कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं निधन : प्रसाद हावळे यांचा लेख

खरा कॉम्रेड!

महाराष्ट्रात, किंबहुना भारतात ‘न्यू लेफ्ट’चा विचार रुजवणाऱ्या, प्रत्यक्षात आणणाऱ्या पिढीच्या शिलेदारांचं एकामागून एक निरोप घेणं खंतावणारं आहे. गेल्या वर्षभरात- आधी सुधीर बेडेकर गेले, मग नंदा खरे, आणि आता कॉम्रेड कुमार शिराळकर. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘मागोवा’सारख्या गटातून कार्यरत झालेले आणि नंतर वेगवेगळ्या दिशांनी, पण एकाच ध्येयाने भरीव योगदान दिलेले हे तिघे. सुधीर बेडेकर यांनी ‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’चे अंक घडवण्याबरोबरच जवळपास तीन पिढ्यांमधल्या तरुणांनाही ‘थिअरी’ समजावून घेण्याची प्रेरणा दिली. नंदा खरे यांचे लेखन आणखी बरीच दशके आपल्याला दिशा देत राहील. कॉम्रेड कुमार शिराळकर या दोघांपेक्षा थोडे निराळे. त्यांनी प्रत्यक्ष क्रांतिकारणाची वाट धरली. जीवनदायी कार्यकर्ते बनले. मेकॅनिकल इंजिनीअर होऊन आयआयटीत एम.टेक्.साठी प्रवेश घेतलेल्या कुमार शिराळकरांनी ठरवलं असतं तर पुढे सुखासीन आयुष्य जगू शकले असते. पण शहाद्याला आदिवासी समाजाच्या न्यायहक्कांच्या लढाईत त्यांनी सर्वस्व झोकून दिलं. हालअपेष्टा भोगल्या. आणि हे असं सलग पन्नास वर्षं! कितीही रोमँटिसिझम विचारात आणला, तरी हे सोप्पं नव्हतं आणि नाही.

kumar-shiralkar2

परंतु आय.आय.टी.त शिकत असतानाच त्यांनी ग्रामीण भागात काम करण्याचं ठरवलं होतं. माटुंगा लेबर कॅम्पात जाऊन गिरणी कामगारांच्या मुलांना शिकवण्याचं काम ते त्याच काळात करत होते. तिथंच बाबुराव बागुलांशी त्यांची ओळख झाली. मात्र एकीकडे हे सुरू असताना, घरी बहिणींची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे बहिणींची लग्न होईपर्यंत त्यांनी ठाण्यातल्या एका कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मात्र राजीनामा देऊन ते थेट बाबा आमटेंकडे सोमनाथला जाऊन धडकले.

‘वेगळ्या’ वाटेनं जाण्याचा असा निर्णय घेण्याआधी कुमार शिराळकरांनी त्यांचे आजोबा नारायण हरी आपटे यांच्याकडे मन मोकळं केलं.
नारायण हरी आपटे हे गेल्या शतकाच्या पूर्वार्धातले प्रसिद्ध कादंबरीकार. त्यांनी सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या होत्या. जरठकुमारी विवाहाच्या प्रश्नावर लिहिलेल्या ‘न पटलेली गोष्ट’ या त्यांच्या कादंबरीवरून व्ही. शांताराम यांनी ‘कुंकू’ हा सिनेमा केला होता. तो बराच गाजला (‘मन सुद्ध तुझं...’ हे गाणं यातलंच, आणि सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याची युगत ‘कुंकू’पासूनच सुरू झाली होती!). त्यांच्या आणखीही काही कादंबऱ्यांवर सिनेमे निघाले. पण कादंबरीकार एवढीच त्यांची ओळख नव्हती. सांगलीत त्यांनी ‘आपटे आणि मंडळी’ ही प्रकाशनसंस्था सुरू केली होती. श्रीनिवास मुद्रणालय नावाचा छापखानाही ते चालवत. स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकार्याशी त्यांचा संबंध आला होता. त्यांनी राजस्थान आणि पंजाबमध्ये बराच काळ भ्रमंती केली. क्रांतिकारक भगतसिंगबरोबर त्यांची भेट झाली होती. राजस्थानमध्ये क्रांतिकारक अर्जुनलाल सेठी यांनी सुरू केलेल्या शाळेत त्यांनी पाच वर्षं शिकवलं होतं. जयपूरच्या वास्तव्यात क्रांतिकारक रासबिहारी बोस त्यांच्याशी सशस्त्र लढ्याबाबत विचारविनिमय करत असत.

कुमार शिराळकरांनी एका लेखात आपल्या या आजोबांबद्दल आपुलकीनं लिहिलं आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसणारी मुक्ततेची जाणीव शिराळकरांना महत्त्वाची वाटे. तर... रूढ नोकरी वगैरे न करता सामाजिक कार्यात जाण्याची, वेगळ्या पद्धतीनं जीवन जगण्याची इच्छा कुमार शिराळकरांनी त्यांना बोलून दाखवली. त्यावर होकार देत ते म्हणाले, “क्रांती भावनांनी नव्हे, तर दृढ जाणिवांनी आणि चिवट अखंड परिश्रमांनी घडते. यशापयशाची खंत गोंजारायची नसते. तू अवश्य तुला जगायचे तसे जग. कार्य कर. व्यक्तिगत लाभहानीचा विचार करू नकोस. समाजासाठी, देशासाठी सर्वस्व वेचण्याची उमेद हरवू नकोस.”
आजोबांचे हे शब्द कुमार शिराळकरांसाठी आश्वासक ठरले. म्हणूनच पुढे शहाद्यातच राहून आपल्या सहकाऱ्यांसह संघटना बांधण्याचा निर्णय ते निर्धारानं घेऊ शकले. त्यावेळी मुंबईच्या आय.आय.टी.तून आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमधूनही बरेच तरुण शहाद्याला येऊन कुमार शिराळकरांबरोबर काम करत होते. ‘सातपुडा साद घालतो आहे...’ या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानं तेव्हा अनेकांना शहाद्यात आणलं होतं.
असं काय घडत होतं तिथं?

kumar-shiralkar1

धुळे जिल्ह्यातल्या शहादा परिसरात आदिवासी आणि भूमीहिनांच्या प्रश्नांनी तेव्हा भयाण रूप घेतलं होतं. एकीकडे पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्ट करूनही हाता-तोंडाची गाठ पडूच देणार नाही अशी सालदारी-रोजंदारी पद्धत आणि दुसरीकडे जमिनदारांकडून जमेल त्या मार्गानं शोषण. त्याआधीच्या वीसेक वर्षांत सावकारांनी आदिवासींची हजारो एकर जमिन हडपली होती. पीक संरक्षण सोसायट्यांच्या नावाखाली सावकार-मालदारांनी नेमलेल्या परप्रांतीय गुंडांकडून आदिवासी सालदारांवर अत्याचार होत होते. पोलीस आणि वनविभागाकडूनही जाच वाढला होता. त्यात 1972-73 च्या दुष्काळानं शेतीतील कामं बंद पडल्यानं आदिवासी-रोजंदारांपुढे गंभीर संकट उभं राहिलं होतं.

अशा कचाट्यात अडकलेल्या आदिवासी आणि भूमीहिनांवरील अन्यायाला अंबरसिंग सुरतवंती या सर्वोदय मंडळात कार्यरत असलेल्या, सुशिक्षित भिल्ल तरुणानं वाचा फोडली. या अंबरसिंगांनी ‘आदिवासी भिल्ल सेवा मंडळ’ स्थापून आदिवासींना संघटित करण्यास सुरुवात केली. भूमुक्ती मेळावा भरवण्याचं ठरवलं. त्यास महाराष्ट्रभरातून डाव्या पक्ष-संघटनांनी प्रतिसाद दिला. सोमनाथच्या श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठात असणारे दिनानाथ मनोहर, विजय कान्हेरे वगैरेंसह कुमार शिराळकर या मेळाव्याच्या नियोजनासाठी महिनाभर आधीच येऊन पोहोचले. अंबरसिंगांबरोबर त्यांनी कामास सुरुवात केली. आदिवासींचं भीषण दारिद्र्य, शोषण पाहून शहाद्यातून परत न जाण्याचा त्यांचा निर्धार पक्का होत गेला. ही शहादा चळवळ मग चांगलीच धारदार झाली. आदिवासींचे, रोजंदारांचे संघटित संप, आंदोलनं, मोर्चे झाले. हस्तांतरित जमिनी परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यातून आदिवासी-रोजंदारांना जमीनदारांविरोधात एकवटण्याची हिंमत मिळाली. तसतसं या जमीनदारांचा धीर सुटू लागला. त्यांच्याकडून कार्यकर्त्यांवर हल्ले होऊ लागले. अशाच एका हल्ल्यात कुमार शिराळकर जबर जखमी झाले होते. मुंबईत असताना ज्युदो शिकलेले शिराळकर कणखर होते, पण त्या हल्ल्यात त्यांच्या कानाला मार लागून तो कायमचा बाद झाला.

मात्र आदिवासी-रोजंदारांमधील जागृतीमुळे त्यांना बऱ्याच बाबतींत न्याय मिळू लागला. सालदारी संपुष्टात आणली गेली. मजुरीवाढ मिळत गेली. जमीनदारांच्या आणि पोलिसांच्या उद्दामपणाला चाप बसला. परंतु एवढ्यापुरतं शहादा चळवळीचं यश मर्यादित नव्हतं. शहादा चळवळ ही भारतातील परिवर्तनवादी चळवळींसाठीचं एक प्रारूप ठरली. आदिवासींचं आर्थिक शोषण रोखण्याबरोबरच त्यांच्या आणि इतर जाती-धर्मांतील श्रमिकांच्या सामाजिक-सांस्कृतिक हक्करक्षणाकडेही या चळवळीनं लक्ष दिलं. याला कारण कुमार शिराळकरांसारखे या चळवळीतले संवेदनशील तरुण कार्यकर्ते. त्यांच्यामुळे शहादा चळवळीनं दलितांचे, भटक्या-विमुक्तांचे प्रश्न हाती घेतले. धुळ्यात समता संमेलन भरवलं. महिलांचा सहभाग वाढवला. त्यांच्यावरील जुलूम-अत्याचारांविरुद्ध संघर्ष केला. दारूबंदी आंदोलन केलं. मुस्लीम-ख्रिश्चनांवर हल्ले करणाऱ्या धर्मांध शक्तींविरोधात आवाज उठवला. लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठीदेखील ब्राझीलियन शिक्षणतज्ज्ञ पॉवलो फ्रेइरी यांच्या ‘कॉन्शन्टायझेशन’च्या सिद्धांतावर आधारित शैक्षणिक उपक्रम राबवले. कलापथकं तयार केली. आरोग्य शिबिरं आयोजित केली. लोकविज्ञान संघटनेच्या साहाय्यानं विज्ञान जत्राही भरवली. हे सारे करताना कुमार शिराळकर आणि कार्यकर्ते श्रमिकांच्या झोपड्यांतच राहू लागले. त्यांच्यातच मिसळून गेले.

पुढील काळात शहाद्यातून विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत गेलं. शहादा चळवळ काहीशी थंडावली. पण श्रमिकांच्या प्रश्नांवर चळवळ संघटित करतानाच दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला, अल्पसंख्याक समाज यांचेही प्रश्न हाती घेणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय चळवळीला समग्रता येत नाही, हे शहादा चळवळीनं महाराष्ट्राला आणि देशाला शिकवलं. नंतरच्या दशकांत एनजीओंच्या माध्यमांतून फोफावलेली ‘स्पेशलायझेशन’ची कप्पेबंद कार्यपद्धती पाहता, शहादा चळवळीचं योगदान किती महत्त्वाचं होतं हे ध्यानात येतं.
कुमार शिराळकरांच्या बोलण्यात आणि लिहिण्यात हे समग्रतेचं भान कायम डोकावत असे. म्हणूनच त्याच काळात नक्षलवादी चळवळ ऐन भरात असतानाही ते तिच्यात सामील झाले नाहीत. नाही म्हणायला ते सुरुवातीला या चळवळीकडे आकृष्ट झालेही होते, पण ते आकर्षण ‘रोमँटिक’ होतं, असं खुद्द शिराळकरांनीच म्हटलं आहे. नक्षलवादी नेत्यांशी त्यांची चर्चाही होत होती त्या काळात. त्यांची गुप्त पॅम्फ्लेट्स शिराळकरांपर्यंत पोहोचत, ते ती वाचतही. माओच्या तत्त्वज्ञानानंही त्यांना काही काळ भूरळ घातली होती. माओच्या लेखनाचे सगळे व्हॉल्युम्स त्यांनी वाचले होते. त्याबाबत सहकाऱ्यांशी चर्चाही केली होती. कवी तुळशी परब यांना माओचा पाचवा व्हॉल्युम मिळत नव्हता. तो त्यांना हवा होता, तर शिराळकर पोलिसांना चकवा देत सरहद्द ओलांडून नेपाळमधून तो घेऊन आले होते. दिनानाथ मनोहर आणि त्यांना चंद्रपूर-गडचिरोलीतल्या प्रवासात पोलिसांनी नक्षलवादी असल्याच्या संशयावरून पकडलं होतं. त्यात त्यांच्याकडे बाबा आमटेंच्या भाषणाची जी टेप होती, त्यातही बाबांनी माओचा उल्लेख केला होता. त्यामुळे पोलिसांचा गैरसमज आणखी बळावला. पण नंतर गैरसमज दूर झाल्यावर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. मुक्ततेची आस असलेला शिराळकरांसारखा चैतन्यशील कार्यकर्ता नक्षलवादी होणं शक्यच नव्हतं. त्यांनी नक्षलवादासंदर्भात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे : “हिंसात्मक कारवायांचे भय दाखवून आणि प्रत्यक्ष हिंसा करून, दहशतवाद पसरविणाऱ्यांविषयी सहानुभूती दाखवणे मला अजिबात मान्य नाही. असे करणाऱ्यांना ते फार मोठे त्यागी जीवन जगून समाजाची सेवा करताहेत म्हणणे किंवा क्रांतीसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे अशा वल्गना करणे म्हणजे समाजसेवा आणि क्रांती यांची चेष्टा करणे होय... गरीब दुबळ्या लोकांविषयी दयाबुद्धीतून वाटणारा कळवळा नक्षलवादी दहशतवादाला गोंजारण्यातून अभिव्यक्त करण्यासारखी हिणकस गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही, या निष्कर्षाला मी केव्हाच आलो आहे.”

नंतरच्या काळात, म्हणजे आणीबाणीपश्चात शहादा चळवळ थंडावल्यानंतर शिराळकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेले. माकपमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. माकपच्या राज्य आणि केंद्रीय समितीत त्यांनी बरीच वर्षं काम केलं. शेतमजुरांच्या चळवळीत सक्रीय राहिले. जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता म्हणून लोकव्यवहाराची, लोकवर्तनाची नेमकी, दुर्मीळ अशी जाण त्यांच्याकडे होती. विशेषत: ग्रामीण भागाची, गावगाड्यातील संक्रमणाची, त्यामागील कारणांची. म्हणूनच ते अनुभवांवर आधारित, विचारशील, आणि मुख्य म्हणजे समोरच्याच्या मनाचा तळ ढवळेल असं बोलत आणि लिहीत. सांगलीकडची थोडीफार झाक असलेल्या मराठीत ते सहजसोपं, एखाद्या मुरलेल्या शिक्षकासारखं, पण प्रांजळपणे बोलत. त्यांची अगदी अलीकडच्या काळातील काही मोजकी भाषणं, व्याख्यानं यूट्युबवर आहेत, ती जरूर ऐकावीत. तीच बाब त्यांच्या लेखनाबाबतही. ‘उठ वेड्या, तोड बेड्या’ ही त्यांची पुस्तिका ऐंशी-नव्वदच्या दशकांत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. पण त्यानंतरही त्यांनी निमित्तानिमित्तानं बरंच लिहिलं.
त्यांचा ‘माझी धर्मयात्रा’ या शीर्षकाचा एक लेख आहे. त्यात वैयक्तिक अनुभव सांगत ते वाचकाला मूलगामी तत्त्वचिंतनाकडे घेऊन जातात. त्यातलं त्यांचं हे म्हणणं पाहा : “नीतिविषयक संकल्पना धर्माच्या कचाट्यातून मुक्त केली पाहिजे. बुद्धाने ती भारतात जशी केली तशी. ती समजावून घेण्याने धर्मविषयक जाणिवांच्या आकलनाला एक आगळी कलाटणी मिळू शकते.” पण प्राप्त परिस्थितीत धार्मिकता आणि धर्मांधता यांच्यातला फरकही ते दाखवून देत होते आणि धार्मिकतेऐवजी धर्मांधतेला विरोध करण्याचे आवाहनही करत होते. म्हणूनच 2002 सालच्या विचारवेध संमेलनातील वसंत पळशीकर यांच्या अध्यक्षीय भाषणातील ‘नवा राष्ट्रवाद आणि धर्माचे अधिष्ठान’ या संदर्भातील विवेचनाचा त्यांनी समाचार घेतला होता. त्याच काळात ‘शिवधर्म’ या नवस्थापित धर्माबाबत भलेभले भुलत असताना शिराळकरांनी मात्र यातला फोलपणा दाखवून दिला होता (वसंत पळशीकरांनीही शिवधर्माबाबत अन्यत्र एक लेख लिहून विरोधच केला होता, हेही लक्षात ठेवू या).

धर्माबरोबरच जातिसंस्थेबद्दलही आणि त्या अनुषंगानं राजकीय प्रक्रियेबद्दलही दिशादर्शक ठरावं असं लेखन शिराळकरांनी केलं आहे. ‘जातिसंस्थेचे बदलते स्वरूप’, ‘दलित-श्रमिक राजकारणाची दिशा’, ‘भांडवली विकास आणि आदिवासींचे परिघीकरण’ आणि ‘श्रमिकांच्या चळवळी : काल, आज, उद्या’ या त्यांच्या चार दीर्घ लेखांचं एकत्रित वाचन व्हायला हवं, इतके ते महत्त्वाचे आहेत. हे लेख त्यांच्या ‘नवे जग, नवी तगमग’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. यापलीकडेही महाराष्ट्रातला साखर उद्योग, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, वनहक्क कायदा, रोजगार हमी कायदा, दुष्काळ अशा बऱ्याच विषयांसंदर्भात त्यांनी लिहिलं होतं. ते लेखनही पुस्तकरूपात यायला हवं. ‘नवे जग, नवी तगमग’ या पुस्तकात त्यांचं मोजकं व्यक्तिगत आठवणीपर लेखन वाचून या माणसानं आत्मचरित्र लिहायला पाहिजे होतं, असं वाटून गेलं. तसं झालं असतं तर साठोत्तरी महाराष्ट्रातला एक मोठा पट त्यातून उलगडला असता, हे नक्की.

मात्र अशी व्यक्तिगतता शिराळकरांनी कायमच टाळली. सभेतली भाषणं किंवा व्याख्यानं हा अटळ भाग झाला, परंतु त्यांचा भर प्रत्यक्ष जमिनीवरच्या कामावर अधिक राहिला. अगदी शेवट-शेवटपर्यंत ते महाराष्ट्रभर वंचित-शोषितांच्या लढ्यांमध्ये सक्रीय होते. आपल्याकडे एरवी डाव्यांमध्ये कार्यकर्ते कमी, ‘तत्त्वज्ञ’च जास्त. असा तत्त्वज्ञ बनण्याचा मोह कुमार शिराळकर नावाच्या, बोलक्या डोळ्यांच्या ध्येयवादी तरुणानं टाळला. आणि शेवटपर्यंत तो कॉम्रेड बनूनच राहिला... तोही खराखुरा कॉम्रेड!

-प्रसाद हावळे

प्रकाशचित्रे : संदेश भंडारे

बातमीचा प्रकार निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

(हे कॉम्रेड कुमार शिराळकर नक्की कोण, हा प्रश्न तूर्तास विचारीत नाही, परंतु,) हे प्रसाद हावळे कोण बुवा आता?

(तसेही, हे कॉम्रेड कुमार शिराळकर नक्की कोण, याबाबत (त्रोटक, वरवरची का होईना, परंतु) माहिती (तेवढीच खाज असल्यास) प्रस्तुत लेख वाचून कदाचित होईलही. (कोणी सांगावे?) मात्र, हे प्रसाद हावळे कोण, हे कसे समजावे? (समजण्याची गरज काय (नि कोणाला), हा भाग अलाहिदा.))

असो. चालू द्या. (आणि, हो... जनरीतीस अनुसरून, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. (ईश्वर, आत्मा, आणि शांती, या तीनही संकल्पना कॉम्रेड म्हणविणाऱ्यांकरिता कितीही गर्हणीय असल्या, तरीही. निव्वळ एक उपचार म्हणून.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

प्रसाद हावळेंचे लोकसत्तेतील 'मराठी वळण' हे एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील मराठी लिखाणाबद्दलचे सदर वाचल्याचे स्मरते.
हा लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कुमार शिराळकर हे नाव आधी कधी तरी ऐकल्यासारखं वाटतंय - एवढंच महिती होतं.
ह्या लेखाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा केली.
४०-५० वर्षं पूर्णवेळ आदिवासी भागात राहून त्यांनी केलेलं कार्य खरंच थोर आहे.

माझं मित्रमंडळ, कोंडाळं आणि दूरदूरच्या जुजबी ओळखी - हे वर्तुळ कितीही विस्तारलं तरीसुद्धा ते शिराळकरांच्या विश्वाला भिडणं अशक्य आहे.
पण ज्यांचं वर्तुळ शिराळकरांच्या जगाशी जोडलं गेलं त्यांनी शिराळकरांबद्दल भरपूर लिहिलं आहे.

त्यातच कुठेतरी वाचल्याचं स्मरतं - "डावे बहुतेक सगळे विचारवंत असतात. कुमारसारखे प्रत्यक्ष काम करत रहाणारे फार थोडे".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0