भेटीत तुष्टता मोठी!

भेटीत तुष्टता मोठी!


Kumar Gandharva Book Cover

माधुरी पुरंदरेंचं बालसाहित्य माझ्या पिढीतल्या, म्हणजे आत्ता पस्तिशी-चाळीशीत असलेल्या पालकांचं लाडकं आहे. आमची मुलं 'राधा' आणि 'यश' यांच्या गोष्टी ऐकत वाचायला शिकली. हाताच्या तळव्यावर मावणाऱ्या त्या छोट्या, चौकोनी पुस्तकांचे मला तीन संच आणावे लागले होते. कारण ती पुस्तकं इतकी वापरली जायची, की काही महिन्यांतच पानं निखळून यायची. एका पानावर एक चित्र आणि एखादीच ओळ असल्यामुळं ती पुस्तकं माझा मुलगा दीड वर्षाचा असल्यापासून ते अगदी पाच वर्षांचा होईपर्यंत वाचत होता. सुरुवातीला चित्र बघून गोष्ट ऐकली, हळूहळू गोष्ट पाठ झाली म्हणून एकटाच 'वाचू' लागला आणि नंतर शाळेत अक्षरओळख झाल्यावर खऱ्या अर्थानं स्वतंत्रपणे वाचू लागला. त्या पुस्तकांतली पात्रं आमच्या रोजच्या आयुष्याचा भाग झाली होती. राधाचे साखरनाना; मोठ्याने गाणी लावून खोलीत ढांचिक-ढांचिक नाचणारा तिचा शिदूकाका; शाळा सुटल्यानंतर थोडा वेळ यशच्या घरी येणारी त्याची मैत्रीण मुक्ता; 'सख्खे शेजारी' आणि 'पाचवी गल्ली' या पुस्तकांतली मल्याळी 'बागुली ताई' – ही सगळी पात्रं लक्षात राहिली. अजूनही कधी कपाट आवरताना पसारा विसरून पुन्हा त्यांची उजळणी होते, याचं एक कारण असं, की या सगळ्या पात्रांमध्ये वेळोवेळी, मला आणि माझ्या मुलाला स्वतःची प्रतिबिंबं दिसली. ज्याला इंग्रजीत 'व्हॅलिडेशन' म्हणतात, त्याचा अनुभव आपल्यासारख्याच भावना असणारी साहित्यातली पात्रं वाचताना मिळतो. त्यामुळे ती अधिक जवळची वाटतात. शाळा सुटल्यावर उत्साहानं मैत्रिणीला घरी घेऊन येणाऱ्या यशला, जेव्हा मैत्रिणीचेच जास्त लाड होऊ लागतात, तेव्हा राग येतो. हा राग तिचा मत्सर वाटल्यानं येतो आहे हे कळण्याइतका यशही मोठा नाही आणि त्याचा वाचकही. पण यशला जसं वाटतंय, अगदी तसंच आपल्यालाही वाटलं आहे, पण ते आपण मान्य करायचं नाहीये – या एका धाग्यानं यश आणि त्याचे छोटे वाचक जोडले जातात. त्याचबरोबर, यशची आई जशी ती परिस्थिती हाताळते, तशीच आपण हाताळायला हवी हा विचार ते पुस्तक वाचून दाखवणाऱ्या आईच्या मनात येत असतो! रोज घडणाऱ्या साध्या, घरगुती अनुभवांतून इतकी रंजक गोष्ट तयार होऊ शकते यावर विश्वास केवळ ती पुस्तकं वाचूनच बसू शकतो. मुलगा मोठा झाला, तसं आम्ही 'आमची शाळा'ची पारायणं करू लागलो. सगळ्यांनाच शाळा आवडते असं नाही. आणि आवडायलाच हवी असंही नाही. शाळा ही हळूहळू सवय होणारी एक वाईट गोष्ट आहे हे माझ्या मुलाच्या मनातलं त्याला त्या पुस्तकात दिसलं. 'लालू बोक्याच्या गोष्टी' वाचून आम्ही घरी मांजर पाळायचा एक अयशस्वी प्रयत्न करून बघितला. रात्री झोपताना कधी परग्रहावरचा 'किकिनाक' सोबतीला असायचा तर कधी बबी नावाची 'अब्दुल-गब्दुल' आणि दानशूर मेंढी असायची.

अलीकडेच, आता आपण माधुरी पुरंदरेंची पुस्तकं एकत्र वाचण्याच्या कालखंडातून बाहेर पडलो आहोत असं वाटायला लागलं तोपर्यंत त्यांचं नवीन पुस्तक हातात पडलं. 'कुमारस्वर, एक गंधर्वकथा' हे कुमार गंधर्वांचं चरित्र माधुरीताईंनी लिहिलं आहे. या वर्षी कुमार गंधर्वांची जन्मशताब्दी आहे. त्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत. हे पुस्तकही त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारं आहे. पुस्तकात कुमारजींच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर बेतलेली चंद्रमोहन कुलकर्णींनी चितारलेली अप्रतिम चित्रं आहेत. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं, की हे चरित्र लहान मुलांसाठी किंवा कुमारवयीन मुलांसाठी लिहिलेलं आहे. पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा माझ्या आठ वर्षांच्या मुलाला हे थोडं जड जाईल का असा प्रश्न मला पडला. तो काही अजून ते स्वतंत्रपणे वाचून समजून घेण्याच्या वयात नाही. तरीही, एक प्रयोग म्हणून मी त्याला पहिली काही पानं वाचून दाखवली. सुरुवातीचे काही दिवस, मी त्याला कुमार गंधर्वांची आठवण करून द्यायचे. पण लवकरच, जेवण झाल्यावर तोच मला पुस्तक वाचण्याची आठवण करू लागला. आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक साधारण एक महिन्यात संपवलं. फक्त बहात्तर पानं असूनही इतका वेळ लागण्याचं कारण असं, की हे काही व्यक्तिकेंद्री असं सरधोपट चरित्र नाही. त्याबरोबर मुलांना सांगण्यासारख्या आणि मुख्य म्हणजे ऐकवण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. शिवाय पुस्तकाचा ओघ एका प्रश्नाकडून दुसऱ्या प्रश्नाकडे जाणारा आहे. त्यामुळे पुस्तकात नसलेल्याही अनेक गोष्टींबद्दल वाचता वाचता चर्चा होते. त्यामुळे हे लहान मुलांचं किंवा मोठ्या माणसांचं पुस्तक असं वर्गीकरण करण्यापेक्षा हे 'वाचून दाखवायचं' पुस्तक असं वर्गीकरण मला जास्त सोयीचं वाटतं.

आज जे साठीच्या आत-बाहेर आहेत त्या पिढीसाठी कुमार गंधर्व हे घरातलं नाव होतं. कारण त्यांच्या पिढीचा काळ रेडिओचा होता. इच्छा असो किंवा नसो, त्या पिढीतल्या लोकांच्या कानावर कुमार गंधर्वांचं गाणं येत राहिलं. मात्र, मधल्या एका पिढीनं मनोरंजनाच्या माध्यमांमधली इतकी स्थित्यंतरं बघितली, की आमच्या संगीताबद्दलच्या आठवणी अनेक कप्प्यांमध्ये साठत गेल्या. घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण नसणाऱ्या माझ्या पिढीतल्या लोकांना कुमार गंधर्व नीट माहीतही नाहीत. आमच्यापर्यंत आल्या त्या आमच्या आईबाबांच्या कुमारांबद्दलच्या आठवणी - त्यांचं त्या काळी घराघरात वाजणारं संगीत, त्यांचं आजारपण, आणि देवासला स्थायिक होणं. 'उड़ जाएगा हंस अकेला', 'ऋणानुबंधाच्या' अशी काही विशेष प्रसिद्ध गाणी सोडल्यास आमचा कुमारजींच्या संगीताशी विशेष संबंध आला नाही. आणि आजची परिस्थिती बघता असं लक्षात येतं, की संगीत ऐकण्यासाठी ढीगभर माध्यमं उपलब्ध आहेत पण ती सगळीच एकमेकांपासून तुटलेली आणि विखंडित आहेत. 'ऑल इंडिया रेडिओ' किंवा 'दूरदर्शन' ज्या पद्धतीनं एखाद्या कलाकाराला व्यासपीठ देऊ शकायचं तसं आता कुठलंच माध्यम देऊ शकत नाही. माध्यमंही व्यक्तिकेंद्री झाल्यामुळे, आई हेडफोन लावून किशोरी आमोणकर ऐकत असली, तरी मुलांना त्या कोण आहेत हे समजेलच असं नाही. आणि मुळात किशोरी आमोणकर किंवा कुमार गंधर्व आठ वर्षांच्या मुलाला आवडू शकतील हा विचारच माझ्यासारख्या काही पालकांच्या मनात येणार नाही.

'कुमारस्वर..' वाचताना, आम्हा दोघांनाही एक छोटासा प्रकल्प मिळाला. एखाद्या गायकाचं गाणं कानावर येईल तसं ऐकणं वेगळं आणि काही संदर्भ माहीत करून घेऊन ऐकणं वेगळं. पुस्तकाची सुरुवातच 'गंधर्व' म्हणजे काय हे सांगून होते. इंद्राच्या दरबारात गानकलेत प्रवीण असलेल्या पुरुषांना गंधर्व म्हणायचे आणि नृत्यकलेत प्रवीण असलेल्या स्त्रियांना अप्सरा म्हणायचे. कर्नाटकातल्या एका छोट्याशा गावातल्या, गरीब घरातल्या मुलानं गायनकला अशी काही आत्मसात केली, की अवघ्या सातव्या वर्षीच त्याला 'कुमार गंधर्व' ही उपाधी मिळाली! आपण आत्ता आहोत त्या वयात कुमारजी सभा कसे गाजवायचे, हे माझ्या मुलाला लगेच बघता आलं.



कुमारजींचे वडील त्यांना गाण्याच्या कार्यक्रमांसाठी गावोगावी घेऊन जायचे. 'माझ्या वडिलांनी माझं अस्वल करून टाकलं होतं' हे कुमारजींचं वाक्य पुस्तकात उद्धृत केलं आहे. घरापासून लांब दौऱ्यावर असताना छोट्या कुमारला आईची आठवण येत असे – हे असं एकच साधं वाक्य ऐकूनही माझ्या मुलाच्या तोंडून, 'बिचारे कुमार गंधर्व!' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली. सुरुवातीला कुमारजी नावाजलेल्या गायकांची हुबेहूब नक्कल करायचे. त्याचंच लोकांना कौतुक वाटायचं. त्यांना नीट मार्ग दाखवणाऱ्या गुरूंची गरज आहे असं त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं आणि देवधर मास्तरांच्या रूपात त्यांना तसे गुरू मिळालेही. मोठं होत असतानाचा त्यांचा आत्मशोधही प्रश्नांच्या रूपात पुस्तकात मांडला आहे. स्वतःच्या गाण्याच्या शोधात निघालेल्या कुमारला,

'मी कोण आहे?’
‘मी जे करतो आहे त्याला काही अर्थ आहे का?’
‘मला जिथे जायचं आहे तिथे नेणारी ही वाट आहे का?'

असे अनेक प्रश्न पडू लागले. आपण आता कुणाचीही नक्कल करायची नाही असं त्यांनी ठरवून टाकलं.
वरवर यशस्वी वाटणाऱ्या माणसालाही आतून निराश वाटू शकतं, आणि असे प्रश्न पडू शकतात, हे लहान मुलांना सावकाश उलगडून, त्यांच्या पचनी पडेल असं सांगणं अवघड आहे. पण या गोष्टीत ते सहज जमलं आहे असं वाटत राहतं. गायक म्हणून नावारूपाला येत असतानाच कुमारजींना क्षयरोग झाला. त्यांचं गाणं काही वर्षं थांबलं. या दरम्यानच त्यांना कोरड्या हवेच्या ठिकाणी राहायचा सल्ला डॉक्टरांनी दिला. ती जागा म्हणजे मध्यप्रदेशातलं देवास नावाचं छोटंसं शहर होतं.

संगीतात श्वास का महत्त्वाचा असतो? क्षयरोग म्हणजे नेमकं काय? त्याचा गाण्यावर कसा परिणाम होईल? असा एक एक प्रश्न सोडवत गोष्ट पुढे जाते. तसं होत असताना एखाद्या लहान मुलाला जे काही विचारावं असं वाटेल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात मिळतातच. तरीही, पुस्तक वाचत असताना आम्ही श्वास, संगीत आणि क्षय या मुद्द्यांवर अनेक दिवस रेंगाळलो. काही वेळा या तीन मुद्द्यांवरची माहिती शोधायला आम्हाला पुस्तकाबाहेरही जावं लागलं. गोष्टीकडे परत येताना मात्र, गोष्टीच्या नायकाबद्दल थोडा अधिक आदर घेऊन परत आलो.

गायला बंदी असताना कुमारजी सतत गाण्याचाच विचार करत असत. या काळात त्यांनी माळवी बोलीतली काही गाणी, स्थानिक स्त्रियांकडून ऐकली आणि पुढे जेव्हा ते गाऊ लागले, तेव्हा ती बोली त्यांनी त्यांच्या बंदिशींतच रुजवली. पुस्तकात अनेक ठिकाणी या माळवी बोलीतल्या बंदिशींचं सुलेखन आहे. त्यातल्या काही यूट्यूबवर सहज सापडतात. पारंपरिक बंदिशींत ठरावीक शब्दरचना, संस्कृती असायची. कृष्णाच्या लीला, त्याच्या खोड्यांवर लटका राग व्यक्त करणाऱ्या गोपी, सासू आणि नणंदांच्या तक्रारी सांगणाऱ्या सासुरवाशिणी आणि प्रेमातुर विरहिणी – अशा प्रकारचं पद्य पारंपरिक शास्त्रीय संगीतात असायचं, अजूनही असतं. पण कुमारजींनी माळवी भाषेत रचलेल्या बंदिशी त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या, साध्या, एरवी अनुल्लेखनीय अशा घटनांवरही असायच्या. उदाहरणार्थ, खाली दिलेल्या उदाहरणात, ट्रेनच्या खिडकीतून लांबवर एक पुरातन मंदिर दिसलं असता, त्यांना जे काही सुचलं ते त्यांनी ‘श्री’ या रागात व्यक्त केलं आहे.

त्यांचा थोरला मुलगा (मुकुल) दंगा करून काम करू द्यायचा नाही तेव्हा त्याबद्दल लटकी तक्रारही त्यांनी एका बंदिशीतून केली आहे. किंवा त्यांची मुलं (मुकुल आणि कलापिनी) यांचं पतंग उडवताना झालेलं भांडणही त्यांनी बंदिशीतून व्यक्त केलं आहे. हा असा भाषेचा आणि काव्याचा वापर किती क्रांतिकारी होता हे ती बंदिश, फक्त 'राग श्री' म्हणून ऐकली असती, तर लक्षात आलं नसतं.

भारतातलं शास्त्रीय संगीत कसं असतं याबद्दलही पुस्तकात हळूहळू एक एक मुद्दा उलगडून सांगितलं आहे. स्वर म्हणजे काय? आलापी म्हणजे काय? रागांचे प्रहर, त्यांमध्ये असलेले वर्ज्य स्वर हे सगळं कथेच्या ओघातच, सोप्या भाषेत पेरलं असल्यानं मुलांना त्याबद्दल कुतूहल वाटण्याच्या शक्यता वाढतात. कुमारजींची 'भूप' रागात हळूच मध्यम आणायची प्रसिद्ध गोष्टही या पुस्तकात येते. त्यांनी रचलेल्या काही नवीन रागांबद्दलही माहिती येते. 'संजारी' या, जेव्हा दिवस अणि रात्र एकमेकांना ओलांडून जात असतात, त्या वेळेच्या, म्हणजेच कातरवेळेच्या रागाची गोष्ट सांगताना त्या वेळी उगाचच बेचैन वाटतं असा उल्लेख माधुरीताई करतात. मनाची ती अवस्था पकडणारे स्वर 'संजारी'त आहेत असं सांगतात. ती माहिती जिथे येते, त्या पानावर संधिप्रकाशात एका निष्पर्ण वृक्षाजवळून जाणाऱ्या गाडीचं चित्र आहे. ते चित्र चपखल आहे कारण त्यांना संजारी 'दिसला' तो तसाच!


Sanjari

(कुमारांनी गायलेला संजारी इथे ऐकता येईल.)

एखादी कलाकृती बघून, तिच्या भव्यतेनं, सौंदर्यानं अंगातली शक्ती जाऊ शकते. आपण किती अपुरे आहोत याची जाणीव अशा कलाकृती करून देतात. असा अनुभव कुमारजींना वेरूळची लेणी बघून आला आणि त्यांच्या हातून बिहाग रागात एक बंदिश घडली. आपण कधीच 'पूर्ण' होत नसतो. आपल्याला अजून सगळं समजलं नाही ही जाणीव जिवंत असेल तर कुतूहलही जिवंत राहतं. त्यातूनच पुढचा मार्ग सापडतो.


Kumar in Ellora

(कुमारांनी गायलेला राग बिहाग इथे ऐकता येईल.)

कुमारजींनी आयुष्यात अनेक त्रासदायक स्थित्यंतरं बघितली. जवळच्या माणसांचं मरण, शारीरिक व्याधी – तीदेखील त्यांच्या जीविकेवर घाला घालणारी. पण या सगळ्यांतूनही त्यांनी त्यांच्यातला प्रयोगशील शास्त्रज्ञ जिवंत ठेवला. त्यांच्यासाठी त्यांचं संगीत त्यांचं होतं. त्यांच्या संगीताची परंपरेशी असलेली बांधिलकी निव्वळ पाईक होण्यात नव्हती. जिथे त्यांना प्रयोग करावेसे वाटले, तिथे त्यांनी नवीन मार्ग शोधून काढला आणि कुणाची पर्वा न करता तो त्यांच्या श्रोत्यांसमोर ठेवला. वाचताना, अनेकदा हे आपणही लहानपणीच वाचायला हवं होतं असं वाटून जातं. जिज्ञासू माणसांच्या आयुष्याबद्दल वाचत असताना कला, विज्ञान, तत्त्वज्ञान एकच वाटू लागतात, तसं कुमारजींच्या आयुष्याबद्दल वाचताना होतं. कलाकार, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ जिज्ञासेपोटी, ध्यासापोटी जसे घडतात तसेच ते त्यांच्या काळानेदेखील घडवले जात असतात. एखाद-दोन दशकांनंतर मागे वळून बघितलं तर त्या त्या दशकांतली काही क्रांती, परिवर्तनं, त्या काळाची ओळख झालेली असतात. कुमारजींचा काळ कसा होता, त्यांचे समकालीन कलाकार, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ कोण होते, कुठे होते हे दाखवणारं एक रेखाटन पुस्तकात आहे. तंत्रज्ञानानं आणि माध्यमांनी आज घेतला आहे तसा माणसाचा ताबा घेतला नव्हता. तरीही जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व आणि क्रांतिकारी बदल होत होते. आइनस्टाईन, पिकासो, गोदार, विजय तेंडुलकर, चार्ल्स कोरिया, बीटल्स, बेगम अख्तर, विक्रम साराभाई, दादासाहेब फाळके – असे लोक कुमारजींचे समकालीन होते. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि पाश्चिमात्य देशही महायुद्धांतून बाहेर पडत होते. सृजनशील, विचारी, संवेदनशील कलाकार आणि विचारवंत निर्भिडपणे व्यवस्थांचा प्रश्न विचारत होते; जुन्या पद्धती मोडून काढून सगळ्याच क्षेत्रांमध्ये नवीन प्रयोग होत होते हे त्या रेखाटनांतील नावांकडे बघून सहज लक्षात येतं.


Kumar Gandharva Contemporaries

आता इतकं सगळं लिहून, शेवटी या पुस्तकातून मुलं काय शिकतील यावर एक परिच्छेद लिहून मी पुस्तकाची मजा घालवणार नाही. पण कर्नाटकातल्या, सुळेभावी नावाच्या एका छोट्याशा गावातून सुरु होणारी, एका छोट्या मुलाची गोष्ट आधी 'आपल्यासारखाच कुणी आहे' म्हणून खिळवून ठेवते आणि नंतर अनेक गोष्टींबद्दल विचार करायला लावते. एक मात्र नक्की – मुलांना एखादी गोष्ट जड जाईल किंवा कसं, हे प्रत्यक्ष प्रयोग करूनच बघावं. एखादी गोष्ट, शब्द, कलाकार जुन्या काळातला आहे म्हणून तो आपल्या मुलाला समजणार नाही हे गृहीतक मुलांचं आणि पालकांचं, दोघांचंही नुकसान करणारं आहे. कारण आपलं मूल पुरातन किंवा आधुनिक नसतं. एखादी गोष्ट नीट समजली की ती त्यांच्याच काळातली होते. तसंच, काही वेळा योग्य ठिकाणी हात धरल्यानं आपल्याच मुलांबरोबर एखादा अद्भुत अनुभव घेता येतो. तसंच काहीसं हे पुस्तक वाचताना झालं. आयुष्यातल्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांतले, वयांतले कुमारजी या पुस्तकांतून भेटतात. आणि मुख्य म्हणजे, साध्या आणि सोप्या भाषेतून त्यांचं संगीतही आपल्याला 'भेटतं' याचंच समाधान.
---
कुमारस्वर, एक गंधर्वकथा
लेखिका : माधुरी पुरंदरे
चित्रे : चंद्रमोहन कुलकर्णी
ज्योत्स्ना प्रकाशन
प्रथमावृत्ती : १० जून २०२३
७२ पाने
मूल्य : ३००₹

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख आवडला. कुमार गंधर्वांचा बालवयातील गाण्याचा व्हिडिओ प्रथमच पाहिला - बाळाचे पाय पाळण्यात दिसावेत तद्वत तयारीने घेतलेल्या सहज हरकती ओळखीच्या वाटल्या.

पुस्तकाची सुरुवातच 'गंधर्व' म्हणजे काय हे सांगून होते. इंद्राच्या दरबारात गानकलेत प्रवीण असलेल्या पुरुषांना गंधर्व म्हणायचे

वरवर यशस्वी वाटणाऱ्या माणसालाही आतून निराश वाटू शकतं, आणि असे प्रश्न पडू शकतात, हे लहान मुलांना सावकाश उलगडून, त्यांच्या पचनी पडेल असं सांगणं अवघड आहे. पण या गोष्टीत ते सहज जमलं आहे असं वाटत राहतं.

एक मात्र नक्की – मुलांना एखादी गोष्ट जड जाईल किंवा कसं, हे प्रत्यक्ष प्रयोग करूनच बघावं. एखादी गोष्ट, शब्द, कलाकार जुन्या काळातला आहे म्हणून तो आपल्या मुलाला समजणार नाही हे गृहीतक मुलांचं आणि पालकांचं, दोघांचंही नुकसान करणारं आहे.

--- नेमकं! गुंतागुंतीच्या गोष्टी सहजपणे मुलांपर्यंत पोचवण्यात माधुरी पुरंदरे यांचा हातखंडा आहे, याची (पुनश्च) साक्ष देणारा हा लेख.

तो व्हिडिओ आता एम्बेड केला आहे.

पुस्तकाची ओळख इतक्या चांगल्या प्रकारे करुन दिली आहे की आता पुस्तक वाचणे क्रमप्राप्त आहे. कुमारांचे गाणे हे अद्भुत आहे. एकच फुफ्फुस असल्यामुळे त्यांना मर्यादा आल्या होत्या. पण त्यातूनही त्यांनी जे करुन दाखवलं ते थक्क करणारं आहे. त्यांचं गाणं समजायला सुरवातीला कठीण गेलं पण त्यानंतर वडिलधाऱ्या मंडळींनी समजावुन सांगितल्यावर ते आवडु लागलं. तरीही, त्यांनी गायलेली काही मराठी गाणी कानाला खटकायची ते त्यातल्या उच्चारांमुळे. त्या गाण्यातली ती 'धुसपुस' कधी पचनी पडली नाही. पण त्यांचा यमन, तोडी व अन्य बरेच राग हे इतरांपेक्षा वेगळेच वाटतात. ते खरोखरीच काळाच्या पुढे असलेले महान गायक होते.

>>तरीही, त्यांनी गायलेली काही मराठी गाणी कानाला खटकायची ते त्यातल्या उच्चारांमुळे.

मी पहिल्यांदा 'उड़ जायेगा' ऐकलं होतं तेव्हा मला त्यांचा "जैसे" चा उच्चार ऐकून फार हसू आलं होतं. आणि एकूणच त्यांचं हिंदी किती मराठी वळणाचे आहे हे ऐकून. पण आता ते गाणं कुणी उत्तर भारतीय हिन्दी वळणाने म्हणून दाखवलं तरी मला ते आवडणार नाही.

आणि एकूणच त्यांचं हिंदी किती मराठी वळणाचे आहे हे ऐकून.

मराठी वळणाचे??????

‍अहो, त्यांचे मराठी उच्चार तरी कुठले मराठी वळणाचे असायचे, त्यांचे हिंदी उच्चार मराठी वळणाचे असायला? (डिस्क्लेमर: इथे चर्चा केवळ त्यांच्या उच्चारांबद्दल आहे; त्यांच्या गायकीबद्दल मला काहीच म्हणायचे नाही.)

तो ‘भेटीत’पुढचा शब्द नक्की काय आहे, तो त्या एका विधात्यालाच ठाऊक, परंतु ‘तुष्टता’ खासा नसावा. (तसेही, त्या संदर्भात ‘तुष्टता’चा काही अर्थ लागत नाही, परंतु, इन एनी केस, तो शब्द ‘तुष्टता’ असा ऐकल्याचे आठवत नाही. (आमच्या लहानपणी, बोले तो जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी-शेजाऱ्यांच्या रेडियोवरून ‘ऋणानुबंधाच्या’ ऐकू येण्याच्या काळात – तेव्हा दूरचित्रवाणीचा प्रसार मुंबईपुण्यातसुद्धा फारसा झालेला नव्हता; तर ते एक असो. – आम्हीसुद्धा ‘ऋणानुबंधाच्या’च्याच रतिबावर वाढलो. एक ‘ऋणानुबंधाच्या’, नि दुसरे ते ‘जुनी रूसूनि आहे’. तर तेही एक असोच.) ‘रुष्टता’ असा एक प्रवाद वाचलेला आहे, परंतु त्यातूनही फारसा अर्थबोध होत नाही. आणि, कानांना तर तो शब्द काहीसा ‘ऊष्टता’सारखा ऐकू येत असे, जो की पूर्णपणे निरर्थक आहे.)

सुनीताबाईंनी (बोले तो, पु.ल. देशपांड्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे. परंतु, नेम्सड्रॉपिंगच्या नियमांनुसार त्यांचा उल्लेख ‘सुनीताबाई’ असाच – आपली त्यांच्या घरी नेहमीची ऊठबस असल्यासारखा – करण्याचा प्रघात आहे.) कुमार गंधर्वांच्या (ज्याच्यात्याच्या नावापुढे ‘जी’ लावण्याच्या हिंदी प्रथेबद्दल मला सामान्यतः तिटकारा असल्याकारणाने, त्यांना ‘कुमारजी’ असे संबोधून त्यांचा अपमान मी करणार नाही.) मराठी पदे गाताना उच्चारांचे मुडदे पाडण्याच्या लकबीचा मनोरंजक किस्सा वर्णिलेला आहे. ते म्हणे (‘स्वकुलतारक सुता’मधील) ‘सुखविला न च जनक न माता’च्या जागी ‘सुकविला न च जनक न माथा’ असे गाऊन अर्थाचा अनर्थ – नि पर्यायाने विचका – करायचे. आणि, कितीही समजावून सांगितले, तरी परिणाम शून्य.

(आणि, त्या ‘ऋणानुबंधाच्या’पुढचा तो दीर्घ पॉज़! म्हणजे, एक तर (पु.लं.नी – नेम्सड्रॉपिंगचे नियम सर्वत्र लागू आहेत. – अन्य संदर्भात म्हटल्याप्रमाणे) त्या ‘च्या’पुढची काही अक्षरे म्हणायची राहून गेली असावीत, असा संभ्रम निर्माण व्हावा; नपक्षी, ‘ऋणानुबंध’ ही काहीतरी (***च्या, ***च्या, ****च्या यांच्यातल्याप्रमाणे) अश्लील भानगड आहे, अशी समजूत व्हावी.)

(अतिअवांतर: त्यातल्या त्यात मग त्या ‘ऋणानुबंधाच्या’मध्ये त्या वाणी जयरामबाईचे उच्चार त्या मानाने बरे होते, म्हणायचे. अर्थात, आमच्या तिरशिंगरावांना हे पटायचे नाही म्हणा, परंतु तरीही.)

परंतु, दणदणीत, दमदार आवाजाचा (मग भले पुढे क्षयरोगामुळे त्या ‘दम’ची वाट लागली असो.), नि मनस्वीपणे गाणारा गायक! त्याबद्दल आदर आहेच. (दुर्दैवाने, शास्त्रोक्त/शास्त्रीय संगीताबद्दलची माझी जाण शून्य असल्याकारणाने, याहून अधिक काही वक्तव्य करणे ही माझ्या आवाक्याबाहेरील गोष्ट आहे.)

(आणि, कोणीही काहीही म्हणो, परंतु किशोरीताई मला आवडतात. बोले तो, त्या ‘रे श्यामसुंदर राजसा’मध्ये काय दणदणीत आवाज लागला आहे! जणू त्या (ग़ुस्ताख़) श्यामसुंदराला (‘विनवुनी’ कसच्या, परंतु) बजावून सांगीत आहेत, की बऱ्या बोलाने मला परतुनि जाऊ देतोस की नाही? की कानाखाली जाळ काढून त्या जाळावर तुला परतू? तो बिचारा श्यामसुंदर, चळचळ कापला असेल ते ऐकून. Respect!)

उच्चारांबद्दलचा माझा टॉलरन्स तुमच्यापेक्षा जास्त असावा कारण मी रेहमानचे हिंदी उच्चार ऐकत वाढले आहे.
ख चा क करणे. छ चा च करणे (लुकाछुपी नावाच्या गाण्यात एकदाच छ म्हणायची वेळ आली असूनही, 'गुच्चा गुच्चा कई ख्वाबों का' असा उच्चार केला आहे)
तसंच मै (मी) चा मे असा उच्चार करणं). उच्चारांबद्दल माफ करावं तर अनेकांना रेहमानचं संगीतही संगीत नाही असं वाटतं.

>>मराठी वळणाचे??????

हिंदी वळणाचे नक्कीच नाहीत. 'जैसे'ला जईसे असं म्हणणाऱ्या दोन व्यक्ती लगेच आठवतात. एक माझी आई आणि दुसऱ्या सुधा मूर्ती.
कदाचित कानडी वळणाचे असेल.

उच्चारांबद्दलचा माझा टॉलरन्स तुमच्यापेक्षा जास्त असावा कारण मी रेहमानचे हिंदी उच्चार ऐकत वाढले आहे.

हे तुम्ही मला सांगताय?

तुम्ही माझ्या पिढीतल्या नाही, त्यामुळे तुम्ही महंमद रफींनी गायलेली मराठी गाणी ऐकलेली असण्याची शक्यता कमी वाटते. (चूभूद्याघ्या.)

तसे पाहिले तर त्या काळात कित्येक नावाजलेल्या/प्रस्थापित अमराठी गायकांनी मराठीतून गाणी गायचा प्रयत्न केला. महंमद रफी, हेमंतकुमार, तलत महमूद, झालेच तर महेंद्र कपूर... यू नेम इट. कित्येकांना ते जमलेसुद्धा; किंवा, गेला बाजार, त्यांचे मराठीतून गाणे कानांना (तितकेसे) खटकले तरी नाही. (नाही म्हणायला, हेमंतकुमारचे ते 'डोलकर डोलकर'मधले 'भोल्या शोकाल आभाल' किंवा 'गोमू संगतीनं'मधले 'तूला मिर्वत्त मिर्वत्त नेईन' ऐकायला किञ्चित चमत्कारिक वाटायचे खरे, परंतु, ते तेवढेच. अन्यथा, सांगितले नसते, तर हे गाणे गाणारा अमराठी आहे, याचा सहज पत्ता लागला नसता.) मात्र, महंमद रफीच्या मराठी गाण्यांवरील बलात्कारांना तोड नाही!

(सांगण्याचा मतलब, टॉलरन्सचा संबंध रेहमानचे गाणे ऐकत वाढण्याशी नाही. आम्ही त्याहूनही भयंकर असे काही ऐकत वाढलो; मात्र, त्याला टॉलरेट करायला शिकलो नाही. (आणि हो, कुमार गंधर्वांना मी टॉलरेट करू शकतो, इतकेच नव्हे, तर काही अंशी, त्यांचे उच्चार नॉटविथष्ट्याण्डिंग, त्यांना ॲप्रीशिएटसुद्धा करू शकतो. महंमद रफी सिंगिंग इन मराठी, मात्र, इज़ अ टोटली डिफरंट ॲनिमल. त्याला क्षमा नाही!))

>>मराठी वळणाचे??????

हिंदी वळणाचे नक्कीच नाहीत.

जे हिंदी नव्हे, ते मराठी???

म्हणजे, टॉम आल्टर पडद्यावर हिंदीच्या नावाखाली जे काही फाडायचा, त्याला 'हिंदी' म्हणणे जिवावर येते. परंतु म्हणून, त्याला 'मराठी' म्हणणार काय?

(अतिअवांतर: खऱ्या आयुष्यात टॉम आल्टर उत्कृष्ट हिंदी बोलायचा, असे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.))

'जैसे'ला जईसे असं म्हणणाऱ्या दोन व्यक्ती लगेच आठवतात. एक माझी आई आणि दुसऱ्या सुधा मूर्ती.

कधी हैदराबाद साइडकडचे दख्खनी उर्दू ऐकण्याचा योग आला नाही काय?

बाकी,

उच्चारांबद्दल माफ करावं तर अनेकांना रेहमानचं संगीतही संगीत नाही असं वाटतं.

खाजगीमध्ये, तसे वाटणाऱ्यांमध्ये आम्हीही मोडतो. परंतु, tolerance, live and let live, there is no accounting for tastes, झालेच तर, it takes all sorts to make a world, वगैरे वगैरे लक्षात ठेवून, सोडून देतो झाले.

असो.

...एक तर (पु.लं.नी – नेम्सड्रॉपिंगचे नियम सर्वत्र लागू आहेत....

ओह ओके, यू मीन "भाईनी" !!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

That’s भाईकाका for you!!!

Smile Smile व्हय व्हय!!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

छान परिचय!

त्यांचा थोरला मुलगा (मुकुल) दंगा करून काम करू द्यायचा नाही तेव्हा त्याबद्दल लटकी तक्रारही त्यांनी एका बंदिशीतून केली आहे. किंवा त्यांची मुलं (मुकुल आणि कलापिनी) यांचं पतंग उडवताना झालेलं भांडणही त्यांनी बंदिशीतून व्यक्त केलं आहे. हा असा भाषेचा आणि काव्याचा वापर किती क्रांतिकारी होता हे ती बंदिश, फक्त 'राग श्री' म्हणून ऐकली असती, तर लक्षात आलं नसतं.

दिवसभर काम करताना एकीकडे गाणी ऐकत होते, पण आता वाचल्यानंतर पुन्हा ऐकलीच पाहिजेत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राग श्री मधली बंदिश मुलांच्या दंग्याची नाही. Sad
मी त्या दोन्हीं शोधल्या बऱ्याच पण मला सापडल्या नाहीत.

तरीही कुमार गंधर्व फॉर दॅट मॅटर किशोरीताई व इतर वगैरे शास्त्रीय गायकांना आपल्या इथे का इतकं मोठं करून ठेवलं आहे हा प्रश्न पडतो.

एकतर तुम्ही स्वरांचे एक फ्रेमवर्क मांडता. त्या फ्रेमवर्क मध्ये अमुक एक राग अमुक या स्वरांच्या पॅटर्न ने अमुक अशा वेळी अमुक अशा पद्धतीने गायचा हे त्या फ्रेमवर्कच्या इंटर्नल लॉजिकने ठरवता. मग त्या फ्रेमवर्कला धरून जे गातात ते महान आणि बाकीचे गाढव असेही ठरवता. कमाल आहे!

एकतर कुमार स्वत:च म्हणतात की भाशासं स्वरांचं माध्यम आहे. मग कशाला "या काळात त्यांनी माळवी बोलीतली काही गाणी, स्थानिक स्त्रियांकडून ऐकली आणि पुढे जेव्हा ते गाऊ लागले, तेव्हा ती बोली त्यांनी त्यांच्या बंदिशींतच रुजवली. पुस्तकात अनेक ठिकाणी या माळवी बोलीतल्या बंदिशींचं सुलेखन आहे." हा व्याप करायचा?

स्वर म्हणजे काय? आलापी म्हणजे काय? रागांचे प्रहर, त्यांमध्ये असलेले वर्ज्य स्वर हे सगळं कथेच्या ओघातच, सोप्या भाषेत पेरलं असल्यानं मुलांना त्याबद्दल कुतूहल वाटण्याच्या शक्यता वाढतात.

याच्यात आणि मुलांची मुंज-बिंज करून त्यांना त्यांचे 'धरोहर' वगैरे सांगणे या दोन घटनांत काहीही फरक नाही. एकतर प्रत्येक व्यक्तीचा आधारस्वर वेगळा, शिवाय एक राग गाताना त्यातला आधारस्वर सुद्धा जर डायनॅमिकली ठरवला तर ते व्यर्ज स्वर वगैरे फार बंडल प्रकार वाटू लागतो. शिवाय ते प्रहर वगैरे तर इतकं मजेशीर आहे की बास. निर्रथक रिच्युअल्स आहेत. एखाद्या गोष्टीभोवती गूढ संदिग्धता करून तिचे उदात्तीकरण करणे म्हण्जे थोडक्यात धर्मच झाला. घोटून घोटून आत्मसात केल्याने एखादी सापेक्ष गोष्ट निरपेक्ष ऑब्जेक्टिव्ह होत नाही. एखादे सापेक्ष फ्रेमवर्क रचून, त्यातले नियम पुन्हा सापेक्षरितीने ठरवून (थोडक्यात धर्म) मठ उभारणे, आणि त्या मठांमधून त्या मठाच्या परंपरा उध्वस्त करणारे रिबेल जन्मणे याच्यात आणि तथाकथित परंपरा उध्वस्त करणारे शास्त्रीय गायक यांच्यात काय नेमका फरक आहे तेच मला कळत नाही.

ठीक आहे, तुमच्या फ्रेमवर्क मध्ये तुम्ही कसलेले लोक आहात म्हणून तुम्ही ग्रेट आहात असं म्हणाल तर मी ते मान्य करतो. परंतु तुमचे फ्रेमवर्कच काहीतरी लई उदात्त वगैरे आहे, तेच ग्रेट आहे( शास्त्रीय म्हणे) आणि तुम्ही त्यात कसलेले आहात म्हणून तुम्ही ग्रेट आहात हे मात्र मी मान्य करणार नाही.

मनाची ती अवस्था पकडणारे स्वर 'संजारी'त आहेत असं सांगतात. ती माहिती जिथे येते, त्या पानावर संधिप्रकाशात एका निष्पर्ण वृक्षाजवळून जाणाऱ्या गाडीचं चित्र आहे. ते चित्र चपखल आहे कारण त्यांना संजारी 'दिसला' तो तसाच!

खिक. उगाच देव्हारे माजवायचे!

शेवटी या पुस्तकातून मुलं काय शिकतील यावर एक परिच्छेद लिहून मी पुस्तकाची मजा घालवणार नाही

थँक्स. मुलांना अभिजात करण्याची काय अभिजात हौस असते अभिजात पालकांना! आमच्या ओळखीचा एक परदेशस्थ भारतीय म्हातारा त्याच्या मुलांना भारतीय शास्त्रीय संगीत आणि विशेषत: बॉलीवूड सुमग संगीत अजिबात ऐकु देत नसे. का तर म्हणे 'मांजरं याहून बरी केकाटतात' असे त्याचे मत होते!!!

प्रतिसाद आवडेश बर्का.
मस्त्

पहायचे असतील, तर पुण्यात सवाई ला जा. रसिक असे काही शो ऑफ करत असतात, की ज्याचं नांव ते! त्यावर कुणीतरी मजेशीर लेखच लिहावा लागेल. परंतु,
शास्त्रीय संगीत पुन्हा पुन्हा ऐकलं, की नवानवा आनंद मिळतो, हे अनुभवलंय. कसा बुवा गळा फिरत असेल यांचा? असे क्षण बरेच येतात, हा स्वानुभव आहे.
तरीही…
मला लोकसंगीतही तितकंच आवडतं दर्जेदार वाटतं
उदा. प्रल्हाद शिंदे यांचा मोकळा, कमालिचा निर्मळ आवाजही अनेकदा ऐकावासा वाटतो. बुलबुलतरंग आणि संयत ढोलकी किती अफलातून वाजवली आहे. व्हिडीओ मात्र एकदम भिकार.
प्रल्हाद शिंदे सजणे कधी गोडीनं बोलायचं
शास्त्रीय संगीताच्या धाग्यावर अवांतर झाले असेल, तर माफ़ करा. गाणं मात्र ऐकाच.

हे गाणं कानावर पडल्यावर एखाद्या अभिजात घरातल्या अभिजात निरागस बालकाने प्रश्न विचारल्यावर त्याची अभिजात आई कसं उत्तर देत असेल? कदाचित 'मिसॉजिनिस्टिक सोसायटी', 'कन्झुमर चॉइस' वगैरे शब्द वापरून काहीतरी अभिजातच उत्तर देईल. पण बिचारा शिंदे तिला 'सखे' म्हणतोय म्हणून थोडा सॉफ्ट कॉर्नर पण देईल.

पोरं आहेत ती. मिऱ्या वाटणारच. कशाला त्यांना अभिजात वगैरे करतात कुणास ठाऊक.

गाणे बरे वाटले. (बोले तो, वर स्वधर्म यांनी ज्या गाण्याची लिंक दिलेली आहे, त्याच गाण्याबद्दल बोलताय, असे गृहीत धरून.)

मात्र, यात 'मिसॉजिनिस्टिक सोसायटी', 'कन्झूमर चॉइस' वगैरे भानगडी कोठून उद्भवल्या (अगदी तुमच्या म्हणण्यातल्या (तथाकथित) 'अभिजात आई'च्या (तुमच्या कल्पनेतल्या) दृष्टिकोनातूनसुद्धा), ते कळले नाही.

नक्की कोठे भेटतात हो तुम्हाला ही 'अभिजात' मंडळी? (नाही म्हणजे, अनुभवातून लिहीत असावात, या गृहीतकाखाली विचारतोय.)

(संबंधित मंडळी conceited असू शकतात, हे समजू शकतो. मात्र, याचा संबंध 'misogynistic society', 'consumer choice' वगैरेंशी कोणत्या stretch of imaginationने लागतो, हे समजण्याचा प्रयत्न करतोय.)

वय वर्ष ४ ते १६ मी भरतनाट्यमचा "अभ्यास" केला. पुण्यातील सुजाण, अभिजात पालकांप्रमाणे माझ्या पालकांनी संगीत आणि नृत्य या दोन्ही कलांमध्ये मला फार पारंगत न करता पुढे जाऊन इंजिनीअर/डॉक्टर असूनही या कला अवगत आहेत असं म्हणता यावं इतपत शिकवलं. पण नृत्यकला मी आवडीनं शिकले. तरीही, त्यात काही वर्षं (अर्थात, इंजिनियर होत असल्यानं) खंड पडला तेव्हा भारतीय शास्त्रीय नृत्याची परंपरा, त्यात येणारं काव्य, चाकोरीत बांधणारे नियम, गुरु-शिष्य नात्यामधील सत्तेचा असमतोल - या अशा काही गोष्टींमुळे माझं मत काहीसं तुमच्यासारखंच झालं आहे. शास्त्रीय संगीतात यापेक्षा काही वेगळं घडतं असं मला वाटत नाही.
तरीही, एखाद्या लहान मुलाला संगीत ऐकायला आवडत असेल, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकता यावं इतपत प्रयत्न करणं योग्य आहे असं मला वाटतं.

बरा अर्धा लहानपणी तबला वाजवायला शिकत होता. त्याला त्यात जरा गतीही असावी. त्यानं काय वयात ते शिकणं सोडलं, हे मी कधी विचारलं नाही.

आम्ही लग्न केलं तेव्हा त्याचे नातेवाईक मला म्हणत होते, "तू तरी त्याला पुन्हा तबला वाजवायला सांग, तुझं ऐकेल तो", वगैरे. मी त्याला सहजच सांगितलं, तुझे नातेवाईक असं म्हणत होते. तू त्यांना काय सांगितलंस. तो म्हणाला, "भारतीय शास्त्रीय संगीतवाले लोक फार देवभक्त असतात. मला ते सहन होत नाही." मला आणखी स्पष्टीकरणाची गरज वाटली नाही. आम्ही विषय बदलला.

बरा अर्धा आता अजिबातच भारतीय गाणी ऐकत नाही; अपवाद फक्त मी काही नवीन सुचवलं तर, तेही बहुतेकदा कोक स्टुडिओमधलंच असतं. मी हौशीनं नुसरत फतेह अली खानच्या कव्वाल्या ऐकते. तो असताना कटाक्षानं हे काही ऐकणं टाळते. आबिदा परवीनही नाही!

तो उगाच या तात्यापंतोजी लोकांना फार महत्त्व देतो, असं मला वाटतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कृपया आपल्या गाण्या बजावण्याचा किंवा अंगी असलेल्या कोणत्याही इतर कलेच्या प्रदर्शनाचा व्हिडीओ अपलोड करणे !

Observer is the observed

त्या मूळ गाण्यातला तो मूळ शब्द नक्की काय आहे, याबद्दल खात्री नाही, परंतु, ‘तुष्टता’ निश्चितच नाही. सबब, (तेवढा तो योग्य शब्द काय, ते शोधून काढून) शीर्षक कृपया दुरुस्त करणार काय?

(अन्यथा, चुकीचाच शब्द (आणि तोदेखील शीर्षकात, prominently!) जर वापरायचा असेल, तर मग ‘तुष्टता’च काय म्हणून? ‘पुष्टता’ किंवा ‘दुष्टता’ का नाही?)

या पदातील 'रुष्टता' हा शब्द नाटकाच्या संहितेनुसार आहे आणि योग्य आहे. कृष्ण-रुक्मिणीच्या प्रत्येक भेटीत होणार्‍या रुसव्या-फुगव्यांचा यास संदर्भ आहे. ( Reference : https://www.aathavanitli-gani.com/Song/Runanubandhanchya_Jithun )

.

धृष्टता सुद्धा चालेल ?

मला तो शब्द कायम तुष्टता असा ऐकू आला आहे. तो शब्द नक्की काय आहे याबद्दलही गोंधळ आहेत असं दिसतं.
पण या पुस्तकातून कुमार गंधर्व भेटतात म्हणून मला ते शीर्षक, शब्द काहीही असला तरी साजेसं आहे असं वाटतं.

ष्टता!

‘तो’ शब्द नुसताच ‘ष्टता’ आहे. म्हणून पहा बरे ‘… भेटीत ष्टता मोठी!’

श्रेणी कधी बंद झाल्या ?

.

(म्हणजे, आमच्यासाठी खूप पूर्वी बंद झाल्या होत्या. आता सर्वांसाठी.)

लेख प्रतिसादांसह आवडला.
चार आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या SRGMP LIL CHAMP ZEE MARATHI कार्यक्रमात देवांश भाटे(६) याने भेटीत तुष्टता मोठी गाणं गायलं ते बहारदार झालं. ***च्या, ***च्या आहे त्यात.

मागच्या वर्षीच्या MTV HASTLE RAP मधली श्रृती तावडे जिंकली नाही पण तिची rap आवडली. हिंदी आहे. पंजाबी नाहीत.

.