गणेशोत्सव आणि मी

गणपती उत्सवाकडे पाहण्याची माझी दृष्टी लहानपणापासून कशी बदलली आहे ते आज अचानक माझ्या लक्षात आलं. माहेरी नायगांवकरांचा गणपती मोठ्या काकांकडे मनमाडला असायचा. दर वर्षी जाणं जमायचंच असं नाही, पण गेलो की गौरींसाठी तिथे असायचोच. तिथे सप्रे काॅलनीतल्या चाळीतलं दोनतीन खोल्यांचं घर, समोर मोठी गच्ची. गणपती अगदी छोटा असायचा, फूटभर उंचीचाही नसेल. त्याचं नवल वाटायचं, कारण मुंबईत इतकी लहान मूर्ती पाहायला नाही मिळायची. गौरी मात्र चांगल्या उंच. गौरींचं जेवण खासच असायचं, असतं. तेव्हा तशी लहान असल्याने कामात मदत वगैरे केल्याचं आठवत नाही. पण बहुधा सगळे काकाकाकू, भावंडं असायचो, धमाल असायची. चाळीतल्या गणपतीसमोरचे कार्यक्रमही मस्त असायचे. पंछी बनू उडती फिरू गाण्यावर एका मुलीने केलेला नाच अजून आठवतोय मला. मनमाड आणि गणपती यांना चिकटून असलेली एक मजेशीर आठवणही आहे, मी आणि दोनेक वर्षांनी मोठा चुलतभाऊ हरवल्याची. ती पुन्हा कधी.
मग मोठा भाऊ निगडीला राहायला गेला आणि कालांतराने काकाकाकूही, पाठोपाठा गणपतीही. एके वर्षी गौरींच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईकर मंडळी सकाळी खाऊन निघणार होतो. काकूने मोठ्ठी कढईभर काळ्या दाण्यांची उसळ केलेली आणि भाकरी. आम्हीच ती उसळ संपवली होती, घरच्यांसाठी दुसरं काही करावं लागलं होतं.
ज्या वर्षी मनमाडला जात नसू त्या वर्षी आमच्या शेजारच्याच इमारतीत राहणाऱ्या मावशीकडे गणपतीचा आनंद घेत असू. हरताळकांसाठी पत्री गोळा करणं, त्या पहाटेपर्यंत जागवणं, पहाटे दहीभात खाऊन उपास सोडणं, मग भरपूर मोदक करणं, यच्चयावत सगळ्या आरत्या तबलापेटीच्या साथीने म्हणणं. भोवत्या घालत, लयबद्ध चालत, टाळांच्या गजरात विसर्जनासाठी गणपतीबाप्पाला नेणं हा कळस. मावसोबांचं भजनीमंडळ होतं, त्यामुळे विसर्जन दणक्यात पण शिस्तीत असे. आज मावशीकडे गणपतीचं विसर्जन घरीच केलं, पण भोवत्या झाल्याच. मी नव्हते तिथे ते सोडा. मावशीकडे आमच्या पटवर्धन कुटुंबातले बहुतेक सगळे सदस्य येत, कारण सगळ्यांच्या घरी गणपती आणण्याची पद्धत नव्हती. काही वर्षांनी मुलांच्या हट्टासाठी म्हणा वा आणखी काही कारणांनी, अनेकांच्या घरी गणपती बसू लागले आणि मावशीकडची गर्दी कमी झाली.

mrinmayi-ganpati-photo

ही मूर्ती माझ्या १९ वर्षांच्या भाच्याने घरी केलेली, रंगवलेली. या सणाबद्दल ममत्व वाटण्याचं हे एक मोठं कारण.

लग्नानंतर मी घाटकोपरला राहायला गेले. नव्वदच्या दशकात त्या भागात प्रामुख्याने मराठी, तामिळ, मल्याळी अशी वस्ती होती, गुजराती कमीच. आमच्या सोसायटीचा गणपती दहा दिवसांचा असे, फार शिस्तीचा. शेजारी राहणारी रत्नाआत्या आणि पप्पा नाडकर्णी, आणि काही तामिळ/मल्याळी मामामामी यांच्या देखरेखीखाली उत्सव पार पडे. इमारतीतल्या सगळ्यांना आरतीचे दिवस वाटून दिलेले असत. त्यांच्यावर सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीची आणि प्रसादाची जबाबदारी असे. सकाळी आठ आणि रात्री आठला एक उत्तर भारतीय भटजी येऊन पूजा सांगे. माझ्या कानांना त्याचे उच्चार जाम खटकत पण पर्याय नव्हता. बायकांना हळदीकुंकू, विड्याचं पान, त्यावर हळकुंड, सुपारी, केळं आणि गजरा असा जामानिमा घरून तयार करून नेत असू आम्ही. सकाळी साधा प्रसाद, थोडीच माणसं असत. रात्री मात्र भरपूर. गुप्ता आंटी मेदूवडे करायची, पोटभर खायला मिळतील सगळ्यांना इतके. दाक्षिणात्य घरांकडे प्रसाद असला की सुंडल असे चविष्ट. एखादेच गुजराती शेजारी होते, ते ढोकळा आणत. विसर्जनाच्या दिवशी तर ज्यांनी प्रसाद आधी केलाय ते, आणि ज्यांना दिवस मिळाला नाही असे सगळे काही ना काही करत. जेवणच होई जणू. पवईला विसर्जनाला जात असू टेम्पोतून. अनेक वर्षं एक मुस्लिम चालक यायचा टेम्पो घेऊन. हल्लीच तिथल्या शेजाऱ्याशी बोलताना कळलं की आता गणपती बसवणं बंद केलं आहे कारण करायला माणसं नाहीत. ठीकच आहे म्हणा. मला त्या सोसायटीत रुळायला गणपतीने मोठी मदत केली होती हे नक्की.
या शतकाच्या सुरुवातीला आम्ही मुलुंडला राहायला आलो. बहुतेक मराठी शेजारी, दोन गुजराती कुटुंबं आहेत पण ती उत्तम मराठी बोलणारी. यंदा या गणपतीचं पंचविसावं वर्ष, बाहेरगावी, परदेशी असलेली मुलंसुद्धा आवर्जून आली आहेत. छोट्या गराजमध्ये सुरू झालेला गणपती लवकरच मांडवात बसू लागला. अनेक वर्षं आमचे शेजारी विजय लाड कोणकोण मुलं नाटकात काम करणार याचा अंदाज घेऊन त्यांच्यासाठी नाटक लिहीत. ते बसवायला परळहून एक मुलगा येई. इंग्रजी माध्यमात शिकलेली आमची पोरं घडाघडा संवाद म्हणत तेव्हा आम्हीच अचंबित होत असू. हळूहळू मुलं मोठी झाली, अभ्यासात गुंतून गेली, अनेक लोक दुसरीकडे राहायला गेले आणि नाटक बंद झालं. कार्यक्रमही कमी होत गेले. पाचच दिवस असणारा गणपती काहीसा केविलवाणा झालाय आता, पण पुढची पिढी तयार हाेतेय, तो पुन्हा नव्या जोमाने साजरा होऊ लागेल लवकरच याची खात्री आहे.
मुलुंडला आल्यानंतर एक आनंद देणारा कार्यक्रम असे तो म्हणजे मैत्रिणींबरोबर स्कूटरवरनं गणपती पाहायला जाणं. रात्री नऊला निघायचं, तीनचार स्कूटर असत. मुलुंड पूर्वेकडचे किमान १५ सार्वजनिक गणपती आम्ही पाहत असू. सगळीकडे उत्तम देखावे, सुंदर सुबक देखण्या मूर्ती पाहायला मिळत. त्या कलाकारांचं कौतुक करायलाच आम्ही जात असू. येताना आईसक्रीम खाणं मस्ट असे. गेली दोन वर्षं अर्थात हे केलेलं नाही, यंदा जाऊ मात्र.
काही वर्षांपूर्वी घराच्या अगदी जवळ पालिकेने विसर्जनाचा कृत्रिम तलाव बांधला आणि माझ्यासाठी हा सण कुरूप होऊन गेला. गणपतीच्या दुसऱ्या, पाचव्या, सातव्या, दहाव्या दिवशी रात्री बारापर्यंत डीजे/कीबोर्ड/ढोलताशे यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे नको होऊ लागलं. काचा बंद करून बसलं तरी कानठळ्या थांबत नाहीत. मग दोनतीन वर्षं एैन गणपतीत मी आणि लेक कुठेतरी बाहेर जाऊ लागलो. तरी दहा दिवस जाणं तर शक्य होत नाही. मग २०२०मध्ये सगळीकडे स्मशानशांतता, तीही जीवघेणी वाटू लागली होती अनेक कारणांनी. गेल्या वर्षीही सोसायटीचा गणपती बसवला नव्हताच. घरगुती होते, पण त्या मानाने येजा कमी होती. या सणामुळे रागराग होण्याचं आणखी कारण म्हणजे प्रवास. सहसा गणपतीपर्यंत मुंबईत तुफान पाऊस झालेला असतो, रस्त्यांची चाळण झालेली असते. आणि अनेक मुंबईकर गणपती दर्शनासाठी बाहेर पडलेले असतात. २०१९मध्ये बोरिवलीहून मुलुंडला परतताना चेकनाक्यापाशी एक तास रिक्षा थांबली होती तेव्हा मनात काय काय आलं ते लिहिता येणार नाही. कालही मी बोरिवलीला गेले, तीन घरं केली, पण ट्रेनने गेले. थोडं दमायला झालं पण प्रवासाने टाळकं सटकलं नाही.
इंडियन एक्स्प्रेसमध्ये असतानाची एक आठवण. आॅफिस लालबागला, लालबागच्या राजाच्या शेजारच्या गल्लीत. मुंबईत राहून सिद्धिविनायकाला जेमतेम एकदा गेलेली मी, एरवी लालबागच्या राजाच्या दर्शनाला रांगेत उभं वगैरे राहणं कल्पनेपलिकडचंच. पण नक्की काय आहे हा प्रकार हे जाणून घेण्याची उत्सुकता तर होती. एक्स्प्रेसमधल्या नोकरीने ती संधी दिली. आयकार्ड दाखवून मागच्या बाजूने प्रवेश मिळाला. आणि मी शब्दश: जनसागरात लोटली गेले. मला मूर्तीसमोर उभं राहून हातही जोडता आले नाहीत कारण एका म्हातारीने उजवा हात आधाराला धरला होता, दोन्ही हात एकत्र येणं अशक्य होतं. असो.
मुंबईतला सार्वजनिक गणेशोत्सव धार्मिक कधीच नव्हता, आता तर त्यात यत्किंचित धर्म उरलेला नाही. आता आहे राजकारण. लोकांची एकत्र येण्याची गरज. भान विसरून कशाचाही भीड न बाळगता मुक्तपणे नाचण्याची संधी मिळण्याची भूक. आणि भारतीयांची समारंभप्रियता आहेच. लोकांकडे वेळ आहे, पैसा आहे हेही. अजूनही अनेक ठिकाणी मनोरंजनाचे चांगले कार्यक्रम होतात, नाटकं बसवली जातात, गाण्याच्या मैफली होतात. पण ते एरवीही होतच असत, त्याला गणपतीचाच रंगमंच हवा अशी निकड आता नाही. अनेक मराठी कलाकार गणेशोत्सवातून लोकांसमोर आले आहेत हे मला ठाऊक आहे.
हे सगळं फार विस्कळित आहे. गणपती या सगळ्याच्या पलीकडे खूप काही आहे, मला सगळं मांडता आलेलं नाही अर्थात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गणपती हा प्रकार मला लहानपणी आवडायचा. मिरवायला वगैरेही आवडायचं. मोठ्या काकांकडे, ठाण्यातच गणपती असायचा. आम्ही गणेशचतुर्थी आणि गौरी जेवतात तेव्हा जेवायला तिकडेच असायचो.

आई नोकरी करायची. तिला गणपतीच्या दिवशीही काकांकडे पोहोचायला 'उशीर' व्हायचा. मी तिचं शेपूट असल्यामुळे मलाही. आणि मिरवायला मिळायचं नाही म्हणून माझा थोडा विरस होत असे. आईचे मोदक छान व्हायचे; बाकी दोन काकू इतर स्वयंपाक करायच्या आणि आई मोदक वळायची, एवढंच मला आठवतं. आई आणि बाबा दोन्हींकडच्या नातेवाईकांत मी शेंडेफळ होते; प्रसादापुरतं ठेवलेलं पंचामृत (दूध, दही, मध, तूप, साखर) मला चाटायला मिळायचं. काकांकडे गौरीच्या दिवशी संध्याकाळी मोठी गर्दी असायची.

एका वर्षी चुलतभावाच्या मित्राची आई भेटली. त्या काकू खूप गोऱ्या असल्याचं आठवतं, भारतात अशा वर्णाचे आणखी दोनच लोक मी बघितलेत. त्या काकूंना मी हळदीकुंकू लावायला गेले तेव्हा मोठ्या काकूनं मला अडवलं होतं. (त्यानंतर अनेक वर्षांनी, माझे आई-वडील दोघंही गेल्यानंतर, ओळखीच्या एक बाई घरी आल्या होत्या. त्या निघताना मी त्यांनी हळदीकुंकू लावलं नाही म्हणून त्या म्हणे रुसल्या होत्या.)

एका वर्षी काकू आजारी पडल्यामुळे हे गणपती-गौरी आमच्या घरी आले. त्या वर्षी गौरीच्या संध्याकाळी आमच्या घरी खूपच कमी गर्दी होती. आणि आमचं घर काकांपेक्षा उलुसं मोठंच असावं, असं माझ्या लक्षात आलं. आईला विचारलं तर ती म्हणाली, "मला तेवढा वेळ नाही करायला. काकूला करायचं तर काकूला करू देत पुन्हा पुढच्या वर्षी!"

काकांकडे जेवायला नेहमीचे भटजीही असायचे. सावळा, मध्यमवयीन, पोट सुटलेला, डोक्यावरचे अर्ध्याधिक केस गेलेला मनुष्य. त्यांनी किमान काही वेळा आठवण काढली होती. आजीच्या काळात केळीच्या पानावर जेवायला असायचं. गौरीच्या दिवशी जेवताना पानातलं मीठ घेताना म्हणे वाकायला लागायचं. आजी विदर्भातली, गौरीच्या दिवशी १६ भाज्या आणि १७ कोशिंबिरी (आकडे थोडे इकडेतिकडे झाले असतील) असायच्या. त्यांचं ढेरपोट मध्ये येऊन त्यांचं जेवण अळणी होत असेल, ह्या विचारानं मी मनात हसले होते. मग ते घरी येऊन आई-बाबांसमोर बोलले; तर ते तिथे न बोलण्याबद्दल आईला हायसं वाटल्याचं आता आठवतं. तेव्हा तिचा चेहरा का बदलला हे तेव्हा समजलं नव्हतं.

आई गेली, मला सणावारांचा थोडा कंटाळा यायला लागला. मग बाबाही गेले आणि ठरावीक नातेवाईकांना न भेटण्याची इच्छा बळावत गेली. आजूबाजूच्या काही लोकांना हे समजत होतंच; शेजारी किंवा बाबांच्या एका मित्राकडे मोदक खायला जाणं सुरू झालं. अशाच एका वर्षी एका काकूंच्या हाताखाली मोदक वळले. ठीक होते दिसायला. मोदक लाडूसारखे वळले म्हणून त्यांची चव कशी बदलेल, असा प्रयोग मला करायचा होता. पण लोकाच्या घरी जाऊन असे प्रयोग करण्यापेक्षा मला मोदक खाण्यात जास्त रस होता.

एका वर्षी मोठे काका-काकू भावाला म्हणाले की आता त्यांना होत नाही आणि पुढच्या पिढीतला म्हणून त्यानं गणपती-गौरीची जबाबदारी घ्यावी. तो तर माझ्यापेक्षा जास्त कडवा नास्तिक!

भावाचा एक मित्र बरेचदा घरी यायचा. त्याची आई छान मोदक करायची. त्या काकू संकष्टी चतुर्थीला मोदक विकायच्या. कधी दोन-चार आमच्याकडे यायचे. एरवी ब्राह्मण-ब्राह्मण करणारे लोक त्या काकूंच्या हातचे मोदक हौशीनं खायचे. माझा कडवट जातीयतावाद कमी व्हायला हा मित्र आणि त्या काकूंचा हातभार होताच.

पुण्यात काही वर्षं राहिले तेव्हा चतुर्थीकडे माझा डोळा असायचा. एक बंगाली मित्र आणि मी औंधातल्या एका जोश्यांच्या दुकानात जाऊन मोदक आणून खायचो. भांडवलशाहीच काय ती खरी! शिवाय ही तर हिंदू धर्म पाळणारी भांडवलशाही!!

आता मात्र माझं रटाळ-नास्तिक असणं मी स्वीकारलं आहे. गेल्याच आठवड्यात ऑस्टिनातल्या भारतीय वाण्यानं 'सोहम'चे आंबा मोदक आले आहेत, असं सांगितलं. मी कुतूहलापोटी ते विकत आणले; आणि 'किती साखर घालतात हे लोक!' म्हणत बसले. गोड खायचं आणि ते आवडायचं तर स्वतःच करायला पाहिजे! पैसे खर्च करून आरोग्याचा नास करायचा तर किमान चव तरी आवडली पाहिजे!

काल गणेशचतुर्थीला, जरा जास्त शिजलेली आणि चिंच किंचित जास्त झालेली भेंडीची भाजी चमच्यानं खात मी 'द अनियन' वाचत होते. भाजी जरा जास्त शिजली कारण भाजी गॅसवर ठेवून मी एकीकडे कोड वाचत होते. ह्या वर्षी टेक्सासात उन्हाळा खूपच लवकर सुरू झाला आणि खूप कोरडा होता; त्यामुळे चांगली भेंडी खूपच उशिरा मिळायला लागली. सुरुवातीला दोनदा भाजी बिघडली की मग जरा सवय होते. आता पाऊस पडलाय, पुढच्या आठवड्यापासून भेंडी बरी होईल.

जेवताना फेसबुक उघडलं तर मोदक आणि गणपतीचा ओव्हरडोस होईल म्हणून तिथे स्क्रोल करण्याच्या फंदात पडले नाही. फेसबुकला कितीही शिकवलं तरीही गणपती, दिवाळी वगैरे गोष्टी टाळता येत नाहीत. मग 'द अनियन'च उघडलं; चातुर्मास मोडणार नाही त्या कांद्यामुळे. आपण बरं आणि आपला रटाळपणा बरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.