करोना काळातील अनुभव

भारतात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याला वर्ष होतंय. एकीकडे करोना गेल्यासारखे वागू लागलेत लोक तर दुसरीकडे अजून मृत्यूंच्या आलेखाची शेपटी तितकी बारीक झालेली नाही, असं तज्ज्ञ म्हणतायत. अधनंमधनं कोणाला तरी करोना झालाय असं ऐकायला येतंय, अर्थात प्रमाण फारच कमी आहे. तसंच करोनामुळे अॅडमिट करावं लागल्याचं प्रमाणही कमी झालंय. मास्कची खबरदारी घेणं कमी झालंय. प्रवासाला जाऊ लागलेत बरेच लोक आता. तरीही...
तरीही भीती आहेच. मी गेल्या शनिवारी लोकलने प्रवास केला जवळपास वर्षभराने. पोटात बाकबूक होत होतं. पण नशिबाने गर्दी नव्हती अजिबातच, चार लोकल बदलल्या त्यात एकदाच फक्त शेजारी कोणी बसलं होतं. एरवी अख्खा बाक मलाच होता. पण रेल्वे स्थानकांमध्ये इतके अडथळे आहेत की विचारता सोय नाही. अनेक जिने बंद ठेवलेत, बहुतेक स्थानकांमध्ये एकच प्रवेशद्वार उघडं आहे. सरकते जिने संपूर्ण बंद आहेत. त्यामुळे फार गैरसोय होते आहे. अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र नसलेल्या पुरुषांना अजूनही प्रवासबंदी आहे, बायकांना मात्र विशिष्ट वेळेत प्रवास करता येतो आहे, म्हणूनच मी जाऊ शकले. बहुतेक दुकानं छोट्यामोठ्या आस्थापना सुरू झाल्या आहेत, तिथे काम करणारे पुरुष बस, रिक्षा यानेच प्रवास करत आहेत, परिणामी रस्ता वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. या पुरुषांचा प्रवासावर खूप खर्चही होतो आहे, तो अनेकांना परवडणारा नसणार आहे.
माझ्या मदतनीस बायकांवर मागे लिहिलं होतं. एकीचा नवरा, दारुड्या होता, आजारी पडून, महिनाभर हाॅस्पिटलात काढून, लाखभर रुपये खर्च झाल्यानंतर वारला. त्याची रिक्षा होती, कर्ज होतं, बायकोने सोन्याचे दागिने विकले होते त्यासाठी शिवाय. या पठ्ठ्याने विम्याचा हप्ता भरायचाय हे हिला सांगितलंच नाही. या सगळ्या भानगडीत शेवटी रिक्षाही हातातून गेली. नवरा गेला. दागिने गेले. तिचा धाकटा मुलगा कर्णबधीर आहे. नशिबाने जवळच पालिकेची या मुलांसाठीची शाळा आहे. नोव्हेंबरपर्यंत त्याचे आॅनलाइन थोडे तरी वर्ग सुरू होते. नंतर जसजसे निर्बंध उठत गेले, लोक कामावर जाऊ लागले, तसतसं मुलांजवळ कोणी नाही, त्यांच्यासाठी फोन उपलब्ध नाही अशी वेळ आली आणि आता वर्ग बंदच आहेत.
दुसऱ्या बाईचे वडील आजारी होते, तेही गेले, पण ते सुटले म्हणायचे. तिचा भाऊ एका जिममध्ये नोकरी करायचा. बाकी अनेक जिम सुरू झालीत, याचं जिम नाही सुरू झालं अजून. दुसरी नोकरी लागली आहे, रोज १२ तास ड्यूटी आणि रविवारीही सुटी नाही. पण पगार वेळच्या वेळी मिळतोय म्हणून तो जातोय.
एसएससी बारावीच्या परीक्षांच्या तारखा लागल्या आहेत, काहीशी निश्चितता आली आहे त्यामुळे. मुलांना अभ्यास करायला तरी जरा जोर येईल त्यामुळे अशी आशा. एमए करणाऱ्या मुलांचं वर्ष आॅगस्टमध्ये संपेल असं सांगण्यात आलं आहे. सीबीएससी बारावीच्या परीक्षांच्याही तारखा आल्या आहेत, पण त्यांना पुढच्या एका महिन्यात मुलांकडून प्रचंड कामं करून घ्यावी लागणार आहेत, ती जवळपास अशक्य कोटीतली आहेत, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. कसं काय होणार, काय ठाऊक?
अनेक हाॅटेलं बंद झालीत, अनेक नवी सुरू झालीत. पण जी सुरू राहिली आहेत, त्यांचा धंदा निम्म्यावर आलेला आहे.
कपड्यांच्या दुकानांमध्ये फारशी गर्दी नाही, म्हणजे साड्या वगैरेंच्या. रोजच्या किंवा साध्या कपड्यांना मात्र भरपूर मागणी दिसते आहे.
लग्नं होऊ लागली आहेत, सध्या तरी १०० पाहुण्यांची मर्यादा आहे. त्याचा फायदाही अनेकांनी घेतला आहे.
सध्या मुंबईत रात्री थंडी आणि दिवसा ऊन अशी परिस्थिती आहे, प्रदूषण प्रचंड आहे, सर्दीखोकलातापाचे खूप रुग्ण आहेत. आणि या सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच उभा राहातो आहे, करोना तर नाही?
अजून अनिश्चितता कमी झालेली नाही हे मात्र निश्चित.

field_vote: 
0
No votes yet