#ऱ्होड्स मस्ट फॉल : केप टाउन विद्यापीठातील एक विलक्षण विद्यार्थी चळवळ
#ऱ्होड्स मस्ट फॉल : केप टाउन विद्यापीठातील एक विलक्षण विद्यार्थी चळवळ
मूळ लेखिका - रुची चतुर्वेदी
- - रोचना
दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरात त्याच नावाचं जुनं आणि नावाजलेलं विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या आवारात अनेक वर्षं सीसिल जॉन ऱ्होड्स या एकोणिसाव्या शतकातल्या प्रख्यात सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या खाणींचा उद्योगपती आणि वसाहतवादी अधिकाऱ्याचा पुतळा विराजमान होता. ८ मार्च २०१५ रोजी चुमानी मॅक्सवेले या विद्यार्थी कार्यकर्त्याने ऱ्होड्सच्या पुतळ्यावर विष्ठेची बादली उपडी केली. या घटनेमुळे "ऱ्होड्स मस्ट फॉल!" (#RhodesMustFall, #RMF, "ऱ्होड्सचा पाडाव झालाच पाहिजे!"), आणि "फीज मस्ट फॉल!" (#FeesMustFall, #FMF, "फिया कमी केल्याच पाहिजेत!") अशा घोषणांनी भरलेल्या, रोमांचकारी चळवळींना तोंड फुटलं. पुढच्या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांनी अनेक मागण्या प्रशासनासमोर आणि सरकारसमोर ठेवल्या. काही दिवसांनी ऱ्होड्सच्या पुतळ्याचं उच्चाटनही झालं. दक्षिण आफ्रिकेत अपार्थाइड (apartheid), म्हणजे वर्णविद्वेषावर आधारित राज्यव्यवस्थेचा पाडाव झाल्यानंतरच्या काळात अशा चळवळी प्रथमच झाल्या. या विद्यार्थी चळवळींमुळे केवळ ऱ्होड्सचा पुतळाच पडला नाही, तर ऐन वसाहतवादाच्या काळात उभारलेल्या शिक्षणसंस्थांच्या मूळ ध्येयांबद्दल मूलभूत चर्चांनाही वाव मिळाला. एकेकाळी वसाहतवाद राबवण्यात आग्रही असलेल्या, मात्र सांप्रतकाळी त्या वारशापलीकडे जाऊ पाहत असलेल्या संस्थांमधल्या विद्यार्थी आणि शिक्षक अशा सर्वांनाच शिक्षणपद्धती, समता, आणि निष्ठा या विषयांवर त्यांनी विचार करायला भाग पाडलं. जगात इतर अनेक विद्यापीठांत अशा समांतर चळवळी आणि चर्चा होऊ लागल्या. विद्यापीठांचं निर्वसाहतीकरण (decolonise) करणं म्हणजे काय, अशासारख्या चर्चा अशा संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या माझ्यासारख्या प्राध्यापकांसाठी प्रेरणादायक ठरल्या आहेत. आफ्रिकेतले शिक्षणक्षेत्रातले हे संघर्ष इतर ठिकाणीही विचारप्रवर्तक ठरतील, या आशेनं या लेखात काही विचार मांडले आहेत.
(पुतळ्याचं उच्चाटन करण्याच्या मागण्या)
(पुतळ्याचं उच्चाटन होत असताना)
२०१५मध्ये अनेक महिने चाललेल्या या चळवळीत कृष्णवर्णीय विद्यार्थी, आणि त्यांतही समलिंगी चळवळीशी निगडित असलेले विद्यार्थी, आघाडीवर होते. त्यांनी विद्यापीठांतल्या वास्तूंचा ताबा घेऊन कामकाज बंद पाडलं. त्याचबरोबर त्यांनी उच्चशिक्षण व्यवस्थेतल्या, देशातल्या, पायाभूत विषमतेविरुद्धही बंड पुकारलं. वांशिक वर्चस्ववादाच्या दैनंदिन हिंसाचारामुळे त्यांच्यात साचलेल्या दुःखाचा, संतापाचा बांध फुटला.
कृष्णवर्णीय विद्यार्थी ज्या व्यवस्थेत आणि वातावरणात राहतात आणि शिकतात, त्या वातावरणाविरुद्ध व्यक्त झालेल्या त्यांच्या सात्विक संतापाबद्दल, विद्यार्थ्यांच्या सभांमध्ये सहभागी झाल्यावर २०१५मध्ये मी लिहिलं होतं. हे वातावरण वसाहतवादी पुतळ्यांनी आणि प्रतीकांनी गच्च भरलं होतं. शिवाय, कृष्णवर्णीय विद्यार्थी मुळात कमकुवत, असंस्कृत, आणि आदर्श विद्यार्थी बनण्यास नालायक असतात, या संकल्पनेवरच शिक्षणव्यवस्थेतल्या शिकवण्याच्या पद्धती आणि संचाराच्या भाषा बेतलेल्या होत्या. एकूण, आफ्रिकेचा भूतकाळ आणि वर्तमानसुद्धा एक अबाधित, हिंस्र अपयशाची गाथाच आहे, त्याला तातडीच्या सुधारणेची गरज आहे, असं शिक्षणप्रणालीत बिंबवलं जात होतं.
२०१५-२०१६च्या चळवळींचे परिणाम दूरवर उमटले. तेव्हा ऐरणीवर आलेल्या प्रश्नांचे पडसाद आजही वेगवेगळ्या स्तरांवर जाणवत आहेत. विद्यार्थ्यांनी जुन्या विद्रोही चळवळींतल्या गाण्यांचा, नाटकांचा आणि नवनवीन प्रतीकांचा कल्पक वापर केला. त्यांतून विद्यापीठीय व्यवस्थेच्या मुळाशी असलेल्या उतरंडीची, शिक्षणप्रणालीत अंतर्भूत असलेल्या संकल्पनांची आणि समान संधी उपलब्ध करून देण्याच्या शक्यतांची आपल्याला चाहूल लागते. वर्णविद्वेषव्यवस्था गेल्यावर राजकीय पातळीवर समान हक्क प्राप्त झाले असले तरी सामाजिक विषमता का टिकून राहिली, याचा शोध घेण्यास हे स्रोत प्रवृत्त करतात. या समाजात वंश आणि वर्ग यांचा अजूनही निकटचा संबंध आहे. परंपरेनं गोऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या, केप टाउनसारख्या विद्यापीठांमध्ये कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना १९९४नंतरच मोठ्या प्रमाणावर प्रवेश मिळाला. हे विद्यार्थी दीर्घकाळ दरिद्री, उपेक्षित घरांत, परिसरांत आणि शाळांमध्ये लहानाचे मोठे झाले होते. त्यांचं बंड जितकं शैक्षणिक व्यवस्थेतल्या विषमता पेरणाऱ्या आणि कायम ठेवणाऱ्या शिक्षणप्रणालीविरुद्ध आणि वातावरणाविरुद्ध होतं, तितकंच ते एकूण विषमतेवर आधारित सामाजिक संरचनेविरुद्ध आणि त्यात होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीविरुद्ध होतं. जुन्या वर्चस्ववादी अस्मितेपुढे झुकणं त्यांना नापसंत होतं, पण विद्यापीठात होणारी स्वत:ची परात्मता कुरवाळत बसणंही त्यांना मान्य नव्हतं. कृष्णवर्णीय वांशिक अस्मितेचा, आणि स्त्रीवादाचा आधार घेऊन त्यांनी जुन्या विचारप्रवाहात एक कल्पक, निर्णायक खंड पाडला. विद्यापीठ हे ठिकाण काळ्या लोकांविरुद्ध बेतलेलं नसावं, आणि उच्चशिक्षण सर्वांना परवडणारं असावं, हे विचार विद्यार्थी चळवळीने आग्रहाने मांडले.
#RMF चळवळीचं केली गिलेस्पी आणि ली-ॲन नायडू यांनी केलेलं वर्णन बोलकं आहे :
कृष्णवर्णीय समाजातल्या जहाल राजकीय विचारांशी आणि स्त्रीवादाशी बांधिलकी राखून, विद्यार्थी कार्यकर्त्यांनी पिळवणुकीच्या संरचनेचा, आणि त्यांच्या अस्मितांवर पडणाऱ्या तिच्या प्रभावाचा एकत्र विचार केला. यामुळे सामाजिक चिकित्सेचं आणि आत्मचिकित्सेचं विलक्षण मिश्रण या चळवळीत आढळतं. हे मिश्रण धारदार आणि बोचरं होतं. मुलांनी टी-शर्टांवर Fuck White People यासारखी वाक्ये लिहिली. काहींनी कपड्यांचा त्याग करून आपले स्तन आणि लिंगांतर केलेली शरीरंच सार्वजनिक अस्त्र म्हणून वापरलं. विद्यापीठातल्या गोऱ्या अधिकाऱ्यांना चारचौघांमध्ये टोमणे मारले; पितृसत्तेचं समर्थन करणाऱ्यांना भर सभेत गप्प केलं. अपार्थाईडविरोधी लढ्यातली जहाल गाणी अद्ययावत करून, काळ्या पुढाऱ्यांवर, सरकारी अधिकाऱ्यांवर आणि पोलीसांवरदेखील मुक्तीच्या लढ्याचे द्रोही असल्याचे आरोप करायला विद्यार्थी घाबरले नाहीत. आत्मशोधाच्या आणि लोकजागृतीच्या प्रयोगांतून दक्षिण आफ्रिकेतल्या सामाजिक शोषणाच्या दीर्घ इतिहासाविरुद्ध पुन्हा लढा देण्याची, आणि लढा चालू ठेवण्याची, त्यांनी घोषणा केली.
अपार्थाइडोत्तर समाज, त्याची हिंसक वृत्ती समजून घेण्यासाठी एकमेकांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रांमधून विद्यार्थ्यांना या लढ्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. ऱ्होड्सच्या पुतळ्याचं उच्चाटन तर झालं, पण या चळवळीचे त्याहून महत्त्वाचे तीन परिणाम होते :
१. "ऱ्होड्स मस्ट फॉल" (#RMF) या घोषणेसह "फीज मस्ट फॉल"च्या घोषणाही सर्वत्र दुमदुमू लागल्यावर दक्षिण आफ्रिकेतली विद्यापीठं दर वर्षी वाढवत असलेल्या फियांवर सरकारला कमाल मर्यादेची घोषणा करावी लागली.
२. अनेक विद्यापीठांतल्या सोयीसुविधांचं झपाट्यानं होत असलेलं कंत्राटीकरण आणि खासगीकरण रद्द करण्यात आलं.
३. शिक्षणप्रणालीचा पुनर्विचार, आणि तिच्या "निर्वसाहतीकरणा"वर (decolonisation) चर्चा दक्षिण आफ्रिकेतच नव्हे तर इतरत्र, अनेक विद्यापीठीय विभागांमध्ये, होऊ लागली. अर्थात, संघटनेवरून किंवा डावपेचांवरून आपापसात झालेल्या चर्चांबद्दल विद्यार्थीच स्पष्टपणे बोलू शकतात. मात्र केप टाउन विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या नजरेतून ही चळवळ कशी घडली, आणि विद्यापीठाला नव्याने उभारण्याच्या प्रेरणेत आम्ही प्राध्यापकही कसे सहभागी झालो, हे मला थोडक्यात सांगायचं आहे.
(फोटो श्रेय - मार्लिन क्लार्क)
केप टाउनला गमतीनं आफ्रिकेतला वसाहतवादाचा शेवटचा बालेकिल्ला म्हणलं जातं. हा लौकिक अनेक कारणांमुळे योग्य आहे, आणि अनेक कारणांमुळे अयोग्यही. दोन्ही बाजू समजून घ्यायला हव्या. युरोपीय वसाहतवादी सर्वप्रथम आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात इथेच आले. या भागात गुलामगिरीच्या व्यवस्थेचा उगमही इथेच झाला. आफ्रिकी वंशाच्या ज्या लोकांना 'काळे आफ्रिकी' (Black African) म्हणलं जातं त्यांची ही मायभूमी आहे. शिवाय ती मिश्र वंशाच्या लोकांचीही मायभूमी आहे. मिश्र म्हणजे, खोइसान लोकांच्या, आणि सिंगापूर, इंडोनेशिया, मलाया, मदगास्कर, पूर्व आफ्रिका आणि बंगालच्या उपसागरालगतच्या इलाख्यांतून युरोपीय स्थायिकांच्या शेतांवर राबण्यासाठी आणलेल्या गुलामांचे वंशज. अपार्थाइडच्या वर्णव्यवस्थेत त्यांना 'कलर्ड' (coloured) म्हणलं जात असे. याशिवाय, गोरं मानल्या गेलेल्या डच आणि इंग्रज स्थायिकांच्या वंशजांचीही हीच मायभूमी आहे.
वर्णावर आधारित वांशिक गटांची विभागणी (segregation) हाच अपार्थाइडचा गाभा होता. ही विभागणी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वैद्यकीय कॉलेजं आणि इस्पितळांमध्ये प्रथम सुरू झाली. पुढे कलर्ड, भारतीय, आफ्रिकी, आणि गोरे, अशा वांशिक गटांसाठी आखल्या गेलेल्या भौगोलिक परिसरांमध्ये कधी विविध कायद्यांच्या मदतीनं, तर कधी बळजबरीने लोकांना डांबून, ही विभागणी भक्कम करण्यात आली. वांशिक विभागणी राबवणाऱ्यांना वर्गीय विषमतेत फारसा रस नव्हता. पण दक्षिण आफ्रिकेत वांशिक ओळख आणि आर्थिक परिस्थितीचे कायमच निकटचे संबंध राहिले आहेत. त्यामुळे, केप टाउनच्या विलक्षण नैसर्गिक सौंदर्याच्या लगोलागच शहरातले भौगोलिक कप्पे बाहेरून येणाऱ्यांना लगेच नजरेस पडतात. एकीकडे गौरवर्णीय रहिवाशांची प्रशस्त, अनेक उद्यानं असलेली हिरवीगार उपनगरं, आणि दुसरीकडे कलर्ड लोकांच्या गरीब वसाहती, आणि कृष्णवर्णीय आफ्रिकी लोकांच्या झोपडपट्ट्या. वसाहतवाद आणि अपार्थाइडच्या वारशाचा ठसा शहरावर असा स्पष्ट उमटलेला दिसतो.
मात्र केप टाउन हे बहिष्काराचं, आणि जनआंदोलोनांचंदेखील शहर आहे. अपार्थाइडविरुद्ध लढा देणाऱ्या युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचा (United Democratic Front) उगम इथेच झाला. पूर्वेकडच्या किनाऱ्याच्या जवळच असलेल्या रॉबेन बेटावरच्या तुरुंगातून नेल्सन मंडेला यांची दीर्घ तुरुंगवासानंतर सुटका झाल्यावर लाखो केप टाउनकर जल्लोषात रस्त्यावर उतरले होते.
मी गेली नऊ वर्षं केप टाउन विद्यापीठात नोकरी करत आहे. विद्यापीठातसुद्धा शहरासारख्याच विसंगती आढळतात. अशा विसंगती सर्व शहरांमध्ये आणि संस्थांमध्ये असतात, पण दक्षिण आफ्रिकेत अधिवासी वसाहतवाद (settler colonialism) आणि अपार्थाइडच्या जिवंत वारशामुळे या विसंगती अधिक भडक, बोचऱ्या आहेत. शिक्षणक्षेत्रात विविध वांशिक गटांसाठी कायदेशीर पद्धतीने स्थापन केलेल्या विभक्त शाळा आणि विद्यापीठं या वारशाचे द्योतक आहेत. ज्या शाळा-विद्यापीठांचं वर्णन "परंपरेनं गौरवर्णीयांसाठी" किंवा "परंपरेनं कृष्णवर्णीयांसाठी" संस्था असं होतं त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांमध्ये जमीनअस्मानाचा फरक असणं साहजिक होतं. पण त्यांच्या विद्यार्थीसमूहांकरता या संस्थांनी आखलेल्या जीवनमार्गातही तितकाच फरक होता. गौरेतरांकरिता आखलेल्या "बांटू" शालेय शिक्षणक्रमात काळ्या आफ्रिकी मुलांना अकुशल कामगार होण्याच्या, आणि कलर्ड आणि भारतीय मुलांना निमकुशल कारागीर, व्यापारी किंवा किरकोळ कारकून होण्याच्या उद्देशानेच शिक्षण दिलं जात असे.
१९५९पूर्वी दक्षिण आफ्रिकेत ८ विद्यापीठं होती. यांपैकी ७ गौरवर्णीय विद्यार्थ्यांकरिता होती. काळ्या आफ्रिकी, कलर्ड आणि भारतीय विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळवण्याकरिता विशेष परवानगी घ्यावी लागे. अशा मुलांची संख्या कमीच होती. केप टाउनसह दोन विद्यापीठांमध्ये मिश्र वर्ग असले तरी बाकीच्या सोयी विभक्त होत्या. इतर संस्थांमध्ये वर्गदेखील गोऱ्या आणि इतर मुलांसाठी वेगळ्या खोल्यांमध्ये घेतले जात. १९५९च्या 'विद्यापीठ कायद्या'नुसार अधिकृतपणे विभक्त विद्यापीठांची स्थापना झाली. प्रत्येक वांशिक गटानं केवळ आपल्या वंशाच्या लोकांमध्ये मिसळून सर्वांनी आपापली निराळी वांशिक अस्मिता बळकट करता यावी, यासाठी विभक्त संस्था. त्यामुळे गौरेतर लोकांमध्ये आपल्या वांशिक ओळखींबद्दल न्यूनगंडही पेरला जाईल हे उघड होतं; किंबहुना, हाच अपार्थाइड व्यवस्थेमागचा विचार होता.
अशा संस्थांतून गौरेतर गटांमध्ये उच्चशिक्षण प्राप्त झालेला, आणि आपापल्या 'बांटूस्तान' व शहरी परिसरांमध्ये प्रशासकीय कामं हाताळू शकणारा एक लहानसा अभिजन वर्ग तयार करण्याची योजना होती. मात्र, असं होण्याऐवजी कृष्णवर्णीयांच्या संस्था अपार्थाइडच्या पाडावाचं कारण बनल्या. १९७०च्या दशकापासून त्यांच्या आवारांत "सतत जनसभा, विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चकमकी, निदर्शने आणि बहिष्कार होत असत." अपार्थाइडसमर्थक सरकारला १९९४मध्ये जेरीस आणण्यात "विद्यार्थ्यांमधल्या राजकीय आणि तात्त्विक पातळीवरच्या चर्चा, आणि अश्रुधूराने भरलेले वर्ग, या सर्वांचा हातभार" होता.
विद्यापीठांतला वर्णविद्वेष आणि वंशाधारित विभागणी १९९४मध्ये अधिकृतरित्या बंद झाली. गोऱ्या विद्यापीठांमध्ये कृष्णवर्णीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेऊ लागले, आणि केप टाउन विद्यापीठासारख्या संस्थांतल्या विद्यार्थीसमूहाची रचना पार बदलून गेली. तरीही, दक्षिण आफ्रिकेच्या, आणि केपटाउन विद्यापीठाच्या इतिहासाबद्दल बरंच काही नोंदणं गरजेचं आहे, कारण हा इतिहास जितका क्लेषदायक आहे, तितकाच तो परिवर्तनासाठी प्रेरणादायीही आहे.
मी वर म्हणल्याप्रमाणे केपटाउन विद्यापीठ ७ गोऱ्या विद्यापीठांपैकी एक होतं. त्याची सुरुवात श्रीमंत, गोऱ्या, इंग्रज आणि डच घराण्यांतल्या मुलग्यांसाठी शाळा म्हणून झाली. १८८६ साली स्त्रियांना तिथे प्रवेश मिळू लागला. सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्यांकडून देणग्या मिळाल्या, आणि वसाहती सरकारकडूनही मोठं अनुदानही मिळालं. १९१८ साली त्याला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. "वाढत्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या खाण्यांच्या उद्योगासाठी कुशल कर्मचारी वर्ग तयार करण्याकरता" खनिजशास्त्र आणि भूगर्भशास्त्राचे विभाग सुरू केले गेले. पुढे वैद्यकीय शास्त्र विभाग, शिक्षण विभाग, आणि अभियांत्रिकीचे अभ्यासक्रमही सुरू झाले. १८९०-१८९६ दरम्यान केप कॉलनीचे पंतप्रधान असलेल्या सीसिल जॉन ऱ्होड्सनं विद्यापीठाची प्रशस्त जमीन दान केली. ऱ्होड्सनं खाणींच्या, खासकरून हिऱ्यांच्या, व्यवसायात पुष्कळ पैसा कमावला होता. जहाल वर्णवर्चस्ववादी आणि कट्टर वसाहतवादी म्हणून तो प्रसिद्ध होता. २०१५मध्ये पाडलेला त्याचा पुतळा १९३४ साली उभारला गेला. म्हणजे, विद्यापीठाच्या आवारात मोक्याच्या ठिकाणी तो ८१ वर्षं विराजमान होता.
या ८१ वर्षांत बरंच काही बदललं, आणि बरंच तसंच्या तसं राहिलं. अपार्थाइडच्या ऐन बहराच्या दिवसांत केप टाउन विद्यापीठाच्या प्रसिद्ध वैद्यकीय विभागात वॉर्ड, तसेच पोस्ट-मोर्टेमच्या व्यवस्था गोऱ्या आणि गौरेतर लोकांसाठी वेगळ्या होत्या. मॅकलिस कला विभागात आकृती रेखाचित्रणाचे वर्गही वेगळे होते. जीवशास्त्राच्या वर्गसहली फक्त गोऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित होत्या. आंतर-विद्यापीठीय स्पर्धांमध्ये सर्व खेळांचे स्पर्धक गट तर वेगळे होतेच, पण प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्थादेखील वेगळीच केली जात असे. "गौरवर्णीय मनुष्याच्या उच्चसंस्कृतीशी संपर्क साधण्याची संधी देऊन आफ्रिकी मनुष्याला 'बौद्धिक आणि अध्यात्मिक मुक्ती' पुरवण्याची जबाबदारी विद्यापीठाने घेतली आहे", असा विश्वास बाळगणाऱ्या टी. बी. डेव्ही आणि रिचर्ड लुइटसारखे अधिकारी विद्यापीठाच्या प्रमुख पदांवर होते. असं असूनही, काळ्या आफ्रिकी वंशाचे प्राध्यापक नेमायला त्यांचा विरोध होता. यामुळे, या काळात केप टाउन विद्यापीठाने अगदी मोजक्या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. प्रशासनाला मोजके विद्यार्थी चालले, पण कृष्णवर्णीय प्राध्यापकांची नेमणूक त्यांना सहन झाली नाही. उलट, १९६८ साली आपलाच माजी विद्यार्थी असलेल्या, विख्यात मानववंशशास्त्रज्ञ आर्ची माफेजे यांची नेमणूक विद्यापीठानं रद्द केली. कट्टर साम्यवाद-विरोधी, आणि वर्णविद्वेषसमर्थक, आणि १९३७-१९७० दरम्यान तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र विभागाचे अध्यक्ष असलेल्या अँड्रू मरे यांनी १९८०च्या दशकात अनेक अपार्थाइड-विरोधी कार्यकर्त्यांविरुद्ध देशद्रोहाच्या खटल्यांमध्ये सरकारच्या बाजूनं साक्ष दिली. तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेच्या सेन्सॉर बोर्डचेही सभासद होते.
आज केप टाउन विद्यापीठाच्या इतिहासात हे सर्व तपशील त्यात सापडत नाहीत. उलट, अपार्थाइडोत्तर काळात रचलेल्या या इतिहासात विद्यार्थ्यांनी या व्यवस्थेविरुद्ध दिलेल्या लढ्याचा उदोउदो केला जातो. विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते यात प्रश्नच नाही. १९७८मध्ये अपार्थाइड पोलिसांकडून मारला गेलेला विचारवंत, कामगार नेता आणि कृष्णवर्णीय जाणिवेचा समर्थक रिक टर्नर हा केप टाउन विद्यापीठाचा माजी विद्यार्थी होता. इथे असंख्य सभा, आंदोलनं, निदर्शनं होत; अपार्थाइडविरोधी कार्यकर्त्यांसाठी ते आसऱ्याचं ठिकाण होतं.
मात्र विद्यापीठाचं स्वगत शिक्षणप्रणाली, शिक्षणपद्धती, आणि तत्कालीन संशोधनाबाबत मौन बाळगून असतं. आज अनेक संशोधक हेच विषय अभ्यासत आहेत. सेपिदेह अजारी या माझ्या विद्यार्थिनीच्या पीएचडीच्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की इथं मुलांना वर्णविद्वेषाचं यशापयश चक्क मोजायला शिकवलं जात असे. शरीररचनाशास्त्राच्या वर्गांमध्ये शिक्षक वर्णवर्चस्वाचे धडे शिकवत, आणि वांशिक फरक दर्शवायला मुलांना डोक्याचे, नाकाचे, आणि मांडीच्या हाडाचे माप घ्यायला लावत. केप टाउन विद्यापीठात शिकवत असताना विख्यात ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ आल्फ्रेड रॅडक्लिफ-ब्राउन यांनी "एतद्देशियांच्या प्रश्नावर तज्ज्ञ" म्हणून वांशिक विषयांवर पुष्कळ माहिती गोळा केली. एकूण, विद्यापीठाच्या संशोधकांनी वसाहती सरकाराच्या सेवेत "सामाजिक नियंत्रणासाठी उपयुक्त" असं पुष्कळ काम केलं.
असा संशोधकीय वारसा कसा समजून घ्यावा, आणि त्याच्या पलीकडे तरी कसं जावं? या प्रश्नांना सरळसोपी उत्तरं नाहीत. ऐशीच्या दशकाच्या शेवटी परिस्थिती हळूहळू बदलू लागली. विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी, कामगार, आणि प्राध्यापक या सर्वांच्या सभा होऊ लागल्या.
फेब्रुवारी १९९०मध्ये नेल्सन मंडेला यांची सुटका झाली. देशातल्या जनआंदोलनामुळे, आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे, काही भागांत भयंकर यादवी युद्ध सुरू असतानाच अपार्थाइडच्या व्यवस्थेची मोडतोड करून बहुमतावर आधारित राज्यव्यवस्था उभारण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या. परवाने देऊन केप टाउन विद्यापीठ गौरेतर मुलांना प्रवेश द्यायला लागलं. पण प्रवेश आणि राजकीय हक्क मिळाले तरी त्याबरोबरच आर्थिक आणि सामाजिक समता मिळवणं कठीण असतं. संस्थांमध्ये रूढ झालेल्या प्रथा बदलणं जड जातं, आणि दीर्घकाळ जोपासलेले सामाजिक भेदभाव मिटवून सहज जवळीक आणता येत नाही.
शिक्षणप्रणालीच्या प्रश्नामुळे मात्र केप टाउन विद्यापीठात, विशेषकरून मानव्यशास्त्रांमध्ये, हा गोडीगुलाबीचा काळ लवकरच ओसरला. नवीन जवळिकीचं वातावरण पणाला लावणारे होते युगांडातले आफ्रिकी इतिहासाचे अभ्यासक महमूद ममदानी. इदी अमीनच्या दडपशाहीत युगांडातून हकालपट्टी झाल्यावर ममदानी दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. इथंच त्यांनी Citizen and Subject हे महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. १९९६साली केप टाउन विद्यापीठानं त्यांची A.C. Jordan Chair of African Studies ह्या पदावर नेमणूक केली. विख्यात भाषाशास्त्रज्ञ आणि शिक्षक ए. सी. जॉर्डन हे विद्यापीठाचे पहिले काळे आफ्रिकी पीएचडी पदवीधारक होते, आणि त्यांचं नाव असलेलं पद भूषवणारे ममदानी पहिले अभ्यासक होते. बहुसंख्य गोऱ्या शिक्षकसमूहात थोडं वैविध्य आणण्याचे आणि वर्णविद्वेषावर आधारित शिक्षणपद्धती बदलण्याचे हे प्राथमिक प्रयत्न होते. या अंतर्गत, विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलांसाठी एक सक्तीचा, आंतरशाखीय कोर्स तयार करण्याची जबाबदारी ममदानींना दिली गेली.
ममदानींनी तयार केलेला अभ्यासक्रम समितीला आवडला नाही. उलट, तो शिकवण्यास त्यांच्यावर बंदी आली. अभ्यासक्रमावरून मोठा वाद झाला, आणि त्यांनी विद्यापीठ सोडून जाण्याचं कारण बनला. अभ्यासक्रमावरची चर्चा समितीपुरती न उरता वर्तमानपत्रात आणि नियतकालिकांपर्यंत पसरली. ममदानींनी त्यांचं मत जाहीर सभेत शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक आणि शहरातल्या कार्यकर्त्यांसमोर मांडलं. या वादातही वांशिक अस्मिता महत्त्वाच्या होत्या – आफ्रिकी भारतीय वंशाचा युगांडन अभ्यासक एकीकडे, आणि अजूनही आपल्या छोट्याशा वर्तुळातून बाहेर पडून इतर आफ्रिकी आणि वसाहतोत्तर जगाशी नातं जोडू न शकणारे गोरे दक्षिण आफ्रिकी अभ्यासक दुसरीकडे.
ममदानींच्या मांडणीत दोन महत्त्वाचे मुद्दे होते. आजही ते केप टाउन विद्यापीठासाठीच नव्हे तर एकूणच समाजशास्त्रीय आणि मानव्यशास्त्रीय शाखांसाठी कळीचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न 'आफ्रिकन स्टडीज'सारख्या भौगोलिक परिसरांवर केंद्रित अभ्यासपद्धतींशी निगडित आहे; दुसरा प्रश्न आपण आफ्रिकी इतिहासाचा क्रम कसा लावतो, आणि आफ्रिकी लोकांचे अनुभव (आणि व्यापक वसाहतोत्तर देशांतल्या समाजांचे अनुभव) कसे टिपतो, याच्याशी निगडित आहे. ममदानींच्याच शब्दांत, "आपण अपार्थाइडसारखी व्यवस्था अनुभवलेल्या शिक्षणव्यवस्थेत आफ्रिकेबद्दल कसं शिकवायचं हा कळीचा प्रश्न आहे. वास्तविक, आफ्रिकन स्टडीज हा अभ्यासाचा विषय, आणि समाजशास्त्राच्या ज्ञानशाखासुद्धा, आफ्रिकेत नाही, तर आफ्रिकेबाहेर, वसाहतवाद, शीतयुद्ध आणि अपार्थाइडच्या वातावरणात तयार झाल्या. समाजशास्त्रीय ज्ञानशाखा आणि आफ्रिकन स्टडीजसारख्या विषयांमध्ये मुख्य फरक असा होता, की ज्ञानशाखांमध्ये गौरवर्णीय लोकांचा जीवनानुभव हा मानवी इतिहासाचा प्रमाण अनुभव मानला गेला, आणि गौरेतर लोकांचा इतिहास 'एरिया स्टडीज'सारख्या कप्प्यांमध्ये ठराविक गटांच्या विशिष्ट संस्कृतीला उकलण्याच्या दृष्टीने अभ्यासला गेला. उदाहरणार्थ, आफ्रिकन स्टडीजमध्ये बांटू प्रशासन, पारंपारिक कायदे, बांटू भाषा, आणि मानववंशशास्त्र एवढेच विषय होते." केप टाउन विद्यापीठासह इतर एरिया स्टडीज सेंटरांमध्येसुद्धा हीच वस्तुस्थिती होती.
ममदानींनी हे मत १९९८मध्ये मांडलं, पण आजही अनेक ज्ञानशाखांमध्ये वसाहतवाद आणि गुलामगिरी अनुभवलेल्या समाजांच्या इतिहासाकडे आणि जीवनानुभवांकडे अपयशाच्या चौकटीतून, प्रमाण मानवी इतिहासमार्गापेक्षा कमकुवत म्हणूनच पाहिलं जातं. विचित्र प्रथा असलेले, आणि आधुनिक राष्ट्र आणि लोकशाहीच्या विश्वात उशिरा, अर्धवटच पाऊल ठेवलेले समाज, असंच त्यांचं सरसकट वर्णन होतं. उलट, जागतिक आधुनिकतेची गुंतागुंत वसाहतोत्तर देशांतच अधिक तीव्रपणे जाणवते असं अलीकडच्या काही वसाहतोत्तर दृष्टीकोनाच्या लेखनात मांडलं गेलं आहे. पण अशा संशोधनातही अनेक त्रुटी उरतात. आफ्रिका खंडातल्या विविध परस्परविरोधी अस्मिता, हिंसाचार, आणि भ्रष्टाचार जोपासणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांचा त्यांत व्यवस्थित विचार होत नाही. उलट, विविध वसाहतोत्तर संदर्भांची त्यांच्यात सरमिसळ होते. सरतेशेवटी, आफ्रिका असो, किंवा इतर वसाहती असोत, अशा चौकटीत इथली राष्ट्रं आणि समाज आधुनिकतेच्या गुंतागुंतीऐवजी तिच्यातल्या विक्षिप्तपणाची उदाहरणं म्हणूनच समोर येतात. शिवाय, अस्मितेचा, भ्रष्ट्राचाराचा किंवा हिंसेचा तीव्रपणा हा आधुनिकतेच्या परिणामाऐवजी, त्या त्या समाजाच्या आदिम संस्कृतीची देणगी मानला जातो.
ममदानींच्या काळानंतर, आजवर आफ्रिकेबद्दल झालेल्या लिखाणाहून निराळा, आणि आफ्रिकेकडे पाहण्याच्या वर वर्णिलेल्या चौकटीहूनही वेगळा, चिकित्सक दृष्टीकोन तयार करण्यावर केप टाउन विद्यापीठातल्या, आणि दक्षिण आफ्रिकेतल्या इतर ठिकाणच्या, शिक्षणप्रणालीच्या चर्चांनी भर दिला आहे.
मानवी हक्क, नागरिकत्व, राष्ट्र, लोकशाही, जनाधिकार, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विवेकवाद, आणि धर्मनिरपेक्षता, हे युरोपीय विचार आणि परंपरेतून आलेल्या, पण आता वैश्विक मानल्या गेलेल्या संकल्पना आहेत. आज त्या सर्व संकल्पना एका सकस आधुनिकतेचे निकष मानले जातात. अशा चौकटीत, या सर्व निकषांवर आफ्रिका खंड सतत कमीच पडताना दिसतो, आणि आफ्रिकेतली राष्ट्रं कोलमडायला ठेपलेली आढळतात. पण नवीन शिक्षणप्रणालीतल्या अभ्यासक्रमांतला चिकित्सक दृष्टिकोण अशा चौकटींचंही परीक्षण करायला शिकवते. न्याय-अन्याय, समता-विषमता, विवेकवाद, आणि लोकशाही यांसारख्या विविध संकल्पनांना कालातीत किंवा निव्वळ वैश्विक म्हणून न मानता, त्यांच्या उगमाचा इतिहास आणि विचारपरंपराही समजून घेण्यावर या अभ्यासक्रमांमध्ये भर दिला जातो.
विविध ज्ञानशाखांच्या चर्चाविश्वांत 'वैश्विक' म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरला आहे. म्हणजेच आफ्रिकेच्या इतिहासाचा क्रम आणि चौकट इतरत्र विकसित झालेल्या संकल्पनांवरच न बसवता, खुद्द आफ्रिकी जनतेच्या जीवनानुभवांवर आधारित असावेत, हा मुद्दा.
यात ममदानींचं योगदान निर्णायक होतं. त्यांनी सुचवलेला आफ्रिकी इतिहासाचा क्रम वांशिक अस्मितेवर आधारित नव्हता. या आधी गौरवर्णीय आफ्रिकेत कधी आले, आणि त्यांच्या इथे असण्या-नसण्यावर पूर्ण इतिहासक्रम अवलंबून होता. वसाहतपूर्व (गोरे अधिवासी येण्यापूर्वीचा आफ्रिका खंड), वसाहतकालीन (गोऱ्यांची सत्ता असलेला काळ) आणि वसाहतोत्तर (गोऱ्यांची अधिसत्ता संपल्यावरचा काळ) असा हा पारंपारिक क्रम. तो नाकारून पुरातन आफ्रिकेच्या इतिहासात तत्कालीन संशोधकांमध्ये लिंगभाव आणि समाजघडणीच्या प्रक्रियांवर होत असलेल्या चर्चांवर ममदानींनी भर दिला. यांतून या पुरातन कालातीत परंपरेत गोठलेल्या समाजाऐवजी जिवंत आणि समृद्ध समाज/परंपरा म्हणून पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून दिली. आफ्रिकेचा गाभा म्हणजे सहारा वाळवंटाच्या आसपासचा प्रदेश, हे समीकरणदेखील ममदानींनी नाकारलं. या उलट, त्यांनी विषुववृतीय (equatorial) आणि दक्षिणेकडील आफ्रिकेमधल्या आर्थिक आणि राजकीय संबंधांवर भर दिला. अभ्यासक्रमाच्या शेवटच्या भागात, दक्षिणेसह आफ्रिकेच्या इतर भागांत राबवलेल्या राज्यव्यवस्थांमधल्या समान गुणांचं विश्लेषण होतं. या सर्व भागांमध्ये काहीशा समान, वर्णावर आधारित वांशिक अस्मितांची जडणघडण कशी झाली, याकडे लक्ष दिलं होतं. या सर्वांतून ममदानी यांनी अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना दक्षिण आफ्रिकेच्या आगळेवेगळेपणाचा बाऊ करण्याऐजवी आफ्रिका खंडातल्या विविध देशांमधल्या देवाणघेवाणीचा विचार करायला प्रवृत्त केलं. अभ्यासक्रमाच्या या बृहत्आफ्रिकी दृष्टिकोनानं आफ्रिकेचा एक देश म्हणून विचार करण्यास चालना दिली.
ममदानींनी आफ्रिकी संशोधकांच्या आणि लोकांच्या चर्चांकडे अधिक लक्ष दिलं. याच प्रक्रियेला ज्येष्ठ साहित्यिक काद्री इस्मैल यांनी "abiding [by Africa]", अर्थात "आफ्रिकेशी बांधिलकी" असं नाव दिलं होतं. इस्मैल यांच्या मांडणीत एखाद्या जागेशी बांधिलकी म्हणजेच तिथल्या अडचणी समजून घेणं, तिथे होत असलेल्या चर्चांमध्ये भाग घेऊन आपलं परखड मत मांडणं, आणि सातत्यानं निराश होण्याची शक्यता असली तरी त्याची भीती न बाळगता करत राहणं." हे इतिहासकार पारंपरिक प्राथमिक साधनं वापरत नव्हते. युरोपीय संशोधक ज्या भाषा आफ्रिकी मानतच नसत, तशा भाषांतल्या साधनांचाही वापर करत होते. यामुळे मुलांना इतिहासलेखनाबद्दल काही कळीच्या मुद्द्यांवर विचार करायला लागत होता – आफ्रिकी म्हणजे नक्की कोण? आफ्रिकेच्या, किंबहुना कोणत्याही भूभागाच्या इतिहासात, अथपासून इतिपर्यंत होत आलेल्या तिथल्या सर्व मानवी हालचाली आणि देवाणघेवाणींचा समावेश कसा करावा? तो भूभाग पूर्णपणे समजून घ्यायला कोणकोणत्या साधनांचा आणि भाषांचा आधार घ्यायला हवा?
आज या पहिल्या अभ्यासक्रमातून प्रेरणा घेतलेले अनेक कोर्स फक्त आफ्रिकीच नव्हे तर जगाच्या युरोपेतर आणि उत्तर अमेरिकेतर (global south) – भारतीय उपखंड, लातिन अमेरिका, करिबियन, आणि पश्चिम आशिया – भागांमधल्या तुलनीय आणि समसामायिक इतिहासाची, आणि त्यांच्यातल्या परस्पर संबंधांची, मुलांना ओळख करून देतात. विविध भाषांमधल्या साहित्यिक, कलात्मक, चित्रमय आणि दैनंदिन अनुभवातून आलेल्या साधनांच्या आधारे मुलांना त्यांच्या अनेकवचनी भूतकाळांची, आणि गुंतागुंतीच्या वर्तमानाची ओळख करून देतात. अभ्यासक्रमातले हे बदल अनेक ज्ञानशाखांमध्ये होत आहेत. त्यांचा उद्देश केवळ चिकित्सक नाही, तर पुनर्बांधणीचा आहे. जगाच्या या भागांतल्या लोकांनी लोकशाही, न्याय, आणि स्वातंत्र्याच्या संकल्पनांबद्दल कसा विचार केला, ह्या संकल्पना कशा अनुभवल्या, आणि त्यांना आपले कसे केले हे या पुनर्बांधणीतून जाणून घ्यायचे आहे. व्यवस्थेखाली दबलेल्या समूहांनी समता, सार्वभौमता, मुक्ती, आणि एकजुटीच्या मांडलेल्या कल्पना, हक्कांच्या चौकटींचा त्यांनी केलेला वापर, आणि या सर्वांतून मानवता आणि न्याय्य समाजनिष्ठेची त्यांनी केलेली रचना हे सर्व शोधण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. शिक्षण म्हणजे सर्वांना समान पातळीवर, कोणाशीही भेदभाव न करता उपलब्ध करून देणं तर आलंच, पण अर्थपूर्ण आणि सुखी जीवन म्हणजे काय याबद्दल विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाचा आवाका वाढवणं, हेही आलं. केप टाउन विद्यापीठ आणि इतर आफ्रिकी संस्थांमध्ये या शक्यता निर्माण करणं हेच मुळात ऱ्होड्स मस्ट फॉलच्या चळवळीचं योगदान आहे.
डॉ. रुची चतुर्वेदी मानववंशशास्त्रज्ञ आहेत. लोकशाही, राजकीय वर्तुळांतील हिंसाचार, आणि लोकराजकारण हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. याच वर्षी त्यांचे पुस्तक Violence of Democracy: Interparty Conflict in South India, Orient Blackswanतर्फे प्रसिद्ध झाले आहे. त्या केप टाउन विद्यापीठात समाजशास्त्र विभागात सीनियर लेक्चरर आहेत.