विकीलीक्स : धोकादायक पण सुंदर?
विकीलीक्स – धोकादायक पण सुंदर?
(हा लेख मार्च २०११च्या 'आजचा सुधारक'मध्ये प्रकाशित झाला होता. त्यामुळे त्यातले काही संदर्भ कालबाह्य वाटण्याची शक्यता आहे. ज्यूलिअन असांजची नुकतीच सुटका झाल्यामुळे तो पुनर्प्रकाशित करत आहोत.)
२८ नोव्हेंबर २०१० रोजी जगभरातल्या अमेरिकी दूतावासांच्या अडीच लाख केबल्समधली गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांतर्फे जगासमोर उघड होऊ लागली. अनेकांना 'विकीलीक्स'च्या अस्तित्वाचा तेव्हा शोध लागला, पण विकीलीक्सचा सर्वेसर्वा असणाऱ्या ज्यूलिअन असांज याने २००६पासून विकीलीक्समार्फत विविध प्रकारची गोपनीय माहिती उघड केलेली आहे. पाश्चात्त्य देशांनी, विशेषत: अमेरिकेने त्याची वेळोवेळी दखलही घेतलेली आहे. आताच्या परिस्थितीत पूर्वीपेक्षा एक फरक मात्र दिसतो आहे : असांजला गौप्यस्फोट करता येऊ नये यासाठी अनेकांनी आता कंबर कसलेली आहे. असांजला आणि त्याच्या विकीलीक्सला जगभरात मिळालेली प्रसिद्धी आणि त्यांना संपवण्याचे होणारे प्रयत्न, यांमुळे या सर्व प्रकाराविषयी विविध मते आणि विचार मांडण्याची अहमहमिका लागलेली आज सर्वत्र दिसते आहे. त्या गदारोळात न सापडता थोडे गंभीर मूल्यमापन करण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.
काही तपशील
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पश्चात अफगाणिस्तानात आणि इराकमध्ये अमेरिकेने जी युद्धे सुरू केली, त्यांविषयीचे अमेरिकी सरकारला अप्रिय किंवा गैरसोयीचे ठरतील असे अनेक तपशील विकीलीक्सने गेल्या तीनेक वर्षांत उघड केले. निरपराध नागरिकांचे नाहक जाणारे बळी, कोठडीत कैद्यांचा होणारा छळ, खाजगी कॉन्ट्रॅक्टरांद्वारे केले जाणारे गैरव्यवहार अशा अनेक गोष्टी विकीलीक्सने जगासमोर आणल्या.
इतर देशांतले गैरव्यवहारही विकीलीक्सने उघडकीला आणले आहेत. जागतिक तापमानवाढीबद्दलच्या संशोधनासंदर्भात काही ब्रिटिश संशोधकांची इ-मेलद्वारा झालेली चर्चा २००९मध्ये उघड करणाऱ्यांपैकी विकीलीक्स ही एक संस्था होती. शोधनिबंध प्रकाशित करण्याच्या चढाओढीत टिकून राहण्यासाठी आपल्या संशोधनातून अधिकाधिक सोयीचे निष्कर्ष कसे काढता येतील याविषयी त्यात काही भाग होता. वरवर पाहता त्यावरून संशोधनाच्या वैधतेविषयी शंका निर्माण होत होती. (ब्रिटिश सरकारने नंतर नेमलेल्या तीन समित्यांना अशी शंका घेण्याइतपत पुरावा त्यात आढळला नाही; शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीत अधिक पारदर्शकता मात्र हवी असा निष्कर्ष त्यांनी काढला.) केनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी कोट्यवधी डॉलर्स गुपचूप देशातून बाहेर काढले होते, असा आरोप करणारा एक गुप्त अहवाल विकीलीक्सने फोडला होता. केनियाच्या पोलिसांनी ८०००हून अधिक राजकीय विरोधकांची हत्या केल्याबद्दलची माहितीही विकीलीक्सने २००८मध्ये खुली केली होती. मानवी हक्कविषयक काम करणाऱ्या 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल' या जगविख्यात संस्थेकडून विकीलीक्सला या कामगिरीबद्दल पारितोषिक मिळाले.
इराकविषयी जी माहिती विकीलीक्सने जगासमोर आणली त्यापैकी एका प्रकरणाचा मासल्यादाखल थोडक्यात आढावा घेतला, तर त्यामधून असांजची भूमिका, विकीलीक्सची कार्यशैली आणि या गौप्यस्फोटांमुळे सत्ताधाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात येईल.
२००७मध्ये बगदादच्या पूर्व भागात अमेरिकी सेनेच्या हेलिकॉप्टरमधून झालेल्या एका हल्ल्यात रॉयटर्स या जगविख्यात वृत्तसंस्थेचे दोन वार्ताहर मृत्युमुखी पडले होते. एका सैनिकाने या घटनेचे व्हिडिओचित्रण त्या हेलिकॉप्टरमधूनच केले होते. माहिती अधिकाराचा आधार घेऊन अमेरिकी सेनेकडून हे चित्रण मिळवण्याचा प्रयत्न रॉयटर्स २००७पासून तीन वर्षे करत होती, पण त्यांना त्यात यश मिळाले नव्हते. एप्रिल २०१०मध्ये असांजने वॉशिंग्टनमधील 'नॅशनल प्रेस क्लब' मध्ये एक वार्ताहर परिषद घेऊन हे चित्रण दाखवले आणि मग WikiLeaks.org या आपल्या संकेतस्थळाद्वारे ते जगभर उपलब्ध करून दिले.
चित्रणात दिसणारे वास्तव अमेरिकेच्या गैरसोयीचे होते. रॉयटर्सचे वार्ताहर इतर काही लोकांसमवेत त्यात दिसतात. एका वार्ताहराच्या हातातल्या कॅमेऱ्याला शस्त्र समजले गेले हे अमेरिकी सैनिकांच्या संभाषणातून कळते. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून त्या समूहावर २५ सेकंद गोळीबार केला गेला हे प्रत्यक्ष दिसते. सर्व जण तत्काळ ठार झाले आहेत, पण जायबंदी झालेली एक व्यक्ती धडपडते आहे हे दिसते. ते पाहून एक गाडी तिथे थांबते. गाडीतले काही लोक मदतीसाठी धावतात. रेडिओवरून मुख्यालयाशी होणाऱ्या संभाषणात हेलिकॉप्टरमधल्या एका सैनिकाने याचे वार्तांकन ‘इतर लोक जखमींची शस्त्रे उचलत आहेत' असे केल्याचे ऐकू येते. जायबंदी व्यक्ती आणि त्याच्या मदतीला धावलेल्यांवर पुन्हा गोळीबार केला जातो आणि त्यांना ठार मारण्यात येते. गाडीत बसलेली दोन शाळकरी मुले जखमी होतात. 'काही सशस्त्र माणसे एका अर्धवट बांधलेल्या इमारतीत घुसत आहेत' असा दावा यानंतर लगेचच हेलिकॉप्टरमधून केला जातो. 'इमारत निर्मनुष्य आहे' असाही दावा केला जातो. त्यामुळे तीवर क्षेपणास्त्र चालवण्याची रेडिओवर परवानगी मागितली जाते. परवानगी मिळाल्यावर काही क्षणांत काही निःशस्त्र लोक इमारतीत जाताना व्हिडिओ चित्रणात दिसतात. तरीही क्षेपणास्त्राचा मारा केला जातो. इमारत उद्ध्वस्त होताना दिसते.
वार्ताहरांवर गोळीबार, त्यांना मदत करणाऱ्यांवर गोळीबार आणि इमारतीचा विध्वंस अशा तीन टप्प्यांत झालेल्या या हल्ल्यात एकूण अठरा लोक मृत्युमुखी पडले. मेलेल्या व जखमी झालेल्यांविषयी अधिक तपशील विकीलीक्सने वार्ताहरांकरवी नंतर शोधून काढले. याच हल्ल्याविषयीची सेनेची गोपनीय कागदपत्रेही विकीलीक्सच्या हाती लागली. यांतून उभे राहणारे चित्र असे आहे :
- २००७ : मेलेले सर्व जण धोकादायक होते असा जाहीर दावा हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकी सेनेच्या प्रवक्त्याने केला. वार्ताहर सोडता इतर जण धोकादायक होते असा दावा सेनेच्या गोपनीय कागदपत्रांत आहे.
- २०१० : मेलेल्यांपैकी कुणाहीकडे शस्त्रे नव्हती; हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांना त्यांचे वडील गाडीतून शाळेत नेत होते; उद्ध्वस्त केलेल्या ‘निर्मनुष्य' इमारतीत काही कुटुंबे वास्तव्य करत होती; इंग्रजीचा निवृत्त शिक्षक असणाऱ्या घरमालकाची पत्नी, मुलगी व इतर असे एकूण सात जण इमारतीत मरण पावले, अशी माहिती विकीलीक्सने उघडकीला आणली.
- २०१० : विकीलीक्सच्या गौप्यस्फोटानंतर अमेरिकी संरक्षण सचिव रॉबर्ट गेट्स यांना त्याविषयी छेडले गेले. 'हे लोक (विकीलीक्स) मनाला येईल ते सांगतात. त्यांना कधीही त्यांचे उत्तरदायित्व सिद्ध करावे लागत नाही. त्यांना कसलेही परिप्रेक्ष्य नाही. शीतपेयाच्या स्ट्रॉमधून युद्धाकडे पाहण्यासारखे हे आहे,' अशा आशयाची प्रतिक्रिया गेट्स यांनी दिली.
थोडक्यात, आपण केलेला दावा चुकीचा होता हे उघड झाल्यानंतरही आपली चूक मान्य न करता विकीलीक्सवरच गरळ ओकणे अमेरिकी सरकारने पसंत केले. आधुनिक युद्धनीतीचा भेसूर चेहरा या गौप्यस्फोटातून उघडा पडला.
युद्धात चुकून कुणाचा नाहक बळी गेला, तर त्याला 'कोलॅटरल डॅमेज' म्हणण्याची पद्धत अमेरिकी सेनेने प्रचलित केली आहे. हा वाक्प्रचार आता शब्दकोशांत समाविष्ट झालेला आहे. मृत्यूला मृत्यू न म्हणता 'नुकसान' म्हणण्याच्या या सरकारमान्य संकेतावर प्रहार म्हणून असांजने आपल्या चित्रफितीचे शीर्षक 'कोलॅटरल मर्डर' असे ठेवले. (इथे पाहा.) चित्रपटाच्या सुरुवातीला जॉर्ज ऑरवेल या सुप्रसिद्ध लेखकाचे एक उद्धृत दिसते. 'असत्यास सत्य म्हणून सादर करणारी, खुनास आदरणीय बनवणारी आणि निव्वळ वाऱ्यातूनही सघनतेचा आभास निर्माण करणारी अशी राजकारणी भाषेची रचना असते,' अशा आशयाचे ते वाक्य आहे. अमेरिकी सेनेच्या अधिकृत भूमिकेला छेद देण्याचा असांजचा हेतू यात स्पष्ट दिसतो.
‘प्रगल्भ लोकशाही’ म्हणून स्वतःचा डांगोरा पिटण्यात धन्यता मानणाऱ्या आणि इतर देशांना लोकशाहीचे धडे देण्याची हिंमत करणाऱ्या अमेरिकेसारख्या देशात माहिती अधिकारासारख्या लोकशाही मार्गाने जे साध्य होत नाही, ते असांजला कसे साध्य होते? किंवा माहितीवरचे सरकारी निर्बंध जिथे खूप कडक आहेत आणि जिथली सरकारे लोकाभिमुख नाहीत अशा देशांतली गोपनीय माहितीदेखील विकीलीक्सच्या हातात कशी येते? असांजच्या मते यामागची कारणे साधी आणि उघड आहेत. अमेरिकेने चालवलेल्या युद्धांना विरोध असणारे काही लोक अमेरिकी सैन्यातही आहेत. त्यांना उपलब्ध होणारी विविध प्रकारची माहिती ते विकीलीक्सपर्यंत पोहोचवतात. इतर देशांतले सरकारी धोरणांचे विरोधकदेखील असे करतात. आंतरजालावरच्या संकेतस्थळांच्या आणि संदेशवहनप्रणालींच्या सुरक्षाव्यवस्थेतल्या त्रुटी शोधून त्यांच्याद्वारे गोपनीय माहिती मिळवणाऱ्या हॅकर्सकडूनही विकीलीक्सकडे अशी माहिती येते.
विकीलीक्सचा कारभार एखाद्या भूमिगत विद्रोही संस्थेप्रमाणे चालतो. अधिकृत कार्यालय, नियमित वेतन घेणारे कर्मचारी अशा गोष्टींशिवाय ही यंत्रणा चालते. स्वतः असांजला तर आपले म्हणता येईल असे घरही नाही. तो जगभर हिंडत असतो. त्याचा नक्की ठावठिकाणा अगदी थोड्या लोकांनाच आणि तोदेखील तात्पुरताच ठाऊक असतो. त्याचे मोबाईल क्रमांक, इ-मेल पत्ते सारखे बदलत असतात. तरीसुद्धा ही यंत्रणा सुरळीत चालते. अलीकडे अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेने विकीलीक्सच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. विकीलीक्सवरची प्रचंड माहिती २४ तास आंतरजालावर उपलब्ध राहावी यासाठी अनेक संगणकांचे जाळे गरजेचे असते. जगभरातले शेकडो स्वयंसेवक त्याचा कारभार सांभाळतात. जगभरातून येणाऱ्या देणग्या त्यासाठीचे आर्थिक पाठबळ पुरवतात. आपला कारभार गुप्त ठेवण्याची पुरेपूर खबरदारी असांज घेतो. महत्त्वाची भूमिका बजावणारे स्वयंसेवक निव्वळ आद्याक्षरांनी ओळखले जातात. असांज आणि त्याचे काही निवडक सहकारी प्रसारमाध्यमांसमोर नावांनिशी वावरतात. त्यामुळे विकीलीक्सच्या यंत्रणेबाबतच्या काही गोष्टी त्यांच्यापासून हेतुपुरस्सर लपवल्या जातात. त्यांना अटक करून त्यांच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यात यश मिळू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. परस्परांना पाठवले जाणारे संदेश सांकेतिक स्वरूपात असतात. विकीलीक्सकडचा माहितीचा प्रचंड साठा जगभरात अनेक ठिकाणी पसरलेला आणि अनेक प्रतींत सुरक्षित असतो. कोणत्याही बँकेपेक्षाही आपली प्रणाली अधिक सुरक्षित आहे असे असांज म्हणतो. विखुरलेला आणि प्रचंड असा हा माहितीचा साठा पूर्णतः नष्ट करायचा झाला तर आंतरजालच बंद पाडावे लागेल, असा त्याचा दावा आहे.
हे सर्व करण्यामागे असांजचा हेतू नक्की काय आहे ? प्रचलित वार्तांकनाच्या पद्धती आता कालबाह्य झालेल्या आहेत आणि त्या सध्याच्या बलाढ्य सरकारांना किंवा राक्षसी शक्तीच्या खाजगी संस्थांना विरोध करण्यासाठी आणि जनतेचे खरे प्रबोधन करण्यासाठी पुरेशा नाहीत, असे त्याला वाटते. सर्वसामान्य नागरिक आणि माहितीचे जनक / प्रसारक यांच्यात सत्तेचा असमतोल आहे; तो मोडून काढण्यासाठी उपलब्ध माहिती सार्वजनिक वापरासाठी खुली करणे हे विकीलीक्समागचे मूळ सूत्र म्हणता येईल. माहिती खुली करून जेव्हा आम्ही त्याचे विश्लेषण लोकांसमोर सादर करतो तेव्हा त्याला आव्हान देणे हे कुणाच्याही हातात असते; या लोकशाहीकरणामुळे आमची विश्वासार्हता वाढते असे तो म्हणतो. माहितीच्या अधिकाराची ही अंतिम परिणती म्हणता येईल.
विकीलीक्समागचे व्यक्तिमत्व
आपल्या कामात असणारा धोका ओळखून ज्यूलिअन असांज विकीलीक्सच्या कारभाराविषयी कमालीची गुप्तता बाळगतो; तसाच तो स्वतःच्या खाजगी आयुष्याविषयीही फार न सांगणे पसंत करतो. तरीही त्याच्याविषयीच्या उपलब्ध माहिती विकीलीक्सची मुळे शोधता येतात; म्हणून त्याचा थोडक्यात गोषवारा देत आहे.
१९६८च्या सुमाराला जगभर ज्या विद्यार्थी चळवळी झाल्या, त्यांच्या वातावरणात वाढलेले असांजचे आईवडील कट्टर बंडखोर होते. वयाच्या सतराव्या वर्षी सर्व पाठ्यपुस्तके जाळून त्याची आई मोटारसायकलवरून घर सोडून गेली होती. रूढ चौकटीतल्या शालेय शिक्षणातून अधिकारपदावरच्या लोकांचा नको तितका आदर करायला मुले शिकतात आणि त्यांची ज्ञानलालसा नष्ट होते असे ती मानत असे. असांजचे शिक्षण त्यामुळे घरीच झाले. त्यात शिस्त नव्हती. पण असांज वेड लागल्यासारखा वाचन करी. वाचनातून कळलेल्या शब्दांच्या उच्चारणाविषयी तो अनेकदा अनभिज्ञ असे, पण त्याची ज्ञानलालसा अविरत होती. त्याचा विज्ञानाकडे ओढा होता. संगणक आणि माणसातले नाते हे त्याला बुद्धिबळासारखे वाटे – 'त्यात नियम अगदी थोडे असतात, तरीही त्याला नियमबद्धता असते आणि ज्यांची उकल करायची त्या समस्या मात्र कठीण असतात. म्हणून मला त्याचे आकर्षण वाटले,' असे तो म्हणतो. अशा जडणघडणीचा एक परिणाम म्हणजे बहुसंख्याकांच्या सांस्कृतिक वा सामाजिक चाकोरीत तो कधीच रमला नाही.
त्याच्यावर असणारा जागतिक साहित्याचा प्रभाव आणि अडचणीच्या वेळी या साहित्याची त्याला झालेली मदत या गोष्टीही त्याची अल्पसंख्याक रुची आणि तिची अपरिहार्यता दाखवून देतात. युरोप आणि उत्तर अमेरिकेतल्या संगणक प्रणालींची सुरक्षाव्यवस्था भेदण्याचे त्याचे प्रयत्न तरुण वयातच यशस्वी होऊ लागले. ज्या संगणकांमध्ये प्रवेश करायचा, त्यांचे कोणतेही नुकसान करायचे नाही; फक्त माहिती मिळवायची आणि आपल्या पाऊलखुणा नष्ट करायच्या, असे त्याचे तत्त्व होते.
१९९१मध्ये, म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी तो नॉर्टेल या दूरसंचार कंपनीच्या जाळ्यात घुसला होता. काही काळानंतर तो या प्रकरणात पकडला गेला. त्याच्यावर खटला भरला गेला. हा खटला काही वर्षे चालला. कंपनीचे कोणतेही नुकसान झालेले नसल्यामुळे अखेर किरकोळ दंडात्मक रक्कम भरून असांजची सुटका झाली. पण हा अनिश्चिततेचा आणि असुरक्षिततेचा काळ असांजच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या काळात त्याने अलेक्सांद्र सोल्झेनित्सीन यांची 'फर्स्ट सर्कल' ही कादंबरी तीनदा वाचली. काही शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ बंडखोर आणि क्रांतिविरोधक असावेत, असा रशियन सरकारला संशय होता. त्यांच्यावर सरकारने जी जुलूम-जबरदस्ती केली त्याची कहाणी या कादंबरीत आहे. सत्ताधाऱ्यांच्या दमनाखाली पिचणाऱ्या बुद्धिजीवी लोकांच्या या गोष्टीमध्ये असांजला आपले आयुष्य प्रतिबिंबित झाल्यासारखे वाटले. सत्ताव्यवस्थांच्या चौकटींविरोधात असणाऱ्या किंवा त्यांविषयी संशय बाळगणाऱ्या फ्रँझ काफ्का, आर्थर कोस्लर, सोल्झेनित्सिन यांसारख्या लेखकांचा असांजवर प्रभाव पडला. मानवी जीवनसंघर्ष हा डावे विरुद्ध उजवे, किंवा धर्म विरुद्ध विवेक असा नसून तो खरा तर व्यक्ती विरुद्ध संस्था असा आहे, अशी त्याची खात्री पटली. आश्रित लोक आपल्या आश्रयदात्यांच्या सत्तांच्या जाळ्यांत (पेट्रनेज नेटवर्क) अडकतात; ही जाळी किंवा विविध संस्थात्मक उतरंडी यांत सत्य, निर्मितिक्षमता, प्रेम व करुणा अशा गोष्टी भ्रष्ट स्वरूपे धारण करतात असे त्याचे दृढ मत झाले. या काळात त्याने 'कट-कारस्थानांच्या आधारे सत्ताचालन' (Conspiracy as Governance) या नावाचा एक जाहीरनामा लिहिला. 'अवैध सत्तासंस्था या कट-कारस्थानांद्वारे कार्यरत असतात. त्यांनी राखलेल्या गुपितांमुळे लोकांचे अहित होते. अशा सत्तांची संदेशवहन यंत्रणा खिळखिळी केली, तर कारस्थानी सत्ताधाऱ्यांमधले माहितीचे वहन हळूहळू कमी होऊ लागते. ते नष्ट झाले की कारस्थानही शिल्लक उरत नाही. त्यामुळे माहिती फुटू देणे ('लीक' करणे) हे अशा अवैध सत्तासंस्थांविरोधात लढा पुकारण्याचे साधन आहे,' असा याचा सारांश सांगता येईल. यावरून विकीलीक्समागची असांजची तात्त्विक बैठक स्पष्ट होते.
प्रतिक्रिया
आतापर्यंत आपण विकीलीक्सची कार्यप्रणाली आणि त्यामागचे विचार यांच्याविषयी काही तपशील लक्षात घेतले. या परिप्रेक्ष्यात आता यावर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि त्याविषयी चालू असणारे विचारमंथन जाणून घेऊ.
प्रसिद्ध तत्त्वज्ञ मार्टिन हाईडेगर याने हिटलरच्या समर्थनार्थ १९३३ मध्ये एक निवेदन दिले होते. 'ज्याच्या साक्षात्काराने लोकांच्या कृती आणि त्यांचे ज्ञान अधिक निश्चित, स्पष्ट आणि दृढ होईल ते(च) सत्य आहे', असा काहीसा विचार त्यात त्याने मांडला होता. एखादी गोष्ट कळल्यामुळे जर जनतेमध्ये अनिश्चितता किंवा गोंधळ पसरणार असेल, नक्की कोणती कृती योग्य किंवा नैतिक हे ठरवणे जर त्यामुळे जड जाणार असेल, तर त्या गोष्टीला सत्य म्हणू नये असा याचा अर्थ घेता येईल. हिटलरने जर्मन जनतेपासून अनेक सत्ये दडवून ठेवून त्यांचा विश्वासघात केला हे दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू उघड झाले. सत्ताधारी आणि जनता यांच्यातले हे द्वंद्व सनातन आहे. 'व्यापक राष्ट्रहित', 'अप्रगल्भ जनता' अशी कारणे देऊन सत्ताधारी आपल्या गैरसोयीची सत्ये नेहमीच जनतेपासून लपवून ठेवत आले आहेत.
त्यामुळे ज्या संस्थांविरोधात विकीलीक्सतर्फे माहिती उघडकीला आणली गेली त्या संस्था आणि त्यांचे प्रतिनिधित्व किंवा लांगूलचालन करणारे विविध सत्ताढाचे यांच्या प्रतिक्रिया रोचक होत्या. जी माहिती उघड झाली त्यात विशेष नवीन असे काहीच नाही, असे जाहीर वक्तव्य एकीकडे अमेरिकेच्या परराष्ट्रव्यवहारमंत्री हिलरी क्लिंटन यांनी केले; पण विकीलीक्स ही राष्ट्रीय सुरक्षेला धोक्यात आणणारी संघटना असल्याचे जाहीर करावे असेही त्या म्हणाल्या. विकीलीक्सला दहशतवादी संघटना घोषित करण्याविषयी काही रिपब्लिकन संसदसदस्यांनी सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षावर दबाव आणला. त्याच काळात अमेरिकी सरकारने विकीलीक्सच्या मुसक्या बांधण्याचे आटोकाट प्रयत्न केले. ज्या संगणकांच्या जाळ्याद्वारे विकीलीक्सकडची माहिती आंतरजालावर जनसामान्यांना खुली होते ते संगणक विकीलीक्सच्या मालकीचे नसतात; तर अशी सेवा पुरवणाऱ्या विविध कंपन्यांकडून भाड्याने घेतलेले असतात. अमेरिकेने विकीलीक्सवर कायदे-उल्लंघनाचा कोणताही अधिकृत आरोप ठेवला नाही. तरीही निव्वळ धाकदपटशाने असे संगणक बंद पाडण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला. 'ॲमेझॉन' या अमेरिकी कंपनीने विकीलीक्सला आपले संगणक भाड्याने वापरू दिले होते. कोणतेही कायद्याचे बंधन नसतानाही तिने सरकारच्या या धाकदपटशापुढे मान तुकवली. पण स्वीडनसारख्या काही युरोपियन देशांचे माहितीविषयक कायदे इतके खुले आहेत, की अधिकृतरीत्या गुन्हे दाखल करता येतील अशी ठोस कारणे दिसत नसताना असे दमनाचे मार्ग पत्करणे या देशांच्या सरकारांना शक्य झाले नाही. त्यामुळे स्वीडन व इतर देशांतल्या संगणकांवरून विकीलीक्सचे गौप्यस्फोट आंतरजालावर उपलब्ध राहिले. विकीलीक्सचा अर्थव्यवहार जगभरातल्या देणग्यांवर अवलंबून असतो. हा देणग्यांचा ओघ ज्या कंपन्यांद्वारे विकीलीक्सपर्यंत पोहोचतो त्यांपैकी 'पेपाल' नावाचे संकेतस्थळ, 'मास्टरकार्ड' / 'व्हिसा' यांसारख्या क्रेडिट कार्ड कंपन्या अशांना अमेरिकेने विकीलीक्सची खाती गोठवायला भाग पाडले. पण तरीही मदतीचे अनेक मार्ग खुले राहिले. थोडक्यात, अमेरिकेसारखी बलाढ्य सत्ता विकीलीक्सच्या केसालाही धक्का लावू शकली नाही.
अराजकतावाद, दहशतवाद, हेरगिरी की निव्वळ वार्तांकन?
रूढ वार्तांकनपद्धती आणि विकीलीक्स यांची तुलना केली जाते. पण विकीलीक्स आणि पारंपरिक प्रसारमाध्यमे यांची मूल्ये, शैली आणि ध्येये यांत काही मूलभूत फरक आहेत. उपलब्ध झालेली सर्व माहिती खुली करणे हे विकीलीक्सचे ध्येय आहे. वार्ताहरांनी आपले स्रोत किती विश्वासार्ह आहेत हे तपासावे; ते उघडे पडणे त्यांना धोक्याचे ठरणार असल्यास त्यांच्याविषयी गुप्तता बाळगावी; जनतेच्या सोयीनुसार आणि हितानुसार माहितीचे संपादन करावे; सर्व संबंधित बाजूंना आपल्या समर्थनाची पुरेशी संधी देऊन बातमीचा समतोल राखावा अशा प्रकारच्या अपेक्षा वार्ताहरांकडून ठेवल्या जातात. याउलट संपादन न केलेला मजकूर वा माहिती विकीलीक्स जशीच्या तशी सर्वांना उपलब्ध करून देते. आपल्या खबऱ्यांची नावे किंवा असंबंधित व्यक्तींची नावे एखाद्या गौप्यस्फोटातून उघडी पडली तर त्यांना नाहक त्रास होऊ शकेल; यामुळे अशा लोकांची ओळख पटण्याजोगी माहिती उघड होऊ नये अशी विकीलीक्सची इच्छा असते. कागदपत्रे खुली करण्यापूर्वी ती माहिती त्यांतून खोडून काढण्याचे प्रयत्नदेखील ते करताना दिसतात, पण कधीकधी (कदाचित माहितीच्या प्रचंड आकारामुळे) त्यात त्यांना अपयशही आलेले आहे. लोकांपर्यंत बातमी त्वरेने पोचण्यासाठी पारंपरिक वृत्तसंस्था असा धोका पत्करणार नाहीत. याउलट ‘प्रस्थापित प्रसारमाध्यमे नको तितकी सावध असतात व अनेक बाबतींत नको तितकी संतुलित असतात. त्यामुळे अनेक सत्यांची जाहीर वाच्यताच होऊ शकत नाही. अशा मर्यादांत आम्ही अडकून पडत नाही हीच आमची खासियत आहे,' असे असांजचे म्हणणे आहे. पारंपरिक वृत्तप्रसारमाध्यमे आणि विकीलीक्स यांमधील अशा काही फरकांमुळे विकीलीक्सवर बेजबाबदारपणाचा आरोपही केला जातो. पण असांजने आपल्या वर्तनातून त्याला प्रतिसाद दिला आहे. खुल्या केलेल्या माहितीचे विश्लेषण शक्यतो इतरांनी करावे अशी विकीलीक्सची इच्छा असते. त्यामुळेच अमेरिकी दूतावासांतल्या केबल्स खुल्या करताना त्यांनी गार्डियन (ब्रिटिश), ल मोंद (फ्रेंच) यांसारख्या महत्त्वाच्या पारंपरिक वृत्तपत्रांना त्या केबल्स आधी देऊ केल्या होत्या. या वृत्तपत्रांनी मग आपल्या विश्वासार्ह विश्लेषणांसहित त्या छापल्या. म्हणजे प्रस्थापित माध्यमांबरोबर सहकार्याची भूमिका घेऊन व्यापक लोकहित साधणे अशी विकीलीक्सची कार्यपद्धती दिसते.
विकीलीक्सने इराक युद्धाविषयी जी कागदपत्रे खुली केली, त्यांचा आवाका पाहून 'कोणत्याही युद्धाविषयी एवढा तपशील सार्वजनिक होण्याची ही मानवजातीच्या इतिहासातली पहिली घटना आहे', असे त्याचे वर्णन केले गेले आहे. (पण त्याच्या टीकाकारांच्या मते विद्रोह आणि गुंडगिरी यांच्यातली सीमारेषाच विकीलीक्सला ओळखता येत नाही.) विकीलीक्सने आजवर खुल्या केलेल्या कागदपत्रांमधून निव्वळ विशिष्ट गैरव्यवहारांची माहिती मिळत नाही, तर सरकारे, सेना, बँका अशांसारख्या सत्तासंस्था नक्की कशा प्रकारे आपले कारभार चालवतात, याविषयीही तपशीलवार माहिती मिळते. अशा गुंतागुंतीच्या पण आजवर तुलनेने गुप्त राहिलेल्या व्यवहारांवर प्रकाश पडल्यामुळे या संस्थांना जाब विचारणे जनतेला शक्य होईल. ज्या भ्रष्ट वातावरणात असे गैरव्यवहार शक्य होतात, त्यांच्या काही व्यवच्छेदक लक्षणांचा अशा गौप्यस्फोटांतून परिचय होऊ शकेल.
याशिवाय एका महत्त्वाच्या लोकशाही चळवळीत विकीलीक्सचा सक्रीय सहभाग होता. आईसलँड या टीचभर देशात अत्यंत व्यापक माध्यमस्वातंत्र्य आणणारा कायदा करण्यात विकीलीक्सच्या काही कार्यकर्त्यांचा मोठा हातभार होता. प्रगत पाश्चात्त्य देशांतही आजवर प्रसारमाध्यमांना इतके व्यापक हक्क दिले गेलेले नाहीत. जगभरातला छुपा पैसा जसा स्विस कायद्यांच्या आधारे स्विस बँकांमध्ये सुरक्षित राहतो, तद्वत गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानंतर जगातल्या कोणत्याही खबऱ्याला आइसलँडमध्ये अभूतपूर्व कायदेशीर हक्क आणि सुरक्षा मिळेल असा असांजचा दावा आहे. कोणत्या प्रकारचे सरकार विकीलीक्सला अपेक्षित आहे हे यातून लक्षात यावे. विकीलीक्सने आजवर कोणत्याही हिंसक कृत्यात सहभाग घेतलेला नाही, हिंसेचे समर्थन केलेले नाही किंवा हिंसेचे आवाहनही केलेले नाही. लोकाभिमुख कायदे बनवण्यातला सक्रिय सहभाग आणि हिंसेला नकार या दोन गोष्टींकडे एकत्र पाहिल्यास हे लक्षात येते, की ही दहशतवादी संस्था नाही आणि लोकशाही प्रक्रियेला त्यांचा मूलतः विरोध नाही. गंमत म्हणजे केबल्स खुल्या करण्यापूर्वी अमेरिकी सरकारशी संपर्क साधून 'काही व्यक्तींची ओळख पटू नये अशी इच्छा असल्यास तुम्ही ती माहिती संपादित करू शकता,' अशी संधीही यांनी सरकारला दिली होती. यावर अमेरिकी सरकारने 'काहीच जाहीर करू नका' अशी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे विकीलीक्सने अखेर त्यांच्याशी असहकार पुकारला. सर्व घटनात्मक चौकटी नाकारणाऱ्या रूढ अराजकतावाद्यांहून विकीलीक्सचे हे वर्तन वेगळे आहे. गोपनीय अंतर्गत कागदपत्रे खबऱ्यांकरवी मिळवण्याचे काम हेरगिरीमध्ये गणता येईलही कदाचित; पण हेरगिरीमध्ये मिळालेली माहिती शत्रूपक्षाद्वारेही गोपनीय ठेवली जाते; किंबहुना ती आपल्या हाती लागलेली आहे हे कुणाला कळू न देणे हा हेरगिरी यशस्वी होण्यातला एक कळीचा घटक असतो. विकीलीक्स ती माहिती सार्वजनिक हितासाठी खुली करत असल्यामुळे ही रूढ अर्थाने हेरगिरीही म्हणता येणार नाही.
मग विकीलीक्समुळे जगरहाटीत नक्की काय फरक पडेल ? याचे उत्तर शोधण्यासाठी एका महत्त्वाच्या घटकाचा विचार करावा लागेल.
एकेकाळी ज्या खाजगी असत अशा सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी आता तितक्याशा खाजगी राहिलेल्या नाहीत. गेल्या वीसेक वर्षांत तंत्रज्ञानावरचे अवलंबित्व जसे वाढत गेले, तसे व्यक्तिगत आयुष्यातले अनेक तपशील हळूहळू त्या तंत्राधिष्ठिततेमुळे खाजगी अवकाशातून बाहेर आले. रेल्वे/बस आरक्षणासारखी नित्याची गोष्ट आता संगणकाद्वारे करता येते. ही सोय आहे हे खरेच आहे; पण त्यामुळे तुमच्या प्रवासाविषयीची माहिती कोणत्या तरी कंपनीच्या संगणकावर आता साठवली जाते. पॅनकार्डामुळे तुमच्या गुंतवणुकींविषयीचे तपशील सरकारे आणि खाजगी वित्तसंस्थांच्या संगणकांवर साठवले जातात. क्रेडिट कार्डाच्या वापरामुळे तुमच्या छोट्या-मोठ्या खरेद्यांचे तपशीलही आता असेच साठवले जातात. तुमच्या मालमत्तेविषयीचे तपशील, वीजबिले, दूरध्वनी क्रमांक अशा अनेक गोष्टी कोणत्या ना कोणत्या माहितीसाठ्यात उपलब्ध आहेत. अशी माहिती इतरांना परस्पर विकली जाते किंवा इतर मार्गांनी कुणाच्या तरी हाती पडते. मग तिचे विश्लेषण करून विविध विक्रेते व एजंट सवलतीच्या योजना, कर्जे वगैरेंचा ससेमिरा तुमच्या मागे लावतात. यात तुमची सोय किंवा इच्छा यापेक्षा इतरांचा फायदा हा निर्णायक घटक असतो. याशिवाय तुम्ही पाठवता ते इ-मेल संदेश, एस.एम.एस., तुमची फोन- संभाषणे अशी तुमच्या खाजगी संवादाची साधने ज्या प्रगत तंत्रज्ञानामुळे सोयीची आणि परवडण्याजोगी झाली आहेत, तेच तंत्रज्ञान तुमच्या या खाजगी बाबी जगभरातल्या विविध संगणकांवर साठवत असते. आतापर्यंत विखुरलेली अशी पुष्कळ माहिती आता निलेकणींच्या ओळखपत्रामुळे (जे पुढे आधार म्हणून ओळखले जाऊ लागले) एकत्रित स्वरूपात ठेवली जाईल. राजकीय सत्ताधारी, आर्थिक व्यवहार करणाऱ्या विविध संस्था व इतर अनेक खाजगी संस्था यांचे तुमच्यावरचे नियंत्रण या सर्व प्रकारांत वाढत चालले आहे. समाज जितका प्रगत होतो आहे तितकी तंत्राधिष्ठितता वाढते आहे. माहितीचा साठाही त्या प्रमाणात वाढतो आहे. तो जितका अजस्र होतो आहे, तितके त्याला सुरक्षित राखणे अशक्य होते आहे. या परिस्थितीत सामान्य मनुष्याला खाजगीपणा उरत नाही.
जागतिकीकरणोत्तर जगात जन्मलेल्या आणि जगत असलेल्या तरुण पिढीच्या खाजगीपणाविषयीच्या संकल्पना पूर्वीच्या पिढीहून वेगळ्या आहेत असे म्हटले जाते. नाश्त्याला काय खाल्ले अशा क्षुल्लक गोष्टींपासून घटस्फोट किंवा जिवलग व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यातले अनेक तपशील 'ट्विटर' किंवा 'फेसबुक'वरच्या आपल्या 'मित्रां'सोबत वाटून घेणे, हा तरुणांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनतो आहे. 'आपले आयुष्य पूर्वीइतके खाजगी राहिलेले नाही,' ही आधीच्या पिढीला जाणवणारी हतबलता त्यामुळे कदाचित त्यांना जाणवत नसेल, अशीही एक शक्यता आहे. मात्र जेव्हा गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांमागे ते धावू लागतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येऊ लागते की आपण स्वत:हून उघड केलेली आंतरजालावरची आपल्याविषयीची अशी खुली माहिती वापरून आपल्या राजकीय विचारांविषयी, आपल्या व्यक्तिगत मूल्यांविषयी आणि आपल्या चारित्र्याविषयीही आडाखे बांधले जात आहेत; त्यावरून आपल्याला नोकरी मिळणार की नाही हे ठरणार आहे. तेव्हा या तरुणांनाही खाजगीपणाची गरज भासते आणि सत्ताढाच्यांविषयीची हतबलता आणि चीड त्यांच्यातही निर्माण होते.
आपली सत्ता आणि जनतेचे अज्ञान कायम राखण्याचे सत्ताधाऱ्यांचे डाव, जगासमोरचे प्रश्न सोडवण्यात त्यांना येणारे अपयश, वित्तसंस्थांच्या गैरव्यवहारांना अधिकृत अवकाश दिल्यामुळे आलेली आर्थिक मंदी, कधीही निर्णायक ठरणार नाहीत अशी इराक-अफगाणिस्तानातली युद्धे अशा पार्श्वभूमीवर मग राजकीय-आर्थिक सत्ताधाऱ्यांना तरी आपले व्यवहार, आपली हतबलता किंवा छोट्यामोठ्या फजित्या या खाजगी राखण्याचा हक्क का असावा? 'जनता मूर्ख किंवा अप्रगल्भ आहे; त्यामुळे तिला अंधारात ठेवा' असे युक्तिवाद खूप जुने आहेत; आताच्या जगात ते कालबाह्य झाले आहेत. ‘राष्ट्रहिताला धोका' असल्याचा दावा करणारे राजकारणी अनेक वेळा निव्वळ आपल्या सत्तेला असणारा धोका कसा टाळता येईल याचीच काळजी करत असतात. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीसच ब्रिटनमध्ये 'परकीय दूतांमध्ये झालेल्या गुप्त वाटाघाटींमुळे आपल्यावर महायुद्ध लादले गेले' असे जनमत तयार झाले होते. पहिल्या महायुद्धात (१९१४-१८) लढलेल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पंतप्रधान झालेल्या (१९४५) क्लेमेंट ॲटली यांनीच १९२०मध्ये 'आमची फसवणूक झाली' अशी जाहीर कबुली दिली होती. इराक-अफगाणिस्तानातल्या चालू युद्धाविषयीचे अमेरिकेचे जनमत आज असेच आहे. आज आपण संसदेचे कामकाज घरबसल्या पाहतो, तेव्हा आपलेच लोकप्रतिनिधी आपल्याच पैशांनी चालणाऱ्या अधिवेशनात वेळोवेळी अडथळे आणून महत्त्वाची कामे अडवून धरतात हे आपल्याला दिसते. माहितीच्या अधिकारासारखे लोकशाही हक्क आता सर्वसामान्यांना मिळत आहेत. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे ते एक शस्त्र आहे. मग विकीलीक्स हे त्याचेच पुढचे पाऊल म्हणता येईल का?
२०१०चे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या मारिओ व्हार्गास लोसा यांना विकीलीक्सविषयी विचारले असता 'ते धोकादायक पण सुंदर आहे', असे त्यांनी म्हटले. 'जगभरातली लोकशाही सरकारे यामुळे उघडी पडत आहेत; पण दमनशाही गाजवणारी, कमालीची गुप्तता राखणारी सत्तास्थाने मात्र या माहितीगळतीची तितकी बळी ठरत नाही आहेत,' असेही ते म्हणाले. पण कितीही काळजी घेतली तरीदेखील सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे ती अपुरी पडणे आणि बाहेरच्या जगात आपल्या गैरव्यवहारांविषयीची स्फोटक माहिती फुटत राहणे, या वास्तवाशी या जुलमी सत्तांचा झगडाही चालूच आहे असे दिसते. ब्रह्मदेशातल्या सरकारविरुद्ध बौद्ध भिक्षूंनी काढलेल्या अहिंसक मोर्चावर जेव्हा पोलिसी अत्याचार झाले (२००७), तेव्हा मोबाईल कॅमेरा आणि इंटरनेट यांच्या जोरावर काही तासांत जगभरातल्या हजारो लोकांपर्यंत ही बातमी त्याच्या चित्रणासह पोचली. इराणमधल्या निवडणुकांतले गैरव्यवहार आणि त्यांविरोधातले विद्यार्थ्यांचे मोर्चेही (२००९) हां हां म्हणता जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले. राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे विचार मांडणारी आंतरजालावरची अनेक संकेतस्थळे आपल्या नागरिकांना दिसू नयेत यासाठीची चीनची धडपड लपून राहणे दिवसेंदिवस अशक्य होते आहे. ट्युनिशियामध्ये नुकतेच लोकाग्रहामुळे सरकार पायउतार झाले. तिथल्या स्थानिक जनतेला सरकारविरोधात एकत्र आणण्यासाठी फेसबुक-ट्विटरसारख्या माध्यमांची मदत झाली. अशा अनेक गोष्टींतून हेच सिद्ध होते आहे, की माहिती लपवून सत्ता राखणे दिवसेंदिवस अधिकाधिक अवघड होत जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २००९ मध्ये चीनच्या दौऱ्यावर गेले होते. 'माहितीची देवाणघेवाण जितकी खुल्या पद्धतीने होईल तितका समाज अधिक समर्थ होईल. सरकारांना जाब विचारणे, नव्या कल्पनांना जन्म देणे आणि एकंदर आपली निर्मितिक्षमता वाढवणे यासाठी नागरिकांना माहितीच्या खुलेपणाची मदत होते,' असे विचार त्यांनी तेव्हा मांडले होते. या पार्श्वभूमीवर मग असांजवर प्रत्यक्ष कोणतेही आरोप न ठेवता खाजगी कंपन्यांना धाकदपटशा दाखवून विकीलीक्स बंद पाडण्याचे अमेरिकेने नुकतेच केलेले अयशस्वी प्रयत्न, हे दमनशाही सरकारांसारखेच वाटणे साहजिक आहे. अमेरिका, चीन, इराण असे देश; स्विस बँका व इतर वित्तसंस्था या सर्वांचे जे दुटप्पी वर्तन आज उघडे पडते आहे, आणि विकीलीक्सविषयी त्यांचे जे दमनशाहीचे वर्तन दिसते आहे, त्यावरून खरोखरच हा लढा निव्वळ परस्परविरोधी विचारसरणींमधला न राहता तरुणपणी असांजला जाणवला तसा व्यक्ती विरुद्ध संस्था असा आहे की काय, असे वाटायला नक्कीच जागा आहे. आता जगभरातली सरकारे आणि संस्था आईसलँडचा पाठ गिरवून आपले व्यवहार अधिक पारदर्शक करतील की शहामृगाप्रमाणे वाळूत डोके खुपसून बसणाऱ्या चीन-इराणसारख्या सत्तांचे धडे गिरवतील असा प्रश्न आहे. कदाचित जागतिक लोकशाहीचे भवितव्यच त्यावरून ठरणार आहे.
—
संदर्भ व अधिक वाचनासाठी :
विकीलीक्सविषयी मूलभूत माहिती
ज्यूलिअन असांजविषयी मूलभूत माहिती
असांजचे बालपण आणि 'मेंडॅक्स' या सांकेतिक नावाने त्याने संगणक हॅकर म्हणून जे काम केले होते त्याविषयी अधिक माहिती या पुस्तकात मिळेल : Underground: Tales of Hacking, Madness and Obsession on the Electronic Frontier - by Suelette Dreyfus, researched by Julian Assange (1997) (E-book available)
अनेक नियतकालिकांत विकीलीक्सविषयी विश्लेषणात्मक लेख प्रसिध्द झाले आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाचे लेख इथे वाचता येतील :
इकॉनॉमिस्ट
गार्डियन - विशेषतः
The Guardian view on the WikiLeaks plea deal: good for Julian Assange, not journalism
आईसलँडचा माध्यमविषयक कायदा
प्रसिद्ध अमेरिकन विचारवंत नोम चॉम्स्की यांनी व्हिएतनाम युद्धाच्या अनुषंगाने 'बुद्धिवाद्यांची जबाबदारी' असा निबंध १९६७मध्ये लिहिला होता. त्यातले अनेक मुद्दे आजही लागू होतात. या संदर्भातली एक तत्त्वचिंतनात्मक मांडणी या दृष्टीने तो लेख मुळातून वाचण्यासारखा आहे.
आभार.
लेख पुन्हा इथे प्रकाशित करण्याबद्दल आभार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेख आवडला.
लोकसत्ता मध्ये अन्वयार्थ सदर काही दिवसांपूर्वी वाचले होते.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू