शांतारामबापूंची काल्पनिका - नंदा खरे

#संकल्पना #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

शांतारामबापूंची काल्पनिका

- नंदा खरे

नंदा खरे 'ऐसी अक्षरे' परिवाराचे मित्र आणि आधार होते. त्यांची सतत आठवण राहील. हा त्यांचा एक पूर्वप्रकाशित लेख.

प्रिय, श्रीमती संध्या शांताराम,

आपण अर्थातच मला ओळखत नाही. आणि बहुधा आपण या पत्राची दखल घेणार नाही. आपले स्नेहीही घेणार नाहीत. माझे मित्र मात्र आवर्जून दखल घेतील. त्यांतल्या उच्चभ्रूंच्या भिवया आणिकच उंचावतील. ते मनात म्हणतील, "तरी मला वाटायचंच की खऱ्या सरकलेला आहे!" इतर सारे मात्र बहुधा दोन-पाच अक्षरी शिव्या देऊन खदाखदा हसतील. ते उच्चभ्रू नसल्याने त्यांना माझे म्हणणे कळेल आणि पटेल.

कधीतरी १९६५च्या सुमाराला आमच्या कॉलेजात 'नवरंग' सिनेमा दाखवला. मला तो आवडला. अनेक मित्रांनाही आवडला. एका उच्चभ्रू मित्राला मात्र तो आवडला नाही. आणि मला तो आवडला असेल हेही पटले नाही! तीनतीनदा विचारत होता, "खरंच आवडला, की फिरक्या घेतोयस?" आत्ता!

नंतरही हे होत राहिले. शांतारामांचे चित्रपट, त्यातल्या तुमच्या भूमिका, यांचे कौतुक करणे हे तुमच्या अभिरुचीत खोट असल्याचे लक्षण मानले जाई. विशेषत: तुमचा उल्लेख तर हेटाळणीनेच केला जाई. सॉरी, पण खरे तेच सांगतो. तुमचे दिसणे, बोलणे, नाचणे, अभिनय, कशाबद्दलही चांगले बोलायची सोय नसे. नाही, मी तुमचा खास चाहता नव्हतो, पण मला राग करण्यासारखेही काही वाटत नसे. 'नवरंग'च्या आधीही तुम्हाला पाहिले होते. 'अमर भूपाळी', 'झनक झनक पायल बाजे' तर प्रथम प्रदर्शनातच पाहिले. पण त्या अतिपोरवयात सिनेमाला जाण्याचेच अप्रूप असे. त्या चित्रपटांचे काही आभिरौचिक ठसे उमटले नाहीत. नवरंग अनुभव आणि नंतरचे मित्राचे बोलणे यानंतर मात्र शांतारामांचे, तुमचे चित्रपट जरा ज्यादाच बारकाईने पाहू लागतो. 'नवरंग'सारखाच 'दो आंखे बारह हाथ' ही मूळ रिलीजच्या बराच नंतर पाहिला, आणि 'नवरंग'पेक्षा वेगळ्या कारणांनी तो आवडला.

मग ७०-८० चे दशक आले, आणि 'पिंजरा'. तो चित्रपट ज्या 'द ब्लू एंजल'वर बेतलेला होता त्याची एक आवृत्ती पाहिली होती. शांतारामांनी चांगले मराठीकरण केले, असे मत झाले. यात डॉ. लागू आणि निळू फुल्यांचे अभिनय, जगदीश खेबुडकरांची गीते वगैरेंचा भाग होता. सोबतच तुमचा अभिनयही भूमिकेत चपखल बसणारा आहे हेही जाणवले. नंतर मात्र एक संपूर्ण गणेशोत्सव 'पिंजरा'च्या गाण्यांनी गाजवून अजीर्ण झाले! राजा परांजप्यांनी शांतारामबापूही तमाशापट काढायला लागले यावर नाराजी नोंदवली, पण प्रेक्षक-समीक्षक मात्र खूष होते. चित्रपट अफाट चालला.

शांतारामांना मराठी प्रेक्षकांची नाडी उत्तम समजते, हेही पुन्हा एकदा ठसले! मराठी आणि भारतीय प्रेक्षकांना बटबटीतपणा आवडतो, हे इतर कोणत्याही चित्रकर्त्यापेक्षा बापूंना जास्त समजले. 'अमर भूपाळी' आणि 'रामशास्त्री' संयतपणे काढणाऱ्या बापूंनी नंतर मात्र बटबटीत चित्रपट काढले. गोपीकृष्ण या अभिजात नर्तकाला 'झनक झनक…'मध्ये व्यंगचित्र वाटावे असे नाचवले. इतर निर्माते-दिग्दर्शक शिडशिडीत बांध्याचे नायक वापरत असताना बापू चौकोनी चेहऱ्याचे, सामान्य बांध्यांचे (थोडेफार बापूंसारखे दिसणारे!) महीपालसारखे नायक वापरत. इतर लोक हेलन आणि कक्कू नमुन्याच्या नट्यांना कमी कपड्यांत नाचवून जे साधत, ते बापू तुम्हाला पूर्ण सवस्त्र रूपात 'अटकर बांधा, गोरागोरा खांदा' (इंचभर!) दाखवायला लावून साधत. हो, ते तुम्हाला 'ज्वानीच्या आगीची मशाल हाती' घ्यायला लावत, तेही ज्वानी ओसरल्यानंतर. आजच्या फ्लेक्सांवर दिसणाऱ्या नेत्यांच्या चेहेऱ्यांसारखे चेहरे असलेल्या दुय्यम पात्रांचे 'गडी अंगानी उभा नि आडवा' असणे ठसवत. भरपूर मेलोड्रॅमॅटिक होत. आणि हे सारे मराठी प्रेक्षकांना आवडते, याची बापूंना खात्री असे.

या साऱ्या प्रकारात बापूंनी तुम्हाला वापरून घेतले का? मला तसे वाटत नाही. त्यांच्या मनात सुंदर स्त्रियांबद्दल काही काल्पनिका होत्या, fantasies म्हणतात तशा. भडक रंग, तंग कपडे, धातूंचे असावे तसे केस वगैरे. त्यात कौतुक असायचे, आणि त्या काल्पनिका तुमच्यावर टांगल्या जात. यात अनादर नसे. त्यांचे मूळ कामोत्तेजन हेच असे. अखेर बापू होनाजी बाळाचेच वारस, 'सखे होतो आम्ही विषय-विचारी' म्हणणाऱ्या! (आज त्या ओळीचा अर्थ समजून घ्यायला शेजारच्या, मराठीत एमे झालेल्या पन्नाशीच्या काकूंकडे जावे लागेल, पण ते असो!). म्हणूनच 'अरे जारे हट नटखट' या गाण्यात बापूंनी तुमचे अर्धनारीनटेश्वर रूप दाखवले. पुरुषी चेहेरा महीपाल/बापूंचा, आणि स्त्रीरूपात तुम्ही स्वतः. शुद्ध कामभावना, तीही 'चित मैं जीता, पट तू हारा' नमुन्याची. डोळे मिटून गाणे ऐकले तर ती जाणवत नाही. पण दृश्यरूपात मात्र ती कामभावना पूर्ण बटबटीतपणे अंगावर येते. यात तुमचा अनादर होत नाही. बापूंनी त्यांची काल्पनिका जाहीर करण्याने ओशाळे वाटते.

मूठभर उच्चभ्रू लोक काहीही म्हणोत, मराठी अभिरुचीत बटबटीतपणा आहेच. आचार्य अत्रे, सर्व ठाकरे, अजित पवार असे फटकळ, प्रसंगी बीभत्स बोलणारे नेते मराठी लोकांना आवडतात. चारोळ्या, सलील कुलकर्णी, संदीप खरे यांच्या गोडगोडपणातही बटबटीतपणा आहेच. द्वयर्थी विनोदांना दादा कोंडक्यानी केंद्रस्थान दिलेच. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे खऱ्या अभिनयाकडून थिल्लरपणात गेले, आणि त्यांचा वारसा पावलावर पाऊल टाकत मकरंद अनासपुरेने घेतला. अगदी आज वाहिन्यांवर 'माझ्या बायकोला *** हवा' हे निर्लज्जपणे ओरडले जाते (माफ करा, माझी लेखणी चाचरली!). तेव्हा उगीच 'मी न्हाई त्यातली…' न करता आपण राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशात राहतो, हे मान्य करावे. त्याशिवाय शांताराम संध्या यांची टिंगलटवाळी होत असतानाच त्यांचे चित्रपट जुबिल्या का साजऱ्या करायचे ते कळणार नाही.

पण मी हे तुम्हाला का सांगतो आहे? बापू जेव्हा महाराष्ट्राला गुंगवत होते, तेव्हा त्या गारुडात तुम्ही साथीदार-भागीदार होतातच. पण बापूंच्या वाट्याला कौतुक आले, अगदी चार्ली चाप्लीनने त्यांना वाखाणले. तुमच्या वाट्याला मात्र कमीजास्त हीन अभिरुचीचे विनोद, टिंगल, हेटाळणी, हेच आले. आज नवरंग अनुभवाला पन्नासेक वर्षे होत असताना जरा समतोल साधावा असे वाटले, म्हणून हे पत्र …

… मोठे बहुधा कोणी नसणारच. लहानांना आशीर्वाद. तुम्हाला प्रणाम!

पूर्वप्रकाशन : महाराष्ट्र टाइम्स, २३ जून २०१३; 'वाचताना पाहताना जगताना', लोकवाङ्‌मय गृह, २०१४, या पुस्तकात संकलित.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख आवडला. बापुंच्या काल्पनिका बटबटीत असायच्याच पण त्याचबरोबर त्यातला (काही अपवाद सोडून) अभिनयही अतिशय ठोकळेबाज असायचा. कुणी उच्चभ्रु म्हणो नाहीतर आणखी नांवं ठेवो, मला त्यांचे चित्रपट कधीच आवडले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापूंच्या काल्पनीकां मधे असलेला सर्वात जास्त बटबटीतपणा म्हणजे संध्या.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण, संध्या ही लोकांसाठी काल्पनिका होती, त्यांच्यासाठी वास्तव होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0