पोर्तुगीज आफ्रिका आणि आफ्रिकेतील गोमंतकीय समाज
पोर्तुगीज आफ्रिका आणि आफ्रिकेतील गोमंतकीय समाज
- - कौस्तुभ नाईक
सुएला ब्रेव्हरमन महिन्याकाठी किती खळबळजनक विधानं करते त्याचा हिशेब ठेवणं आता अशक्य झालं आहे. हा लेख लिहिण्यापर्यंत 'होमलेसनेस हा एक लाइफस्टाइल चॉईस आहे' अशा आशयाचे विधान तिनं केलं होतं. स्वतः स्थलांतरित परिवारातून येऊनही स्थलांतरितांबद्दलचा तिला कमालीचा तिटकारा असावा असं वाटतं. ब्रिटनसारख्या, वसाहतींच्या जोरावर धनाढ्य बनलेल्या देशाची होम सेक्रेटरी (केंद्रीय गृहमंत्री) बनणं हे एका अर्थी प्रातिनिधिक स्वरूपात ऐतिहासिक म्हणावं लागेल. पण स्थलांतरितांविषयीची तिची किंवा सुनकशासित सरकारची जी भूमिका आहे ती एकविसाव्या शतकातील मोठ्या विरोधाभासांपैकी एक म्हणावी लागेल.
ब्रेव्हरमनचा उल्लेख सुरुवातीलाच करण्याचं कारण की परवा माझी एक लंडनस्थित गोमंतकीय मैत्रीण 'काय लाजिरवाणी आहेत तिची वक्तव्यं आम्हां गोवेकरांसाठी' असं म्हणून गेली असता मला कळलं कि ब्रेव्हरमन गोमंतकीय वंशाची आहे. नंतर कळलं की तिचे वडील गोमंतकीय कॅथलिक होते; ते केनियामध्ये स्थायिक होते आणि साठच्या दशकात ब्रिटनमध्ये दाखल झाले. केनिया, झांझिबार, युगांडामार्गे बरेचसे गोमंतकीय ब्रिटन, तसंच इतर देशांत पोचले. ह्या देशांमध्ये वसाहतवाद संपून स्वायत्त राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर ब्रिटिश सरकारमार्फत नोकरशहा म्हणून आलेल्या बऱ्याच भारतीय लोकांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. मीरा नायर ह्यांच्या 'मिसिसिपी मसाला' ह्या फिल्मची सुरुवात ह्याच इतिहासापासून होते.
मुळात गोवेकर आफ्रिकेत कसे पोचले? गोवेकरांसाठी आफ्रिकेचा मार्ग पोर्तुगीज आणि ब्रिटिश अशा दोन्ही वसाहती साम्राज्यांमुळे खुला झाला. हा इतिहास एकमेकांत जरी गुंतला असला तरी त्या स्थलांतरणाची प्रक्रिया किंवा तिथे गेलेल्यांचं पुढे काय झालं, ह्या भिन्न गोष्टी आहेत. म्हणून त्या प्रक्रिया दोन वेगळ्या भागांत मी मांडणार आहे. खरं तर हा माझा अभ्यासाचा विषय नाही, पण जी त्रोटक माहिती माझ्याजवळ आहे ती इथे जरा सुटसुटीत करून लिहिण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
आफ्रिकेमध्ये पोर्तुगीज
आयबेरियन द्वीपकल्पात पोर्तुगीज आणि स्पॅनिश अशी दोन साम्राज्यं उदयास येत होती आणि साहजिकच त्यांच्यात आपलं साम्राज्य वाढवण्याची चुरस निर्माण झाली होती. ह्याचा धर्तीवर कॅथलिक धर्मगुरू पोप अलेक्झांडर (सहावे) ह्यांच्या एका फर्मानाने (पेपल बुल) जगाच्या नकाशाचे दोन भाग करून एक भाग स्पेन तर दुसरा भाग पोर्तुगाल साम्राज्याला देण्यात आला. पण ह्यात पोर्तुगालला कमी भूभाग मिळाला असं वाटून १४९४मध्ये ह्या फेरविचार होऊन नकाशा विभागणारी रेषा अजून पश्चिमेकडे हलवली. आणि ह्यामुळेच ब्राझील ते आशियाखंड हा भूभाग पोर्तुगीजांच्या ताब्यात आला आणि तेव्हापासून त्यांची नजर आफ्रिकेकडे वळली.
पोर्तुगाल साम्राज्याच्या वाढीत सर्वांत मोठा वाटा हेनरी द नेव्हिगेटरचा मानला जातो. हेनरी हा पोर्तुगालचे तत्कालीन सम्राट राजा जॉन आणि राणी फिलिपा ह्यांचा तिसरा पुत्र होता. त्याचे इतर दोघे भाऊ राजा बनले पण हेनरीने त्याबाबतीत जास्त रस दाखवला नाही असं मानतात. पण त्यानं बऱ्याचशा सागरी मोहिमा आखल्या आणि त्यासाठी लागेल ती मदत उपलब्ध करून दिली. भारतीय उपखंडाकडे जायचा सागरी मार्ग शोधणं, ह्या विचारानं तो झपाटला होता आणि त्याच अट्टहासामुळे तो आफ्रिकी समुद्रतटावर मोहिमा पाठवू लागला. वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालिकतला पोचेपर्यंत बरेचसे पोर्तुगीज खलाशी क्रमाक्रमानं आफ्रिकेचा तट चाचपडत पुढे पुढे जात होते. ह्या सर्व मोहिमा हेनरीच्या आशीर्वादाने होत होत्या.
त्याकाळी दीपस्तंभ नसत त्यामुळे पोर्तुगालहून निघणारे नाविक जिथे जमेल तिथे मोठाले क्रूस बसवत, ज्यांना पाद्रांव म्हणत. परतीच्या वाटेवर किंवा मागाहून येणाऱ्या मोहिमांना त्याची मदत व्हावी हा त्यामागचा हेतू होता. ह्याच विस्तारवादी मोहिमांतून पोर्तुगीज साम्राज्यानं आफ्रिकेत आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. १४८२ साली डायगो कांव नावाचा पोर्तुगीज खलाशी काँगो नदीच्या मुखापाशी पोचला आणि आफ्रिका खंडातल्या पोर्तुगीजांच्या वास्तव्याची एका अर्थी सुरुवात झाली. गिनी-बिसाउ, मोझांबिक, मदगास्कर, अंगोला, सांव टोम, प्रिन्सेप येथे पोर्तुगीज वसाहती स्थापन झाल्या.
पूर्व आफ्रिकेत मोझांबिक आणि पश्चिम आफ्रिकेत अंगोला ह्या पोर्तुगालच्या आफ्रिकेमधल्या दोन प्रमुख वसाहती होत्या. सोळाव्या शतकापासून सुरू झालेल्या इथल्या वसाहती १९७४ साली सालाझारच्या राजकीय अस्तानंतर संपुष्टात आल्या. आफ्रिकेत प्रामुख्यानं सोनं, हस्तिदंत, मसाले ह्यांच्या निर्यातीवर आपली पकड कायम केली. साखर, कापूस, तंबाखू ह्यांसारख्या श्रम अधिक लागणाऱ्या पिकांच्या लागवडीसाठी आफ्रिकेतून गुलाम म्हणून राबवण्यासाठी माणसांची निर्यात व्हायची. ह्या विक्रीत इतर पोर्तुगीज वसाहतींमधल्या स्थानिक व्यापाऱ्यांनीही चांगला जम बसवला होता. गोव्यामधलं त्याकाळचं म्हामाय कामत हे मोठं व्यापारी घराणं गुलामांच्या विक्रीत सामील होतं हे त्यांच्या दफ्तरातल्या नोंदीतून स्पष्ट होतं.
प्रशासकीय सेवेत जसजसा स्थानिकांचा सहभाग वाढत गेला तशा त्यांच्या बदल्या इतर वसाहतींमध्ये होऊ लागल्या. अंगोला, मोझांबिकसारख्या ठिकाणी गोवेकर प्रशासकीय सेवेमार्फत आले. काही हंगामी होते तर काहीजण तिथेच स्थायिक झाले. अंगोलाच्या कम्युनिस्ट नेत्या सीता वालेस ह्यांचे आईवडील सरकारी कर्मचारी ह्या नात्याने गोव्यातून तिथे स्थायिक झाले होते. वालेस ह्यांचा जन्म १९५१ साली अंगोलात झाला. विद्यार्थी चळवळीतून वर आलेल्या वालेस ह्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते व त्या पीपल्स मूव्हमेंट फॉर लिबरेशन ऑफ अंगोला (पीएमएलए) ह्या डाव्या राजकीय पक्षासाठी काम करत होत्या. १९७४ साली जेव्हा पोर्तुगालमध्ये कार्नेशन क्रांती होऊन इश्तादो नोवो (नवं राज्य) ह्या हुकूमशाही सरकारचा अंत झाला तेव्हा त्या क्रांतीचे पडसाद अंगोलातही उमटले. त्यावेळी मॉस्कोत असलेल्या सिता वालेस १९७५मध्ये अंगोलाला परतल्या व तोपर्यंत सत्तेत आलेल्या पीएमएलएच्या सरकारचा भाग बनल्या. पण डाव्या राजकारणातल्या संघटनामध्येही अंतर्गत कलह होते. वालेस ज्या गटाशी संलग्न होत्या तो गट सोव्हियतधार्जिणा मानला जाई. हळूहळू ह्या कलहाचं रूपांतर एका चळवळीत होत गेलं आणि अंगोलाचे त्याकाळचे प्रधानमंत्री अगुस्तिन नेतो ह्यांच्याशी त्यांनी फारकत घेतली. पुढे ह्या गटानं सत्तापालट करण्यासाठी बंडही केलं; ते बंड रोखायला सत्ताधाऱ्यांनी क्युबन सैन्याची मदत मिळवून यश मिळवलं. ह्याच बंडात सहभागी होण्याच्या संशयावरून १९७७ साली सिता वालेस ह्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी त्या केवळ २५ वर्षांच्या होत्या. त्यांनतर त्यांचे बंधू आल्दमार वालेस ह्यांचीही (ते केवळ त्यांचे भाऊ आहेत म्हणून) हत्या करण्यात आली. 'सिता वालेस - अ रेव्होल्यूशनरी अनटील डेथ' हे लिओनोर फिगरेदो ह्यांनी लिहिलेलं त्यांच्यावरचं पुस्तक २०१८ साली प्रकाशित झालं.
मोझांबिकमध्येही बरेचसे गोमंतकीय स्थायिक झाले. काही नोकरी शोधण्यासाठी तर काही सरकारी किंवा सैन्यातल्या नोकऱ्यांमार्फत तिथे पोचले. ह्यापैकींच एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अकिनो दे ब्रागांझा; जे मोझाम्बिक सरकारचे राजदूत होते आणि तत्कालीन राज्यप्रमुख सामोरा माशेल ह्यांचे निकटवर्तीय सल्लागार होते. मोझांबिकमध्ये स्थायिक होण्याआधी ब्रागांझा पोर्तुगाल, फ्रान्स, मोरोक्को आदी देशांमध्ये वास्तव्यास होते. तिथे त्यांनी विज्ञानाचं शिक्षण घेता घेता पत्रकारिताही केली. १९८६ साली सामोरा माशेल ह्यांच्याबरोबर एका दौऱ्यावर असताना विमान अपघातात त्यांचं निधन झालं. २०११ साली त्यांच्या पत्नी सिल्विया ब्रागांझा ह्यांनी 'बॅटल्स वेज्ड, लास्टिंग ड्रीम्स' हे त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहून प्रकाशित केलं.
आफ्रिकेत गोमंतकीय मराठे
एकोणिसाव्या शतकात पोर्तुगालला आफ्रिकेत आपल्या अखत्यारीखाली असलेला भूभाग वाढविण्याची इच्छा झाली व त्यासाठी त्यांनी तसे प्रयत्नही सुरू केले. पण ह्या प्रयत्नांना स्थानिकांतर्फे बऱ्यापैकी विरोध झाला. ह्या प्रतिकाराला तोंड देण्यासाठी पोर्तुगीज नौदलाच्या प्रमुख फेरेरा दे आल्मेदा ह्यानं पोर्तुगीज गोव्याच्या गव्हर्नर जनरलला टेलिग्राफ पाठवून सुमारे चारशे 'सच्चे मराठे' सैनिक पाठविण्याची विनंती केली. हे मराठे म्हणजे सत्तरी, डिचोली ह्या नव्यानंच पोर्तुगीज अखत्यारीत आलेल्या नव्या काबिजादी भागांतले सैनिक होते. त्यात प्रामुख्याने सत्तरी तालुक्यातल्या राणेंचा समावेश होत. राणेंकडे सत्तरीची मोकासदारी होती (आणि आजही आहे).
ह्या काळात मराठा सैनिकांविषयी जे काही प्रचलित समज होते, त्यांच्या बळावरच त्यांना सरकार दरबारी सैन्यात नोकरी वगैरे मिळत असे. आणि ह्या नोकरीचा भाग म्हणून त्यांना इतर वसाहतीत जावं लागणं हेही काही नवं नव्हतं. ह्या आधी मराठा सैनिकांच्या तुकड्या आफ्रिका, तिमोर, मकाऊ इथे पाठवण्यात आल्या होत्या. पण ह्यावेळी परिस्थिती बदलली होती. एकोणिसाव्या शतकात पोर्तुगीज साम्राज्याचं वैभव कमी होत चाललं होतं. त्यामुळे जे बदल आले त्यांत सैन्यावरच्या खर्चात कपात करण्यात आली होती. सैनिकांमध्ये असंतोष वाढला होता. ह्याला बरीच कारणं होती. सैनिकांचे कमी झालेले पगार आणि हक्क हे ह्या असंतोषामागचं मुख्य कारण होतं. तसंच, सत्तरीच्या जमिनीच्या कारभारात स्थानिक सारस्वत कारकुनांचा वाढत जाणारा प्रभाव हेही एक कारण होतं. नुकत्याच आफ्रिकेतून परतलेल्या एका मराठा तुकडीनं आपले तिथले अनुभव व्यक्त केल्यावर तर तिथं जाणं शक्यच नाही असा पावित्रा सैनिकांनी घेतला. आफ्रिकेत पाठविलेल्या सैनिकांची सर्वांत मोठी समस्या होती की हिंदू सैनिकांसाठी वेगळं स्वयंपाकघर नव्हतं आणि इतर लोकांबरोबर बसूनच त्यांना जेवावं लागत असे. ह्यामुळे त्यांच्या जातीशुचितेचा प्रश्न निर्माण झाला. समुद्र पार करणं हेही वर्ज्य होतं. ह्या धर्तीवर जेव्हा सैनिकांना आफ्रिकेत पाठवायची वेळ आली तेव्हा त्याचं रूपांतर बंडात झालं. १८९५ साली दादा राणेंनी सुमारे ९०० सैनिक घेऊन पोर्तुगीज सरकारविरुद्ध बंड पुकारलं. ते लगेच शमवण्यात पोर्तुगीज सरकारला यश आलं. पण ह्या बंडाचा धसका त्यांनी घेतला. १८९७ साली जेव्हा परत मराठा सैनिकांना आफ्रिकेत पाठविण्याचं आदेश मंजूर झाला तेव्हा त्यांना पगार वाढवून मिळाला; आणि हिंदू सैनिकांच्या चालीरीतींत पोर्तुगीज फेरफार करणार नाहीत असं आश्वासनही दिलं. त्यानंतरही गोव्यातून पोर्तुगीज आफ्रिकेत गोमंतकीय सैनिक पाठवले गेले पण तिथे गोमंतकीय हिंदू स्थायिक झाल्याचं ऐकण्यात नाही.
पूर्व आफ्रिकेतले गोमंतकीय समाज
वर नमूद केल्याप्रमाणे एकोणिसाव्या शतकात पोर्तुगीज साम्राज्याचं आर्थिक पतन सुरू झालं होतं. त्यामुळे बरेचसे गोमंतकीय तेव्हा भरभराटीला येत असलेल्या मुंबईकडे नोकरीधंद्यांच्या शोधात निघाले. ह्याच काळात इंपिरियल ब्रिटिश ईस्ट आफ्रिका कंपनी आफ्रिकन वसाहतीत रेल्वे प्रशासनासाठी नोकरभरती करत होती. ह्या नोकरभरतीतून गोमंतकीय लोक पूर्व आफ्रिकेत दाखल झाले. केनिया, युगांडा, झांझिबार ह्यांसारख्या देशांत त्यांनी आपलं बस्तान बसवलं आणि एक नोकरशहा वर्ग म्हणून ते आफ्रिकेत उदयास आले. तिथे त्यांची पत इतर भारतीयांपेक्षा जरा वरचढ होती. त्यांच्या इंग्रजीवरच्या प्रभुत्वामुळे आणि इमानदारीमुळे त्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य दिलं जाई, असं एका ब्रिटिश ऑफिसरने लिहून ठेवले आहे. पूर्व आफ्रिकेत गोवेकरांना चांगल्या हुद्द्याच्या जागा मिळाल्या. त्या बळावर त्यांनी स्वतःसाठी सामाजिक संस्था उभारल्या; क्लब्स, शाळा, वाचनालयं वगैरे सुरू केली. तिथले गोमंतकीय जरी भारतीय आणि स्थानिक आफ्रिकन समाजांत मिसळत असले तरी ते स्वतःला भारतीयांपेक्षा वेगळे समजत होते.
जेव्हा पूर्व आफ्रिकेमध्ये स्वातंत्र्यवादी चळवळी सुरू झाल्या तेव्हा ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या भारतीय नोकरशाहीलाही त्याची झळ बसली. तोपर्यंत स्थानिक आफ्रिकी लोकांना मोठ्या हुद्द्याच्या नोकऱ्या सहसा दिल्या जात नसत; त्यामुळे भारतीयांविषयीही त्यांच्यात बराच राग होता. झांझिबारमध्ये प्रजासत्ताक राज्य स्थापन झाल्यानंतर चर्चमधून परतणाऱ्या काही गोमंतकीय लोकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारण्यात आलं. ह्या घटनेचा धसका स्थानिक गोवेकरांनी घेतला होता. त्यानंतर जेव्हा सरकारनं संसाधनांच्या राष्ट्रीयीकरणाची मोहीम राबवली त्यात बऱ्याच नोकऱ्या गोमंतकीयांकडून काढून घेतल्या गेल्या. ह्या सगळ्यानंतर बरेच गोमंतकी (आणि इस्माइली व्यापारी) झांझिबार सोडून गेले. केनियामध्येही अशाच प्रकारच्या प्रक्रियेअंतर्गत गोवेकरांना केनिया सोडून जावे लागले. पियो गामा पिंटोसारखे गोवेकर तर राष्ट्रवादी चळवळीचा भाग होते, पण स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी त्यांचीही राजकीय हत्या करण्यात आली. युगांडामध्ये ईदी अमीनचे सरकार येईपर्यंत तिथल्या भारतीयांच्या रोजच्या आयुष्यावर काही परिणाम झाला नव्हता पण अमीनच्या उदयानंतर त्याने फर्मान काढून, ज्यांनी कोणी युगांडाचे नागरिकत्व घेतले नाही त्यांनी तीन महिन्यात देश सोडून चालते व्हावे असा इशारा दिला.
जेव्हा १९१० साली पोर्तुगालमध्ये राजेशाहीच्या अंत होऊन प्रजासत्ताक राज्य स्थापन झालं तेव्हा पोर्तुगालचं सार्वभौमत्व वसाहतींनाही लागू झालं. त्यामुळे पोर्तुगीज वसाहतींमध्ये राहणारे सगळे लोक पोर्तुगालचे नागरिक मानले जात होते आणि हा नियम पूर्व आफ्रिकेत असलेल्या गोमंतकीयांनाही लागू होता. जेव्हा १९६१मध्ये गोवा भारतात विलीन करण्यात आला तेव्हा पूर्व आफ्रिकास्थित गोवेकरांनी आपले पोर्तुगीज पासपोर्ट भारतीय दूतावासात जमा करावे असा आदेश दिला. ह्यावेळी त्यांनी भारतीय नागरिकत्व घ्यावं का ब्रिटिश प्रोटेक्टड स्टेटस, ह्याविषयी द्विधा मनस्थिती होती. त्यांनी आपला आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करता ब्रिटिश प्रोटेक्टेड पासपोर्ट घेतला. पण जेव्हा पूर्व आफ्रिकेतले देश ब्रिटिशांपासून मुक्त झाले तेव्हा त्यांच्या नागरिकत्वाचा पेच पुन्हा उभा राहिला. राहत्या देशात आयुष्यभर कमावलेलं सगळं सोडून इंग्लंडला जावं, का आहे त्या देशाचं नागरिकत्व घेऊन तिथंच राहावं हा मोठा प्रश्न होता. आणि त्यावेळी ब्रिटिशांनी आपल्या इमिग्रेशन कायद्यात बरेच बदल केले होते. त्यानुसार वसाहतींमध्ये ज्यांना ब्रिटिश नागरिकत्वाचा दर्जा मिळाला आहे त्यांना मर्यादित हक्क देण्यात आले होते; आणि त्यांनी ब्रिटनमध्ये येण्यातही बरेच निर्बंध घातले होते. (ह्या बाबतीत सविस्तर माहिती याच अंकात महमूद ममदानींच्या लेखात आहे). आफ्रिका सोडणं भाग होतं, आणि ब्रिटिश पासपोर्ट असूनही इंग्लंडमध्ये शिरणं अवघड असल्यानं त्यांनी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पोर्तुगाल व ब्राझील यांसारख्या देशांत स्थलांतर केलं.
पोर्तुगीज आणि ब्रिटिश ह्या दोन साम्राज्यांच्या वसाहतवादी प्रक्रियेमुळे जी मानवी फरफट निर्माण झाली त्यात गोमंतकीय जगभर विखुरले गेले. त्या प्रक्रियेचं विश्लेषण किंवा त्यात सापडलेल्या लोकांचे अनुभव इतिहासाच्या पटावर फार झळकले नाहीत, कारण वसाहतवाद विरुद्ध राष्ट्रवाद अशा पारंपरिक बायनरीत ते कधीच सामावले जाऊ शकत नाहीत. जागतिकीकरणाचा पाया हा वसाहतवादी इतिहासानं गिरवलेल्या मार्गानंच जातो. आजही गोव्यात परदेशी नोकरीला जाणाऱ्यांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. कैकदा हा पर्याय नसतो, हतबलताही असते. हल्लीच पोर्तुगीज व्हिजा मिळविण्याच्या निमित्तानं मला महिनाभर पणजीतल्या दूतावासात खेपा माराव्या लागल्या, तेव्हा तिथे पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठी येणाऱ्या गोवेकरांना बघून ह्याची पक्की जाणीव झाली. हेही एकप्रकारचे बेघर होणंच आहे.
सुएला ब्रेव्हरमनला हे कळेल काय?