Skip to main content

पुस्तकपरिचय - गुणसूत्रांमुळे आपली शैक्षणिक पात्रता ठरते का?

सप्टेंबरमध्ये प्रा. कॅथरीन पेज हार्डन यांचं The Genetic Lottery: Why DNA Matters for Social Equality हे पुस्तक प्रकाशित झालं. न्यू यॉर्कर आणि गार्डियनमध्ये त्या संदर्भात लेकन आलं होतं. न्यू यॉर्करमध्ये मोठी प्रोफाईल आहे, गार्डियनमध्ये प्रा. पेज हार्डन यांची मुलाखत आहे.

द न्यू यॉर्कर - Can Progressives Be Convinced That Genetics Matters?
द गार्डियन - Kathryn Paige Harden: ‘Studies have found genetic variants that correlate with going further in school’

द जेनेटिक लॉटरी

प्रा. कॅथरीन पेज हार्डन ह्या ऑस्टिनमधल्या टेक्सास विद्यापीठात Developmental Behavior Genetics प्रयोगशाळा चालवतात आणि the Texas Twin Project नावाचा प्रकल्प चालवणाऱ्यांपैकी एक आहेत. ह्या दोन्ही लेखनांचा सारांश असा की त्यांच्या संशोधनाच्या दिशेमुळे अनेक उदारमतवादी लोकांना(ही) असं वाटतं की त्या युजेनिक्स-वादी, वंशवादी आहेत. त्या स्वतःला डाव्या, उदारमतवादी समजतात; विज्ञानाचा वापर सामाजिक शास्त्रांच्या जोडीनं, समाजाच्या भल्यासाठी करावा असा त्यांचा आग्रह पुस्तकातून दिसतो.

पुस्तकाचे दोन भाग आहेत, पहिला विज्ञानाचा आणि दुसरा भाग आता हे समजलेलं आहे तर समाजातल्या तळागाळातल्या, मागे पडलेल्या, वंचितांनी पुढे येण्यासाठी काय करू नये आणि काय करावं.

लोक बरेचदा nature or nurture असे प्रश्न विचारतात. एखाद्या मुलाची बोलण्याची कौशल्यं खूप कमी असतात; कुणी अभ्यासात खूप पुढे असतात; कुणी व्यवसायात अतिशय यशस्वी होतात; कुणावर रस्त्यावर झोपायची वेळ येते; हे कशामुळे होतं? निसर्ग का वातावरण. हा भाग समजावण्यासाठी त्यांनी एक रूपक वापरलं. तेच इथे देते. एखाद्या हॉटेलात जेवायला गेल्यावर, तो संपूर्ण अनुभव आवडायचा असेल तर बसण्यासाठी खुर्ची आवश्यक आहे का जेवणात मीठ आवश्यक आहे? दोन्ही हवेत, तेच कुणाच्याही आयुष्यातल्या महत्त्वाच्या, ठळक गोष्टींबद्दल खरं आहे.

त्यांनी एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्यांचा, आणि इतर काही जुळी आणि भावंडांचा अभ्यास केला. एकसारखी दिसणारी जुळी कधी होतात; तर जेव्हा बीजांडं आणि शुक्राणू एकत्र येतात आणि त्यातून झायगोट तयार होतो, त्याचंही विभाजन होऊन एकाचे दोन झायगोट झाले तर एकसारखी दिसणारी जुळी जन्माला येतात. मुळात एकच बीज फळलं, पण त्या फळाचे दोन भाग स्वतंत्र वाढले. एकसारखी न दिसणारी जुळी म्हणजे एकाच्या जागी दोन बीजं परिपक्व होऊन, ती फळतात. म्हणजे सख्खी भावंडं आणि एकसारखी न दिसणारी जुळी ही वैज्ञानिक अभ्यासाच्या दृष्टीनं समान असतात. इथे वैज्ञानिक अभ्यास म्हणाले, कारण दोन सख्ख्या भावंडांमध्ये बरंच अंतर असेल तर कदाचित आई-वडलांच्या परिस्थितीत बदल झालेला असेल; त्यामुळे सामाजिक परिस्थिती बदललेली असेल. पहिल्या मुलाच्या वेळेस झालेल्या/केलेल्या 'चुका' पालकांनी दुसऱ्या वेळेस दुरुस्त केल्या असतील... असो.

वैज्ञानिक अभ्यासासाठी, म्हणजे जनुकं, गुणसूत्रांमुळे काय फरक पडतो हे बघायचं असेल तर दोन एकसारख्या जुळ्यांची गुणसूत्रं जुळवून बघतात. माणसांमध्ये गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात. पैकी X आणि y सोडून देऊ. उरलेल्या २२ जोड्यांपैकी, भावंडं आणि जुळ्यांमध्येही किती साम्य आहे ते शोधायचं. (आम्ही अशा चाचण्या केलेल्या नाहीत पण), समजा माझा भाऊ आणि मी यांच्यात गुणसूत्रांची ११वी जोडी अगदी एकसारखी आहे. तर त्या जोडीच्या बाबतीत आम्ही जुळे आहोत, प्रत्यक्षात भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असला तरीही. आणि १३व्या गुणसूत्रात काहीही साम्य नसेलही. दोन सख्ख्या भावंडांमध्ये, आणि एकसारख्या नसणाऱ्या जुळ्यांमध्ये गुणसूत्रं साधारण ५०% एकसारखी असतात. एकसारख्या जुळ्यांमध्ये हे साम्य ~१००% असतं; पूर्ण १००% नसेलही कारण एकदा झायगोट वाढायला लागला, पेशींचं विभाजन व्हायला लागलं की गुणसूत्रं म्यूटेट (मराठी?) होतात. अगदी आपण जन्माला आलो तेव्हा आपला जो काही जिनोम सिक्वेन्स (मराठी?) असेल तो वय वाढायला लागल्यावर तसाच्या तसा राहत नाही. ह्या सगळ्याच गुणसूत्रबदलांचे काही दृश्य परिणाम असतात असं नाही.

तर, भावंडांमधलं गुणसूत्रसाम्य. आपली उंची किती असेल हे ठरवणारं एकच एक जनुक नाही. बरीच आहेत. एकसारख्या जुळ्यांमध्ये ही जनुकं एकमेकांसारखी असण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, सख्ख्या भावंडांच्या तुलनेत. याचा अर्थ, आपली उंची किती असेल हे आपल्या जनुकांवरून अधिक ठरतं, nature or nurture या प्रश्नाचं उंचीच्या बाबतीत उत्तर आहे nature जरा जास्त. हा जुळी आणि सख्खी भावंडं यांतला गुणसूत्र-फरक, आणि त्याचा अर्थ लावणं.

कुपोषित बालकांची, समाजांची उंची कमी असते; ही बाब निराळी. एकाच घरातल्या मुलामुलींचा अभ्यास केल्यामुळे दोन्ही भावंडांना एकसमान वागणूक मिळालेली असेल असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. भारतात अनेक समाजांत, घरांत मुलींना कमी लेखून, कमी किंवा निकस खायला दिलं जातं. अशी बाब इथे त्यांनी उल्लेखलेली नाही. याचं कारण, अमेरिकेत, टेक्सासात अशा प्रकारच्या बातम्या, चर्चा, सांगोवांगी सापडत नाही.

दुसरी बाब, ही सगळी संशोधनं गोऱ्या लोकांवर केलेली आहेत. गोरे लोक म्हणजे कॉकेशन वंशाचे. जीवशास्त्रासाठी समाजगट वर्णावरून तयार होतात; भारतीय निराळे, चिनी निराळे, जपानी निराळे; आयरिश निराळे; जर्मन निराळे; वगैरे. पण त्या लिहितात की, वंश ही संकल्पना उच्चनीचतेसाठी तयार केली आहे, तिचा जीवशास्त्राशी, विज्ञानाशी काहीही संबंध नाही. उदाहरणार्थ, अमेरिकी समाजात कॉकेशन लोक गोरे; भारतीय, चिनी, जपानी सगळे आशियाई, वगैरे. याबद्दल आणखी थोडं पुढे.

उंची हा शारीरिक गुणधर्म पॉलिजेनिक समजला जातो; कारण एकाचएका जनुकावरून उंची ठरत नाही, अनेक जनुकांचा एकत्रित परिणाम म्हणून आपली उंची किती हे ठरतं. आता येऊ विवादास्पद मुद्द्याकडे. गुणसूत्रांमुळे आपलं शिक्षण किती हे ठरतं का?

अमेरिकेत ज्यांना गोरे समजलं जातं अशा लोकांत, शिक्षण हा सुद्धा पॉलिजेनिक गुणधर्म दिसतो; म्हणजे खूप निरनिराळी जनुकं शैक्षणिक पातळी किती यावर प्रभाव पाडतात. हा प्रभाव किती, तर साधारण २०%. (म्हणे) जनुकशास्त्रात हा २०% आकडासुद्धा मोठा समजला जातो. तरीही जनुकांमुळे शैक्षणिक पातळी ठरण्याचं काम २०%च होतं, बाकी ८०% इतर अनेक घटकांवर अवलंबून असतं.

त्या म्हणतात, १०० वर्षांपूर्वी ह्याच समाजघटकांचा अभ्यास केला असता तर शिक्षण पॉलिजेनिक ठरलं नसतं. मुख्य कारण, बायकांना शिकू दिलं जात नसे. तसंच त्या म्हणतात, आजही व्यवस्था गौरेतर समाजांना मागे टाकणारी आहे. काळी, हिस्पॅनिक (द. अमेरिका खंडात मूळ असणारे) मुलं शिक्षणात मागे पडलेली दिसतात, याचं कारण त्या इतर ८०% घटकांवर अधिक अवलंबून आहे. आता उदारमतवादी धोरणं राबवली तर आणखी १०० वर्षांनी कदाचित शिक्षण या गुणधर्माचा पॉलिजेनिक इंडेक्स आणखी वाढलेला दिसेल. जेवढ्या जास्त प्रकारचे जीवशास्त्रीय समाजगट मुख्य प्रवाहात येतील, तेवढा पॉलिजेनिक इंडेक्स वाढत जाणार.

हे सगळे प्रयोग गोऱ्या लोकांवरच जास्त होतात. म्हणजे कुठल्या जनुकांमुळे आजार होतील, वगैरे गोष्टी गोऱ्या लोकांच्या बाबतीत जास्त समजणार. काळे, हिस्पॅनिक लोक आधीच मुख्य प्रवाहापासून लांब आहेत, त्यांच्या आरोग्याबद्दल त्यांना आणखी कमी सेवा मिळणार; अशीही नोंद त्या करतात.

समजा, बाकी सगळ्या गोष्टी समान असतील, किंवा त्यात सगळ्या प्रकारच्या लोकांना समान संधी मिळत असतील तर मग शेवटी जनुकं ठरवणार की कोण किती शिकणार. किंवा माझी उंची १५७ से.मी. आहे; मी बास्केटबॉलमध्ये यशस्वी होण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणजे सगळी समानता वगैरे आली तरीही जनुकांमुळे असमानता टिकून राहील. म्हणून अनेक उदारमतवादी लोकांनी प्रा. हार्डन यांच्यावर युजेनिक्स-वादी असण्याचे आरोप केले आहेत. त्यांचं उत्तर (मला समजलं ते) दुपदरी आहे -

१. ज्या मुलांचा शिक्षणासंदर्भातला पॉलिजेनिक गुणांक कमी असतो, पण घरचे बरे असतात, ते काही वर्षं गणित शिकतात. ज्या मुलांचा हा पॉलिजेनिक गुणांक मध्यम असतो, पण घरची गरिबी असते, ते कमी काळ गणित शिकतात. मुलं जेवढी वर्षं गणित शिकतात, तेवढ्या चांगल्या उत्पन्नांच्या नोकऱ्या, व्यवसायांत शिरतात, असं सामाजिक अभ्यासातून दिसलं आहे. त्यामुळे मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर त्याचा मुलांच्या गणित शिकण्यावर परिणाम होऊ नये, असं त्या म्हणतात.

शैक्षणिक धोरणं ठरवताना ती पॉलिजेनिक गुणांकाचा विचार करून, मग धोरणं आखावीत; सुखवस्तू शाळांसाठी फार पैसा खर्च करण्याची गरज नाही, याचा विचार करावा.

२. कुणाचं शिक्षण कमी आहे, वा बास्केटबॉलमध्ये यशस्वी नाहीत म्हणून त्यांना कमी किंमत, असं असू नये. त्या स्वतःच्या मुलाचं उदाहरण दोन्ही ठिकाणी देतात. त्यांचा धाकटा मुलगा बोलण्यात मागे होता. मोठ्या मुलीच्या वेळेस ही काही अडचण असू शकते, हेच त्यांना समजलं नव्हतं. मुलीला बोलता येतं त्यामुळे तिच्या बोलण्यासाठी जास्त खर्च, कष्ट करायची गरज नाही. पण मुलासाठी त्या स्पीच थेरपिस्टकडे जातात. मुलीला घडाघडा बोलता येतं, याचं फार कौतुक वाटायचं कारण नाही; पण मुलाला आणि त्याच्यासाठी इतरांनाही खूप कष्ट करावे लागले, त्यामुळे तो घडाघडा बोलायला लागेल तेव्हा त्याचं खरं कौतुक वाटलं पाहिजे.

मग त्या 'कर्णबधीर' लोकांचं उदाहरण देतात, कर्णबधीर निराळे. कर्णबधीर म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही. 'कर्णबधीर' म्हणजे ज्यांना अमेरिकी खुणांची भाषा येते ते लोक. हे 'कर्णबधीर' लोक स्वतःला भाषिक अल्पसंख्य समजतात; अपंग नाही. २०००च्या दशकात अमेरिकेत दोन स्त्रियांची गोष्ट बरीच प्रसिद्ध झाली. त्या स्वतः 'कर्णबधीर' आहेत; त्यांनी स्पर्म डोनेशनमार्गे गर्भधारणा घडवली; आणि त्यात कर्णबधीर पुरुषाचे शुक्राणूच निवडले. त्यामुळे त्यांची मुलं कर्णबधीर निघण्याची शक्यता खूप जास्त वाढवली. आपल्याला - ठीकठाक ऐकू येणाऱ्या लोकांना - ऐकू न येणं हे अपंगत्व किंवा काही कमी असणं वाटलं तरी त्यांना तसं वाटत नाही.

(शोंडा राईम्सच्या 'प्रायव्हेट प्रॅक्टिस' नामक करमणूकप्रधान मालिकेत अशा प्रकारची चर्चा एका भागात आहे. खूप बुटके, ड्वार्फ, असणाऱ्या जोडप्याला आपलं मूल खूप बुटकं, ड्वार्फ असावं असंच वाटतं. डॉक्टरांना हे पटत नसतं; तर ते गोरं, बुटकं जोडपं म्हणतं, "डॉक्टर, तुम्ही आणि तुमचा नवरा काळे आहात. तुमची मुलं गोरी असती तर तुम्हांला कसं वाटलं असतं?")

जुळी आणि सख्खी भावंडं यांतला गुणसूत्र-फरक आणि हा 'कर्णबधीर' भाग वाचून मेंदूला चालना मिळाली. (पुस्तक वाचण्याचा आग्रह धरणाऱ्या मित्राचे आभार. ह्या निरागसाचं नावही मी सांगणार नाही.)

क्वचित अपवाद वगळता बाकी पुस्तकाची भाषा, वाक्यरचना मला थोडी किचकट वाटली. किंचित छोटी वाक्यं, आणि कमी बोजड शब्द वापरले असते तर बरं झालं असतं. मी अगदी निराळी इंग्लिश भाषा वापरते इथवर मी जाणार नाही, पण साधारण त्या लायनीवरचा विचार. कदाचित विषय नेहमीचा नाही; लेखिका विद्यापीठात संशोधन करते; आणि त्यांचं मूळ अमेरिकी साऊथमधल्या अतिधार्मिक घरात आहे; यांपैकी काही कारणं असावीत. तरीही पुस्तक वाचनीय आहे. विज्ञान आणि त्या जोडीला येणारं तंत्रज्ञान माणसांच्या नव्या गरजा निर्माण करण्यासाठीच असायची गरज नाही. कधी ते समाजांच्या प्रगतीसाठीसुद्धा असतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/04/2022 - 23:55

हा लेख पुन्हा वाचताना माझ्या आकलनातली चूक लक्षात आली. मूळ लेखातही ते सुधारत आहे.

अनेक उदारमतवादी लोकांनी प्रा. हार्डन यांच्यावर युजेनिक्स-वादी असण्याचे आरोप केले आहेत. त्यांचं उत्तर (मला समजलं ते) दुपदरी आहे -

यांतला मुद्दा १. ज्या मुलांचा शिक्षणासंदर्भातला पॉलिजेनिक गुणांक कमी असतो, पण घरचे बरे असतात, ते काही वर्षं गणित शिकतात. ज्या मुलांचा हा पॉलिजेनिक गुणांक मध्यम असतो, पण घरची गरिबी असते, ते कमी काळ गणित शिकतात. मुलं जेवढी वर्षं गणित शिकतात, तेवढ्या चांगल्या उत्पन्नांच्या नोकऱ्या, व्यवसायांत शिरतात, असं सामाजिक अभ्यासातून दिसलं आहे. त्यामुळे मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर त्याचा मुलांच्या गणित शिकण्यावर परिणाम होऊ नये, असं त्या म्हणतात.

आणि शैक्षणिक धोरणं ठरवताना ती पॉलिजेनिक गुणांकाचा विचार करून, मग धोरणं आखावीत; सुखवस्तू शाळांसाठी फार पैसा खर्च करण्याची गरज नाही, याचा विचार करावा.

सई केसकर Thu, 21/04/2022 - 09:34

मध्यंतरी (म्हणजे तरी त्याला बरीच वर्षं झाली असतील) लॅरी समर्सनं अशी काहीतरी थियरी मांडली होती की बायका गणितात चमकत नाहीत कारण त्यांचे मेंदू गणिताला अनुकूल नसतात. या निष्कर्षापर्यंत यायला ज्याला आपण 'नर्चर' म्हणतो ते पूर्णपणे कंट्रोल करून प्रयोग करता यायला हवेत. तसे ते मोठ्या सॅम्पल साईझला करता येत नाहीत. त्यामुळे अशा थेट निष्कर्षांवर विश्वास ठेवावासा वाटत नाही. पण तरीही अशा प्रयोगाबद्दल वाचायला नक्कीच मजा येते.
अशाच प्रकारची दुसरी फारच controversial बाब म्हणजे बाळाला स्तनपान केल्यामुळे बाळाच्या बुद्धीत फरक पडतो. स्तनपान विरुद्ध फॉर्म्युला अशी भयानक "मॉमी वॉर्स" होत असतात. पण नक्की स्तनपान केल्याने बाळाची बुद्धी अधिक तीक्ष्ण होते का हे शोधून काढणं केवळ अशक्य आहे. असा प्रयोग जरी करायचा ठरवला तरी त्याचा कंट्रोल ग्रूप कसा शोधायचा? आणि काही आयांना मुद्दाम स्तनपान करायला लावणे ठीक आहे पण काही आयांना मुद्दाम फॉर्म्युला कसा द्यायला लावणार? आणि प्रत्येक गटाच्या बुद्ध्यांकाची विरुद्ध गटाच्या बुद्धयांकाशी तुलनाही होऊ शकत नाही.

जयदीप चिपलकट्टी Thu, 21/04/2022 - 10:28

अशा गोष्टींचा अभ्यास multivariate regression (किंवा तशासारखी पद्धत) वापरून केला जातो असा माझा अंदाज आहे. म्हणजे उदाहरणार्थ, समजा आपल्याला मुलांच्या गणिती क्षमतेचा अभ्यास करायचा आहे. तर आता कुणाही मुलाचे दहावीच्या गणितातले मार्क हे त्याचं लिंग, त्याच्या आईवडिलांची मिळकत, त्याच्या आईवडिलांची शैक्षणिक पात्रता, त्याने शिकवणी लावली होती की नाही, ते खेड्यात राहतं की शहरात, अशा डझनभर घटकांवर अवलंबून आहेत असं समजायचं. अशा हजारो मुलांचा डेटा गोळा केला की यांतल्या प्रत्येक घटकावर ते कितपत अवलंबून आहेत हे त्या त्या रिग्रेशन कोइफिशिअंटवरून कळतं. उदाहरणार्थ, मुलाच्या लिंगामुळे जर बराच फरक पडत असेल तर तो कोइफिशिअंट मोठा असतो, नाहीतर लहान असतो. यासाठी ‘नर्चर’ (म्हणजे लिंग सोडून इतर घटक) पूर्णपणे कंट्रोल करण्याची गरज नाही, आणि तसं ते शक्यही नाही.

बाकी सगळे घटक कंट्रोल केल्याखेरीज मी कुठल्याच निष्कर्षावर विश्वास ठेवणार नाही असं म्हटलं तर आपल्याला कशावरच विश्वास ठेवता येणार नाही. उदाहरणार्थ, सिगरेट ओढणारे लोक आणि न ओढणारे लोक हे दोन गट घ्या. ह्या दोहोंत सिगरेट सोडून बाकी फरक पुष्कळ असतात. (आर्थिक-शैक्षणिक पार्श्वभूमीत फरक असतो, व्यवसायांत असतो, आहारात असतो वगैरे.) पण हे बाकीचं सगळं कंट्रोल न करताही 'फार सिगरेट ओढल्यामुळे कॅन्सर होतो' असा निष्कर्ष काढता येतो. यावर विश्वास न ठेवणं धोक्याचं आहे.

अर्थात multivariate regression analysis मध्ये खाचखळगे बरेच आहेत, आणि निष्कर्ष नेहमीच काही चिरेबंदी नसतात. पण ते आता चालायचंच.

सई केसकर Thu, 21/04/2022 - 10:50

>>>अशा हजारो मुलांचा डेटा गोळा केला की यांतल्या प्रत्येक घटकावर ते कितपत अवलंबून आहेत हे त्या त्या रिग्रेशन कोइफिशिअंटवरून कळतं. उदाहरणार्थ, मुलाच्या लिंगामुळे जर बराच फरक पडत असेल तर तो कोइफिशिअंट मोठा असतो, नाहीतर लहान असतो. यासाठी ‘नर्चर’ (म्हणजे लिंग सोडून इतर घटक) पूर्णपणे कंट्रोल करण्याची गरज नाही, आणि तसं ते शक्यही नाही.

समर्सने अशी पद्धत वापरून तो निष्कर्ष काढला होता का?
कारण नंतर PNAS मध्ये त्याचं म्हणणं खोडून काढणारा एक मोठा पेपर प्रकाशित झाला होता. त्यासाठी बराच खर्च करावा लागला आणि बरीच वर्षही लागली असं मी अर्थात त्याबद्दल आलेल्या बातम्यांमध्ये वाचलं होतं. पण समर्सचं मूळ भाषण इतकं प्रसिद्ध झालं होतं की त्या पेपरबद्दल तेवढी चर्चा झाली नाही.
स्तनपान आणि बुद्ध्यांक या बाबतीत मात्र कंट्रोल एक्सपेरिमेंट करायचे प्रयत्न केले गेले होते (ज्यात मुळातच फॉर्म्युला फीडिंग करणाऱ्या बायका आणि मुळातच ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या बायका असे गट केले होते). पण त्यात असं लक्षात आलं की फॉर्म्युला फीडिंग करणाऱ्या बायका 'बाळाच्या जन्मानंतर लगेच नोकरीवर जायला लागणाऱ्या/कृष्णवर्णीय/गरीब अशा होत्या आणि ज्यांना स्तनपान करायला जमत होतं त्या सहा किंवा जास्त महिन्यांची सुट्टी घेऊ शकणाऱ्या किंवा गृहिणी /गोऱ्या/श्रीमंत होत्या.
मग मुलं मोठी झाल्यावर समजा त्यांच्या बुद्ध्यांकाचा संबंध स्तनपानाशी लावायचा ठरवला तर multivariate analysis इथे नक्की कसा निष्कर्ष देईल? म्हणजे जर स्तनपान केलं किंवा नाही याचा कोएफिशियंट मोठा आला तर तो सगळ्यात मोठा फॅक्टर असं का? पण जेव्हा इतर confounding फॅक्टर्स असतात तेव्हा हे कसं ठरणार?

जयदीप चिपलकट्टी Thu, 21/04/2022 - 19:01

In reply to by सई केसकर

> तर तो सगळ्यात मोठा फॅक्टर असं का? पण जेव्हा इतर confounding फॅक्टर्स असतात तेव्हा हे कसं ठरणार?

तसे confounding factors नेहमी असतातच. रिग्रेशन मारल्यावर प्रत्येक फॅक्टरचा कोइफिशिअंट येतो. पण ह्या कोइफिशिअंट्सची एकमेकांशी थेट तुलना करता येत नाही, कारण युनिट्स वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, स्तनपान किती केलं हे महिन्यांत मोजतात, कुटुंब किती गरीब आहे हे डॉलरमध्ये मोजतात, वगैरे. कृष्णवर्णीय असणे-नसणे हा डमी व्हेरिएबल आहे: म्हणजे तो एक किंवा शून्य असू शकेल. अध्येमध्ये नाही. त्याला युनिट्स अशी नाहीत. (अर्थात स्त्री मिश्रवर्णीय असू शकते, पण ते आता जाऊ दे.) तर कोइफिशिअंटचा अर्थ लावताना आणखी एक महिना स्तनपान केल्याने इतका फरक पडेल, किंवा स्त्रीच्या कुटुंबाची मिळकत हजार डॉलरनी वाढली तर इतका पडेल असा लावता येतो.

लॅरी समर्स प्रकरणावर माझा पास. एखाद्या तात्कालिक वादावर मत साचून जाऊन डासांची वस्ती झाली की मग त्यात पाय न टाकणंच शहाणपणाचं.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 22/04/2022 - 19:56

In reply to by जयदीप चिपलकट्टी

कृष्णवर्णीय असणं हा डमी असणंही मला १००% पटत नाही. अमेरिकेत जे लोक शुद्ध (तुपातले) गोरे असतात, तेच गोऱ्या वंशाचे समजले जातात. पण इतरांत तसं नाही. वंश ही संकल्पना वंशवादासाठी, गुणसूत्रांसाठी समाजगट ही निराळी संकल्पना वगैरे पुस्तकाच्या परिचयात लिहिलेल्या गोष्टीच.

रिग्रेशनवरून कुठल्या फॅक्टर, घटकाचं किती कोरिलेशन, साधर्म्य आहे हे समजू शकतं. पण ह्या घटकामुळे एवढा फरक पडतो, अशी कारणपरंपरा सांगत येत नाही. तेच प्रसिद्ध सुवचन, correlation does not mean causation.

त्या कार्यकारणभावासाठी जुडेआ पर्लनं do-calculus, counterfactual वगैरे प्रकार मांडले.

Rajesh188 Thu, 21/04/2022 - 16:09

सामाजिक स्वास्थ टिकावे म्हणून जाहीर पने सत्य असून पण मान्य केले जात नाही.
माणसाची बौद्धिक ,शारीरिक शमता ही जीन्स वरच अवलंबून असते..
किती ही प्रयत्न केले तरी एशियन लोक आफ्रिकन लोकांच्या शारीरिक शमतेशी स्पर्धा करू शकणार नाहीत
मग इथे सामाजिक,आर्थिक स्थिती काही ही असू ध्या.
युरोपियन लोकांच्या बुद्धी शी स्पर्धा करण्याची कुवत पण काही आनुवंशिक बुध्दी नी कमजोर देशात नाही.
किती ही प्रयत्न करू ध्या.

'न'वी बाजू Thu, 21/04/2022 - 16:48

In reply to by Rajesh188

माणसाची बौद्धिक ,शारीरिक शमता ही जीन्स वरच अवलंबून असते..

समजले नाही.

उदाहरणादाखल, धोतर नेसणाऱ्या व्यक्तींमध्ये बौद्धिक तथा शारीरिक क्षमता नसते, असा आपला दावा आहे काय?

(आणि, जीन्सच्या ब्राण्डमुळे फरक नक्की कसा पडावा?)

जयदीप चिपलकट्टी Fri, 22/04/2022 - 08:45

In reply to by 'न'वी बाजू

> (आणि, जीन्सच्या ब्राण्डमुळे फरक नक्की कसा पडावा?)

हा फरक पुढच्या पिढीत पडतो. उदाहरणार्थ, असं समजा की जॉनी हा इसम गेसची पाचशे डॉलरची जीन्स घालतो, तर डॅनी हा इसम लीव्हायची पंचवीस डॉलरची क्लिअरन्स सेलमध्ये घेतलेली जीन्स घालतो. तर अशा परिस्थितीत आपल्या तुटपुंज्या बौद्धिक भांडवलाची भरपाई म्हणून जॉनी इतकी महागाची जीन्स घालतो आहे हे चतुर स्त्रियांच्या लक्ष्यात येतं (ह्याला masculine overcompensation effect म्हणतात), आणि आपसूकच त्या डॅनीकडे आकर्षित होतात. जीन्स उतरवल्यानंतरच खरे जीन्स आपला प्रभाव दाखवू शकतात ही बाब या स्त्रियांना (चतुर असल्यामुळे) ठाऊक असते. ह्यापैकीच एका चतुर स्त्रीचे जीन्स (गुणसूत्र या अर्थाने) डॅनीच्या अपत्यात शिरतात (इथे तेवीस दुणे शेहेचाळीस वगैरे शास्त्रार्थ समजून घ्या) आणि परिणामी ह्या अपत्याची शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढते. उपरोल्लेखित कॉम्पेन्सेशनची ह्या अपत्याला गरज नसल्यामुळे तेही लीव्हायची जीन्स घालू लागतं आणि हा क्रम असाच चालू राहतो.

'न'वी बाजू Fri, 22/04/2022 - 09:10

In reply to by जयदीप चिपलकट्टी

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. आभार!

Masculine overcompensation effect, huh? :D (आणि, ‘बौद्धिक’ भांडवल?)

ह्यापैकीच एका चतुर स्त्रीचे जीन्स (गुणसूत्र या अर्थाने) डॅनीच्या अपत्यात शिरतात (इथे तेवीस दुणे शेहेचाळीस वगैरे शास्त्रार्थ समजून घ्या) आणि परिणामी ह्या अपत्याची शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढते.

पण म्हणजे, त्या अपत्याच्या वाढीव शारीरिक/बौद्धिक क्षमतेकरिता प्रस्तुत स्त्री जबाबदार आहे… जन्मदाता (आणि त्याचे/त्याच्या जीन्स आणि/किंवा त्यांचा ब्राण्ड) केवळ निमित्तमात्र।

'न'वी बाजू Fri, 22/04/2022 - 21:37

In reply to by 'न'वी बाजू

Diarrh(o)ea is hereditary. It runs in the jeans.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/04/2022 - 20:03

In reply to by Rajesh188

साधारण असाच मुद्दा त्या पुस्तकातही मांडतात. त्यांच्या दोन्ही मुलांच्या बोलण्याच्या क्षमतेबद्दल लेखात उल्लेख आहेच. मोठी मुलगी आपण होऊन घडाघडा बोलायला शिकली; अगदी आपण होऊन नाही, तिच्या घरात आजूबाजूला अतिशिकलेले लोक आहेत. हेच वातावरण धाकट्या मुलाला मिळूनही त्याला बोलण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्याची बोलण्याची क्षमता कमी आहे. म्हणून ह्या मुलाचं मूल्य कमी आहे का, त्या मुलावर प्रेम कमी होतं का? उलट त्या मुलासाठी त्याच्या शिकलेल्या आईनं जास्त खर्च केला, की मुलाला व्यवस्थित बोलता यावं.

दुसरा मुद्दा. तुम्ही म्हणता आशियाई लोक आणि आफ्रिकी लोक. तर हे दोन वंश आहेत, जीवशास्त्राच्या दृष्टीनं यात खूप जास्त समाजगट आहेत. वंशवार विभागणी बरेचदा वंशवादासाठी केली जाते; ते टाळलेलं बरं.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/04/2022 - 20:13

धूम्रपानामुळे होणारा कर्करोग, आणि एकंदरच कार्यकारणभाव सिद्ध करणं याबद्दल The Book of Why वाचाच असा आग्रह. माझी प्रत मी शेजारच्या मैत्रिणीला दिली आहे. ती परत मिळाली की त्याही पुस्तकाबद्दल लिहेन ... किंवा आणखी कुणी लिहा. जुडेआ पर्लची किंचित किरकिर बाजूला टाकावी लागेल, ए‌वढंच.

The Genetic Lotteryमध्ये, सई, तू म्हणतेस तशा एका प्रयोगाचंही वर्णन आहे. रोमेनियात कम्युनिष्ठांच्या राज्यकाळात गर्भपातावर बंदी होती. ज्यांना मूल नको असेल त्या स्त्रियांनी ती मुलं सरकारी अनाथालयांत सोडून द्यावीत. मग रोमेनिया कम्युनिस्टमुक्त झाला. तेव्हा ह्या सरकारी अनाथालयांची दुर्दशा समोर आली. तेव्हा मानसोपचारतज्ज्ञ वा अशाच कुणी शास्त्रज्ञांनी, रीतसर परवानग्या काढून प्रयोग केला. एका अनाथालयात वाढलेल्या ~ ५० (नक्की आकडा आठवत नाहीये) मुलांना दत्तक घरांमध्ये सोपवलं. तेवढीच मुलं सरकारी व्यवस्थेतच पुढचे दीड वर्षं राहिली. ही विभागणी यादृच्छिक रीतीने, रँडमपणे केली. त्यांचे IQ आधी आणि नंतर तपासले.

त्या-त्या वयाच्या इतर, आपापल्या घरी राहणाऱ्या मुलांच्या बुद्ध्यांकापेक्षा ह्या सगळ्याच मुलांचे बुद्ध्यांक कमी होते. मात्र जी मुलं दत्तक घरांमध्ये राहायला गेली होती त्यांचे बुद्ध्यांक सरकारी अनाथालयातच राहिलेल्या मुलांपेक्षा जास्त होते. हे सगळे आकडे आता आठवत नाहीत; पण तो फरक statistically significant होता.

हे असे प्रयोग एरवी कुठे करता येणार? याला जुडेआ पर्ल counterfactual म्हणतो. जर-तर प्रत्यक्षात आणून बघायचं.

Rajesh188 Fri, 22/04/2022 - 14:58

सामाजिक स्वास्थ बिघडू नये ह्या चांगल्या हेतू नी ह्या वर चर्चा होत नाही.
पण शेवटी निसर्ग नियम सर्वांना सारखेच असतात
खिल्लारी बैलाची शारीरिक शमता ,देखणे पण गावठी दुसऱ्या बैलात किती ही पोष्टिक अन्न दिल तरी येईल का?
जर्सी गाय २५ltr दूध देते, गिर गायी आठ दहा लिटर दूध देतात.
देशी गाई ना किती ही पोष्टीक अन्न दिले तरी त्या इतके दूध देवू शकणार नाहीत.
फरक असतो जसा प्राण्यात तसाच माणूस प्राण्यात.
वादाचा विषय फक्त हा आहे एका एका क्षमतेत श्रेष्ठ कोण?
ते जाती वरून ठरवायचे की ,वंश वरून .
प्रश्न फक्त हाच आहे .

सई केसकर Fri, 22/04/2022 - 15:48

>>>जर्सी गाय २५ltr दूध देते, गिर गायी आठ दहा लिटर दूध देतात.

पण जर्सी गाय देशी नसते. हे तिचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे. कारण ती ए १ बीटा केसीन असलेलं दूध तयार करते.
गीर गाय ए २ दूध तयार करते. म्हणून ती श्रेष्ठ.
जर्सी गायीने २५ लिटर दूध दिलं तरी ते फक्त ६६ रुपये/लिटर या भावाने विकलं जातं.
गीर गायीने आळशीपणा करून फक्त १० लिटर दूध दिलं तरी ते ८९ रुपये/लिटर प्रमाणे विकलं जातं.
दोघींच्या दुधात समसमान म्हणजेच ३% फॅट असतं. तूप कढवता येत नाही. ते वेगळं विकत घ्यावं लागतं.
गीर गायीचं शेणही लोकांना फार आवडतं. त्याचे वेगळे. शिवाय हे नक्की ए २ च कशावरून असा प्रश्न, गाय गीर आहे हे ऐकल्यावर कुणी विचारत नाही.
मग तुम्हीच सांगा आता काय श्रेष्ठ? जेनेटिकली उच्च असणं की देशी असणं?

ता. क. भारतीय म्हशी पूर्णपणे ए २ आहेत. शिवाय त्यांच्या दुधात ८% फॅटही असतं. पण म्हशी कशा उपेक्षित आहेत याबद्दल सवडीनं लिहीन.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 22/04/2022 - 19:46

In reply to by सई केसकर

गोल गरगरीत रूपया हाच देव असेल तर जर्सी गायीचं मूल्य दुप्पट. पण जर्सी गायीचा मासिक खर्च किती, शेणाची किंमत किती, वगैरे आकडेमोड वाढवली तर फरक पडू शकेल.

म्हशींबद्दल लिहीच. (मला नार्सिसिझम आवडतं.)

'न'वी बाजू Fri, 22/04/2022 - 21:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हशींबद्दल लिहीच. (मला नार्सिसिझम आवडतं.)

मला म्हशी आवडतात. (इतकी पर्सनॅलिटी असलेला दुसरा प्राणी विरळा.)

----------

बाकी, नार्सिसिझमचा मुद्दा नीटसा समजला नाही. बोले तो, कोणीतरी म्हशीबद्दल लिहिणे हे नार्सिसिझम, की कोणीतरी म्हशीबद्दल लिहिलेले वाचून आनंदाच्या उकळ्या फुटणे हे नार्सिसिझम? की दोन्ही?

'न'वी बाजू Sun, 24/04/2022 - 17:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे असे फोड करून इतक्या उघडपणे लिहायचे नसते! समझने वाले को…

असो. मला म्हशी आवडतात, या बाबीचा पुनरेकवार पुनरुच्चार करून तूर्तास खाली बसतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 22/04/2022 - 20:14

In reply to by Nikhil

हे थोडं जुनं आणि अगदीच त्रोटक वाटतंय. मुळात पुस्तकातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गुणसूत्रांचा आपल्या शिक्षण, यश, श्रीमंती यांच्याशी काही संबंध असतो का; आणि युजेनिक्स-विरोधी पद्धतीनं, समाजाच्या भल्यासाठी हे विज्ञान कसं वापरावं याचा यात काही उल्लेखही नाही.

Nikhil Sat, 23/04/2022 - 06:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Hope you read the article in entirety. Quoting from the article above:

Others, including the University of New Mexico academic David Correia, have envisioned dystopian outcomes, suggesting the wealthy might use genetic engineering to translate power from the social sphere into the enduring code of the genome, effectively as “legacy genetics,” establishing “permanent capitalist social relations.”

Nature>nurture असं जर काही अंशीही खरं असेल, तर human race चं काही खरं नाही, असं म्हणतोय. आपल्या आतापर्यंतच्या प्रगतीसाठी काही वेगळी selection pressures होती, आणि पुस्तकातला मुद्दा खरा असेल, तर intelligence ह्या trait चे selection हे पूर्णतः कृत्रिम, controlled by a group of humans only असेल, अशी भिती आहे.

Also, see this: https://www.technologyreview.com/2019/02/21/137309/the-crispr-twins-had…">China’s CRISPR twins might have had their brains inadvertently enhanced

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 24/04/2022 - 05:03

In reply to by Nikhil

नाही, मी सगळं काही अर्धवट वाचून मतप्रदर्शन करते! ;-)

युजेनिक्स वा युजेनिक्सवाद्यांची भीती दाखवणं निराळं आणि युजेनिक्सविरोधी भूमिका स्पष्टपणे मांडणं निराळं. The Genetic Lotteryमध्ये त्यावर एक संपूर्ण प्रकरण आहे. सदर संशोधनासंदर्भात (लेखिका क्रिस्परवर काम करत नाही आणि लिहीतही नाही) एकेक मुद्दा घेऊन युजेनिक्सवादी भूमिका काय आहे; हे संशोधन कार्पेटखाली सारण्याची भूमिका काय आहे; आणि लेखिकेची युजेनिक्सविरोधी भूमिका काय आहे, हेही स्वच्छ लिहिते. फक्त युजेनिक्सचा बुवा दाखवून समाजाला काय दिशा मिळणार! लेख त्या बाबतीत उणा आहे.

Nature>nurture असं जर काही अंशीही खरं असेल ...

काही अंशी म्हणजे कसं? शिक्षणाच्या बाबतीत ते बहुदा नसावं, असं सध्या दिसत आहे (गुणसूत्र आणि शिक्षणाचा ~२०% परस्परसंबंध). उदाहरणार्थ, मुलं शाळेत गणित किती वर्षं शिकतात. पॉलिजेनिक इंडेक्स सरासरीपेक्षा कमी असणारी परंतु घरची बरी असणारी मुलं गणित जास्त वर्ष शिकतात; पॉलिजेनिक इंडेक्स सरासरीच्या आसपास असणाऱ्या मात्र घरची परिस्थिती बरी नसणाऱ्यांपेक्षा. इथे सरळसरळ nurture wins असं दिसत आहे.

हे सध्याचं वास्तव आहे. सामाजिक परिस्थिती बदलत राहते; कदाचित व्यवस्था वंचितांना प्रवाहात सामील करून घेण्यात आणखी यशस्वी होईल आणि मग हे वास्तव आणखी बदलेल. हेही लेखिकाच नोंदवते.

ह्या उलट उंची, स्वमग्नतेचा विकार अशा गोष्टी गुणसूत्रांवर अधिक अवलंबून असतात. मग Nature>nurture असं जर काही अंशीही खरं असायचं तर नक्की कुठल्या मितीमध्ये, अशा छापाचे प्रश्न काडेचिराईपणापेक्षा केसभर जास्त महत्त्वाचे ठरतात.

असे कुठलेच तपशील सदर लेखात नाहीत. लेख ह्याही बाबतीत उणा आहे.

हा लेख आहे आणि पुस्तक नाही, हे खरंच. पुस्तकाचा आकार मोठा असल्यामुळे बरंच काही लिहिण्याची सोय असते. मला अजूनपर्यंत न समजलेला मुद्दा म्हणजे मग सदर लेखाचा दुवा इथे डकवण्यामागे आपली नक्की काय भूमिका आहे?

Rajesh188 Sat, 23/04/2022 - 20:42

१) १०० माणसांना एकसारखे जेवण.
२) एक. सारख्या सर्व सुविधा.

३) एक सारखे बाह्य वातावरण,आर्थिक वातावरण,सामाजिक वातावरण दिले.
आणि त्या १०० माणसांना .
एका ठरवलेल्या गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यास सांगितले सामान सुविधा देवून.
तर हे सर्व एका च सामान पातळीवर त्या ठरवलेल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकणार नाहीत.

मग हे असे कसे घडते.
ह्यांना वेगात धावण्यासाठी तयार करायचे झाले तरी ते सर्व एका वेगात धावू शकणार नाहीत.
कोण पुढे कोण पाठी राहील.. मग हे असे कसे घडते.
त्याची काही तरी कारण असतील ना?
मग त्याला जीन्स कारणीभूत आहेत की अजून दुसरे काय हा प्रश्न राहतोच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 24/04/2022 - 05:07

In reply to by Rajesh188

तुम्ही म्हणता तसा जर प्रयोग करता आला तर काही माणसं अधिक वेगानं धावतील, काही जास्त उंच होतील, काहींना गणित जास्त चांगलं समजेल आणि काहींचं व्हायलिन वादन अधिक सुसह्य असेल. हे बहुतांशी त्यांच्या गुणसूत्रांनुसार ठरेल.

इथे मुद्दे असे -
१. १०० माणसं अशा प्रयोगासाठी पुरतील का?
२. समाजात खरंच सगळ्या माणसांना अशा सुविधा मिळतात का?
२अ. मिळणं शक्य असेल तर सगळ्यांनच जोरात पळता येणं किंवा व्हायलिन वाजवता येणं गरजेचं आहे का?

लेखिका त्याबद्दल विचार मांडते.

Rajesh188 Sun, 24/04/2022 - 12:43

ह्याचा वापर माणूस सोडून बाकी प्राणी आणि वनस्पती वर झालेला आहे.
अनेक प्रयोग करून गुणधर्मात बदल केलेले आहेत.

प्राण्याची रचना पण खूप गुंतागुंतीची आहे काही प्राण्यात तर माणसापेक्षा जास्त biological गुंतागुंत असू शकते.
संशोधक नी आधुनिक शास्त्र वापरून गुणधर्मात कसे बदल होतात ह्याचे खूप प्रयोग केले आहेत.
वनस्पती ना कमी समजायचे कारण नाही त्यांच्या रचना पण गुंतागुंतीच्या आहेत.
शेवटी प्राणी काय,माणूस काय किंवा वनस्पती काय .
सिंगल सेल मधून च निर्माण झाल्या आहेत.

CRISPR चा वापर करून माणसात काय काय बदल करता येतील ह्याचा बऱ्या पैकी अंदाज आहे.
जग बदलेल पण तो बदल चांगला की वाईट हे फक्त आताच सांगता येणार नाही.
जगात १०० मीटर अंतर सर्वात जलद ९.५८ सेकंद मध्ये पूर्ण केले आहे.
ही माणसाची नैसर्गिक क्षमता नाही.
तर ती विविध हार्मोन्स देवून वाढवलेली क्षमता आहे.
ह्याच्या पेक्षा जास्त वाढवणे शक्य नाही.
(म्हणजे ७ सेकंदात १०० मीटर माणूस धावू शकणार नाही)
ह्याचा अर्थ प्रतेक गोष्टी ल मर्यादा असतात.
त्या ओलांडता येत नाहीत.
किती ही जेनेटिक बदल केले तरी एका ठराविक सीमेपर्यंत च ते करणे शक्य होईल.
त्या पुढे नाही.