Skip to main content

शाळा

विकल मनाच्या पडवीमध्ये
घण घण घंटा; भरते शाळा
वर्ग तासिका हस्त पुस्तिका
थकवी मास्तर खडू फळा

उंचाविती हात षडरिपू
त्यांना अवगत प्रश्न गहन
मागील बाकावर पेंगुळते
रोज न्याहाळतो द्रष्टे मन

रसाळ मोठे विषय विभ्रमी
गृहपाठाची कसरत पुरती
आखीव-रेखीव अक्षर ओळी
डाग शाईचे आत्म्यावरती

घोकून पाढे; प्रश्न-उत्तरे
का टक्क्यांचा चुकतो होरा
वाचाळांना वेळ पुरेना
अन् मौनाचा पेपर कोरा..!
***