मारियो रिग्बी: वर्णभेद आणि आफ्रिकेतली रमतगमत भटकंती
मारियो रिग्बी: वर्णभेद आणि आफ्रिकेतली रमतगमत भटकंती
जानेवारी २०१६. दक्षिण आफ्रिकेमधलं एक गाव - विटसॅन्ड. गावातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये एक आफ्रिकी वंशाचा परदेशी मुशाफिर आला. गेस्ट हाऊसचा मालक आणि त्याची बायको, दोघांनी मुशाफिराचं आगतस्वागत केलं, त्याला शक्य त्या सगळ्या सोयी पुरवल्या. संध्याकाळी दोघांनी बार्बेक्यूची तयारी केली, मुशाफिराला जेवायला बोलावलं. तिघांच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता मालक अचानक म्हणाला, 'कधी वाटलंही नव्हतं, की एक दिवस मी एका काळ्या माणसाबरोबर जेवायला बसेन.' मालक श्वेतवर्णीय होता. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी राजवटीच्या काळात तो सैन्यात होता. त्याने काही कृष्णवर्णीयांना प्रत्यक्ष गोळ्या घालून ठारही केलं होतं. त्याच्या भूतकाळाबद्दल कळल्यावर मुशाफिराला एक क्षणभर त्याची घृणा वाटली खरी, पण त्याने प्रामाणिकपणे सगळं सांगून दिलगिरी व्यक्त केल्याने मुशाफिराने त्याला मनोमन माफ करून टाकलं.
तो मुशाफिर याच कारणासाठी तर घरातून बाहेर पडला होता. कृष्णवर्णीयांच्या तरुण पिढीने आपल्या कोषातून बाहेर पडून जग बघावं, असं त्याला वाटत होतं. आपला हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्याने एक घाट घातला होता - आफ्रिका खंडातून दक्षिणोत्तर प्रवास करण्याचा. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनपासून इजिप्तच्या कैरोपर्यंतचं १२ हजार किमी अंतर जास्तीत जास्त चालत पार करायचं, अगदीच आवश्यकता भासेल तिथे होडीने जायचं, मात्र कोणत्याही यांत्रिक वाहनाचा वापर करायचा नाही, असा त्याचा निश्चय होता. तो होता मारियो रिग्बी, कॅनडात राहणारा एक जिम इन्स्ट्रक्टर आणि फिटनेस ट्रेनर.
मारिओचा जन्म कॅरेबियनमधल्या Turks and Caicos बेटांवर झाला. पण त्याचं सुरुवातीचं बालपण जर्मनीत गेलं. तो १०-११ वर्षांचा असताना त्याच्या आईवडिलांनी कॅरेबियनमध्ये परतण्याचं ठरवलं. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे जर्मनीत त्यांच्या गावात ते एकमेव कृष्णवर्णीय कुटुंब असूनही तिथे त्यांना कधीही भेदभावाला तोंड द्यावं लागलं नव्हतं. मात्र कॅरेबियनमध्ये वेगळंच चित्र होतं. Turks and Caicos बेटांवर ब्रिटिश राजवट आहे. तिथे मारिओला आणि त्याच्या भावाला इंग्रजीचं अज्ञान, जर्मन धाटणीचे उच्चार, त्वचेचा रंग यावरून शाळेत चेष्टा, टोमणे, कुजकट शेरे ऐकावे लागले. मारिओच्या मनात स्वतःच्या रंगाबद्दल घृणा निर्माण झाली.
शालेय शिक्षण संपल्यावर मारिओ कॅनडात आला. त्याला विविध व्यायामप्रकार, साहसी खेळ यांची लहानपणापासून आवड होती. अॅथलेटिक्स क्रीडाप्रकारांतही त्याला रस होता. अशा गोष्टींसाठी त्याची आईदेखील त्याला कायम प्रोत्साहन द्यायची. पळण्याच्या स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेत घेत त्याने Turks and Caicos च्या सर्वोच्च पातळीपर्यंत मजल मारली होती. ऑलिंपिक्समध्ये भाग घेण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र Turks and Caicos चा स्वतःचा स्वतंत्र ऑलिंपिक संघ नाही, हे कळल्यावर त्याने तो नाद सोडून दिला. अॅथलेटिक्स नाही तर नाही, वेगळं काहीतरी करावं, असं त्याने ठरवलं.
त्याची दुसरी आवडती गोष्ट होती भटकंती. जुन्या भटकबहाद्दरांनी लिहिलेली पुस्तकं तो कायम वाचायचा. आपणही तसंच काहीतरी करावं, खरं जग बघावं, असं त्याने ठरवलं. सर्वात पहिला पर्याय युरोप किंवा उत्तर अमेरिकेचा होता. पण तिथे पर्यटकांसाठी, भटक्यांसाठी तशाही अनेक सोयीसुविधा असतात. त्यामुळे ते त्याला फारसं आव्हानात्मक वाटेना. त्याचबरोबर त्याला हेदेखील दिसलं की अशी माहिती शोधताना आफ्रिकेचा कुठेही फारसा उल्लेख नव्हता. आफ्रिकेत विशेष कुणीच का जात नसेल, तो प्रदेश इतका अनुल्लेख करण्यासारखा नक्कीच नसणार, आपणच जाऊन शोधावं का, असा विचार करता करता त्याच्या डोक्यात हळूहळू आफ्रिकेतली मोहीम घोळायला लागली. तो इतका अवाढव्य खंड. सुरुवात कुठून करायची, कुठे जायचं, कोणता मार्ग निवडायचा, हे त्याने कसं ठरवलं? मारिओ सांगतो, 'मी सरळ गूगल केलं - How to travel from Cape Town to Cairo. गूगल नकाशात दिसणारा मार्ग सारखा बदलत असतो. नवे रस्ते बनलेले असतात, जुने उद्ध्वस्त झालेले असतात, वेगवेगळ्या देशांमधली राजकीय परिस्थिती, युद्ध, दुष्काळ यानुसार नकाशात वेगवेगळे मार्ग दिसतात.'
मारियोने आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलगतचा मार्ग निवडला - दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, मलावी, टांझानिया, केनिया, इथियोपिया, सुदान, इजिप्त. मोहिमेच्या दृष्टीने अधिकाधिक माहिती मिळत गेली तसतसं त्याला लक्षात येत गेलं, की आफ्रिका खंड म्हणजे एक आगळंवेगळं आश्चर्य होतं. कित्येक जंगलं, गवताळ प्रदेश, वाळवंटं, लांबच्या लांब समुद्रकिनारे, वेगवेगळ्या तीन-चार हजार जमातींची माणसं, त्यांची वेगवेगळी संस्कृती... कुणाही अस्सल भटक्याला मोहात पाडणार्या अशा या गोष्टी होत्या. याशिवाय मारियोचं आणखी एक उद्दिष्ट होतं. 'Trans-Atlantic Slave Trade'मुळे पश्चिम आफ्रिकेतली माणसं पुढे जगभर पसरली. त्या तुलनेत पूर्व आफ्रिकेतल्या माणसांचा बाहेरच्या जगाशी फार संपर्क आला नाही. पण मुळात ५०-६० हजार वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतल्या मानवानेच पहिल्यांदा त्या भूभागाच्या बाहेर पाऊल ठेवलं होतं. हा विरोधाभासही मारियोला विशेष वाटत होता. त्यामुळे आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचे देश जमेल तितके जाणून घ्यावे, असं त्याने ठरवून टाकलं.
पायी प्रवासाचा निर्णय मारियोने का घेतला? तो म्हणतो, 'पायी फिरताना आपण त्या प्रदेशाचेच होऊन जातो. तिथलं ऊन, वारा, पाऊसपाणी आपल्यालाही झेलावं लागतं. तिथे लोकांना खायला अन्न नसेल तर आपल्यालाही ते मिळत नाही. आसपासची परिस्थिती आपल्या सोयीची नाही म्हणून गाडी पकडून दुसर्या ठिकाणी निघून जाण्याचा पर्याय तिथे नसतो. आफ्रिका जाणून घ्यायला हेच आवश्यक वाटलं मला...'
बेत पक्का झाला. ओळखीपाळखीतल्या लोकांना त्याबद्दल कळल्यावर सर्वांचा मारियोला एकच प्रश्न होता - 'Why Africa?' मारियो म्हणतो, 'त्यातल्या कित्येकांना आफ्रिका हा एक देश नसून ५०-६० देशांचा एक खंड आहे, हेदेखील माहीत नव्हतं.' त्याच्या घरच्यांची प्रतिक्रिया मात्र याहून एकदम वेगळी होती. त्याची आई अगदी धाडसी वृत्तीची. ती त्याला लगेच म्हणाली, 'वाटेत तुला काही झालं, पाय वगैरे मोडून घेतलास, तरी व्हीलचेअरवरून आफ्रिका पालथी घालणारा पहिला माणूस असा विक्रम करूनच घरी ये.' घरून असा पाठिंबा मिळाल्यामुळे मारियोच्या मनावरचं उरलंसुरलं ओझं निघून गेलं.
२४ नोव्हेंबर २०१५, केपटाऊन, दक्षिण आफ्रिका. सहा-सव्वासहा फूट उंचीचा हा धट्टाकट्टा तरुण कॅनडातलं निवांत आयुष्य, आवडीचं काम हे सगळं सोडून, पाठीवर सामान बांधून, एका तुलनेने मागास प्रदेशातल्या सफरीवर निघाला. त्याने या सफरीचं नाव ठेवलं होतं - 'Crossing Africa'. अर्थात आलं मनात आणि निघाला आफ्रिकेत, असं काही नव्हतं. आधीचे आठ-दहा महिने त्याने सफरीच्या तयारीत घालवले होते. दमसास वाढवण्यासाठी शारीरिक तयारी, १५-२० तास सलग चालण्याचा सराव, पैशांची आणि सामानाची जुळवाजुळव, सफरीचे टप्पे ठरवणं, त्या वाटेवरचा भूगोल समजून घेणं, इतर माहितीची शोधाशोध, कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याचा अंदाज बांधून त्यावरचे उपाय शिकून घेणं, अशा अनेक गोष्टी होत्या. तो सांगतो, 'आफ्रिकेतून चालत जायचं तर कसं याची एखादी तयार योजना काही हाताशी नव्हती. मग मी काय केलं, आधी होऊन गेलेल्या साधारण तशा मोहिमा शोधल्या, त्यातले लोकांचे अनुभव गोळा केले, त्याला समजा पाचने गुणलं आणि निघालो.' एका मुलाखतीत त्याने हेदेखील सांगितलं आहे की या आधी होऊन गेलेल्या मोहिमा जोडीने पार पाडल्या गेल्या होत्या; एकट्याने अशी प्रदीर्घ पायी मोहीम करणारा तो पहिलाच होता.
तर, केपटाऊन. निघाल्यावर एक-दोन दिवसांतच मारियोला कळून चुकलं, की त्याची पाठीवरची १५-२० किलोची पिशवी खूप जड पडत होती. एरवी एवढं वजन उचलणं त्याच्यासाठी काही विशेष नव्हतं. मात्र बर्याच ठिकाणचे कच्चे रस्ते, ओसाड प्रदेश, आफ्रिकेतलं हवामान आणि दीर्घ पायपीट लक्षात घेता सामान जितकं हलकं असेल तितकं चांगलं, हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग सामानातल्या अनेक वस्तू अनावश्यक वाटायला लागल्या. त्याने निघताना एक जड, मोठ्या पात्याचा सुरा बरोबर घेतला होता. दाट जंगलांतून वाट काढण्यासाठी किंवा हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव करून घेण्यासाठी त्याचा उपयोग झाला असता खरा; पण सामानाच्या वजनात काटछाट करण्याची वेळ आली तेव्हा त्याने आधी तो सुरा काढून टाकला आणि त्याऐवजी एक लहान चाकू जवळ ठेवला. सामानातली कपड्यांची संख्याही त्याने कमी करून टाकली. डक्ट टेप, एक तंबू किंवा ताडपत्री, दोरखंड या वस्तू त्याच्या सामानात सतत होत्या. सौर ऊर्जेवर चार्ज करता येईल असा एक सेलफोनही त्याने जवळ ठेवला होता.
चालण्याचा वेग किती असावा, दररोज किती अंतर काटावं, असं काही मारियोने आधीपासून ठरवलेलं नव्हतं. आधी म्हटलं तसं, आफ्रिका समजून घेणं या गोष्टीला त्याचं प्राधान्य होतं. त्यामुळे दररोज ३०-५० किमी अंतर पार पडलं तरी त्याला चालणार होतं. मोहीम सुरू करण्यापूर्वी त्याने कॅनडात रोज ५० ते ७० किमी चालण्याचा सराव केला होता. त्या तुलनेत हा वेग त्याच्यासाठी तसा निवांत होता. काही ठिकाणी त्याला उन्हाचा खूप त्रास झाला. माऊंट केनियावर थंड, विरळ हवेचाही त्रास झाला. दक्षिण आफ्रिका, केनिया इथले गवताळ प्रदेश बरेचसे कॅनडातल्या त्याच्या ओळखीच्या प्रदेशाप्रमाणे होते, असंही तो सांगतो. आफ्रिकेत वन्य प्राण्यांची संख्या जास्त असणार, याचं भान त्याने सतत बाळगलेलं होतंच.
आफ्रिकेतल्या वन्य प्राण्यांबद्दल मारियोकडे आगळेवेगळे अनुभव आहेत. एका ठिकाणी शहामृगांच्या कळपाने त्याच्यासोबत जवळपास वीसएक किलोमीटर प्रवास केला. सुरुवातीला त्याला थोडं बिचकायला झालं. पण ती शहामृगं शांतपणे त्याच्या अवतीभोवतीने चालत होती. एका विशिष्ट टप्प्यांनंतर शहामृगांनी त्याची साथ सोडली. बहुतेक ती दमली असावीत किंवा त्यांनी आखून घेतलेल्या सीमारेषेबाहेर ती जात नसावीत. टांझानियातून केनियात शिरताना त्याला हत्तींच्या कळपाचाही असाच अनुभव आला. वास्तविक हत्ती त्याच्या वाटेत आले नव्हते, तर तो त्या हत्तींच्या आफ्रिकन सफारीच्या वाटेत आला होता. त्या कळपात चार मोठे हत्ती आणि दोन पिल्लं होती. दिवसभर हत्ती त्याच्यासोबत चालायचे. रात्री थांबून त्याने तंबू ठोकला की हत्तीही आसपास थांबायचे. सकाळी उठून तंबू आवरून तो निघाला की हत्तीही निघायचे. एका ठिकाणी जंगली कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. आणखी एकदा दुपारच्या वेळी टळटळीत उन्हातून तो निघालेला असताना त्याला लांबवर वाटेत एका ट्रकचा टायर पडलेला दिसला. तापलेल्या मैलोगणती ओसाड प्रदेशात माणसाच्या अस्तित्वाची तीच एक खूण होती. तो टायर हलतोय असं मधूनच वाटत होतं. आपल्याला मृगजळामुळे भास होत आहेत, हे त्याने ओळखलं. तो टायरच्या अगदी जवळ पोहोचला, आणि अचानक टायरचं वेटोळं परत जोरात हललं. तो टायर नव्हता, तर मोठाच्या मोठा काळा साप (black Mamba) होता. हा कोब्राइतकाच जहरी असतो. मारियो जरा बिचकला, काही पावलं मागे सरकला आणि मग सापापासून लांब होऊन वळसा घेऊन पुढे गेला.
अर्थात, प्राण्यांची अशी भलीबुरी सोबत काही सतत नसायची. एरवी निव्वळ एकट्याने वेळ कसा घालवायचा? चालणं तर सुरू होतंच, शरीर काम करत होतं; पण अमुक वेळेत अमुक ठिकाण गाठायचंय, तमुक रस्ता शोधायचाय, असं काही काटेकोर व्यवधान डोक्याला नव्हतं. मोठ्या शहरांमध्ये राहणार्यांना अशा व्यवधान नसण्याची सवय नसते. अशा वेळी चालताना काही वेळ तंद्री लागू शकते, तर उरलेला वेळ कंटाळाही येऊ शकतो. गाणी, podcasts, चिंतनपर व्याख्यानं ऐकणं, हा त्यावरचा पहिला उपाय डोक्यात येतो. मारियोने अधूनमधून त्याच्या आवडीचे podcasts ऐकले. गाणी मात्र त्याने कैरो जवळ आल्यावरच ऐकायला सुरुवात केली. आणि मेडिटेशन? तो म्हणतो, 'Meditation works for a short time, for longer durations it is bullshit.' व्यक्तिसापेक्ष असले तरी हे त्याचे अस्सल अनुभवाचे बोल म्हणायला हवेत.
मारियोने तेव्हाच्या मनोवस्थेबद्दल छान सांगितलं आहे. आपण सर्वस्वी एकटे असतो तेव्हा सुरुवातीचा काही काळ भूतकाळातल्या आठवणी, घडून गेलेल्या गोष्टी, भेटलेली माणसं यांचे विचार मनात येतात. मग काही काळ भविष्याबद्दल विचार केला जातो. ते झालं की मन वर्तमानकाळात येतं. आपण काय ठरवलं आहे, काय करतो आहोत, जे करतो आहोत ते ठरवल्याप्रमाणे होतं आहे का, त्यात काही बदल करायला हवेत का, हे विचार सुरू होतात. काही काळाने ते विचारही थांबतात. मग समोर एखादा पर्वत असेल तर मनातल्या मनात त्याचं वर्णन करायला सुरुवात करायची. याचा उपयोग होतो, नाही असं नाही; पण नंतर नंतर तो पर्वत म्हणजे एक वस्तू असल्यासारखं वाटायला लागतं. आपल्या सगळ्या जाणिवांवर ताण पडलेला असतो. आपल्याला होणारा त्रास, शरीराची एक-एक वेदना समजून घेऊन दूर लोटायची असते. दुसरीकडे, नेमका रस्ता शोधायचा नसला, तरी दिशाभान हरवून चालणार नसतं. विशेषतः आसपास लोकवस्ती नसलेल्या प्रदेशातून चालत असताना (त्याच्या वाटेवर असे भरपूर टापू होते) आपल्यावर मागून एखादा प्राणी किंवा जंगलातल्या माणसांचा हल्ला होऊ शकतो, या शक्यतेकडे सतत लक्ष ठेवावं लागतं. ही सावधता नकळत वाढत जाते; आपण निसर्गाचाच एक भाग बनून जातो, जागरुक असणं याचा खरा अर्थ त्या वेळी समजतो. अशा अती सावधतेमुळे प्रत्येक गोष्टीची अती चिकित्साही केली जाते. तो म्हणतो, 'शब्दांत सांगणं फार अवघड आहे, अनुभव घेतला तरच ते कळेल.'
सावधता, अतिचिकित्सा होतीच; पण मारियोने स्थानिकांचे अनुभव, tips, सल्ले यांचाही कायम उपयोग करून घेतला. त्याला ठिकठिकाणी भेटलेली स्थानिक माणसं खूप अगत्यशील, आपलेपणाने वागणारी होती. त्याच्या सामानात कोरडे, वाळवलेले खाद्यपदार्थ कायम ठेवलेले असायचे. वाटेत जिथे जिथे वाणसामानाचं किंवा खाद्यपदार्थांचं दुकान दिसेल तिथे तो असे पदार्थ खरेदी करून ठेवायचा. पण अनेकदा असं व्हायचं, की ग्रामीण भागांमध्ये सलग दोन-तीन दिवस असं एकही दुकान दिसायचं नाही. अशा वेळी तो स्थानिकांकडे जेवायचा. काही ठिकाणी त्याने स्थानिकांसोबत मासेमारीचेही प्रयत्न केले. पण ते सतत करणं शक्य नव्हतं. पण एकूणच त्याच्या मोहिमेबद्दल उत्सुकता असणारी, त्याला मदत करण्यासाठी धडपडणारी माणसं त्याला ठिकठिकाणी भेटली.
तो केपटाऊनहून निघाला त्या पहाटे त्याला काही स्थानिक तरुण भेटले. तो कोण आहे, कुठे निघाला आहे, याची चौकशी केल्यावर त्यातल्या एकाला मारियोच्या मोहिमेत खूपच रस वाटला. पहिले दोन-तीन दिवस तो मुलगा चक्क त्याच्याबरोबर चालला. तो खूप बोलघेवडा होता. त्याच्यामुळे मोहिमेची सुरुवात चांगली झाली, असं मारियो सांगतो. पुढे दक्षिण आफ्रिकेतच एका ठिकाणी त्याला बघून एकाने गाडी थांबवली; त्याची चौकशी केली. मारियोचं पुढचं मुक्कामाचं जे गाव होतं तिथेच त्या माणसाचं घर होतं. रस्ता अवघड होता. मारियोचं वेळेचं गणित जरा चुकल्याने अंधार होत आला होता. त्या माणसाने आग्रह करून मारियोला घरी नेलं; रात्री ठेवून घेतलं; आणि यांत्रिक वाहनातून प्रवास न करण्याचा मारियोचा निश्चय कळल्याने दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा मारियोला ते रस्त्यात भेटले त्या ठिकाणी आणून सोडलं.
मारियो मोझांबिकमध्ये पोहोचला तोवर स्थानिक टीव्ही चॅनल्समुळे लोकांना त्याच्या मोहिमेची माहिती कळलेली होती. लहानसहान गावांतही माणसांनी त्याला ओळखलं. सगळे त्याच्या मदतीसाठी धावाधाव करत होते. काहींनी तर त्याला पैसेही देऊ केले. या लोकांच्या मनात मारियोबद्दल भीती, परकेपणा अजिबात नव्हता. एका माणसाने त्याला आपल्या घरी जेवायला बोलावलं. उत्साहात स्वयंपाकाची तयारी करत असताना घरातला स्टोव्ह बिघडला. तो माणूस अगदी दुःखीकष्टी झाला. मारियोने थोडी खटपट करून जवळच्या गावातून त्याच्यासाठी नवा स्टोव्ह मागवला. त्या माणसाला इतका आनंद झाला की त्याने मारियोला आणखी दोन दिवस घरी ठेवून घेतलं. कधीकधी त्यांचं असं अगत्य मारियोला नको व्हायचं. जेवणाखाण्याला नको म्हटलं तरी ती माणसं हाताने भरवायला बघायची. रात्री तंबू ठोकून मारियो झोपला असेल तर त्याच्या रक्षणासाठी म्हणून त्याच्या शेजारी येऊन झोपायची.
कित्येक खेड्यांमध्ये कमालीचं दारिद्र्य होतं. दोनदोन दिवस काहीही खायला न मिळालेली माणसं होती. पण मारियोला दिसलं की ते त्यांच्या सवयीचं होतं. त्यावर उपाय शोधता येतात, पर्यायी मार्ग शोधावे लागतात, हेदेखील त्यांना ठाऊक नव्हतं. कित्येक गावांमधल्या माणसांना त्या वाटेवरचं पुढचं गाव कोणतं आहे, किती लांब आहे, तिथे कोण राहतं याची काडीचीही कल्पना नसायची. त्यामुळे पुढे जाऊ नकोस, तिकडे भूतपिशाच्चं असतात, अशा गोष्टी सांगून ती माणसं मारियोला रोखण्याचा प्रयत्न करायची. आफ्रिकेतला असा कल्पनेपलिकडचा संपर्काचा अभाव दूर व्हायला हवा, ही गोष्ट मारियोने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये नमूद केली आहे.
मोझांबिकमध्येच मारियो एका जंगलभागात सैनिक आणि बंडखोरांच्या चकमकीत सापडला. 'दोन्हीकडून गोळीबार सुरू होता, एके-४७ च्या गोळ्या सटासट जवळून जात होत्या. सैनिकांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसती तर त्या दिवशी मी मेलोच असतो,' असं तो सांगतो. योग्य माहिती योग्य वेळात न मिळणं, भाषेचा प्रश्न असे अनेक गोंधळ झाल्यामुळे हे घडलं.
भाषेचा प्रश्न, संवादातल्या अडचणी याबद्दल सांगताना तो म्हणतो, 'एका कृष्णवर्णीय देशात, कृष्णवर्णीय खंडात, एक कृष्णवर्णीय माणूस म्हणून काही तोटेही असतात. पूर्व आफ्रिकी देशांमध्ये इतके वेगवेगळे संघर्ष सुरू असतात की परक्या कृष्णवर्णीय माणसाला निर्वासित, अतिरेकी, चोर, असं काहीही समजलं जाऊ शकतं.' त्यामुळे ग्रामीण भागातल्या कोणत्याही गावात शिरताना तो आधी कायम गावच्या मुखियाला शोधायचा. मुखिया नसेल तर स्थानिक पोलिस; पोलिसही नसतील तर गावात थोडंफार इंग्रजी बोलणारं कुणी आहे का, हे शोधायचा. काही ठिकाणी असा एखादा शिक्षक वगैरे असायचा. तो दारूच्या नशेत नसेल तर त्याच्याशी बोलता येण्याची शक्यता असायची. नाहीतर मग संशय, भीती, गोंधळ, गैरसमज यांची खात्रीच. मलावीमध्ये एका गावात त्याला अशाच गोंधळामुळे काही दिवस चक्क तुरुंगाची हवा खावी लागली.
मलावी हा मोझांबिक आणि टांझानियादरम्यानचा एक लहानसा देश. मलावीच्या उत्तर-पूर्व सीमेवर 'लेक मलावी' हा मोठाच्या मोठा तलाव आहे. तलावाच्या काठाकाठाने चालत जाण्याचा पर्याय होताच; मात्र मारियोने तलावातून ५५० किमी अंतर होडी वल्हवत (कयाकिंग) काटलं आणि टांझानियाची सीमा गाठली.
होडी तलावाच्या काठावरून आत न्यायची, जमेल तितकं अंतर जायचं आणि संध्याकाळी पुन्हा पुढे कुठेतरी किनारा गाठायचा, तंबू ठोकून मुक्काम करायचा, असं त्याने दोन महिने केलं. त्याने त्याआधी कधीही कयाकिंग केलेलं नव्हतं, हे विशेष. एकदा एका ठिकाणी होडीत बिघाड झाला. होडी अचानक बुडायलाच लागली. तलावाच्या काठापासून तो दोन-एक किमी आत आलेला होता. मग त्याने पाण्यात उतरून, एका हाताने होडी पकडून पोहत पुन्हा किनारा गाठला. होडी दुरुस्त केली. मुळात ही होडी त्याच्याकडे कुठून आली? तर, होडीतून तलावाची परिक्रमा पूर्ण करणारे दोन भटके त्याला तिथे भेटले. त्यांनी त्यांची होडी मारियोला देऊ केली.
मोहिमेला एक वर्ष झालं तेव्हा मारियो टांझानियामध्ये होता. वर्षभरातले अनुभव इतके दमवणारे, थकवणारे होते, की एक महिनाभर एखाद्या अंधार्या खोलीत स्वतःला कोंडून घ्यावं, काहीही करू नये, कुणाशी भेटू-बोलूही नये, असं अगदी आतून वाटल्याचं त्याने नमूद केलं आहे.
पुढे सुदानमध्येही त्याच्या आधी त्याच्या मोहिमेची कीर्ती पोहोचली होती. मोझांबिकप्रमाणे तिथेही दर पाच मिनिटांनी कुणी ना कुणी त्याचा फोटो काढायला धावत होतं. त्याच्यासोबत सेल्फी काढून घेण्यासाठी तरुण, लहान मुलं धडपडत होती. सुदानमध्ये स्थानिकांनी मारियोची चक्क दोन जाहीर व्याख्यानंही आयोजित केली.
इजिप्तमध्ये मोहीम संपणार होती. शिवाय मारियोला इजिप्तमधल्या पिरॅमिड्सबद्दल अतिशय उत्सुकता होती. पण इजिप्तपेक्षा सुदानमध्ये जास्त पिरॅमिड्स असल्याचं त्याला दिसलं. पण हे बाहेर विशेष कुणालाच माहिती नसेल. तो म्हणतो, 'प्रसारमाध्यमांमधून आफ्रिकेचं भलतंच चित्र आपल्या माथी मारलं जातं. प्रत्यक्षात आफ्रिका खूप वेगळी आहे, तिची स्वतःची अशी काही वैशिष्ट्यं आहेत. ती समोर न आल्यामुळे तिथल्या लोकांचं तर नुकसान होतंच, पण आपणही खूप काही गमावतो. ही दरी जितकी लवकर कमी होईल तितकं चांगलं.'
आफ्रिकेत जाऊन तिथल्या लोकांना आपल्या प्रगत जाणिवांचा उपयोग करून द्यावा, असा काहीतरी विचार घेऊन मी तिथे गेलो, पण आफ्रिकेनेच माझ्या जाणिवा अधिक समृद्ध केल्या, हेदेखील तो प्रांजळपणे कबूल करतो.
२४ फेब्रुवारी २०१८. तब्बल २८ महिन्यांनी कैरोत मारियोची मोहीम संपली. एकूण ७४० दिवस चालणं, ६० दिवस होडीतून किंवा बोटीतून मार्गक्रमण, रोज साधारण आठ ते १२ तास प्रवास; इतकं सगळं झाल्यावर कैरोत मारियोला कसं वाटलं? याचं उत्तर म्हणून तो एक समर्पक उदाहरण देतो, 'आपण वर्षभर परीक्षेसाठी झटून तयारी केलेली असते आणि अचानक एक दिवस ती परीक्षा पारही पडते. आणि मग रिकामपण येतं, वेगळं काय करावं हे सुचत नाही. तसंच माझं झालं.'
आफ्रिकेतून कॅनडात परत आल्यावर शहरी आयुष्याशी पुन्हा जुळवून घेणं त्याला खूप अवघड गेलं. पुढे वर्षभर त्याला नैराश्याने ग्रासलं होतं. या गोष्टीला तो 'रिव्हर्स कल्चर शॉक' असं म्हणतो. त्याला आयुष्य कंटाळवाणं वाटायला लागलं. आसपासची सगळी माणसं आळशी वाटायला लागली. जंगलाला, वाळवंटाला, पर्वतांना, एकटेपणाला अंगावर घेण्यासाठी जो रासवटपण नकळत अंगी बाणवला गेला होता, तो उतरवून ठेवायला त्याला खूप प्रयास पडले. पण शेवटी नशिबाने ते जमलं, असं तो म्हणतो.
लहानपणी त्वचेच्या रंगावरून सोसाव्या लागलेल्या भेदभावाचं एक अदृश्य ओझं घेऊन मारियो आफ्रिकेत गेला. आफ्रिकेने त्याच्या विचारांमध्ये मोठे बदल घडवले. आता त्या भूमीसाठी आणखी काहीतरी करण्याची त्याची इच्छा आहे. विजेवर चालणार्या वाहनातून संपूर्ण आफ्रिका खंडाची परिक्रमा करण्याच्या मोहिमेची आखणी तो करतो आहे. आफ्रिकेतलं अंतर्गत दळणवळण सुधारण्यासाठी इ-वाहनांचा पर्याय तिथे पोहोचायला हवा असं त्याला वाटतं. तिथल्या माणसांना शारीरिक भेदभावांपलिकडचं जग बघता यावं, एवढाच त्याचा उद्देश आहे.
'अनुभव' मासिकात पूर्वप्रकाशित. फोटो
मारिओच्या संस्थळावरून, फेसबुक-इन्स्टाग्रामवरून घेतले आहेत.