‘नर्मदेऽऽ हर हर..’

नुकताच झालेला साक्षात्कार--

सतत त्रस्त वाटू लागले, चिडचिड होऊ लागली, सारे काही ‘निरर्थक’ वाटायला लागले, की नक्की काय करायचे? जगन्नाथ कुंटेंचे ‘नर्मदेऽऽ हर हर..’ वाचायला सुरुवात करायची. कोणत्याही पानापासून!

‘प्रत्यक्षात अवघड आहे’ ह्याची जाणीव असूनही मनाला भुरळ पाडणारी नर्मदा-परिक्रमा! तिचा निसर्गरम्य परिसर, तिच्या प्रवाहांचा खळाळ, डोंगरांवरील चढ-उतार, वाटांवरील खाच-खळगे, काटे-कुटे, दगड-धोंडे, हवेतील बोचरी थंडी.... सार्‍याला अनुभवत रहायचे! सध्यातरी हा अनुभव केवळ पुस्तकातून घ्यायचा, मनाशी इच्छा बाळगून की कधीतरी आपणही असे वेगळे जगून बघावे. काही काळ तरी निदान! पण इतके सोप्पे थोडेच आहे हे? शहरी सवयींना सोकावलेल्या आपल्या शरीरांना सोसणारे आहे का?

शारीर कष्टांची तमा न बाळगता स्वत:ला ‘नर्मदामैय्या’वर सोपवून निश्चिंतपणे मार्गक्रमण सुरू करणार्‍या ह्या अवलियांच्या अनुभवांतून काय शिकायचे?

‘अनंत अवकाशात आपण ठिपक्याएवढेसुध्दा अस्तित्वात नाही, कुठला लेका अहंकार करतोस? मी यंव न त्यंव आहे?
’‘चालेल त्याचे भाग्य उजळले म्हणतात! उजळायचे तेव्हा उजळेल, आधी चालले तर पाहिजे ना?’
‘शरीर म्हणजे ‘मी’ नव्हे, शरीराचे भोग ते भोगेल. आपण त्याच्याशी समरस होऊन दु:ख भोगण्याचे कारण नाही...’
‘साधकाची दृष्टी नितळ स्वच्छ हवी. चव-बेचव, किळस घृणा, सुंदर-असुंदर अशी भेदाची दृष्टी नको.’
‘माणूस आतून शांत झाला की राग येत नाही. शांततेत रहाणं वेगळं-शांत रहाणं वेगळं!’
‘गुणाला गुण म्हणताना मन मोठे करायला हवे. दोषाला दोष देतानाही हिंमत दाखवायला हवी!’
‘जेव्हा आपण स्वत:ला विशेष काही समजतो, तेव्हा जो अशक्त आहे, कमकुवत आहे, त्याला समजावून घेऊन न्यायानं वागणं हे महत्त्वाचं नाही का?’
‘आसक्तीचा धागा चिवट असतो, तो वेळीच तोडणे चांगले...’
अशी अनेक वाक्ये विचारात पाडतात. आपल्या रोजच्या जगण्यातील चिंता-भय सार्थ की निरर्थ?

जगन्नाथ कुंटे ‘परिक्रमा सुरु करण्यापूर्वी...’ सांगतात,
‘साधकाने परिक्रमा ही उपासनावृध्दीसाठी करावी. परिक्रमेत देहाला कष्ट होतात, मान-अपमान होतो, भिक्षा मागावी लागते. या गोष्टींमुळे अहं म्हणजे मी नव्हे ही जाणीव पक्की व्हायला मदत मिळते. सामान लुटण्याच्या परंपरेने आसक्ती कमी व्हायला मदत होते. मैयाच सांभाळणार आहे, ह्या वाक्यावरची श्रध्दा दृढ होते.’

आपले रोजचे जगणे हीदेखील एक प्रकारची परिक्रमाच की! त्यात काय काय घडत-बिघडत असते! दैहिक कष्ट, मानापमान, लुटालूट (कधी आपण इतरांकडून केलेली तर कधी आपली झालेली), कामे करताना करावयाचे ‘ॐ भवति भिक्षांदेहि..’ ह्या सार्‍याला सर्वार्थाने भिडण्यासाठी.... ‘मी’ बाजूला सारण्यासाठी.... जगन्मातेवर स्वत:ला सोपवून निश्चिंत रहाता यावे यासाठी....

वळकटी बांधायची, पाठुंगळीला लावायची, नर्मदामैयाचे स्मरण करुन तिच्यावर स्वत:ला सोपवून द्यायचे अन.....
चालू लागायचे......

नर्मदेऽऽऽ हर हर....

चित्रा राजेन्द्र जोशी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कुंटेंचं लेखन ओघवतं आहे, एका पांथस्थाचा परिप्रेक्ष्य म्हणून उत्तम लेखन आहे असे म्हणेन. ह्या नंतरचे 'साधना मस्त' पण ठीक आहे. नर्मदा परिक्रमेविषयी असलेली धार्मिक मते कुंटे वाचकावर लादताना जाणवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तकाचा उत्तम परिचय. खूप पूर्वी वाचलं होतंच हे पुस्तक. असं अचानक समोर आलं होतं. मात्र मला स्वतःला र. रा. गुण्यांचं याच विषयावरचं पुस्तक अधिक आवडलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

कुंट्यांच फक्त हेच पुस्तक आवडलं होतं.. नंतरच्या पुस्तकात तपशील बदलले पण एकूणच जे सांगायचं होतं ते पहिल्या या पुस्तकातच संपलं होतं असं सारखं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!