टिंबक्टू – इतिहास आणि वर्तमान

 #टिंबक्टू #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

टिंबक्टू – इतिहास आणि वर्तमान

- देवकी एरंडे

आपण सगळ्यांनी कधी ना कधी तरी "टिंबक्टू" हा शब्द ऐकलेला असतो. अनेक अर्थांनी टिंबक्टू हे झुमरीतलैयासमान एक काल्पनिक, रम्य ठिकाण मानले जाते. हा संदर्भ अनेक हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा पाहायला मिळतो. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने म्हटल्याप्रमाणे टिंबक्टू म्हणजे "कल्पनेतील सर्वात दूरचे ठिकाण". अशा 'काल्पनिक' ठिकाणी काम करायला जायला मिळेल, असे मला कधी वाटले नव्हते. पण 'नकाशा नकाशा' खेळताना काही वर्षांपूर्वी फक्त कल्पनेतच असणारे हे शहर एकदा कधीतरी जगाच्या नकाशावर दिसले आणि आपल्याच अज्ञानाची मजा वाटलेली अजून आठवते! नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास सुरु केल्यापासून टिंबक्टूच्या ऐतिहासिक महत्त्वाची तोंडओळख झाली. त्या जागेबद्दल असलेले वलय, तेथील सर्वदूर पसरलेले ते प्रचंड सहारा वाळवंट, त्या वाळवंटातील एक प्रसिद्ध संगीत महोत्सव आणि एकूणच त्या नावाबद्दल असलेले गूढ ह्यामुळे एकदातरी तिकडे जाता आले तर किती बहार येईल असे मला काही वर्षांपूर्वी वाटून गेले होते. अर्थात मी ते विसरूनही गेले होते. पण काही वेळेस अगदी अनपेक्षितपणे आपली स्वप्ने सत्यात उतरतात, आणि टिंबक्टूच्या बाबतीत माझे तसेच झाले. २०२० साली जेव्हा मी 'इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस'बरोबर मालीला कामाला जाणार हे निश्चित झाले तेव्हा राजधानी बामाकोबरोबरच मोपती आणि टिंबक्टूला सुद्धा मला सतत कामानिमित्त जावे लागेल असे कळले आणि मला कोण आनंद झाला! कल्पनेतील जागा सत्यात बघायला मिळणार याचे मला खूप अप्रूप वाटत होते आणि कधी एकदा मी तिकडे जातेय असे झाले होते.

टिंबक्टू नकाशा

खरे तर कुठल्याही नवीन ठिकाणी जायच्या आधी मी त्याबद्दल मुद्दामच काही वाचायचे टाळते. उगीच पूर्वग्रह होतात आणि ती नवीन जागा जाणून घ्यायच्या निखळ आनंदाला आपण मुकतो असे मला वाटते. मात्र टिंबक्टूबद्दलची तीव्र ओढ मला काही स्वस्थ बसून देत नव्हती आणि मी जरा इंटरनेट राजाला हाक घातली. तेव्हा समोर आले सर्वप्रथम मनसा मुसा हे नाव. तसे बघायला गेले तर आपल्यासाठी अगदीच अपरिचित नाव. पण मनसा मुसा, म्हणजे बादशाह मुसा हा टिंबक्टूचा करविता. साधारणपणे बाराव्या शतकात (तर काहींच्या मते पाचव्या) तुआरेग भटक्या लोकांनी वसवलेले टिंबक्टू हे आधी फक्त तात्पुरती वसाहत म्हणून प्रसिद्ध होते. पण मनसा मुसासारख्या द्रष्ट्या राज्यकर्त्याने टिंबक्टूचे अतिशय मोक्याचे भौगोलिक स्थान ताडले आणि उत्तर, पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या प्रदेशांमधील मध्यबिंदू म्हणून नावारूपास आणले. त्याच्या द्रष्टेपणाने सहारा वाळवंटाच्या प्रवेशद्वारावर, सुदानच्या सुपीक प्रदेशाच्या हद्दीत आणि नायजर नदीपासून साधारण नऊ मैलांवरील एका विलक्षण प्रसन्न जागेत वसलेल्या टिंबक्टूला व्यापारउदीमाचं मुख्य स्थान, आणि सहारा वाळवंटातून जाणाऱ्या मुख्य मार्गांवर दक्षिणेकडील मार्गांचे प्रवेशद्वार म्हणून एक विलक्षण महत्त्व मिळाले. २०० वर्षांच्या आत टिंबक्टू हे मीठ आणि सोन्याच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गांच्या केंद्रस्थानी असलेले एक अत्यंत श्रीमंत शहर बनले. तिथे हस्तलिखितांच्या व्यापारासाठी वाटाघाटी होत असत. उत्तरेला तेगाझा येथून मीठ, सोने विकले जात असे, आणि दक्षिणेकडून गुरे व धान्य विकले जात असे. हे एक महत्त्वाचे बाजारस्थान होते.

पण फक्त व्यापारावर भर न देता मुसाने इस्लामी शैक्षणिक संस्थासुद्धा सुरू केल्या; आणि ज्या अस्तित्वात होत्या, त्यांना एक नवी झळाळी दिली. त्यामुळे हे शहर जगप्रसिद्ध व्यापारी महासत्तेबरोबरच मध्ययुगीन जगाचे शैक्षणिक केंद्र बनले. जणू काही त्या काळातील एक बौद्धिक आणि आध्यात्मिक राजधानीच! मुसाने टिंबक्टू शहरात इस्लामी शिक्षणाचे विद्यापीठ स्थापन करून त्याला मोठी किर्ती मिळवून दिली. केवळ इस्लामी अभ्यासच नव्हे, तर इतिहास, वक्तृत्व, कायदा, विज्ञान आणि विशेषत: वैद्यकशास्त्र हेही विषय या विद्यापीठात शिकवले जात. त्याचबरोबर गणित, खगोलशास्त्रापासून ते वैद्यकशास्त्र आणि कायद्यापर्यंत, तसेच इस्लामची महान शिकवण येथे संकलित करून अनेक लाख हस्तलिखितांमध्ये जतन करण्यात आली. ही हस्तलिखिते – काही चौदाव्या शतकातील आणि बहुतेक अरबी भाषेत लिहिली गेलेली – असे दर्शवितात की, मध्ययुगीन टिंबक्टू हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र होते तसेच सहारा वाळवंटातून जाणाऱ्या मुख्य मार्गांवरील एक मध्यवर्ती, सर्व दिशांना जोडलेले मोक्याचे शहर होते. नायजर नदी आणि सहारा ज्या ठिकाणी एकत्र येतात अशा ठिकाणी वसलेले हे ठिकाण म्हणजे भूमध्य समुद्रातील व्यापारी आणि मोठ्या इस्लामी जगासाठी बांधलेल्या आफ्रिकी वस्तूंचे प्रवेशद्वार होते. मुसानंतर आलेल्या सोंगहाई साम्राज्याच्या अंतर्गत हे शहर, १८०पेक्षा जास्त मदरसे आणि विद्यापीठ असलेले महान मुस्लिम शैक्षणिक केंद्र बनले. मनसा मुसाच्या कारकिर्दीच्या अखेरीस (इसवी सन चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस) संकोरे मशीद, ज्याला संकोरे विद्यापीठ म्हणून देखील ओळखले जाते, जगातील पहिल्या विद्यापीठांपैकी एक होते. ऑक्सफर्ड आणि सरबोनचे समकालीन असलेल्या टिंबक्टूच्या संकोरे विद्यापीठातील शिक्षणाची पातळी जगातील इतर सर्व इस्लामी केंद्रांपेक्षा श्रेष्ठ होती. जिंगुरेबर, सिदी याह्या आणि सांकोरे या तीन मदरशांमध्ये २५,००० विद्यार्थ्यांची सोय होती; ज्यामुळे हे त्या वेळचे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ बनले होते. ह्या सगळ्यावरून आपल्याला अंदाज येईल की खरे तर टिंबक्टू एकेकाळी उच्च शिक्षणाचे आश्रयस्थान होते.

युरोपात जेव्हा Renaissance लाट उसळली होती, तेव्हा टिंबक्टू हे आधीच विपुल लिखित परंपरेचे केंद्र होते. त्या काळात टिंबक्टूमध्ये असंख्य कुरानिक शाळांबरोबरच तब्बल ८० मोठी खाजगी ग्रंथालये होती. उत्तर आफ्रिका, अरबस्तान आणि अगदी पर्शियातूनही टिंबक्टूच्या हस्तलिखितांकडे विद्वान ओढले गेले. शहराच्या सुवर्णयुगात इतर सर्व व्यापारी वस्तूंपेक्षा पुस्तके ही सर्वात मौल्यवान वस्तू बनली. टिंबक्टूमध्ये ७ लाखांहून अधिक हस्तलिखिते होती, ज्यामुळे आफ्रिकी इतिहासाची एक अनमोल लिखित नोंद तयार झाली.

टिंबक्टू मातीचं घर

पण हे सगळे जरी टिंबक्टूमध्ये घडत होते तरी जगाच्या नकाशावर अजून त्याचा पत्ताच नव्हता. तो मिळाला जेव्हा मुसाने आपल्या हजयात्रेच्या माध्यमातून टिंबक्टू आणि सर्वसाधारणपणे माली साम्राज्याची उर्वरित मध्ययुगीन जगाला ओळख करून दिली. मुसाची ही हजयात्रा फारच कमाल होती. असे म्हणतात की मुसाने १३२४ ते १३२५ या काळात २,७०० मैलांचा प्रवास केला. त्याच्या यात्रेत साठ हजार पुरुषांचा समावेश होता. त्यांनी ब्रोकेड आणि पर्शियन रेशीम परिधान केले होते. त्याचबरोबर त्याच्याबरोबर बारा हजार गुलामांचा समावेश होता, ज्यांनी प्रत्येकी १.८ किलो (४ पौंड) सोन्याच्या विटा बाळगल्या होत्या आणि रेशीम परिधान केलेले सैनिक ज्यांनी सोन्याची पाती असलेले भाले घेतले होते. मुसाने त्याच्या यात्रेसाठी सढळ हाताने खर्च केला होता आणि त्याचबरोबर असलेल्या त्याचा ताफ्यातील सर्वांच्या सगळ्या गरजा पुरवल्या. वाटेत भेटलेल्या गरिबांना सोने दिले, कैरो आणि मदिनासह मक्केला जाताना वाटेतल्या शहरांना त्याने सोने तर दिलेच, पण सोन्याचा व्यापारही केला. दर शुक्रवारी त्याने एक मशीद बांधली अशाही कथा सांगितल्या जातात. मुसाच्या मक्केच्या यात्रेनंतर कैरोला भेट देणाऱ्या अल-उमरी यांनी नमूद केले की, "हे सामर्थ्य, संपत्ती आणि त्याच्या आकाराचे आणि सौंदर्याचे अभूतपूर्व प्रदर्शन होते". मुसाने आपल्या देशाची संपत्ती यथासांग सर्वांसमोर मांडली. काही अरबी लेखकांच्या मते, मुसाच्या भेटवस्तू देण्यामुळे इजिप्तमध्ये सोन्याच्या मूल्यात घसरण झाली आणि किमान बारा वर्षे तरी त्याची परिस्थिती सुधारली नाही! मुसाच्या हज यात्रेने एका दगडात दोन पक्षी मारले – माली साम्राज्याचे वैभव लोकांसमोर आले आणि टिंबक्टू जगाच्या नकाशावर विराजमान झाले. त्याचबरोबर अरब प्रवाशांना उत्तर आफ्रिकेला भेट देण्यासाठी प्रेरणा मिळाली. पुढे लिओ आफ्रिकन्ससारख्या लेखकाच्या माध्यमातून त्याच्या अफाट श्रीमंतीच्या कथा युरोपपर्यंत पोहोचल्या, ज्यामुळे युरोपीय खलाशांच्या मनात तीव्र कुतूहल निर्माण झाले. युरोपीय मात्र खडतर आणि लांबलचक प्रवासामुळे फार उशिरापर्यंत या शहरात पोहोचणार नव्हते, त्यामुळे या शहराभोवती गूढतेची आभा निर्माण झाली होती. त्यामुळेच टिंबक्टू हा शब्द म्हणजे पृथ्वीच्या टोकापर्यंत तीन अक्षरांचा प्रवास होय असा विचार रुजू झाला आणि त्याभोवतीचे गूढतेचे वलय अजूनच गडद होत गेले. टिंबक्टूच्या सुबत्तेची रंजक कथा युरोपीय लोकांपर्यंत यथासांग पोहोचली, पण प्रवासाची जमवाजमव करून प्रत्यक्ष तिथे पोहोचेपर्यंत त्यांना बराच उशीर झाला. ते आले ते एका समृद्ध, श्रीमंत टिंबक्टूमध्ये नाही, तर अनेक टोळ्यांच्या स्वाऱ्या आणि त्यांनी केलेल्या लुटीच्या जखमा घेऊन कोलमडलेल्या टिंबक्टूमध्ये. त्यामुळे जेव्हा युरोपीय प्रवाशांना ते शोधत असलेले सोने सापडले नाही आणि त्याऐवजी तेथे पोहोचणे किती अवघड आहे हे लक्षात आले, तेव्हा शहराची किर्ती त्याच्या सोन्यामुळे प्रसिद्ध होण्याऐवजी त्याच्या स्थान आणि गूढतेमुळे बदनाम होण्याकडे वळली. किमान १८६३पासून या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दकोशात आता टिंबक्टूचा उल्लेख कोणत्याही दूरच्या ठिकाणाचे रूपक म्हणून केला जातो. एकोणिसाव्या शतकात युरोपीय खलाशी येथे जाण्याच्या प्रयत्नात मरण पावले. टिंबक्टू हे एक असे ठिकाण म्हणून सामूहिक कल्पनेत रुजले, जे इतके विलक्षण आहे की कदाचित ते अस्तित्वातच नसेल.

अलीकडच्या वर्षांत टिंबक्टूमध्ये हजारो मध्ययुगीन हस्तलिखिते सापडली आहेत ज्यात स्त्रियांच्या कविता, कायदेशीर विचारमंथन आणि नाविन्यपूर्ण वैज्ञानिक ग्रंथांचा समावेश आहे. आफ्रिकी आणि इस्लामी संस्कृतींबद्दलच्या कल्पनांना त्यामुळे नवे वळण मिळत आहे. कृष्णवर्णीय आफ्रिकेत साक्षरता आणि बौद्धिकता होती, हे या हस्तलिखितांतून स्पष्ट झाले आहे. आफ्रिका हा 'गीत आणि नृत्याचा खंड' आहे, या कल्पनेला त्यामुळे तडा जातो. नाजूक वाङ्मयीन कलाकृतींचे जतन करण्यासाठी २००९मध्ये बांधण्यात आलेल्या अहमद बाबा इन्स्टिट्यूटतर्फे सुमारे २० हजार हस्तलिखिते जतन करण्यात आली आहेत. इजिप्तच्या अलेक्झांड्रिया ग्रंथालयानंतर आफ्रिकेतील हस्तलिखितांच्या सर्वांत मोठ्या ग्रंथालयांपैकी हे एक. अनेक पुस्तके काही स्थानिक कुटुंबांच्या खासगी ग्रंथालयांमध्येही आहेत. ही कुटुंबे त्यांच्या हस्तलिखितांचा आदर करतात, अगदी वर्षातून एकदा मौलाऊद नावाच्या सुट्टीद्वारे त्यांचा सन्मान करतात, ज्या दिवशी इमाम आणि कुटुंबातील वडील पैगंबर मोहम्मद यांच्या जन्माचे औचित्य साधून प्राचीन प्रार्थना पुस्तकांचे वाचन करतात. २०१२ साली इस्लामी अतिरेक्यांनी शहरावर कब्जा करण्यापूर्वी आणि दरम्यान, अहमद बाबा इन्स्टिट्यूट आणि खाजगी ग्रंथालयांमधील ३ लाखांहून अधिक टिंबक्टू हस्तलिखिते जतन करून मालीमधील अधिक सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. पण ह्या व्यतिरिक्त सापडत असलेला साठा मात्र आज नामशेष होण्याचा धोका आहे दिवसेंदिवस वाढत आहे, कारण वाळू आणि इतर घटकांमुळे अनेक जुने ग्रंथ नष्ट होत आहेत, त्यांचे विघटन होत आहे. आज टिंबक्टूमधली बहुतेक अनमोल हस्तलिखिते खाजगी हातात आहेत, जिथे ती बऱ्याच वर्षांपासून लपवून ठेवली गेली आहेत आणि काही काळ्या बाजारात गायब झाली आहेत. यामुळे टिंबक्टूच्या अस्मितेचा काही भाग नामशेष होण्याचा धोका आहे.

९०० वर्षांच्या इतिहासात टिंबक्टू अनेक वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या नियंत्रणाखाली होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला माली साम्राज्याने ते आपल्या ताब्यात घेतले. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात, १४६८मध्ये विस्तारित सोंगहाई साम्राज्याने हे शहर ताब्यात घेईपर्यंत तुआरेग लोकांनी थोड्या काळासाठी शहराचा ताबा घेतला. मोरोक्कोच्या सैन्याने १५९१मध्ये सोंगहाईचा पराभव केला आणि गाओऐवजी टिंबक्टूला राजधानी बनवले. आक्रमणकर्त्यांनी आर्मा नावाचा नवा शासक वर्ग स्थापन केला, जो १६१२नंतर मोरोक्कोपासून स्वतंत्र झाला. सोळाव्या शतकात मोरोक्कोच्या आक्रमकांनी विद्वानांना हाकलून लावायला सुरुवात केली आणि व्यापाराचे मार्ग हळूहळू किनाऱ्यांकडे वळले. टिंबक्टूचे महत्त्व व प्रतिष्ठा कमी झाली आणि अभ्यासक इतरत्र पांगले. १८९३मध्ये फ्रेंचांनी सत्ता हाती घेईपर्यंत वेगवेगळ्या जमातींनी राज्य केले, ही परिस्थिती १९६०मध्ये सध्याच्या माली प्रजासत्ताकाचा भाग होईपर्यंत कायम राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फ्रेंच वसाहतीमुळे टिंबक्टूच्या पूर्वीच्या वैभवाला आणखी एक गंभीर धक्का बसला. टिंबक्टूमधील परिस्थिती इतकी बिघडली की, काही वर्षांपूर्वीच जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली असली तरी १९९०मध्ये धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान देण्यात आले. परंतु तीन प्राचीन मशिदींच्या जतनात मोठ्या सुधारणा झाल्याने २००५मध्ये टिंबक्टू या यादीतून बाहेर आला. मात्र २०१२मध्ये सशस्त्र संघर्षाशी संबंधित धोक्यांमुळे टिंबक्टूला पुन्हा एकदा जागतिक वारसा धोक्याच्या यादीत टाकण्यात आले.

टिंबक्टू मातीचं घर

मार्च २०१२मध्ये मालीच्या लष्कराने तत्कालीन अध्यक्ष अमादू तोमानी तुरे ह्यांना बडतर्फ केले आणि राजधानी बामाकोचा ताबा घेतला. ह्या लष्करी बंडामुळे माजलेल्या गोंधळाचा इस्लामी अतिरेक्यांच्या पाठिंब्याने तुआरेग बंडखोरांनी फायदा उठवला नसता तरच नवल. त्यांनी तत्परतेने गाओ, किदाल आणि टिंबक्टू यांच्यावर आपला झेंडा फडकवला आणि टिंबक्टूच्या सांस्कृतिक अस्मितेला अजून एक मोठा धोका निर्माण झाला. तुआरेगांनी टिंबक्टूसह या प्रदेशावर अझावादचे स्वतंत्र राज्य म्हणून दावा केला. तथापि, तुआरेग बंडखोरांची जागा लवकरच इस्लामी अतिरेक्यांनी घेतली आणि नंतर त्यांनी रहिवाशांवर शरीयतची (इस्लामी कायदा) कठोर आवृत्ती लादली. इस्लामी अतिरेक्यांनी – विशेषत: अंसार दीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गटाने – टिंबक्टूची अनेक ऐतिहासिक धार्मिक स्मारके आणि कलाकृती मूर्तिपूजक मानल्या आणि त्यासाठी, त्यांनी जिंगुरेबर आणि सिदी याहिया मशिदींमध्ये असलेल्या इस्लामी संतांच्या कबरींसह त्यांतील बऱ्याच स्मारकांचे नुकसान केले किंवा नष्ट केले. तेव्हापासून सुरू झालेली टिंबक्टूची साडेसाती अजूनही सुरू आहे.

एकेकाळी समृद्धीच्या शिखरावर असणारे टिंबक्टू आज आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. यादवी, वाळवंटीकरण, अस्थिरता आणि ह्या सगळ्या बरोबर येणारे सामाजिक प्रश्न आजच्या टिंबक्टू ला नकोनकोसं करून टाकतात. ज्या शहराने एकेकाळी एकाच वेळी पंचवीस पंचवीस हजार विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतले आणि इस्लामच्या अभ्यासाचे माहेरघर बनवले, तेच टिंबक्टू आज, गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दारिद्र्याने ग्रासले आहे. टिंबक्टूची लोकसंख्या मध्ययुगीन काळात अंदाजे अडीच लाखावर पोचली होती ती आता साधारणपणे ३५हजारावर आली आहे. एकेकाळी अरब-आफ्रिकी व्यापाराचे केंद्र असलेले टिंबक्टू जगण्याचे साधन म्हणून सरकारी निधीवर अवलंबून असलेले शहर बनले आहे. वाळवंटाचे अतिक्रमण झाले आहे, पाण्याचा पुरवठा गायब झाला आहे आणि बंडखोर लढाऊ नवीन हल्ले करण्याची धमकी देत आहेत.

पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला कुठेतरी माझे टिंबक्टू सापडले. अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण अगदी पहिल्या दिवसापासून टिंबक्टूने मला आपलेसे करून टाकले. खरंतर ऑफिसपासून ते घरी जाईपर्यंतचा माझा रस्ता अगदी जेमतेम १० मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर होता. पण तेवढे अंतरसुद्धा मला पायी जायची परवानगी नव्हती. एकेकाळी परदेशी विद्यार्थी आणि यात्रेकरूंनी भरलेले रस्ते आज मात्र कोणत्याही विदेशी व्यक्तीसाठी असुरक्षित आहेत. किडनॅपिंगचा प्रचंड मोठा धोका आहे. कधी कुठे काय विपरीत घडेल ह्याचा नेम नाही. टिंबक्टूच्या विमानतळावर उतरल्यापासून तिथे आता सर्वदूर पसरलेल्या असुरक्षिततेची चाहूल यायला लागते. संयुक्त राष्ट्रांच्या फौजा तिथे आपले स्वागत करतात; आपल्या सामानाची आणि गाड्यांची कसून चौकशी झाल्यावरच आपल्याला बाहेर जाता येते. ह्या सगळ्यामध्ये आपला भरवशाचा साथीदार म्हणजे मनापासून आणि जरा जास्तच मनापासून काम करणारा सूर्य! पण तरीसुद्धा त्या रस्त्यांवरून फिरताना एकेकाळी गजबजलेले रस्ते, तिथे चालणारी वैचारिक खलबते आणि मुख्य म्हणजे सुरक्षितता ह्याची कल्पना करून मन भरून येते आणि "काय होतास तू, काय झालास तू" असे वाटल्यावाचून राहत नाही. पण ह्या सगळ्यात मला काय जास्त भावले असेल तर टिंबक्टूवासियांची दिलदारी आणि आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल असलेला सार्थ अभिमान. अनेक चांगल्या-वाईट परिवर्तनांनंतर त्या अजूनही मानाने उभ्या असलेल्या मशिदींप्रमाणेच त्यांचे मनोधैर्यही अजून टिकून आहे.

गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये गोष्टी खूप बदलल्या आहेत. वाढत्या दहशतवादामुळे खूप अंतर्गत स्थलांतर झाले आहे. प्रत्येक दहशतवादी गट आपल्या स्थानासाठी लढतो आहे आणि नेहमीप्रमाणे भरडली जाते आहे ती म्हणजे सामान्य जनता. एकदा असेच दोन टोळ्यांच्या भांडणात होरपळून निघालेल्या एका गावात आम्ही गेलो होतो. ते गाव टिंबक्टूपासून साधारण ३००-३५० कि. मी. दूरवर असलेल्या वाळवंटात होते. तिथल्या लोकांशी बोलून परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर त्या गावातल्या एकमेव शाळेत तिथल्या दहशतवादी गटाने तळ ठोकल्याचे आमच्या लक्षात आले. जरा अजून खोदून चौकशी केल्यावर कळले की गेले अनेक महिने शाळा भरलीच नव्हती कारण अनेक शस्त्रधारी व्यक्ती तिथे मुक्काम ठोकून होत्या. ICRC म्हणून आमची जबाबदारी आहे की कोणत्याही सशस्त्र संघर्षात सहभागी असलेल्या सशस्त्र गटांना युद्धादरम्यान त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणे – कारण युद्धातही नियम असतात. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा (IHL) युद्धांवर नियंत्रण ठेवतो. यात काही तत्त्वे आहेत जी संघर्षादरम्यान लढणाऱ्या पक्षांनी विचारात घेणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरी लोकांवर परिणाम होणार नाही. IHLने सुचविल्याप्रमाणे, शाळा, वैद्यकीय केंद्रे इत्यादी सार्वजनिक वस्तूंचे नेहमीच संरक्षण केले पाहिजे. ही नाजूक बाब शाळेवर कब्जा केलेल्या सशस्त्र गटासमोर मांडण्यासाठी स्थानिक जनतेची सहमती मिळाल्यावर आम्ही त्यांच्या कमांडरशी बोललो. आम्ही IHL, त्याची तत्त्वे आणि शाळा रिकामी करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. कमांडरने आमचे आभार मानले आणि दोन आठवड्यांतच शाळा रिकामी झाली आणि वर्ग पुन्हा सुरू झाले! मी व माझे सहकारी मिळून हे करू शकलो हा एक अद्भुत अनुभव होता आणि आनंदाचा क्षणही! त्यानंतर आम्हाला इतर लढाऊ पक्षांशीही बोलावे लागले कारण ICRC म्हणून आम्ही संघर्षातील प्रत्येक पक्षाशी बोलतो – नेहमीच अत्यंत गोपनीयतेच्या पद्धतीने आणि नेहमीच द्विपक्षीयपणे. त्यांनी आम्हाला एका मोठ्या तंबूखाली बैठकीला बोलावले, मध्यभागी १३ सशस्त्र लोक आपल्या नेत्यासह आमची वाट पाहत होते. आम्ही तेथे गेलो आणि त्यांच्याशी आयएचएलबद्दल शांतपणे चर्चा केली आणि त्यांनी अतिशय समर्पक प्रश्न विचारले. आजूबाजूला मी एकटीच स्त्री होते, पण एका सेकंदासाठीही मला असुरक्षित वाटले नाही. मला खूप आदराने संबोधित केले गेले. काही अनुभव अविस्मरणीय असतात त्यातला हा एक!

असे काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. आज जरी टिंबक्टू एका अतिशय कठीण काळातून जात असले तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व कधीही कमी होणार नाही. तिथे असलेल्या समस्यांपेक्षाही खूप काहीतरी भारावून टाकणारे असे तिथे आहे. तिथली लोकसंस्कृती ह्या आताच्या संकटांवर मात करून पुन्हा मोठ्या डौलाने उभी राहील आणि निदान एकदा तरी मला त्या वाळवंटातील संगीत महोत्सवाला जात येईल अशी एक वेडी अशा मी कायम मनात ठेवीन!

लेखिका ICRC - The International Committee of the Red Crossसाठी काम करतात. पुणे विद्यापीठातून फ्रेंचमध्ये एम्.ए. केल्यानंतर त्यांनी पॅरीसच्या Sciences Po या संस्थेतून International Public Management आणखी एक मास्टर्स केले. आजवर अनेक फ्रेंच व स्पॅनिश भाषक देशांत त्यांनी काम केले आहे. सध्या त्या कोलंबिया देशात काम करत आहेत.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. यादवीमुळे सामान्य लोक होरपळून निघतात आणि त्यांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहेच. पण मध्ययुगीन हस्तलिखितांबद्दल वाचूनही हळहळायला होतं. त्यांच्या भाषा आणि लिपीबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

(तिंबक्टू सारखंच झांझीबार आणि दर-एस-सलाम शहरानबद्दलही कायम कुतूहल राहिले आहे!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला असे कुतुहल बगदाद व समरकंद या शहरांबद्दल वाटते.
एकेकाळचे सांस्कृतीक वैभव अनुभवलेली शहरे ही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

या शहराचं नाव अनेक ब्रिटिश पुस्तकं आणि विनोदी मालिकांतून नेहमी ऐकलं होतं.
लेख आणि फोटो दोन्ही आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तच लेख ! वाह !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed