Skip to main content

‘रूळ’लेली वाट - एका पाॅडकास्टचा प्रवास

माझा पहिला लोकल प्रवास काही मला आठवत नाही अर्थात. पण तो बोरिवली ते माहीम असा असणार, यात मला शंका वाटत नाही. माहीमला बेडेकर सदनमध्ये राहणारी माईमावशी (गोखले) आणि तिच्या शेजारी राहणारा सुहासकाका (बापट) अशी आमची नेहमी जाण्याची दोन घरं होती. या घरांमध्ये राहतानाच माझे वडील आणि आई एकमेकांना भेटले होते. आई कोकणातून मुंबईला आलेली, मोठ्या बहिणीकडे राहात होती आणि बाबा वाईहून आलेले, सुहास बापट या बालपणीच्या मित्राकडे राहात होते. यथावकाश त्यांचं लग्न झालं आणि त्यांनी बोरिवलीला घर घेतलं. पण माहीमची ही दोन घरं आमच्यासाठी कायमच स्पेशल होती, अजूनही आहेत. त्यामुळे अनेक शनिवार रविवार तिथे जाणं होतच असे.

बाबा (तेव्हाच्या) टपाल आणि तार खात्यात, आणि आई महापालिकेत. मी आणि माझा धाकटा भाऊ. असं आमचं मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब. त्यामुळे प्रवास लोकलनेच होई, टॅक्सी वा रिक्षा अगदीच क्वचित. रिक्षा तर मी अगदी लहान असताना नव्हत्याच. टांगे होते थोडे बोरिवलीत. आई नोकरीच्या सुरुवातीची अनेक वर्षं बोरिवलीतच होती, पण बाबा सीएसएमटी (तेव्हाचं व्हीटी) स्थानकाला लागून असलेल्या जनरल पोस्ट आॅफिसात, जीपीओत, होते, त्यामुळे बोरिवली ते चर्चगेट लोकलने आणि पुढे चालत हा त्यांचा रोजचा प्रवास. सकाळी ८.१० किंवा ८.१५ला ते निघत. त्यांची ८.३० किंवा अशीच एक लोकल ठरलेली होती. ठरलेली गाडी, ठरलेला डबा. त्यांना कशामुळे ते माहीत नाही, (कारण वाई या त्यांच्या मूळ गावी अजूनही रेल्वे पोचलेली नाही,) पण रेल्वेचं प्रचंड वेड होतं, ते त्यांचं आनंदनिधान होतं. रोज संध्याकाळी ठरावीक वेळी घरी आल्यानंतर लोकल किती वाजता आली, किती वाजता पोचली, कोणती लोकल आली, वगैरेच्या गप्पा होतच असत.


Railway cleaning woman
माहीम रेल्वे स्थानकातील रूळमार्गावर प्रवाशांनी टाकलेला कचरा उचलणारी कर्मचारी. या कचऱ्यातला सगळ्यात धोकादायक पदार्थ म्हणजे प्लास्टिक, ज्यामुळे मार्गावर पाणी साचून राहातं.

मी आठवीनववीत असताना आईची बदली झाली ती थेट दक्षिण मुंबईत बोरा बाझार भागात, त्यामुळे तीही बोरिवली-चर्चगेट प्रवासात अडकली. ती काही लोकलच्या गप्पा वगैरे मारत नसे, कदाचित दमून आल्यानंतर स्वयंपाक, आमचा अभ्यास, आलंगेलं यात तिला तशी उसंतही मिळत नसावी. पण मला मात्र बाबांच्या गप्पा, घरी असलेली वेस्टर्न आणि सेंट्रलची टाइमटेबल्स, एक मोठं लांब पल्ल्याच्या गाड्यांचं टाइमटेबल या सगळ्याविषयी अतिशय कुतूहल होतं. उगीचच एखादं टाइमटेबल उघडून ते वाचायलाही आवडायचं मला. लांब पल्ल्याचं टाइमटेबल खरं तर शोभेचं होतं आमच्या घरात. ट्रेनने जाऊन जाऊन जाणार कुठे, तर मनमाडला मोठ्या काकांकडे. हे काका रेल्वे मेल सर्विसमध्ये होते, त्यामुळे ट्रेन हे त्यांचं दुसरं घरच होतं जणू. एक काका वाईला, तिथे जायचं तर एसटीनेच. दुसरं प्रवासाचं ठिकाण आजोळ, कोकणात रत्नागिरीला. तिथे ट्रेन १९९७मध्ये जाऊ लागली. पण ते टाइमटेबल होतं खरं घरात.

मी दहावी झाल्यानंतर रूपारेल काॅलेजमध्ये प्रवेश घेतला त्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षापासून मीही रोज लोकलने प्रवास करू लागले. ठरलेल्या लोकल, गर्दी, लोकलमध्ये विकत घेतलेले कानातले, मैत्रिणींचे ग्रूप असं पाच वर्षं मी अगदी आनंदाने जगले. मग नोकरीला लागले. आॅफिस होतं कुलाब्यात. बोरिवली ते चर्चगेट प्रवास सुरू झाला. पत्रकार असल्याने जाण्यायेण्याच्या वेळा निश्चित नसायच्या, त्यामुळे ठरावीक लोकल आणि लोकलमधला ग्रूप बंद पडला. पण प्रवास सुरूच राहिला. नंतर घाटकोपर व्हीटी, मुलुंड व्हीटी, आणि नंतर मुलुंड माहीम व्हायला दादर, असा प्रवास कोविडपूर्व काळापर्यंत सुरू राहिला. दै. दिव्य मराठीत असताना औरंगाबाद, जळगाव, अकोला, अमरावती, सोलापूर असा ट्रेनचा प्रवास अनेक वेळा केला. बहुतेक वेळा एकटीने.


Pandharpur Railway Station
पंढरपूर रेल्वे स्थानक, कोविडकाळ असल्याने चक्क रिकामं.

अजूनही नोकरीच्या वा कामाच्या वा भटकण्याच्या निमित्ताने हा प्रवास सुरूच आहे. गेल्या वर्षी उद्यान एक्स्प्रेसचा डकावडकाव २४ तासांचा प्रवास केला तो फार कंटाळवाणा झाला होता. आता महाराष्ट्रात आणि भारतातही अनेक ठिकाणी ट्रेनने जाणं होतं. क्वचित विमानानेही, परंतु ते कमीच. पत्रकार असल्याने आजूबाजूचं टिपून घेण्याच्या सवयीमुळे म्हणा की बडबड्या स्वभावामुळे, लोकलच्या प्रवासात कान आणि डोळे सतत उघडे असतात, तर लांबच्या प्रवासात तोंडही, गप्पा मारण्यासाठी. यातूनच अनेक किस्से घडले, ऐकले, टिपून ठेवले. अनेक माणसं भेटली, जी अनेक वर्षांनंतरही विस्मरणात गेली नाहीत.

गेल्या अनेक वर्षांत फेसबुकवर असं काही छोटं मोठं टिपून ठेवत आले. कधी तो किस्सा असे, कधी तक्रार. पण ते वाचलं जायचं, मुंबईबाहेरच्या वाचकांनाही आवडायचं. महेश विजापूरकर हे माझे ज्येष्ठ पत्रकार मित्र. त्यांनी सतत धोशा लावला, “मृण्मयी, रेल्वेवरचं पुस्तक कर”, असा. मेधा कुलकर्णी, मुग्धा कर्णिक या ज्येष्ठ मैत्रिणींनी महेशच्या या कमेंटला कायम दुजोराच दिला. त्यातल्याच पोस्ट एकत्र करून तयार झाल्या या लोकलकथा. लांबच्या प्रवासात भेटलेली आणि नाती जुळलेली माणसं, एकटीने प्रवास करताना आलेले अनुभव, लोकलच्या प्रवासातल्या मैत्रिणी, मुंबईतल्या पावसात लाेकलमध्ये अडकल्याचे अनुभव, असं बरंच काही या कथांमध्ये सांगितलेलं आहे.


Sion Railway Station in Rain
शीव रेल्वे स्थानक परिसरात साचलेल्या पाण्यात अडकलेली एक लोकल. मी याच लोकलमधनं उतरले, आॅफिसला जाताजाता, आणि रस्ता गाठून रिक्षाने घरी आले.

या लोकलकथांचं ईबुक करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षी केला होता, परंतु ते काही कारणाने राहून गेलं. मग मी पाॅडकास्ट करायचं ठरवलं, आणि सहासात भाग साउंडक्लाउडवर टाकलेही. त्यातला एक तुम्हाला इथे ऐकता येईल. बाकीचेही दिसतीलच.