्या आश्वासनाव्यतिरिक्त पदरी काही पडले नाही. कुठेही डाळ शिजत नव्हती. शेवटी (वैतागून) स्वतःचीच स्टेज शो करणारी कंपनी का काढू नये हा विचार त्याच्या मनात येऊ लागला. जर भिकार, भकास आवाज असलेले म्युजिक शो करून खोऱ्याने पैसे कमावतात तर आपण का या धंद्यात पडू नये असे त्याला वाटू लागले. आपल्या कलागुणांना वाव मिळावा, चार पैसे कमवावे, इतर सहकलाकारांनाही संधी द्यावी असले विचार त्याच्या डोक्यात शिरू लागले. जेथे जेथे त्याचे (मराठी) गजल सर्व ऐकत आहेत, त्याच्या शोला गर्दी जमते, अशी स्वप्न तो पाहू लागला.

त्याची ही स्वप्नं प्रत्यक्षात उतरतील का?
माझ्या मते त्याचे हे स्वप्न खरे होण्याची शक्यता 10 टक्कयापेक्षा कमी असेल. हाही एक अपयशी कलाकार म्हणून काळाच्या पडद्याआड जाईल. त्याच्यासारखी अशी स्वप्नं पाहिलेले हजारो गायक, वादक, लेखक, कवी, फोटोग्राफर, नाटककार,पडद्याआड गेले आहेत, याचीही त्यानी दखल घेतल्यास तो अशी स्वप्नं उराशी बाळगलाच नसता. सगळ्या प्रसिद्धी माध्यमांना यशस्वी लोकांचीच गोष्ट सांगाविशी वाटते. गरीबीत वाढलेला कसा श्रीमंत झाला, उद्योगपती झाला, या गोष्टी वाचण्यात लोकांचा रस असतो. मागणी तसा पुरवठा या तत्वाप्रमाणे वार्ताहर/लेखक अशा गोष्टीलाच जास्त फुलवून सांगत असतात. अनेक वेळा काही गोष्टी लपवून यशाची एकच बाजू आपल्यासमोर मांडत असतात. आपल्याला मात्र ते सगळे खरेच आहे असे वाटू लागते. अपयशी कलाकारांच्या कर्तृत्वांची दर्दभरी कहाणी सांगण्यात कुठल्याही वार्ताहराला वा लेखकाला इंटरेस्ट नाही. काही वेळा अपवादात्मकरित्या एके काळी गाजलेल्या कलाकारांच्या दुर्दैवी अंताच्या बद्दल कुठल्या तरी नियतकालिकेतील रकाने भरलेले सापडतीलही. परंतु अगदीच अपवाद म्हणून.

photo 1

कौन बनेगा करोडपती ही टीव्ही मालिका सोफ्यावर बसून बघत असताना अमिताभ बच्चन विचारत असलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं (कुठेही फोन न करता वा कुठल्याही व्यक्तीची मदत न घेता!) आपल्याला माहित आहेत असेच वाटत असते. त्यामुळे करोडपती होणे इतके कठिण नाही अशी एक (गैर) समजूत आपण मनात बाळगून असतो. परंतु हॉटसीटवर बसलेला(ली) दुसरीच व्यक्ती मोठीची मोठी रक्कम घेऊन जाते, तेव्हा टाळ्या वाजवण्याव्यिरिक्त आपण काहीही करू शकत नाही. अशा प्रकारच्या तद्दन सुमार कार्यक्रमात भाग घेण्यासाठीसुद्धा अनेक डावपेच खेळावे लागतात हे आपण विसरतो. त्यामुळे जगजितच्या स्वप्नातली कंपनी प्रत्यक्षात उतरण्यासाठी नुसतेच फक्त गाता येते हे पुरेसे नाही. स्पर्धेत उतरून पैसे कमवण्यासाठी आणखी काही गोष्टी लागतात व त्या गोष्टी आपल्याकडे नाहीत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. सेल्फ-हेल्पची पुस्तकं वाचून अजूनपर्यंत कुणीही श्रीमंत झालेला नाही हेही लक्षात ठेवावे लागते.

खरे पाहताही तरुणांच्या अस्तित्वाच्या प्रश्नांशी स्वप्नं निगडित आहेत. सकारात्मक विचार करावा, संधीच्या शोधात असावे, संधी एकदाच येते, आलेली संधी सोडू नये हे वाचण्यापुरते ठीक आहे. प्रत्यक्ष व्यवहारात हे काही जमण्यासारखे नाही हे लक्षात येते. आपल्याच मित्रापैकी एखादा (अती)उत्साहाने स्टार्ट अप् कंपनी काढतो. आपल्यालाही त्यात भागीदारी वा हिस्सा देण्याचे आश्वासन देतो. आपणही हुरळून जातो. परंतु तो प्रस्ताव पुढे सरकतच नाही. 3-4 वर्षे झाल्यानंतर ती कंपनी गुंडाळल्याची बातमी कळते. बर झालं आपण सुटलो असे सुस्कारा सोडतो. याचा अर्थ सगळीकडे सगळ्यांच्या बाबतीत असे घडते असेही नाही. एका यशस्वी कंपनीच्या मागे शंभर अयशस्वी कंपन्या आहेत हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. परंतु ज्या पद्धतीने उत्तुंग शिखरे गाठल्यांची चित्रं रंगवली जातात, ते मात्र खरे नसते. कुणीतरी आपल्याला अमुक अमुक समभाग घ्या, अमुक अमुक म्युच्यअल फंडमध्ये पैसे गुंतवा, 2-3 वर्षात 15-20 टक्के परतावा मिळेल असे छातीठोकपणे सांगणाऱ्यांचे एका कानाने ऐकावे व दुसऱ्या कानाने सोडून द्यावे. अशा प्रकारे सांगणाऱ्यांचे व त्याबद्दल रकानेच्या रकाने लिहिणाऱ्यांचे कधीच बळी पडू नये. अमुक अमुक अवधीत तुमचे पैसे दुप्पट करून देतो अशा जाहिरातीला बळी पडून पैसे गुंतवल्यावर पैसेही गुल् व कंपनीही गुल्.

या अविचारी व तर्कशून्य (दुष्ट)चक्रातून बाहेर पडून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नेमके काय करावे हा प्रश्न नक्कीच जगजित विचारेल. यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला यशाची व्याख्या बदलावी लागेल. पैसा, प्रसिद्धी, सत्ता वा चंगळवादी जीवनशैली म्हणजेच यश हे डोक्यातून काढावे लागेल. आयुष्यात सगळे काही पटकन हवे, आजच, आताच हा हट्टाग्रह सोडण्याची तयारी हवी. आपल्या कर्तृत्व शक्तीवर आपला विश्वास असावा. कुणीतरी सांगितले म्हणून मी केले असे कधीच होऊ देता कामा नये. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार आहोत हे मनात पक्के असावे. सर्वात महत्वाचे म्हणजे बौद्धिक व/वा शारीरिक कष्ट घेतल्याशिवाय प्रामाणिकपणे जगता येत नाही हे लक्षात ठेवावे. जगात काहीही फुकट मिळत नाही. ते जरी आता फुकट वाटत असले तरी त्याची पुरेपूर किंमत कधीतरी वसूल केली जाते.

प्रत्येकाचे एक विशिष्ट व्यक्तिमत्व असते. काही बलस्थाने असतात. काही मर्यादा असतात. आणि या गोष्टी थोड्याशा थंड डोक्याने विचार केल्यास प्रत्येकाला हे कळू शकतात. त्यासाठी अती खर्चिक सल्लागाराकडे जायची गरज नाही. आपण आपल्या अस्तित्वाचा प्रश्न सोडवू शकतो. आपण आपल्या पायावर उभे राहू शकतो. आपण कुणाच्या मिंद्यात नाही हेसुद्धा आपल्याला भरपूर समाधान देऊ शकते. जरा सबूरीने विचारपूर्वक कृती केल्यास काही मर्यादेपर्यंत तुमची स्वप्नं पुरे होतात. फक्त यशाबरोबर अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. ते वेदनादायक असले तरी त्याला पर्याय नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet