एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ८

धार्मिक सुधारणांचे प्रयत्न

सुधीर भिडे

भगवान बुद्ध पहिले धर्मसुधारक होते.
– महर्षी शिंदे

मागच्या भागात आपण ब्राह्मणी कर्मकांडी धर्मात सुधारणेची आवश्यकता यावर विचार केला. या भागात धार्मिक सुधारणांसाठी काय प्रयत्न झाले याचा आढावा घेऊ. महाराष्ट्रात धार्मिक सुधारणांचे प्रयत्न दादोबा तर्खडकर, रामकृष्णपंत भांडारकर आणि जोतिबा फुले या तीन महान व्यक्तींनी केले. त्या प्रयत्नांची सुरुवात दक्षिणा फंडापासून झाली.

दक्षिणा फंड

मागील भागात आपण रमण्याविषयी माहिती घेतली आहे. पुण्यातील ब्राह्मणांचे म्हणणे असे की पेशवाईच्या अंतानंतरही ही दक्षिणा चालू राहिली पाहिजे. या मागणीस मान देऊन १८१८मध्ये पेशवाईचा अंत झाल्यावर इंग्रजांनी ब्राह्मणांना दक्षिणा देण्याची प्रथा चालू ठेवली. लोकहितवादी देशमुख आणि जोतिबा फुले यांच्या सारख्या समाजसुधारकांनी अशी मागणी केली की हा पैसा शाळेची पुस्तके मराठीत छापण्यासाठी वापरावा. याला पुण्यातील ब्राह्मणांचा फार विरोध झाला. ब्राह्मणांच्या विरोधाला न जुमानता या फंडातला पैसा हळूहळू शिक्षणासाठी वापरला जाऊ लागला.

महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक

दादोबा तर्खडकर


दादोबा तर्खडकर
दादोबा तर्खडकर

दादोबा तर्खडकर यांनी स्थापन केलेली परमहंस सभा हा महाराष्ट्रातील धर्म सुधारणेचा पहिला प्रयत्न म्हणावा लागेल. दादोबांनी १८४३ साली धर्म विवेचन नावाचे एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकात त्यांनी धर्म सुधारणेची सात तत्त्वे विषद केली.

 • एक ईश्वर;
 • नीतीपूर्वक ईश्वरभक्ती हाच धर्म;
 • सर्व मनुष्यमात्रांचा एकच धर्म आहे;
 • प्रत्येक मनुष्यास विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे;
 • नैमित्तिक कर्मे विवेकास अनुसरून करावी;
 • मनुष्यमात्राची एकच जात आहे;
 • सर्वांस ज्ञानाचा अधिकार आहे.

१८४०च्या दशकात तर्खडकरांच्या नेतृत्वाखाली मुंबईत परमहंस सभा स्थापन झाली. समाजातील जातीव्यवस्था आणि इतर अनिष्ट बाबी नष्ट करून बंधुभाव आणि एकेश्वरपूजन यांयोगे लोकांना एकत्र आणणे हा या सभेचा उद्देश होता. लवकरच ही संस्था लयास गेली. (संत – सुधारक आणि त्यांचे धर्म विचार, रा. ना. चव्हाण, प्रकाशक – रमेश चव्हाण)

रामकृष्णपंत भांडारकर


रामकृष्णपंत भांडारकर
रामकृष्णपंत भांडारकर

(खालील माहिती रानडे आणि भांडारकर – एक सम्यक आकलन, रा. ना. चव्हाण, प्रकाशक – पुणे प्रार्थना समाज, २०१३, या पुस्तकातून घेतली आहे.)

भांडारकर हे लोकमान्यांचे समकालीन. मुंबई विद्यापीठातून १८६३ साली त्यांनी एम. ए. ही पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज पुणे येथे त्यांनी अध्यापन केले. धर्म आणि प्राच्यविद्या यांत त्यांचा मोठा अभ्यास होता. जर्मनीतील विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली. शिकत असतानाच भांडारकर परमहंस सभेचे सभासद झाले. ही संस्था लयास गेल्यावर भांडारकर प्रार्थना समाजाकडे वळले. सामाजिक सुधारणा यशस्वी होण्यासाठी त्या धर्म सुधारणांवर आधारित असायला हव्यात असा भांडारकरांचा दृष्टिकोण होता.

सन १८२८मध्ये बंगालात राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. एक सर्वसमावेशक धर्म निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करून रॉय यांनी या समाजाची स्थापना केली. या समाजाची काही मूलभूत तत्त्वे अशी –

परमेश्वर निर्गुण आणि निराकार असून कोणत्याही प्रतिमेने परमेश्वराची पूजा होत नाही.
नीती, भूतदया आणि परोपकार हेच धर्माचे उद्दीष्ट असते.
जगातील कोणताही धर्मग्रंथ ईश्वरप्रणित नाही.

ब्राह्मो समाजावरून प्रेरणा घेऊन १८६७ साली मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना झाली.


प्रार्थना समाज, पुणे
प्रार्थना समाज, पुणे

भांडारकर प्रार्थना समाजाचे सभासद झाले. प्रार्थना समाजाचा वैचारिक पाया भांडारकरांनीच घातला. त्यांचे विचार असे –

साधकाला मध्यस्थाशिवाय म्हणजे पुरोहिताशिवाय सत्याचे ज्ञान होऊ शकते. सर्वांगीण सामाजिक सुधारणेचा पाया सदाचरणावर आधारित असावा. प्रतिमा किंवा मूर्ती यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वराच्या उपासनेचा खरा मार्ग नव्हे. परमेश्वर सावयव रूपात अवतार घेत नाही. सर्व मनुष्ये एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणून भेदभाव न बाळगता सर्वांशी बंधुभावाने वागावे.

भांडारकरांच्या मते,

श्रुती – स्मृती वगैरे धर्मग्रंथात परस्पर विरोधी आणि विसंगत वचने आढळतात. यामुळे धर्माधर्म ठरविणे अवघड जाते. अशा वेळी मानवांनी त्यांची सारासार बुद्धी वापरुन धर्मनिर्णय घ्यावा. कोणताही ग्रंथ संपूर्णपणे निर्बाधित असू शकत नाही. कारण ग्रंथांचे कर्ते हे मानवच असतात.

भांडारकरांच्या कार्याचे विशेष म्हणजे त्यांनी भारताबाहेर भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यांविषयी कुतूहल निर्माण केले. १८७४ साली लंडन येथे झालेल्या प्राच्यविद्या परिषदेत नाशिक येथील शिलालेखासंबंधी त्यांचा शोध निबंध वाचला गेला. १८८५ साली व्हिएन्ना येथे Congress of Orientalists झाली. त्या परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. Royal Asiatic Society, German Oriental Society, American Oriental Society, Imperial Academy of Science या जगप्रसिद्ध संस्थांचे ते सभासद होते.

जोतिबा फुले


जोतिबा फुले
जोतिबा फुले

भांडारकरांप्रमाणे जोतिबांना ही जाणीव झाली होती की समाजातील बदल आणि धर्मातील बदल या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जोतिबांचे विचार सुबोधपत्रिका या वार्तापत्राने प्रकाशित केले. (संत – सुधारक आणि त्यांचे धर्मविचार, रा. ना. चव्हाण, प्रकाशक – रमेश चव्हाण, पृष्ठ २४१ – २५९) . जोतिबांचे प्रमुख विचार आपण पाहू –

  अवतारवाद लटका आहे. त्यामुळे परमेश्वराच्या भक्तीच्या मार्गात अडथळे आले आहेत. माणसाच्या किंवा पशू पक्ष्यांच्या रूपात ईश्वर अवतार घेत नाही.
  ईश्वराची मूर्ती कल्पिता येत नाही. म्हणून आज हिंदू धर्मात रूढ असलेली मूर्तिपूजा अयोग्य आहे. निर्मिकाचे साकार दर्शन कोणासच होणार नाही. साकार दर्शन झाले म्हणणारे ढोंगी आणि दुसऱ्यास लुबाडणारे असतात.
  सर्व व्यक्तींत समता आणि बंधुभाव जन्मजात आहे. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शूद्र हे वर्ण आणि इतर जातिभेद अयोग्य आहेत.
  ज्याप्रमाणे देव एकच आहे त्या प्रमाणे धर्मही एकच आहे.
  वैश्विक सत्य (universal truth) चोहोकडे एकच असणार. सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी सुखी होणार नाही.
  एकच निर्माणकर्ता सर्व मानवांचा निर्मिक आहे. सर्व मानवी प्राणी अवयवाने आणि बुद्धिकौशल्याने सारखेच आहेत. त्यांपैकी काही लोक पिढीजात पवित्र आणि श्रेष्ठ कसे होऊ शकतील?
  निरुपयोगी लोकांना सहस्रभोजने किंवा दक्षिणा देऊ नये.
 • दगडाच्या देवाला नैवेद्य न वाहता अपंगांना आणि पोरक्या मुलांना यथाशक्ती मदत करावी.
 • स्वर्गाची कल्पना धर्म पुस्तकांत आढळते. ही कल्पना बागुलबुवाप्रमाणे निरर्थक आणि खोटी आहे. माणसाने स्वश्रमाने पृथ्वीचा स्वर्ग केला पाहिजे.
 • स्त्रिया आणि शूद्र ह्यांच्या बाबतीत धर्माने, धर्मग्रंथांनी आणि धर्मगुरूंनी पक्षपाती भूमिका घेतली आहे.

प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज यांची मूलतत्त्वे इतकी सारखी असताना जोतिबांना निराळा समाज स्थापण्याची गरज का वाटली? याचे विश्लेषण लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी बहुजन समाजाच्या चळवळीचा इतिहास यात केले आहे. (परिशिष्ठ १, सार्वजनिक सत्यधर्म, रा. ना. चव्हाण, रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, २०१७)


Laxmanshastri Joshi
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

पुरातन धर्मसंस्थांनी अनेक युगे मानव समाजाच्या भोवती भेदभावाची तटबंदी उभारली आहे. ती उडवून मानवी ऐक्याची स्थापना करावी या ध्येयाने नवयुगधर्माची चळवळ गेल्या शतकात निर्माण झाली. (जोशी एकोणिसाव्या शतकाविषयी बोलत आहेत.) ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज हे त्याच चळवळीचे रूप होय. सत्यशोधक समाज हा तिचाच एक पर्याय होता. सार्वजनिक सत्यधर्म यातील सत्ये आणि ब्राह्म तत्त्वे यात साम्य आहे. मग जोतिबांनी ब्राह्मो समाजाचा का अंगीकार केला नाही हा प्रश्न येतो.

याची दोन कारणे दिसतात. प्रार्थना समाजाच्या बहुसंख्य सभासदांचे विचार बदलले पण आचार बदलले नाहीत. पुष्कळसे प्रार्थनासमाजी दुहेरी जीवनक्रम घालवीत असत. प्रार्थना समाजात मूर्तिपूजा नव्हती पण घरात देव्हाऱ्यात देव असत. प्रार्थना समाजात सुखवस्तूंचा भरणा होता. युरोपियन शिष्टाचार पाळून आपले वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न असे. दुसरे असे की ब्राह्मो समाजात आणि प्रार्थना समाजात विद्यमान धर्मावर टीका करण्यास परवानगी नव्हती. सत्यशोधकास ब्राह्मणी आचारविचार आणि धर्मग्रंथ यावर सडकून टीका करण्याची गरज भासत होती. ब्राह्मणी आचार हा सर्व हिंदूंचा आदर्श ठरला होता. सत्यशोधकाला ब्राह्मणी दंभाचा स्फोट करायचा होता.

जोतिबा लिहितात, “आता आम्हाला ब्रह्म समाज व प्रार्थना समाज नकोत. पुरे झाले तुमचे छक्केपंजे! शूद्रांचा तुम्ही सर्वनाश केलात, तुमच्या पूर्वजांनी महार-मांगांच्या मार्गात पसरलेले काटे तुम्हीच वेचून काढा.”

लक्ष्मणशास्त्री लिहितात, “ब्राह्म समाज ही हिंदूंच्या वरच्या थरातील धार्मिक सुधारणेची वैचारिक हाक होती. सत्यशोधक समाज ही सामाजिक मूल्ये बदलण्याची खालच्या थरातील ललकारी होती.”

आर्य समाज

स्वामी दयानंद या ब्राह्मण गृहस्थाने या पंथाची स्थापना केली आणि १८६७ साली मुंबईत पंथाचे पीठ स्थापिले गेले. वेदकालीन धार्मिक पद्धती पुन:प्रस्थापित करणे हा या पंथाचा मुख्य हेतु होता. आर्य समाजाच्या शाखा देशातील सर्व प्रमुख शहरांत उघडल्या गेल्या. आर्यधर्मीयांस मूर्तिपूजा मान्य नाही. हा पंथ जातिभेद मानत नाही. अन्य धर्मीयांस आर्य समाजाद्वारे हिंदू धर्मात दाखल केले जाते.

(माहितीचा स्रोत – हिंदू धर्म दीपिका, वामन गणेश दुभाषी १९३३, पुन:प्रकाशन १९९८, वरदा प्रकाशन))

गांधी आणि सावरकर

या दोन महान व्यक्तींनी आपले हिंदू धर्माविषयीचे विचार १९२०नंतर व्यक्त केले. परंतु धर्म सुधारणेचे प्रयत्न या विषयाच्या पूर्ततेसाठी आपण या दोन महापुरुषांचे विचार पाहू. हे विचार त्यांनी १९२० ते १९४० या कालखंडात व्यक्त केले. या विचारांचे संकलन वि. ग. कानिटकर यांनी धर्म – महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा या पुस्तकात केले आहे. (दिलीपराज प्रकाशन, प्रथम आवृत्ती, २०००.)

प्रथम महात्मा गांधींचे विचार पाहू. महात्मा गांधींनी हे विचार यंग इंडिया या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले.

हिंदू धर्माची कुठलीही अधिकृत अशी धर्म श्रद्धा नाही. मी म्हणतो की सत्य आणि अहिंसा ही माझी धर्म श्रद्धा आहे. अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध म्हणजे हिंदू धर्म. एखाद्या मनुष्याचा ईश्वरावर विश्वास नसेल तरी तो स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊ शकतो. हिंदू धर्म हा इतर सर्व धर्मांपेक्षा अधिक सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे. हिंदू धर्माच्या ग्रंथांवर मी विश्वास ठेवतो. पण केवळ हिंदू ग्रंथच दैवी आहेत असे मी मानत नाही. इतर धर्म ग्रंथसुद्धा दैवी प्रेरणेतून निर्माण झाले आहेत. म्हणून काही त्यांतील प्रत्येक शब्द ईश्वराकडून स्फुरलेला आहे असे मानण्याची मला आवश्यकता वाटत नाही.

कोणतेही भाष्य नैतिक भावनांना रुचणारे नसेल तर ते मी कदापि मानणार नाही. धर्मग्रंथांचा अर्थ समजून घेण्यासाठी मी त्यांना सत्य आणि अहिंसेच्या कसोटीवर कसतो. मूळ वेदांत काहीही असो. जर ते नैतिकतेच्या विरोधी असेल तर यर नाकारावे. धर्मशास्त्राच्या ग्रंथांचे स्थान कधीच बुद्धी आणि सत्य यांच्या वरचे असू शकत नाही. (असे लिहून गांधींनी मनुस्मृतीसारख्या ग्रंथातील वचनांचे विचार न करता पालन करण्यातील धोका दाखविला.) धर्माच्या नावाखाली आपण हिंदूंनी कर्मकांडाला विनाकारण जास्त महत्त्व दिले. धर्म म्हणजे खाण्यापिण्याचा प्रश्न मानून आपण धर्माची अवनती केली आहे.

गांधीजींनी हे १९२१ साली लिहिले, आज शंभर वर्षांनंतर आपल्या समाजात हे वाद आहेत की हलाल योग्य की अयोग्य, मांसाहार कुठल्या दिवशी बंद केला पाहिजे!

हिंदू धर्मातील अस्पृश्यता ही बुद्धीला न पटणारी आणि दया आणि प्रेम या भावनांच्या विरोधी आहे. जर हिंदूंनी आपल्या धर्माला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक मिटविला नाही तर ते स्वातंत्र्यप्राप्तीला योग्य समजले जाणार नाहीत. अस्पृश्यता ही एक पुरातन संस्था आहे. पण ते महापाप आहे. शूद्राला वेद शिकण्याला मनाई करणे मला स्वत:ला कधीही मान्य होणार नाही. ज्ञान कोण्या एका वर्गाची किंवा वर्णाची मिरासदारी नव्हे.

आता सावरकर हिंदू धर्माविषयी काय लिहितात ते पाहू. हे विचार साधारणपणे किर्लोस्कर या मासिकातून आणि सावरकरांचे सामाजिक विचार या पुस्तकातून घेतले आहेत (संपादित, मॅजेस्टिक प्रकाशन, १९७३) आणि हे विचार १९३५ ते १९४० या काळात प्रसिद्ध झाले.

विश्वाला धारण करणारी आणि चालन करणारी अशी जी शक्ती, तिला देव म्हणायचे असेल तर त्या देवाने हे विश्व माणसाच्या सुखसोयीसाठी निर्मिले ही खुळी कल्पना आहे. मनुष्य या विश्व-देवाच्या खिजगणतीतही नाही. विश्वाच्या असंख्य आणि अनंत उलाढालींतील मनुष्य हा एक अतिशय तुच्छ परिणाम आहे. या विश्वाची जी आद्यशक्ती काही ठराविक नियमांनी वर्तते ते नियम समजून घेऊन त्यातील काहींचा मनुष्य जातीला पोषक होईल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. विश्वात आपण आहोत पण फार थोड्या अंगी ते आपणास अनुकूल आहे, फार मोठ्या अंगी ते आपणास प्रतिकूल आहे.

(सावरकरांना ईश्वर हीच कल्पना मान्य नाही, असा शेरा किर्लोस्करचे संपादक लिहितात.)

धर्मग्रंथांविषयी बोलायचे तर ज्या समाजाने धर्मग्रंथास जखडून घेतले तो समाज मागासलेला राहिला. धर्मग्रंथावर समाजसंस्था उभारण्याचे दिवस गेले. या विज्ञानयुगात समाजसंस्थेची उभारणी विज्ञाननिष्ठ तत्त्वावरच केली पाहिजे.

जन्मजात अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. विटाळ तोच ज्यायोगे आरोग्यास हानी पोचते. सोवळे तेच की जे वैद्यकशास्त्रास आवश्यक आहे. अमक्यास शिवू नये, तमक्याचा विटाळ होतो यास कोणी जुमानू नये. जातिभेद देशास अत्यंत विघातक होत आहे. कोणतीही व्यक्ती अमक्या जातीत जन्मली एवढ्यासाठी उच्च अथवा नीच मानली जाऊ नये. गुणविकासाची संधी सर्वांस समानतेने मिळाली पाहिजे.

लिंगपूजा, पशूपूजा, वृक्षपूजा हे धर्माचे निकृष्ट स्वरूप आहे. गायीत देव आहे असे पुरोहित सांगतात. मग वराह अवतार देवाने घेतलेला म्हणून डुक्कर का पवित्र मानू नये? गाय, बैल हे पशू आपल्या शेतीप्रधान देशात उपयुक्त आहेत. म्हणून त्या पशूंची जोपासना करावी. गोपालनाचा प्रश्न धार्मिक अंधळेपणा चालू न देता आर्थिक दृष्टीने सोडवावा. गायींना पक्वान्ने खायला देवून मनुष्ये उपाशी ठेवणे हा धर्म नव्हे.

पाच हजार वर्षांपूर्वी पोथ्यांत सांगितलेली गोष्ट आम्ही जर विज्ञानावर पारखून न घेतली तर आपले राष्ट्र पाच हजार वर्षांइतकेच मागासलेले राहील.

वारकरी संप्रदाय

आपण अठराव्या शतकातील वारकरी संप्रदायाचे स्वरूप पाहिले. शंभर वर्षांनी त्या संप्रदायात काही बदल झाला नाही. हा संप्रदाय वैयक्तिक देवभक्ती आणि सामूहिक कीर्तन यांपुरता मर्यादित राहिला. वारकरी संप्रदायाने माणसाचे देवाबरोबर नाते पाहिले. जातीव्यवस्थेवर संतांनी टीका केली खरी पण ब्राह्मणी धर्मावर हा संप्रदाय अंकुश लावू शकला नाही. कुसुमाग्रज एका कवितेत लिहितात

व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर। संतांचे पुकार वांझ झाले॥

अंधश्रद्धा

एकोणिसाव्या शतकात समाजात पुष्कळ अंधश्रद्धा होत्या काही सामान्य अंधश्रद्धा याप्रमाणे होत्या –

 • ग्रहणकाळात अन्न शिजवायचे नाही आणि खायचे नाही.
 • ऋतुमती असताना स्त्रियांनी कशाला शिवायचे नाही.
 • फलज्योतिष.
 • देवाला प्रसन्न करण्यासाठी प्राण्याचे बळी देणे.
 • नवरात्रात अष्टमीला अंगात येणे.
 • पंचपक्वांनांचे बोडण करून ते गाईस खाऊ घालणे.
 • दृष्ट लागणे, नजर लागणे / दृष्ट काढणे.
 • शितळादेवीच्या प्रकोपाने देवीचा (small pox) रोग होणे.
 • गळ्यात किंवा हातात गंडे बांधून स्वतःचे संरक्षण करणे.

या अंधश्रद्धांपैकी फलज्योतिष ही अंधश्रद्धा जगभर दिसते. जगभर हा मोठाच धंदा झालेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने जो भविष्यकर्ता याची सत्यता सिद्ध करून दाखवेल त्यास ५ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे अजून एकाही भविष्यकर्त्याने हे आव्हान स्वीकारलेले नाही.

या आणि अशा स्वरुपाच्या अंधश्रद्धांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात येते की या अंधश्रद्धा चालू ठेवून काही व्यक्तींचा फायदा होत असतो. याशिवाय हे लक्षात येते की काही अंधश्रद्धा कालाबरोबर नाहीशा होतात आणि काही नवीन जन्माला येतात. ऋतुमती असताना स्त्रियांनी घरात कशाला शिवायचे नाही ही कल्पना आता जवळजवळ नाहीशी झाली आहे. पन्नास वर्षांपूर्वी वास्तुशास्त्र अशी काही कल्पना नव्हती. (ते अर्थातच शास्त्र नाही). आता त्या कल्पनेचा मोठा धंदा झाला आहे.

आपण ज्या कालखंडाचा विचार करीत आहोत त्या कालखंडात समाजात वरील अंधश्रद्धांची चांगलीच पकड होती. आज या अंधश्रद्धा गेल्या आहेत का? नाही. पण या अंधश्रद्धांची तीव्रता कमी झाली आहे. पुढच्या काळात संत गाडगे महाराज आणि डॉक्टर दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे कार्य केले.

निष्कर्ष
धर्माचा खरा अर्थ समाजापुढे मांडणारे विचारवंत एकोणिसाव्या शतकात उभे राहिले. दादोबा तर्खडकर, रामकृष्ण भांडारकर आणि जोतिबा फुले हे खऱ्या अर्थाने पहिले धर्म सुधारक होते. या तिघांचेही धर्मसुधारणासंबंधी विचार जवळजवळ सारखेच होते. ते साहजिकच होते कारण तत्कालीन धर्मातील उणिवा तिघांनाही जाणवत होत्या. परंतु या सुधारणांना लोकांत मान्यता मिळाली नाही हे खेदाने म्हणावे लागते. या नंतरच्या काळात गांधीजी आणि सावरकर यांनी धर्माबद्दलचे आपले विचार परखडपणे मांडले. यामुळे समाजात बदलांना निश्चितच सुरुवात झाली.

पुढच्या भागात – भाग ९मध्ये एकोणिसाव्या शतकात दलितांचे काय प्रश्न होते याचा विचार करू.

मागचे भाग –
भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet