मुंगी उडाली आकाशी

#ललित #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

मुंगी उडाली आकाशी

- झंपुराव तंबुवाले

मनोमयने घट्ट आवळलेल्या मुठी उघडल्या. कीबोर्ड, संगणक, आणि तत्सम इतर छोट्यामोठ्या इलेक्ट्रॉनिक अवजारांपलीकडे त्यानं हातात काही धरलं नव्हतं. त्याच्या मनात भीती दाटून आली होती. पण ती दूर ठेवत त्यानं समोरचा दोरखंड हातात धरला. मनाचा हिय्या करून फुटा-फुटाच्या अंतरावर असलेल्या गाठीवजा पायऱ्यांमध्ये बोटं आणि पाय जमतील तशी अडकवत हळूहळू वर चढू लागला. चढणं क्रमप्राप्त होतं. राजस्थानच्या इंजीनिअर्स बटालियनमध्ये सामील झाल्यानंतरचं त्याचं हे पहिलंच ट्रेनिंग. बायोनिक्स इंजीनिअर म्हणून येऊनही असं काही करावं लागेल हे माहीत असतं तर तो कदाचित आलाच नसता.

"म्हणे सर्व्हायवलसाठी आवश्यक आहे," मनोमय म्हणाला आणि चपापून कोणी ऐकलं तर नाही ना हे पाहायला वळला. बाकीच्या दोरखंडावरचे इतर नवशिके आपापल्या विवंचनेत चढत होते - सगळे एकाकी.

मनोमय पळ काढणाऱ्यांमधला नव्हता. स्वत:ला शिव्या देत-देत का होईना आवश्यक त्या वीस गाठी पार करून त्या उंच भिंतीवर तो विसावला. काटक असूनही चांगलीच दमछाक झाली होती त्याची. अनेक जण त्याच्या आधीच पोचले होते. सुदृढ प्रकृतिमानाचे एक-दोघं अजूनही हळूहळू चढत होते.

बसल्या-बसल्या मनोमयने भिंतीपलिकडच्या मैदानाकडे पाहिलं. मुलींची एक रेजिमेंट तिकडे कवायतींमध्ये मग्न होती. वर्ध्याला असतानाचा कॉलेजमधला प्रसंग अचानक आठवून त्याला हसू आलं. तो जात्याच घाबरट होता. कॉलेजातही तेच हाल. को-एड कॉलेज आणि कॉमन हॉस्टेल्स असली तरी मुला-मुलींचे स्विमिंग पूल मात्र स्वतंत्र असत. इतर मुलं शिडीने हॉस्टेललगतची भिंत चढून नेत्रसुख मिळवत. इच्छा असूनही मनोमय तसं काही करणं शक्यच नव्हतं. एकदा मात्र त्याच्या मित्रांनी त्याला मस्त पाजली आणि मग चढले की राव लटपटत का होईना! एखाद्या पेयाचा इतका अंमल होऊ शकतो याची अशी प्रचिती आल्यानंतर तो त्या विषयाच्या मागे लागला. इलेक्ट्रॉनिक्समधल्या पदवीनंतर मेंदूतले दळणवळण आणि त्यात बदल घडवून आणणारे विविध रासायनिक पदार्थ आणि त्यांचा अंमल कसं टाळता येईल यावर संशोधन. त्या दरम्यान इतरांवर प्रयोगही करून झाले. पण तो स्वतः मात्र या पदार्थांपासून दूर राहिला.

त्याचं संशोधन प्रसिद्ध झालं, त्याला प्रशस्तीपावत्याही मिळाल्या. पण हे दैनंदिन आयुष्याशी संबंध नसलेलं महागडं संशोधन कोण वापरणार आणि कुठे? पुढे काय करावं या विचारात दिवस सरत असतांना एक दिवस सकाळी-सकाळी तो साखरझोपेत असतांना दारावरच्या कर्कश घंटीने त्याला उठवलं.

"कोण आहे?" असं गादीवरूनच तो ओरडला, पण मग डोळे चोळतच दार उघडलं.

दारातले गणवेशधारी सैनिक पाहून त्याची बोबडीच वळली.

"क-काय हवं तुम्हाला?"

तितक्यात त्यांच्या मागून त्यांचा अधिकारी वाटणारा, एक भरघोस मिशा पण पूर्ण टक्कल असलेला धिप्पाड माणूस पुढे आला.

"मी कर्नल खन्ना." हुद्दा आणि अवताराच्या तुलतेन कर्नलसाहेबांचा आवाज खूपच मृदू होता.

"तुमच्या संशोधनाबद्दल बोलायचं आहे," मिलिटरी कॅप पुन्हा डोक्यावर ठेवत खन्नाच पुढे बोलले.

आतापर्यंत सावरलेला मनोमय संशोधनाचं नाव निघताच पुरता जागा झाला. त्यांना खोलीतल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसायची खूण करत टेबलवरच पडलेला टॉवेल उचलून तो बाथरूममध्ये शिरला. पाचच मिनिटांत बाहेर आला तेव्हा खन्ना त्याच्या पुस्तकांच्या कपाटाच्या बाजूला उभे राहून पुस्तकं न्याहाळत होते.

तो आल्याचं पाहून वेळ न दवडता त्याच्याकडे वळून खन्ना म्हणाले, "सैन्यापर्यंत तुमचं संशोधन पोचलं आहे. त्यामुळे देशाला मदत होऊ शकेल अशी आमची खात्री आहे. जैसलमेरला आपलं एक पथक यासंबंधीचं काम करतंय. तुम्हीपण त्यात सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे."

ती केवळ इच्छा नसून जवळजवळ आज्ञाच आहे हे मनोमयच्या लगेच लक्षात आलं.

तसंही तो काही करत नव्हताच, आणि देशाच्या रक्षणाचं कारण असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पंधराच दिवसांत तो जैसलमेरच्या मिलिटरी स्टेशनवर पोचला. सोनेरी किल्ल्यापासून काही किलोमीटरवर असलेला हा अद्ययावत बेस. बाहेरून साधं, वाळवंटातल्या इतर बांधकामांमध्ये मिसळून जाईल असं वाटलं तरी बांधकाम पक्कं. प्रयोगशाळाही सुसज्ज आणि अत्याधुनिक. बायोनिक्सची प्रयोगशाळा पाहून तर मनोमय हरखून गेला. वर्ध्याला संशोधन करताना केवळ चित्रांत आणि व्हिडिओजमध्ये पाहिलेली सामग्री आता पहिल्यांदाच हातात पडली. त्याच्याबरोबर आणखी दोन ज्येष्ठ वैज्ञानिक, गुवाहाटीचे रॉबिन आणि जामनगरची जमीला. त्यांच्याव्यतिरीक्त अनेक मदतनीस, आणि देखरेख ठेवायला थेट खन्नांना रिपोर्ट करणारा लेफ्टनंट कर्नल ससाणे. तीन-चार दिवस तो परिसर जाणून घेण्यात गेले. त्यानंतर मनोमयच्या सर्व्हायवलचा फतवा निघाला, आणि त्यामुळेच आजचं हे दिव्य. होस्टेलमधल्या त्या अनेक वर्षांआधीच्या प्रसंगानंतर इतकं वर चढल्याचं त्याला आठवत नव्हतं. पूर्ण शुद्धीवर असतानाची तर पहिलीच खेप.

"टेऽऽन, हट!" या खालून आलेल्या आरोळीने मनोमय भानावर आला. कपाळावरचा आणि बारीक केसांवरचा घाम पुसत तो खाली उतरला. आपली भीती कमी झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.

***

असेच आणखी बरेच प्रकार झाले हेरगिरीबद्दलचे आणि अँटी-इंटेलिजन्सबद्दलचे काही सेशन्स झाले; आणि मनोमयला त्या नॉनसिव्हिलियन बेसची जास्त ओळख झाली. तिथले सैनिकच नाहीत तर त्यांच्या मधून फिरणारी आम जनता. त्यात दारू आणि ड्रग्स पुरवणारे आणि वेश्यापण. सैन्याच्या सर्व थरांत दारू पिणे सर्रास चाले. स्ट्रेस रिलिव्हर म्हणून. निषिद्ध असूनही ड्रग्सपण घेतले जात. वाच्यता झाल्यास लागणाऱ्या कलंकामुळे एकमेकांबद्दल वरिष्ठांना त्याबद्दल अंधारात ठेवलं जाई. तसे प्रकार सुरू असतात हे अर्थातच सगळ्यांच्या माहितीचे. मनोमय वेश्यांपासून तर दूर राहिला पण संशोधनात पुढेमागे कामी येतील हे जाणून ड्रग सप्लायर्सबरोबर मात्र त्याने सलगी केली. वर्षानुवर्षं तिथेच असल्यागत त्याची जमीला आणि रॉबिनबरोबरदेखील मैत्री झाली. इतर अनेक गोष्टींबरोबरच तिथले ड्रग्सचे प्रॉब्लेम, अल्कोहोलिजम आणि त्याबद्दल काही करता येईल का वगैरेबद्दल पण बोलणं व्हायचं. कर्नल खन्नापण या संभाषणात सहभागी असायचे.

***

अशातच एक दिवस खन्नांनी मनोमयला पाचारण केलं.

"मनोमय, आपली लॅब आता तुझ्या पूर्ण परिचयाची आहे. पुढच्या आठवड्यात पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. रस्तोगी येताहेत. त्यांनीच तुझं संशोधन हेरलं आणि आम्हांला कळवलं. त्यांना या संशोधनाबद्दल काही प्रश्न आहेत. आपली इतर मंडळी असतीलच."

"काही खास कामाने येत आहेत का ते?" मनोमयने विचारले.

"कारणाशिवाय ते कधीच येत नाहीत. आता तर काय त्यांनी स्वतः निवडलेला माणूस इथे आहे," कर्नल खन्ना ससाणेंकडे पाहून चक्क डोळा मारत म्हणाले.

"मला काही कळलं नाही."

"कळेल. मला तुझ्या मनात काही भरवून द्यायचं नाहीये, पण डॉ. रस्तोगींच्या भेटीनंतर त्यांचा पूर्ण रिपोर्ट मला तुझ्या पद्धतीने दे."

खन्ना आणि ससाणे गेल्यानंतर मनोमयने रॉबिन आणि जमीलाला डॉ. रस्तोगींबद्दल विचारून पाहिले.

"पंतप्रधानांप्रमाणेच त्यांचे हे वैज्ञानिक सल्लागार पण आजन्म ब्रह्मचारी," एवढेच बोलून जमीला चूप बसली.

***

आठवड्याभरात डॉ. रस्तोगी आले. बारीक शरीरयष्टी, अर्धचंद्राकार टक्कल, धारदार नाक, कपाळावर आडवं गंध आणि कथ्या रंगाचं नेहरू जॅकेट असं ते व्यक्तिमत्त्व. नमस्कार चमत्कार झाल्यावर ते प्रयोगशाळेतल्या कॉन्फरन्स रूममध्ये गेले. डॉ. रस्तोगींची तिथे एक खास खुर्ची होती. तिथे बसल्यावर डॉ. रस्तोगींनी सरळ विषयाला हात घातला.

"तुझ्या थिसीसमधलं ते मुंगीचं उदाहरण मला आवडलं," खड्या आवाजात डॉ. रस्तोगी म्हणाले.

"मुंगीचं उदाहरण?" आपल्या जाड थेसीसमधल्या नेमक्या कोणत्या भागाबद्दल डॉ. रस्तोगी बोलताहेत हे त्याला कळेना. त्याने बऱ्याच उदाहरणांत मुंग्या वापरल्या होत्या.

"ती गवतावर चढणारी मुंगी," डॉ. रस्तोगींनी खुलासा केला.

"ओह, लान्सेट फ्लूक? हं, मुंग्या असतात त्यांच्या सेकंडरी होस्ट्स."

"तेच उदाहरण. काय कमाल आहे ना त्या परजीवींची. ते लान्सेट फ्लूक जसे मुंग्यांना मॅनिप्युलेट करतात तसं काही आपल्याला हवं."

"आम्हांला पूर्ण उदाहरण सांगणार का?" कर्नल खन्ना म्हणाले.

मनोमयने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "सांगतो."

"लान्सेट फ्लूक हे एक-दिड सेंटीमीटर लांबीचे किडे असतात. त्यांची बाधा होते गायी-बकऱ्यांना. पण हे इवलेसे परजीवी त्यांच्या पोटात कसे पोहोचतात त्याची ही सुरस कहाणी. आधीच्या लागणीमुळे झालेली अंडी गायीच्या शेणातून खाली पडतात. काही गोगलगायी ती अंडी खातात. त्यांच्या शरीरात लान्सेट फ्लूक पुढच्या स्टेजला जातात. या गोगलगायींच्या नाकामधून छोट्या छोट्या चेंडूंच्या रूपाने बाहेर पडतात. या शेंबड्यांनी मागे सोडलेल्या पदार्थातून ओलावा मिळवत मुंग्या येतात आणि हे बारके चेंडू खातात. त्यांच्या शरीरात लान्सेट फ्लूक आणखी पुढच्या स्टेजला जातात आणि त्यांपैकी एक मुंगीच्या नर्व्ह सेलचा ताबा मिळवतो आणि संध्याकाळी मुंगीला गवताच्या पात्यावरती थेट वर चढवतो. रात्रभर मुंगी तिथेच असते. सूर्योदयानंतर मात्र पूर्ववत होऊन खाली येते. संध्याकाळ झाली की पुन्हा वर चढून बसते. तिच्याकडे स्वतःचा ताबा मुळीच नसतो. एखाद्या संध्याकाळी बकरी किंवा गाय गवताच्या पात्यासकट मुंगी खाते आणि ते चक्र पुन्हा सुरू."

"एक्झॅक्टली," डॉ. रस्तोगी उत्तेजित होऊन म्हणाले. "त्या मुंग्यांच्या मेंदूचा जसा ताबा फ्लूक मिळवतो तसा आपल्याला आपल्या शत्रूचा मिळवायचा. असं एक हत्यार बनवायचं की ते थेट शत्रूच्या डोक्यात जाईल. तुझं संशोधन मानवी मेंदू आणि अमली पदार्थांबद्दलचं. पण असे अमली पदार्थ हजारोंना जबरदस्ती करून देणं सोपं नाही. गरज पडलीच तर ते जीवाणूंद्वारे त्यांच्या लक्षापर्यंत पोचवायचं आमचं - आपलं - उद्दिष्ट. पार घाबरवून टाकायचं त्यांना."

खरं तर हे ऐकून मनोमय हादरला. सैन्यात इंजीनिअर म्हणून जात असल्याने कोणाला मारावं लागेल असं त्याच्या स्वप्नातही आलं नव्हतं. इथे तर संपूर्ण सैन्याला गारद करण्याची भाषा सुरू होती. तेही जैविक युद्धाद्वारे. आणि दुसरं म्हणजे त्याला हे काम करायला सांगणारे अशिक्षित किंवा कच्च्या गुरूचे चेले नव्हते. वरकरणी तसं न दाखवता तो म्हणाला, "मी त्या दिशेने विचार केलेला नाही. मुंग्यांचा मेंदू अतिशय सूक्ष्म असतो. माणसाचा मेंदू कंट्रोल करायचा असेल तर वेगळी काही पद्धत लागेल. करतो मी विचार आणि पाहू काय प्रयोग होऊ शकतात."

"पण खूप वेळ लागायला नको," डॉ. रस्तोगी म्हणाले. "तुझ्या बरोबर आहेतच मदतनीस. गरज पडल्यास अजूनही लोक आणि सामग्री आपण गोळा करू शकतो."

आणखी थोडी चर्चा झाली आणि काही आठवड्यांनी परत येण्याचं बोलून आणि मनोमयच्या हातात एक डबा ठेवून डॉ. रस्तोगी बाहेर पडले.

***

त्यांना निरोप देऊन कर्नल खन्ना परत आले. मनोमयने डॉ. रस्तोगींनी दिलेल्या डब्यातल्या लाकडाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले, "हा काय प्रकार आहे?"

"ही त्या रस्तोगीची जुनी खोड आहे," जमीला हसत म्हणाली.

"खोड?"

"तिच्याकडे लक्ष देऊ नकोस," रॉबिन म्हणाला. "ते खरंच एक खोड आहे - चंदनाचं."

"आणि मी त्याचं काय करणार?"

"अर्थात उगाळून गंध लावायचं," जमीला म्हणाली.

"कसे वाटले डॉ. रस्तोगी?" खन्नांनी विचारलं.

"डायरेक्ट आणि सरकलेले," मनोमय म्हणाला.

"आणि शक्तिमान," खन्ना म्हणाले.

"तुम्हाला ते फार काही आवडत नाहीत असं दिसतंय."

"देशाभिमानी आणि धर्माभिमानी. त्यासाठी इतरांकडून काहीही करून घ्यायची त्यांची तयारी असते. थोडं सांभाळून राहायला हवं."

"तुम्हाला त्यांची भीती नाही वाटत?"

"सैन्यातल्या कॅमेराडरीबद्दल तुला अजून शिकायचं आहे," खन्ना त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाले.

"त्यांची पुढची डिमांड काय असू शकते याची मी कल्पना करू शकतो," मनोमय म्हणाला.

"काय, एका भेटीत?" रॉबिनने विचारले.

"मी पैज लावतो. एक सिंगल माल्टची बाटली."

"कालपर्यंत तुला रस्तोगीबद्दल काही माहिती नव्हतं आणि आज त्यांच्याबद्दल पैज लावायला तयार?"

"ऑफ कोर्स. इंटरनेटचा काहीतर फायदा घ्यायला हवा ना?"

"अरे, पण आधी तुझा कयास तर सांग."

"ऐक," मनोमय म्हणाला आणि हळू आवाजात काहीतरी बोलला.

"काही पण काय…" जमीला ओरडली.

"पैज मान्य आहे," रॉबिन म्हणाला.

***

मनोमयने जमीला आणि रॉबिन यांच्या बायोमानिक्समधील रिसर्चबद्दल जाणून घेतलं. सैन्यात घडवून आणता येतील अशा बदलांबद्दलच्या त्या तिघांच्या अनेक योजना सुरू झाल्या. डॉ. रस्तोगींच्या पहिल्या भेटीनंतर दोन महिन्यांनी ते पुन्हा येणार असल्याचे कर्नल खन्नांनी सांगितले.

आल्याबरोबर डॉ. रस्तोगी कॉन्फरन्स रूममधल्या गुबगुबीत खुर्चीत विसावले; आणि सरळ मनोमयला नेहमीच्या खड्या आवाजात विचारले, "झाला रिसर्च?"

"सर, आधी आपल्याला प्रॉब्लेम नीट डिफाइन करावा लागेल. तेच करायचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर अनेक चाचण्या घ्याव्या लागतील. त्या कुठे घ्यायच्या तेही ठरवावे लागेल. आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन्सप्रमाणे अशा चाचण्या माणसांवर नको. पण हे तुम्हाला सांगायची गरज नाही."

"पाठवायचे की ड्रोन फवारणीला. त्यात काय एवढं?"

"ड्रोन्सचे प्रयोग सुरूच आहेत," खन्ना म्हणाले.

"पण खरा प्रश्न आहे की ते ड्रोन्स फवारणी कशाची करतील, कशी करतील आणि फवारणीने काम होईल की नाही," मनोमय म्हणाला.

"हॉर्मोन्स. तुझ्या थेसीसमध्ये लिहिल्याप्रमाणे."

"पण इतक्या जास्त प्रमाणात हॉर्मोन्स बनवणं सोपं नाही," मनोमय म्हणाला.

"मास प्रोडक्शन कसं करायचं हा प्रश्न तुमचा."

"सर, चांगले प्रभाव पाडणारं औषध बनवणं जास्त सोपं. लोकांना धीट बनवणं, जास्त सोशिक करणं वगैरे. त्यांचे न्यूरल पाथवेज जास्त माहितीचे आहेत. सध्याची बरीच अँफेटमीनसारखी वगैरे औषधे वापरली जातात, ती न वापरताही. पण भित्रं बनवणं वगैरे त्याच्या उलट जरी वाटत असलं तरी तितकं सोपं नाही."

"असं म्हणतोस?" ते जणू आधीच माहीत असल्यागत डॉ. रस्तोगी म्हणाले. "त्यांचा नैतिक ऱ्हास केला तर?"

"तो कसा?" जमीला आणि रॉबिनकडे कटाक्ष टाकत मनोमयने विचारले.

"त्यांना गे बनवून."

"गे? आनंदी? ते कसं नैतिक अधःपतन होईल?" मनोमयने विचारले.

"फालतूपणा करू नकोस. तू चांगलं जाणतोस मी काय म्हणतो ते. हाॅर्मोन्सने ते साधायला हवं."

"ओह, ते होय? सर, इतरांनी त्याचेही प्रयोग आधीच केले आहेत. आणि ते पाऽर फसले. गे बॉंब म्हणायचे त्याला. एका प्रयोगाला तर इग्नोबल बक्षीस पण मिळालं. पूर्णपणे इग्नोरेबल रिसर्च."

"चुकीची केमिकल्स वापरत असतील ते. मी तुम्हाला आयुर्वेदातली एक यादी पाठवतो."

"सर, अभय असेल तर एक विचारू?"

"अगदी न घाबरता विचार."

"तुम्ही समलिंगी लोकांचा इतका का तिरस्कार करता?"

"कारण ते आपल्या संस्कृतीला काळिमा फसतात. सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे ते."

"पण आपल्या पुराणांमध्ये इतरही अनेक प्रकारांची उदाहरणं आहेत. लक्ष्मीनारायण, अर्धनारीनटेश्वर वगैरे…"

"काहीतरी बोलू नकोस. उद्याच पाठवतो मी यादी. कसून प्रयत्न व्हायला हवा."

"ठीक. पण टेस्टिंगचा प्रश्न येणारच."

"करा की आसपासच कुठे. असतात बरेच गरीब लोक आसपास. द्या त्यांच्या नातेवाईकांना काही रक्कम."

"आपल्याच लोकांवर?"

"ऑल इज फेअर इन लव अँड वाॅर."

"ठीक आहे सर."

***

दुसऱ्याच दिवशी डॉ. रस्तोगींनी एक यादी पाठवली. संध्याकाळी ते अनेकदा जात त्याप्रमाणे मनोमय, जमीला आणि रॉबिन जैसलमेरच्या किल्ल्यावर फिरायला गेले. सूर्यास्ताच्या वेळी आजूबाजूच्या छोट्या-छोट्या घरांकडे, आणि दूरपर्यंत पसरलेल्या वाळूकडे पाहताना जैसलमेरला गोल्डन सिटी का म्हणतात हे विचारायची गरज पडत नसे. पैज हरल्यामुळे रॉबिनने ग्लेनफिडिचची एक बाटली आणली होती.

"मनोमय, काल तू ‘ठीक आहे’ अशा प्रकारे म्हणालास की जसं काही तू रस्तोगीनी सांगितलेलं सगळं खरंच करणार आहेस," जमीला म्हणाली.

"मी ‘ठीक आहे’ हे त्यांनी सांगितलेल्या कामाला नाही म्हणालो."

"मग?"

"त्यांच्या आधीच्या वाक्याला म्हणालो."

"आणि काय होतं ते? मला तुमचा शब्दनशब्द नाही आठवत."

"ते म्हणाले ‘ऑल इज फेअर इन लव अँड वर’. अँड नाऊ धिस इज वॉर."

"आणि काय आहे स्वारींच्या मनात?" रॉबिनने विचारले.

"काही वेगळं नाही. आधी ठरल्याप्रमाणे सगळ्यांना धीट आणि सोशिक बनवायचं काम सुरू ठेवायचं," मनोमय हसत म्हणाला.

***

पुन्हा जेव्हा डॉ. रस्तोगी आले आणि त्यांच्या आवडत्या खुर्चीत विसावले तेव्हा खोलीत एक मंद सुवास पसरला होता. त्यांनी एकदोन दीर्घ श्वास घेतले आणि मान वळवून त्या सुवासाच्या स्त्रोताची शोधाशोध केली. त्यांच्या खुर्चीच्या मागे एक पेटलेली उदबत्ती होती.

"तुम्ही दिलेल्या चंदनाच्या खोडापासून मी स्वतः बनवली," मनोमय म्हणाला आणि बाजूला ठेवलेला एक मोठा पुडा त्यांना दिला.

"वा वा फस्क्लास. पण हे काम झालं नाही म्हणून नाही ना?"

"सर, आम्ही काम सुरू केलं आहे. पण त्याला वेळ लागणार हे आधीच सांगितलं होतं. सध्या उंदरांवर काही प्रयोग करतोय."

"वाळवंटातील उंदरांवर? त्याने काय होणार?"

"तुमच्या यादीत बेलाडोनासारखे काही पदार्थ होते. आयुर्वेदात आहे बेलाडोना? मानवाला भ्रमित करतो तो पदार्थ."

"का? ते ज्ञान आपल्या पूर्वजांना असू शकत नाही? सूची म्हणतात त्याला आयुर्वेदात."

"पूर्वजांना नक्कीच माहीत असणार, पण त्याचं इथे प्रयोजन काय?"

"तुझी ही टाळाटाळ पाहून मला एक शंका येते आहे."

"काय सर?"

"तुझं लग्न नाही ना झालं?"

"नाही."

"का?"

"वेळ मिळाला नाही."

"वेळ मिळाला नाही, की आणखी काही?"

"सर, काहीतरी बोलू नका. कळतोय मला तुमचा रोख."

"मग?"

"अभय असेल तर मीही काही विचारू?"

"पुन्हा अभय? ठीक. विचार."

"मी तुम्हालाही तोच प्रश्न विचारणार होतो. का त्या लोकांचा इतका द्वेष? कधीकधी आपण आपलाच द्वेष करतो त्यातला भाग नाही ना? खजुराहोची शिल्पं आणि अय्यपा, शिखंडी, लोपामुद्रेसारखे अनेक दाखले आपल्या आसपास असतात."

"गाढवा, अभय दिलंय म्हणून मी काही बोलत नाही. काम चालू ठेवा आणि पुढच्या वेळी येईन तेव्हा काही निश्चित रिझल्ट दिसले पाहिजेत."

***

मनोमय, जमीला आणि रॉबिनच्या प्रयत्नांमुळे सैनिकांचा अँफेटमीन, फेनेथायलाईन, मोडाफीनीलसारख्या औषधांचा अतिवापर काबूत येऊ लागला. त्यासाठी प्रयोगशाळेत बनवलेल्या नूट्रॉपीक्स असलेल्या औषधांचा त्यांनी वापर केला. या औषधांचे प्राण्यांवर इतरत्र प्रयोग आधीच झाले होते. हायकमांडकडून परमिशन घेऊनच काही मोजक्या सैनिकांना ती औषधं दिली. व्हर्चुअल रियालिटी आणि ब्रेन-मशीन इंटरफेसचा वापरून सैनिकांचा धीटपणा आणि सहनशक्ती वाढवण्याचे प्रयोग सुरू झाले. या प्रयोगांना यश यायला अर्थातच वेळ लागणार होता. हेच प्रयोग मोठ्या प्रमाणावर कसे करता येतील याबद्दल त्यांची सल्लामसलत सुरू होती.

"हे सर्व ठीक आहे पण डॉ. रस्तोगींच्या प्रयोगांचं काय करायचं ठरवलं आहेस?" कर्नल खन्नांनी विचारलं.

"त्यांना हवे असलेले, घाबरटपणाचे प्रयोग यशस्वी होणार नाहीत असं नाही. पण जर ते यशस्वी झाले तर ते आपल्यावरही उलटू शकतील. तसंही शस्त्र म्हणून रसायनं वापरणं हे अनेक कन्व्हेन्शन्सच्या विरुद्ध असल्यामुळे तसं करण्याचा प्रश्नच नाही."

"आणि दुसरे प्रयोग?"

"खरं सांगू का?"

"सांग की. की माझ्याकडून पण अभय हवं आहे?" कर्नल खन्नांनी हसून विचारलं.

"त्यांना वाटतंय मी लान्सेट फ्लूक बनावं आणि पछाडावं सगळ्या मुंग्यांना. पण मला मात्र त्यांना हवे असलेले प्रयोग केले तर आपण केवळ गोगलगाईंसारखे अभक्ष्य गोळे ओकतो आहोत असंच वाटेल," मनोमय म्हणाला.

"पण तरी तू इतका शांत?" रॉबिनने विचारलं.

"ते थकतील कदाचित …" मनोमय म्हणाला.

***

दोन महिन्यांनी डॉ. रस्तोगी आले. ते थोडे शांत वाटले. आल्याआल्याच त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली नाही नेहमीसारखी. जमीलाची आणि मनोमयची नजरानजर झाली. काही मिनिटं इकडची तिकडची चौकशी केल्यावर डॉ. रस्तोगींनी विचारले, "कुठवर आले प्रयोग?"

"बायोनिक्सचे प्रयोग जोरदार सुरू आहेत. हात थकणार नाहीत, खांदे रिकॉईल सहन करतील वगैरे. त्यांना यशही येतंय," कर्नल खन्ना एका दमात म्हणाले.

"ते नाही हो. आपल्या आनंदीपणाचे," डॉ. रस्तोगी नेहमीपेक्षा सौम्यपणे म्हणाले.

"त्याचं मनोमयच सांगेल, पण तिघांनी मिळून अजून दोन प्रयोग केले. एक सैनिकांना शूर बनवण्याचा आणि एक सोशिक बनवण्याचा."

"म्हणजे नाही म्हणत म्हणत माणसांवर केलेच प्रयोग?"

"हायकमांडकडून परवानगी मिळवून काही लोकांवरच केले."

"झाले का ते यशस्वी?"

"कळेल लवकरच," मनोमय म्हणाला.

"मी तुला सांगितलेल्या प्रयोगांचं काय?"

"माझाही सफल झाल्यासारखा दिसतोय," मनोमय हसून म्हणाला.

"दिसतोय म्हणजे?"

"त्याचा प्रयोग तुमच्यावर होता," कपाळावरचा घाम पुसत कर्नल खन्ना म्हणाले.

"काय? कसा काय?" पहिल्यांदाच आवाज चढवत डॉ. रस्तोगी म्हणाले.

"इथे केला तोच सोशिकतेचा प्रयोग तुमच्यावर केला, फक्त औषधांऐवजी उदबत्तीच्या धुरातून," मनोमय म्हणाला.

"चंदनाच्या उदबत्त्यांचा पुडा…" डॉ. रस्तोगींचा आवाज अजूनही खाली आला नव्हता.

"हो, तोच तो. तुमच्या सुरुवातीला खाली असलेल्या आवाजावरून त्याचं यश ओळखता यावं."

"नालायक! हिंमत कशी झाली तुझी?"

"धीट होण्याचं औषध त्यानेही घेतलं होतं. प्रयोग त्याने स्वत:पासूनच सुरू केले," कर्नल खन्ना म्हणाले.

"हं. पण तरी माझ्यावर प्रयोग?"

"अजून एक सांगू?" मनोमयने विचारले.

"बोल. खूपच धिटाई आलेली दिसते आहे," डॉ. रस्तोगी म्हणाले.

"माफ करा, पण तुम्हीच त्या दिवशी म्हणालात ‘ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर’ आणि त्यावरून मी ठरवलं की करूयाच हे प्रयोग."

"पाहा त्याची हिंमत. आज त्याने अभयपण नाही मागितलं," कर्नल खन्ना म्हणाले.

"म्हणे माफ करा. मला काय समजलास? चार युद्धं पाह्यली आहेत," खुर्चीवरून उठत आणि दोन्ही नाकपुड्यांमधून छोटे फिल्टर्स काढत डॉ. रस्तोगी नेहमीपेक्षा मोठ्या आवाजात पुढे म्हणाले, "आजपासून रोज मला रिपोर्ट्स मिळायला हवेत आणि तीन महिन्यांत काम पूर्ण व्हायला हवं नाही तर पुढचे प्रयोग तुमच्यावरच."

मनोमयला लख्खकन् जाणवलं की तो गवतावर चढलेली मुंगी आहे आणि रस्तोगीरूपी डायनोसॉर त्याला गिळंकृत करतो आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

जमली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झंपुराव, गोष्ट आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त झाली आहे गोष्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास गोष्ट आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

छान आहे कथा .. आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?