इतिहास

इतिहास म्हणजे असे असे घडले असे सांगणारी कथा.

इतिहास आपल्यापर्यंत अनेक मार्गांनी येतो.

लहानपणी आजीने, आईने सांगितलेल्या कथा. ज्यात भुते असतात, राक्षस असतात. चेटकीणी असतात. राजकुमारी असते. राजकुमार असतो. शेवटी लग्न होऊन ते सुखी होतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र लग्न झाल्यावर कथा अशी सहजासहजी सुखी होत संपत नसते. वाढणारे आयुष्य त्याची जाणीव करुन देते. मग लग्न झाल्यावर पुढे काय झाले हा विचार मनात येत रहातो. कल्पनाशक्ती सुसाट धावत सुटते आणि आपल्या स्वतःच्या, आजुबाजुच्या परिस्थितीशी साधर्म्य असणारी कथा आपलेच मन तयार करुन पुढे असे झाले असावे असा आपल्या मनाचा समज करुन देते. भन्नाट कल्पना शक्ती कितीही सुसाट धावत असली तरी तिच्यामधे वास्तवतेचा थोडा तरी अंश असतो त्यामुळे कथा, कादंबरी मधून समाजाच्या मनस्थितीचे, मागील इतिहासाचे धागेदोरे मिळतात. कल्पना आणि वास्तव यातील सीमारेषा काळाच्या ओघात पुसट होत जाते. कर्तृत्वशक्तीला गवसणी घालण्यासाठी आकाश मिळेनासे झाले की जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणेच जीवन जगण्याचे भोग नशिबी येतात आणि त्यातच जीवनाची कृतार्थता वाटू लागते. मग परंपरेने आलेल्या कथा कादंबर्‍यांनाच वास्तव समजून पवित्रतेचे आच्छादन घालुन मनाचे समाधान केले जाते. आणि कथेला इतिहासाचे रुप दिले जाते. ती कथा हाच खरा इतिहास आहे असे समजले जाते. इतिहासाचा विपर्यास इथे सुरु होतो आणि कथेतील इतिहासाचा अंश दाण्याप्रमाणे बाहेर काढून स्वाद घेण्याऐवजी फोलपटे खाल्ले जातात आणि दाणे फेकून दिले जातात.

इतिहास केवळ याच मार्गाने येत नाही. शाळेतुन इतिहास शिकवण्याची जबाबदारी राजसत्तेने उचललेली असते. राजसत्तेमार्फत केले जाणारे कुठलेही कार्य निर्हेतूक नसते. विशिष्ट तारतम्य बाळगून आवश्यक असलेला इतिहास संस्कारक्षम वयात मुलांना शिकवला जात असतो. सुजाण नागरीक बनण्यासाठी कायदेकानुन यांचे पालन करणे हे आधुनिक नागरी व्यवस्थेतील एक मुलभुत कर्तव्य आहे ही बाब बिंबवण्यासाठी इतिहासाचा आधार घेतला जात असतो. बहुमताचा रेटा असलेल्या लोकशाही देशांमधे कित्येकदा दरवर्षी वेगळा इतिहास पुस्तकांमधून शिकवला जातो. शाळांमधून शिकवल्या जाणार्‍या इतिहासामधे असे असे घडले असे सांगण्यापेक्षा जे काही असेच घडले असे बहुमताने सिद्ध होते ते सांगण्याचा प्रघात असल्याने अशा गमती होत असतात. सुदैवाने म्हणा अगर दुर्देवाने शालेय इतिहास हा फारसा गंभीरपणे अभ्यासला जात नसल्याने इयत्ता दहावीनंतर बर्‍याच जणांचे इतिहासाचे ज्ञान दोन चार राजे, त्यांचे जन्म मृत्यचे सन आणि महत्वाच्या लढायांचे स्थळे आणि तहाची कलमे यापुरतेच मर्यादीत रहाते. कॉलेजात गोड चेहर्‍यांच्या आणि नाजुक हातवार्‍यांच्या लयीत ते ज्ञान कधीच लयाला जाते.

काही जण मात्र झटून इतिहासाचा अभ्यास करतात. कुठल्यातरी महाविद्यालय अथवा विद्यापीठामधे चिकटतात. चिकटतांना त्यांचे जे ज्ञान असते तेच बर्‍याच वेळेस सेवानिवृत्त होईपर्यंत असते. मधल्या तीस चाळीस वर्षांमधे जे काही नवे संशोधन झाले, नवे पुरावे मिळाले, वेगळ्या उपपत्ती मांडल्या, हे सर्व त्यांच्या गावी नसते. कारण त्याचा अभ्यास करुन त्यांचा पीएफ बॅलन्स काही वाढणार नसतो. त्यापेक्षा संस्थाचालकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या, संस्थाचालकांच्या घरातील सदस्यांचा सोईस्कर इतिहास लक्षात ठेवल्यास अधिक फायदा असतो. इतिहासात संशोधन करुन काही मिळेल याची शक्यता कमी. बर्‍याचदा जे माहित होते ते चुकीचे होते असा निष्कर्षच निघण्याची शक्यता जास्त असते. नकोच तसले त्रासदायक काम.

अशा परिस्थितीत इतिहासाचे वर्णन करणारी कथानके, उपकथानके कथा कादंबर्‍यांचा वेष धारण करुन येतात. खटकेबाज संवाद, काळजाचा ठोका चुकवणारे प्रसंग, देवाची, धर्माची रक्षण करण्याचा विडा उचलणार्‍या माणसांची रेलचेल असलेल्या इतिहासामधे आपण रमुन जातो. धाड धाड आवाज करत जाणार्‍या घोड्यांच्या सैन्यासमवेत आपण रपेट करुन येतो. प्राणाची बाजी लावता लावता धारातीर्थी पडणार्‍या योद्ध्यांसमवेत आपणही जखमी होतो. त्यांच्या हालासमवेत आपलेही हाल होतात. त्यांच्या मुठी वळण्याआधी आपल्या मुठी वळलेल्या असतात आणि त्यांच्या अश्रुंच्या आधी आपला हुंदका बाहेर पडलेला असतो. अमुक गोष्ट जर अशी झाली असती तर नक्कीच तसे झाले असते असे आपण गळ्याच्या शिरा ताणून ताणून सांगतो आणि पगारवाढ होणार नाही कारण कंपनीची स्थिती खराब आहे हे सत्य विसरुन जाण्याचा प्रयत्न करतो. बहुतेकांचे असेच असते. प्रत्येक जण इतिहासातला तत्ज्ञ बनतो आणि दुसर्‍याची माहिती चुकीची आहे हे ठामपणाने सांगतो.

कधी तरी वेगळे पुस्तक समोर येते. आजवरच्या कल्पना चुकीच्या होत्या असे लेखक सांगतो. त्याचे मुद्दे चुकीचे नसतात. तेच सत्य त्याने वेगळ्या कोनातुन मांडले असते. त्याचा दृष्टीकोन चुकीचा असतो असे नाही. आपण तो विचार केलेला नसतो. मुळात आपल्याला विचार करायची सवयच नसते. आपण समोरील मनुष्य जे सांगतो ते बरोबर आहे हेच मनात धरत त्याचा तर्क आपलाच तर्क असे समजून वागत असतो. नंतर कधीतरी अजून वेगळा मनुष्य वेगळा तर्क घेऊन समोर येतो. मग लक्षात येते की इतिहास म्हणून ज्याला आपण आजवर कवटाळले आहे ते आणि खरा इतिहास यात कुठेही साम्य नाही. असे का होते?

खरी गोष्ट ही आहे ही इतिहास म्हणजे असे असे घडले या अर्थाने पहाण्यापेक्षा आपण इतिहासाकडे आपल्या भविष्यात आपल्याला काय हवे आहे ह्या दृष्टीने पहात असतो. आपल्या भविष्याचा आशा आकांक्षांना आपण भुतकाळातील सुवर्णकाळ असे नाव देऊन त्यांना प्रत्यक्षात आणू पहातो. यासाठी आपण हवे ते करतो. भुतकाळातील व्यक्तींना आपण विस्मृतीतुन खेचून आणतो. त्यांची थडगी उकरुन काढतो. सर्वभक्षी काळाने घाला घातल्यावर शांतपणे अग्नीच्या स्वाधीन झालेल्या त्यांच्या देहाचे तुकडे शोधून शोधून गोळा करतो. त्यांना भेसुर अशा मखमली वस्त्रांनी मढवतो. भरजली शेले आणि रुबाबदार पागोटे त्यांच्या मस्तकावर बांधतो. चुकून त्यांचे डोळे खरे बोलतील म्हणून त्यांच्या डोळ्यांच्या बाहूल्या हिरे माणक्यांनी चिणून टाकतो. त्यांच्या तोंडी आपण आपले संवाद टाकतो. त्यांच्या कृती आपण आपल्या पध्दतीने मांडतो. आपला धर्म त्यांना देतो. आपली कर्मकांडे त्यांच्या हातून करवतो. आपल्याला हवी असलेली फळे त्यांना मिळाल्याचे दाखवतो. आपल्याला हवा असलेला भविष्यकाळ त्यांना प्राप्त झाला होता असे दाखवून आपणही तसेच वागूया असे आपणच आपली समजूत घालत वागतो. या सर्व खटाटोपाकडे मुळचा इतिहास एका कोपर्‍यात दिनवाणा होत खुजा खुजा होता एक दिवस नष्ट होऊन जातो आणि आपण इतिहासाचे मढे मिरवत रहातो.

कुणी धर्माचे अधिष्टान मुलभुत प्रेरणा असे समजून इतिहासाची मांडणी करतो, कुणी वर्णाचे अस्तित्व ही मुलभुत प्रेरणा असे समजून इतिहास मांडतो. कुणी आर्थिक अस्तित्वाची लढाई ही संकल्पना मध्यवर्ती मांडतो तर कुणी वंशराजसत्ता टिकवणे ह्या प्रेरणेने इतिहास मांडतो. इतिहास प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन मांडता येतो. मांडला जातो. हा विचार एकदा समजला की इतिहासकाराचा हेतू त्याच्या मांडणी मागे हे समजून येते. ज्याला धर्माच्या आधारावर एकीकरण अपेक्षित असते तो धार्मिक आधार सिद्ध करतो. प्रत्येक लढाई, डावपेच ही त्याच दृष्टीकोनातून समोर येते. ज्याला धार्मिक कट्टरवादाच्या विरुद्ध लढा द्यायचा असतो तो इतिहासातील धर्म निरपेक्षता मांडण्याचा प्रयत्न करतो. भांडवलशाहीच्या विरुद्ध लढणारा त्याच इतिहासाला वर्गकलहाचे रुप देतो.

वेगवेगळे विचार मांडणारे पुस्तके, विश्लेषणे यांचा अभ्यास केल्यावर ते ते विचारवंत आपल्याला खुजे वाटू लागतात. पण आपण हे विसरता कामा नये की आपण त्यांच्या खांद्यावर उभे राहून त्यांच्याकडे पहात आहोत म्हणून आपल्याला ते खु़जे वाटत आहेत. त्यांच्या खांद्यावरुन खाली उतरुन आपण जमिनीवर उभे राहू तर आपल्याला कळेल की आपणही एका खुजा समुदायाचे भाग आहोत जो भविष्याच्याच नजरेने इतिहासाकडे पहात आहे.

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

अशा काही डोसाची गरज हल्ली खूपच निर्माण झाली आहे. पण हा उपदेश म्हणजे आंधळ्यांच्या दुनियेत आरसे विकण्याचा प्रकार ठरायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रावण मोडक यांच्या प्रतिसादाशी सहमत.

अतिशय संयत भाषेत मांडलेला आणि विचार करायला लावणारा लेख आहे. इतिहासातली घटना 'एक' असली आणि 'वास्तव' असली (जसे फाळणी, तह, युध्द इत्यादी) तरी त्या घटनेची कारणमीमांसा आणि तिचे परिणाम याबाबत नेहमीच मतमतांतरे राहणार. ही मतमतांतरे अभ्यासावर आधारित असणार - फक्त भावनेवर नाही - हे समजलं की अभिनिवेश कमी होतो आणि 'दुसरी बाजू' समजून घेण्याची प्रक्रिया सुकर होते. ही प्रक्रिया घडण्याची नितांत गरज आजही (नेहमीइतकीच) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक लिखाण, शैली सुंदर.

कधी तरी वेगळे पुस्तक समोर येते. आजवरच्या कल्पना चुकीच्या होत्या असे लेखक सांगतो. त्याचे मुद्दे चुकीचे नसतात. तेच सत्य त्याने वेगळ्या कोनातुन मांडले असते. त्याचा दृष्टीकोन चुकीचा असतो असे नाही. आपण तो विचार केलेला नसतो. मुळात आपल्याला विचार करायची सवयच नसते. आपण समोरील मनुष्य जे सांगतो ते बरोबर आहे हेच मनात धरत त्याचा तर्क आपलाच तर्क असे समजून वागत असतो. नंतर कधीतरी अजून वेगळा मनुष्य वेगळा तर्क घेऊन समोर येतो.

हे पटलं.

मग लक्षात येते की इतिहास म्हणून ज्याला आपण आजवर कवटाळले आहे ते आणि खरा इतिहास यात कुठेही साम्य नाही.

नुसता तर्क ऐकुन/वाचून खरं/खोटं कसं करणार? फारतर नवीन विचार पटला, जुना सोडून दिला वगैरे ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच दिवसांनी 'मार्मिक' लेख वाचायला मिळाला!
चोक्कस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आणि विशेषतः मतितार्थ आवडला. शेवटचा परिच्छेद संशोधनाच्या कोणत्याही शाखेसाठी तेवढाच उपयुक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.