नकोस विसरू

नकोस विसरू
कोसळणार्‍या
प्रपातातल्या
जलबिंदूच्या
खोल आतवर
कल्लोळाच्या
अब्जांशाचा
निनाद असतो

नकोस विसरू-
माथ्यावरती
ओणवलेल्या
निळ्यासावळ्या
घुमटावरल्या
नक्षत्रांच्या
दंतकथांना
शेवट नसतो

नकोस विसरू-
दाट धुक्याच्या
पल्याडचे जग
धूसरताना
अस्तित्वाच्या
काचेवरती
आभासाचा
चरा उमटतो

नकोस विसरू-
पैलतिराच्या
अनाहताशी
ऐलतिराच्या
कणाकणातील
कोलाहलही
रुणझुणणारे
धृपद साधतो

field_vote: 
0
No votes yet