(आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-३)

(आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-३)
सजावटीच्या रोषणाईसाठी चोरी!

गणपती

आम्ही आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन त्यानुसार मूर्ती आणि सजावट करायचो. माझा धाकटा भाऊ अभय उत्तम चित्रकार आहे. दरवर्षीच्या मूर्ती व सजावटीची कल्पना बहुधा तोच ठरवायचा. चर्चा करून ती कल्पना अधिक विकसित केली जायची. आम्ही आम्हाला मूर्ती कशी हवी ते गणपती करणाऱ्या विश्वनाथ परदेशी या आमच्या मित्राला सांगायचो व त्यानुसार विश्वनाथ मूर्ती तयार करायचा. एके वर्षी आम्ही सुपारीतील गणपती ही संकल्पना घेतली. अखंड सुपारी अडकित्त्याने उभी कापली की तयार होणाऱ्या दोन भागांवर एका ठरावीक प्रकारचे नैसर्गिक ‘पॅटर्न’ दिसतात. सुपारीवरील याच ‘पॅटर्न’मधून श्री गणेशाची मूर्ती साकार झाल्याची ती संकल्पना होती. त्यानुसार विश्वनाथने सुमारे तीन फूट उंचीच्या सुपारीच्या अर्ध्या भागाचा आकार पृष्ठभूमीला ठेवून आम्हाला हवी तरी अत्यंत सुंदर मूर्ती तयार करून दिली. सजावट मंदिराची केली होती व हे मंदिर तयार करण्यासाठीही सर्व प्रकारच्या सुपाऱ्यांचाच वापर आम्ही केला होता.

आमचा गणेशोत्सव ज्या गल्लीत होत असे त्याच गल्लीत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकविणारे एक अध्यापक राहयचे. रोज रात्री जेवण झाल्यावर ते व त्यांची पत्नी शतपावली करण्यासाठी बाहेर पडत. गणपतीच्या दिवसांत आमचे सजावटीचे काम सुरु असले की हे ‘सर’ आवर्जून तेथे थांबायचे. आम्ही करीत असलेल्या कामाचे ते कौतुक करायचे व सजावट अधिक आकर्षक व्हावी यासाठी सूचनाही करायचे. सुपारीचा गणपती केला त्या वर्षी सर्व सजावट पूर्ण झाल्यावर ‘सरां’नी ती पाहिली. सजावटीची संकल्पना व तिचे प्रत्यक्ष सादरीकरण त्यांना खूप पसंत पडले. समोरच्या बाजूने संपूर्ण सजावटीवर प्रखर दिव्याने ‘फोकस’ टाकल्यास सजावट अधिक उठावदार दिसेल, अशी त्यांनी सूचना केली. यासाठी नेहमीचा पिवळ्या प्रकाशाचा बल्ब न वापरता दुधी प्रकाशाचा खास ‘फोकस लाईट’ असतो तो वापरावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. आमचा गणपती बसायचा ती गल्ली जेमतेम १२ फूट रुंदीची होती. गणपतीच्या समोर एक तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या तळमजल्यावरील भोईरकाकांचे घर गणपती मंडपाच्या अगदी समोर होते. त्यामुळे गणपतीसाठी आम्ही विजेचे ‘कनेक्शन’ त्यांच्याच घरातून घेत असू. गल्लीची रुंदी अपुरी असल्याने भोईरकाकांच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने ‘फोकस लाईट’ बांधला तरच संपूर्ण सजावटीवर प्रखर ‘फोकस’ पडेल, असे आम्ही बऱ्याच चर्चेनंतर ठरविले. त्यानुसार खिडकीपर्यंत वायर आणून तयारी केली आणि ‘फोकस लाईट’चे काय करायचे यावर खल सुरु झाला.

आमच्या मंडळाच्या सदस्य कार्यकर्त्यांपैकी नविन चित्रे हे आणखी एक अतरंगी ‘कॅरेक्टर’. आम्हाला हवा तसा ‘फोकस लाईट’ जवळच असलेल्या कुंभारवाड्यातील कोल्हापूर गादी कारखान्याच्या बोर्डावर लावलेले आहेत, असे नविनने सांगितले. प्रथम आम्हांला त्याच्या बोलण्याचा संदर्भ लागला नाही. पण लगेचच त्याने ‘तो बोर्डावरचा फोकस लाईट आपण काढून आणू व आपल्या येथे बसवू’, असा खुलासा केला. असे करणे म्हणजे चक्क चोरी करणे आहे, याची चाड त्या वयात आमच्यापैकी कोणालाही नव्हती. नविनने ही कल्पना सुचविली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. लगेच नविनसह मंडळाच्या पाच-ससहा कार्यकर्त्यांनी कोल्हापूर गादी कारखान्याकडे मोर्चा वळविला.

नविन तब्येतीने अगदी ‘पाप्याचे पितर’ होता. दहीहंडीला लावतात तसे मानवी थर लावून नविनलाच वर चढविले गेले. रात्री आठ वाजल्यापासून लावलेल्या बोर्डावरील तो ‘फोकस लाईट’ खूप गरम झाला होता. नविनने अंगातील शर्ट काढला व तापलेल्या ‘फोकस लाईट’भोवती गुंडाळून तो काढला. लगेच सर्व फय्यर गणपती मंडळापाशी आली. परंतु चोरून आणलेला तो ‘फोकस लाईट’ भोईरकाकांच्या खिडकीत बसविताना लक्षात आले की त्या लाईटला नेहमीचा होल्डर चालत नाही. तसा ‘फोकस लाईट’ आटे फिरवून बसवावा लागतो व त्यासाठी खास चिनीमातीचा होल्डर असतो. कार्यकर्ते पुन्हा कोल्हापूर गादी कारखान्याकडे रवाना झाले. आधी जेथून ‘फोकस लाईट’ काढला होता तेथील बोर्डात ‘फिट’ केलेला होल्डर यावेळी, बोर्ड तोडून काढण्यात आला. जागेवर आणून तो होल्डर व त्यात तो ‘फोकस लाईट’ बसविल्यावर आमच्या गणपतीची सजावट एकदम लखलखून गेली!

याच वर्षीच्या गणपतीच्या वेळची आणखी एक मजेशीर घटना सांगायला हवी. कल्याणच्या सार्वजनिक गणेसोत्सव मंडळांमध्ये विसर्जनाच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याची पूर्वापार प्रथा आहे. त्या वर्षी आम्हीही तशी पूजा केली. पूजा संध्याकाळी झाली. परंतु त्याच्या आधी दुपारी मन्या प्रधानने आणखी एक शक्कल लढविली. भाजपा कार्यालयासमोरच्या भिंतीवर काळा रंग फासून तयार केलेला एक सूचना फलक होता. मन्याच्याच सुपिक डोक्यातून आलेल्या कल्पनेनुसार त्या सूचना फलकावर ‘सुपारीचा गणपती... आत्तापर्यंत ५३,२६८ भाविकांनी दर्शन घेतले. आपण मागे का? आत्ताच दर्शन घ्या’ असा मजकूर ठळक अक्षरांत लिहिला गेला. याचा परिणाम म्हणून संध्याकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. आम्हांला एवढ्या गर्दीची पूर्वकल्पना नव्हती. आम्ही प्रसादासाठी केलेला शिरा पुरणार नाही हे स्पष्ट झाले. रात्र झाली तरी गर्दी हटेना. शेवटी आमच्याच चौकात किराणा मालाचे दुकान असलेल्या हरिकिशन सोमाणी यांना मध्यरात्रीच्या सुमारास झोपेतून उठवून दुकान उघडायला लावले. पुन्हा पंचाईत नको म्हणून पाच किलो रवा, तेवढीच साखर व तूप त्यांच्याकडून घेतले. आमच्या आणि आणखी दोघांच्या आयांना झोपेतून उठवून त्यांना तातडीने शिरा करायला लावला. रात्री दोन-अडीचच्या सुमारास गर्दी ओसरली. प्रसादाचा बराच शिरा उरला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आयांना कामाला लावून त्याच्या सांज्याच्या पोळ्या करून खाल्ल्या.

त्यावर्षी आम्ही महापालिकेने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. आमच्या मंडळाला सजावटीचे पहिले व मूर्तीचे दुसरे पारितोषिक मिळाले. यावरून आमच्या मंडळातील मुले अतरंगी होती तशीच ‘गुणी’ही होती, हेच दिसते.

भाग १
भाग २

field_vote: 
0
No votes yet