बंधप्रतिबंधाच्या इतिहासातील नाट्य किंवा बंधप्रतिबंध- काल आणि आज :

बोलणे, लिहिणे, चित्र काढणे, अभिनय करणे, संगीत- नृत्य करणे, टीका करणे अशा अनेक मार्गांनी मनुष्य पूर्वापार अभिव्यक्त होत आलेला आहे. अभिव्यक्तीला वैचारिक, भावनिक, राजकीय अशा अनेक प्रकारच्या छटा असू शकतात. अभिव्यक्ती म्हणजे नक्की काय, ती कधी सिद्ध होते याबद्दल काही प्रश्न विचारता येतील. एकट्या मनुष्याने स्वतःसाठी/स्वतःपुरती केलेली चित्रकला, स्वतःपुरतंच केलेलं लिखाण आदी क्रिया या अभिव्यक्ती म्हणून मानता येतील का हा या संदर्भातला एक महत्वाचा प्रश्न ठरावा. या मुद्द्यावर बरीच चर्चा होऊ शकेल कदाचित तरीही सध्यापुरतं अभिव्यक्ती कोणत्याही रूपामध्ये असली तरी ती सिद्ध होण्यासाठी, किंवा तिला अभिव्यक्ती म्हणून मानण्यासाठी दुसरा कोणीतरी पाहणारा/ऐकणारा/आस्वाद घेणारा असावा लागतो असं मानून चालूयात. स्वान्त सुखाय लिहिणारे, चित्र काढणारे, फक्त स्वतःसाठी नृत्य करणारे लोक असतातच आणि ते असावेतही परंतु सर्वसाधारणपणे अभिव्यक्ती ही समूहासमोर प्रस्तुत करण्यासाठी असते; कधी तर ती समूहासाठी पण असू शकते. समूहाशी संबंध आल्यानेच कदाचित त्या त्या समाजाचे काही लिखित-अलिखित नियम, जगरहाटी, समाजमनाची त्या त्या वेळची जडणघडण अशा अनेक घटकांवर त्या अभिव्यक्तीची समाजातली स्वीकार्यता ठरत असते. अभिव्यक्त होताना, तिची प्रस्तुती करताना मनुष्य कुठेतरी कळत-नकळत या नियमांच्या कक्षांचा, बंधनांचा विचार करीतही असतो, परंतु अशा लिखित-अलिखित नियमांच्या बाहेर जाणाऱ्या अभिव्यक्तीला मग बंधनांचा/प्रतिबंधाचा सामना करावा लागतो तर कधी काही अभिव्यक्ती त्या त्या काळच्या सामाजिक संकेतांचा, नियमांचा पुनर्विचार करण्यास, कधी त्यात बदल करण्यास भाग पाडतात. अभिव्यक्ती आणि नियम, बंध आणि प्रतिबंध यांच्यातली वीण अशी मजेदार आहे. प्रस्तुत लेखामध्ये जास्तकरून पोलिश रंगभूमीच्या संदर्भात या प्रतिबंधांची अर्थात नेहमीच्या भाषेत ‘सेन्सॉरशिपची कहाणी’ सांगण्याचा प्रयत्न असेल.
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

केन्सूरा:

सेन्सॉरशिपचा पश्चिमेतील इतिहास पाहिला तर कदाचित सर्वज्ञात अशा सॉक्रेटिस पर्यंत मागे जावं लागेल. सॉक्रेटिसचा गुन्हा काय तर सत्यान्वेषणाचा त्याचा परखड आणि अनोखा प्रयत्न. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील ग्रीक तत्ववेत्ता प्रोटॅगोरस याला एथेन सोडून जावं लागलं होतं आणि त्याची पुस्तके जाळली गेली. त्याचा गुन्हा असा होता, की कोणत्याशा पुस्तकात त्याने ऑलिम्पस पर्वतावरील देवतांच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली होती. प्रतिबंधाची ही काही अगदी जुन्या काळातली उदाहरणे. थोडं जवळचं म्हणजे एकोणिसाव्या शतकातलं उदाहरण म्हणजे डार्विनच्या पुस्तकावर असलेली बंदी, पुन्हा बोल्शेव्हिक काळातील पुस्तकांवर असलेली बंदी.

सेन्सॉरबद्दल चर्चा करण्यापूर्वी या शब्दाच्या उगमाविषयी थोडं पाहूयात. “Censura” अर्थात केन्सूरा असा काहीसा लॅटिन उच्चार असणारी ही संज्ञा प्राचीन रोममध्ये ख्रिस्तपूर्व काळापासून अस्तित्वात होती. याचा अर्थ सेन्सॉर बोर्ड किंवा समिती. या समितीवर पाच वर्षांच्या काळासाठी दोन माजी मंत्री किंवा राजदूत असत. त्यांचं काम म्हणजे सेना, प्रशासन किंवा कर- कार्यालय यांच्यासाठी नागरिकांची माहिती ( किंवा विदा/डेटा) गोळा करणे. याला लागूनच त्यांच्याकडे आपसूकच मॉरल पोलिसिंग अर्थात नैतिक निरीक्षक असण्याचं कर्तव्य येई त्यातून शिक्षा ठोठावण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता. तरीही या शिक्षांचा एक ठरीव साचा नव्हता, त्या प्रत्येक मनुष्याप्रमाणे बदलत असत.

ही व्यवस्था पुढे चर्च संस्थेने आपलीशी केली आणि त्याला Censura ecclesiastica अशी संज्ञा दिली. याअंतर्गत चर्च व्यवस्थेच्या बाहेर जाणाऱ्या मनुष्याला शिक्षा करण्याचे, त्याला वाळीत टाकण्याचे, सामाजिक धार्मिक कार्यात भाग घेण्यास बंदी करण्याचे अधिकार चर्चच्या धर्मगुरूंना होते. चर्चने या सर्व प्रकारांत एक प्रकारचं स्टॅण्डर्डायझेशन आणलं. गुन्हा आणि शिक्षा किंवा प्रतिबंध याचं एक कोष्टक त्यांनी बनवलं. विविध प्रकारचे धार्मिक गुन्हे करणाऱ्या किंवा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कृती करणाऱ्या किंवा अभिव्यक्ती करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याचा, त्यांना प्रतिबंधित करण्याचा अधिकार कॅथॉलिक चर्चला खुद्द परमात्म्यानेच दिला होता अशी त्यांची धारणा (किंवा खात्री) होतीच. त्यात प्रामुख्याने अधार्मिक प्रकारची पुस्तके लिहिणाऱ्या किंवा आजच्या भाषेत अधार्मिक कन्टेन्ट प्रकाशित, प्रसृत करणाऱ्या लोकांना प्रतिबंधाची शिक्षा मिळत असे. ही व्यवस्था तयार होताना चर्चच्या धर्मसत्तेला राजसत्तेची साथ मिळालेली होतीच. १२७५ साली पॅरिस युनिव्हर्सिटीने पारित केलेल्या नियमानुसार कोणत्याही पुस्तकाची नक्कल करण्याआधी युनिव्हर्सिटीच्या सेन्सॉर समितीची परवानगी घेणं जरूरी असे. पंधराव्या शतकात गुटेनबेर्गने छपाई यंत्राचा शोध लावल्यानंतर अनेकविध प्रकारची पुस्तके छापणं अगदी सोपं झालं आणि यात पुन्हा चर्चला खटकणाऱ्या अधार्मिक प्रकारचा कन्टेन्ट होताच. यावर उपाय म्हणून पोप सिकटुस चौथा याने १४७८ मध्ये छापखाने आणि प्रकाशक यांना चर्चच्या सेन्सॉर समितीच्या अधिकाराखाली आणण्याचा प्रयत्न केला. पुढे १४८७ साली पोप इनोत्सेंते (म्हणजे भोळा/निष्पाप बरं !)आठवा याने प्रकाशनपूर्व सेन्सॉरशिप आणली. आता कुठलंही पुस्तक प्रकाशित होण्याआधी बिशप किंवा त्याने नेमलेल्या समितीकडून मंजूर करून घ्यावं लागे. तसंच याआधी प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी, त्याच्या प्रतिदेखील या समितीला द्याव्या लागत.

हे सर्व सांगण्याचं कारण असं, की एकूण युरोप खंडात चर्चचा धर्मप्रसार आणि त्यासोबत येणाऱ्या शिक्षण, कायदा, अर्थ, राजकारण यांच्या मुख्य व्यवस्था आणि त्याला लागून असलेल्या इतर काही व्यवस्था यांचा फार गहिरा असा परस्पर संबंध आहे आणि या सर्व घटनांचा प्रभाव इथल्या जीवनाच्या अनेक घटकांवर पडलेला आहे.

पोलिश संदर्भात सेन्सॉरचा पहिला बळी कोण याबद्दल संशोधकांमध्ये एकमत नाही तरीही पंधराव्या शतकात क्राकूव शहरातील श्वायपोल्ट फियोलचं प्रकरण रोचक आहे. मूळचा फ्रँकोनमधील नॉयश्टाडटचा फियोल सोन्याचं काम करीत असे आणि तो १४८३ साली क्राकूवमध्ये स्थायिक झाला. यानंतर त्याने अनेकविध प्रकारचे व्यापार-उदीम केले. उच्च आर्थिक स्तरामुळे समाजातल्या मोठ्या मोठया लोकांमध्ये त्याची उठबस होती. १४९० च्या आसपास त्याने एका छापखान्यात पैसे गुंतवले, भरपूर प्रमाणात कागद मागवला (त्यातला पुष्कळ चोरीलाही गेला) आणि एका कारागिराकडून सिरील लिपीतील अक्षरे एका विशिष्ट फॉन्टमध्ये बनवून घेतली. १४९१ मध्ये त्याने या फॉन्टमध्ये चार पुस्तके छापली. त्या पुस्तकांत अधार्मिक साहित्य आहे किंवा चर्चच्या धार्मिक धारणेच्या विरोधात आहे असा आरोप त्याच्यावर झाला. छापखान्याच्या पार्टनर्सची तसेच इतर संबंधितांची कसून चौकशी करण्यात आली, त्यांना दंड ठोठावण्यात आला. सर्वांनी फियोलकडे बोट दाखवलं. नंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. फियोलला कैदेत रहावं लागलं. त्याने लिखित कबुलीजबाबात जेव्हा त्याच्या ख्रिश्चन धर्मावरील अढळ विश्वासाचे दाखले दिले आणि येशू ख्रिस्त हाच कसा मुक्तिदाता आहे याबद्दल आपल्या मनात शंका नसल्याचं लिहून दिलं तेव्हा कुठे त्याला सोडण्यात आलं.
—----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऐतिहासिक घटनांच्या सनावळ्या !

पोलंड देशाचा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास अनेकविध वैशिष्ट्यांनी भरलेला असून
इतिहासातील काही महत्वाच्या राजकीय घडामोडी आणि त्यांची सनावळ आपल्याला थोडी पहावी लागेल. असं केल्याने आपलं काम एका बाजूने सोपं तर एका बाजूने अवघड होणार आहे आणि आपल्याला काही बारीक सारीक गोष्टी समजून घ्यायला मदत होणार आहे. आधुनिक इतिहासात रशिया आणि जर्मनी हे पोलंड देशाचे बलाढ्य शत्रू आहेत हे आपल्याला माहित असतं, परंतु ही संक्षिप्त सनावळी पाहिली तर दुर्दैवाने रशिया आणि जर्मनी या दोन्ही देशांशी कायम संघर्षमय नातं असल्याचं आपल्या लक्षात येईल. याचा परिणाम भाषा, भाषा धोरण, कला, संस्कृती, तंत्रज्ञान, व्यापार अशा जीवनाच्या अनेक अंगांवर झाल्याचं दिसून येतं.

सन घटना
९६६ : अधिकृत ख्रिश्चनीकरण.
१०३४-१०३९: पेगन समाजाची ख्रिश्चनीकरण विरोधी मोहीम.
११८२: पहिली लोकसभा.
१३०८: टॉयटॉन लोकांनी ग्दास्क हे उत्तर पोलंडमधील शहर काबीज केले ( दुसऱ्या
महायुद्धाची सुरुवात देखील याच शहरावर हल्ला करून झाली हे एक विशेष!)
१३२६: पहिले पोलिश - टॉयटॉनिक युद्ध (टॉयटॉन हे पुरातन जर्मन वंशाचे लोक)
१४०१: विलना (लिथुआनिया) आणि रादोम शहरात युती.
१४०९: पोलिश - लिथुआनियन - टॉयटॉनिक युद्ध सुरु.
१४९९: क्राकूव-विलना शहर युती.
१५९६: क्राकूव ही राजधानी वारसा शहरात हलवली.
१६२०: पोलिश-ऑटोमन युद्ध (पोलिश-लिथुआनिया यांचं मोलदाविया मुद्द्यावरून युद्ध.हे एक
वर्ष चाललं.).
१६३२: स्मोलेन्स्क ( रशियातील एक शहर) युद्धाची सुरुवात ( २०१० साली कातीन नरसंहारातील
हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या शहराला भेट देण्यासाठी गेलेल्या विमानाला अपघात होऊन तत्कालीन राष्ट्रपतींसह अनेक मंत्री आणि इतर महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालं. यामुळे पुन्हा एकदा रशिया-पोलंड संबंधात तणाव निर्माण झाला होता.)
१६५४-१६५७: रशिया-पोलंड युद्ध ( पुन्हा याला समांतर १६५५ - १६६० हा स्वीडिश आक्रमणाचा काळ.
हा काळ महापूर म्हणून ओळखला जातो.)
१७०४: वारसा कॉन्फेडरेशन.
१७६४: अखेरचा पोलिश राजा स्तानिस्लाव पोनियातोवस्की याचा राज्याभिषेक. आधुनिक
पोलिश नाटकाच्या उभारणीत अत्यंत महत्वाचं योगदान देणारा हा राजा आहे.
१७७२: तत्कालीन पोलिश-लिथुआनियन गणतंत्र विशाल भूभागाच्या फाळणीचा पहिला टप्पा.
वास्तविक १७६९-७१ या काळात ऑस्ट्रिया आणि प्रशिया यांनी काही भूभाग आधीच
बळकावला होता. एक गोष्ट नमूद करायला हवी, की फाळणीच्या या टप्प्यांमुळे येणाऱ्या एकशेवीस पेक्षाही जास्त वर्षे पोलंड देश हा जगाच्या नकाशावर अस्तित्वात नव्हता.
१७९३: फाळणीचा दुसरा टप्पा. यामुळे पोलंड-लिथुआनिया गणतंत्र युती संपुष्टात आली.
१७९४: प्रशियन सैन्याच्या विरोधात महा-पोलंड क्षेत्रातील उठाव.
१७९५: फाळणीचा तिसरा आणि अखेरचा टप्पा.
१८०७: बियावस्टोक हे शहर रशियाने काबीज केले.
१८१५: याच साली झालेल्या व्हिएन्ना काँग्रेसचा परिणाम म्हणून फ्री सिटी ऑफ क्राकूव ची
घोषणा.
१८५०: क्राकूव शहरात अनेक दिवस चाललेली मोठी आग. तिथे राहत असणाऱ्या अनेक
ऑस्ट्रियन नागरिकांचं या आगीत अपघाती निधन.
१९१६: ऑस्ट्रियन आणि जर्मन सरकारने ५ नोव्हेंबर रोजी एक करार केला. या करारानुसार
पोलंड राज्याची निर्मिती करण्याची सुरुवात झाली.
१९१८: अखेरीस पोलिश स्वातंत्र्याची पहाट उजाडली. परंतु लगेचच युक्रेन युद्धाला सुरुवात.
१९३२: पोलिश-सोविएत अनाक्रमण करार. ( या कराराचं उल्लंघन लवकरच १९३९ साली
सोविएत युनियन ने केलेच!)
१९३४: पोलिश-जर्मनी अनाक्रमण करार. ( पुढील काहीच वर्षात या कराराचं काय झालं हे
आपल्याला ठाऊक आहेच!)
१९३८: पोलिश राज्यांची पुनर्रचना.
१९३९: जर्मन नाझी आक्रमण आणि पर्यायाने दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात. यानंतर सोळाच
दिवसांनी पूर्वेकडून रशियन सैन्याचं आक्रमण.
१९४०: रशियन सैन्याने केलेला कातीन नरसंहार ! याच साली नाझी सैन्याने AB-Aktion ही
मोहीम राबवून देशातील विचारवन्त, बुद्धिजीवी वर्गाला त्रास देण्यास सुरुवात केली.
१९४१: घेट्टोची स्थापना.
१९४३: वारसा घेट्टो उठाव.
१९४४-१९५६: स्टालिनची राजवट
१९४५: दुसऱ्या महायुद्धाचा शेवट.
१९४६: नवीन रेफ्रेन्डम.
१९५५: वारसा करार ( या करारानुसार तत्कालीन पोलिश भूभागावर अनेक ठिकाणी रशियन
सैन्य तैनात होतं.)
१९८९: कम्युनिस्ट राजवटीचा अंत. एका संपूर्ण नवीन पर्वाला सुरुवात.
—--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्राकूव शहरातील एक (कु) प्रसिद्ध सेन्सॉरवाला :

पोलंड देशातील काही महत्वाची शहरे म्हणजे अर्थातच राजधानीचं पर्यायानं व्यापार, राजकारण यासाठीचं शहर वारसा, औद्योगिक (खासकरून टेक्सटाईल) शहर ऊछ आणि सांस्कृतिक शहर क्राकूव. याआधीही क्राकूव शहराचा उल्लेख इथे आलेला आहे. पहिलं पोलिश विद्यापीठ हे क्राकूव विद्यापीठ आहे. पोलंड देशाच्या दक्षिणेला असलेलं हे शहर साहित्य, संस्कृती, कला, तत्वज्ञान, राजकारण अशा अनेक संदर्भांत अत्यंत महत्वाचं आहे. तर या शहरातील कोंस्तांते मायेरानोवस्की या सेन्सॉर सदस्याची कहाणी आता थोडक्यात पाहूयात. ११ डिसेम्बर १८३२ रोजी सेन्सॉर समिती निर्मित झाली. याआधी सिनेटमधील काहीजणांना हे काम अनिवार्यपणे म्हणजे नाईलाजाने करावे लागे. यावेळी स्तानिस्लाव सुजेव्स्की हा सिनेटमधील लोकांची नेमणूक करीत असे. याचं राजकीय जीवन अत्यंत क्लिष्ट आहे आणि याची वागणूक तत्कालीन काळाच्या मानाने देखील कठोर अशीच होती. १८३६ साली रशियन राजवट आल्यानंतर हा पॅरिसला पळून गेला. १८३६ नंतर सेन्सॉरची जबाबदारी मायेरानोवस्कीकडे आली. याने आतापर्यंत चाळीस नाट्यसंहिता लिहिलेल्या होत्या आणि शहरात चांगलाच प्रसिद्ध होता. साहित्य आणि नाट्यवर्तुळात त्याच्या रागीटपणामुळे आणि त्याच्या टोकदार लेखनामुळे बरेच लोक याला घाबरून असत. “क्राकूवची मधमाशी” हा १८१९-१८२२ या काळात जोरदार चाललेला साहित्यिक अंक तो चालवत असे. त्याच्या या पार्श्वभूमीमुळे हे सेन्सॉर करणाऱ्याचं हे पद मिळण्यास मदतच झाली तरीही त्याच्या कुरूप अशा अवतारावर काही लोक नाराज असत. १७८७ मध्ये याचा जन्म ग्रुयेचकी परगण्यात झाला, म्हणजे हा क्राकूवचा स्थानिक नागरिक नव्हता. सुरुवातीला त्याने लष्करात काम केलं आणि नंतर सिव्हिल सेवक म्हणून काम करू लागला. तो फ्रेंच साहित्याचा अनुवादही करीत असे. त्याच्या या अंकांमध्ये तो जुन्या परंपरा, चालीरीती, लोककथा यांच्याबद्दल लिहीत असे, परंतु बऱ्याचदा त्यात ऐतिहासिक तथ्य असेच असे नाही. एक मजेदार गोष्ट अशी की त्याच्या कल्पनेतून निघालेला एक उत्सव “लायकोनिक” आजही साजरा होतो (पुढे १९०४ साली यातील मुख्य पात्राचा लायकोनिकचा वेष स्तानिस्लाव विस्पीयान्स्की याने डिझाईन केला).

झालं असं की मायेरानोवस्की सेन्सॉर म्हणून खूपच कडक होता. तो प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन करीत असे आणि उलट स्वतःहून कायदे अधिकाधिक कडक कसे बनतील याकडे लक्ष देत असे. त्याच्याकडे येणाऱ्या संहितांवर तो खूप बारीक बारीक अशा नोंदी करीत असे, काटछाट करीत/सुचवत असे तसेच मूळ लेखनशैलीत बदल करीत असे, दिलेल्या पाठामध्ये नसलेले अर्थ शोधण्याची आणि त्या अनुषंगाने टीकात्मक टिप्पणी करण्याचीही त्याला सवय होती. त्याच्या सेन्सॉरीय कारकीर्दीत देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या संहिता मंचावर येणं मुश्किल होऊन बसलं होतं. दुसऱ्यांची खिल्ली उडवण्याचा त्याचा स्वभाव हादेखील एक महत्वाचा दोष होता.

अशा रीतीने लोकांमध्ये तो अप्रिय बनला नसता तरच नवल ! त्याच्या या वागणुकीवर एका कवितेत ताशेरेही ओढण्यात आलेले आहेत. सेन्सॉर म्हणून तो महत्वाकांक्षी होता आणि बऱ्याच राजकीय खटपटी करण्यात तो पुढे असे. त्याच्या अशा वागणुकीमुळे आणि काटछाट करण्याच्या, कुठलेही नियम कशाही प्रकारे लावून लेखकावर आरोप करण्याच्या विचित्र सवयींमुळे गिएश्कोव्स्की याने शहराच्या प्रशासनाकडे तक्रारही केली होती. ‘क्राकोवचे नागरिक आणि पहाडी लोक’ हा बोगुस्लावस्कीचा एक महत्वाचा ऑपेरा. त्यातील एका काव्यात “बिचारा पक्षी आत्ता पिंजऱ्यात कैद आहे, त्याला त्याच्या जुन्या मोकळ्या दिवसांची आठवण येत आहे” अशा प्रकारचं वाक्य होतं. या ओळीत मायेरानोवस्कीने “बिचारा पक्षी आत्ता पिंजऱ्यात कैद आहे,तो आधी जंगलात होता” असा उगाच बदल केला. कुठल्याशा एका कुकबुकातील पाककृतीमध्ये “संथ आचेवर” या जागी “अशक्त आचेवर” अशा प्रकारे काहीतरी चमत्कारिक शब्दरचना सुचवली. मायेरानोवस्कीच्या काळात जी नाटके होत असत त्यात लोरेंझ नावाचं एक ग्रामीण पात्र बहुतेक नाटकांत असे. त्याच काळी तिथे याच नावाचा एक ऑस्ट्रियन नागरिक राहत असे. त्यामुळे याने लोरेंझ या पात्राचं नाव बदलून दुबोईस केलं. यामुळे नट लोक पुरते गोंधळून गेले. प्रयोगानंतर प्रेक्षकांनी जोरदारपणे “ऑस्ट्रियाचा लोरेंझ, लोरेंझ!” अशा घोषणा दिल्या. याकाळी पोलिश भूभागाचा हा हिस्सा ऑस्ट्रियन अमलाखाली होता हे नमूद केलं पाहिजे.

हे तर काहीच नाही! खुद्द विलियमजी शेक्सपियरजी यांच्या “हॅम्लेट” नाटकातील जगप्रसिद्ध आणि प्रस्तुत नाटकासाठी व्यवच्छेदक असा “टू बी ऑर नॉट टू बी” हा संवाददेखील कापण्याची सूचना मायेरानोवस्कीने केली होती. १८४० साली तोमाश हेउकोवस्की हा क्राकुवमधील थिएटरचा निर्देशक बनला आणि तो या सेन्सॉरची कटकट टाळण्यासाठी म्हणून विनोदी संहिता निवडू लागला. या संहितांमध्ये “हिरो किंवा नायक” नसेच त्यामुळे बहादुरी, वीरता वगैरे गुण दाखवण्याची आणि त्या अनुषंगाने पेटून वगैरे उठण्याची, चिथावण्याची, देशभक्ती जागवण्याची भानगडच मिटली. मायेरानोवस्की हा संहितेतून विशिष्ट शब्द/शब्दरचना काढून टाकत असे. त्यात , “ स्वातंत्र्य, पोलिश नागरिक, गर्व/अभिमान, कीर्ती, समता, शूरता” असे वीरवृत्ती जागृत करू शकणारे, पोलिश नागरिकांमध्ये तत्कालीन पारतंत्र्याबद्दल जागृती करू शकणारे असे अनेक शब्द आले. सेन्सॉरला त्याकाळी पगार किंवा मानधन देखील पुष्कळ मिळत असे, म्हणजे एकाच वेळी सत्ता आणि संपत्ती दोन्हीची सोय करू देणारं हे पद होतं. त्याकाळी त्याला महिन्याला २५० पोलिश त्सलोती मिळत असत, पुन्हा ऑफिसच्या जागेचं भाडं नगरपालिकेकडून मिळत असे. साधारण शिक्षकाला त्याकाळी ५० पोलिश त्सलोती पगार असे यावरून त्याला मिळणाऱ्या भरघोस पैशांची कल्पना यावी.

फ्रेडरिक हेशेल या डॉक्टर आणि समाजकार्य करणाऱ्या एका महत्वाच्या व्यक्तिमत्वाने मायेरानोवस्की हा रशियन गुप्तहेर असून स्थानिक नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल राग/घृणा आहे अशा आशयाचं वक्तव्य केलेलं आहे. १८४६ साली क्राकूव क्रांती नंतर मायेरानोवस्की पळून गेला आणि नंतर नोव्हेंबर उठावानंतर पुन्हा आला. १६ फेब्रुवारी १८५१ साली ६४ वर्षे वयाचा असताना त्याला मृत्यू आला. एक गोष्ट मात्र आहे, की तो अखेरपर्यंत लिहित होता, तरीही त्याने भरीव लिखाण असं केलं नाही. त्याच्या अंत्ययात्रेला फक्त जवळचे काही लोक हजर होते. लूदविक वेंतोवस्की या त्याच्या समकालीन लेखकाने त्याच्याबद्दल लिहून ठेवलं आहे, की रशियाकडून पैसे घेणाऱ्या या साहित्यिकाच्या अंत्ययात्रेला काळं कुत्रंदेखील आलं नाही.

आपल्या भारतीय परिप्रेक्ष्यात सेन्सॉर आणि नाटकवाले (फिल्मवाले देखील) यांचं गेली अनेक वर्षे काही नातं आहे. या नात्याला बरेवाईट पदर आहेत. आपल्याकडचे सेन्सॉर सदस्य हादेखील एक रोचक विषय असावा कदाचित. परंतु मजेची गोष्ट अशी की आजवर कोणत्याही नाटक/फिल्ममध्ये सेन्सॉर सदस्य हे पात्र आल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही. तर आता नवीन नाटककारांनी/फिल्मवाल्यांनी/वेब सिरीजवाल्यांनी हे जरा मनावर घ्यावं अशी मी एक नम्र विनंती करतो.
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पोलिश नाटकाच्या इतिहासात सतराव्या शतकात लोकनाट्याच्या धर्तीवर केलेली कॉमेडी नाटके Komedia Rybałtowska म्हणून ओळखली जातात. Rybałt रिबाऊत याचा अर्थ भटका कलाकार, गायक! यातील पात्रे म्हणजे प्रामुख्याने शाळामास्तर ( एक प्रकारच्या शाळामास्तरला रिबाऊत अशी संज्ञा होती !), विद्यार्थी आणि यातील घटना, प्रसंगामध्ये जास्तकरून चर्चच्या शाळेतील अंतर्गत कारभारातील जीवन, त्यातील त्रुटी दाखवून देणे, त्यावर टीका केलेली पहायला मिळते. ही नाटके अधूनमधून चर्चच्या सेन्सॉरशिपला बळी पडल्याचं आपल्याला दिसतं. अठराव्या शतकाच्या अंतापासून परकीय राजवटींच्या अमलाखाली विविध प्रकारच्या सेन्सॉरशिप लादल्या गेल्या. बोगुस्लावस्कीचं क्राकोव्हियन आणि हायलँडर हे नाटक १७९४ मध्ये एका रशियन राजदूताच्या आणि रशियन सैन्याच्या कमांडरच्या आज्ञेवरून बंद करण्यात आलं. १८०६ मध्ये ऑस्ट्रियन राजवटीखाली असलेल्या पोलिश भूमीवर ऑस्ट्रियन सैन्य, सरकार यांच्यावर व्यंग करणाऱ्या, टीका करणाऱ्या नाट्यसंहितांवर सेन्सॉरशिप लादली गेली. नाटकाच्या जाहिरातीची पोस्टरे अशावेळी “अधिकाऱ्यांच्या परवानगी नुसार” अशा प्रकारची वाक्ये वापरण्याची युक्ती करीत असत. परकीय राजवटीखाली असलेल्या पोलिश भूमीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुष्कळ मर्यादा होत्या. १८१९ सालच्या धार्मिक समितीने धर्मावर टीका करण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. फाळणीच्या किंवा विभाजनाच्या काळात नाट्यसंहितांमधून काही शब्द/वाक्प्रचार काढण्यात किंवा वगळण्यात आले: मातृभूमी, लोक, हुकूमशाह, शृंखला/साखळदंड, सूद, स्वातंत्र्य, लोकशाही अशी या काही शब्दांची छोटी यादी इथे देता येईल. १८१५-१८६७ या काळात सरकारच्या विविध समित्या यासंदर्भात काम करीत होत्या. सन १८३२ पासून वारसा शहरातील केंद्रीय सेन्सॉरशिप समिती साहित्यिक आणि नाट्यसंहितांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करू लागली. यात त्यांचा प्रमुख भर होता तो तो जुन्या साहित्याचा प्रसार रोखण्यावर. यात आदाम मिटस्कीएवीचची नाटके , खासकरून पूर्वज- भाग तीन, कॉर्डीयन तसेच शेक्सपियरच्या अनेक संहिता आणि जागतिक दर्जाची नाटके असं सर्व साहित्य होतं. शेक्सपियरच्या “मिडसमर नाईटस ड्रीम” मध्ये एका प्रसंगात “भिंतींना देखील कान असतात” असं वाक्य आहे. ते वाक्य काढून टाकायला लावलं होतं. १८४५ पासून वारसा सेन्सरच्या अंतर्गत फ्रेद्रोच्या “सूड” नाटकाच्या शीर्षकात “हद्दीच्या भिंतीचा सूड” असा बदल करण्यात आला होता. स्लोवाचकीचं नाटक “बाल्लादीना” याचं शीर्षक बदलूनही सेन्सॉरशिप समितीकडून या नाटकासाठी परवानगी नाकारण्यात आली. हे नाटक एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कधीतरी मंचावर आलं. स्लोवाचकीच्याच “माझेपा” नाटकाला एका अटीवर परवानगी देण्याचं ठरलं. ही अट अगदी चमत्कारिक होती. नाट्यलेखकाच्या आडनावाच्या ऐवजी लेखकाची आद्याक्षरे वापरणे ! विस्पीयान्स्कीच्या लग्न नाटकातील संवाद “मी आतमध्ये काही (कपडे/अंतर्वस्त्र) घालत नाही” सेन्सॉर समितीसाठी खास चर्चेचा विषय ठरला होता.

यूजेफ़ कोजेनियोवस्कीच्या एका नाटकात असा प्रसंग आहे:

काताजना: ( घाबरून) बाप रे ! तू दहा नाटके लिहून टाकलीस ?
कोजेनियोवस्की: त्यातली अर्धी जाळून टाकणार आहे मी.
काताजना: हम्म , म्हणजे त्यातून जी उरतील त्यात सत्य आणि जीवन असणार नाही.
न्यायाधीश: थांबा ! मुद्दा तो नाही. तुमच्या नाटकांत सरकारविरोधी असं काही नाही ना ?
कोजेनियोवस्की: बिलकुल नाही ! कुठल्याही नाटकात नाही.
न्यायाधीश: धर्माच्या किंवा नैतिकतेच्या विरोधातही काही नाही ना ?
कोजेनियोवस्की: सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याला कुठल्याशा प्रसंगात काहीतरी आक्षेपार्ह
सापडलं होतं, पण तो बरीच प्यायला होता !

सेन्सॉरच्या कचाट्यातून मित्सकीएविच सारखा नाटककार देखील सुटला नाही. वारसामध्ये १८९७ च्या आसपास मित्सकीएविच देखील सेन्सॉरच्या चष्म्यातूनच प्रेक्षकांना माहित झाला. मातृभूमीचं प्रेम जागृत करणारे जे अनेक प्रसंग आहेत त्यात एका सैन्यप्रमुखाच्या मृत्यूचा प्रसंग आहे. तर हा प्रसंग सेन्सॉरच्या कृपेने पुष्कळ काटछाट करूनच मंचावर आणला गेला. १८७८ मध्ये प्रकाशित झालेल्या पान / मिस्टर तादेऊष या नाटकात सेन्सॉरच्या एका सदस्याने ( फुंकेनश्टाईन) संहितेत बऱ्याच सुधारणा सुचवल्या होत्या.
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कम्युनिस्ट काळात म्हणजे १९७५ मध्ये लुब्लिन या पूर्वेकडील शहरात एक नाटकाचा ग्रुप तयार झाला. त्याचं नाव होतं “Grupa Chwilowa” म्हणजे “तात्पुरता ग्रुप”. हा ग्रुप तिथल्या विद्यापीठाशी एका अर्थाने संलग्न होता. याचा प्रमुख होता क्षिष्टोफ़ बोरोविएच. यातील सर्व नाटके हाच दिग्दर्शित करीत असे. सुरुवातीला हा एक साधा काबारेत म्हणजे प्रहसने करणारा ग्रुप होता. परंतु लवकरच त्याने विद्यार्थी नाट्यचळवळीचं रूप धारण केलं. या काळात विद्यार्थी किंवा अल्टर्नेटीव्ह नाटकांचे अनेक ग्रुप देशभर तयार झालेले दिसतात. त्याकाळी असलेल्या राजकीय वातावरणामुळे अनेक तरुण लोकांना अशा प्रकारच्या ग्रुपमध्ये मोकळीक मिळत असे, मोकळा श्वास घेता येत असे, स्वतःची अभिव्यक्ती करता येत असे. “Grupa Chwilowa” या ग्रुपचे प्रयोग देशीविदेशी होऊ लागले होते. तत्कालीन सरकारने या ग्रुपचे प्रयोग पाहून असं ठरवलं, की यातील कन्टेन्ट हा सरकार किंवा पार्टीविरोधी आहे. या ग्रुपवर देखरेख करण्यासाठी एक गुप्त पोलीस टीम बनवण्यात आली. या गुप्त पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टवरून १९७७ साली बोरोविएचला काढून टाकण्यात आलं.

आदाम मित्सकीएविच ने एकोणिसाव्या शतकात लिहिलेलं एक महत्वाचं नाट्यकाव्य म्हणजे पूर्वज (Dziady). नाटकाचा प्रमुख नायक आपल्याला भेटतो तेव्हा तो प्रेमात अयशस्वी झालेला आहे आणि जवळजवळ आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे. परंतु त्याच्या मनःस्थितीमध्ये आमूलाग्र बदल होतो ( या बदलाला पुष्कळदा spiritual metamorphosis असं म्हणलं जातं, अर्थात भारतीय आणि पाश्चात्य संदर्भात अध्यात्मिक परिवर्तन हा पुष्कळ सखोल चर्चेचा विषय ठरावा). या पात्राचं सुरुवातीचं नाव गुस्ताव आहे तर बदलानंतर तो कॉनराद होतो. या पात्राने दाखवलेली विचारधारा, वागणूक ही पुढे अनेक वर्षे आदर्शवत मानली गेली आणि पोलिश अस्मितेचा हिस्सा झाली. तुरुंगात असलेला हा कवी प्रवृत्तीचा माणूस आहे. त्याच्या आजूबाजूच्या कैद्यांना तो थोडा विचित्र आणि वेडा वाटतो, परंतु तो सशक्त स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेला मनुष्य आहे. वास्तविक कॉनरादच्या तोंडी असलेलं एक मोठं स्वगत “Wielka Improwizacja” (विएल्का इम्प्रोविझात्सया) म्हणजे बिग इम्प्रोव्हायजेशन हे या नाटकाने दिलेलं फार मोठं आणि महत्वाचं असं टेक्स्ट आहे. यात कॉनराद त्याच्या एकटेपणाबद्दल बोलतो, आजूबाजूचा समाज त्याला समजून घेत नसल्याने त्याला टोकाचा एकटेपणा आला आहे. त्याच्या काव्यलेखनाबद्दलही तो बोलतो. त्याची कविता ही निसर्गाला आणि परमेश्वराला समजते असं तो मानतो. पुढे जाऊन तो स्वतःला एक सर्जनशील मनुष्य म्हणून रचनाकार परमेश्वराच्या पंक्तीत नेऊन ठेवतो. हा भाग तत्कालीन समाजाचा आणि पुन्हा अनेक धार्मिक प्रवाहांचा विचार करता फार म्हणजे फार रोचक आहे. अगदी थेट अनलहकची आठवण यावी अशा प्रकारचं हे टेक्स्ट आहे. यात तो स्वतःला आणि स्वतःच्या संपूर्ण रचनेला ‘अमर’ ‘अखंड’ घोषित करतो. चारी बाजूंनी होणाऱ्या आक्रमणानं पिचत चाललेल्या पोलिश समाजात अशा प्रकारचा अत्यंत मजबूत आणि एकसंध आवाज एखाद्या पात्रापाशी असावा हाच एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या कवितेतून आपण एक नवीन, रोमँटिक जग निर्माण करतो आहोत याची खात्री कॉनरादला वाटते आहे. यात तो तथाकथित विद्वान आणि प्रेषितांवर टीकादेखील करतो. त्याच्या भावना इतक्या तीव्र झालेल्या आहेत, की त्याला आपलं शरीर सोडून आपला आत्मा एखाद्या पक्ष्याप्रमाणे उडून जावा असं खोलवर वाटत आहे. हे सर्व असतानाही देशावरील प्रेमाचा धागा हे स्वगत सोडत नाही. परमेश्वरावर टीका करताना तो म्हणतो, की हा परमेश्वर फक्त बुद्धिमान आहे परंतु त्याच्यामध्ये प्रेमाचा अभाव आहे. विसाव्या शतकातील पूर्वज नाटकाच्या मंचनामध्ये ही भूमिका गुस्ताव होलोउबेक या प्रतिभावान नटाने साकारली होती. त्याने साकारलेलं हे स्वगत अत्योत्तम स्वगताचा वस्तुपाठ आहे. २५ नोव्हेंबर १९६७ रोजी ऑक्टोबर क्रांतीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देयमेक या दिग्दर्शकाने या नाटकाचं मंचन केलं, तेव्हा तत्कालीन यूएसएसआर सरकारने ‘सरकारविरोधी वक्तव्ये करणारं नाटक, रशिया विरोधी नाटक ’ अशी कारणे देऊन यावर बंदी आणली आणि याचं मंचन थांबवायला लावलं. नंतर विद्यार्थी गटांची मोठी विरोधी प्रदर्शने झाली. तत्कालीन सामाजिक-राजकीय जीवन या नाटकाने खोलवर घुसळून काढले.
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आज :

आजच्या काळात आमच्या देशात सेन्सॉर बोर्ड असं अस्तित्वात नाही. आतापर्यंतच्या चर्चेचा विचार करता वाचकांच्या लक्षात येईल, की शतकानुशतके विविध आक्रमणांच्या छायेत तगून राहिलेल्या आणि अनेकविध राजवटींचा जाच सहन केलेला पोलिश समाज आज लोकशाही वातावरणात जगतो आहे. अभिव्यक्तीच्या संदर्भात आणि त्यातही मंचावरील अभिव्यक्तीच्या संदर्भात आजचं इथलं वातावरण पुष्कळ खुलं आहे. उलट आज मिळणाऱ्या मोकळीकीमध्ये सीमा कुठे आणि कशा आखाव्या हा प्रश्न निर्माण झाला आहे असंही म्हणता येऊ शकेल. तरीही अगदी नजीकच्या काळातील उदाहरण घ्यायचं तर २०१४ साली आलेल्या उजव्या विचारसरणीच्या सरकारने रेडिओ चॅनेल आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करण्याचं घेता येईल. वृत्तपत्रे, टीव्ही यासारखी जनसंचार माध्यमे आणि सरकारी नियंत्रण हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. या लेखात आपण प्रामुख्याने थिएटरशी संबंधित असलेल्या सेन्सॉर प्रक्रियेबद्दल बोललो. ही चर्चा वाचकांना आवडेल अशी आशा करतो.
संदर्भ ग्रंथ:
Dzieje Cenzury w Polsce do 1918 roku- Bartłomiej Szyndler. 1993.
Piętno Władzy: Redakcja: Wanda Ciszewska-Pawłowska i Barbara Centek.2020.
Pod presją cenzury- szkice o kontroli słowa w latach 1945-1990, Wiktor Gardocki. 2022.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet