माझी आजची पाककृती.

स्वयंपाक करणे ही एक कला आहे असे कोणीतरी एका महान व्यक्तीने म्हणले आहे. चला म्हणजे मला एक तरी कला अवगत आहे असे म्हणायला हरकत नाही. तर माझी आजची ताजी ताजी पाककलाकृती सादर करीत आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जेवणाच्या तऱ्हा पण बदललेल्या आहेत. पूर्वीप्रमाणे सांजा, शिरा, पोहे, उपमा, थालीपीठ वगैरे पदार्थ खपत नाहीत. काही तरी वेगळे पाहिजे ही मागणी पुरवण्याकरता, नव्या आणि सोप्प्या पाकृसाठी सर्वत्र शोधाशोध करणे क्रमप्राप्तच. मी तसा शोध घेतला, पण मला ही पाकृ. मिळाली माझ्या सुपुत्राकडून. आजकालच्या वेगवान युगात झटपट, चवदार आणि वेगळ्या (भारतीयाकरता) पाककृतीला प्रचंड मागणी असते. त्यामूळे मला ही पाककृती बरी वाटली. आजच तयार केली होती ... चांगली जमली होती(खरंच..) म्हणून म्हणलं सगळ्यांना सांगावी.

खूप थोड्या वेळात आणि कमीतकमी साहित्य वापरून तयार झालेल्या या पाककृतीचे नाव आहे "सामन (काही लोक साल्मन म्हणतात) स्पॅघेट्टी". नाव तर एकदम फॅन्सी आहे की नाही? करायला देखिल सोपी आहे. बिघडण्याची शक्यता अगदीच अल्प आणि चव हमखास चांगलीच असेल.
चला तर मग जाणून घ्या कशी करायची सामन स्पॅघेट्टी.

साहित्य:

स्पॅघेटी पास्ता, सामन मासा, बारीक चिरलेले लसूण, बटर (सॉल्टेड असलेले चांगले), तेल, तिखट, मीठ (चवीनूसार).

कृती :
(१) सामन मासा लहान, चौकोनी आकारात कापून घ्या. त्यात थोडे मीठ आणि मिरीपूड मिसळून १० ते १५ मिनीटे झाकून ठेवा.
(२) एका लहान कढईमधे थोडे तेल ( बटर वापरले तरी हरकत नाही) गरम करून त्यात सामन माशाचे चौकोनी तुकडे मिसळा. थोडी वाफ येऊ द्यात, माशाचा लाल रंग पांढुरका दिसायला लागे पर्यंत.
(३) एका मोठ्या पातेल्यात काही थेंब तेल आणि जरासे मीठ घालून पाणी गरम करायला शेगडीवर ठेवा. त्यात पास्ता (अखंड) ठेवून पाण्याला उकळी येऊ द्या. पाण्यात बुडालेला भाग जरा शिजला की उरलेला (पाण्याच्या वर असलेला) भाग पाण्यामधे बुडेल असे करा. पास्ता पुरेसा शिजला की एका चाळणीत काढून घ्या आणि त्यावर थंड पाणी ओतून घ्या.
(४)लसणीच्या तीन ते चार पाकळ्या सोलून अगदी बारीक चिरून घ्या(ठेचू नका).
(५) जाड बुडाच्या कढईमधे किंवा मोठ्या नॉनस्टीक भांड्यात थोडे तेल गरम करून घ्या. त्यात कापलेले लसूण (जळणार नाही इतपत) परतून घ्या. लगेच त्यावर पास्ता घालून, झाकण घालून वाफ येउ द्यात (५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ नको).
(६) आता त्यात आवडीनूसार मीठ आणि तिखट मिसळा (तिखट नसले तरी चालेल).
(७) तयार झालेल्या पास्ता मधे शिजवलेला सामन मासा मिसळा.
(८) अशा प्रकारे तयार झालेल्या गरम (स्पॅघेटी) पास्ता मधे बटर मिसळा.

एका छानशा प्लेट मधे काढून घ्या, तुमच्या आवडीनूसार सजावट करा आणि बघा चव कशी आहे ते? ... अर्थात चांगलीच असणार.

टीप: - पाककृती जरी सोप्पी असली तरी त्याकरता साहित्य (भांडीकुंडी) बरीच लागतात. ती स्वच्छता करण्यास तुम्ही दूसऱ्या कुणाला विनंती करू शकता, म्हणजे तुम्हाला पाककृतीचा जास्त चांगल्या पद्धतीने रसास्वाद घेणे शक्य होईल.

field_vote: 
0
No votes yet