आजचा सुधारक – एप्रिल २०१२ (गुणवत्तापूर्ण शिक्षण विशेषांक)

भारतीय बालकांना नि:शुल्क आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा अधिनियम (Act) एप्रिल २०१० पासून लागू झाला. ‘आजचा सुधारक’चा ताजा अंक त्या विषयाशी संबंधित विशेषांक आहे. मंजिरी निंबकर आणि सुबोध केंभावी हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. अधिनियमात उल्लेख असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टाबाबत विचारमंथन करण्यासाठी १४-१५ जानेवारी २०१२ रोजी सेवाग्राम (वर्धा) इथे एक संमेलन आयोजित केलं गेलं होतं. त्यात सहभागी झालेले शिक्षक, अधिकारी, कार्यकर्ते आणि तज्ज्ञ यांच्या विचारांवर आधारित लेख या अंकात आहेत.

‘सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण लेखन’ या विषयाच्या चौकटीत भारतातल्या परिस्थितीचा धावता आढावा सुषमा शर्मा यांच्या लेखात घेतलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते २००५च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यापर्यंतचा हा आढावा आहे. या आराखड्याचं स्वरूप त्यात मांडलेलं आहे. कागदोपत्री तरी हा आराखडा उत्कृष्ट वाटतो.

या आराखड्याची उद्दिष्टं साध्य करायला वर्गात काय करायला हवं हे आधुनिक शिक्षणशास्त्रातल्या तत्त्वांच्या आधारे नीलेश निमकर यांनी आपल्या लेखात मांडलं आहे. मुलांना भयमुक्त कसं करावं, मुलांची बोली भाषा प्रमाण नसली तरी तिचा कितपत आदर करायला हवा अशा कळीच्या प्रश्नांचा इथे विचार केलेला आहे. आदिवासी मुलांच्या निवासी शाळेत चार-पाच वर्षं घालवलेली मुलं आपापसात आपल्या घरच्या भाषेत आणि पाहुण्यांशी प्रमाण भाषेत बोलतात आणि तरीही त्यांच्या भाषेच्या वापरातला सहजपणा आणि रसरशीतपणा हरवत नाही, अशी शिक्षणपद्धती कशी असावी याविषयीचं त्यांचं म्हणणं मनोज्ञ आहे. बहुसंख्यांना दडपण आणणाऱ्या गणित-विज्ञान या विषयांच्या बाबतींत आपले अनुभव सांगताना मुलांच्या परिसराशी जोडून घेऊन विषय सोपा करता येतो हे त्यांना कसं पाहायला मिळालं, किंवा चुका करत करत शिकणं मुलांना कसं फायद्याचं झालं यासारखे त्यांचे अनुभव वाचण्यासारखे आहेत.

शिक्षणाविषयी चांगली ध्येयं प्रत्यक्ष आचरणात आणताना काय अडचणी येऊ शकतात हे गिरीश सामंत यांनी आपल्या लेखात मांडलं आहे, तर शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मूल्यमापन कसं असायला हवं याविषयी विवेक माँटेरो यांनी लिहिलं आहे. इथे केवळ विद्यार्थ्यांचं वैयक्तिक मूल्यमापन अभिप्रेत नाही. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या एकंदर मूल्यमापनाचा एक भाग म्हणून ते इथे येतं. त्याशिवाय वर्ग, तालुका अशा अनेक स्तरांवरच्या मूल्यमापनाविषयी ते बोलतात. शिक्षणशास्त्र, संख्याशास्त्र अशा क्षेत्रांतल्या उपलब्ध ज्ञानाचा आधार माँटेरो यांनी घेतला आहे. त्याशिवाय प्रत्यक्ष आचरणात काय घोटाळे होतात किंवा केले जातात तेदेखील त्यांना माहीत आहेत. संकलित मूल्यमापन नैदानिक (diagnostic) पद्धतीनं कसं वापरता येतं याचं प्रत्यक्ष उदाहरण मधुरा मणेर आपल्या लेखात देतात. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मूल्यमापनापेक्षा त्यांचं मन न दुखावता त्यांची वाढ कशी होईल याविषयीचे आपले विचार वैशाली गेडाम मांडतात. अधिनियमानुसार आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्व मुलांपर्यंत कसं पोचवता येईल याचा एक आराखडा प्रियदर्शिनी कर्वे यांनी मांडला आहे. प्रचलित प्रारूप (model) आणि ज्ञानरचनावादी प्रारूप यांतला फरक त्या स्पष्ट करतात. त्याप्रमाणे सरकारची मदत घेऊन आणि ती न घेता अशा दोन्ही पद्धतींनी चांगलं काम कसं करता येईल असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन त्या लिहितात. गीता महाशब्दे यांची प्रस्तावना आणि मंजिरी निंबकर यांचा समारोप अंकाची चौकट स्पष्ट करतो.

नयी तालीम (वर्धा), प्रगत शिक्षण संस्था (फलटण), शैक्षणिक संदर्भ (द्वैमासिक) अशा, म्हणजे शिक्षणक्षेत्रात नवनवे प्रयोग करणाऱ्या संस्थांशी निगडीत असणारे उच्चशिक्षित आणि नावाजलेले शिक्षणतज्ज्ञ आणि चंद्रपूरला किंवा आदिवासी पाड्यावर शिकवणारे प्रयोगशील शिक्षक यांच्या एकत्रित सहभागामुळे अंक लक्ष वेधून घेतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

श्री दत्तप्रसाद दाभोलकरांच्या पत्रांच्या निमित्ताने दिवाकर मोहनींचे प्रत्युत्तर वाचनीय आहे. Smile तसेच नंदा खरे यांचे वृद्धाश्रमाबाबतचे छोटे पत्र ही विचार करायला लावते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

श्री दत्तप्रसाद दाभोलकरांच्या पत्रांच्या निमित्ताने दिवाकर मोहनींचे प्रत्युत्तर वाचनीय आहे. तसेच नंदा खरे यांचे वृद्धाश्रमाबाबतचे छोटे पत्र ही विचार करायला लावते.

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
माहितगार

वाचले पाहिजे एकदा.

आजपावेतो आम्ही फक्त आमच्या कोल्हापुरी दादांच्या लेखनाने समाजात परिवर्तन आणणारे साधनाच वाचतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २