स्वयंपाकघरातील निरुपयोगी उपकरणं
मी साधारण २४-२५ वर्षांची असताना, माझा एक प्रियकर होता ज्याला स्वयंपाक फार आवडायचा. आमचं बरंचसं प्रियाराधन स्वयंपाकघरात झालं. अनेक संस्कृतींतून आलेल्या अनेक पाककृती करण्यात आमचा (महत्वाचा पीएचडीचा) वेळ सुखाने (वाया) जात होता. अशात एकदा त्यानं लसूण चिरडण्यासाठी म्हणून एक खास उपकरण विकत आणलं. मला फार तपशील आठवत नाहीत, पण त्या उपकरणाला एक स्टीलचा आणि एक प्लास्टिकचा असे दोन भाग होते आणि ते धुवावं लागायचं. ते बघून मी हसत हसत सुरीच्या मागे असलेल्या मुठीने झटक्यात त्याला लसणाच्या दोन मोठ्या कुड्या ठेचून दाखवल्या आणि सुरीच्या पात्याने त्या ठेचलेल्या ऐवजाची एकदम ॲटॉमिक लेव्हलची पेस्ट सदृश चटणी करून दाखवली. पण त्यामुळे त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला असावा. तो माझ्याकडे दुर्लक्ष करून ते गार्लिक क्रशर वापरत राहिला. मग एक दिवस त्याचा एक जवळचा मित्र जेवायला आला असता, त्यानंही माझ्यासारखंच प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि असली निरुपयोगी उपकरणं विकत घेऊन आपण भांडवलशाहीच्या आहारी जातो आहोत असं मत व्यक्त केलं. त्यानंतर स्वयंपाकघरात लसूण वापरावा लागला की नेहमी एक अनामिक ताण भरून राही. पुढे तीन वर्षांनी आम्ही वेगळे झालो. त्या निर्णयाची बिजं त्या लसूण ठेचणीतच पेरली गेली होती असं माझ्या थेरपिस्टनं मला पटवून दिलं (या अर्थानं, आमच्यापैकी निदान एकासाठी तरी ते उपयुक्त ठरलं असावं असं म्हणता येईल). मी त्या गोष्टीचा इतका धसका घेतला की लग्नाच्या नवऱ्याला स्वयंपाक येतो का हा प्रश्नही विचारला नाही. पण इथे एक अवांतर साक्षात्कार नोंदवावासा वाटतो तो असा, की भविष्यकाळात नवरा होऊ शकणारा प्रियकर बावळट आहे असं लक्षात आलं की फार दुःख होतं. अगदी दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना येते. पण लग्नाचा नवरा बावळट आहे असा साक्षात्कार झाला की तितकाच आनंद होतो. हे असं का होत असावं याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.
लग्नाच्या आहेरात मिळणारं एक मध्यमवर्गीय उपकरण म्हणजे सँडविच मेकर. ही दोन्ही बाजूला दोन टेफ्लॉन कोटेड खळगे असलेली एक विजेवर चालणारी पेटी असते. पावाचे चार तुकडे घ्यायचे आणि दोन-दोन तुकडे घेऊन त्यांच्या मध्ये आदल्या रात्री डोसे करून उरलेली बटाट्याची भाजी भरायची असते. म्हणजे इतरही काही भरता येईलच पण माझी मध्यमवर्गीय कल्पनाशक्ती इथपर्यंतच चालू शकते. भाजी फार कोरडी होणार असेल तर पातळ प्लास्टिक ल्यालेले प्रोसेस्ड चीजचे तुकडे (प्लास्टिक काढून) भाजी आणि पावाच्या मध्ये अलगद सरकावायचे. मग दोन खळगे एकमकांवर दाबून दोन्हीकडे असलेल्या अर्ध्या अर्ध्या पट्ट्यांची मिळून एक दांडी तयार होते. खालच्या पट्टीचा चाप वरच्या पट्टीत अडकवून, विजेचं बटण सुरु करून, वाट बघत बसायचं. त्यातून जे काही कधी कच्चे कधी करपलेले त्रिकोण बाहेर येतात, त्यांना विजेवर भाजल्याचा एक कृत्रिम वास येतो. प्रोसेस्ड चीज सँडविचच्या सीमा ओलांडून बाहेर सांडलेलं असतं. हे त्रिकोण मग स्टीलच्या ताटलीत शेजारी टमाटो केचप ओतून घरातल्या लोकांना द्यायचे असतात. ही कृती करत असताना मात्र वारंवार, आपण इथे का आहोत? आपल्यावर ही वेळ का आली आहे? असे प्रश्न पडत राहतात.मला नाही वाटत लग्नात मिळालेली ही पावदाहिनी कुणी दोन किंवा अधिक वेळा वापरत असेल. याचा एक उपयोग आहे मात्र. घरी झुरळं झाली आहेत का हे तपासायचं असेल तर अधूनमधून स्वयंपाकघरातल्या त्या एका निरर्थकतेने भरलेल्या कपाटातून ही पेटी काढून उघडून बघावी. झुरळांना ती फार आवडते. सगळ्यात आधी या पेटीतच त्यांची कॉलनी थाटली जाते.
याचीच एक छोटीशी करोलॉरी म्हणजे पाव भाजायचा उभा टोस्टर. कदाचित स्वयंपाकात फार रस नसलेल्या आणि रोज पाव खाणाऱ्या लोकांना हे उपकरण उपयुक्त वाटत असेल पण ज्यांना सुटीच्या दिवशी सकाळी लोखंडी तव्यावर, मंद आचेवर कुरकुरीत टोस्ट भाजायची सवय आहे त्यांना माझं म्हणणं पटेल. पहिली गोष्ट म्हणजे पाव किती तीव्रतेने भाजून हवा आहे यासाठी या टोस्टरच्या कडेला आकडे असलेली एक डायल असते. तीवरचे आकडे आणि मला काय हवं आहे हे कधीच एक असत नाही. ३ वर ठेवून पाव भाजला आणि तो मनासारखा भाजला नसेल तर पुन्हा १ वर ठेवल्यास तो करपतो. यावरूनच मला दुसरी गोष्ट सुचली होती. या टोस्टरचे पॅनल जर धातूचे न करता उष्णता सहन करू शकणाऱ्या पारदर्शक घटकाचे केले तर पाव किती भाजला आहे हे दिसू शकेल. मानवजातीला अजून असा पारदर्शक घरगुती टोस्टर तयार करता आला नाही याचं मला फार वाईट वाटतं.
वेगवेगळ्या आकारांत भाज्या कापून देणारी कापणीही तितकीच निरुपयोगी असते. मध्यंतरी लो कार्ब डाएट करायच्या नादात मी झुकिनीचे नूडल करून देणारं यंत्र विकत घेतलं. हल्ली असल्या डाएटांमुळे झुकिनी, ब्रॉकली वगैरे भाज्या सोन्याच्या भावात विकल्या जातात. खरंतर झुकिनीचे साध्या सुरीने पातळ काप करून थोड्याश्या लसणावर शिजवले आणि त्यांत थोडी बेझल घातली तरी चविष्ट पदार्थ होतो. पण ती त्या यंत्रातून गोलगोल फिरवून तिच्या दोऱ्या करून मग त्यांना नूडल समजून खाणं म्हणजे टोकाची स्वफसवणूक आहे. अशाच प्रकारे भाताला पर्याय म्हणून हल्ली चक्क फ्लॉवरचा भुगा करून त्याला भात म्हणायची प्रथा आली आहे! फ्लॉवरचा भातासारखा भुगा करण्याचेही एक यंत्र आहे. त्या भुग्यात थोडं पार्मेजान मळून तो गोळा बटर पेपरवर थालीपिठासारखा थापून त्याला पित्झा बेस म्हणतात. झुकिनीचे नूडल्स, फ्लॉवरचा भात, बदामाच्या पिठाची पोळी (ग्लूटेन नसलेलं हे पीठ एकजीव व्हावं म्हणून यात अंडं घालतात), बदामाच्या पिठाच्या पोळीत फायबर असावं म्हणून मळताना घातलेलं इसबगोल - अश्या प्रयोगांबद्दल वाचलं की एकदम अजून आपले या पृथ्वीवर किती दिवस राहिले असतील असं वाटायला लागतं. याचं दुसरं टोक म्हणजे घरी फ्रेंच फ्राईज करता यावेत म्हणून बटाटे तसे चिरून देणारी कापणी. एका प्लास्टिकच्या फ्रेममध्ये कधी फ्रेंच फ्राईजसाठी बटाटा कापायची कापणी, कधी बुधानीसारखे वेफर्स करायची कापणी लावून, बटाट्याची विविध रूपं तयार करायची स्वप्नं आपल्याला दाखवली जातात. पण त्यापेक्षा कॅम्पात एक चक्कर मारून बुधानीचे वेफर्स, कयानीचा केक आणि येता येता केएफसी किंवा तत्सम हृदयविकारजन्य अन्न विकणाऱ्या कोणत्याही दुकानातून फ्रेंच फ्राईज खाऊन येता येईल. आणि ते बटाटे कापून तळण्यापेक्षा अधिक सोपं असेल.
पूर्वी, म्हणजे साधारण नव्वदीच्या मध्यात कधीतरी सगळ्या घरांतून फूड प्रोसेसर घ्यायची एक लाट आली होती. त्याला एक शूट (chute) असायची जिच्यातून प्रोसेसर चालू असताना त्यात अख्ख्या भाज्या घालता यायच्या. याचंच एक नातवंडं अलीकडे जन्माला आलं आहे ज्याला ज्युसर म्हणतात. 'लो कार्बिंग' सारखं मध्यंतरी 'ज्यूसिंग'चंदेखील फॅड आलं होतं. फ्रिज उघडल्यावर पहिल्यांदा जे काही दिसेल: बीट, आलं, कारलं, आवळा - त्या सगळ्यांना पाठोपाठ ज्यूसरच्या तोंडी द्यायचं. एकीकडे मेंदी किंवा तत्सम रंगाचं भयाण द्रव्य आणि दुसरीकडे त्यांचा अतिशय कॉम्पॅक्ट चोथा करून देणारं हे यंत्र होतं. ज्यूसिंग करणारे ज्यूस पिऊन गप्प बसले असते तर ठीकच होतं. पण त्या चोथ्याचा ते कसा कसा उपयोग करतात त्याच्या कृतीही ऐकाव्या लागायच्या. कुणी त्या चोथ्याचं थालीपीठ करायचं, कुणी कंपोस्ट! पण लवकरच ते सगळे पुन्हा पोळी भाजी खाऊ लागले आणि त्यांचे ज्यूसर माळ्यावर रवाना झाले.
दोन-तीन वर्षांपूर्वी मी असं ठरवलं की काही दिवस एखाद्या शास्त्रज्ञाच्या डोळ्यांनी निरीक्षण करून आपल्या स्वयंपाकघरातल्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत हे ठरवायचं. याचे निकष काय असावेत असा विचार केल्यावर ज्या वस्तू वारंवार फुटतात/मोडतात/पाण्याने धुवून कुजतात किंवा गंजतात आणि/किंवा पुन्हा विकत घ्याव्या लागतात अशा. या निकषांत कॉफीचा फ्रेंच प्रेस, व्हिस्की आणि वाईनचे ग्लास, खोबरं खोवायची सक्शनने ओट्याला चिकटून राहणारी खोवणी, पोळपाट लाटणं, प्रेशर कुकर आणि लोखंडी स्किलेट एवढ्याच पास झाल्या. एवढ्यावरून आम्ही नक्की कोण म्हणून जगणार आणि मरणार आहोत याची ओळख मला पटली. आता त्यात बदल घडणार नाही एवढीच खबरदारी घ्यायची.
एअर फ्रायर
>>कधी एअर फ्रायर नावाचा प्रकार विकत घेतला नाहीत काय?
एअर फ्रायर हा अन्न पदार्थांचा ब्लो ड्रायर आहे हे जेव्हा समजलं तेव्हाच तो घ्यायचा नाही असं ठरवलं. लहानपणी भातुकली खेळताना आम्ही
चुरमुर्ऱ्यात पाणी घालून त्याला भात म्हणायचो. पाण्यात सुपारीची पूड घालून त्याला चहा म्हणायचो. तसं कशावर तरी खूप वेळ गरम फुंकर मारून त्याची तुलना तळलेल्या पादार्थांशी करायचा खेळ आता या वयात नको वाटतो. त्यापेक्षा तळलेले पदार्थ सोडलेले बरे.
ते ampule असलेलं कॉफीमशीन माझ्या एका फ्लॅटमेटनं विकत घेतलं होतं. तो एका कपाचे अमुक अमुक डॉलर असा चार्ज घेऊन लोकांना कॉफी करुन द्यायचा. त्यानं त्यातून जे पैसे मिळवले त्याचा त्यानं संपूर्ण छाती भरेल एवढा टॅटू केला. त्या टॅटूतला शब्द सोलेदाद असा होता. निदान कॉफीचा संबंध असलेलं काही करायला हवं होतं असं तेव्हा वाटलं होतं. पण असो.
भावना दुखावल्या.
तो कूर्जेटांचे नूडल काढणारा प्रकार आमच्याकडे आहे. उन्हाळ्यात तो वापरला जातो; कूर्जेटांच्या नूडली फोडणीला टाकल्या की पाच-दहा मिंटांत भाजी तयार होते त्यांची!
मात्र स्वयंपाकघरातील उपकरणांची उत्क्रांती तुम्ही अशी रोखून धरू शकत नाही. डार्विन नाही तर भांडवलवाद, चंगळवाद तुमचा बीमोड करेल.
बाकी स्वयंपाक करणारा प्रियकर तुला मिळाल्याबद्दल अंमळ असूया व्यक्त करून मी आता बाजूला बसते.
मिल्क कुकर
१९७० च्या दशकात , लग्नात आहेर म्हणून मिल्क कुकर देत असत. नव्याने लग्न झालेले आपल्या कामात गुंग असणारच, या गृहितावर, दूध उतु जाऊ नये म्हणुन हे कुकर असत. माझ्या बहिणीच्या लग्नात तिला असे ११ मिल्क कुकर भेट मिळाले होते.
पुरुषी अहंकार ठेचण्याला लसुण ठेचणे हे अतिउत्तम प्रतीक आहे. चित्रपट आणि अन्य दृकश्राव्य माध्यमांतही याचा वापर व्हावा. दोन गुलाब एकमेकांना टेकवण्याच्या प्रतीकापेक्षा हे कितीतरी चांगलं!
…
माझ्या बहिणीच्या लग्नात तिला असे ११ मिल्क कुकर भेट मिळाले होते.
हे होऊ नये, म्हणून आमच्याकडे (पक्षी: अमेरिकेत) एक उत्तम (आणि आत्यंतिक प्रॅक्टिकल) उपाय आहे: वेडिंग रजिष्ट्री. परंतु, हिंदुस्थानात तो कितपत पटेल/झेपेल, याबद्दल शंका आहे. बहुधा (विवाह होऊ घातलेल्या जोडप्याचा) आगाऊपणा/भांडवलवादी हावरटपणा/सांस्कृतिक धक्कादायक वगैरे वगैरे वाटण्याची शक्यता दाट आहे.
असो चालायचेच.
त्यालाही उपाय आहेत ना!
दूध उतू जाणेचे नसेल, तर त्यालासुद्धा सोपे घरगुती उपाय आहेत, ते मी सांगण्याची गरज असेल, असे वाटले नव्हते. परंतु, आता सांगतोच.
- दूध तापवू नये.१
- मिल्क कुकर वापरावा२; मात्र, स्वतः बाजारात जाऊन स्वतःच्या पैशाने तो विकत घ्यावा. अशा व्यवहारांत सामान्यतः डझनाच्या भावाने विकत घेण्याची सक्ती नसते.
अर्थात, वरीलपैकी कोणताही एक (किंवा दोन्हीं) उपाय जरी अंमलात आणले, तरीसुद्धा, लग्नातल्या आहेरांच्या ‘देणाऱ्यांचे हात हजारों’कडून ‘वर्षाव पडो (मिल्क)कुकरांचा’ होण्याची शक्यता टाळता येत नाहीच३; त्याकरिता उपाय सांगितला, एवढेच.
——————————
१ आमच्याकडे (पक्षी: अमेरिकेत) कोणीही तापवीत नाही. बाजारात मिळणारे दूध हे सामान्यतः पाश्चराइज़्ड तथा होमोजेनाइज़्ड१अ असते. ते घरी आणून फ्रिजमध्ये टाकल्यास सामान्यतः पॅकवरच्या एक्सपायरी डेटनंतर एखाद्या आठवड्यापर्यंत (पक्षी: विकत घेतल्यापासून साधारणतः दोनतीन आठवडे) आरामात टिकते. ते उकळावे वगैरे लागत नाही. किंबहुना, (गरम) चहाकॉफीत ते तसेच (न तापवता, थंड) घालता येते, नि सामान्यतः घातले जाते. (एवढेस्सेच तर घालायचे असते. त्याने गरम चहाकॉफीच्या तापमानात जाणविण्याइतका फरक पडत नाही.) (फिल्टर मद्रास कॉफी वगैरे बनविणे असल्यास उकळते दूध लागते खरे, परंतु ते कितीसे? ते कपात टाकून मायक्रोवेव करता येते. तेथे मात्र, ते उतू जाऊ नये म्हणून मायक्रोवेवसमोर डोळे लावून उभे राहावे लागते खरे, परंतु तो फार फार तर दीडदोन मिनिटांचा सवाल असतो.)
अर्थात, हा सर्व फर्ष्टवर्ल्ड मामला झाला, असा आक्षेप यावर घेता येईलच. परंतु, आजमितीस हिंदुस्थानदेखील तितकासा थर्डवर्ल्ड वगैरे राहिला नसावा. (तिरशिंगरावांच्या बहिणीचे लग्न झाले, त्या काळात, १९७०च्या दशकात वगैरे परिस्थिती वेगळी होती, हे मान्य. आज तसे नसावे.) पाश्चराइज़्ड दूध बाजारात मिळत असावे, नि फ्रिजसुद्धा घरोघर असावेत. (नि ज्या वर्गात नाहीत, त्या वर्गात घाऊक भावात मिल्क कुकरसुद्धा आहेर म्हणून बहुधा देत नसावेत; चूभूद्याघ्या.)
दूध कच्चे/स्ट्रेट फ्रॉम द काउज़ अडर (मराठीत: धारोष्ण?) वगैरे असल्याखेरीज (पाश्चराइज़्ड वगैरे असल्यास), ते तापविण्याची गरज सामान्यतः नसावी. (चूभूद्याघ्या.) (फ्रिजमध्ये मात्र कटाक्षाने ठेवावे लागेल, ते वेगळे.) परंतु, ओल्ड ह्याबिट्स डाय हार्ड; त्याला कोण काय करणार?
१अ पावतीवर याची नोंद (संक्षेपात) अनेकदा ‘होमो मिल्क’ अशी होते; परंतु ते एक असो.
२ ऐकीव माहिती. याबद्दल स्वानुभव नाही; चूभूद्याघ्या.
३ खरे तर, बहुपत्नीत्व/बहुपतीत्वाकरिता केवढे मोठे डिसइन्सेंटिव आहे हे! (थिंक पॉज़िटिव!)
इश्श
मला वाटलं होतं, 'न'बा म्हणणार दूध उतू जायचं नसेल तर दूधच सोडा. मग तळटिपांसकट मोठा प्रतिसाद येणार की सस्तन प्राणी झाले तरी बालपण संपायच्या आतच दुधाची आवश्यकता संपते. शिवाय अमेरिकेत अर्धे (रिपब्लिकनांना मत देणारे) आणि भारतात ३३% (you know who) लोक साप असतात. सापाला कशाला दूध पाजायचं वगैरे.
तर 'न'बा अगदी समरसून प्रतिसाद द्यायला लागले!
दूध तापवू नये.
अगदीच सहमत आहे. पण असं केलं तर फेसबुकवरच्या खाद्य ग्रूपवरचं ट्रॅफिक कमी होईल.
माझी साय गुलाबी झाली!
माझं लोणी गोळाच होत नाही!
तूप कढवतना घाण वास येतोय!
असे प्रश्न आणि त्यावर येणारी २३५ उत्तरं कोण लिहिणार?
शिवाय घरी कढवलेले विरुद्ध विकत आणलेले तूप अशी घमासान युद्धं! ही करमणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे दूध तापवून ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही उगाच काही डोक्यात भरवू नका भारतीयांच्या.
?
पण तुम्ही १२ मिल्क कुकर न मिळण्याचा उपाय सांगितला.
ही बायेनीचॅन्स तक्रार आहे काय? (नाही, सूर तसा वाटला, म्हणून विचारले.)
नाही, म्हणजे तुम्हाला १२ मिल्क कुकर आहेरात गोळा करण्याचीच जर हौस असेल, तर त्याला माझी हरकत असण्याचे काहीच कारण निदान मला तरी दृग्गोचर होत नाही.
फार कशाला, तुम्ही ४ वेळा लग्न करून आहेरात १२ चोक ४८ मिल्क कुकर जरी गोळा केलेत, तरीसुद्धा आपले काहीच म्हणणे नाही. ज्याचात्याचा छंद! कोणी पोष्टाची तिकिटे गोळा करतात, तर कोणी काड्यापेट्यांचे छाप, तर कोणी मिल्क कुकर! आणि त्याकरिता ४-४ लग्ने सोसायची जर कोणाची तयारी असेल, तर... मियाँ-(चारों)बीबी राजी, तो...
असो चालायचेच.
.
>>होऊ नये, म्हणून आमच्याकडे (पक्षी: अमेरिकेत) एक उत्तम (आणि आत्यंतिक प्रॅक्टिकल) उपाय आहे
माझ्याकडेही आहे. पण तो मला उशिरा सुचला. लग्नच करू नये. किंवा आई वडिलांच्या प्रतिष्ठेला शोभेल असा, म्हणून मोठा लग्नसमारंभ करू नये. माझ्या लग्नात आहेर नको असं सांगूनही मला ती पावदाहिनी मिळाली. आहेर आणा असं सांगितलं असतं तर मलाही ११ पावदाहिन्या मिळाल्या असत्या.
समारंभ करूच नये. पण जमल्यास लग्नही करूच नये. मुलं जन्माला घालवीत पण आवर्जून. ती चांगली असतात.
.
नक्की कोणाच्या शब्दांत?
माझ्या माझ्या!
तुम्ही तलवार म्यान करू शकता नबा.
अदितीताई अधूनमधून त्यांच्या लंचटाईममध्ये मला फोन करतात. आणि त्या हटकून सेलरी खात असतात. कच्ची सेलरी चावण्याच्या आवाजाने कानठळ्या बसतात हे मला त्यांच्यामुळे समजलं. त्यांना तसा आवाज करू नका असं सांगायची सोय नाही. कारण त्यांना काहीही करू नका असं सांगितलं की त्या प्राणपणाने ती गोष्ट करू लागतात.
माझ्या मते, इतर मर्त्य मानव डोरीटो खाताना जो आवाज काढतात तोच त्या सेलरी खाऊन काढून दाखवतात याबद्दल त्यांना अहंगंड आहे.
मग मी त्यांना म्हणाले की मला दीर्घायुषी व्हायचं नाही कारण माझ्या आजूबाजूला जिवंत असलेले लोक सगळे कच्ची सेलरी खाणारे असतील. त्यापेक्षा चॉकलेट खाऊन लवकर मेलेलं बरं!
(अतिअवांतर)
त्यांना तसा आवाज करू नका असं सांगायची सोय नाही. कारण त्यांना काहीही करू नका असं सांगितलं की त्या प्राणपणाने ती गोष्ट करू लागतात.
त्या टेक्सासात आहेत, नि आपण टेक्सासात नसाव्यात (बहुधा) (चूभूद्याघ्या.), ही आत्यंतिक सुदैवी गोष्ट आहे. कारण, कोठलीही गोष्ट करू नका म्हणून सांगितल्यावर, सरळ एआर-१५ काढून, सांगणाऱ्यावर गोळ्या झाडण्याची प्रथा टेक्सासात आहे. तरी बरे, कितीही अमेरिका म्हटले, तरी फोनमध्ये गोळ्या झाडण्याच्या सुविधेचा शोध अद्याप लागलेला नाही. अन्यथा, एआर-१५चा आवाज, पॉइंट ब्लँक रेंजमध्ये तर कानठळ्या बसवीत असावाच (मला (सुदैवाने) (अद्याप) अनुभव नाही.), परंतु, फोनमधून किती कानठळ्या बसवेल, याची कल्पना करवत नाही.
(सांगण्याचा मतलब: टेक्सासातल्या आहेत त्या. सांभाळून राहा.)
तरी यात लोकल ट्रेनमध्ये
तरी यात लोकल ट्रेनमध्ये मिळणाऱ्या संत्र्याचा रस काढणाऱ्या उपकरणाचा उल्लेख नाही.
शिवाय कांद्याचे पातळ काप करण्याच्या यंत्राचा. तसे पातळ काप विक्रेत्याचे मशीन, विक्रेत्याचा हात आणि विक्रेत्याकडचा कांदा हे तिन्ही योग जुळुन आल्यासच होतात.
बाय द वे कपबशी वापरणे (म्हणजे कपातून चहा बशीत ओतून पिणे) ही प्रथा बंद होऊन एक पिढी लोटली असली तरी अजून टी-कोस्टर मात्र बाजारात आहेत हे एक आश्चर्यच. ते बहुधा कपावर/मगावर झाकण म्हणून वापरतात.
तसेच व्हॅक्युम क्लीनर हाही एक अडगळ प्रकार आहे पण तो स्वयंपाकघरातील नाही म्हणून सोडून देऊ. [याच कॅटॅगरीतील काचा पुसण्याचे उपकरण वगैरे पण सोडून देऊ)
…
तसेच व्हॅक्युम क्लीनर हाही एक अडगळ प्रकार आहे
तुम्ही रोबोव्हॅक या लेटेष्ट आविष्काराबद्दल ऐकलेले दिसत नाही.
याच्या उपयुक्ततेबद्दल दुमत असू शकते, परंतु करमणूकमूल्य… लाजवाब!
(परंतु, प्रस्तुत धाग्याचा हा विषय नसल्याकारणाने – आणि, त्यापेक्षासुद्धा, तूर्तास तरी मला यावर पाल्हाळ लावण्याचा कंटाळा आलेला असल्याकारणाने – याविषयी पुन्हा कधीतरी.)
लोल! मस्त धागा.
लोल! मस्त धागा.
ते टेलिमाकेर्टिंग आल्यावर तर निरुपयोगी उपकरणांची जंत्रीच लागली होती. होमशॉप १८ म्हणजे अशा उपकरणांचा खजाना.
१. चपाती करायचे मशीन - पूर्वीचे चपाती भाजायचे गोल मशीन सँडविचचा ब्रेड भाजयच्या यंत्राचीच एक आवृत्ती होते. टेलीमार्केटिंग मध्ये मऊ लुसलुशीत चपात्या बाहेर पडताना पाहून ते मशीन अवश्य घ्यावे असे वाटायचे. अजून एक अत्याधुनिक महागडा प्रकार म्हणजे रोटीमॅटीक. लिंक इथे. नुसत्या कल्पनेनेच हे मशीन गंडके असणार याची कल्पना येते.
२. एअर फ्रायर : मीही गंडलो प्रचंड. अत्यंत निरुपयोगी मशीन. म्हणजे मशीन म्हणून ते चांगले आहे. पण युज केसेस खूप कमी. शिवाय त्यात मासा वगैरे भाजायचा म्हणजे खूप व्याप. एकदा ते मासे त्या जाळीला चिकटले की गंडलंच समदं.
३. मिक्सर अजिबात निरुपयोगी नाही, कदाचित सगळ्यात हिट मशीन असावे ते - तरीही - मिक्सरच्या भांड्यामधून वाटण बाहेर काढायला एक स्पॅतुला-उलथनं छापाचा प्लास्टिकचा आयटम दिलेला असतो, त्याच्या टोकाला भांड्यातले ब्लेड काढायला नट फिरवणारी खोबणी असते- हा आयटम अनबॉक्स केल्यावर आयुष्यात परत कधीही सापडत नाही. कुठे गायब होतो भेन्चो कळत नाही.
४. कांदे, बटाटे, टोमॅटो विनासायास पटकन कापून देणारी सर्व वायझेड कॅटेगरी - या मशिन्सचा हेतू खूप जेन्युईन असतो. म्हणजे प्रॉब्लेम सर्वव्यापी आहे. माहित आहे. तो सोडवायचाही आहे. परंतु एकही, सालं एकही मशीन हा प्रॉब्लेम नीट सोडवत नाही. तिसऱ्या दिवशी यांचे ब्लेड बोथट होतात. साफ करायची प्रचंड कटकट. त्या जपानी लोकांना एक कळकळीची विनंती आहे, काहीतरी उपाय शोधून काढा यावर.
आमच्या घरचा मसाला करताना खूप प्रमाणात कांदे कापावे लागतात तेव्हा कांदे पटकन कापायला गोल गोल फिरायचे एक उपकरण कामी यायचे. परंतु तेही एका वापरानंतर बिनकामाचे.
!!!
काय! तुम्हाला 'ध्रांगध्रा'१ ष्टोरी माहीत नाही? विजुभाऊंची 'ध्रांगध्रा'?????? (कुठूनकुठून पैदा होतात लोक या जगात!)
ही घ्या. (स्वत:च्या जबाबदारीवर) वाचा. So bad, that it is good!
ध्रांगध्रा - १
ध्रांगध्रा - २
ध्रांगध्रा - ३
ध्रांगध्रा - ४
ध्रांगध्रा - ५
ध्रांगध्रा - ६
ध्रांगध्रा - ७
ध्रांगध्रा - ८
ध्रांगध्रा - ९
ध्रांगध्रा - १०
ध्रांगध्रा - ११
ध्रांगध्रा - १२
ध्रांगध्रा - १३
ध्रांगध्रा- १४
ध्रांगध्रा - १५
ध्रांगध्रा - १६
ध्रांगध्रा - १७
ध्रांगध्रा - १८
ध्रांगध्रा - १९
ध्रांगध्रा - २०
ध्रांगध्रा - २१ (अंतिम!) २
------------------------------
१ ध्रांगध्रा गावाचा या ष्टोरीशी संबंध शोधून दाखविणाऱ्यास विजुभाऊ इनाम देण्यात येतील.
२ 'अंतिम' हा शब्द मुळाबरहुकूम न ठेवता, त्याचे शुद्धलेखन मी स्वत: सुधारले आहे. तसेच, त्यापुढील उद्गारचिन्हसुद्धा मीच घातले आहे. 'हुश्श! सुटलो (एकदाचा)!!!!!!' अशा अर्थी.
तरीही .. केवळ चेष्टेने चालू
तरीही .. केवळ चेष्टेने चालू आहे. बाकी तुमचे लिखाण जे बेहद्द आवडते तिथे तसे लिहिले होते, जे कुठेतरी अतर्क्य वाटले तिथेही तसे लिहिले. त्यामुळे आवडले असे म्हणतो तेव्हा ते जेन्युईन असते, हा फायदा.. बाकी नबांकडे दुर्लक्ष करा. जुने जाणते तुम्ही. तुम्हाला आम्ही काय सांगावे..
एअर फ्रायर
एअर फ्रायरचा उपयोग मिनी ओवन म्हणून केला तर तो अत्युपयोगी आहे. फ्रोजन सामोसे, व्हेजी किंवा मीटबॉल्स, स्प्रिंग रोल्स वगैरे फ्रोजन पदार्थ खाण्यायोग्य करण्यासाठी तळण्यापेक्षा एअर फ्रायर वापरला तर पसारा कमी होतो, शिवाय तेलाचा वापरही टळतो. फिंगर चिप्स (फ्राईज) वगैरेही चांगले होतात. आता तुम्ही भजी तळायला फ्रायर वापरला तर काय सांगू...
अत्यंत सहमत. एअर फ्रायरच्या
अत्यंत सहमत. एअर फ्रायरच्या अनेक जेनुईन उपयुक्त यूज केसेस आहेत.
टिक्की, potato wedges, वांग्याचे काप, सुरमई फ्राय तुकडी वगैरे उत्तम बनतात. मुख्य उपयोग बेक करण्यासाठी. केक बिस्किटे उत्तम बनतात. गार्लिक ब्रेड टोस्ट वगैरेसुद्धा खूप छान.
त्यात डीप फ्राईड गोष्टी, बटाटेवडे किंवा मूगडाळ खिचडी बनवायला गेल्यास चालणार नाही हे खरेच.
तळटीप:
एअर फ्रायर जे काही करू शकतो ते सर्व बहुधा बेकिंग वाला ओव्हन (त्याला convection, conduction जे काही म्हणत असतील ते) करू शकतोच. तेव्हा तसा ओव्हन आपल्या घरी असल्यास एअर फ्रायर घेण्याची आवश्यकता नसावी. चुभुदेघे.
…
कोपऱ्यावरच्या वाण्याकडं जायला कार नेता येईल पण बाईकवर टांग मारुन जाणं सोयीचं आहे.
हे स्थलनिरपेक्ष नि त्रिकालाबाधित सत्य नव्हे. (एकच कौंटरआर्ग्युमेंट: अमेरिका!)
अमेरिकेत, कोपऱ्यावरच्या (पक्षी: एका मैलावरच्या) ग्रोसरी स्टोअरमधून सामान आणण्याकरिता सायकलवर टांग टाकणे (किंवा, प्रसंगी, चालतसुद्धा जाणे), ही गोष्ट अशक्यकोटीतील निश्चितच नाही. (मी स्वत: हे अनेकदा केलेले आहे.)
मात्र, त्याचबरोबर, ही गोष्ट तितकीशी सोयिस्कर आणि/किंवा सुरक्षित आहे, असेही नाही.
जावे त्यांच्या देशा, तेव्हा कळे.
प्रतिवाद
(बॉस, मला घरगुती मार्टिनी जास्त झालेली असताना माझ्याशी पंगे घेत जाऊ नका. आधीच सांगून ठेवतोय.)
तर मग काय म्हणताय, एअर फ्रायर हा ओव्हररेटेड मिनी ओव्हन आहे, म्हणून? असेल; माझे काहीही म्हणणे नाही.
परंतु, एकदा त्याला एअर ‘फ्रायर’ म्हणून मार्केट केल्यावर, त्यात जर लोकांनी भजी नाहीतर बटाटेवडे (बिनतेलाचे) ‘तळून’ (पक्षी: गरम हवेवर भाजून) बघितले, नि मग ते जिवानिशी गेलेले (भिजक्या पिठातले) कांदेबटाटे ‘वातडब्येक्कार लागतात’, म्हणून जर का बोंब ठोकली, तर त्यात दोष लोकांचा कसा? एअर ‘फ्रायर’ म्हणून मार्केट करून लोकांच्या अपेक्षा कोणी वाढवून ठेवल्या?
आणि, एअर फ्रायरचा उपयोग (एकदा विकत घेतलेलाच आहे, म्हटल्यावर – संक कॉस्ट थियरी?) फ्रोझन सामोसे वगैरे गरम करण्याकरिता मिनी ओव्हनसारखा करणे, हे म्हणजे, ऑफ-लेबल यूसेज झाले. बोले तो, ते वायाग्रा नाही का, पुल्लिंगोद्दीपनाव्यतिरिक्त, इतरही अनेक, पूर्णपणे असंबद्ध गोष्टींकरिता उपाययोजना म्हणून वापरता येते (नि क्वचित्प्रसंगी वापरले जातेसुद्धा), तद्वत.
आणि, आता, ओव्हनचा ज़िक्र झालेलाच आहे, म्हटल्यावर, मिनी ओव्हनचे जाऊ द्या, परंतु, घरातल्या त्या मोठ्या (शेगडीखालच्या) ओव्हनच्या संदर्भात: अनेक फ्रेश-ऑफ-द-बोट (किंवा -एअरप्लेन) देशी लोक हे त्या ओव्हनच्या खालच्या भागात जो ब्रॉयलर सेक्शन असतो, त्याचा (किंवा, क्वचित्प्रसंगी, त्या आख्ख्या ओव्हनचासुद्धा) उपयोग हा घरातील अतिरिक्त भांडीकुंडी साठविण्याकरिता स्टोअरेज स्पेस म्हणून करितात. परंतु, म्हणून काय तो त्या ओव्हनच्या ब्रॉयलर सेक्शनचा (किंवा, त्या ओव्हनचासुद्धा) अधिकृत/अपेक्षित उपयोग झाला काय? आँ?
असो चालायचेच.
विशेष काही नाही…
फार काही कठीण आणि/किंवा सॉफिस्टिकेटेड नाही.
मूलभूत रेसिपी इथे दिलेली आहे, तीत स्वतःच्या मतीने किंचित फेरफार करतो, इतकेच. बोले तो, त्या रेसिपीत १-१/२ भाग व्होडका नि १/४ भाग ड्राय व्हरमूथ म्हटले आहे, त्यातील १-१/२ भाग व्होडकाऐवजी, १च भाग व्होडका नि १/२ भाग पांढरी बकार्डी रम वापरतो. व्होडका, रम, व्हरमूथ, अधिक बर्फ एका शेकरात घालून, त्यात अंगोस्टुरा बिटर्सचा एक शिडकावा, लिंबाच्या रसाचा एक शिडकावा, तथा ग्रेनाडीन सिरपचा सढळहस्ते शिडकावा, इतके सगळे मिसळून, शेकर बंद करून गचागचा हलवतो नि मिश्रण ग्लासात ओततो, नि मग प्लास्टिकच्या काडीला हिरवी ऑलिव्हे टोचून ती ग्लासात सोडून देतो. बस, आहे काय नि नाही काय? अशा मार्टिनीच्या दोन ते तीन मात्रा पुष्कळ होतात.
असो चालायचेच.
…
ते अंगोस्टुरा सोडून बाकी जमवाजमव शक्य वाटते.
त्याने फारसे काही बिघडू नये. अंगोस्टुराने एक किंचित मसालेदार (काहीशी दालचिनीसारखी?) झाक येते, परंतु, नसल्यास वांदा नाही. (तसेही, हाताशी-आहे-म्हणून-घालून-पाहिले तत्त्वावरच घातले आहे. मूळ रेसिपीत त्याचा समावेश नाही.)
काय हो ही भाषा..!!
आता, आहेच आमची भाषा अशी (चित्रदर्शी!), त्याला कोण काय करणार? चालायचेच! (हं, आमच्या चित्रदर्शी भाषेतून कोणाच्या डोळ्यांसमोर काही भलतीच चित्रे जर का उभी राहिली, तर त्याला मात्र आम्ही जबाबदार नाही.)
…
प्लास्टिकची काडी? अरेरे!
सांगितले ना, आमची भाषा अशीच (आणि चित्रदर्शी!) आहे, म्हणून?
(हं, तसे म्हणायला, शेकरसेटबरोबर आलेल्या स्टेनलेस स्टीलच्या काड्यासुद्धा आहेत माझ्याजवळ, त्या काढून वापरून पाहायला पाहिजेत एकदा. त्यांचे उद्घाटन झालेले नाहीये अद्याप.)
ओलिव्हांचं काय करता? एयर फ्रायरमधून तळून घेता का ओव्हनमध्ये बेक करून?
आमच्यात ‘तसले’ काही (बोले तो, ऑलिव्हांची उत्तरक्रिया वगैरे) करीत नाहीत! आम्ही ती ऑलिव्हांची धुडे (!) तशीच मार्टिनीत गाडतो.
सबब, ‘त्या’बद्दलच जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल, तर तुम्ही अतिशहाणासाहेबांनाच का विचारीत नाही? कोणास ठाऊक, त्यांच्यात अशी काही (पक्षी: ऑलिव्हे एअर फ्रायरमध्ये तळण्याची आणि/किंवा ओव्हनमध्ये भाजण्याची) पद्धत असेलसुद्धा कदाचित! विचारून पाहा. फार फार तर नाही म्हणतील, याहून अधिक वाईट ते काय होईल? मात्र, दुर्दैवाने, या बाबतीत आपल्याला (‘आपली’ नव्हे!) काही मदत करण्यास निदान मी तरी असमर्थ आहे; सबब, क्षमस्व!
मसालेदार मार्टिनी
त्याने फारसे काही बिघडू नये. अंगोस्टुराने एक किंचित मसालेदार (काहीशी दालचिनीसारखी?) झाक येते, परंतु, नसल्यास वांदा नाही. (तसेही, हाताशी-आहे-म्हणून-घालून-पाहिले तत्त्वावरच घातले आहे. मूळ रेसिपीत त्याचा समावेश नाही.)
अरेरे! नबा, तुम्ही अशा मसालेदार मार्टिन्या पीत असाल असं वाटलं नव्हतं.
इथे भारतात (म्हणजे पुण्यात) हल्ली तिखट मीठ लावलेला पेरू फार फॅशनीत आहे. मी आणि एक मित्र कोरेगाव पार्कमधील एका अपस्केल रेस्त्रांत गेलो होतो.तिथे त्याला स्पायसी ग्वावा मार्टिनी घेण्याची बुध्दी झाली. तर येणारं पेय म्हणजे ट्रॉपीकानाचा गुलाबी पेरू ज्यूस, व्होडका आणि तिखट-मीठ असं तद्दन ममव पोशन होतं. मग लगेच, शाळेच्या दारातले पेरू - ते कसे तेव्हा दोन रुपयाला मिळायचे वगैरे सेंटीयापा झाला.
तुमची मार्टिनी तिखट मीठ लावलेल्या डाळिंबासारखी लागते का?
???
तर येणारं पेय म्हणजे ट्रॉपीकानाचा गुलाबी पेरू ज्यूस, व्होडका आणि तिखट-मीठ असं तद्दन ममव पोशन होतं.
खरे तर यातला पेरू हा कोलंबीयदेवाणघेवाणोद्भव (म्हणजे विदेशी – त्यात पुन्हा ट्रॉपिकाना ब्राण्ड बोले तोसुद्धा विदेशीच!), व्होडका विदेशी, तिखटसुद्धा कोलंबीयदेवाणघेवाणोद्भव, म्हटल्यावर, यातले फक्त मीठच काय ते फार फार तर दांडीयात्रोद्भव म्हणजे निखालस स्वदेशी असू शकेल. मग अशा परिस्थितीत, प्रस्तुत पेयास ममव म्हणून का बरे हिणविता? भले ममवंनी या कॉंबिनेशनास (तेवढी व्होडका वगळल्यास) अंगीकारले असले, म्हणून काय झाले?
(उद्या म्हणाल, लोणावळ्याची चिक्की खाणारा तेवढा ममव. मग आमच्या जॉर्जियातले पीनट ब्रिट्ल खाणारा काय, झग्यातून पडलेला? एफवायआय, मिठाच्या पाण्यात उकडलेल्या शेंगा हे ममव लोक जितक्या आवडीने खातात, तितक्याच आवडीने आमच्या जॉर्जियाच्या ग्रामीण भागातले लोकसुद्धा खातात. (आणि, मुख्य इंटरस्टेट सोडून ग्रामीण रस्त्यांनी गेलात, तर रस्त्याच्या कडेला टेबले मांडून विकतानासुद्धा दिसतात. बोले तो, आमच्या इकडचाच प्रकार आहे हा. ममवंनी उचलला, म्हणून काय झाले?) हं, आता, आमच्या ग्रामीण जॉर्जियातले लोक हे ममवंइतकेच घाटी असतात (किंवा व्हाइसे व्हर्सा), असा जर तुमचा मुद्दा असेल, तर गोष्ट वेगळी. अन्यथा, एखादी गोष्ट ही केवळ ममवोच्छिष्ट झाली, म्हणून डाउनमार्केट समजण्याचे काही कारण निदान मला तरी दृग्गोचर होत नाही.)
बाकी, सेंटियापा हा शब्दप्रयोग आवडला.
(अतिअवांतर: परवा एकदा आमच्या गावानजीकच्या ग्रोवर्स औटलेटात स्वस्तात मिळाले, म्हणून पेरूचे रोपटे आणून बॅकयार्डात लावले आहे. पाहू या या मोसमात काही फळे येतात का, ते. वस्तुतः, खालती फ्लोरिडात वगैरे ठीक आहे, परंतु आमच्या जॉर्जियाचा झोन पेरूच्या झाडाकरिता साजेसा नाही. बोले तो, उन्हाळ्यात ठीक आहे, परंतु आमच्या इथला हिवाळा (उत्तरेच्या तुलनेने सौम्य असला, तरीसुद्धा) ते सहन करू शकेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे, पुढच्या मोसमाला ते जिवंत राहण्याची अपेक्षा (तसाच काही चमत्कार झाल्याखेरीज) मी करीत नाही. याच मोसमात काही झाले तर झाले; बघू या. प्रायोगिक तत्त्वावरच लावलेले आहे. असो.)
तुमची मार्टिनी तिखट मीठ लावलेल्या डाळिंबासारखी लागते का?
जिच्यात तिखट आणि मीठ दोन्ही नाही, अशी मार्टिनी ही तिखटमीठ लावलेल्या डाळिंबासारखी कशी बरे लागेल? काहीतरीच तुमचे! हं, किंचित दालचिनीची पूड लावलेल्या डाळिंबासारखी म्हणू शकालही कदाचित. (बोले तो, तुमच्यात डाळिंबाला दालचिनीची पूड लावून खाण्याची पद्धत असल्यास. आमच्यात तशी पद्धत नसल्याकारणाने, दालचिनीची पूड लावलेले डाळिंब कसे लागू शकत असेल, याची मी केवळ वाइल्ड कल्पना करू शकतो, परंतु, त्याचे प्रत्यक्ष प्रमाण मजजवळ नाही. त्यामुळे, दालचिनीची पूड लावलेल्या डाळिंबाशी प्रत्यक्ष तुलना करण्यास मी असमर्थ आहे. तुम्हाला ते शक्य असल्यास तुम्ही अवश्य करा; माझे काहीही म्हणणे नाही.)
परंतु, या निमित्ताने एक चांगली कल्पना सुचली. पुढच्या वेळेस मिश्रणात हालापेन्यो चुरडून घालेन म्हणतो. किंवा, गेला बाजार, माझ्या फ्रिजमध्ये पडून असलेली थाई लवंगी मिरची तरी. आणि, ग्लासास मार्गारिटा सॉल्ट लावले, की झाली तिखटमिठाच्या डाळिंबाची मार्टिनी – आहे काय, नि नाही काय!
(तशी पुढेमागे माझ्या बॅकयार्डात वाढत असलेली भूत जोलोकियासुद्धा घालून बघता येईल, परंतु तिला यायला अजून वेळ आहे. चालायचेच.)
डाळिंब?
तुम्ही घरी पेरू लावला आहेत ते ठीक आहे. ह्या हिवाळ्यात तो जगला तर उत्तमच. नाहीच तर डाळिंब लावून पाहा. ते जगण्याची शक्यता जास्त आहे.
घरी डाळिंब वा पेरूचं झाड लावणं ममव असेल नाही तर ग्रामीण टेक्सासी वा ग्रामीण जॉर्जियन असेल; मी डाळिंब लावलंय एक. त्याला अजून फुलं आणि फळं धरलेली नाहीत.
डाळिंब!!!
डाळिंब दोनतीन वर्षांपूर्वी लावले होते. मागच्या वर्षीपर्यंत त्याला नियमितपणे पाने व (लाल रंगाची) फुले येत होती, परंतु फळे कधी धरली नाहीत. या वर्षी तर अद्याप पानेसुद्धा धरण्याचे नाव नाही. (मेले की काय, कोण जाणे! तरी अजून भोळी आशा म्हणून उपटून काढून टाकलेले नाही.)
फळझाडांच्या बाबतीत आजवर तरी आमचे नशीब फक्त ब्लॅकबेरी, रास्पबेरी, (काही अंशी) ब्लूबेरी, आणि अंजीर, यांच्याच बाबतीत बलवत्तर साबीत झालेले आहे. नाही म्हणायला, दोन वर्षांपूर्वी लावलेल्या द्राक्षांच्या दोन झाडांना या वर्षी (सर्वप्रथम) भरघोस द्राक्षे येतील, अशी लक्षणे किमान आत्ता तरी दिसत आहेत. (गेल्या वर्षी दोन्हीं झाडांत मिळून मोजून बारा द्राक्षे आली होती!) बघू या काय होते ते. (गेल्या वर्षी लावलेल्या दोन्हीं चेऱ्या मात्र यंदा मृतवत आहेत. का कोण जाणे. त्यांनाही अद्याप उपटलेले नाही.)
असो चालायचेच.
कोलंबीयदेवाणघेवाणोद्भव
OMG! या शब्दामुळे मला मी पहिलीत असताना घडलेला एक किस्सा आठवला. आमच्या शाळेत भोंडला होता. त्यासाठी सगळ्यांना खिरापत आणायला सांगितली होती. बाईंनी बहुतेक कोलंबी पेरू आणा असं काही सांगितलं असावं. ते घरी येऊन मी माझ्या बाबांना सांगितलं. तर ते म्हणाले कोलंबी पेरू म्हणजे काय? एकतर कोलंबी आणायला सांगितली असेल नाहीतर पेरू! आई अजून ऑफिसातून आली नव्हती आणि आमच्या शेजारी राहणाऱ्या चित्र्यांना कोलंबी आणि पेरू या दोन्ही पदार्थांची माहिती असेल म्हणून आम्ही त्यांना विचारलं. तर ते म्हणाले जो आतून गुलाबी असतो तो पेरू!
तेव्हा आम्ही शुक्रवार पेठेत राहायचो. मग आम्ही स्कूटरवरून टिळक रोड ते बाजीराव रोड असा प्रवास केला तरी सगळीकडे पांढरेच पेरू दिसले. मग बाबा म्हणाले की काय फरक पडतो. पांढरा काय गुलाबी काय पेरू तो पेरूच (त्यांना कंटाळा आला होता). त्याकाळी शाळा व्हॉट्सॲप ग्रूप नावाची भीषण गोष्ट नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी एकटीच पांढरा पेरू नेणारी असणार असा माझा समज झाला. त्यामुळे मला नीट झोप लागली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी शाळेत माझ्यासारखी अनेक पांढऱ्या पेरवांची मुलंमुली होती.
पण भोंडल्याच्या खिरापतीला शाळेतून कोलंबी आणायला सांगू शकतील असं माझ्या बाबांना वाटलं त्यावरून ते किती उदारमतवादी आणि निरागस होते याचा अभिमान वाटतो मला.
इश्श!
आम्ही प्राथमिक शाळेत असताना आमच्या शाळेतल्या बायांना (‘बाई’ या आदरार्थी बहुवचनाचे संख्यार्थी बहुवचन – तसेही, प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यमाची असल्याकारणाने, यांना ‘बाई’ म्हणून न संबोधता ‘टीचर’ म्हणून संबोधावे, असा दंडक होता. परंतु ते एक असो.) डोहाळी नाही लागायची काही; त्यांची सपासप एकापाठोपाठ एक ‘ऑपरेशने’ व्हायची. (ही ‘ऑपरेशने’ पोटाची, असे आम्हांस कर्णोपकर्णी माध्यमांतून सांगण्यात येत असे, नि आम्ही त्यावर विश्वासही ठेवत असू. आता मोठे झाल्यावर वेगळीच शंका येते. मात्र, इतक्या सगळ्या बायांची पोटे ऑपरेशने करायला लागण्याइतपत नादुरुस्त अगदी एकसमयावच्छेदेकरून नाही, तरी जवळजवळ एकापाठोपाठ एक कशी काय होऊ शकतात, ही शंका आमच्या (तत्कालीन) बालमनास कधीही शिवली नाही. तर तेही एक असो.) आणि ती ऑपरेशने झाली रे झाली, की त्या दीडदोन महिने गायब व्हायच्या. नि मग त्यांच्या जागी छानछान सब्स्टिट्यूट टीचर यायच्या.
असो चालायचेच.
.
- कधी एअर फ्रायर नावाचा प्रकार विकत घेतला नाहीत काय? आमच्या घरी जागा व्यापून राहणाऱ्या मढ्यांत त्याचीही एक भर आहे. (मात्र, फेकून देण्याचे जिवावर येते. संक कॉस्ट फॅलसी!)
(जेमतेम एकदा, कांद्याची भजी (‘कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?’ – पु.ल.) करण्यासाठी प्रयोग करून झाल्यावर, निर्माण होणारा पदार्थ माणसाने खाण्याच्या लायकीचा नसतो, याची प्रचीती आल्यानंतर आजतागायत पुन्हा त्याचा वापर झालेला नाही. त्याच्या इतर अटॅचमेंट्स (रोटिसेरी वगैरे) तर आता दोनतीन वर्षे होऊन गेली तरीही अद्याप खोक्यातून बाहेर आलेल्या नाहीत. (चालायचेच.)
- क्यूरिगचे कॉफी मशीन. आ. घ. जा. व्या. रा. मढ्यांत त्या. ए. भ. आ. (मा., फे. दे. जिवावर येते. सं. कॉ. फॅ.!)
‘नावीन्याची हौस’ या सदरात विकत घेतल्यानंतर, सुरुवातीला काही दिवस हौशीने वापरून झाले. नंतर, त्या महागड्या के-कप्सवर कोण खर्च करतो, म्हणून अगोदर अनब्रांडेड के-कप्स, मग प्लास्टिकच्या के-कपसदृश फिल्टरमध्ये साधी कॉफीची पूड भरून काही दिवस वापरून झाल्यावर, आता अडगळीत धूळ खात पडून आहे. (पुढे बऱ्याच वर्षांनंतर पारंपरिक मद्राशी कॉफी फिल्टरचा शोध लागला. आणि, त्रिभुवनात त्यासारखे दुसरे काही नाही, असे लक्षात आले. तूर्तास मद्राशी कॉफी फिल्टरचा उपयोग मात्र धार्मिकपणे, नित्यनेमाने होतो.)
वरील गोष्टी या ‘बायकोची (तात्कालिक) हौस’ या सदरात जमा होतात. मात्र:
- एस्प्रेसो मशीन (१९९६ व्हिन्टाज). (आणि, त्यासोबत, एस्प्रेसो तथा कापुचिनो पिण्याच्या संकीर्ण फॅन्सी कपबशासुद्धा!) आ. घ. जा. व्या. रा. मढ्यांत त्यां. ए. भ. आ. (मा., फे. दे. जिवावर येते.
सं. कॉ. फॅ.!)या माझ्या बॅचलरहुडापासून पूर्वापार घरात असलेल्या चीजवस्तू आहेत. माझ्या तत्कालीन अनेक बदल्यांतून (धर्मराजाच्या कुत्र्याप्रमाणे) माझ्या मागोमाग (खोक्यातून) आलेल्या आहेत. यांच्या बाबतीत ‘संक कॉस्ट फॅलसी’ मात्र म्हणता येणार नाही, कारण, त्यांची किंमत एके काळी (माझ्या बॅचलरहुडात!) पुरेपूर वसूल करून झालेली आहे. (मात्र, या वस्तूंचा वापर किमानपक्षी गेल्या दशकात तरी झालेला नाही. तेवढीच एस्प्रेसो/कापुचिनो/लाटे वगैरे पिण्याची उबळ आली, तर आम्ही सरळ स्टारबक्सात जातो. काखेत कळसा!)
(अवांतर: याला ‘काखेत कळसा’ म्हणणे मात्र सं.कॉ.फॅ.चा आविष्कार ठरेल, नाही काय?)
या चीजवस्तू आम्ही घरात आजतागायत नक्की काय म्हणून बाळगून आहोत, हे एक त्या (असलाच, तर) जगन्नियंत्यालाच ठाऊक! (किमानपक्षी, आम्हाला तरी ठाऊक नाही. नॉस्टाल्जिया? तसेही म्हणवत नाही. निदान, माझ्या बायकोला तरी त्यांबद्दल नॉस्टाल्जिया असण्याचे काहीच कारण नाही. (असलाच, तर सवतीमत्सर असू शकतो. परंतु, तोही असण्याचे खरे तर काहीच कारण नाही. कारण, मला स्वतःलाही या वस्तूंचा खरे तर नॉस्टाल्जिया नाही. असो.))
- अरे हो! ज्यूसरसुद्धा (ही माझी लग्ना(च्या बऱ्याच )नंतरची, परंतु माझी एकट्याची (तात्कालिक) हौस! किंवा, फॅड खरे तर.) साधारणतः महिनाभर वगैरे वापरून त्यानंतर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेला आहे. (मात्र, त्यातून निघणाऱ्या चोथ्याचा मी कल्पक वापर वगैरे कधीही केला नाही. सरळ कचऱ्यात फेकून देत असे. किंवा, अनेकदा, बुरशी येईपर्यंत तसाच राहू देऊन मगच कचऱ्यात फेकत असे.)
- फूडप्रोसेसरची अटॅचमेंट मिक्सरबरोबर आली होती (रादर, मिक्सर घेताना त्याबरोबर घेतली होती) ती कपाटात कोठेतरी जागा व्यापत पडून आहे. मिक्सरचा पुरेपूर वापर होतो; फूडप्रोसेसर अटॅचमेंटचा एकदाही नाही.
- इलेक्ट्रिक वॅफलमेकर. आत्यंतिक निरुपयोगी वस्तू! मात्र, एकदा आमच्या चिरंजीवांनी (त्यावेळी लहान होता तो. समज कमी होती.) वापरून झाल्यावर (वय त्यावेळी लहान असले, तरी असल्या वस्तू हाताळण्याची हौस दांडगी!) तो ‘धुवायला’ म्हणून पाण्यात घातला, म्हटल्यावर, जो फेकून दिला, तो पुन्हा आजतागायत विकत घेतलेला नाही.
—————
बाकी,
- सँडविचमेकरबद्दल काहीसा असहमत आहे. (बादवे, ही चीज मला लग्नात आहेर म्हणून मिळाली नव्हती. लग्नानंतर आम्ही स्वखर्चाने विकत घेतली. आणि, ती मोडल्यावर अनेक वर्षांनी पुन्हा दुसरी विकत घेतली.) म्हणजे, हीदेखील चीजवस्तू आमच्या घरात पडून असली, आणि आजकाल तिचा फारसा वापर होत नसला, तरीही, कधीकाळी तिचा भरपूर वापर करून झालेला आहे, आणि अजूनही वेळप्रसंगी (दशकातून चारपाचदा, वगैरे) उपयोग होत नाहीच, असे नाही. (आणि, हो! आमच्या घरात कधी झुरळे झाली नाहीतच, असे नाही, परंतु, आमच्या सँडविचमेकरात मात्र आजतागायत झुरळे सापडलेली नाहीत.)
तुमचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही फक्त त्यात शिळी बटाट्याची भाजी अधिक प्रोसेस्ड चीजचा स्लाइस एवढेच घालून बघितलेत. परंतु, त्यातसुद्धा वैविध्य आणता येते!
१. कधी पावाच्या दोन स्लाइसमध्ये मुगाची उसळ टाकून बघितलीत काय?
२. किंवा, पावाच्या एका स्लाइसवर अगोदर सनीसाइडअप (मराठीत: ‘हाफफ्राय’.), त्यावर बटरचा तुकडा, त्यावर श्रेडेड मेक्सिकन चीज़ मिक्स, त्यावर केचप, त्यावर दुसरा स्लाइस, एवढे सगळे त्या सँडविचमेकरमध्ये कोंबून बघितलेत काय?
(जातिपरत्वे, आमची धाव इतपतच. चालायचेच.)
- कॉफीचा फ्रेंच प्रेस घरात पडलेला आहे. अगदीच निरुपयोगी नाही; मात्र, वापर क्वचितच होतो. (वर्षाकाठी दोनतीनदा, वगैरे.)
—————
सरतेशेवटी, प्रियकर असो, वा लग्नाचा नवरा, लग्नानंतर तो बावळटच ठरतो, एवढेच निरीक्षण नोंदवून नम्रपणे खाली बसतो. बाकी तुमचे चालू द्या.