केंद्र परिघाचं नातं

वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते.

तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात. स्वत:च नाव सांगायची प्रत्येकीची त-हा वेगळी. कोणी घाईघाईने नाव सांगून मोकळी होत होती; तर कोणी आधी हसावं की नाव सांगावं या संभ्रमात. एखादी दुसरीलाच नाव सांगायचा आग्रह करत होती – तेंव्हाचा त्यांचा संवाद ऐकण्याजोगा होता.

त्यांनी सहा सात महिन्यांपूर्वी हा बचत गट स्थापन केला होता. महिन्यातून एकदा त्या सगळ्या नियमित भेटतात आणि बचत करतात. बॅंकेच दर्शन त्यातल्या एक दोघींनीच घेतलेलं – तेही या गटामुळे. बचत गटाच वैयक्तिक पासबुक त्या अगदी जपून ठेवतात. प्रत्येकील मी तिच पासबुक पहावं असं वाटतं. खरं तर एक दोन पासबुक पाहिली की कळतो त्या गटाचा एकंदर आर्थिक व्यवहार आणि शिस्त. पण त्यांना बरं वाटावं म्हणून मी प्रत्येक पासबुक पाहते, त्यावर काहीतरी बोलते /विचारते आणि हसून ते परत करते.

मी त्यांच्याकडून गट बांधणीच्या प्रक्रियेची माहिती घेते आहे. ती घेताना त्यांच जगणं, त्यांचा संदर्भ मी समजावून घ्यायचा प्रयत्न करते आहे. मी इतके सगळे प्रश्न का विचारतेय हे त्याही समजून घ्यायचा प्रयत्न करताहेत हे माझ्या लक्षात येतं.

खरं तर जगण्याबद्दल विचार करत बसण्याची चैन त्यांना परवडणारी नाही. दारिद्र्याशी झुंजण्यात त्यांची सारी शक्ती खर्च होते. हंडाभर पाणी आणायचं तर अर्ध्या तासाची पायपीट केल्याविना त्यांना ते मिळत नाही. घरात खाणारी सहा सात तोंड आहेत – त्याची तजवीज करावी लागते. लाकूडफाटा, धुणी-भांडी, स्वयंपाक, साफसफाई, शेणगोठा – ही त्यांचीच कामं! गेली दोन वर्ष पावसानं ओढ दिलीय खरी, पण शेत तयार तर कराव लागत आशेनं!

गावातल्या अनेक गोष्टींबद्दल आम्ही बोलतो. इतर गावातील गटांचे अनुभव मी त्यांना सांगते तेव्हा त्यांच्या नजरेत नव्या स्वप्नांच बीज रुजताना मला दिसतं.

“ताई, रसायन घ्यायला आवडेल का तुम्हाला?” रखमाताई विचारतात आणि मी दचकते. फार वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशाच्या भटकंतीत तिथल्या आदिवासींच्या भावनांचा मान राखण्यासाठी मी ‘अपांग’(तांदळाची दारू) चाखली होती. तसाच प्रसंग दिसतोय आज. माझा गोंधळ चेह-यावर दिसला असणार. कारण नीता (सोबत असलेली संस्थेची कार्यकर्ती) हसून म्हणाली, “घाबरू नका, रसना पिणार का असं विचारताहेत त्या!”

रखमाताई आधीच माझ्याशी बोलताना जरा बावरलेल्या होत्या. नीताच्या बोलण्यावर जमलेल्या सगळ्या बाया हसतात तेव्हा त्या आणखीच खजील होतात. मला एरवी रसना आवडत नाही. पण आत्ता रखमाताईंना बरं वाटावं म्हणून मी उत्साहाने होकार देते.

रखमाताईंच घर छोटस आहे. पुरेसा उजेड पण नाही. रसना येत. मी ग्लासातलं रसना कमी करायचा प्रयत्न करते तो एकमुखाने हाणून पाडला जातो.

मग गावात एक फेरफटका मारायला आम्ही निघतो. गुलाबताईंच घर दूर आहे. पाण्याचा टिपूस नसलेल्या नदीच्या पात्रातून आम्ही चाललो आहोत. भर दुपारी दोन वाजता वाळूतून चालणं सोप नाही. आम्ही दोघी तिघी सोडल्या तर कोणाच्याच पायात चप्पल नाही. पण जणू एखादा आनंदसोहळा असल्यागत सर्वांचा उत्साह!

एक चढण चढून आल्यावर समोर एकदम हिरवाई आहे. गुलाबताई बायफ संस्थेच्या शेती विकास कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. खड्डे कसे खणले, लांबून पाणी आणून लेकराच्या मायेनं आंबा आणि काजू कसे जगवले, त्यापायी शरीर कसं हलक झालं ... असं बरच काही गुलाबताई बोलतात. त्यांच घर त्यामानाने मोठ वाटलं मला. एका दोरीवर काही कपडे टांगलेले होते; एका कोप-यात चूल – दोन तीन पातेली आणि तीन चार ताटल्या फक्त दिसल्या. दुस-या कोप-यात दोन मध्यम आकाराच्या कणग्या. आणि तिस-या कोप-यात एक मध्यम आकाराची पेटी. घरात फक्त एवढच सामान.

शेजारचे लहान मोठे सगळे मला पहायला येतात. पुन्हा एकदा ‘परिचयाचा’ कार्यक्रम होतो. एक पोरगेलासा तरुण पुन्हा एकदा मला नाव विचारतो. नवा शब्द सापडल्यागत तो स्वत:शी हसतो आणि एका अंधा-या कोप-यात दिसेनासा होतो. दोन मिनिटांत तो लगबगीने परततो. “माझ्या लग्नाला यायचं बरं का ताई,” असं म्हणत माझ्या हातात पत्रिका देतो. त्याचा निरागस आनंद पाहून “लग्नाच्या योग्य वयाबाबत” काही बोलायचा मोह मी निग्रहानं टाळते.

तेवढ्यात टोपलीभर बटाटे घेऊन एक आजीबाई येतात. इतके स्वच्छ आणि तुकतुकीत बटाटे मी आजवर कधी पाहिले नव्हते. त्या बाजारात बटाटे विकायला निघाल्या आहेत असं समजून मी विचारते, “किती किलो बटाटे आहेत, आजी?” त्यावर आजीबाई हसत म्हणाल्या, “ मापून थोडेच आणलेत? तुझ्यासाठी घेऊन आलेय मी. घरी घेऊन जा.”

सकाळपासून या गावात मला आदराची आणि प्रेमाची वागणूक मिळते आहे. या गावात मी आयुष्यात पुन्हा कधी कदाचित पाऊलही टाकणार नाही. या स्त्रियांकडून खास वागणूक मिळावी असं वास्तविक मी काही केलेलं नाही. मी या स्त्रियांशी फक्त गप्पा मारायला आलेय. मी ना त्यांना कसली आशा दाखवतेय ना आश्वासन देतेय - आशेनं त्या माझ्या पुढेपुढे करताहेत अशातलाही भाग नाही. मला भरून आलं – माझ्या डोळयांत पाणी तरारलं.

पण माझ्या मनाची एक गंमत आहे. ते जितक्या चटकन भारावतं, तितक्याच सहजतेने ते वास्तवही स्वीकारतं. सकाळपासूनच्या भारावून टाकणा-या आदरातिथ्यासमवेत नकळत नजरेआड केलेली वास्तवाची काही प्रखर रुपंही होती – ती आता ठळकपणे नजरेसमोर येऊ लागली.

शहर असो की खेड, माणसांच्या मूळ स्वभावात आणि परस्परनातेसंबंधात फारसा फरक आढळत नाही. व्यक्ती म्हणून एकटी भेटणारी माणसं, आणि समूह रूपांत भेटणारी माणसं यांत नेहमीच अंतर राहतं. मी या गावातली – त्यांच्यातलीच एक - असते तर रखमाताईंनी मला ग्लास भरून रसना दिल नसतं; आपलं काम सोडून या स्त्रिया अशा माझ्याशी अशा गप्पा मारत बसल्या नसत्या; गुलाबताईंनी मला आग्रहाने त्यांच्या घरी नेलं नसतं आणि त्या पोरगेल्या युवकाने मला इतक्या लगबगीने त्याच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नसतं.

पण बाहेरून पाहिलं, की तेच जग वेगळ दिसतं!

आपण सर्वचजण बाहेरून काही काळासाठी आपल्यात आलेल्या व्यक्तीशी वेगळ वागतो. बाहेरून आलेली व्यक्ती आपल्याच जगाचा भाग झाली, की मात्र आपली गाडी मूळ पदावर येते. रोजच्या संबंधातील व्यक्तींना गृहीत धरून चालताना आपलं काही चुकतंय अस आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्यातील एका व्यक्तीला नेम धरून एकट पाडणं – हा समाजातल्या रंजनाचा सर्वमान्य नमुना. कोणाच्याही अनुपस्थितीत भलतेसलते शेरे मारत त्या व्यक्तीच्या वागण्याचा अनर्थ काढण्यात आपली सारी हुशारी खर्ची पडते. रोजचे संबंध आले की, काही वाटून घेणं, काही सोडून देणं, काही स्वीकारणं भाग असतं. ते आपण सहज करू शकत नाही. क्रिया-प्रतिक्रियांच्या जंजाळात सोप्या गोष्टी अवघड करून घेण्यात, दुस-यांच्या माथी खापर फोडण्यात धन्यता वाटायला लागते. आपल्यात मार्दव, सहजता, नम्रता ... फक्त बाहेरच्या माणसांच्या वाटयाला येईल इतकीच दुर्दैवाने उरते!

परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं. पण ते आपल्यासाठी नसतं, हे आपण जाणून घ्यायला हवं. पाहुण्यासारख जगणं जमतं, तोवर चैन असते. कशाला आपलं मानून स्थिरावलं की मग नाण्याची दुसरी बाजू समोर येते. जे आपलं असतं, त्यात फक्त सुख कधीच नसतं – सुखाबरोबर दु:खही असतंच! परिघ आणि केंद्रबिंदू यांचा तोल राखणं जमलं, तर कदाचित काही रहस्याचा उलगडा होईलही!

वैशाखाच्या रणरणत्या उन्हात कधीतरी आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली बसण्याच सुख जरूर उपभोगावं! पण रोजचीच गोष्ट असेल तर आपली सावली आपल्याला आतच शोधायला हवी!

पूर्वप्रसिद्धी

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

वैशाख वणव्यातही वसंताचा गारवा देण्याचे सामर्थ्य असलेले सविताचे हे लेखन वाचताना दुर्गा भागवतांच्या लिखाणाची आठवण [मुक्तक वाचून संपल्याक्षणीच माझा हात कपाटातील 'ऋतुचक्र' कडे गेला] झाली, इतकी सुंदरता वाक्यावाक्यातून डोकावत आहे.

आपल्या वाट्याला आलेल्या कामाकडे सौंदर्याची दृष्टी ठेवून त्यातील शुष्कपणा, रखरखीतपणा कमी करून प्राप्त परिस्थितीतही आनंद कसा घ्यावा हे या लिखाणाची जातकुळी दर्शविते. काय आहे ही वस्तुस्थिती ? तर एक स्त्री आणि तिची सहाध्यायी यांची एका अशा ठिकाणाला भेट जो भाग शहरीसंस्कृतीपासून अलिप्त...किंबहुना त्या भागातील जनांला हेच अप्रुप की भिन्न संस्कृतीतील या दोघी कोणताची संकोच न बाळगता 'आपल्यात' आल्या आहेत. 'रसना' चा तो ग्लास एकूणच त्या वस्तीतील आपुलकीचे प्रतिनिधित्व करत आहे. आपले शहरीपण त्या भागाशी गुंतून राहू शकत नाही याचीही लेखिकेला कुठेतरी टोचणी जाणवत असून त्या भरातच त्या लिहितात "या गावात मी आयुष्यात पुन्हा कधी कदाचित पाऊलही टाकणार नाही...." पण म्हणून त्या गावाविषयीची त्यांची आत्मियता किंचितही उणी होणार नाही. वस्तीवरील बचत गट महिलांची संवादातील प्रश्नोत्तररूप रचना, उत्तरे अंधुक माहीत असतानाही त्याना मुद्दाम बोलते करण्यासाठी सहज विचारलेले प्रश्न, बाईनी आमची पास बुके पाहिलीच पाहिजेत असा बालिश वाटू शकणारा हट्ट, आणि त्या पाहात असताना त्यांच्या प्रफुल्लित नजरा...ह्या सार्‍या छोट्या गोष्टींची, त्यातील आशयाची केलेली बांधणी अतिशय मनोज्ञ वाटली.

इथपर्यंतच्या भागाला आणि त्यातील लिखाणाला एकप्रकारे कवितेचेच रूप लाभले आहे.

पण पुढे "परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं. पण ते आपल्यासाठी नसतं, हे आपण जाणून घ्यायला हवं...." इथून ते व्यावहारिक पातळीवर का उतरावे यासाठी लेखिकेला तसा वैयक्तिकरित्या अनुभव आला असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न होऊ शकतो. ही 'जाणून घेण्याची' प्रक्रिया मुद्दाम घडवून आणता येत नाही [असे मला वाटते]. समाजरचनेत अशा पातळीवर जीवन जगणे क्रमप्राप्तच असते. 'अ' ठिकाणी मला आलेला अनुभव 'ब' च्या जमिनीवर का मिळत नाही, वा तिथे मला जी कटुता अनुभवायला मिळाली तिचे कारण मी नको तितके त्यांच्यात गुंतून जातो का ? माझ्यातील मार्दव, लोकसमूह मिळविण्याची धडपड इतरांच्या हृदयापर्यंत का पोचू शकत नाही ? अशा गोष्टींचा मागोवा घेताना त्यातून नैराश्य येणार नाही इतके जरी पाहिले तरी जीवनातील 'नकारार्थी' समूहाकडून 'होकारार्थी' गटाला धक्का लागू शकत नाही. परिघ आणि केन्द्रबिंदू यांचा तोल राखणे जमो अथवा ना जमो, पण त्यामुळेच रहस्याचा उलगडा होईल असेही काही नसावे. शेवटी हा रहस्यभेदही एकटीनेच करावा लागणार असल्याने त्या भेदाचे दायित्वही शोधकाकडे त्याच्या मगदुराप्रमाणे जाते.

आपल्याला गारवा देवू शकणारी "सावली" आपणच शोधली पाहिजे हे तर अटळ असे कर्मच आहे माणसाचे. फक्त त्या सावलीची व्याख्या काय करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशोकभाऊ, तुम्हाला लेखाचा उत्तरार्ध 'व्यावहारिक पातळीवरचा' वाटला याची थोडी गंमत वाटली. कारण माझ्या मते संपूर्ण लेखच एका अर्थी व्यावहारिक पातळीवरचा आहे - पण त्याच व्यवहारातून जाताना, त्यातले सुख-दु:ख उपभोगताना त्या व्यवहाराचे एक सारही मनात कळत-नकळत तयार होते. ते सार प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असते हे मान्य असल्याने तुम्हाला ते पटले नाही, तितकेसे आवडले नाही या तुमच्या मताबद्दल आदर आहेच. 'सावली'प्रमाणेच अनेक व्याख्या आपल्या आपल्यालाच करत रहाव्या लागतात पुन्हपुन्हा हेही खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> रोजचे संबंध आले की, काही वाटून घेणं, काही सोडून देणं, काही स्वीकारणं भाग असतं. ते आपण सहज करू शकत नाही.>>
कदाचित सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट चा भाग यात असू शकेल. आपले रिसोर्सेस विभागले गेल्याने आलेल्या सुरक्षिततेमधून आपण बचावात्मक होत असू. यात मला तरी काही फार आक्षेपार्ह वाटत नाही. याउलट नवीन व्यक्ती थोड्या काळापुरती आल्याने आपल्या वाट्यामधे हिस्सा मागणार नाही याची खात्री असते त्यामुळे अधिक उत्तम रीतीने आपण मिसळू शकत असू.

अनुभवात्मक लेख ह्रुदयस्पर्शी आहे यात शंकाच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारीका, आभार.
आपण अनोळखी लोकांशी काही परिस्थितींमध्ये जास्त चांगले का वागतो याची अनेक कारणे असतात. त्यातले कोणतेच कारण माझ्या मते आक्षेपार्ह नाही - कारण त्या भूमिकेत आणि त्या परिस्थितीत मी कशी वागले असते याची कल्पना करण्यावर अनेक मर्यादा आहेत - माझ्या भूमिकेच्या आणि माझ्या परिस्थितीच्या. फक्त त्या अनुभवाच्या निमित्ताने मनात आलेले हे विचार आहेत इतकंच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी आम्हाला 'आतले आणि बाहेरचे' असा धडा होता. त्यात एखाद्या व्यवस्थेच्या आतल्यांना कशी 'आपल्यातली' वागणूक मिळते हे दाखवलं आहे. बाहेरच्यांना आत येऊ देण्यास विरोध होतो. मात्र एकदा ते आतले झाले की त्यांनाही ती वागणूक मिळते.

वरच्या लेखात तुम्ही या चित्राची दुसरी बाजू दाखवली आहे. बाहेरच्यांना, ते तात्पुरते बाहेरचे असले तर पाहुण्याची, सौम्य वागणूक मिळते. मात्र एकदा आतले झालात की हे मखमली आवरण वापरण्याची गरज नाहीशी होते, व हक्कांबरोबर जबाबदाऱ्याही येतात.

एक गोष्ट मात्र वेगळी वाटली. इथे तुम्ही - सुशिक्षित शहरी व त्या - अशिक्षित गावंढळ अशी सांस्कृतिक विषमता आहे. हेच चित्र उलटं असतं तर इतका सन्मान मिळाला असता का? अर्थात तरीही पाहुणा व घरचा यामधल्या फरकाचा जो मुद्दा मांडला आहे त्याला फार बाधा येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश, तुम्ही म्हणता तो 'आतले आणि बाहेरचे' हा श्री. म. माटे यांचा लेख होता माझ्या आठवणीप्रमाणे. रेल्वेच्या डब्यातलं उदाहरणं त्यांनी दिलं होत हे मला आठवतय.
इथे शिक्षित - न शिकलेले/कमी शिकलेले; शहरी -ग्रामीण असाही एक पदर आहे हे बरोबर. कदाचित हे नुसतं 'पाहुणेपण' नसून 'विशेष पाहुणेपण' असल्याने मला वेगळी वागणूक मि़ळाली असणार या प्रसंगात. त्याचा उहापोह तितकासा मी केलेला नाही हे तुमचं निरीक्षण योग्यच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा गो. वि. करंदीकरांचा धडा होता ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सविता आणि मेघना ~

रेल्वेच्या डब्यातील उदाहरण असेल तर ते मग वि.स.खांडेकर यांच्या 'आतले आणि बाहेरचे' या कथेतील आहे. सुरुवातीला लेखकाला डब्यात आतील प्रवासी प्रवेश देत नाहीत मग हा इतरांवर अन्यायाविरुद्ध लढा देऊन कशीबशी आपली लढाई जिंकतो आणि आत प्रवेश मिळवितो. पण पुढील स्टेशनवर दुसरी व्यक्ती आत येण्याचा प्रयत्न करीत असता हाच लेखक अन्यांच्या साथीने त्या नव्या प्रवाशाला बाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न करते.....व्यक्तीमत्वातील 'माझ्यापुरता मी' हा विरोधाभास खांडेकरांनी त्या कथेत दाखविला होता.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशोकभाऊ, खांडेकराची कथा आहे का ही? जरा नेमकी कुठे मिळेल ते शोधून सांगितलंत, तर परत एकदा वाचेन. घाई नाही, सावकाश कळवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरूर. त्या निमित्ताने माझेही पुन्हा एकदा वाचन होईल. खांडेकरांचे असे छोटे छोटे ललितनिबंध खूपच छान आहेत. 'रेल्वे प्लॅटफॉर्म' वरील वातावरण त्यानी असेच हळुवारपणे टिपले आहेत एका लेखात [अर्थात १९३५-४० सालातील ते 'फलाट' होते; खेडेगावातून जाणारे....एरव्ही जवळपास निर्मनुष्य असणारे आणि अप डाऊनच्या वेळेपुरतेच काहीसे गजबजणार]. पु.ल.देशपांडे यांचाही आगगाडीवरील 'काही अप्स काही डाऊन्स' हा लेख तुम्ही वाचला असणारच, तोही असाच हळवा करून सोडणारा...विशेषत: ज्यानी 'धुराचे इंजिन' अनुभवले आहे त्याना.

{अवांतर झाले आहे, तरीही राहवले नाही म्हणून....}

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमकी अशीच कथा आहे वि. वा. शिरवाडकर यांची. आगगाडीच्या डब्यात बसलेले लोक बाहेरच्या लोकांविषयी कसा विचार करतात ते त्यांच्या 'आहे आणि नाही' या कथासंग्रहातील 'हे लोक' या कथेत रंगविले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

या विषयावर इतक्या लोकांनी लिहिलेलं आहे हे नव्यानेच लक्षात येतय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला अनुभव म्हणावं.. की अनुभव सांगता सांगता केलेलं आत्मपरिक्षण म्हणावं.. की समोरच्याला आत्मपरिक्षणाला नकळत भाग पाडणं म्हणावं.. की केवळ व्यक्त होणं असावं? लेखनाआधी उद्देश जो काही असो, लेखन या सार्‍या गोष्टी पूर्ण करते आहे

लहानपणी मी कोणत्याही गावात गेलो की मला तिथेच रहावंसं वाटायचं.. पुढे पुढे तिथे राज रहाणार्‍या परिचितांचे कष्ट पाहिले, वणवण पाहिली की आपलं तिथलं 'औट घटकेचं पाहूणेपण' मला अधिक आवडू लागलं.. या पाहूणेपणाच्या आवडीचा प्रवास इतक्या छोट्या गावांतून, अश्या सामाजिक अनुभवातून झाला नसेल - नाही; मात्र मनातले भाव असेच काहिसे बदलत गेले. ते इतके छान शब्दात बांधले नाहीत - बहुदा असे बांधता आलेच नसते..

छान लिहिलंय.. लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश, 'औट घटकेच्या' पाहुणेपणात व्यवस्थेचे फायदे मिळतात पण तोटे मात्र सोसावे लागत नाहीत - म्हणून बहुधा आपल्या सगळ्यांनाच ते आवडतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम आवडले!

आपल्या वाट्याला आलेल्या कामाकडे सौंदर्याची दृष्टी ठेवून त्यातील शुष्कपणा, रखरखीतपणा कमी करून प्राप्त परिस्थितीतही आनंद कसा घ्यावा हे या लिखाणाची जातकुळी दर्शविते. >>> अशोकजींच्या या वाक्याशी १००% सहमत. उन्हाळ्यात एखाद्या फारश्या सुविधा नसलेल्या सरकारी कार्यालयाजवळचे वातावरण, विशेषतः खेड्यातील, एकदम भकास वाटते कधीकधी. तुम्ही ते एकदम सुंदर करून टाकले या लेखात.

(बाकी नावावरून भूमितीबद्दल काहीतरी असावे असे वाटल्याने बराच वेळ लागला उघडायला Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारएण्ड, केंद्र, परिघ हे शब्द भूमितीत येतात हे मी पार विसरून गेले होते तुमचा प्रतिसाद वाचेपर्यंत Smile हो, लेखाचं शीर्षक गोंधळात टाकणारं असू नये याची नोंद घेतली आहे. मला वाटतं खेडयातला भकासपणा हा आपल्या शहरी वाढीतून येतो. खेडयातून पहिल्यांदा मोठया शहरात आल्यावर मला ते शहर भकास वाटलं होत - हेही जाताजाता आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गैरसमज नसावा - खेडं भकास असते/दिसते असे म्हणत नाहीये. मी लहानपणापासून पीडब्ल्यूडी, कृषी उत्पन्न बाजार समिती वगैरे ठिकाणी जेव्हा गेलो तेव्हा तेथे दिसलेल्या वातावरणाबद्दल ती कॉमेण्ट होती. पूर्ण खेड्यांबद्दल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारएण्ड, प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगवेगळा असू शकतो हे आहेच की! गैरसमज अर्थातच नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाहुणेपणाचा अनुभव आवडला सविताताई.

सगळेच लोक पाहुण्याशी आदराने आणि सौम्यपणे बोलतात आणि एकदा त्यांच्यातले झाले की हे वागणे कमी होत जाते हे मान्यच. सर्वसाधारणपणे आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांच्याशी सौम्य व्यवहार करतो, त्यांना वेळ देतो, पाहुणचार करतो.
मात्र लेखात उल्लेख केल्याप्रमाणे (आणि राजेश यांनीही म्हटल्याप्रमाणे) पाड्यावरच्या स्त्रिया आपली कामं सोडून दिवस पाहुण्यापाठी घालवणे, त्याला/तिला खायला-प्यायला, भेटवस्तू देणे , इ. या गोष्टी केवळ पाहुणचाराकरता नसून ते लोक शहरातून पाड्यावर आलेल्या शिकल्या-सवरलेल्या पाहुण्याला आपल्यापेक्षा अनेक बाबतीत खूप वरच्या स्तरातले किंवा वेगळ्या जगातलेच समजतात, तो समज रास्तच आहे, त्या भावनेमुळे आहे.
आपल्या शहरी लोकांचे उदाहरण म्हणजे एखाद्या चित्रपटसृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेता/अभिनेत्रीच्या भेटीच्या वेळी त्या भागातले शहरी लोकही असेच त्यांच्या सहीकरता किंवा त्यांच्यासोबत फोटो काढायला वेळ खर्ची घालतांना दिसतात.

ह्याच्या उलट म्हणजे एखाद्या शहरी घरात खेड्यापाड्यातून आलेल्या गरीब शेतकरी पाहुण्याला किंवा सिनेअभिनेत्याकडून एका सर्वसामान्य माणसाला तशी स्पेशल ट्रिट्मेंट मिळणार नाही.
इथे मला सविताताई आणि सिने-अभिनेत्यांची तुलना करायचे नसून मानवी स्वभावाचा एक गुण दाखवण्याचा प्रयत्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

स्मिता, सिने-अभिनेत्यांचं उदाहरण तुम्ही जे दिलं आहे, त्यातला मुद्दा समजला. पण इथे सिने-अभिनेत्यांचा पाहुणचार करुन काहीतरी पदरात पाडून घेण्याची (प्रसिद्धी, स्वाक्षरी, फोटो ..पुढे मिरवता येतात) हाव मात्र नक्की नव्हती. कदाचित 'बाहेरच्या जगातून आलेल्या माणसाबरोबर वेळ घालवणे' (आणि त्यातून काहीतरी नवे मिळवणे) असा इतकाच स्वार्थ असू शकतो. कारण मी कोणताही नवा विषय घेऊन तिथं गेले नव्हते. कदाचित कोणीतरी लांबून केवळ आपल्याशी बोलायला आलं आहे याचही नाविन्य असेल त्यात. त्यांना माझं नावही लक्षात राहण्याच कारण नाही .. त्यामुळे त्यांची पाहुण्यांशी वागण्याची प्रेरणा ही मानवी स्वभावाची एक नैसर्गिक झलक आहे असं मी समजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित 'बाहेरच्या जगातून आलेल्या माणसाबरोबर वेळ घालवणे' (आणि त्यातून काहीतरी नवे मिळवणे) असा इतकाच स्वार्थ असू शकतो.
या मुद्द्याशी सहमत. नाविन्याचं कुतूहल तर असेलच आणि नवीन आलेली व्यक्ती खास आपल्याला भेटायला आलीये याचा आनंदही असेलच. तुमचा मुद्दा कळला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

अशा प्रकारचा अनुभव मलाही काही ठिकाणी मिळालेला आहे. ग्रहण बघण्यासाठी, लोणारचं सरोवर बघण्यासाठी, आकाशदर्शनाला आम्ही मुंबईच्या जवळच्या किंवा अगदी उत्तर प्रदेशातल्या लखनौच्या जवळच्या खेड्यात गेलो होतो. स्थानिक लोकं ही शिकलेली, आधुनिक कपडे घातलेली, मुंबईची माणसं आली म्हणून कौतुकाने आमच्याकडे बघायची. भीड चेपल्यावर बोलायलाही यायची. आणि त्या सगळ्यांशी बोलताना अशाच प्रकारचा अनुभव येत असे.
क्वचित कोणी "तुम्ही शाहरूख खानला पाहिलं आहेत का?" वगैरे प्रश्नही विचारायची. पण असे प्रश्न अपवादानेच. टीव्ही आणि केबल चॅनल्स घरोघरी पोहोचण्यापूर्वी हे कुतूहल थोडं अधिकच असावं.

आमच्या गटात बरेचसे मुलगे/पुरूष आणि आम्ही एक किंवा दोन मुली असायचो. मोठे कार्यक्रम असायचे तेव्हा एखाद्या सेशनची पूर्ण जबाबदारी एकेका माणसावर असायची, त्यात ती मुलींवरही असे. अशा वेळेस स्थानिक मुली आणि स्त्रिया अतिशय उत्साहाने कार्यक्रमात भाग घेत असत. पुरूषांनाही या मुली एवढं सांभाळतात याचं कौतुक दिसत असे. विशेषतः वयस्कर स्त्री-पुरूषांकडून मुलींचं थोडं अधिकच कौतुक होत असे. स्वतःच्या घरातल्या मुलींना कशी वागणूक देत असतील ... माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती,
<< स्वतःच्या घरातल्या मुलींना कशी वागणूक देत असतील ... माहित नाही.>>
हे तर आहेच!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतरः

विशेषतः वयस्कर स्त्री-पुरूषांकडून मुलींचं थोडं अधिकच कौतुक होत असे. स्वतःच्या घरातल्या मुलींना कशी वागणूक देत असतील ... माहित नाही.

यावरून एक आठवण झाली. माझ्या जन्मापूर्वीपासून मी ४-५ वर्षांचा होईपर्यंत एक मावशी (तत्कालिन सामान्य संबोधन - नातं नव्हे) आमच्याकडे काहि छोटी कामे मागायला येत असत. आजी (वडिलांची आई) ती सांगून त्यांना काहि मोबदलाही द्यायची. त्या मावशी त्यातले थोडे पैसे माझ्या आत्याला (जी तेव्हा कॉलेजात होती) 'खाऊसाठी' म्हणून देत असे. पुढे माझ्या आत्याच्या मुलाच्या मुंजीची आमंत्रणे करताना आजीने त्यांचे नाव घेतले तर घरात अनेकांच्या भुवया उंचावल्या. तेव्हा आजी म्हणाली "अगं ती तुला शिकत असताना पैसे द्यायची तेही स्वकमाईतले. एक मुलगी कॉलेजात शिकतेय याचं त्यांना कोण कौतूक!"
"अगं पण त्यांच्या स्वतःच्या मुलीला तर शाळेतही नव्हतं घातलं त्यांनी"
"तीच खंत त्यांना होती. नवर्‍याच्या, त्यांच्या जातीतील इतर थोरांच्या धाकाने मुलीला शाळेत घालण्याचा धीर नाहि झाला तिला पण तरी मुलगी शिकावी असं वाटून ती नेहमीच तुझं कौतूक करत आलीये हे विसरू नकोस" (अर्थात त्यांना बोलावणे गेले)

अदितीने वर संगितलेल्या स्त्रिया घरी आपल्या मुलींशी कशाही वागत असल्या तरी ते कौतूक खरेच असावे असे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश, एक वेगळाच अनुभव समोर आणलात तुम्ही. व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या जीवनात त्यांना हवी असलेली सर्वच मूल्ये पाळता येतात असं नाही, त्यांची सगळी स्वप्नं पूर्ण होतातच असं नाही - हे पुन्हा एकदा लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरती श्री पाटील यांनी दिलेले आतल्या बाहेरच्याचे ऊदाहरण रोज मुंबईच्या लोकल्समधे बघायला आणि अनुभवायला मिळते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

जाई, मान्य आहे. पण आतलं-बाहेरच सहप्रवाशांमधलं नातं आणि आतलं -बाहेरचं जग यात पुन्हा बराच गुणात्मक फरक आहे. सहप्रवासी असताना एक प्रकारचा नाईलाज असतो कारण परिस्थितीने, त्यातल्या नियमांनी, सामाजिक संकेतांनी आपण बांधले गेलेले असतो. रेल्वे आपल्या कोणाच्याच मालकीची नसते. पण आतल्या-बाहेरच्या जगामध्ये याला ओलांडून जाणारी एक वेगळी भावनाही असते - ती नेमकी काय असते हे सांगता नाही येणार. कारण ती सगळ्या ठिकाणी एकच असेल असं नाही. पण रेल्वेत सहप्रवाशाला सामावून घेणं आणि आपल्या घरात कोणाचं तरी स्वागत करुन त्याचा/तिचा पाहुणचार करणं यात माझ्या मते बराच फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण अतिशय आवडले हे काही नव्याने लिहायला नको. ते आवडलेच. प्रतिसाद वाचताना 'आतले आणि बाहेरचे' .'काही अप, काही डाऊन' हे जुने वाचलेले आठवले, हा आणखी एक फायदा.
मी खेड्यात बरीच वर्षे काढली आहेत. खेड्यातले बरेच अनुभव, आठवणी लक्षात आहेत. असे, तसे वगैरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

'काही अप, काही डाऊन' हे कुणाचे?
तुम्ही दिलेला दुवा (असे, तसे) - त्यात काहीतरी गडबड होते आहे. मला वाटलं ती तुमच्या एखाद्या लेखाकडे घेऊन जाईल, पण तसं होत नाही. जरा बघाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविता....

"काही अप-काही डाऊन" श्री. पु.ल.देशपांडे यानी लिहिलेला हा वर्णनात्मक लेख प्रथम 'आवाज' दिवाळी अंक १९६४ मध्ये प्रसिद्ध झाला होता. नंतर त्यांच्या 'हसवणूक' या पुस्तकात तो समाविष्ट करण्यात आला. हा संग्रह "मौज प्रकाशन" चा असून तो हल्ली उपलब्ध आहे. तुम्ही जरूर वाचावा अशी मी मुद्दाक शिफारस करीत आहे.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. विचार करण्यासारखा अनुभव.

पाहुणचार म्हणजे नव्वद मिनिटांची नवलाई. किंवा "घरच्या पीराला तेलाचा मलिदा" अशी म्हण उत्तरेकडे आहेच. पण सदा पाहुणचाराची अपेक्षा घरच्यांनी केली, तर चालेलही कसे? (पण शिष्टाचाराची अपेक्षा करायला हरकत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्-दोन दिवसापूर्वी ऐसीवरील चर्चेतच ह्या लेखाचा उल्लेख मी केला होता.
कोणती चर्चा ते आता आतह्वत नाही.
बहुतेक सारिका तैंचे चर्चा असेल.
http://www.aisiakshare.com/node/2472

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गावाकडचे लोक खूप प्रेमळ आणि प्रांजळ असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ठ्ठो!!
अरूण जोशी आपलं वय कधीकधी असं उघड करतात Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शीर्षक वाचून मला वाटल कि काहीतरी गणित आणि आयुष्य यांचा संबध लावणारा लेख असेल पण पहिल्या एक दोन वाक्यामाध्येच लेखाने मनाची पकड घेतली. अश्या प्रकारच सामाजिक काम ज्यांच्या हातून होत त्या व्यक्तींना खरा आनंद मिळत असेल. बाकी अश्या ठिकाणच्या "रसना" पाहुण्चाराबद्दल थोड विनोदी वाटल.सुंदर लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!