ते कुटुंब

त्या कुटुंबाची ओळख थोडीशी योगायोगाने -अपघातानेच झाली. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा मुलगा पहिली-दुसरीत होता आणि त्याला त्याच्या शाळेनंतर काही तास रहाता येईल अशा पाळणाघराचा आम्ही शोध घेत होतो. पाळणाघर घराच्या जवळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे, (आणि स्वस्तही पाहिजे!), मुलांना थोडीशी शिस्त लावणारेही असावे, पण शिस्तीचा फार मोठा बडगा उगारणारेही नको, जागा मोकळी, मुलांना खेळता येईल अशी असावी, मुलाच्या बरोबरीची चार मुले असावीत... कोणत्याही पालकांच्या ज्या सर्वसाधारण अपेक्षा असतील, त्या अपेक्षा घेऊनच हा शोध चालला होता. एकतर आपल्या मुलामुलींना पाळणाघरात ठेवायचे म्हणजे संवेदनशील पालकांच्या मनात पहिली भावना येते ती म्हणजे अपराधीपणाची. ('...कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात एक कोपरा असा असतो की जेथे तो तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ इच्छित नाही. कारण अशा आंतड्याच्या ठिकाणी तडजोड करावी लागली की सगळे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते. पुढे पुढे हीही शरम नाहीशी होऊन मन निबर होऊन बसते ही माणसाची खरी शोकांतिका...' हे आठवावे असे आयुष्यात अनेक प्रसंग येतात, त्यातलाच हा एक.) ही वेळ ज्यांच्यावर आली आहे त्यांनाच या अपराधीपणामागची वेदना कळेल. पाळणाघरात आपल्या रडत्या मुलांना सोडून मन घट्ट करुन बाहेर पडताना 'इज इट वर्थ इट?' हा प्रश्न प्रत्येक आई-बापाला पडत असावा. स्वतः थकून घरी परत येताना पाळणाघरात आपल्या मुलाला आणायला गेलो आणि आपापल्या पालकांची वाट बघत बसलेली रडवेल्या चेहर्‍याची मुले बघीतली की पोटात जी कालवाकालव होते त्याला तर तोड नाही. मग किमान आपण नसताना आपले मूल जरा बर्‍या ठिकाणी वाढावे अशी अपेक्षा मनात तयार होते. तसलेच काहीसे मनात घेऊन काहीशा नाराज मनाने आम्ही हा शोध घेत होतो. आधी बघीतलेल्या काही पाळणाघरांमधली अस्वच्छता, काहींमध्ये जाणवलेली कडक लष्करी शिस्त यांनी मन जरा चरकलेच होते. असाच शोध घेत असतानाच त्या काकूंचे नाव कळाले. एका अपार्टमेंटच्या आउटहाऊसमध्ये त्या काकूंचे कुटुंब राहात होते. ते जोडपे, त्यांच्या आजी आणि शाळकरी वयाची दोन लहान मुले. तिथेच त्या काकू काही मुलांसाठी घरगुती पाळणाघर चालवीत होत्या. शांत, सात्विक, प्रेमळ चेहर्‍याच्या त्या काकूंना भेटल्यावर प्रथमदर्शनीच समाधान वाटले. त्या घरातल्या इतर माणसांचे चेहरेही हसरे, प्रेमळ होते. घर छोटेसेच होते, पण स्वच्छ, नीटनेटके आवरलेले होते. शिवाय आमच्या घराच्या अगदी जवळ होते. मुलाला तेथे ठेवायचे ठरले.
मग सुरवातीचे अस्वस्थतेचे काही दिवस, मुलाचे हळूहळू त्या पाळणाघरात रुळणे आणि मग मनावरचे दडपण दूर होणे अशा सगळ्या टप्प्यांमधून गेल्यानंतर जरा मोकळे वाटू लागले. मुलालाही हळूहळू त्या घरची सवय होत होती. त्या घराची आर्थिक परिस्थिती सामान्यच होती, पण लोक कष्टाळू होते. सज्जन होते. आपल्या घरी सांभाळायला दिलेल्या मुलांना त्या काकू लळा लावत. त्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी मुद्दामून ध्यानात ठेऊन त्यांना घरी त्यांच्या आवडीचे काही खायलाप्यायला करत. त्यांची दोन मुले अगदी समजूतदार, आपल्या परिस्थितीची जाणीव असलेली आणि हसरी होती. त्यातला मोठा मुलगा दिसायला थोराड प्रकृतीचा, वयापेक्षा थोडा मोठा दिसणारा पण अगदी निरागस होता. कॉलनीत कुठेही भेटला की आवर्जून थांबून काय काका, कसे आहात वगैरे विचारत असे. घरी मदत म्हणून तो दिवाळीत फटाके विकायचा छोटा व्यवसाय करत असे. धाकटा तर अगदीच पोर होता. पण मुले अगदी गुणी होती.
हळूहळू ही मुले मोठी झाली. माझ्या मुलाचे पाळणाघरात राहाण्याचे दिवस संपले. पण त्या कुटुंबाशी -विशेषतः त्या दोन मुलांशी- आमचे संबंध टिकून राहिले. माझ्या मुलाचे तर हे दोन चांगले मित्रच आहेत. काही दिवस गेले की माझ्या मुलाला त्या काकूंची, त्यांच्या मुलांची आठवण येते. मग तो त्यांना भेटून येतो. माझ्या मुलाला त्या काकूंचा हातची बटाट्याची भाजी आवडते. हे मुद्दाम लक्षात ठेऊन माझ्या मुलाच्या बोर्डाच्या परीक्षेच्या आधल्या दिवशी त्या काकू भाजीचा डबा घेऊन आमच्या घरी आल्या. फिरायला गेलो की त्या कुटुंबातले कुणीतरी भेटते. एकमेकांच्या खुशालीची चौकशी होते. त्या कुटुंबातल्या थोरल्या मुलाने आधी इकडेतिकडे बरेच काही केले आणि मग तो जाहिरात, लेखन या क्षेत्रात शिरला. आज तो मराठी नाटककार- चित्रपट कथा-संवादलेखक म्हणून उदयाला येतो आहे. त्याचे एक नाटक मराठी रंगमंचावर चांगलेच गाजते आहे. गेल्या वर्षी रंगमंचावर आलेले हे नाटक त्या वर्षातील सगळ्यात यशस्वी नाटक ठरले आहे. आता तर त्या नाटकावर चित्रपटही तयार होतो आहे. काही चित्रपटांचे संवाद, काही जाहिराती असे एकंदरीत त्याचे बरे चालले आहे. धाकटा उत्कृष्ट छायाचित्रकार झाला आहे. कुणाकुणाचे त्यांने काढलेले फोटो, कुणाकुणाबरोबरचे त्याचे फोटो विविध माध्यमांतून बघायला मिळताहेत. कोणकोणत्या सेलेब्रिटीजबरोबरचे त्याचे फोटो आणि त्यांतला त्याच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास बघीतला की बरे वाटते. आयपीएलचा एका वर्तमानपत्राचा अधिकृत छायाचित्रकार म्हणून ते ओळखपत्र हातात घेतलेला फोटो फेसबुकवर अगदी हिट होऊन गेला. आज पेपर उघडला की चार ठिकाणी त्या मुलांची नावे दिसतात. आपापल्या व्यवसायात गुरफटलेली ही मुले - मुले कसली हे तरुण- आता कधीकधीच भेटतात. भेटले की बाकी आवर्जून थांबतात. त्याच अगत्याने कसे आहात काका म्हणून विचारतात. अरे तुझ्याबद्दल कळत असतं काहीकाही, नाव वाचतो तुझं पेपरात, टीव्हीवर दिसतोस तू कधीकधी ... बरं वाटतं खूप वाचून तुमच्याबद्दल असं काही मी म्हणालो की किंचित लाजून, बरेचसे बरे वाटून हसतात आणि बरंय, येतो काका असं म्हणून आपापल्या मोटारसायकलींवरुन फर्रकन निघून जातात. ती मुले गेलेल्या दिशेला मी काही काळ बघत राहातो.
यात जगावेगळे असे काही नाही. काहीच नाही. कष्टातून, प्रामाणिकपणातून, कुणाला गंडवागंडवी न करता, टोप्या न घालता पुढे येणार्‍या कुटुंबांची अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पहात असतो, नाही असे नाही. असे साधे, प्रामाणिक तरुण आपापल्या वाटा शोधून काढत असतात, आपापल्या कुटुंबातील लोकांच्या कष्टांचे चीज करत असतात.
पण हेच जगावेगळे आहे. कुणाचे मोठेपण तो किती पैसा कमावतो यात आहे, त्याने तो पैसा कसा कमावला याला काही महत्त्व नाही. सगळी मोजमापेच स्क्वेअर फूट, जीबी, तोळे, टक्के अशी झाली आहेत. नुसते चित्र बघीतले तरी ओकारी यावी इतके सोन्याचे दागिने अंगावर आणि नुसते चित्र बघीतले तरी अंगावर शहारा यावा इतपत मस्ती चेहर्‍यावर असलेल्या एका राजकारणीपुत्राचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन करणारे भेसूर फलक गावभर लागले आहेत. लँडमाफिया म्हणून तुरुंगाची हवा खाऊन आलेले एक गेंडाकातडी नगरसेवक अधिकाराच्या जागेवर प्रस्थापित झाले आहेत. त्यांच्याहून जाड कातडी असणारे दुसरे एक दादा चौदा सालच्या निवडणुका लढवण्याची गुर्मी करताहेत. बोलेरो, स्कॉर्पिओ, कडक स्टार्चचे पांढरे कपडे, दोन-तीन मोबाईल फोन, गळ्यात, हातात सोन्याचे भरपूर दागिने, दरवर्षी तिरुपती, दर पौर्णिमेला शिर्डी, दादा, भाऊ, आप्पा, वाढदिवसाच्या शुभेच्छा असले काही किंवा याचसारखे इतर काही.... या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सज्जनपणा, साधेपणा आणि कष्ट यातून सरळ मार्गाने आयुष्यात वर येत रहाणार्‍या या मुलांचे, या कुटुंबाचे विशेष वाटते ते यामुळे. बाकी काही नाही.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

"साधे, प्रामाणिक तरुण आपापल्या वाटा शोधून काढत असतात, आपापल्या कुटुंबातील लोकांच्या कष्टांचे चीज करत असतात..." हे खरे,, पण एकदा यश मिळाले (पैसा/प्रसिद्धी) की गतायुष्याबद्दल लाज बाळगून त्याकडे पाठ फिरवण्याचे दिवस आहेत. ही मुले खरोखरीच गुणी आहेत. आजही ती ओळख दाखवतात, आपुलकीने बोलतात यातच त्यांचे मोठेपण आहे. आणि मुले प्रसिद्ध झाली तरीही त्यांचा मोठेपणा न मिरवता बटाट्याची भाजी घेऊन येणार्‍या त्यांच्या मातोश्रीही आगळ्याच आहेत. 'ते' कुटुंब सर्वसामान्यांत न मोडणारे आहे.

बाकी, हत्तीला बांधायचा साखळदंड सोन्याने बनवून स्वतःच्या गळ्यात मिरवणार्‍या पोस्टरबॉईजबद्दल बोलायलाच नको. तेच आजच्या समाजाचे सर्वसामान्य चित्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या लहानपणी आईचा एक विद्यार्थी आमच्याकडे पेपर (वर्तमानपत्र) टाकायला येत असे. लहान वयातच त्याचे केस पिकले होते. घरची परीस्थिती खरच बेताची होती , सालस होता. दूधाच्या बाटल्या टाकणे, वर्तमानपत्र टाकणे अशी सचोटीची कामे करून, शिकत असे. आम्हाला कौतुक वाटत असे.
________
आईने नेहमी अशी (सन्जोपरावांनी वर उधृत केलेली) उदाहरणे आमच्यासमोर ठेवली ज्यायोगे आपल्याहून दुर्दैवी आणि तरीही रडत - कुढत न बसणारे लोक दिसून चांगला आदर्श सतत डोळ्यासमोर राहील.
__________

>> बोलेरो, स्कॉर्पिओ, कडक स्टार्चचे पांढरे कपडे, दोन-तीन मोबाईल फोन, गळ्यात, हातात सोन्याचे भरपूर दागिने, >> याला म्हणतात"नवा पैसा हातात खुळखुळणे".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वसामान्य आणि असामान्य या व्याख्या, किंवा त्यांची मानके, किंवा त्यांचे मापदंड यांचा हा मुद्दा आहे. हे तिन्ही (किंवा अधिकही) घटक आपापल्या भूमिकांतून, दृष्टिकोनातून साकार होतात. त्यामुळं ही भूमिका, किंवा हा दृष्टिकोन काय असावा हा प्रश्न उमटला पाहिजे, त्याची उत्तरे दिली गेली पाहिजेत. त्या उत्तरानुसार भूमिका किंवा दृष्टिकोनात बदल झाले पाहिजेत. अशी काही प्रक्रिया या आणि अशा लेखनातून साध्य झाली तरी ते लेखनाचे यश असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मोठेपणा' कशाला म्हणायचं याबाबतची परिभाषा आणि समज बदलत चालली आहे असं एकंदर चित्र दिसत आहे. पण ही नेहमीच बदलत होती? की अलिकडेच बदलते आहे? ही समज मजबूत आणि प्रभावी बनण्यासाठी किती 'क्रिटिकल मास' लागतो आणि तो मुळात कशाकशाने बनतो (त्यावर कशाचा प्रभाव पडतो) हे पण पाहण्यासारखं असत अनेकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी कुटुंब त्यातील व्यक्ती पाहण्यात आहेत
रखरखीत वास्तवात वाऱ्‍याच्या सुखद झुळुकेप्रमाणे त्यांच अस्तित्व जाणवतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

'साधी रहाणी उच्चविचासरणी' मानणार्‍या काकुंच्या कुटुंबाचा प्रवास 'उच्च रहाणी उच्च विचारसरणीकडे' गेलेला वाचुन बरे वाटले. मात्र ही रहाणी कष्टातून आली असल्याने व विचारसरणी पालकांकडून मिळाली असल्याने असे झाले असावे का?
साधारणतः यापुढल्या पिढीला आयत्या मिळणार्‍या गोष्टींचा विचार करता प्रवास '(अति)उच्च रहाणी (अगदीच) साधी विचारसरणी'कडे होऊ नये ही सदिच्छा!

अवांतरः एकूणच अनेकदा ही पिढ्यांची साईन वेव्ह चालू रहाते का? असा प्रश्न पडतो म्हणजे एखाद्या पिढीने कष्टात दिवस ढकलणे --> पुढल्या पिढिने कष्टातून बाहेर येऊन सुस्थितीत येणे --> पुढल्या पिढीने सुस्थितीतून संपन्नतेकडे कष्टाने वाटचाल करणे --> यापुढील पिढीला मिळाणार्‍या गोष्टींची किंमत माहित नसल्याने सगळे उधळणे किंवा (अति)संपत्तीच्या तिटकार्‍यातून सारे काही फुंकून देणे --> पुन्हा ये रे माझ्या मागल्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाचायला जरा उशिरच झाला आहे पण फार आवडला लेख,
स्वाती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. मुलांना पाळणाघरात सोडताना वाटणारी बोच आताशा कमी होउ लागली. कुटुंबाचे चित्रण आवडले.
लेख वाचायला जरा उशीरच झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/