एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ९

समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?

सुधीर भिडे

स्वतःला सवर्ण समजणारा समाज अस्पृश्यतेचा शिक्का उठवलेल्या सोन्यासारख्या जीवनाच्या चिंध्या करत असतो. आपण देश, धर्म, संस्कृती वगैरे शब्द किती क्षुद्र मर्यादेच्या रिंगणात वापरत असतो याचा प्रत्यय आला की आपले जगणे आपल्यालाच ओशाळवाणे वाटायला लागते.
– पु. ल. देशपांडे

आपला विषय आहे की १८१८ ते १९२० या शतकात काय घडले की ज्याचे समाजावर दूरगामी परिणाम झाले. गेल्या भागात आपण त्या शतकातील धार्मिक सुधारणांच्या प्रयत्नावर नजर टाकली. समाजातील बदलांचा विचार करताना आपण तीन भागांत विचार करू – दलितांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न आणि समाजसुधारकांचे प्रयत्न.

या भागात दलित या संज्ञेत कोणत्या जातींचा समावेश होतो आणि त्या जातींची एकोणिसाव्या शतकात काय स्थिती होती ही माहिती घेणार आहोत.

सवर्ण

आपण पाहिले की ब्राह्मणांनी समाजाचे तीन भाग केले - ब्राह्मण, शूद्र, अस्पृश्य. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अस्पृश्यांशिवाय इतर जातींचा उल्लेख सवर्ण या शब्दाने केलेला दिसतो. सवर्णांमध्ये ब्राह्मण, मराठा, कुणबी, सोनार, तेली, माळी, सुतार, न्हावी, कुंभार इत्यादी जाती अंतर्भूत झालेल्या दिसतात. धर्मशास्त्राचा आधार घेऊन ब्राह्मणांनी अस्पृश्यांना समाजाबाहेर केले. इतर सवर्ण मागे राहिले नाहीत. तेही अस्पृश्यांना वाईट वागणूक देत राहिले.

१८१८ साली समाजावर जातीव्यवस्थेची पकड होती. जात आणि उपजीविकेचे काम यांची पूर्ण सांगड होती. ब्राह्मणांचे प्रमाण ५ टक्के तर कुणबी आणि मराठा समाज ३० टक्के होता.

१८१८नंतर शासन, कोतवाली, सैन्य या क्षेत्रांतले ब्राह्मणांचे प्राबल्य संपले. शिक्षणक्षेत्रात ब्राह्मणांनी आघाडी मिळविली. त्याचा शासन आणि नोकरी उद्योगात ब्राह्मणांना फायदा मिळाला. ग्रामीण क्षेत्रात मराठ्यांचे प्राबल्य राहिले. मराठ्यांत शिक्षणाला सुरुवात उशिरा झाली. त्यामुळे १९२०पर्यंत नोकरी आणि उद्योग यांत मराठ्यांचे स्थान महत्त्वाचे नव्हते. ब्राह्मण आणि मराठा जातींशिवाय इतर सवर्ण जाती – धोबी, न्हावी, लोहार, कुंभार, सुतार, वैश्य इत्यादी – गावकुसात रहात. ब्राह्मण सोडून यांपैकी कोणी शिक्षण घेत नसे; (शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती).

दलित कोण?

दलित, अस्पृश्य आणि हरिजन हे शब्द समानार्थी मानून वापरले जातात. सवर्ण सोडून इतर सर्वच अस्पृश्य होते. हरिजन हा शब्द गांधीजींनी वापरायला सुरुवात केली. आंबेडकरांना हरिजन हा शब्द मान्य नव्हता. त्यांच्या मताप्रमाणे हरिजन म्हणून अस्पृश्यांच्या भयंकर स्थितीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होतो. आंबेडकरांनी दलित हा शब्द वापरला. या लिखाणात दलित आणि अस्पृश्य या शब्दांचा वापर केला आहे. दलित म्हणजे दळले गेलेले, भरडले गेलेले. हे सर्व दलित गावकुसाबाहेर रहात असत. दलितांत तीन प्रकार होते (आजही आहेत).

  • गावकुसाबाहेरचे नित्य रहिवासी – महार, मांग, चांभार, रामोशी
  • भटक्या जमाती - कैकाडी, पिंगळे जोशी, डोंबारी, पारधी, धनगर, गोसावी, रोहिली
  • आदिवासी - भिल्ल, वारली, गोंड, ठाकर अशा बहुत करून जंगलांत राहणार्‍या जमाती

या तीनही प्रकारच्या जाती अस्पृश्य समजल्या गेल्यामुळे अस्पृश्यतेचा आधी विचार करू. आपण विचार करीत आहोत त्या कालखंडात समाजात अस्पृश्यता तशीच राहिली.

ना. वि. जोशी यांनी १८६८ साली लिहीलेल्या पुस्तकात १८१८ सालातली अस्पृश्यांची स्थिती वर्णिली आहे –

अस्पृश्य लोकांस त्यांची ओळख पटावी म्हणून कमरेस मडकी बांधून फिरावे लागे. रस्त्यात येताना ब्राह्मण दिसला तर अस्पृश्यास खाली बसावे लागे, ज्यायोगे त्यांची सावली ब्राह्मणावर पडू नये. कोणी अस्पृश्य बाजीरावांच्या समोरून गेला तर त्याचे शिर उडवून त्याचा चेंडू बनवून खेळत. नवीन इमारत बांधताना महारास पायात गाडत.

१८१८ साली दलितांची वर वर्णन केलेली भयंकर स्थिती होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. गावातील विहिरीतून त्यांना पाणी भरता येत नसे. त्यांना जमिनीची मालकी नव्हती.

दलित समाज एकजिनसी नव्हता. (आताही नाही). त्यांच्यात निरनिराळ्या जाती आहेत आणि त्यांतही श्रेष्ठ-कनिष्ठ श्रेणी आहेत. दलितांच्या निरनिराळ्या जातींत त्यांची पंचायत असते. काही जातींत पंचायतीला भावकी म्हणतात. जातीतील प्रश्नांचा निवाडा तिथे होतो.

गा‌वकुसाबाहेरचे नित्य रहिवासी

सवर्ण जातींत मराठ्यांची संख्या सर्वांत जास्त होती तर अस्पृश्यांत महारांची संख्या सर्वांत जास्त होती. महारांकडे गावकीची सरकारी कामे असत. पाटील, कुलकर्ण्यांप्रमाणे महार हा गावातला वतनदार होता.

महारांनी करण्याची कामे (तराळ-अंतराळ, शंकरराव खरात, कॉन्टिनेन्टल १८८१, पृष्ठ ११७)

सरकारी वसूल सबट्रेजरीत पोचता करणे. सरकारी देणे देण्यासाठी शेतकर्‍याला चावडीवर बोलविणे.गावाचे दफ्तर तालुक्याच्या कचेरीत नेणे आणि आणणे. सरकारी वसुलीवर जप्त केलेल्या मिळकतीवर नजर ठेवणे. सरकारी टपाल कचेरीत नेणे आणि आणणे. पीकपाहणी चालू असताना अंमलदाराबरोबर जाणे. जन्म-मृत्युची खबर कचेरीला देणे. गावकर्‍यांना नोटिसा बजावणे. रात्रीच्या गस्तीला पोलिस पाटील नसतील तर जाणे. दवंडी देणे. कोंडवाडयात घातलेली गुरे लिलावासाठी नेणे. बेवारसी प्रेतांची विल्हेवाट लावणे. गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे. गा‌वकुसाबाहेर गस्त घालणे. गावात येणार्‍या-जाणार्‍या माणसावंर नजर ठेवणे.

ही सर्व कामे करून महाराला गावातील पाटील-देशमुखांकडे पडेल ते काम करावे लागे. त्याला वेठबिगारी म्हणत. गावात जी नदी असे तिच्या सर्वांत वरच्या बाजूला (upstream) ब्राह्मण पाणी भरीत; त्यांच्या खाली वाणी, देशमुख, पाटील यांचे पाणवठे; त्यांच्या खाली कुंभार, लोहार, सुतार पाणी भरीत. सर्वांत खाली महार, मांग पाणी भरीत. महारांच्या कामांची यादी पाहता महारांचे काम खूप महत्त्वाचे दिसते. अशा समाजाला अस्पृश्य समजणे आणि त्यांच्याशी दुर्व्यवहार करणे ही हिंदू समाजाने (निव्वळ अर्थशास्त्राचा विचार करताही) मोठीच चूक केली असे दिसते.

दलितांचा धर्म

दलित स्वतःला हिंदू समजतात. हिंदूंच्या देवांसारख्या देवांची पूजा करतात. पूजा करण्यासाठी त्यांचे स्वतःचे विधी आहेत. महारांची देवी मरीआई. महारांच्या जत्रेत रेड्यांचा बळी देण्यात येतो. ‘मरीआईचं चांगभलं’ अशी हळी देऊन रेडा मारला जातो. मग त्या रेड्याचे मांस शिजवून सर्व जण खातात. भटक्या जमातींतही जत्रेत बळी देणे हा प्रकार सामान्य दिसतो. भटक्या जमातींत बकरा किंवा कोंबडी यांचा बळी दिला जातो. नैवेद्यानंतर बळीचे मास खाल्ले जाते. नैवेद्याचे मांस खाणे झाल्यावर दारू पिणे हे ही त्या रूढीचा भाग असतो. मरीआईसारखीच मरगम्मादेवीचीसुद्धा पूजा होते.

अंगात येणे हा त्यांच्या धर्माचा मोठा भाग दिसतो. कुठली व्यक्ती आजारी पडली की अंगात आलेली व्यक्ती इलाज म्हणून भुताला नैवेद्य द्यायला सांगते. मरणानंतर या जातींत प्रेत पुरले जाते, दहन केले जात नाही.

दलित वाङ्मयात महार

जोतिराव फुले यांनी मातंग समाजातील मुलींसाठी शाळा काढली होती. त्या शाळेतील मुक्ता साळवे नावाच्या १४ वर्षांच्या मुलीने १८५५ साली एक निबंध लिहिला होता. दलित साहित्याची ती सुरुवातच म्हणायला हवी. हा लेख ज्ञानोदय वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. उषा पोळ खंदारे, कोमल प्रकाशन २०११, पृष्ठ ९). ती मुलगी आपल्या निबंधात लिहिते -

ज्या ईश्वराने मज दीनदुबळीच्या अंतःकरणात आम्हां दुर्दैवी, पशूपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांग-महाराच्या दुःखाविषयी भरविले त्यास स्मरून मी हा निबंध लिहीत आहे. लाडूखाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमची मत्ता आहे. यावरून असे दिसते की आम्हांस धर्मपुस्तक नाही. तर हे भगवान तुजकडून आलेला आम्हा साठी कोणता धर्म ते कळीव.

आमच्या जागेवरून आम्हांस हाकून देऊन ब्राह्मण मोठमोठ्या इमारती बांधून बसले. त्या इमारतींच्या पायांत मांग-महारांना जिवंत पुरण्यात आले. आम्हांस ब्राह्मण लोकांनी गाई-म्हशीपेक्षा नीच मानिले आहे. त्यांच्या घरासमोरून कोणी मांग अथवा महार गेला तर त्यास मारण्यात येई. आम्हांस शिकण्याची बंदी. बाजीरावास कळले की कोणी महार-मांग वाचतात तर तो त्यांस शिक्षा देई. सहवास तो काय आमच्या सावलीचाही स्पर्श होऊ नये असा सोवळे नेसून नाचत फिरणार्‍या लोकांचा हेतू.

या शिवण्याच्या बंदीमुळे आम्हांस कोणी चाकरीत ठेवत नाही तर आम्हांस पैसा कोठून मिळणार? बाजीरावांच्या राज्यात मांग-महारांवर नाना जुलूम होत होते. आता दयाळू इंग्रज सरकारचे राज्य आल्यापासून हे जुलूम बंद झाले आहेत. पण चमत्कारिक गोष्ट अशी की जे ब्राह्मण आम्हांस दुःख देत होते त्यांपैकीच काही आम्हांस दुःखातून बाहेर काढण्यासाठी मेहनत करीत आहेत. अशा ब्राह्मणांस काही सनातनी तुम्हांस जातीबाहेर टाकू अशी धमकी देतात.

(ठळक ठसा लेखकाचा.)

१९७०पासून दलित वाङ्मयात आत्मचरित्र लेखन सुरू झाले. या दलित लेखकांनी स्वतःची कहाणी वर्णन केली. या सर्व पुस्तकांतून दलित समाजाची १९३० ते १९६० या कालखंडातील स्थिती वर्णन केलेली दिसते. आपण ज्या कालखंडाचा विचार करीत आहोत – १८१८ ते १९२० – त्या कालखंडातील हे लेखन नाही. पण त्या कालखंडात दलित असे लेखन करणे शक्यच नव्हते. त्यांना शिक्षणच नव्हते. त्यामुळे दलितांची खरी स्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याला याच आत्मलेखनाकडे पाहावे लागेल. एकोणिसाव्या शतकातील दलितांची स्थिती या आत्मकथनांतून वर्णन केल्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त वाईट असावी.
या पुस्तकांतून जे कथन केले आहे ते वाचून अंगावर काटा येतो, पोटात डचमळते. या जाती आपल्या समजाचा भाग होत्या, आहेत. हिंदू धर्माने आणि हिंदू समाजाने यांना जशी वागणूक दिली ते वाचून स्वतःलाच लाज वाटते. उदाहरणादाखल आपण दोन पुस्तकांचा विचार करू.

दया पवार यांनी बलुतं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. दया पवार महार जातीत जन्मले. या पुस्तकात त्यांना सवर्णांनी कशी वाईट वागाणूक दिली ते उल्लेख येतात. (ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.) बलुतं या पुस्तकावर पु. ल. देशपांडे यांनी १९७९ साली अभिप्राय लिहिला त्यातील काही वाक्ये उद्धृत करीत आहे –

या देशातील माणसावर जातीचा शिक्का जन्मकाळीच उठवला जातो. तो शिक्का पुसण्याची हिंदूंच्या तेहेतीस कोटी देवांपैकी एका देवाचीसुद्धा प्राज्ञा नाही. हिंदू समाजात सवर्णपणाचा डाग बालकाचे पुढचे जीवन विद्रूप करीत नाही. पण अस्पृश्य आई-बापापोटी जन्माला आलेल्या बालकाला जीवन किडा-मुंगीसारखे जगावे लागते. स्वतःला सवर्ण समजणारा समाज अस्पृश्यतेचा शिक्का उठवलेल्या सोन्यासारख्या जीवनाच्या चिंध्या करत असतो. आपण देश, धर्म, संस्कृती वगैरे शब्द किती क्षुद्र मर्यादेच्या रिंगणात वापरत असतो याचा प्रत्ययआ ला की आपले जगणे आपल्यालाच ओशाळवाणे वाटायला लागते. ह्या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रुढीजन्य श्रद्धांचे मोतीबिंदू गळून पडतील आणि माणुसकीच्या जवळ जाऊन जगण्याची ओढ लागेल.

दया पवार बलुतंमध्ये एके ठिकाणी लिहितात (पान ७०) – हिंदू धर्माविषयी तसं कधीच प्रेम नव्हतं. - हिंदू धर्माने हिंदू राष्ट्राचे नुकसान केले आहे हे जे प्रमेय आहे त्याची पुष्टी ह्या आणि अशा उद्गारांतून होते.

दुसरे पुस्तक तराळ अंतराळ; लेखक शंकरराव खरात, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९८१. तराळ या शब्दाचा अर्थ महारांचा मुकादम. तराळकी फिरती असून एका वर्षासाठी योग्य महाराकडे जात असे. खरातांचे सांगली जिल्ह्यात तीन गावी महार वतन होते. खरातांच्या लहानपणचे अनुभव ते लिहितात, त्यांपैकी काही –

  • सवर्णाच्या घरी लग्नाची जेवणे झाली की उष्ट्या पत्रावळी एकत्र करून त्यांत राहिलेले उष्टे अन्न मेजवानीसारखे खरातांच्या घरी खाल्ले जायचे.
  • त्यांना कधी मंदिरात प्रवेश नव्हता. मंदिराच्या बाहेरूनच देवास नमस्कार असे.
  • सवर्णांची मुले शाळेत वर्गात बसत. खरातांना उन्हात वर्गाबाहेर बसावे लागे.
  • पिण्याच्या पाण्याला कोठेही हात लावता येत नसे. कोणी सवर्ण वरून पाणी ओते, ते ओंजळीतून प्यावे लागे.
  • प्रेतावरचे पांढरे कापड प्रेताला अग्नी देण्याआधी काढून महाराला दिले जाई. खरातांचे लहानपणाचे शर्ट त्या कापडातूनच झाले.
  • महार विहिरीजवळ गेले म्हणून विहीर अशुद्ध झाली. मग विहिरीत गायीचे शेण आणि मूत्र टाकून विहीर शुद्ध करण्यात आली.

भटक्या जमाती

लक्ष्मण माने यांनी लिहिलेले आत्मचरित्र – उपरा (ग्रंथाली प्रकाशन १९८०). कैकाडी या भटक्या जमातीच्या जीवनाचे यात वर्णन आहे. ते लिहितात –

पिढ्यान्‌पिढ्या बिर्‍हाड पाठीवर घेऊन गाढवाचं जिणं जगणार्‍या माणसांच्या वेदना हे पुस्तक वाचून समाज समजावून घेऊ शकला तरी खूप झालं. लक्षण माने यांना त्यांच्या लेखनाबद्दल पद्मश्रीने गौरविण्यात आले.

दादासाहेब मोरे यांनी गबाळ नावाचे पुस्तक कुडमोडे जोशी या भटक्या जमातीवर लिहिले आहे. (श्रीविद्या प्रकाशन, १९८३). हेही आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. या पुस्तकात भटक्या जातींच्या जीवनाचे वर्णन केले आहे ते पाहू –


गबाळ

ज्याला तुम्ही संसार म्हणता ते गबाळ घोड्याच्या पाठीवर टाकून जिकडे पोटाला मिळेल तिकडे भटकत जाणारी आम्ही माणसं. मुक्कामाला आलो की दोन काठ्यांवर पोती टाकून केलेलं पाल म्हणजेच घर. पालासमोर तीन दगड आणून ठेवायचे तीच चूल. पालाच्या समोरच एक मोठा दगड आणून ठेवायचा त्यावर बसून आंघोळ करायची. बायकांनीदेखील तिथेच आंघोळ करायची. त्यांना लाज वाटायची नाही. त्यांच्या जीवनात लाजेचं खातंच उघडलेलं नसावं. सकाळी जवळच्या गावात भीक मागायला जायचं. अर्धा भाकरीचा तुकडा आणि शिळे कालवण यांबरोबर पुष्कळ शिव्या मिळायच्या. मी पहिल्यांदा गावात जाऊन भीक मागितली तो दिवस मला आठवतो. घरी भाकरीचे चार तुकडे घेऊन आलो. त्याचे माझ्या आईला केवढे कौतुक? ती म्हणाली, “आता माझा बाळ मिळवा झाला.” (मिळवता झाला.)

गावात मिळेल ते काम करायचं आणि दोन पैसे मिळायचे. चार-सहा दिवस झाले की जमातीतील प्रमुख लोक एकत्र येऊन पुढच्या मुक्कामास कुठे जायचे ते ठरवीत. सामानाची बांधाबांधी करून घोड्यावर किंवा गाढवावर सामान लादायचे आणि पुढच्या मुक्कामाकडे वाटचाल.

धनंजय धुरगुडे यांनी माझा धनगरवाडा हे धनगरांच्या जीवनावरचे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. (रोहन प्रकाशन, २०१७). लेखकाच्या शब्दांत –

हा अनुभवकथनाचा कालखंड १९८० ते १९९५ या कालखंडातील आहे. आमचा धनगरवाडा भटकत होता. तसा तो मागील अनेक पिढ्यांपासून भटकत आहे. धनगर भटकतच जन्माला आले, उभं आयुष्य भटकत राहणार आणि भटकत असतानाच मरणार. धनगर समाज दर्‍याखोर्‍यांमध्ये आपल्या शेळ्या-मेंढ्यांच्या चारापाण्यासाठी भटकत असतो आणि सामाजिक सुधारणांपासून तो मागास राहिलेला आहे. आमच्या भावकीचे धनगरवाडे पोटापाण्यासाठी अजूनही भटकत आहेत.


धनगर

आपण ज्या कालखंडाचा विचार करीत आहोत – १८१८ ते १९२० – या शतकात धनगरांचे जीवन असेच किंवा यापेक्षाही जास्त खडतर असणार. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्या शतकातील यांचे जीवन वर्णन करणारे लेखन नाही. कारण हे भटके समाज त्या काळात पूर्णपणे अशिक्षित होते. धनगरवाडा हा शब्द टोळी अगर तात्पुरती वस्ती या अर्थाने वापरला जातो. शहरातील वाड्यांप्रमाणे धनगरवाडा एका जागी नसतो. बिरोबा, धुळोबा, सिदोबा, धनगरबाबा असे यांचे देव असतात तर कडजाई, वडजाई, घुमाई, मावलाई अशा देवतांची हे पूजा करतात. यांच्या जेवणात शेतकर्‍यांकडून मिळालेल्या धान्याची भाकरी आणि शेळ्या-मेंढ्यांचे दूध असते. १९८५पर्यंत धनगर जातीत स्त्रियांचे शिक्षण चालू झाले नव्हते. स्त्री शिक्षणाची सुरुवात १८५१ साली महात्मा फुल्यांनी केली. यावरून हे लक्षात येईल की या भटक्या जमाती समाजजीवनापासून किती दूर होत्या.

धनगरांचे पैसे कमविण्याचे साधन म्हणजे त्यांच्या शेळ्या आणि मेंढया. पिके काढल्यानंतर शेतकरी धनगरांच्या शेळ्या-मेंढ्यांना रात्री शेतात बसवितात. रात्रभर शेळ्यामेंढ्या शेतात लेंड्या आणि मूत्र टाकतात. हे शेतासाठी उत्तम खत असते. याकरता शेतकर्‍यांकडून धनगरांना धान्य मिळते. शेतकरी धनगरांकडून मांसासाठी बकर्‍या खरेदी करतात. वर्षातून दोनदा मेंढ्यांची लोकर कापली जाऊन ती विकली जाते.

भटक्या जमातीतही उच्च आणि नीच श्रेण्या असतात. धनगरांची श्रेणी इतर भटक्या जमातींपेक्षा वरची असते. धनगरांची आर्थिक स्थिती इतर भटक्या जमातींपेक्षा बरी असते. गावकुसाबाहेरच्या जातींत जसे महार वरच्या स्थानावर असतात तसे भटक्या जमातींत धनगर वरच्या स्थानावर असतात.

या भटक्या जमाती वर्षातून एकदा एखाद्या ठिकाणी ठरावीक महिन्यात एकत्र येतात. हा त्यांच्या दृष्टीने आनंदाचा काळ असतो. वर्षभर एकमेकांपासून दूर झालेली माणसे एकमेकांना भेटतात. सुख-दुःखाच्या गोष्टी होतात. लग्ने केली जातात. या छोट्या काळानंतर ही माणसे परत एकमेकांपासून दूर जातात ती पुन्हा एक वर्षांनंतर भेटण्यासाठी. धनगर पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्या मूळ वस्तीवर जातात. पावसाळ्याचे चार महिने ते एका ठिकाणी राहतात.

भटक्या जमातींच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न असतो. एका जागी राहातच नसल्याने मुलांचे शिक्षण कसे होऊ शकणार? वरील भटक्या जातींतील लेखकांचे शिक्षण निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या शाळांत झाले. ते केवळ या लेखकांच्या आई-वडिलांच्या जिद्दीनेच शक्य झाले.

या आत्मचरित्रात्मक कथनांतून ब्राह्मणांचे ओझरतेच उल्लेख येतात. एका कैकाडी लग्नात बामण मांडवाबाहेर दूर उभे राहून लग्न लावतो असा उल्लेख आहे. दलितांचे संबंध आणि प्रश्न मराठा जातीबरोबर आलेले जास्त दिसतात.

दलित स्त्रियांची स्थिती दलितातील दलित अशी एका लेखिकेने वर्णिली आहे. स्त्रियांना मार देणे, मर्जीनुसार सोडून देणे हे प्रकार सामान्य दिसतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की इतके अत्याचार सोसूनही दलितांनी हिंदू समाजातील वाईट गोष्टी आत्मसात केल्या.

आंबेडकरांनंतर अस्पृशांना त्या उंचीचा पुढारी न लाभल्याची खंत लिखाणात दिसते.

या सर्व आत्मचरित्रांतून अजून एक गोष्ट दिसते ती ही की असे आत्मचरित्र लिहिल्याबद्दल त्यांच्या समाजातूनच लेखकांवर टीका झाली. जातींची दुर्दैवी स्थिती समाजापुढे आणल्याकरिता त्या समाजातूनच टीका व्हावी याचे कारण समजत नाही.

आदिवासी

आदिवासींना इंग्रजीत सध्या शेड्यूल्ड ट्राइब्स असे संबोधिले जाते. The Scheduled Castes and Scheduled Tribes Orders (Amendment) Act 2002 (Act No.10 of 2003)या कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात ४७ निरनिराळ्या आदिवासी जमाती आहेत. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या ९.३५% आहे. (ब्राह्मणांची संख्या ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.)


महाराष्ट्रात आदिवासींचा भाग
महाराष्ट्रातला आदिवासी भाग

महाराष्ट्रात आदिवासींची वस्ती समप्रमाणात विखुरलेली नाही. नकाशातील पिवळ्या रंगाच्या भागांत आदिवासींची वस्ती जास्त आहे. विदर्भात आणि गुजरात प्रांताला लागून आदिवासींची वस्ती जास्त आहे. मुंबई-पुण्यातील विचारवंतांचे आदिवासींच्या प्रश्नांकडे लक्ष गेले नाही त्याचे कारण हे असेल का?

आदिवासी हे आर्य आणि सिंधु संस्कृतीच्या आधी भारतात राहणारे लोक आहेत. तसे पाहिले तर ते खरे भारतवासी आहेत. अमेरिकेतील नेटिव्ह अमेरिकन आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूूझीलंडमधील aborigines प्रमाणे येथील आदिवासींची स्थिती अतिशय वाईट आहे. एकोणिसाव्या शतकात त्यांची काय स्थिती असावी याचा अंदाज आपण पन्नास वर्षांपूर्वीच्या त्यांच्या स्थितीच्या वर्णनावरून करू शकतो.

डॉक्टर प्रकाश आमटे लिहितात –

आदिवासींची परिस्थिती पाहून आम्ही हादरून गेलो. आरोग्य सेवा, शिक्षण यांचा गंध नाही, लोक आजारी पडले तर झाडपाल्याची औषधे आणि मंत्रतंत्र. कंदमुळे गोळा करणे आणि शिकार करणे आणि थोडी शेती यातून पोट भरणे, शेतीसाठी नांगराची माहिती नाही. निसर्ग आणि ऋतूंवर आधारित सण हेच जीवन. सरकार दरबारी यांच्या जमिनीचे रेकॉर्ड नाही त्यामुळे जमिनीच्या मालकी नोंदी नाहीत, जन्म-मृत्युच्या नोंदी नाहीत. मुले उघडीनागडी - काही वस्त्र नाही. मोठ्यांच्या कमरेला काहीतरी गुंडाळलेले. पुरुष नुसती लंगोटी नेसलेले.

अशी आमट्यांनी वर्णन केलेली १९७०मधील स्थिती (मौज दिवाळी अंक, २०२०). एकोणिसाव्या शतकात स्थिती यापेक्षा काही निराळी नसणार. आज २०२०साली परिस्थितीत पुष्कळच बदल झाला आहे. आपण विचार करीत आहोत त्या काळात आदिवासी विचारात घेतले जात नव्हते. इंग्रजांनी जमीनदारी आदिवासींवर लादली. आदिवासी भागांत त्यांनी जमीनदार नेमले, ज्यांच्याकडून ते शेतसारा घेऊ शकत. याचा परिणाम आदिवासी भागात उद्रेक होण्यात झाला. १८५५मध्ये संथाळ भागात मोठा उद्रेक झाला. १८७८ साली फॉरेस्ट ॲक्ट आला. या कायद्याने जंगलातील उत्पादनाचा आदिवासींचा हक्क काढून घेण्यात आला.

वारली जमात

माहिती मराठी विश्वकोशातून

वारली ही आदिवासी जमात किनारपट्टीवरचा उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या भागांत आहे. त्यांचा एकोणिसाव्या शतकातील इतिहास पहाण्यासारखा आहे. या भागातील वारली जमातीचा उल्लेख २००० वर्षापासून येतो.

१८१५ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या या भागातील कलेक्टरने हा रिपोर्ट लिहिला.

येथे राहणार्‍या जंगली लोकास जर शेती करण्यास भाग पाडले तर ते समाजाचा भाग होऊ शकतील. १८८५ सालच्या इंग्रजांनी बनविलेल्या एका रिपोर्टमध्ये असा उल्लेख येतो. मुंबईच्या उत्तरेला घनदाट जंगले आहेत. या भागात सागाची उत्तम झाडे आहेत. या भागात शेती करणारे फारसे लोक दिसत नाहीत.

यानंतर वारली लोकांस सरकारने शेती करण्याची जबरदस्ती केली. पण ही जमात शेती करू शकली नाही. त्यांना शेती करण्यात रसच नव्हता. इंग्रजांचा या भागातील उत्कृष्ट सागावर डोळा होता. मग इंग्रजांनी येथे उच्च जातींतील जमीनदार नेमले. आता त्यांच्या स्वतःच्या जागेचेच वारली कुळे / भाडेकरू झाले. यानंतर या भागातील उत्तम साग इंग्रजांनी इंग्लंडला नेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कसेल त्याची जमीन हा कायदा आला आणि वारली परत आपल्या जमिनीचे मालक झाले.

वारली चित्रकला आदिवासी स्त्रिया

वारली जमातीची चित्रकला बरीच प्रसिद्ध झाली आहे.

प्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा यांनी आदिवासी बोधकथा असे पुस्तक लिहिले. मराठी अनुवाद सुहास परांजपे आणि स्वातिजा मनोरमा यांनी केला. (मनोविकास प्रकाशन, २०१८). पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात –

बर्‍याच बोधकथा निसर्ग आणि मानव या नात्याचा शोध घेतात. निसर्ग आणि मानव यांत जी देवघेव घडते त्याचा अर्थ लावण्याच्या पद्धती आदिवासींनी विकसित केल्या आहेत. आदिवासी हे जंगलाचे सोबती आहेत. अजूनही ८०% आदिवासी वनक्षेत्रांत राहतात. त्यांचा जीवनाधार – अन्न, आरोग्य, आसरा – जंगलाशी घट्ट जोडलेला आहे. ‘हिरवा’ हे त्यांचे प्रमुख दैवत आहे. प्रत्येक वारली घरात तांदुळाच्या एका टोपलीत त्याची स्थापना केलेली असते. हिरवा हे अन्नाचे दैवत आहे. ‘वाघाया’ हे गावाचे रक्षण करणारे दैवत आहे. झाडे, प्राणी आणि पक्षी ही अनेक कुलांची कुलदैवते आहेत. वारली झाडे, प्राणी आणि पक्षी यांना जपतात. मानवी आयुष्यात निसर्गाचे स्थान हे अस्तित्वासाठीच महत्त्वाचे मानले आहे. आदिवासींच्या विश्वात निसर्ग आणि माणूस यांत संघर्ष नाही. जगण्याचा आधार निर्माण करणारे ते नाते आहे.

या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या बोधकथा वारली समाजात मौखिकरीत्या एका पिढीतून दुसर्‍या पिढीला सांगण्यात आल्या आहेत. वारली लोकांना लिपी / लिखाण याचे ज्ञान नव्हते. हे समाजाचे सामूहिक ज्ञान गोष्टींच्या स्वरूपात शेकडो वर्षांपासून राखले गेले आहे. या कथांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की आपण ज्यांना रानटी समजतो त्या समाजात स्त्रियांचे स्थान जंगलाबाहेर राहणार्‍या आणि स्वतःला सुसंस्कृत समजणार्‍या लोकांपेक्षा जास्त चांगले होते. या गोष्टींतील स्त्रिया आत्मविश्वासपूर्ण आणि कल्पक (assertive आणि inventive) आहेत. दुसरी जाणवणारी गोष्ट अशी की या समाजात ताडी / दारू पिणे ही एक सामाजिक आणि सामूहिक क्रिया आहे. बर्‍याच गोष्टींमध्ये कथानायक दारू पितो असे उल्लेख येतात.

एका गोष्टीची सुरुवात अशी होते –

ही खूप जुन्या काळातली गोष्ट आहे. त्याकाळात आपले वाडवडील शिकार करत; रानातील पाने, फुले, फळे, मुळे, कंद गोळा करत असत. त्यांना शेती माहीतच नव्हती. जंगल त्यांना पाहिजे ते मुबलक देत असे.

वारली जमातीची अशी परिस्थिती निश्चितच १८१८ साली होती.

भिल्ल

महाराष्ट्रातील दुसरी मोठी आदिवासी जमात म्हणजे भिल्ल. भिल्ल वस्ती खानदेशच्या उत्तरेला मध्य प्रदेश सीमेवर आहे.


भिल्ल

१८३३ साली भिल्लांची लोकसंख्या ५५००० इतकी असावी असे अनुमान आहे. भिल्ल त्यांच्या भागातून जाणार्‍या माल वाहतुकीवर जकात घेत. हे इंग्रजी कायद्याबाहेर होते. याशिवाय भिल्लांच्या टोळ्या शहरी भागांत दरोडे घालत असत. भिल्लांचा उपद्रव १८५७च्या उठावापर्यंत कमी झाला नाही.

महाराष्ट्रातील आदिवासी जमातींपैकी वारली आणि भिल्ल या दोन जमातींची आपण थोडी माहिती घेतली. एकोणिसाव्या शतकात आदिवासी जमाती समाजजीवनापासून खूप दूर होत्या. आदिवासी भागात जाण्यासाठी रस्तेही नव्हते. समाजात बदलांची सुरुवात मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे प्रामुख्याने झाली. या आदिवासी वस्त्या या भागापासून फार दूर होत्या. त्यामुळे समाजाचे त्यांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष गेले नाही असे झाले असेल का?

निष्कर्ष

१८१८ साली समाज सवर्ण आणि दलित असा विभागलेला होता. दलितांत तीन प्रकारच्या जाती होत्या – गावकुसाबाहेरचे नित्य रहिवासी, भटक्या जमाती आणि आदिवासी. या जमातींविषयीची माहिती आपल्याला १९७०नंतर प्रसिद्ध झालेल्या वाङ्‌मयावरून मिळू शकते. एकोणिसाव्या शतकात प्रसिद्ध झालेली या समाजांविषयीची माहिती अगदी त्रोटक आहे. उपलब्ध माहितीवरून लक्षात येते की त्या शतकात या जमातींची अवस्था भयंकर होती.

पुढच्या भागात – भाग १० मध्ये एकोणिसाव्या शतकात दलितांच्या उद्धाराचे जे प्रयत्न झाले ते पाहू.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet