एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ७

धार्मिक सुधारणांची आवश्यकता

सुधीर भिडे

This is my simple religion. There is no need for temples, no need for complicated philosophy – our own brain, our own heart is our temple, the philosophy is kindness.
– Dalai Lama

पार्श्वभूमी

या भागापासून आपण एकोणिसाव्या शतकाकडे वळणार आहोत. आपला विषय आहे की १८१८ ते १९२० या शतकात काय घडले की ज्याचे समाजावर दूरगामी परिणाम झाले. त्या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी त्या काळाच्या सुरुवातीला स्थिती काय होती याची माहिती भाग २ ते ६मध्ये करून घेतली. १८१८ साली जी स्थिती उद्भवली ती त्याच्या आधीच्या शतकातील – १७२० ते १८१८ – घटनांचा परिणाम होती.

सन १८१८ मध्ये समाजाची स्थिती कशी होती?

 • देशात ५००पेक्षा अधिक संस्थाने होती. संस्थानिक त्यांच्या क्षेत्रांत शिक्षण, आरोग्य अशा स्वरूपाची कामे करू शकत. मिरवणुका आणि समारंभासाठी लागतील त्यापेक्षा जास्त सैन्य ठेवण्याची परवानगी नव्हती. ही संस्थाने भारताचा अदमासे ३०% भाग व्यापत होती. उरलेला भूभाग इंग्रजांच्या पूर्ण वर्चस्वाखाली होता. हा भूभाग अर्थातच सध्याचा पाकिस्तान आणि बांगलादेश धरून होता.
 • उत्तर पेशवाईत नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला होता. समाज जातींत विभागाला गेला होता. आदिवासींचे अस्तित्व खिजगणतीतच नव्हते. अस्पृश्य आणि स्त्रिया यांची अवस्था वाईट होती. सर्वात मोठी उणीव म्हणजे शास्त्रीय दृष्टीचा अभाव. युरोपात त्यावेळी नवीन शोध लागत होते, नवीन तंत्रज्ञान वापरात येत होते. आपण मात्र आपल्या भूतकाळात राहिलो होतो आणि आपापसांत भांडत होतो.
 • शासनयंत्रणेचा पाया वतनदारीत होता. आनुवंशिकतेने चालत आलेली वतनदारी सामान्यजनांचा थोडाही विचार करीत नसे. जमा झालेला सारा सामान्यजनांच्या कल्याणासाठी वापरला जात नसे. संहितेवर आधारित न्यायव्यवस्था नव्हती. पुरोहितांना जे गुन्हे धर्माविरुद्ध वाटत त्या गुन्ह्यासाठी प्रायश्चित्त घ्यावे लागे. गावाच्या सुरक्षिततेसाठी थोरले माधवराव यांनी कोतवाली चालू केली. या संस्थेतही उत्तर पेशवाईत लाचलुचपत पेशव्यांमुळेच सुरू झाली.
 • प्रवासाची साधने म्हणजे घोडे, पालखी किंवा मेणे.
 • वैद्यकीच्या दोन प्रथा चालू होत्या. आयुर्वेद आणि युनानी. या दोन्ही पद्धतींचे शास्त्रीय शिक्षण नव्हते.
 • अठराव्या शतकात धर्माच्या आचरणात ‘धर्मशास्त्रे’ याला फार महत्त्व होते. एखादी गोष्ट का करायची किंवा का करायची नाही याचे एकच उत्तर असे; धर्मशास्त्रात सांगितले आहे म्हणून. सर्वांत महत्त्वाचे धर्मशास्त्र मनुस्मृती. मनुस्मृतीत स्त्रिया आणि दलित यांविषयी जे लिहिले आहे ते घृणास्पद आहे. या आधारावर पुरोहितांनी कर्मकांडी धर्माचरण उभे केले. त्या पलीकडे जाऊन ‘शास्त्रात रूढीर्बलियसी’ असे सांगून पूर्ण मनमानी चालू केली.
 • धर्माचे आचरण रूढी आणि कर्मकांडे यांनी होते. ह्या रूढी आणि कर्मकांडे कायद्याचे स्वरूप घेतात. ही स्थिती सर्वच धर्मांत राहिली आहे. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात रूढी आणि कर्मकांडी धर्माची समाजावर मोठी पकड होती. पुरोहितांनी समाज ब्राह्मण, शूद्र आणि अस्पृश्य अशा तीन भागात विभागला होता. पुरोहितांनी लादलेल्या धर्माचे दोन भाग होते. विधी आणि संस्कार यांबरोबर रूढी. यांमध्ये रूढी जाचक राहिल्या. स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षण न देणे याचा आधार धर्मशास्त्रे. बदलत्या काळाबरोबर या रूढी बदलणे आवश्यक आहे हे पुरोहित विसरले. किंवा त्यांना बदल नकोच होता. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड राहिले. अशा धर्माचे आचरण पाहून विचारवंतांच्या मनात प्रश्न पडू लागला की हिंदू धर्मामुळे हिंदू राष्ट्राचे नुकसान होत आहे का?

राजकीय, सामाजिक आणि धार्मिक व्यवहाराची १८१८ साली अशी स्थिती होती.
एकोणिसाव्या शतकातील समाजाच्या खालील पैलूंचा पुढच्या २० भागांतून आपण विचार करू.

 • धार्मिक आणि सामाजिक सुधारणा
 • १८५७चा उठाव
 • शिक्षण, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रांत बदल
 • आर्थिक संस्था, उद्योग, शेती आणि दळणवळण यातील बदल
 • शासकीय आणि राजकीय संस्था

या भागात आपण एकोणिसाव्या शतकातील धर्माचे आचरण आणि सुधारणेची आवश्यकता येथून सुरुवात करू.

धर्माची पकड

आपण ज्या कालखंडाचा विचार करीत आहोत त्या काळाच्या सुरुवातीला असलेली धर्माची स्थिती आपण भाग ६मध्ये पाहिली. त्यानंतरच्या साठ ‌वर्षांत – १८८० पर्यंत – ब्राह्मणी धर्माच्या चालीत फार बदल झाला नाही. धर्म कर्मकांडावर आधारित राहिला. पुरोहित मनाला वाटेल ती गोष्ट धर्मविरोधी ठरवत राहिले. आपण काही उदाहरणे पाहू.

 • समुद्र ओलांडून दुसऱ्या देशात जाणे धर्मविरोधी मानले गेले. पुरातन काळी आपले पूर्वज पूर्वेकडील इंडोनेशिया, कंबोडिया, सयाम (थायलंड) या देशांत पसरले. आता मात्र समुद्रापलीकडे जाणे पाप झाले. न्यायालयात काम करायचे असेल तर इंग्लंडमध्ये जाऊन एक परीक्षा द्यावी लागे. भारतीयांनी अशी मागणी केली की ती परीक्षा भारतात घ्यावी कारण भारतीय लोक समुद्रावरून प्रवास करू शकत नाहीत.
 • लोकहितवादी देशमुख त्या वेळचे मोठे सुधारक होते. ते अशा प्रकारच्या अंधश्रद्धांवर टीका करत. पण त्यांचा स्वतःचा मुलगा जेव्हा कायदा शिकून इंग्लंडहून परत आला तेव्हा त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
 • टिळक इंग्लंडला एका खटल्याकरिता गेले होते. परत आल्यावर टिळकांना प्रायश्चित्त घ्यावे लागले.
 • चहा पिणे, बिस्किटे किंवा ब्रेड खाणे धर्मबाह्य होते. १८९० साली पुण्यात एक सभा झाली. त्या सभेस पुण्यातील नामवंत व्यक्ती हजर होत्या. टिळक आणि रानडे हेही त्या सभेला गेले होते. हजर असलेल्या लोकांस चहा आणि बिस्किटे देण्यात आली. याकरिता पुण्यात हलकल्लोळ झाला. पुण्यातील पुरोहितांनी टिळकांच्या घरी जाणे बंद केले. टिळकांच्या घरातील स्त्रियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. शेवटी टिळकांनी प्रायश्चित्त घेतले.
 • मुंबईमध्ये अशा प्रकारची अंधश्रद्धा घालवण्यासाठी एक संस्था बनविण्यात आली. त्या संस्थेच्या एका बैठकीत सभासदांना खाण्यास ब्रेड देण्यात आला. त्या बैठकीत डॉक्टर भांडारकर उपस्थित होते. त्यांनीही ब्रेड खाल्ला. त्यांनंतर त्यांनी त्या अनुभवाबाबतीत लिहिले – तो एक भयानक अनुभव होता. त्या रात्री मला झोप आली नाही.
 • त्या काळात इंग्रज डॉक्टरांनी दिलेली औषधे लोक घेत नसत. अशी समजूत होती की औषधात हिंदू धर्म नाहीसा करण्याची रसायने आहेत. जेव्हा लस टोचण्यासाठी डॉक्टर घरी येत त्यावेळी मुलांना लपविले जाई. कारण लशीत बाटविण्याची औषधे आहेत असे समजले जाई. ग्रँट मेडिकल कॉलेजची सुरुवात १८४५ साली झाली. त्या शिक्षणासाठी ब्राह्मण जाईनात.
 • कृष्णशास्त्री चिपळूणकर १८५६ साली पूना कॉलेजमध्ये गेले होते. ज्या गालिचावरून इंग्लिश प्रोफेसर चालला त्यावरून चिपळूणकर चालले. त्याकरिता त्यांना अशुद्ध घोषित करण्यात आले. घरी गेल्यावर त्यांना शुद्धी करावी लागली. घरात इंग्लिश पुस्तक असले तरी घर अशुद्ध होत असे.
 • जेव्हा महादेव गोविंद रानडे लहान असताना इंग्रजी शाळेत जाऊ लागले त्यावेळी त्यांच्या आईने तीन दिवस उपास केला कारण आईला असे वाटले की हे धर्माच्या बाहेर आहे. लोकहितवादी शाळेतून घरी आल्यावर रोज त्यांना आंघोळ करावी लागे कारण शाळेत त्यांनी इंग्रजी पुस्तके वाचलेली असत.
 • १८२५ साली एक फडके नावाचे गृहस्थ मुंबईहून पुण्यास शिक्षक म्हणून आले. पुण्यात त्यांना जातीबाहेर काढण्यात आले कारण त्यांनी मुंबईत इंग्रजांच्या बरोबर काम केले होते.
 • इंग्रजी पुस्तकावरचा संशय छापण्याच्या शाईमुळे येत असे. लोकांना असे वाटे की शाई गाईच्या चरबीपासून बनविलेली आहे. त्यानंतर अशा जाहिराती येऊ लागल्या की छपाईच्या शाईत गाईचे शुद्ध तूप वापरण्यात आले आहे. वेदवाङ्मय छापण्यास सनातनी ब्राह्मणांचा विरोध होता.
 • एखाद्या विहिरीतील पाणी प्यायले आणि मागून लक्षात आले की विहिरीत पाव (ब्रेड) पडलेला आहे तर पाणी प्यायलेल्या सर्व व्यक्ती बाटून ख्रिश्चन होत.
 • आंतरजातीय विवाहास मान्यता नव्हती. जेव्हा गांधींच्या मुलाचा राजाजी यांच्या मुलीशी विवाह ठरला त्यावेळी लग्न लावायला कोणी भट मिळेना. शेवटी वाईहून लक्ष्मणशास्त्री जोशी आले आणि त्यांनी विवाह लावला. त्याकरिता लक्ष्मणशास्त्र्यांना धमक्या मिळाल्या.
 • ब्राह्मणांनी जे वर्तन धर्मबाह्य ठरविले त्याचे दोन परिणाम असत. ज्या वर्तनास ब्राह्मण गंभीर गुन्हा समजत नसत त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावे लागे. गंभीर गुन्ह्यास समाजाबाहेर काढणे ही शिक्षा असे – त्यास ग्रामण्य म्हणत. पंडिता रमाबाई (डोंगरे) यांच्या आई-वडिलांस समाजाबाहेर काढण्यात आले होते. त्यांचा गुन्हा हा होता की त्यांनी मुलीस वेद शिकविले.

वैदिक धर्म, सनातन धर्म, हिंदू धर्म आणि ब्राह्मणी कर्मकांडी धर्म

भारतातील धर्माचा विचार करताना वैदिक धर्म, सनातन धर्म, आणि हिंदू धर्म या तीन संज्ञा वापरल्या जातात. हिंदूंचे जुने धार्मिक ग्रंथ अगर शास्त्रग्रंथ या धर्माला ‘हिंदू धर्म’ म्हणत नाहीत. धर्माला वैदिक धर्म, सनातन धर्म किंवा वर्णाश्रमधर्म असे संबोधतात (मराठी विश्वकोश). याशिवाय आपल्या विवेचनात आपण ब्राह्मणी कर्मकांडी धर्म असा अजून एक शब्दप्रयोग केला आहे. धर्माच्या या चार नावांविषयी थोडी माहिती घेऊ.

वैदिक धर्म

वैदिक काळात धर्म हा शब्द निराळ्या अर्थाने वापरला जात असे. धर्माचा अर्थ बहुतेकदा कर्तव्य असा घेतला जाई. वैदिक धर्माविषयी गेल्या भागात आपण थोडी माहिती घेतली. (हिंदू धर्म दीपिका, वामन गणेश दुभाषी १९३३, पुन:प्रकाशन १९९८, वरदा प्रकाशन). त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे -

 • वैदिक धर्मात सध्या प्रचलित असलेला जातिभेद नव्हता. जातिभेदांचे बीज नंतर पेरले गेले.
 • वेदकालीन स्त्रियांना समान दर्जा होता. स्त्रिया पुनर्विवाह करू शकत.
 • वेदकाली आर्यांना नौकाज्ञान होते. परदेशप्रवास निषिद्ध ही कल्पना त्या काळी नव्हती.
 • अनेक क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र कर्माने ब्राह्मणत्वास पोचले.
 • स्पृश्य आणि अस्पृश्य या कल्पना त्या समाजात नव्हत्या.
 • वैदिक धर्म यज्ञकर्मावर आधारित होता. त्या काळात मूर्तिपूजा नव्हती.

वैदिक धर्माचा व्यवहार पूर्णपणे निराळा होता. मूर्तिपूजा आणि देवळे धर्माचा भाग नव्हती. अग्निहोत्र, इष्टी, चातुर्मास्य याग या कृतींतून धर्म व्यक्त होत असे. या पूजापद्धतीत इंद्र, वरुण, अश्विनौ, प्रजापती, सवितुर, बृहस्पती आणि अग्नि अशा देवतांना आवाहन करून पूजन केले जाई. यज्ञ हा धर्माच्या आचरणाचा महत्त्वाचा भाग होता. प्राण्यांचे बळी देणे यज्ञ कर्माचा भाग होता.

यज्ञ राधाकृष्ण

वैदिक काळातील धर्म आणि आजचा धर्म. तेव्हा यज्ञ होता, आता नाही. आता मूर्तिपूजा आहे, तेव्हा नव्हती.

आता आपण वैदिक काळातील देवतांचे पूजन करीत नाही. आपले सध्याचे देव राम, कृष्ण, हनुमान, गणपती, शंकर. आपला धर्म मूर्तिपूजेवर आधारित आहे. आपल्या घरांतसुद्धा देवांच्या मूर्ती असतात. जेव्हा आपण धर्मसुधारणेचा विचार करतो तेव्हा वैदिक धर्मात सुधारणा हा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण तो धर्म एकोणिसाव्या शतकात आचरणात नव्हता आणि परत आचरणात येईल असे वाटत नाही.

सनातन धर्म

सनातन धर्म ही संज्ञा हिंदू लोक आणि हिंदू धर्म या संज्ञा वापरात येण्याआधी भारतात जो धर्म व्यवहारात होता त्याकरता वापरली जाते. हिंदूंचे धार्मिक ग्रंथ अगर शास्त्रग्रंथ या धर्माला ‘हिंदू धर्म’ म्हणत नाहीत. धर्माला आर्य धर्म, वैदिक धर्म अथवा सनातन धर्म असे संबोधतात.

सनातन या शब्दाचा अर्थ आहे – शाश्वत, अनादी, कालाबाधित सत्य. हिंदू धर्मात जेव्हा विविध रूपे दिसू लागली तेव्हा काही राष्ट्रीय वृत्तीच्या व्यक्तींनी ‘सनातन धर्म’ या संज्ञेचा परत वापर सुरू केला, ज्यायोगे हिंदू धर्माचे एक उज्ज्वल रूप लोकांसमोर ठेवता येईल.
महात्मा गांधी स्वत:ला सनातनी म्हणत कारण, हिंदू धर्माच्या ग्रंथांवर मी विश्वास ठेवतो. माझा पुनर्जन्म आणि अवतारांवर विश्वास आहे.. मात्र हे विधान करून त्याखाली गांधीजी लगेच लिहितात, धर्मावरील कोणतेही भाष्य बुद्धिविरोधी आणि नैतिक भावनांना रुचणारे नसेल तर ते मी कदापि मान्य करणार नाही. ही दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटतात.

सनातन धर्म म्हणजे काय याबद्दल सावरकरांची कल्पना अतिशय निराळी आहे. जे सृष्टी नियम आणि वैज्ञानिक सत्ये आज मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात आली आहेत त्यास मी सनातन धर्म मानतो. प्रकाश, उष्णता, ध्वनि, गणित, चुंबकत्व, विद्युत शास्त्र याचे ज्ञान हेच सनातन धर्म.
(धर्म – महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, वि. ग. कानिटकर, दिलीपराज प्रकाशन, २०००)

हिंदू धर्म

हिंदू या शब्दाचा वापर प्रथम ग्रीक आणि पर्शियन लोकांनी साधारण दोन हजार ‌वर्षांंपूर्वी सुरू केला असे समजले जाते. साधारण दहाव्या शतकानंतर जेव्हा मुसलमानांची आक्रमणे चालू झाली तेव्हा हिंदू लोक स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊ लागले. आपण आधीच्या भागांतून पाहिल्याप्रमाणे दोन हजार ‌वर्षांपासून ब्राह्मणी कर्मकांडी धर्म आचरणात येऊ लागला.

ब्राह्मणी कर्मकांडी धर्म

ब्राह्मणी कर्मकांडी धर्माचे मूळ धर्मशास्त्रात – मनुस्मृतीत दिसते. वेद आणि शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मण पुरुषांचा होता. ब्राह्मण सोडून इतर सर्व समाज शूद्र समजला जाई. अस्पृश्यांना अतिशय वाईट वागणूक दिली जाई. ब्राह्मणांना अस्पृश्यांची सावलीसुद्धा पडलेली चालत नसे. वागण्याचे नियम आणि रूढी ब्राह्मणांनी ठरविलेल्या असत. शास्त्रीय वृत्तीचा पूर्ण अभाव होता.

साधारणपणे असे म्हणता येईल की वैदिक / सनातनी धर्माचे आचरण ३००० वर्षे किंवा त्या आधी करण्यात येत होते. ब्राह्मणी कर्मकांडी धर्माचे आचरण २००० ‌वर्षांपासून (मनुस्मृतीचा काळ) होत आहे. मधली हजार वर्षे बदलाची असावीत. वैदिक धर्म, सनातनी धर्म, हिंदू धर्म आणि ब्राह्मणी कर्मकांडी धर्म या चार संज्ञांचा विचार करण्याची आवश्यकता यासाठी की जेव्हा हिंदू धर्मात सुधारणेचा विचार केला जातो तेव्हा आपण अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात जो कर्मकांडी धर्म आचरणात होता त्याविषयी बोलत आहोत. निरनिराळ्या लेखकांच्या लिखाणात बर्‍याच वेळेला या चारही संज्ञा समानार्थी वापरल्या जातात. एक उदाहरण द्यायचे तर वारकरी धर्म योद्धा – संत तुकाराम असा लेख पुरुषोत्तम खेडेकर यांनी तुकाराम महाराज स्मारक ग्रंथात लिहिला आहे. (संपादिका शैलजा मोळक, २००१). या लेखात असे उल्लेख येतात –

वैदिक, सनातनी धर्मामुळे समाजात जात व्यवस्था अत्यंत घृणास्पद प्रकारे राबविली जात असे.. ... वैदिक धर्मानुसार ब्राह्मण नसलेल्यांना शिक्षण बंदी होती.. [...] वारकरी चळवळ ही वैदिक धर्माविरुद्ध प्रचंड विद्रोह होता.

वरील विवेचनावरून आपण समजू शकतो की खेडेकरांनी वैदिक / सनातनी धर्म या ऐवजी ब्राह्मणी कर्मकांडी धर्म असा शब्दप्रयोग केला असता तर जास्त योग्य झाले असते.

हिंदू धर्मात सुधारणेची आवश्यकता

१९३३ साली हिंदू धर्म दीपिका या नावाचे पुस्तक वामन गणेश दुभाषी यांनी लिहिले. त्याचे पुन:प्रकाशन १९९८ साली वरदा प्रकाशनने केले. या पुस्तकात हिंदू धर्मात सुधारणेसाठी काय केले पाहिजे हे विचार दुभाषी यांनी मांडले. ते विचार खाली उद्धृत केले आहेत.

वेदकालापासून आम्हां हिंदूंच्या आचार-विचारांमध्ये कितीतरी फेरबदल झाला आहे. येता-जाता, उठता-बसता सर्व प्रकारच्या हालचालींमध्ये धर्माचे महत्त्व प्रस्थापित झाल्यामुळे कोठेही विचारस्वातंत्र्य राहिले नाही. पवित्र-अपवित्र अशा कल्पना बोकाळल्यामुळे हजारो प्रकारचे निर्बंध, जातिभेद आणि अनर्थाच्या गोष्टी समाजात दिसतात. खर्‍या धर्मास कोणी विचारात घेत नाही आणि खर्‍या धर्मास कोणी समजत नाही. (पृष्ठ २०३)

वडिलांची कीर्ति सांगे तो एक मूर्ख जाणावा या विधानात आमच्यातील विद्वानांचा समावेश आहे. जुने ज्ञानभांडार, जुने थोर लोक, जुनी संस्कृती यांची मातब्बरी सांगून तादृश्य फायदा नाही. आमच्या अंतःकरणात दुरभिमानाने ठाणे दिले आहे. आम्ही कौटुंबिक कर्तव्याविषयी अनास्था दाखवितो परंतु परमार्थाच्या गोष्टी सांगतो.

धर्मावर संकट ही ओरड वेळी-अवेळी कानी येते. पाण्याच्या कुंडास जर कोणी शिवले तर धर्म बुडाला, विहीरीतून कोणी घागर भरून पाणी काढले तर धर्म बुडाला, भर वस्तीतून नग्नावस्थेत जाण्याची बंदी झाली तर धर्म बुडाला, वाटेल तेव्हा वाद्य वाजविण्याची बंदी झाली तर धर्म बुडाला! अशा कारणांवरून धर्म बुडत असेल तर तो अत्यंत हलका आणि कुचकामी असला पाहिजे. (पृष्ठ ३९२)

जे हिंदू वैदिक आपल्या धार्मिक मालमत्तेची मातब्बरी सांगतात आणि स्मृती इत्यादी जुने साहित्य पोटाशी कवटाळून बसले आहेत त्यांचा शब्द मानणारे आता समाजात थोडेच आहेत. नवीन युगास साजेल असा हिंदू धर्म लोकास समजावून दिला पाहिजे. (पृष्ठ ३९५)

प्राचीन ग्रंथांतील ग्राह्य भाग कोणता हे ठरवून तेवढाच भाग दाखविला पाहिजे. आचार कालपरत्वे आणि देशपरत्वे भिन्न असतात. परस्परविरोधी स्मृती काय कामाच्या? काळ बदलला त्याप्रमाणे स्मृतीही बदलल्या पाहिजेत. सर्व स्मृतींची छाननी करून हिंदूंच्या पुरुषार्थास पोषक अशी वचने एकत्र केली पाहिजेत. जी स्मृती हिंदू समाजातील अनाचारास कारणीभूत आहे ती काढून टाकली पाहिजे.

अनेक व्रते, हजारो गुरु, अज्ञ भटजी, लक्षावधी देवालये यांची गरज नाही. देवाच्या नावाखाली चालणारा भ्रष्टाचार याचे उच्चाटन होणे अगत्याचे आहे. हिंदूंच्या पुनरुज्जीवनाचे पवित्र कार्य करण्यास ब्राह्मणांनी पुढे आले पाहिजे. (पृष्ठ ३९६)

धर्माभिमान्यांनी समतोल वृत्तीने हा विचार करणे जरूर आहे की सध्याची धर्म स्थिती अशीच चालत राहिल्यास समाजहितास जे नैतिक बल पाहिजे ते मिळेल काय? ज्ञानी म्हणून तत्त्वार्थाचा काथ्याकूट करीत बसणारे कर्मठ आमच्या धर्माचे रक्षण करण्यास समर्थ आहेत असे आम्ही मानत नाही. (पृष्ठ २०४)

हिंदू धर्माच्या उद्धाराची गुरुकिल्ली ब्राह्मणांच्या हाती आहे. हजारो वर्षे त्यांनी ज्ञानाचा मक्ता घेतला. याचा परिणाम काय झाला? खरा धर्म मागे पडला असून कर्मजाल उत्पन्न झाले आहे. आज ब्राह्मण धर्मास पारखे झाले असून सर्व दृष्टीने पंगू दिसतात. याचे कारण त्यांनी दाखविलेली दिशा योग्य नाही हे समाजास कळून चुकले आहे. इतकेच नव्हे तर ते ब्राह्मणासही कळत असेल. ब्राह्मणांच्या बद्दलचा आदर जाऊन अनादर आणि द्वेष दिसू लागला आहे.

सारांश, जे ब्राह्मणांनी घडवून आणले त्यांनीच ते मोडून पुन: घडी बदलली पाहिजे. अनेक मंत्र-तंत्र, अनेक देव, अनेक जाती याप्रमाणे भेदाचे प्राधान्य गेले पाहिजे. सध्या धर्म खाली पडला असून अधर्माचे भयंकर दडपण धर्मावर पडले आहे. हे दडपण निघाले तर उच्चनीचत्वाचे अनिष्ट प्रकार जाऊन खर्‍या शाश्वत धर्माची भावना प्रकाशित होईल. (पृष्ठ २०५)

खालील विचार ब्राह्मणांना अकारण कोण कशाला झोडपणार? या पुस्तकातून घेतला आहे. (लेखक आनंद घोरपडे, जिजाऊ प्रकाशन, २००६)

मनुस्मृतीच्या काळातील अथवा दोनशे ‌वर्षांपूर्वीच्या काळातील वांगी आज चिरण्यात काय अर्थ आहे असा प्रश्न मूलतत्त्ववादी विचारतात. याला उत्तर म्हणजे – आपणास जर इतिहास माहीत नसेल तर आपले भविष्य फुलणार नाही. इतिहासाचा अभ्यास भूतकालाचे ओझे वाहण्यासाठी नाही तर वर्तमान आणि भविष्य सुधारण्यासाठी आहे. सध्याच्या ब्राह्मणांना बहुजनसमाज पूर्वीच्या काळाबद्दल जबाबदार समजत नाही. परंतु त्या काळातील आदर्श पुन:प्रस्थापित करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका समजून घेऊन स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या विचारांची कास धरावी. तरच हा देश एकसंघ होऊन बळकट होईल.

निष्कर्ष

एकोणिसाव्या शतकात ब्राह्मणांनी मनाला वाटेल ती गोष्ट धर्मविरोधी घोषित केली. समुद्रावर प्रवास करणे निषिद्ध, चहा पिणे आणि ब्रेड खाणे धर्मबाह्य, इंग्रज चालला त्या सतरंजीवरून चालणे म्हणजे धर्म बुडाला. धर्मात सुधारणेची निश्चितच आवश्यकता होती. वैदिक धर्म, सनातन धर्म, हिंदू धर्म अशा प्रकारच्या संज्ञा धर्माच्या बाबतीत वापरल्या जातात. परंतु एकोणिसाव्या शतकातील धर्माचे आचरण ब्राह्मणी कर्मकांडी धर्म असे करावे लागते. आणि या धर्मात सुधारणा करण्याची आवश्यकता होती. आधुनिक युगानुसार धर्माची संहिता बनविणे याची जरूर होती आणि आजही आहे.

पुढच्या भागात – भाग ८ मध्ये आपण धार्मिक सुधारणासाठी जे प्रयत्न झाले त्याची माहिती घेऊ.

मागचे भाग –

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet