‘द रीडर’... अनुवादः अंबिका सरकार

‘द रीडर’

(मूळ जर्मन कादंबरी: बर्नार्ड श्लिंक, मराठी अनुवाद: अंबिका सरकार, राजहंस प्रकाशन, पहिली आवृत्ती: ऑगस्ट २००९, पृष्ठे: १५४)

गेल्या वर्षी 'लोकसत्ता-लोकरंग-पुस्तकाचे पान' येथे हा पुस्तक-परिचय प्रसिध्द झाला आहे. आंतरजालावर तो धागा सापडत नाहीये. त्यामुळे तोच लेख इथे जसाच्या तसा देत आहे. "ऐसी अक्षरे" च्या रसिक वाचकांसाठी खास -----

‘द रीडर’......

माणसाला आपल्या आजवर जगून झालेल्या आयुष्याकडे नव्या नजरेने बघताना कसं वाटतं? पूर्वायुष्यातील घटनांचे नवे अन्वयार्थ लावता येतात का? त्याच्या मनाला सदसद्विवेकबुध्दीची टोचणी लागून त्याचा परिणाम त्याच्या सुख-दु:खाच्या व्याख्या बदलण्यात होतो का? बर्नार्ड श्लिंक ह्यांनी जर्मन भाषेत लिहिलेल्या आणि अंबिका सरकार ह्यांनी इंग्रजीवाटे मराठीत अनुवाद केलेल्या ‘द रीडर’ कादंबरीतील प्रमुख पात्रं, मायकल आणि हाना ह्यांच्यातील नातं समजून घेताना ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत होते.

ना धड बाल्य, ना धड तारुण्य अशा उंबरठ्यावरील पंधरा वर्षांचा मायकल बेर्ग. एकदा शाळेच्या वाटेवर असताना त्याला अचानक मळमळायला लागतं व उलटी होते. उलटून पडलेलं अन्न, तोंडाचा आंबूस वास अशा घाणेरड्या अवस्थेत पस्तिशीतील एक प्रौढा, हाना, त्याच्या मदतीला पुढे येते. स्वच्छ होण्यासाठी पाणी देते आणि गळाठलेल्या अवस्थेतील त्याला स्त्रीसुलभ मायेने जवळ घेते.

त्याला कावीळ झाल्याचं निदान होतं आणि सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. पौगंडावस्थेतील मायकलची हानाशी झालेली ती क्षणिक, शारीरिक जवळीक स्त्री शरीराविषयीचं त्याचं कुतूहल नकळतपणे जागं करते. आपलं आजारी असणं त्याला रम्य वाटू लागतं. तो म्हणतो, "या काळात काहीही शक्य होत असतं. चांगलं आणि वाईटही." "... मी केवळ दिवास्वप्नं पाहत होतो एवढंच नव्हे, तर मी मुद्दामच नजरेसमोर तर्‍हतर्‍हेची आक्षेपार्ह कल्पनाचित्रं नि प्रसंग आणत होतो..."
कुटुंबवत्सल आई, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक-प्राध्यापक वडिल, खास विश्वासातील भाऊ-बहीण अशा कौटुंबिक वातावरणात मायकलच्या नीतीमत्तेच्या कल्पना तयार झालेल्या असतात. त्यामुळे आजारपणाच्या काळात मनात शिरकाव झालेल्या वासनेबाबत त्याला अपराधी वाटू लागतं.
हानाने केलेल्या मदतीबद्दल तिचे आभार मानण्यासाठी तो तिच्या घरी पहिल्यांदा गेलेला असतो. तेव्हा आतल्या खोलीत कपडे बदलत असलेल्या हानाला बंद दरवाजाच्या फटीतून बघण्याचा मोह त्याला अनावर होतो. अवचितपणे झालेल्या अनावृत्त स्त्री-देहाच्या दर्शनाने त्याची नजर तिच्यावर खिळून रहाते. तो तिच्याकडे बघतोय हे तिला समजल्याचं त्याला जाणवतं आणि त्याची घाबरगुंडी उडते. आपण वागलो हे चूक की बरोबर? तो गोंधळतो आणि त्यावेळी तिथून पळून जातो. पण त्याबद्दल तिची माफी मागण्याचं तो ठरवतो. पुन्हा एकदा तिच्या घरी जावं की न जावं? बर्‍याच विचाराअंती तिच्याकडे जाण्याचा निर्णय तो घेतो. आणि त्यानंतर पुन:पुन्हा तिच्याकडे जायला उद्युक्त होतो. असं खास काय घडतं त्यांच्यात?

तीन भागांत विभागलेल्या ह्या कादंबरीच्या पहिल्या भागात ओळख होते मायकल-हानाची. वयाचा अडसर नसलेली, निसर्गदत्त लैंगिक प्रेरणांनी जवळ येणारी स्त्री-पुरूषाची एक जोडी.
वाढत्या वयातील स्वप्नाळूपणा, धिटाई, कुणाच्याही विरोधाला न जुमानता स्वत:च्या मनाला प्रमाण मानून एखाद्या गोष्टीला भिडण्याचा निडरपणा ह्या गुणविशेषांसह जगणारा मायकल आणि आपल्या भूतकाळाला जाणून-बुजून दडपू बघणारी, आपलं स्वत्व सांभाळत जगणारी हाना आपल्याला दिसतात.
त्यांच्यात निर्माण झालेले भावबंध, शारीरिक जवळीक हे फक्त त्या दोघांचंच गुपित असतं. त्या काळात आपण ‘पुरूष’ असल्याची सुखद भावना मायकलच्या मनात निर्माण होते. ‘शाळेच्या वर्गात शेवटच्या बाकावर बसणारा एक नगण्य मुलगा’ हा त्याचा न्यूनगंड नाहीसा होतो. त्याच्या वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास येतो.
मायकलमुळे हाना पुस्तकांकडे आकर्षित होते. त्याच्याकडून निरनिराळ्या कलाकृती मोठ्यानं वाचून घेत असताना त्यात गुंगून जाते. शाळेच्या अभ्यासात अथवा वाचनात तो टाळंटाळ करतो आहे असा थोडासा संशय जरी आला तरी ती त्याला झिडकारते. हानाच्या ह्या पुस्तकवेडामुळे मायकल आश्चर्यचकित होतो आणि तिची तिनेच पुस्तके वाचावीत असं सुचवतो. परंतु ती सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करते आणि त्यालाच वाचन करायला भाग पाडते.
पौगंडावस्थेतील बदलांनुसार होणार्‍या शारीरिक व भावनिक उद्रेकांना सामोरं जाणार्‍या मायकल बेर्गच्या आयुष्यात अवचितपणे हानाचा प्रवेश होतो. तितक्याच अवचितपणे ती त्याच्या आयुष्यातून नाहीशी होते. तिला शोधण्याचे त्याचे सगळे प्रयत्न विफल ठरतात. तिचा ठावठिकाणा त्याला लागत नाही.

कादंबरीचा दुसर्‍या भागात मायकल-हाना अनपेक्षितपणे न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने एकमेकांना सामोरे येतात. ती आरोपीच्या पिंजर्‍यात असते आणि तो कायद्याचा पदवीधर, तिसर्‍या राईशचा अभ्यासक म्हणून त्या खटल्यात सहभागी झालेला असतो. आपल्यावरील आरोप मान्य करताना न्यायाधीशांशी युक्तिवाद करणार्‍या हानाला बघून तो अचंबित होतो. त्यावेळी इतकी वर्षं तिनं प्राणपणानं जपलेलं तिचं गुपित त्याच्या लक्षात येतं. तिचा मानीपणा आणि तो जपण्यासाठी तिने मोजलेली किंमत त्याला संभ्रमात पाडते. तो म्हणतो, ’नेहमीच तिनं आपण काय करू शकतो हे दाखवण्यापेक्षा आपण काय करू शकत नाही हे लपवण्याचा प्रयत्न केला होता.’ ती असं का वागते? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तो त्याच्या वडिलांची मदत घेतो. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या संभाषणाने त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळतं. शिवाय वडिलांच्या त्यांच्या मुलांशी (मायकल व त्याची भावंडे) तटस्थपणे वागण्याचा काहीसा उलगडा व्हायलाही ह्यामुळे मदत होतो.

तिसर्‍या भागात खटल्यानंतरच्या काळातील हाना-मायकल आपल्याला भेटतात. तिसर्‍या राईशमध्ये भाग घेतलेल्या हानाशी अज्ञानापोटी का होईना मायकलची जी जवळीक झालेली असते ती ह्या खटल्याच्या काळात आणि नंतरही बराच काळ त्याला मानसिक क्लेश देणारी ठरते. ‘तुरुंगात असलेल्या हानाला व्यक्तिश: ओळखणारा एकमेव माणूस’ अशी मायकलची ओळख त्याला त्रासदायक ठरू लागते. तो सतत तिच्याशी दुरून संपर्क साधून असतो. ती तुरूंगातून सुटून बाहेर आल्यावर तिची रहाण्याची, कामाची व्यवस्था करण्याचं तो मान्य करतो. तरीही तिला प्रत्यक्ष भेटण्याचं टाळत राहतो. तुरुंगाधिकारी बाईंच्या आग्रहाखातर तो नाईलाजास्तव तिला भेटायला जातो. इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर ती दोघं एकमेकांना कशी सामोरी जातात? त्यांच्यात काय संभाषण होतं? आणि ह्या नात्याचं शेवटी काय होतं. हानाशी असलेल्या संबंधाचं गुपित राखणं मायकलला शक्य होतं का?

त्यांच्या पहिल्या भेटीनंतर हानाविषयी वाटलेल्या शारीरिक आकर्षणापायी त्याच्या मनाची झालेली चल-बिचल आणि त्यामुळे मनात निर्माण झालेली अपराधीपणाची भावना, तिच्या अचानक निघून जाण्याने पुन्हा एकवार त्याला ग्रासून टाकते. ‘... ती दिसली तेव्हा चटकन पुढे होऊन मी तिच्याकडे का गेलो नाही? ... मी काही केलं नाही. आता खूप उशीर झाला होता...’
नकळत का होईना परंतु आपण एकेकाळी जिच्याकडे देहभावनेने आकर्षित झालो त्या हानाचा भूतकाळ समजल्यानंतर मायकलची मन:स्थिती पुन्हा एकदा दोलायमान होते, अपराधीपणाची बोच लागते.
या ना त्या निमित्ताने मायकलच्या मनात निर्माण होत राहणारे अपराधी भाव त्याची सदसद्विवेकबुध्दि त्याला सतत टोचत असल्याचे द्योतक आहेत हे संपूर्ण कादंबरीभर जाणवत रहातं.

‘माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी माझ्याबाहेर उभा राहून स्वत:ला निरखीत होतो.’ असं म्हणत पौगंडावस्थेतल्या आकर्षणापायी दुसर्‍या महायुध्दाशी निव्वळ योगायोगाने जोडल्या गेलेल्या मायकलचे अलिप्तपणे लिहिलेलं हे आत्मकथन अनेक पातळ्यांवर आपल्याला विचारप्रवृत्त करतं. माणसाच्या वेगवेगळ्या वयोगटात असणार्‍या शारीरिक-भावनिक गरजा आणि त्यांच्या पूर्ततेची निकड ह्या टप्प्यावरून सुरू झालेलं हे कथानक! माणुसकीला आव्हान करणारी युध्दं, त्यात बळी गेलेल्या निरपराध व्यक्ती, त्यांच्या मरणाला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरलेले हुकुमाचे ताबेदार, त्यांचा न्याय-निवाडा करण्यासाठी निर्माण झालेले कायदे, ह्या कृत्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेले मनोबल, अशा विविधांगांना स्पर्श करते.

जर्मन भाषेतील ही कादंबरी इंग्रजी भाषेवाटे मराठी भाषेतही इतक्या सकसपणे अनुवादित झाली आहे की ती जणू मूळ मराठी भाषेतच लिहिली गेली असावी असं वाटतं. हाना मायकलशी बोलताना वापरत असलेले ‘बच्चू’ हे संबोधन विशेष उल्लेखनीय! त्या दोघांच्या वयातील फरकाचा आणि तरीही जुळलेल्या अनिर्बंध नात्याचा अंदाज ह्या संबोधनाने येतो. त्याचप्रमाणे जर्मन शब्दांचे मूळ उच्चार वापरल्याचेही जाणवते. उदा. जर्मन कवी, ज्यांच्या नावाचा उच्चार सरकटपणे ‘गटे’ असा करतात तो मूळ भाषेप्रमाणे ‘गऽथ’ असा येतो.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील आणि तीनही भागांच्या सुरूवातीला असणार्‍या अर्थपूर्ण चित्रांमधून संपूर्ण पुस्तकाचा आणि त्या-त्या भागाचा सारांश यथार्थपणे व्यक्त झाला आहे.

माणुसकीला काळिमा फासणार्‍या दुसर्‍या महायुध्दातील ज्यूंच्या छळछावण्यांमध्ये असंख्य निरपराध माणसं मृत्युमुखी पडली. त्या काळात हुकूमशहांच्या हुकुमांची ताबेदारी पत्करावी लागल्याने अपराधीपणाचा शिक्का कायमचा मागे लागलेली, हानासारखी माणसं मेलेल्या मनाने जगली असतील. ज्या घटनेशी आपला थेट संबंध नाही तरीही नैतिक जबाबदारी मानून मूल्यविवेकाने जगू बघणार्‍या मायकलसारख्या माणसांचं जगणं, आपण कुणाच्या सहवासात होतो हे कळल्यानंतर अपराधीपणाच्या भावनेनं काळवंडून गेलं असेल.
अशा परिस्थितीशरण माणसांच्या जगण्याचं वास्तवदर्शी चित्रण करणारी ही कादंबरी वाचून संपते त्यावेळी आपलं मन सुन्न होऊन गेलेलं असतं, कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड झालेलं असतं!

चित्रा राजेन्द्र जोशी.
ईमेल पत्ता - chitrarjoshi@gmail.com

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

नक्की वाचलं पाहिजे असं वाटलं. इतक्या विस्तृत परिचयाबद्दल आभार
पुस्तक कुठे उपलबध आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश,
हे पुस्तक पुस्तकांच्या दुकानांतून मिळू शकेल. उदा. ठाण्यातील मेजेस्टिक, पुण्याचे रसिक साहित्य, अक्षरधारा, इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकसत्तात आलेल्या मूळ लेखाचा दुवा

पुस्तक बुकगंगावर उपलब्ध आहे - दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
माहितगार

माहितगार,
मनःपूर्वक धन्यवाद, दुवा मिळवून दिल्याबद्दल! नाव सार्थ ठरवलेत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कादंबरी पुष्कळ वर्षांपूर्वी इंग्रजीतून वाचली होती तेव्हा रोचक वाटली होती. नंतर त्यावर एक चित्रपट आला तो मात्र कादंबरीतल्या गुंतागुंतीला स्पर्श करू शकला नव्हता असं वाटलं.* दुसर्‍या महायुद्धात जगलेल्या आपल्या आधीच्या पिढीबद्दल लेखकाच्या पिढीतल्या जर्मनांना मोठं अपराधीपण वाटतं. निवडक कट्टर उजवे सोडता जवळजवळ अख्ख्या देशाच्या जनमानसाचं प्रातिनिधित्व त्यामुळे कादंबरीतला मुलगा करतो. ज्यांच्याविषयी प्रेम/अनुकंपा/आपुलकी वाटते, आणि ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहावं अशी सर्वसाधारणतः कोणत्याही समाजात अपेक्षा असते अशा माणसांनी अत्यंत घृणास्पद गोष्टींत सक्रीय भाग घेतला होता हे ज्ञान उद्ध्वस्त करणारं असतं; पण नायक त्याच्याशी कसा भिडतो यातून कुठेतरी त्या पिढीबद्दल एक हृद्य भाष्य कादंबरीत आहे. नायक त्यातून पूर्णपणे उजळून निघत नाही, पण तावून-सुलाखून मात्र निघतो. त्या मधल्या पिढीच्या जबाबदार वागण्यामुळे आजचा तरुण जर्मन त्या अपराधीपणाच्या भावनेतून जवळजवळ मोकळा झालेला दिसतो हे कादंबरीतून प्रतीत होतं. म्हणजे कादंबरी व्यक्तिगत गोष्टीतून सामाजिक-राजकीय भाष्य करते.

* कादंबरीतली मध्यमवयीन हाना ही अतिशय सामान्य वाटणारी, रूढ अर्थानं सुंदर नसणारी किंबहुना थोडी कुरुप किंवा बेढबच असावी, पण चित्रपटात केट विन्स्लेटला तिच्या भूमिकेत दाखवल्यामुळे कादंबरीचा सूर हरवला आणि ती हॉलिवूडची तद्दन प्रेमकथा झाली असं वाटलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंतातुर जंतू,

तुमच्या प्रतिक्रियेशी संपूर्ण सहमत!
कादंबरी वाचल्यानंतर लगेचच चित्रपट बघितला. मनातील हाना चित्रपटात भेटली नाही. परंतु, कादंबरीची पारायणे केलेली असल्याने मायकल आणि हाना ह्यांच्याविषयी आणि एकंदरीतच त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या समाजाविषयी मनात कणव भरुन राहिलेली होती. शिवाय उत्तम अभिनय, भावनांचं प्रकटीकरण ह्या जमेच्या बाजू होत्या. चित्रपट बघितला गेला तरीही ‘आवडला’ असं म्हणणं कठीण आहे.

अत्यंत प्रामाणिकपणे आणि तटस्थपणे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील स्वत:कडे बघत-निरखत माणसाचं तावून-सुलाखून निघणं हे त्याला जगताना कितीही त्रासादायक होत असलं तरीही माणूस म्हणून उंच पातळीवर नेतंच नेतं!

ह्याच लेखकाचं Guilt about the Past: by Bernhard Schlink बघितलं. जाणवलं की कादंबरीतून व्यक्त करण्याचं राहून गेलेलं ह्या पुस्तकात उतरलं असावं.
तुम्ही हे इंग्रजी पुस्तक जरुर वाचा आणि त्याविषयी इथे लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कादंबरी वाचलेली नाही पण चित्रपट पाहिला आहे. लेख वाचताना अनेक गोष्टी चित्रपट पाहून मला समजल्या नव्हत्या का असा प्रश्न पडला. जर्मनीतली नात्झी काळाबद्दल घृणा किंवा एकूणच तो सर्व इतिहास संपूर्णतः काळा आणि त्यामुळे तिरस्करणीय मानणं मायकलच्या पात्रातून दिसत रहातं. पण त्या पात्रातले इतर अनेक कंगोरे चित्रपटात दिसले नाहीत.
केट विन्स्लेटच्या अभिनयाबद्दल काही निगेटीव्ह टिप्पणी मलातरी पटणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहमत.
मला आवडला होता सिनेमा, पण मी आधी सिनेमा पाहिला होता, तेही कारण असू शकेल. शिवाय मला केट विन्स्लेट खरंच खूप आवडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघना,

आपल्या आवडत्या कलाकाराला बघताना इतर गोष्टी बाजूला सारल्या जात असाव्यात. मी विचारात पडले आहे, मला खरंच खूप आवडणारा कलाकार कोण बरं आहे, की ज्याच्या असण्याने मी बाकी सारे बाजूला सारु शकते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३_१४ विक्षिप्त अदिती,

कादंबरी आणि सिनेमा... शब्द आणि दृश्य.... ह्यात नक्कीच फरक आहे. जे बारकावे शब्दांत व्यक्त करता येतात ते दृश्यरुप घेऊ शकत नाहीत आणि जे दृश्यरुप असतं ते शब्दांत पकडता येत नाही.
त्यामुळे अनेक गोष्टी समजल्या नाहीत असं वाटणं साहजिक आहे.

शिवाय हा सिनेमा उत्तम अभिनय, भावनांचं प्रकटीकरण ह्या जमेच्या बाजू (मी हे ह्याआधीच स्पष्ट केलं आहे) असल्याने बघितला गेला.

विजय पाडळकर हचांदणं’‘चंद्रावेगळं चांदणं’ हे पुस्तक कादंबरी आणि त्यावर आधारित सिनेमा अशा लेखांचं आहे. ते जरुर वाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कादंबरी वाचलेली नाही मात्र चित्रपट पाहिला आहे. चित्रपट आवडला होता पण तो बघताना त्यात काही गोष्टिंची कमतरता जाणवली होती. ती कसली ते ही ओळख वाचून लक्षात आलं.

उत्कृष्ट कथा-कादंबर्‍यांवर आधारीत चित्रपट नेहमीच पुस्तकापेक्षा कमी पडतात. त्याविषयीच्या कारणांवर अनेकदा चर्चा झालेली आहे. तीच कारणां इथेही लागू व्हावीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...