वाचावंच असं राकेश मारिया यांचं आत्मचरित्र

(पुस्तक परिचय आहे, स्पाॅयलर अलर्ट देऊन ठेवते आहे.) (ही समीक्षा नाही.)
राकेश मारिया हे नाव मुंबईकरांना फारच ओळखीचं. माझ्यासाठी विशेष मुद्दा म्हणजे माझी पत्रकारितेची सुरुवात झाली त्याच्या एकदोन वर्षं आधीच ते मुंबईत रुजू झाले होते आणि १९९३च्या बाॅम्बस्फोटाचा तपास त्यांनी केला होता त्यामुळे ते तुलनेने लहान वयात प्रकाशझोतात आले होते. तेव्हापासून ते गेल्या वर्षी निवृत्त होईपर्यंत हा पोलिस अधिकारी चर्चेत राहिला, बऱ्याच अंशी चांगल्या कामामुळे. त्यामुळे त्यांचं 'लेट मी से इट नाउ' हे पुस्तक गेल्या वर्षी आल्यापासून वाचायचं ठरवलंच होतं, ते अखेर गेल्या आठवड्यात मिळालं वाचायला.
मारिया यांचा जन्म मुंबईतला, वांद्रे पश्चिम इथला. ते स्वत:ची ओळख अ बँड्रा बाॅय अशी करून देतात. वडील पंजाबी आणि आई हिमाचली. जेसुइट शाळेत आणि काॅलेजात शिक्षण. वडील हिंदी चित्रपट क्षेत्रात संगीत संयोजन वगैरे काम करत त्यामुळे घरी सतत कलाकारांचा, दिग्दर्शकांचा राबता असे. शाळा अत्यंत शिस्तीची, आईही शिस्तीची. मारिया वडलांबरोबर अनेकदा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात, चित्रपट क्षेत्र त्यांनी जवळून पाहिलेलं. तरीही, किंवा म्हणूनच, त्यांना तिथे जावंसं वाटलं नाही. खेळांची प्रचंड आवड, अनेक खेळ ते खेळत. पोलिस व्हायचं हेच स्वप्न. भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा पहिल्या झटक्यात उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्या पाचही प्राधान्य क्रमांवर त्यांनी पोलिस सेवाच लिहिलं होतं. त्यांनी महाराष्ट्र काडर निवडलं असल्याने त्यांची संपूर्ण कारकीर्द महाराष्ट्रातच गेली. खामगाव, अकोला, उस्मानाबाद या शहरात काही वर्षं काम केल्यानंतर त्यांना मुंबईत पाठवण्यात आलं. सहसा इतक्या लवकर मुंबईतलं पोस्टिंग मिळत नाही त्यामुळे तेही चकित झाले होते.
एक मुंबईकर म्हणून पुस्तक मी प्रचंड एंजाॅय केलं याचं मुख्य कारण पुस्तकात येणारे बहुतेकसे संदर्भ ओळखीचे होते. ठिकाणं, व्यक्तींची नावं, आणि घटना हे सगळं ओळखीचं. मुंबईत वाढल्याने ते मराठी चांगलं बोलतात. पुस्तकात अनेक संभाषणं मूळ मराठीत आहेत, इंग्रजी अनुवादासह.
दुसरं कारण मला एकूणच या प्रकारची पुस्तकं आवडतात. गेल्या दोन महिन्यात मोसाद आणि एमआय ५।६ या दोन संघटनांवरची भलीमोठी पुस्तकं वाचलीत. हे पुस्तक त्याच धाटणीचं. याची भाषा उत्तम आहेच, अजिबात बाेजड नाही. मधेच असलेला विनोदी शिडकावाही हवाहवासा.
मारिया यांनी मुंबईवर आलेल्या अनेक संकटांचा तपास केलेला आहे. ते सगळे प्रसंग अनुभवलेले असल्याने ते वाचणं थरारक होतं. १९९३चे बाॅम्बस्फोट, नंतर गुरुपौर्णिमेला लोकलमध्ये झालेले बाॅम्बस्फोट, शक्ती मिल बलात्कार, एस्थर अनुया बलात्कार आणि खून, शीना बोरा खून, वगैरे. २६/११ बद्दल वाचताना मात्र मी अतिशय अस्वस्थ होऊन गेले कारण तेव्हाही एकतर मी फिक्सर म्हणून काम करत होते, नंतर अनेक दिवस ते फाॅलो करत होते. आणि ते दिवस एकुणातच मुंबईकरांसाठी प्रचंड भीतीचे, तणावाचे, दहशतीचे, अनिश्चिततेचे होते. मारिया यांच्यावर त्या रात्री पोलिस नियंत्रण कक्ष सांभाळायची जबाबदारी आयुक्तांनी टाकली होती. तेव्हा तिथे नक्की काय परिस्थिती असेल, कसं हाताळलं असेल त्यांनी याची पूर्ण कल्पना पुस्तकात याचं तपशीलवार वर्णन असूनही आपण करू शकत नाही, कारण ती वेळच भीषण होती. मला हा भाग वाचवेना आणि तो टाळून पुढेही जाववेना.
त्यांनी यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार लिहिलेलं नाही, किंवा फार तपशील दिलेले नाहीत. पण जे आहेत त्यावरनं एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबावर काय ओढवत असेल याची कल्पना नक्की येते.
गेले आठ दिवस कामातून वेळ काढत जमेल तसं वाचत होते, आज दुपारी वाचून झालं. आता रिकामं वाटायलंय फार. मारिया यांचा इमेल शोधून त्यांना लिहिणार आहे नक्की.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet