आफ्रिका हा देश नव्हे

#आफ्रिकाखंढ #भाषांतर #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

आफ्रिका हा देश नव्हे

मूळ लेखक - Ivor Chipkin and Jelena Vidojević

- अनुवाद -उज्ज्वला

आफ्रिका ही संकल्पना

'आफ्रिका' हा विषय निघाला की आपल्याला अनेक सरधोपट आणि बहुशः काचणारे सरसकटीकरण ऐकायला/वाचायला लागते. जगभर लोक भरभरून बोलतात ते क्वचितच एखाद्या विशिष्ट आफ्रिकन देश किंवा समाजबद्दल असते. ते बोलतात 'आफ्रिका' नावाच्या ठिकाणाबद्द्ल1. विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण भूभागांना एकाच गोष्टीचा भाग बनवण्याची प्रवृत्ती दिसते – फसवणुकीच्या घटना, एकसाची प्रतिमा आणि छातीठोक 'सत्य'2. हे शेरे आफ्रिकेत आणि इतरत्र उच्चारणाऱ्यांचे काळजीयुक्त उच्चरव आणि नैतिकतेची कळकळ अगदी ठळक असते.3 आफ्रिकेकडे अपयशाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून पाहिले जाते. 'आफ्रिका' हा शब्द सुटा कधी येत नाही, 'आफ्रिके'वरील संकट, 'आफ्रिके'तील समस्या, आणि / वा 'आफ्रिके'चे अपयश! आफ्रिका खंडाचे वर्णन नेहमी नकारात्मक शब्दांनीच होते – दुबळ्या / अपयशी लोकांची भूमी, जेमतेम संघटित, अकार्यक्षम राज्ये4. असल्या नकारात्मक – अगदी नष्टप्राय नाही, तरी दुःस्वप्नांची खाण – अशासारख्या वर्णनांची चलती संपताना दिसत नाही. अतिरिक्त प्रमाणात आलंकारिक शब्दांतील वर्णने जुन्या, प्रगाढ ठोकताळे अधोरेखित करत आफ्रिका खंड म्हणजे कोणतीच आशा किंवा कसलेही भविष्य नसलेली जागा अशी त्याची संभावना करतात. सन २०००मध्ये The Economist या वृत्तपत्रातील कुप्रसिद्ध संपादकीयात वापरलेले hopeless continent 'कुचकामी खंड' याचेच उदाहरण आहे. "त्यात आफ्रिकेचे चित्र दारिद्र्य, अपयश, व निराशा, पूर आणि दुष्काळ, गरिबी आणि साथीचे रोग, क्रौर्य, हुकुमशाही आणि भ्रष्टाचार, भयाण युद्धे आणि लुटालूट, बलात्कार, नरमांसभक्षण, अंगविच्छेद आणि शिवाय वाईट हवामान असे रंगवल्याने या सगळ्यांमुळे आफ्रिकेचे भविष्य नक्कीच काळवंडले आहे असा सूर दिसतो."5

शीतयुद्धानंतरच्या काळात विकासाबद्दलच्या चर्चांमध्ये 'भ्रष्टाचार' आणि 'भ्रष्टाचाराची चिंता' यांचा इतका उल्लेख होतो की, अनेक विकासाची धोरणे ठरवण्यात आणि त्याबाबतच्या वक्तव्यांत त्याला मध्यवर्ती स्थान मिळाले आहे. Transparency international या संस्थेने तयार केलेला 'भ्रष्टाचार गोचर निर्देशांक' [Corruption perception index] हा निरनिराळ्या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये सर्वांधिक पाहिला जाणारा निर्देशांक जगाच्या दक्षिण गोलार्धाचा विशेषतः आफ्रिका खंडाची समस्या असल्याचे दर्शवतो.

भ्रष्टाचाराने आफ्रिकेतील राष्ट्रांना ग्रासले आहे एवढेच नव्हे, तर ती खास आफ्रिकी बाब आहे असे म्हटले जाते. १९९६साली जेम्स वॉलफेन्सॉन यांच्या भाषणात त्यांनी आफ्रिकेत 'भ्रष्टाचाराचा कर्करोग' पसरला आहे असे म्हटले तेव्हापासून आफ्रिका म्हणजे भ्रष्टाचार असे समीकरण सर्वांच्या मनात रुजले.6 अशा उपमांमुळे भ्रष्टाचार ही केवळ आफ्रिकेत आढळणारी आजारासारखी समस्या बनते.7 'आफ्रिकेतच आढळणारे' छापाचे भ्रष्टाचारविषयक चर्वण8 हे अशा आदानप्रदानाचे फलित आहे, जी भ्रष्टाचार हे आफ्रिकेत केवळ मुरलेलाच आहे असे नव्हे तर ते आफ्रिकेच्या स्थितीचे सर्वांत मोठे कारण किंवा आव्हान आहे असे पसरवते.9

अशा तऱ्हेच्या चित्रणातून संपूर्ण खंडाला एकसाच्यात बसवण्याची, भूगोल आणि राजकारण जणू एकच असावे असे मानण्याची प्रवृत्ती उघड होते. खरे तर या खंडामध्ये ५४ स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात काही साम्ये जरूर आहेत, वसाहतवादाचा अनुभव, हे त्यातील एक. त्यातसुद्धा, फ्रेंच, ब्रिटिश, पोर्तुगीज, बेल्जिअन आणि जर्मन वसाहतवाद तसेच राजा लेओपोल्डचा अंमल किंवा दक्षिण आफ्रिका व ऱ्होडेशिया येथील गोऱ्यांच्या वस्त्या व त्यांचा वर्चस्ववाद यांत विविध कंगोरे आहेत. त्यांचा राष्ट्रवाद, वसाहतवादविरोधी लढाई, हा इतिहास सामाईक अशा अर्थाने आहे की, अनेक राष्ट्रवादी चळवळींनी मार्क्सवाद-लेनिनवाद, माओवाद, निग्रो अस्मिता आणि गार्वे प्रणीत काळ्यांचेच राज्य अशा विविध राजकीय विचारांपासून स्फूर्ती घेतली. त्यांनी त्यांचा अर्थ कसा लावला आणि त्यातून काय आकाराला आले यात मात्र खूपच वैविध्य होते. त्यामुळे विविध राजकीय समीकरणे आकाराला आली व त्यातून अतर्क्य व स्थानिक राजकीय युत्या व रचना निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, मार्क्सवादाची सांगड अगदी ख्रिश्चन धर्म, इस्लाम, स्थानिक धर्माशीही घालून काही जटिल, बदलत्या आणि संकरित राजकीय संस्कृती व चालीरीती निर्माण झाल्या. वसाहतवाद संपुष्टात येण्याच्या व स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मिती प्रक्रियेत परस्परांच्या भाषा न कळणारे अनेक भाषक एका सामाईक राजकीय समुदायाला जोडले गेले. त्यांच्या संस्कृती वेगळ्या होत्या, राजकीय इतिहास व शासनव्यवस्था एकसारख्या नव्हत्या आणि त्यांच्याकडे सामुदायिक सौहार्दपूर्ण सहजीवनाचा पायंडा पडलेला नव्हता. या मुख्य बाबींमुळे स्वातंत्र्यानंतर लगेच हुकुमशाही येण्याचा कल वाढला व त्यामुळे या देशांतील राजकारण इतके अस्थिर बनले.10 मात्र या देशांतील विविधतेत समानता आणण्याकडे कल ही काही केवळ पाश्चिमात्य देशांच्या नजरेची मर्यादा नव्हे. आफ्रिकी देशांचे राष्ट्रवाद या असामान्य वैविध्यपूर्ण अस्मिता, दृष्टिकोण, त्यात सहभागी घटक, समूह आणि वर्ग साऱ्यांना एकाच "आफ्रिकन" या साच्यात बसवू पाहतात हेही त्याचे एक कारण आहे.

सर्वसाधारण भ्रष्टाचार

आफ्रिका खंडाचे चित्रण वैचारिक लिखाणांत, माध्यमांच्या वार्तांकनात ज्या प्रकारे चालते ते संशयास्पद आहे हे जरी खरे असले, तरी कित्येक आफ्रिकी देशांमध्ये आर्थिक प्रगती, राजकीय स्थैर्य आणि एकंदर जगण्यातील आव्हाने खडतर व भरपूर आहेत; त्यातही चिकार वैविध्य आहे याचे उदंड पुरावे मिळतात. आफ्रिकी राज्य व राजकारण यांबाबत गैरसमज आहेत. कारण आफ्रिकी राजकारण हे जणू कोणतेही आदर्श, न्यायासाठी धडपड, समानतेची संकल्पना या कशाचाच पत्ता नसलेली, व्यक्तिगत संपत्तीसंचय आणि संरक्षण यापलीकडे न जाणारी व्यवस्था असा गैरसमज पसरला आहे,11 आणि अशा गैरसमजांमुळेच भ्रष्टाचारविरोधी कारवाया या उलटा परिणाम करणाऱ्या नसल्या, तरी निष्प्रभ ठरतात.

भ्रष्टाचाराची सर्वमान्य व्याख्या "सामाजिक अधिकारांचा वैयक्तिक फायद्यासाठी दुरुपयोग" अशी असून ती व्यवस्थेची घडी नीट न घातल्याने निर्माण झालेली समस्या असते असे मानले जाते. भ्रष्टाचार निरनिराळ्या प्रकारचा असतो, मात्र बहुतेक साऱ्या व्याख्यांमध्ये सर्व प्रकारचे भ्रष्टाचार एकाच तागडीत घातले जातात.

या दृष्टीने युएन युएन आंग यांचे चीनवरील पुस्तक किंवा त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर "चीनमधील आर्थिक घोडदौड आणि प्रचंड भ्रष्टाचार यांतील विरोधाभास" हे अतिशय तथ्यदर्शक आहे. त्या चीनच्या प्रगतीचा मार्ग भ्रष्टाचाराच्या लोलकातून पाहतात. या काहीशा नावीन्यपूर्ण मार्गाने त्या "मोठ्या अर्थव्यवस्थेने केलेल्या ऐतिहासिक सर्वांत जलद व स्थिर विस्तारा"तील विरोधाभासाचा उलगडा करतात. आंग चीनमधील भ्रष्टाचाराचे प्रकार उलगडत नेतात व बरेच अभिनव विश्लेषण करून असे दाखवून देतात की चीनमध्ये भ्रष्टाचाराचे विविध प्रकार असून त्यांतील काही प्रगतीसाठी चांगले आहेत. नफावाटणीची व्यवस्था, किंवी आंगच्या शब्दांत सांगायचे तर "मुभा द्रव्य" (जमीन, करार किंवा कर्जे मिळण्यासाठी उच्चपदस्थांना देऊ केलेली मोठ्या रकमेची लाच किंवा मोठे उपकार) हे प्रत्यक्षात प्रगतीला उपकारक आहे. असे पैसे चारण्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते, मात्र दीर्घकालीन सम्सय़ाही निर्माण होतात. १९९०पासून चीनने "वाईट प्रकारचा भ्रष्टाचार" कमी करण्यात यश मिळवले, मात्र मुभादेय भ्रष्टाचार टिकून राहिला, कारण केंद्राकडून स्थानिक नेत्यांवर आर्थिक प्रगतीचा दट्ट्या येत होता.

भ्रष्टाचाराकडे एकमितीय घटित असे पाहून चालणार नाही याकडे आंग लक्ष वेधतात. भ्रष्टाचाराचा जर गांभीर्याने अभ्यास करायचा असेल, तर त्यातील विविध गुणात्मक प्रकारांची उकल केली पाहिजे. त्यासाठी भ्रष्टाचारामागील सर्वदूर पसरलेली गृहीतके तपासून पाहायला हवीत.

याउलट, आफ्रिकेतील भ्रष्टाचाराबाबत जे वैचारिक लिखाण होते त्यात दुर्दैवाने सरसकटीकरण आढळते. आशिल म्बेमे याचे कारण "वर्णनवाद" आहे असे म्हणतात, जी ना कसली पद्धत आहे ना कसला सिद्धान्त. आफ्रिकेत आढळणाऱ्या जीवनशैलींची व्याख्या करण्यासाठी वा त्यांचा अर्थ लावण्यासाठी केवळ काही किस्से नाहीतर नकारात्मक विधाने करणे किंवा काही आकडेवारीच्या साहाय्याने आफ्रिकेची सद्यस्थिती व आदर्श स्थिती यांतील तफावतीचा उल्लेख करणे हीच प्रवृत्ती आढळते.12 "आफ्रिके"तील भ्रष्टाचाराबाबतचे शेऱ्यांकडे वर्णनवादाचे उदाहरण म्हणून पाहता येईल. राजकीय व्यवस्थेमध्ये खाजगी व सार्वजनिक अवकाशांत तीव्र व उघड असा भेद असतो हे त्यात गृहीत धरलेले असते.

दुसरीही एक प्रवृत्ती आढळते – मानवविज्ञानाच्या, इतिहासलेखनाच्या अंगाने जीवनशैलींबाबत तपशीलवार लिखाण करणे. क्षेत्रीय अभ्यासाच्या परंपरेतून आलेल्या अशा लिखाणातून काही ठाशीव उदाहरणेही मिळतात. मानवी आयुष्याबद्दल आपण कशा प्रकारे विचार केला पाहिजे, लिहिले पाहिजे तसेच कोणत्या विश्लेषणात्मक पद्धती वापरून विशिष्ट ठिकाणच्या समाजजीवनाचे वर्णन व आकलन करता येईल याची उकल त्यातून होते.13 अशा प्रकारची वांशिक अभ्यासाची अंतःप्रेरणा "आफ्रिके"वरील चर्चांच्या विरोधी असते. सरससकटीकरणाऐवजी मग त्यातून भरपूर वैविध्य व फरकाचा, ऐतिहासिक व समकालीन भूगोल सामोरा येतो. या संदर्भात मग "भ्रष्टाचारा"चा सामाजिक संकेत त्याच्या परिस्थितीनुसार समजून घ्यावा लागतो.

सापेक्ष भ्रष्टाचार

आपल्या १९७५च्या पुस्तकातून पीटर एकेह असे परिस्थितीसापेक्ष विश्लेषण करण्याचा मार्ग दाखवात. आपल्या Colonialism and the Two Publics in Africa या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की वसाहतकालीन आफ्रिकेने वसाहतोत्तर काळात एक विशेष असे ऐतिहासिक बाह्यस्वरूप निर्माण केले, त्या खंडाच्या दोनपैकी एक चेहरा. पहिला, आदिम लोकांचा, ज्यात प्रत्येक सदस्य व्यक्ती आपले कर्तव्य ही नैतिक जबाबदारी मानून त्याद्वारे आपल्या समूहासाठी फायदा व आधार निर्माण करते. कोणालाही या समूहाकडून भौतिक सुखाच्या अपेक्षा नसतात, तर केवळ समूहासाठी आपुलकीची भावना आणि भावनिक सुरक्षितता हा फायदा मिळण्याची आस असते. याउलट, नागर लोकांकडे (वसाहती सरकारने वसवलेले भूभाग, सरकारी आणि सार्वजनिक संस्था या सर्वांसह) अनैतिक वागणुकीचे व केवळ आर्थिक लाभ मिळवणारे अशा दृष्टीने पाहिले जाते. अशा परिस्थितीत लोक आदिम चेहरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यासाठी ते अनेकदा नागरी कार्यक्षेत्रातील जे वेगळे किंवा दोलायमान असते ते पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात. आदिम लोकांना कायम कोणाच्यातरी आपुलकीची गरज असते, तशी नागर लोकांना नसते. आफ्रिकेतील अनेक राजकीय आव्हाने ही या द्वंद्वातून, आणि त्या दोहोंना सामाईक अशी नैतिकता नसल्याने उद्भवलेली आहेत. शिवाय, असे तात्त्विक विवेचन करताना असे विश्लेषण भ्रष्टाचाराच्या प्रश्नाकडे नैतिक दौर्बल्य, किंवा विकासाच्या महत्त्वाकांक्षेपायी बहकलेली राजकीय अर्थव्यवस्था या दृष्टिकोणातून न पाहता राजकारणाच्या स्थानिक आविष्कारातून तयार झालेले घटित म्हणून त्याची मांडणी करता येते.

दक्षिण आफ्रिका या देशाच्या संदर्भात पीटर एकेह यांची मांडणी वंशभेदी राजवटीनंतरच्या काळातील वारंवार आढळणारी घटना समजून घेण्यास मदत करते. जेथे जेथे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे राज्य आहे तेथे बहुतेक सर्व ठिकाणी सार्वजनिक पायाभूत सुविधांना उतरती कळा लागलेली दिसते. देशभरातल्या नगरपालिकांमध्ये, अगदी जोहान्सबर्गसारख्या मोठ्या शहरांमध्येही रस्ते, जलसंधारण प्रकल्प, वीजपुरवठा यांची देखभाल असमाधानकारकच आहे असे नव्हे, तर त्याचे अपुरेपण धक्कादायक आहे. ही हलाखी केवळ शहरे, निमशहरे येथेच आढळते असे नाही, काही ठिकाणी तर अनास्था हीच त्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दशकभरातील लूटमार, अकार्यक्षम व्यवस्थापन यामुळे तेथील Eskom ही वीजनिर्मिती कंपनी सबंध देशाला रोज कित्येक तास अंधारात लोटते. त्याचप्रमाणे Transnet ह्या वाहतूक कंपनीची अवस्था अशी झाली आहे की, लाखो टन कोळसा आणि इतर वस्तू निर्यातीसाठी बंदरांपर्यंत पोहोचू शकत नाही. या सर्व परिस्थितीचे वर्णन करताना नेहमीच यात गुंतलेल्या लोकांचा भ्रष्टाचार, नैतिकता (किंवा तिचा अभाव) हीच कारणे विशद होतात. अशा विश्लेषणातून मग वंशभेदी राजवटीनंतरच्या सरकारच्या, किंबहुना वसाहतवादी राजवटींनतरच्या सर्वच सरकारांच्या नैतिक मूल्यांबाबत निष्कर्ष काढले जातात. पीटर एकेह यांची मांडणी अशा नैतिकताधिष्ठित कारणमीमांसेचे खंडन करते. दक्षिण आफ्रिका देशातील Eskom व Transnet या सरकारी कंपन्या केवळ वर्णद्वेशी काळातील नागरी वस्तीपायी अस्तित्वात आल्या नव्हत्या. त्या तेथील आर्थिक मुकुटातील रत्ने होत्या. त्यांची झालेली लूट ही केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हती, तर आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्याही राजकीय मोहिमांना आर्थिक मदत म्हणून असे : एकेह यांच्या भाषेत आदिम लोकांसाठी. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर भ्रष्टाचार ही नागरी समाजातील अनैतिक कृती ही आदिम नैतिक समाजाच्या हितासाठी वापरली गेली. याचा अर्थ एकेह यांच्या मांडणीतील 'आदिम' समाज हा नात्यागोत्याच्या लोकांचा गोतावळा नसून राजकीय पक्ष आहे.

आफ्रिकन म्हणजे नक्की काय ?

जर आपण आफ्रिकेकडे वैविध्यपूर्ण आणि बहुस्तरीय भूभाग म्हणून पाहिले तर भ्रष्टाचार, आर्थिक साचलेपण, राजकीय अस्थिरता आणि अशा इतर बाबी या "आफ्रिकन" समस्या असा शिक्का मारून चालणार नाही, तर त्या विशिष्ट परिस्थितीशीजन्य आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ते ज्या विशिष्ट पार्श्वभूमीवर व ज्या परिस्थितीत निर्माण होतात – कधी स्थानिक, कधी राष्ट्रीय, कधी प्रांतीय तर कधी वैश्विक – त्यांचा विचार झाला पाहिजे. तसेच, ज्या सामाजिक मान्यतांना कायदा व आंतरराष्ट्रीय संस्था 'भ्रष्टाचार' मानतात, त्यांना त्यांच्या परिसंस्थेत तसाच सामाजिक अर्थ गृहीत धरून चालणार नाही. या दृष्टिकोणातून भ्रष्टाचारविरोधी लढा हा सर्व आफ्रिकनांना एका साच्यात बसवणाऱ्या परिभाषेचा त्याग करण्यासाठीचा लढादेखील आहे.

References:

Chipkin, I. 2022. The Dark Side of Democracy. Popular Sovereignty, Decolonisation and Dictatorship. Političke Perspektive, Vol. 12. Issue 1, pp. 35 – 52.

Hellmann, O. 2019. The Visual Politics of Corruption. Third World Quarterly, Vol. 40, Issue 12.

Harrison, E. 2010. Corruption, in: (eds.) Cornwall, A. Eade, D. Deconstructing Development Discourse: Buzzwords and Fuzzwords, pp. 257-265.Practical Action Publishing.

Szeftel, M. 1998. Misunderstanding African Politics: Corruption and Governance Agenda. Review of Review of African Political Economy, no. 76, pp. 221-240.

Ferguson, J. 2006. Global Shadows: Africa in the Neoliberal World Order. Duke University Press.

Apata, G.O. 2018. Corruption and Postcolonial State: how the West invented African corruption. Journal of Contemporary African Studies, 37: 4, pp. 1-14.

Ang, Y. Y. 2020. China's Gilded Age: the paradox of economic boom and vast corruption. Cambridge University Press.

Ekeh, P. 1975. Colonialism and the Two Publics in Africa: a theoretical statement. Comparative Studies in Society and History, vol. 17, issue 1, pp. 91-112.

Mbembe, A. 2021. Out of the Dark Night: essays on decolonisation. Columbia University Press.

Sarr. F. 2019. University of Minnesota Press.

Notes


 1. Ferguson, 2006 8 

 2. Sarr, 2019 

 3. Ferguson, 2006: 10 

 4. Ferguson, 2006 

 5. Mbembe, 2021: 8 

 6. Harrison, 2010 

 7. Apata, 2018 

 8. आपल्या २०१९च्या लेखात हेलमान दाखवून देतात की, Transparency international या संस्थेने आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेमध्ये वसाहतवादी काळानंतरच्या चष्म्यातून दृश्य भ्रष्टाचाराचे राजकारण खेळले गेले. त्यासाठी ते दोन महत्त्वाचे मुद्दे मांडतात : स्पर्धेत दाखल झालेली व बक्षीस मिळालेली छायाचित्रे दोन टोकाची विरोधी चित्रणे दाखवतात – उत्तरेकडचा भाग हा गुणी, मदतीला धावून येणारा, तंत्रकुशल तर्कशुद्धता ओतप्रोत भरलेला, तर दक्षिणेकडला भाग त्याच्या पातकी आणि तर्कहीन स्थितीतून कोणी त्याला वाचवेल म्हणून वाट पाहणारा. मात्र दक्षिण गोलार्धातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देऊन ते वाढवण्यात असलेल्या उत्तर गोलार्धाच्या सहभागावर पांघरूण घातले जाते.) 

 9. Szeftel, 1998; Wrath and Wilkins in Apata, 2018 

 10. Chipkin, 2022 

 11. Szeftel, 1998 

 12. Mbembe, 2021: 14 

 13. Mbembe, 2021: 14 

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख तूर्तास वरवरच वाचला. सवडीने सविस्तर वाचेन. (‘आफ्रिका ही संकल्पना’ या भागातला) सरसकटीकरणाचा मुद्दा पटण्यासारखा. मात्र, याला (या सरसकटीकरणाला) दुसराही एक आयाम आहे, त्याचा उल्लेख लेखात जर आला असेलच, तर माझ्या नजरेतून सुटला, म्हणावा लागेल.

आपण आफ्रिकेकडे एक मोनोलिथ म्हणून बघतो, परंतु त्यांच्यातही भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, झालेच तर जानसमूहिक (? की जनसामूहिक? इथियोपियातल्या जाती-जमाती-टोळ्या वेगळ्या नि सेनेगालमधील जाती-जमाती-टोळ्या वेगळ्या; दोन्हींकडील लोक (बहुधा) काळे दिसतात, यापलीकडे दोहोंत काहीही साधर्म्य नाही, अशा अर्थाने म्हणायचे होते. व्याकरणाच्या दृष्टीने जानसमूहिक हा शब्द, कृत्रिम वाटला, तरी बहुधा बरोबर असावा. परंतु ते असो.) वैविध्य प्रचंड आहे, झालेच तर सामाजिक परिस्थिती वा समस्या सर्वत्र सारख्या नसू शकतात, या बाबीकडे आपले प्रचंड दुर्लक्ष होते. (नि मग कोठल्याशा काल्पनिक कथेत जोहानिसबर्गमधली स्थानिक पोट्टीपाट्टी फाडफाड स्वाहिली बोलू लागतात. शेवटी आपल्या लेखी दोन्हीं इकडूनतिकडून सारखेच; चालायचेच!) मला वाटते आपण या मुद्द्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न तेथे केलेला आहे. ते ठीकच आहे. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे.

बोले तो, ‘आफ्रिका खंड’ म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर चटकन नक्की कोण(कोण)ते देश (प्रातिनिधिक स्वरूपात) उभे राहतात? केनया? दक्षिण आफ्रिका? इथियोपिया? झिम्बाब्वे? कदाचित नायजीरिया?

की इजिप्त? मोरोक्को? अल्जीरिया? (हेही देश आफ्रिका खंडातच तर आहेत की!)

कदाचित आपल्या मोनॉलिथिक संकल्पनेत वांशिक सरसकटीकरणाचाही (मोठा) भाग आहे काय?

असो. लेख वरवरच चाळला असल्याकारणाने, लेखातील उर्वरित मुद्द्यांबाबत तूर्तास भाष्य करू इच्छीत नाही. (शिवाय, त्याबद्दल मला अजिबातच गम्य नसण्याच्या शक्यतेस तूर्तास तरी मी डिस्काउंट करू शकत नाही.) परंतु तरीही, जाता जाता एकच खुसपट:

दक्षिण आफ्रिका या देशाच्या संदर्भात पीटर एकेह यांची मांडणी वंशभेदी राजवटीनंतरच्या काळातील वारंवार आढळणारी घटना समजून घेण्यास मदत करते. जेथे जेथे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे राज्य आहे तेथे बहुतेक सर्व ठिकाणी सार्वजनिक पायाभूत सुविधांना उतरती कळा लागलेली दिसते. देशभरातल्या नगरपालिकांमध्ये, अगदी राजधानी जोहान्सबर्गसारख्या मोठ्या शहरांमध्येही रस्ते, जलसंधारण प्रकल्प, वीजपुरवठा यांची देखभाल असमाधानकारकच आहे असे नव्हे, तर त्याचे अपुरेपण धक्कादायक आहे.

दक्षिण आफ्रिकेस (संसदेची जागा, प्रशासनाची जागा, तथा सर्वोच्च न्यायालयाची जागा, अर्थात legislative capital, administrative capital, तथा judicial capital अशा) तीन वेगवेगळ्या राजधान्या तीन वेगवेगळ्या शहरांत आहेत. मात्र, यांपैकी एकही राजधानी जोहानिसबर्ग येथे नाही. (Legislative capital: Cape Town, Administrative capital: Pretoria, Judicial capital: Bloemfontein.) किंबहुना, जोहानिसबर्ग ही कोठल्याही प्रकारे दक्षिण आफ्रिकेची राजधानी नाही. (फार फार तर एक मोठे नि महत्त्वाचे शहर आहे.)

(आता, यात मी काही फार मोठे, प्रगल्भ वगैरे सांगत आहे, अशातला भाग नाही. एखादे शाळकरी पोरदेखील हे सांगू शकले असते. किंवा, गेला बाजार, विकीवरून ही माहिती चटकन सापडली असती. आणि, एरवी अत्यंत विद्वत्ताप्रचुर (चूभूद्याघ्या.) अशा लेखात इतकी मूलभूत घोडचूक शोभत नाही, नि चटकन डोळ्यांत भरते, खटकते. थोडे मुद्रितशोधनावर कष्ट घ्यायला मला वाटते हरकत नव्हती. असो चालायचेच.)

(हे एक भाषांतर आहे, ‌असे लक्षात घेतले, तरीही, मूळ लेखात जर जोहानिसबर्गचा उल्लेख राजधानी म्हणून असला, तर तो भाषांतरात तसाच ठेवून परंतु तळटीपेद्वारे सुधारणा करून तसेच तळटीपेत चुकीचा श्रेयअव्हेर करून हाताळता आला असता. किंबहुना, तसे करणे योग्य (तथा आवश्यक) ठरले असते. उलटपक्षी, मूळ लेखात जर जोहानिसबर्गचा उल्लेख राजधानी म्हणून नसेल, आणि अनुवादिकेने जर तो (उत्साहाच्या भरात?) पदरचा घातला असेल, तर मग तो उल्लेख चुकीचा आहे याहूनही अधिक मोठे प्रश्न उपस्थित होतात. मुळात भाषांतराची integrity त्या परिस्थितीत प्रश्नांकित होते. काहीही असले, तरी, झाला प्रकार लाजिरवाणा आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. अधिक काय लिहावे?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार. ही दुरुस्ती केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरसकटीकरणाचा मुद्दा ठीकच आहे, आणि आफ्रिकेवर संशोधन करणार्‍यांमध्ये हा जुना वाद आहे. आफ्रिकेला वैविध्यपूर्ण खंड म्हणून पाहणारे आहेत, आणि हे मान्य करूनही त्या देशांतल्या अनेक समान बाबींवर भर देऊन आफ्रिकेला बृहत-देशाच्या स्वरूपात पाहणारेही आहेत. पहिल्या गटातल्या लोकांचं म्हणणं असतं की काही उठून दिसणार्‍या देशांच्या संस्कृतीवरून अखंड आफ्रिकेच्या संस्कृतीबद्दल बरंवाईट बोललं जातं, आणि त्यामुळे खंडाची भौगोलिक आणि सांस्कृतिक वैविध्यता नजरेआड राहते. दुसर्‍या गटातले लोक हे मान्य करूनही खंडातल्या समान अडचणी, प्रथा वगैरेंकडे बोट दाखवतात. दोन्ही गटांमध्ये ही ओढाताण चालूच असते, आणि दोन्ही बाजूंमध्ये तथ्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला! भारतालाही लागू होणारे मुद्दे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0