जयंत पवारचा मृत्यू आणि इतर गोष्टी

अगदी अलीकडे म्हणजे पंधरा दिवसांपुर्वीच प्रदीप कोकरे या माझ्या पुस्तकवाल्या मित्राकडून जयंतचे दोन नवे कथासंग्रह मागवले, ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ आणि ‘मोरी नींद नसानी होय’ पैकी ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ नाही मिळाला. “आवृत्ती संपली, आता रिप्रिंट केल्यावरच मिळेल,” असं प्रदीप म्हणाला. कथासंग्रह नाही, तर लेखकाचा मृत्यूच मिळेल इतक्या अनाहूतपणे असं वाटलंच नव्हतं. बहुदा जयंतला निरवानिरवीची वेळ आल्याची कुणकूण लागली असावी, असं मला ‘लेखकाचा मृत्यू…’ प्रकाशित झाली, तेव्हाच वाटून गेलं होतं

असो. काल त्याचा अचेतन देह पाहिल्यावर मेंदू सुन्न झाला, मानवी चिरवेदनेचा शोध घेणारे त्याचे डोळे मिटलेले, त्याच्या मिटत्या स्वभावाप्रमाणे... मागची काही वर्ष तो आजाराशी झुंजत होता, अध्येमध्ये उमेदीनं बरा होत होता, तरीही कधीतरी हे होणार, हे माहीत असूनही त्याचा मृत्यू पचवता येत नाही. माणूस मर्त्य असतोच, तो कधी तरी जाणार हे असं क्लिशेड आपल्याला ठाऊक असतंच, तरी सर्वहारांचं जग इतकं पोटातून लिहिणारा हाडामासाचा माणूस एक दिवस अकाली मातीआड जाणार आणि पुन्हा कधीही दिसणार नाही, हे काही पचवता येत नाही. लेखकाचे शब्द लाख अमर होत असतील, पण त्याचा स्पर्श, आवाज ? तो कुठून आणणार? लेखक काही नुसताच शब्दांचा बनलेला नसतो, शब्द मर्त्य- अमर्त्याच्या मधली पोकळी भरू शकतात, पण ते पुरतातच असं नाही. हे आता लिहिण्यात काही फार थोरपण नाही, किंबहुना मला वाटलं, आपल्या पेशाला जडलेल्या मृत्यूलेख लिहिण्याच्या भिकार सवयीला राम राम ठोकण्याची वेळ आलेली आहे. अमुक लेखक गेला...लिहा मृत्यूलेख, तमुक कलाकार गेला, लिहा मृत्यूलेख...अरे काय चाललंय काय आपलं? मृत्यूलेखांचं पीक नुसतं. महाश्वेतादेवी गेल्या मृत्यूलेख...कविता महाजन गेली मृत्यूलेख. लेखकाच्या हयातीत तरी त्याच्या लिखाणाशी वाचक म्हणून किती न्याय करतो आपण? आणि गेल्यावर मृत्यूलेख. अशा लेखांचं काहीएक महत्त्व जरुर आहे पण त्याची निराकार सवय होत जाणं महावाईट. तरीदेखील हा मृत्यूलेख किंवा तत्सम मी आता लिहिते आहेच की...ते का?

जयंत पवार पुस्तक
छायाचित्र श्रेय - निखिल वाघमारे

तर आज सकाळी मी मॉर्निंग वॉकसाठी बहिणीसोबत वर्सोव्याला गेले. समुद्रकिनाऱ्यावर आम्ही फिरत होतो. किनाऱ्याला लागून अर्थातच अति-उच्चभ्रूंच्या मोठ्या वसाहती होत्या. आम्ही वाळूवरून चालत या टोकावरून त्या टोकावर चाललो होतो...पण दोनएकशे मीटर चालून थबकलो. कारण पुढे दोन-तीन माणसं संडासला बसली होती, उघड्यावर...आम्हाला येताना बघून त्यांची जी अवस्था झाली, ते पाहून मेल्याहून मेल्यासारखं झालं नि आम्ही आल्यापावली उलट फिरलो. उच्चभ्रू वसाहती आणि जिथे ही माणसं उघड्यावर बसली होती, त्यात पाचशे मीटरचंही अंतर नसेल. पण एका टोकावरची माणसं एकोणिसाव्या मजल्यावर घरात कमोडवर बसून खिडकीतून सुंदर समुद्र पाहू शकतात आणि तिथून काहीच मीटर अंतरावरच्या माणसांना रोजच्या विधीसाठी समुद्राकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. दोघांना दिसणाऱ्या, अनुभवता येणाऱ्या समुद्रात किती अंतर आहे. आणखी पुढे आलो तर किनाऱ्याजवळ चार कचरावेचक दिसलेले. काळवंडलेली शरीरं, भयानक उदासी, रिकाम्या पोटात खिन्नता घेऊन बसलेले ते चार जीव पाहून जयंताची दरदरून आठवण आली. हे कचरावेचक समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणार...उघड्यावर बसलेल्या त्या माणसांसारख्याच अनेकांनी किनाऱ्यावरचे उंची टॉवर्स बांधले असतील, तरी किनाऱ्यावरच्या स्वच्छ हवेचे, निवांतपणाचे, क्वचित फुलणाऱ्या श्रृगांराचे, एकांताचे लाभधारक मात्र हे नाहीतच.हे चित्र प्रत्यक्ष बघतो, तेव्हा पोटात ढवळून निघतं. याआधीही पाहिलेल्या अशा कित्येक प्रसंगी जयंताची आठवण हटकून यायची. या अवाढव्य महानगरांतली सगळी कष्टकरी माणसं आपल्याला आपली कशी काय वाटतात? आपल्या आणि त्यांच्या दु:खाची जातकुळी एकच नाही, तरी मजूर, सफाई कामगार, भाजी विकणाऱ्या बायका, घरकाम करणाऱ्या बायका, बुर्जी पाव विकणारे, हॉटेलातली पोरं हे सगळे आपले कोण लागतात? आपलं पोट भरलेलं आहे, पण आसपासची खपाटीला गेलेली पोटं बघून आपले डोळे का वाहतात, या प्रश्नांची उत्तरं जयंताच्या कथेत आणि त्यातल्या माणसांमध्ये आहेत. या माणसांची भूक आणि जगणं, जगणं आणि मरणं, असणं आणि नसणं, त्यांच्या जगण्यातल्या पोकळीशी तादात्म्य पावण्यासाठी तिथवर घेऊन जातो जयंत.

जयंत पवारांच्या कथेतली माणसं

२०१५-१६ मध्ये मी महाराष्ट्र1 वृत्तवाहिनीत काम करत होते. तेव्हा चिंचपोकळी, सिताराम मिल्स, कमला मिल्स, आर्थर रोड भागात रोज जाणं, फिरणं व्हायचं. तिथल्या रिकाम्या, भकास मिल्सच्या मोठाल्या भिंती बघून पोटात ढवळून यायचं, तेव्हाही जयंतच्या, ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ची स्फोटक आठवण यायची. तेव्हा लिहिलेला एक तुकडा

‘चिंचपोकळीच्या पुलावरुन पलीकडे
स्काय स्क्रेपर
अलीकडे मी, माझी छटाकभर स्वप्नं
आणि सिगरेटचं थोटूक
कामगार सांडलेले बुर्जी पावच्या गाड्यांवर
पिळल्या आतड्यातली भूक एकवटून
अलीकडं नारायण सुर्वे
पलीकडं अमर नाईक
फक्त या पुलावरुन पलीकडे जाता येत नाही
वा अलीकडेही’

हे असं काय काय आत भरून राहिलेलं आता फुटलंय. अशी अस्वस्थता उरीपोटी दाटू शकली आणि नुसतीच भावनेच्या पातळीवर न राहता, शोषण म्हणजे काय, त्याचे अंतस्तर हे सारं राजकीय-सामाजिकदृष्ट्या समजून घेण्याच्या शक्यता जयंतच्या कथांमुळे निर्माण झाल्या. माणसं त्यांचे वर्तनव्यवहार, मनोव्यापार किती भिन्न असतात आणि त्याच्या मुळाशी वर्गअस्तित्व, वर्गजाणीव किती खोलवर रुजलेली असते, हे दाखवण्याचं काम या कथांनी केलं. अन्यथा हेगेल, मार्क्स, एंगल्स काय म्हणतो, हे समजून घेण्याचा अवकाश प्रत्येकापाशी नाही आणि अकथात्म साहित्यातून ते समजून घेणं तेवढं सोपं तरी आहे का? असो. तर अशा भवतालाचा कोलाहल बरोब्बर चिमटीत पकडणारं त्याचं बहुमितीय असणं, आता असं तुकड्यातुकड्यात आठवतंय आणि हळूहळू त्या मूर्त नसण्याच्या जाणिवेने एकेक कोपरा ठसठसतोय, त्यामुळे कॅथार्सिस हा एक अतिशय स्वार्थी हेतू हे तुकडे लिहिण्यामागे आहे.

तसं जयंताच्या कथांबद्दल अनेक जाणत्या माणसांनी याआधी लिहिलं आहे. यानंतरही लिहिलं जाईल, त्याबद्दल मला खूप बोलायचं नाही. म्हणून ‘इतर गोष्टी’.

जयंता मी पाहिलेला मराठीतला पहिला हँडसम लेखक. उंचापुरा, व्यवस्थित टक इन केलेला शर्ट, चश्म्यातून विशिष्ट कोनात धीरगंभीरपणे समोरच्याकडे बघण्याची त्याची एक खास लकब, त्याची फ्रेंच कट दाढी हे सगळं हे त्याच्या वेगळ्या अस्तित्वाची नेहमीच जाणीव करून द्यायचं. लेखक म्हणजे सदरा, जाकीट घातलेला, विशिष्ट टोप्या, खांद्यावर शबनम ल्यालेला माणूस अशी लेखकाबद्दलची माझी विशीतली ठोकळेबाज इमेज मूर्त रुपात तोडणारा हा पहिला लेखक...पुढे कथा म्हणजे अमुक अमुक अशा माझ्या चौकटीतल्या धारणांनाही त्याच्या कथांनी जोरदार तडाखे दिले. उदा., ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट अर्थात सड्डम मे टड्ढम’, ‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’, ‘बाबलच्या आयुष्यातलं धादांत सत्य’, ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ अशा कित्येक गोष्टी. ‘अधांतर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, आणि भयव्याकूळतेनं सतत गदागदा हलवत राहणारं ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ अशा नाटकांतून अंतर्बाह्य हादरवून सोडणारा हा लेखक. जागतिक दर्जाच्या कथा लिहिणारा हा या पिढीतला मोठा लेखक, नाटककार आहे हे कुणीही सांगेल. पण मला त्याने माझ्या पिढीला दिलेलं मूल्यभान महत्त्वाचं वाटतं, जे येण्यात अर्थातच त्याच्या कथांचा मोठा वाटा आहे आणि हे त्याच्या कथेचं यश आहे. सगळीकडेच दिसणारं - माणसाचं होत असलेलं अवमूल्यन सांगताना त्याची भाषा अशी की, पिढ्यांचं अंतर गळून पडावं. हा आपल्याच वर्गातला किंवा शेजारचा मित्र आहे नि त्याच्या खांद्यावर हात टाकून चहाच्या टपरीवर जाऊन फक्या माराव्यात नि त्यातही हा मित्र हृदयात कालवणारं गहनगंभीर बोलत बसावा, आपण ऐकत राहावं अशी त्याची भाषा.

एकदा या मित्रासोबत मुंबई फिरायला हवी, असं मला ‘फिनिक्सच्या राखेतून…’ वाचल्यानंतर वाटू लागलं. तसं त्याला फोनवर बोलूनही दाखवलं, पण तोवर तो मटातून निवृत्त झाला नव्हता, त्यामुळे रोजचा कामाचा व्याप आणि तब्येतीचं कारण झालं. निवृत्त झाल्यावरही अनेकदा तब्येतीनं उचल खाल्ली. मग पुढे फोनवर बोलणंही अवघड.

साठोत्तरी पिढीतल्या लेखकांचा, त्यांना दिसलेल्या मुंबईच्या रोमँटिसिझमचं भूत अजूनही सवार असल्याने जयंतासोबत सातरस्त्यापासून नरीमन पॉईंटपर्यंत फिरणं, गिरण्या उजाड व्हायच्या आधीची मुंबई ऐकणं कितीतरी समृद्ध करणारं असेल...असं कैकदा वाटलं. आता हे राहिलंच. पण तरीही तो भेटत राहील मुंबईत ठिकठकाणी. चिंचपोकळी, डिलाईल रोड, ना.म.जोशी मार्ग, काळाचौकी, लालबाग, परळ, नरे पार्क, वाडिया अशा मुंबईच्या अंगोपांगी जयंत सामावलेला आहे किंवा त्याच्या अंगोपांगी मुंबई! अगदी गिळनारा फिनिक्स मॉलसुद्धा! 'फिनिक्सच्या राखेतल्या त्याच्या नायकासह, 'खून करण्यापेक्षा प्रेताची विल्हेवाट लावणंच साला कठीण'

ही कविता लिहिणारा अरुण काळेही असाच अध्येमध्ये कुठे कुठे भेटत राहतो. जयंताच्या या कथेतलं ‘काव्य’ आणि अरुण काळेंच्या कवितेतली ‘कथा’ एकत्र वाचणं हा फारच भेदक अनुभव आहे.

जयंताने आमच्या पिढीला आपल्या मातीशी, भवतालाशी इमान राखायला शिकवलं. अराजक माजलेल्या नि सत्याचा आवाज क्षीण होत जाण्याच्या काळात तुम्ही शांतपणे वा बोलून पण एक बाजू निवडायचीच असते, भूमिका घ्यायचीच असते, त्याचवेळी ज्याविरोधात भूमिका घ्यायची त्याबद्दल स्पष्टता असणं आणि मतभेदांसकटही समविचारींसोबत पुढे जाण्याची निकड आणि धोरणीपणा अंगी बाणवताना एकजूट, मानवतेच्या बाजूनं लढण्यासाठी लागणारी अभेद्यता राखण्यासाठी प्रयत्न करणं हेही त्याच्याकडून अप्रत्यक्षपणे मिळतच होतं.

मला आठवतं...२०१५-१६ च्या दरम्यान कधीतरी दया पवार स्मृती पुरस्कार सोहळ्याकरता त्याला अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं होतं. भाषणाची सुरुवात करताना तो म्हणाला, ‘नमस्कार, जयभीम, लाल सलाम!’ ही तीन तीन संबोधनं ऐकून मलाही तेव्हा बावचळायला झालं, कारण तेव्हा माझ्या आसपास या नाही तर त्या टोकालाच गेलं पाहिजे, असा हट्टाग्रह धरणारी, ध्रुवीकरण करणारी अनेक माझ्या वयाचीच माणसं होती, त्यांचा प्रभाव माझ्यावरही होत होता आणि माझीही समज कुंपणातलीच! त्यामुळे जयभीम-लाल सलाम म्हणायचं तर नमस्कार म्हणायची काय गरज? असं मलाही वाटलं. एक तर एक काही का ठरवता वा बोलता येऊ नये? अतिशय प्रिय लेखक असला तरी जयंता गोंधळलेला आहे का किंवा तिन्ही गटांना खूश करण्याचा प्रयत्न करतोय का, अशी चर्चाही तेव्हा मित्र-मैत्रिणींसोबत झालेली. ती चर्चा किती फालतू आणि उथळ होती, ध्रुवीकरणाकडे नेणारी होती, याची पुढे दोनच वर्षांत प्रचिती आली.

जात-वर्ग-लिंगभेदाची लढाई सुटी-सुटी नाही, तिन्ही वेगवेगळं काढता येत नाही, हे आधी थियरी म्हणून माहीत असलं तरीही प्रत्यक्षात व्यापक लढाई लढताना आणि विशेषत: फॅशिस्ट लोक डोक्यावर बसले असताना किती एकोप्याची गरज आहे, प्रसंगी आपापले अंतर्गत मतभेद बाजूला सारून पुरोगामी वर्तुळांनी, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन समोर उभ्या ठाकलेल्या कॉमन शत्रूचा नि:पात करणं, हेच या घडीचं राजकीय शहाणपण आहे, याची तेव्हा पहिल्यांदा प्रकर्षाने जाणीव झाली, जयंताच्या त्या संबोधनाचा दोनच वर्षांनी पुन्हा अर्थ लावताना अशा माणसांचं आसपास असणं, आपली खुजी समज विकसित करण्यासाठी किती गरजेचं आहे, हेही नीटच कळलं. अनेक गटांना खुश करण्यासाठी नव्हे तर एकत्र बांधून ठेवण्यासाठी तत्त्वांशी तडजोड न करताही त्यांच्या आस्था, भावना जपता येऊ शकतात. वैचारिक लढे लढण्यासाठी ह्रदयातला ओलावा हद्दपार करायची गरज नसते, किंबहुना त्यामुळे माणसं तुमच्यापासून तुटतात, हा मोठाच धडा त्याच्याकडून मिळाला. अशा एकेक एनलायटनिंग गोष्टींनी माझं जयंतावरचं प्रेम वाढतच गेलं. पुढे २०१९ मध्ये माझ्या पहिल्या अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन त्याच्या हस्ते झालं, त्यादिवशी तर जणू माझे हात आभाळालाच टेकले होते.

सगळं जगणंच शतखंडितेत जगणाऱ्या माझ्या पिढीला या लेखकाने आत्मभान दिलं. व्यक्ती ते समष्टी या प्रवासात भरभक्कम साथ दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही शब्द थिटे पडतायत.

मुंबईतल्या किती तरी जागा, टपऱ्या, बुर्जी पावच्या गाड्या, मजूर अड्डे, उजाड झालेल्या गिरण्या पाहताना यापुढेही जयंताची दरदरून आठवण येणार आहे. त्याच्या लेखनाला स्मरून व्यवस्थेतल्या तळाच्या माणसाप्रती करुणा बाळगण्याव्यतिरिक्त, सर्व अन्यायांविरोधात मुठी वळण्याव्यतिरिक्त आपण काय करू शकतो? जयंतालाही बहुधा हेच अपेक्षित असावं! हरतऱ्हेच्या शोषणाविरोधात व्यापक एकजूट आणि माणसा-माणसांत घट्ट बंध विणू पाहणाऱ्या या प्रिय लेखकाला, नमस्कार- जयभीम आणि लाल सलाम!

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

फार छान लेख आहे. जयंत पवारांच्या जाण्याने फार अस्वस्थ होतो / आहे. ही अस्वस्थता एका मित्राला बोलून दाखवल्यावर त्याचीही तशीच काहीशी मनस्थिती आढळली. आम्हां दोघांचीही पवारांशी नाटकं/कथा सोडता प्रत्यक्ष ओळख नव्हती. आमच्यासारखे सामान्य लोक हळहळावेत यापेक्षा वेगळं यशाचं माप ते काय?

प्रतिमा जोशींपासून ते अतुल पेठेंपर्यंत अनेकांनी लिहिलेले श्रद्धांजलीपर लेख वाचले. इतक्या कमी काळात, बसलेल्या धक्क्यामुळे जवळच्या लोकांनी लिहिलेल्या लेखांचा सूर थोडा भावनिक असणं स्वाभाविक आहे. पण पवारांच्या लेखनाची समग्र आणि विस्तृत समीक्षा अद्याप वाचनात आली नाही. येत्या काही महिन्यांत ती येईल अशी आशा करू या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुह्मी वर उल्लेखिलेले श्रद्धांजली लेख कुठे वाचायला मिळतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रात्रंदिन आह्मां युद्धाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन….

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रात्रंदिन आह्मां युद्धाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन….

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अतिशय सामर्थ्यवान लेख आहे तुमचा. वाचताना डोळ्यात पाणी दाटले. जयंत पवारांचे लिखाण वाचलेच पाहिजे. सद्यःपरिस्थितीचा सामना करायला मदत होईल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

लेख मनाला फार भिडला. मी जयंत पवारांचे काहीच वाचलेले नाही याची चुटपुट वाटते आहे.

अवांतर: स्वत: आंबेडकरांना जय भीम-लाल सलाम ही जोडगोळी किती रुचली असती याविषयी साशंक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जयंत पवार यांचे फार काही वाचलेले नाही. मात्र त्यांचे अधांतर हे नाटक प्रचंड आवडले होते. वरील लेख आणि प्रतिसादात आलेले काही इतर श्रद्धांजलीपर लेख वाचून पवार यांचे लेखन वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0