नाशिक साहित्य संमेलनातल्या माफक गंमतीजमती

नाशिक साहित्य संमेलनाला गेले होते, तिथल्या छोट्या नोंदी.
एरवी मी संमेलनाला मुद्दाम जाण्यातली नाही, पण एक तर या वेळी घरी परिस्थिती अशी होती की कोणताही विचार न करता चार दिवस बाहेर राहणं सहज शक्य होतं. नोकरी सोडल्यानंतर आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मी खूप भटकले, तरी नाशिक तसं जवळ असल्याने मोह झाला. (पावणेदाेन वर्षांचा भटकंतीचा अनुशेष भरून काढला आहे, आता गुमान घरी बसून काम करायचं.) एका मित्राने पटकन राहायला ये घरी असं आवतण दिलं. त्याच्या घरापासून रेल्वे स्टेशन आणि संमेलन स्थळ (भुजबळ नाॅलेज सिटी ऊर्फ MET ऊर्फ कुसुमाग्रज नगरी) बऱ्यापैकी जवळ आहे म्हणाला. आणि मी ट्रेनची तिकिटं काढली. संमेलनात काय कार्यक्रम असणारेत वगैरे काही माहीत नव्हतं. पण संमेलनात बोअर होणार नाही हे निश्चित ठाऊक होतं. त्याला शनिवार रविवार सुटी होती त्यामुळे कंटाळा आलाच तर नाशिक फिरता येणार होतं.
याआधी मी पाच संमेलनं पाहिली होती. पहिलं शिवाजीपार्कचं १९९९ मधलं. म्हणजे ठाकरे, बापट, बैल वगैरे वाद झालेलं.
दुसरं ठाण्याचं २०११मधलं. तेव्हा चक्क रजा काढून मौज, ज्योत्स्ना, रोहन प्रकाशनांच्या एकत्रित स्टाॅलवर तिन्ही दिवस काम केलं होतं. धमाल येते पुस्तकं विकत घेणाऱ्यांशी डील करायला मला. त्यात ज्योत्स्नाची बरीचशी पुस्तकं मुलांसाठीची. मुलं आणि आईबापांमधले संवाद म्हणजे मनोरंजनाची खात्री.
एक वर्षी सासवडला चक्कर मारली होती एक दिवस मैत्रिणीबरोबर. तिथले कार्यक्रम आठवतायत थोडे. तिथे माझा वाईचा काका माझ्यासाठी काहीतरी घेऊन आला होता, आणि त्या प्रचंड गर्दीत आमची भेट होऊ शकली याचंच मला प्रचंड अप्रूप वाटलं होतं. तिथे पुस्तकांच्या स्टाॅलची रचना इतकी विचित्र होती की काही घडलं तर आपण आतच अडकू अशा भीतीने मी पाच मिनिटांत तिथनं बाहेर पडले होते. आणि भयंकर धूळ होती सगळीकडे. तिथली सीताफळ बासुंदी आठवतेय पण!

image1

डोंबिवलीचं २०१७चं संमेलन कव्हर केलं होतं दिव्य मराठीसाठी. फार त्रासाचं होतं ते. मला आठवतंय, डोंबिवलीला उतरून रिक्षा केली तेव्हा सांगितलं, संमेलन आहे तिथे जायचंय. तर तो म्हणाला, संमेलन, वो क्या है? स्टेशनात, बाहेर, रस्त्यांवर एकही फलक/पाटी नव्हती संमेलन कुठे आहे, कसं जायचं सांगणारी. हाच अनुभव नाशकात. रेल्वे स्टेशनात उतरल्यापासून पहिला फलक दिसला तो मेटसाठी डाव्या बाजूला वळल्यानंतर. म्हणजे मुख्य रस्त्याच्याही आत. गावात असतील बोर्ड, पण मी गावात नाही गेले. गावातून बस होत्या अर्थात, माेफत आणि हात दाखवा बस थांबवा तत्त्वावर चालणाऱ्या. त्यामुळे गावातल्या लोकांची चांगली सोय झाली.
संमेलनाच्या ठिकाणी पुस्तकांचे स्टाॅल इथेही जरा विचित्र होते, मोठ्या C आकारात साधारणपणे. त्यामुळे एका टोकाकडून चालायला सुरुवात करून ३० किंवा ४० स्टाॅल फिरूनच माणसं दमून जात आणि उलटी फिरत. त्यामुळे या सीच्या मध्यावर असलेल्या स्टाॅलवर गर्दी कमी होती. बाकी स्टाॅलवर बऱ्यापैकी होती आणि सतत होती. सहसा संमेलनातल्या पुस्तक प्रदर्शनात शाळा आणि सार्वजनिक ग्रंथालयांची मोठी खरेदी होते. परंतु कोविडमुळे यंदा हा खप जवळपास शून्य होता.
शनिवार आणि रविवार मिळून मला खूप मित्रमंडळी भेटली, काही अनपेक्षित तर काही ठरवून. मी रामदास भटकळांच्या मुलाखतीला बसले होते अर्धा तास पण नवीन काहीच ऐकायला मिळेना म्हटल्यावर उठले. ही मुलाखत मुख्य मंडपात होती जो प्रचंड मोठा होता, आणि रिकामा होता. उद्घाटन आणि समारोपाला मात्र खचाखच गर्दी होती. बाकी कार्यक्रम, कार्यशाळा, वगैरे या कँपसमधल्या काही इमारतींमध्ये होते. कँपस भलंमोठं आहे, इमारती आधुनिक आहेत. मोकळ्या जागा, चांगले रस्ते आहेत. हिरवळ आहे. कँपस मोठं असल्याने, हजारो विद्यार्थ्यांची सोय असल्याने स्वच्छतागृहं भरपूर होती, स्वच्छ होती, पाणी होतं. जे आधीच्या ठिकाणी पाहिलं नव्हतं कधीच.

gfQTGT.jpg

एक मोठी अडचण होती ती म्हणजे नेटवर्क. एअरटेलला जवळपास शून्य नेटवर्क होतं. जिओ आणि आयडिया थोडं होतं. त्यामुळे माझ्या किती तरी जणांच्या भेटी हुकल्या कारण कोण कुठे आहे ते कळणंच शक्य नव्हतं. पुस्तक विक्रेत्यांनाही त्रास झाला, किंवा ग्राहकांनाही म्हणू शकतो, जीपे वा क्रेडिट कार्डने पेमेंट होत नव्हतं किंवा फार वेळ लागत होता. यावर काहीतरी उपाय आधीच करायला हवा होता खरं तर, कारण ही समस्या सगळ्यांनाच येत होती. मागे आयडियात असलेल्या एका मित्राने सांगितल्याचं आठवतंय की पंढरपूरच्या वारीसाठी त्यांनी तात्पुरत्या टाॅवरची सोय केली होती. तसं काहीतरी करायला हवं होतं. मला एक कोपरा सापडला जिथे नेटवर्क येत होतं. मग दर दोन तासांनी तिथे जायचं, मेसेज पाहायचे, गरज असल्यास फोन करायचा आणि परत यायचं.
खायचीप्यायची चंगळ होती तिथे. म्हणजे प्रतिनिधींसाठी कूपन होती दिलेली, पण जेवणाच्या ठिकाणी लंगर लावला होता जणू. कूपन पाहातच नव्हते. फुकट मिळतंय म्हटल्यावर ही गर्दी उसळली होती तिथे. मग पुस्तकांच्या स्टाॅलवर असणाऱ्या माणसांना कूपन दाखवून आत कसाबसा प्रवेश मिळवावा लागला. तिथली एक चांगली गोष्ट म्हणजे ताटात अन्न टाकायला मनाई होती, चक्क २०० रुपये दंड होता. काही जणांकडून तो वसूलही केला म्हणे. शेजारी स्टाॅलही होते, पैसे देऊन खाण्याचे. डोसा, पुरणाचे मांडे, मोदक, थालिपीठ, वडापाव, आप्पे असे बरेच पदार्थ होते, ते चांगलेही होते आणि रास्त किमतीत होते.
पुस्तकांच्या स्टाॅलमध्ये एक स्टाॅल पैठणीचा होता चक्क आणि एक लोकरीच्या जाकिटांचा.
शनिवार अर्धा दिवस आणि रविवार पूर्ण मी ज्योत्स्ना प्रकाशनच्या स्टाॅलवर घालवला. मित्रमंडळी भेटली पण निवांत गप्पांना अर्थात वेळ नव्हता. नेटवर्क नव्हतं त्यामुळे कदाचित, पण शाईफेक प्रसंगही नंतर कळला.

gfQ6H7.jpg

शनिवारी रात्री मित्राच्या कुटुंबाबरोबर गंगेवर गेले. घाट बघून थेट बनारसची आठवण आली. आणि रविवार कारंजा परिसरात बनारसला मिळतं तसंच लोखंडी कढईत तापत असलेलं दूध मिळतं ते प्यालं, वर कढईच्या बाजूला जमा झालेली साय घातलेलं. बनारसला या प्रकाराला खुर्चन म्हणतात. पण नदीचं पात्र जे काही आक्रसून टाकलंय ते पाहून काळजाला भोकं पडली. नदीला काँक्रीटने इतकं बंदिस्त करून टाकलंय की थोडासा पाऊस झाला तरी पूर कसा येतो याचं नवल वाटायला नको.
एकुणात हे माझ्यासाठी फक्त संमेलन होतं, साहित्याच्या निमित्ताने. पुढचं उद्गीरला आहे, पण मराठवाड्यात मार्च महिन्यात जाण्यात काहीच पाॅइंट नसल्याने आपला पास.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फोटो छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

भारतात कुठेही भरपूर स्वच्छतागृहं होती, ती स्वच्छ होती, पाणी होतं, वगैरे वर्णनं, तीही बाईकडून ऐकली की भरून येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सासवडला तात्पुरती स्वच्छतागृहं उभारली होती, पण तिथे पाणी नव्हतं! सासवडला पंढरपूरच्या वारीचा एक मुक्काम असतो. संमेलनाच्या निमित्ताने कायमची स्वच्छतागृहं बांधायची संधी होती खरं तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

संमेलनाला मुद्दाम न जाणाऱ्याला या आधी पांच संमेलनांना जावं लागलं होतं, हा विरोधाभास वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही पार्लेकर!

पत्रकारिता केली अनेक वर्षं त्यामुळे कामासाठी जावं लागे. आणि संमेलनाला मुद्दाम न जाण्याचं कारण सहसा ठिकाण मुंबईपासून दूर असणं आणि तिथे राहायची सोय नसणं हे. नाशिक तीन तासांवर आहे जेमतेम. आणि मित्रमंडळींना भेटणं, विशेषकरून पावणेदोन वर्षं घरात काढल्यानंतर, याचं आकर्षण जास्त होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

ह्या मध्ये मराठी भाषा कशी अजुन समृध्द होईल,विज्ञान विषयातील शिक्षण मराठी मध्येच देण्यासाठी मराठी भाषेत नवीन शब्द आले पाहिजेत.
ह्या वर चर्चा व्हावी.
जगातील उत्तम साहित्य मराठी मध्ये उपलब्ध असावे ह्या साठी काय करता येईल ह्या वर चर्चा हवी.
समलेनाचा उद्देश हा मराठी भाषेची समृद्धी हाच असावा.
हे भोळे स्वप्न आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

शिर्षकात लिहीलंय गमती जमती. पण गंमत जंमत वगैरे कुठे दिसली नाही लेखात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0