पंगत- काही सुंदर आठवणी
कुठलाही घरगुती समारंभ असू दे किंवा एखादा सण आमच्या कुटुंबात पंगत बसतेच. मला अगदी प्रकर्षाने आठवते ते म्हणजे माझ्या काकांकडे कसलासा समारंभ होता आणि त्यावेळी मला पहिल्यांदा कळलं होत की घर स्वच्छ झाडून, पुसून मग बसायला सतरंज्या अंथरून, ताटे ठेऊन मग ताटांभोवती सुंदर (सुंदरच कारण जरा जरी सुंदर रांगोळी नसेल तर रांगोळी काढणाऱ्या बाईच्या नावाचा उद्धार ठरलेला) रांगोळ्या काढून, उदबत्त्या लावून ताटे वाढुन पुरुषांना आधी जेवायला घालण्याची जबाबदारी ही बायकांचीच असते. मग पुढच्या काही कार्यक्रमांना हेही कळत गेलं की बहुतांश वेळा पंखा नसणाऱ्या दमट अंधाऱ्या स्वयंपाक घरात सगळा स्वयंपाक करणे हे बायकांचं कर्तव्यचं आहे.
मग एखाद्या कार्यक्रमाला, सणाला मी मुलगी असल्याने मलाही अशा स्वयंपाकघरात कामामध्ये सहभागी व्हावे लागे मग मी साधारण दहा बारा वर्षांची झाल्यावर कळलं की आता मी लहान मुलगी नसल्याने पुरुषांना आधी जेवण वाढावे लागेल आणि मगच जेवता येईल कारण सगळ्या बायका अस्सच करतात.
मग एखाद्या सणाला कळलं की सकाळपासून पोटात कावळे ओरडत आहेत आणि चार वाजता ते कावळे मरून गेले तरी माणसांची पंगत संपली नाही म्हणून बायकांनी नाही हो जेवायचं लगेच.
मग मला शिकवण्यात आलं ताट कसे वाढायचे ते म्हणजे कोशिंबीर याच बाजूला आणि भाजी त्याच बाजूला आणि हो यात जरा काही चुकल की सगळ्या पंगती समोर तुमचा पाणउतारा सगळे पुरुष आणि बायका करतील तर उपाशीपोटी तोही सहन करावाच लागणार. मग अश्या अनेक आठवणी तयार केल्या गेल्या. जसं एका कार्यक्रमात मला पोळीच कशी खाली वाकून वाढता येत नाही म्हणून सगळ्यांसमोर अपमान करण्यात आला तर एका समारंभात भाजीची जागा ताटात चुकली म्हणून सर्वांनी माझ्याबद्दल थोड थोड वाईट बोललं.
बरं ह्या सगळ्यात बायकांनी आनंदी राहणं अपेक्षित असतं म्हणे म्हणजे वाढताना चेहऱ्यावर हसू हवं. मग पुढे कळलं की मुली आणि बायकांनी ड्रेसकोडही सांभाळायचा असतो वाढताना. म्हणजे काय होत ना की पंगत सहसा जमिनीवर बसते आणि सगळ्या बायकांनी अगदी वाकूनच वाढलं पाहिजे असा आमच्या कुटुंबात नियम आहे. म्हणजे माझी एक नातेवाईक मामी की काकू मला तू वाढताना गुडघ्यात वाकलीसच कशी? बाईने कसं कंबरेत वाकूनच वाढलं पाहिजे यावर अत्यंत शेलक्या शब्दांत सुनावले होतें.
तर ड्रेसकोड म्हणजे बायका साडी नेसणार आणि मुली सलवार, कुडता आणि ओढणी. तर पदर/ओढणी नीटच बांधलेली हवी कारण वाकताना तुमचेच काका, मामा, भाऊ तुमच्याकडे बघणार आहेत.
बरं आणिक एक सुंदर गोष्ट म्हणजे आम्हा मुलींच्याच वयाचे आमचे आते मामे भाऊ मात्र अशाच पंगती मध्ये पदार्थांची नावे घेऊन आम्हा सकाळपासून उपाशी असणाऱ्या मुलींना पंगतीत पळायला लावून मला वाढ मला वाढ म्हणून गंमत करणार ती वेगळीच. छानच अगदी. कित्ती कित्ती कौतुकाने बघायची सगळी मंडळी त्यांच्याकडे.
बरं ह्या सगळ्यात माझ्या अगदी आई आणि वडील दोन्हीकडील कुटुंबात कधी कधी म्हणजे अगदी कद्धी सुद्धा मी एकाही अगदी एकाही पुरुषाला बायकांना जरा म्हंजे जरा ही मदत करताना पाहिलेलं नाही. त्यांचं कामचं नाहीये ते.
बायका स्वयंपाक करत असताना सगळी पुरुष मंडळी अगदी स्वयंपाक घराकडे बघतं ही नसतं. छानश्या गप्पा मारत दुसऱ्या खोल्यांमध्ये बसत असत.
हो पण लहान मुलगा जर भूक भूक करीत आला तर त्याला मात्र थोडाफार खाऊ नक्की मिळत असे. लहान मुली गौण. जरा सहन केली भूक तर काही बिघडत नाही मुलींचं.
बरं मग कधीकधी स्वयंपाक कमी होणार आणि मग बायका सगळ्यात शेवटी जेवणार तेंव्हा जे काही उरलं सुरलेल अन्न आहे तेच आज बाई भूकच नाही, जरा जास्तच झालं अस म्हणून पुरवून पुरवून खाणार.
तर अशा माझ्या रम्य आठवणी आहेत सण, समारंभ आणि पंगतीच्या.
मग पुढे पुढे माझ्या बई डोक्यात फेमिनिझम बिझम असलं काहीतरी खूळ भरलं आणि मी असल्या सुंदर प्रथा आणि परंपरांच्या विरोधात जाऊ लागले. मी हळुहळू नातेवाईकांकडे सण समारंभाला जाणंच टाळायला लागले. अजूनही माझ्या घरच्यांना मात्र वाटतं की मी ही त्यांच्याबरोबर अश्या सण समारंभाला नातेवाईकांकडे जावे पण मी बाई घरी बसते. माणूसघाणी कुठची.
प्रतिक्रिया
आवडला.
आवडला.
नाव वाचून वेगळ्याच अपेक्षेने वाचायला घेतला.
पण दिशा उलटी(?)च निघाली पण हीच खरी दिशा असावी बहुतेक!
असे माझे अपेक्षाभंग व्हावेत मधूनमधून
धन्यवाद.
आजकाल काही परंपरांना थोर, सुंदर अशी विशेषणे लावली नाहीत तर लोकांना उगाचच राग येतो त्यामुळं नावातच सुंदर लिहून टाकले. बाकी दिशा मला तरी उलटीच योग्य वाटते.
अगदी बरोबर वर्णन त्या काळाचे.
अगदी बरोबर वर्णन त्या काळाचे.
आता पंगती व्यावसायिक केटरर्सच घडवून आणत असावेत असे वाटते
ते ताटात वाढण्याचे नियम, नेमक्या जागा, डावे उजवे, मिठात लोणच्याचा ओघळ न जाणे वगैरे अगदी उगाळून उगाळून हॅरासमेंटी होत जायचे. म्हंजे शिस्तीत नीट स्वच्छ ताट असणे ठीकच पण त्यावरून कोणाला जज करणे म्हणजे अतीच.
अगदी बरोबर वर्णन त्या काळाचे.
तो काळ? फारच जुन्या काळाचे वर्णन आहे असं वाटू शकतं पण मी एका शहरासारख्या दिसणाऱ्या खेड्यात राहत असल्याने या गोष्टी आजही आसपास अगदी सहज घडताना पाहते. अगदी हल्ली हल्ली गेल्या चार ते पाच वर्षांत मी ह्यात सहभागी होणे थांबवले आहे. पण ह्या अशा पंगती अजूनही होतात इथे.
अगदी योग्य वर्णन! साधारण वीस
अगदी योग्य वर्णन! साधारण वीस एक वर्षांपूर्वीपर्यंत अशा सुंदर पंगती घरोघरी उठत असत. आताशा कमी झाल्यायत. गृहकृत्यदक्षतेचा आग्रह, नव्हे अट्टाहास, धरणारी ज्येष्ठ पिढी इतिहासजमा झाली. शिक्षण, नोकरीसाठी परगावी वा परदेशी सेटल होऊन तरुण पिढीने यातून सुटका करून घेतली. शिवाय, मोजकंच खाण्याची पद्धत आली. त्यामुळे घरची सणासुदीची जेवणंही बुफे पद्धतीने होतात हल्ली. सुटसुटीत होतं ते.
आणखी एक गोष्ट, काही वेळा बायकांना स्वतः कडकडीत उपवास करुन इतरांना रांधून वाढावे लागे. तेही उपवासाने डोके दुखत असताना किंवा चक्कर येत असताना. अर्थात, काही आज्या हे सर्व मनापासून करत. त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास झाला तरी मानसिक समाधान मिळे. मात्र ज्यांना हे घरच्यांच्या आग्रहामुळे करावे लागे त्यांच्या वाट्याला शारीरिक व मानसिक दोन्ही त्रास येत.
ताट वाढणे, रांगोळी काढणे, सुरेख अक्षर काढणे, विणकाम, भरतकाम इ. अशा अनेक गोष्टी मोठ्यांच्या पसंतीस उतराव्यात म्हणून तेव्हा जिवाचा आटापिटा केलेला आठवला की आता हसू येते. पुढे कधीच त्या करण्याची वेळ आली नाही. आता ह्यातल्या काही गोष्टींना महत्त्वच उरलेले नाही!
.
हसू येते, तिडीक/डोक्यात सणक/तत्सम काही येत नाही, याचे वैषम्य वाटते. असो चालायचेच.
भूतकाळातल्या गोष्टींसाठी मनात
भूतकाळातल्या गोष्टींसाठी मनात कायमचा कडवटपणा ठेवला तर आपल्यालाच त्रास होतो. It is better to move on. तेव्हाचे मोठे लोक आपापल्या अनुभवानुसार, मगदुरानुसार मुलामुलींना वळण लावत होते. हेतू वाईट नव्हता. जग बदलते आहे, भविष्यात तर किती बदलणार आहे याचा त्यांनाही अंदाज नसावा. माहितीच्या महापूराच्या पूर्वीचा काळ होता तो.
सुंदर रांगोळी काढणे वगैरे तत्सम गोष्टीत कमीपणा काहीच नाही. पण ते शिकताना सांगितले जायचे की हे केले की पुढे सासरी कौतुक होईल!!!! ही एक कला आहे, ह्यातून तुला आनंद मिळेल अशा हेतूने शिकवले असते तर बरे झाले असते. असो.
मुलींना रांगोळी काढावी लागल्याचे दुःख नाही, परंतु…
…अशानेच हिंदू पारंपरिक/परंपरावादी पुरुषप्रधान थेरडेशाही सोकावली, बोकाळली, माजली.
पण लक्षात कोण घेतो?
सुंदर रांगोळी काढण्यात कमीपणा नाही, हे खरेच. (असायचे कारणसुद्धा नाही.) परंतु, स्वेच्छेने. कोणी करायला लावले, किंवा, नपक्षी कोणी मापे काढण्यास सरसावून येण्यास टपून बसलेले आहे, म्हणून नव्हे!
आडात नाही, ते पोहऱ्यात कोठून येणार?
Extant पारंपरिक हिंदू संस्कृतीत (as opposed to some idealized, imaginary version of it) निखळ स्वानंदासाठी काहीही करणे हे महत्पाप आहे. (आणि, याउलट, दुसऱ्याच्या निखळ आनंदात माती कालविण्यासाठी सरसावून येणे हे आद्य नि परम धर्मकर्तव्य. ज्यातत्यात मध्येमध्ये करणे ही त्याची modus operandi. ‘संस्कार लावणे’, ‘संस्कृतिसंरक्षण’/‘संस्कृतिसंवर्धन’ अशी गोंडस नावे त्यास आहेत. आणि, सरतेशेवटी, minding one’s own business is not an Indian virtue.)
सांगण्याचा मतलब, त्यांना स्वतःला जे अवगत नव्हते, ते तुम्हाला ते काय शिकविणार, कपाळ!
“They knew no better” हा प्रतिवाद “But, I was only following orders!” या Nuremberg defenseइतकाच तकलादू आहे! By and large, अत्यंत दळभद्री, sadistic संस्कृती होती ती! अलम इतिहासात आक्रमक मुसलमानांनी नि इंग्रजांनी मिळून जितके केले नसेल, तितके हिंदूंच्या पुढील पिढ्यांचे नुकसान या स्वकीय पूर्वजांनी केले. (किंबहुना, हिंदूंचे नुकसान करण्यासाठी बाह्य शक्तींची गरजच नव्हती; त्या डिपार्टमेंटात आम्ही स्वयंपूर्ण होतो, नि अजूनही आहोत!)
परंतु, हे असेच चालायचे!
(अतिअवांतर: ‘देवा, त्यांना क्षमा कर. का की, ते काय करतात, ते त्यांचे त्यांनाच समजत नाही.’ हे एक परमोच्च भोंगळ विधान आहे.)
अजेंडा चालवणारी लोक आंधळी
हिंदू हिंदू काय लावले आहे.
भारतात हिंदू सोडून बाकी धर्माचे लोक पण राहतात.
त्या बाकी धर्मात.
१) डाव्या न च कथित काल्पनिक पुरुष प्रधान संस्कृती नाही आहेका की फक्त हिंदू धर्मात च आहे.
२) हिंदू धार्मिक सोडून बाकी भारतीय इतर धर्मात डाव्यांना ज्याची अलर्जी आहे ती भारतीय परंपरा पाळली जात नाही का?
३) डाव्यांना लाडके व्यक्ती स्वतंत्र (समाज व्यवस्थेचे सर्व फायदे घेवून फक्त अजेंडा म्हणून )
हिंदू सोडून बाकी धर्मात उतू चालले आहे का?
हिंदू न द्वेष सोडा.
हिंदू न पेक्षा बाकी धर्मात कट्टर पना जास्त आहे.
स्त्रिया न वर अन्याय जास्त आहे. चुकीच्या व
पुरातन परंपरा हिंदू धर्मीय लोकांनी सोडल्या आहेत.
हिंदू सोडून बाकी धर्मात आज पण पुरातन जुनाट परंपरा चालू आहेत.
जरा अजेंडा बाजू ल ठेवा.
पंगत ही कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी योग्य परंपरा आहे.
फक्त द्वेष म्हणून त्या परंपरेवर पण तुमची वक्र दृष्टी नको
कोणी कोणास म्हटले? (५ गुण)
कोणी कोणास म्हटले? (५ गुण)
चाचणी समाप्त.
..................
बादवे. ऑ? पंगत या परंपरेला नावे ठेवल्याचे मूळ लेखात कुठे आढळले? पुन्हा वाचावा लागणार लेख. आम्ही पुरुष आरामात लोड तक्के घेऊन गप्पा हाणतो, तुम्ही स्त्रियाच निगुतीने परंपरेचे रक्षण करा, तयारी झाली की आम्हाला बोलवा, आम्ही येतो पुख्खे झोडायला,.. अशा मनोवृत्तीबद्दल लेख आहे असे वाटले. आणि हे सर्व जपण्यात स्त्रियाच पुढच्या पिढीतल्या स्त्रियांवर अपेक्षांचे ओझे टाकत असणे हे त्यातले आणखी एक.
बाकी हिंदू आणि इतर धर्म, डावे वगैरे काही संदर्भ लागला नाही.
कोणी कोणास म्हटले...
मी (पक्षी: एका प्रतिसादकाने) दुसऱ्या एका प्रतिसादकास म्हटले. मला वाटते राजेश१८८ यांचा रोख त्याकडे आहे.
मूळ लेखात असे (बहुधा) कोणीही कोणासही म्हटलेले नाही. (चूभूद्याघ्या.) मात्र, तरीसुद्धा, प्रतिसादांतून आलेल्या वक्तव्यांवर प्रतिवक्तव्य करणे हे (मला वाटते, एक प्रतिसादक म्हणून) राजेश१८८ यांच्या अधिकारांत बसावे. ते प्रतिवक्तव्य मला पटो वा न पटो, परंतु, (ते प्रतिवक्तव्य करण्याच्या) त्यांच्या या अधिकाराचे समर्थन (निदान) मी (तरी) अवश्य करेन.
असो.
.
ते बाकीचे धर्म आदर्श आहेत, असा दावा येथे नक्की कोणी आणि कधी केला?
त्या बाकीच्या धर्मांशी मला नक्की काय घेणेदेणे आहे? त्यांच्या बुरसटलेपणातून त्यांचे जे नुकसान होत असेल (किंवा नसेल), त्याबद्दल त्यांचे ते पाहून घेतील. माझ्या धर्मसंप्रदायातल्या कुप्रथांतून जर मला त्रास होत असेल किंवा त्यातून माझे जर नुकसान (किंवा मनस्ताप) होत असेल, तर त्याबद्दल मी अवश्य बोंबलणार! इतर धर्मांतल्या कुप्रथांतून जोवर माझे वैयक्तिक नुकसान होत नाही वा मला व्यक्तिश: तोशीस पडत नाही वा डोक्याला ताप होत नाही, तोवर त्यांबद्दल बोंबलणे हे माझे कर्तव्य नव्हे. त्या धर्मांच्या अनुयायांनी वाटल्यास त्याबद्दल अवश्य बोंबलावे. त्यांचे वकीलपत्र त्यांनी मला दिलेले नाही.
बाकी तुमचे चालू द्या.
मुळात विस्तृत कुटुंबाला एकत्र ठेवायचे कशासाठी? सगळ्यांची एकमेकांच्या तंगड्यांत तंगडी (आणि आणखी कशात तरी आणखी काहीतरी) नुसती! सगळ्यांनी एकत्र येऊन प्रसंगी जो उपस्थित नसेल, त्याच्या (किंवा तिच्या) कुचाळक्या करणे, याहून अधिक थोर असे काहीही त्यातून साध्य होत नाही.
विस्तृत कुटुंब हा एक जमाव आहे; नव्हे, जमावाहूनही वाईट आहे. जमावाचा बुद्ध्यंक हा त्यातल्या सर्वात कमी बुद्ध्यंक असलेल्या व्यक्तीचा बुद्ध्यंक भागिले जमावातील व्यक्तींची संख्या इतका असतो, असे कोणीसे म्हटलेले आहे. विस्तृत कुटुंबाचा बुद्ध्यंक हा त्याहूनही कमी असतो, नि उपद्रवमूल्य हे त्याहून कित्येक पटींनी अधिक असते. हवेत कशाला असले मेळावे?
(याचा अर्थ असा नव्हे, की आपल्या निकटतम कुटुंबियांच्या मर्यादित परिघाबाहेर कोणी कधी कोठल्या नातेवाइकाशी संबंध ठेवूच नयेत. प्रत्येक माणसास नि नात्यास पारखून, एकास एक तत्त्वावर, ज्यांच्याशी इष्ट असेल, त्यांच्याशी – अगदी वाटेल तितक्यांशी – अवश्य ठेवावेत. परंतु, व्यक्तिगत पातळीवर आणि स्वेच्छेने ठेवावेत. मात्र, सगळ्या झुंडीने जबरदस्तीने एकसमयावच्छेदेकरून एके ठिकाणी जमलेच पाहिजे, हे नक्की कशासाठी?)
तुम्ही गृहितक मांडले आहे
खरी स्थिती ही आहे कुटुंब च नको ह्या विचारामुळे आणि फालतु व्यक्ती स्वतंत्र मुळे लोक एकटी पडली आहेत जरा खऱ्या समाजात डोकवा.
अपघात,आजार,आर्थिक कमजोरी मुळे एकदा व्यक्ती जी कुटुंब पासून वेगळा झाला आहे .
त्याला रोज चे साखर ,मीठ,भाज्या ,औषधे देण्यास पण कोणी नाही.
दुःखात बोलायला कोणी नाही.
सुखात मनापासून सहभागी होणारे कोण नाही.
संकटात साधे जामीन देणारे पण कोणी नाहीत.
जरा आताच्या समाजात डोकवा.
तो माणूस तडफडून मेला तरी बघायला कोणी नाही
आणि समजा…
…विस्तृत परिवार जरी असला, तरी त्यातले किती कावळे ऐन वेळी मदतीला धावतात, असे वाटते? (मदत बोले तो, उपयोगी मदत. तोंडदेखली मदत नव्हे; पुढेपुढे करण्याची ‘मदत’ तर नव्हेच नव्हे.)
हं, मेल्यावर खांदा द्यायला येणार नाहीत. नंतर मात्र आपला किती ‘जिव्हाळा’ होता, याचा बोभाटा करायला (नि जमलेच, तर त्या आधारावर गचकलेल्याची एखादी बारकीसारकी चीजवस्तू ‘आठवण’ म्हणून निर्लज्जपणे ‘हक्काने’ मागून लंपास करायला) घोळक्याने घोंघावत येतील.
तुम्हाला म्हणून सांगतो, राजेश१८८राव. आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना (कोणी ओळखीचे असतील, तर) विचारून पाहाच एकदा. ते सांगतील, कोणीही कोणाचे नसते, म्हणून. सगळे चोर साले. डँबीस! Bloody b******s, all!
(कुसुमाग्रजांची नि त्या गणपतराव बेलवलकरांची बिनशर्त क्षमा मागून. इथे हत्तींचा नक्की काय संबंध आला नि ते आभाळ कधीपासून नि का पाठीवर घेऊ लागले — फॉर्दॅट्मॅटर, हत्तीच काय म्हणून; घोडे, उंट, राजा, वजीर, झालीच तर प्यादी, या सर्वांनी काय घोडी मारली होती — हे आजतागायत अनुत्तरित राहिलेले प्रश्न आहेत. कुसुमाग्रजांचे, म्हणून गोड मानून घ्यायचे, झाले. परंतु, ते असो. चालायचेच.)
पंगत आणि भाऊबंदकी
ज्या काळी पंगती झडायच्या तेव्हा भाऊबंदकी किंवा वाटण्या वगैरे प्रकार नव्हता बहुतेक
?
१. असे कोण म्हणते?
२. पंगतींचा नि भाऊबंदकी/वाटण्या असण्यानसण्याचा परस्परसंबंध काय?
तुम्ही हे विचारात आहात
ह्याचा अर्थ तुम्ही ह्या विषयावर एक शब्द पण लीहण्या साठी योग्य नाहि आहात.
सत्य हेच आहे
सध्या झुंड च महत्वाची आहे आणि त्याच झुण्डी च हिस्सा असणे महत्वाचे आहे.
तर च अधिकार, सुरक्षितता ,संरक्षण मिळू शकते
.
झुंड असेल तर त्या jhundi मधील व्यक्ती वर अन्याय होण्याची शक्यता खूप कमी
पंगत
आमच्या लहानपणीच्या पंगतीच्या आठवणी काही रम्य नाहीत. पंगतीत बसलं असताना, जेवायला सुरवात करुन, सर्व पदार्थांची चव घेण्याच्या आंतच, विविध आक्रमणे होत. भातावर केवळ शास्त्र म्हणुन वाढलेल्या अपुऱ्या वरण असलेल्या मुदीचे गोळे पोटात जातात तोच मसालेभाताचे आक्रमण व्हायचे. आणि काही, हो नाही म्हणायच्या आंत, पानात मसालेभाताचा डोंगर पडलेला दिसायचा. पानात काही टाकायचे नाही म्हणून तो संपवावा लागायचा. त्यानंतर मुख्य पक्वान्न खायला भूकच रहायची नाही. जेवणाच्या शेवटी, आपल्या पानात, वर एक इवलीशी खीर वाढली आहे, हे ध्यानात यायचं. आणि त्या भात, भात, भात असं ओरडत, पानात भाताचे ढिगारे लोटणाऱ्या दैत्यांपासून तर कायमच सावध रहावं लागायचं!
भुकेने पोटात कावळे ओरडत आहेत,
भुकेने पोटात कावळे ओरडत आहेत, समोर जेवण वाढून झाले आहे पण सुरू करता येत नाही कारण श्लोकांची न संपणारी माळ लागली आहे असा अनुभव घेतला आहे का?
वदनी कवळच्या पुढे सुरू होणारा कार्यक्रम.
त्यावरून बहुधा रा ग गडकरी यांचा एक किस्सा (खखो देजा) ऐकला होता.
किस्सा?
"तर तो किस्सा ऐकूया, एका छोट्याश्या ब्रेकनंतर" अशा काही विचाराने लगेच सांगितला नाहीत का?
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
असेच एकदा लोक वाढून झालेल्या
असेच एकदा लोक वाढून झालेल्या पानावर आडवा हात मारण्याच्या तयारीने भूक आवरून वाट श्लोक संपण्याची बघत असताना एका कोण्या गृहस्थांनी लांबलचक श्लोक मालिका भसाड्या रेकणाऱ्या आवाजात सुरू केली म्हणे. खूप वेळ झाला तेव्हा कोणीतरी कोणाला तरी म्हणाले की या श्लोकांचे किती चरण आहेत विचारून ये रे.. तेव्हा म्हणे गडकरी म्हणाले की त्यापेक्षा आधी त्या गाणाऱ्याला किती चरण आहेत ते पाहून ये..
अर्थात हे खरेच घडले असेल असे नाहीच. पण आठवण येत असे कोणी फार लांबड लावली की.
लग्नाच्या पंक्ती मी अनुभवल्या आहेत
मुलीचे लग्न ठरले की सर्व भावकी कामाला लागायची...
त्या काळी गॅस हा प्रकार नव्हता मग एकद्या झाडाची मोठी फांदी तोडून त्याच्या thaplya पाडल्या जायच्या .
आणि हे काम सर्व पुरुष च करायचे ह्या मध्ये स्त्रियांचा सहभाग झीरो असायचा.
ती लाकड सुकवली जायची..
जेवण बनवण्यासाठी तांदूळ,रवा आणला जायचा तो साफ करायचे काम मात्र स्त्रिया च मिळून करायच्या.
. लग्न दिवशी सर्वांसाठी जेवण बनवायचे काम पुरुष च करायचे स्त्रियांचा सहभाग झीरो.
आणि आजू बाजू ची लोक च जेवण बनवायची.
. पत्रावळ्या वर जेवण वाढले जायचे .
जेवण वाढण्या पासून खरकटे uchalnya पर्यंत सर्व काम पुरुष च करायची आणि ही सर्व काम लोक कोणताही आर्थिक मोबदला न घेता फक्त रीती रीवज म्हणून प्रेमाने करायची.
.आता फक्त अक्षदा टाकायला लोक येतात .
ना जिव्हाळा ना प्रेम
सामाजिक मूल्य नष्ट झाल्याचे हे परिणाम आहेत.
आजोबा
माझे आजोबा माझ्यापेक्षा साधारण ७२ वर्षांनी मोठे होते. ते राहायचे ते गाव ठाण्यापासून साधारण अडीच-तीन तासांवर होतं. कर्जतपर्यंत लोकल आणि पुढे एस्टीनं अर्धा तास.
आजोबा आले तरीही रोजच्या रात्रीच्या जेवणाला आम्ही सगळे एकत्रच बसायचो. दुपारची जेवणं आपापल्या वेळेस. जेवताना काही वाढताना माझ्या शेजारची भाजी किंवा भात वगैरे वाढायची वेळ आली की आजोबा ताटात बोट दाखवून सुचवायचे, 'इथे वाढ' म्हणून. मला रीतभात नसण्याची आणि आपल्या मुलीनं तिच्या मुला-मुलीला रीतभात न शिकवल्याची त्यांना खात्रीच असावी. पण ते फक्त त्यांच्या ताटापुरतं. आमच्या ताटांमध्ये आम्ही कुठेही काहीही वाढलं तरी त्यांना फरक पडायचा नाही.
काही वर्षांपूर्वी ही गोष्ट मी बऱ्या अर्ध्याला सांगितली. तो मला थालिपीठावरच दही वाढत होता, तेव्हा मी एकदम "नाही, नाही" करत थालिपीठाच्या बाजूला दही वाढ म्हणून दाखवलं, आणि आजोबांची गोष्ट सांगितली.
आता आम्ही दोघं सोफ्यावर जेवायला बसतो; समोर टीव्ही सुरू असतो. अधूनमधून तो 'टिढीश टिढीश' असे आवाज आपण होऊन काढतो. एखाद्या मोक्याच्या वेळी 'टिढीश टिढीश' आवाज काढला नाही तर मी त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं बघते. आणि जेवताना दही, चीज किंवा काही वाढायची वेळ आली तर आजोबांसारखं, ताटात बोट किंवा काटा दाखवून 'इथे वाढ, इथे वाढ' चालतं.
जिव्हाळा, परंपरा, प्रेम, सामाजिक मूल्यं वगैरे काहीही नसलं तरीही आमच्याकडे ड्रामाबाजी चिकार चालते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तो आवाज
तो टिढीश टिधीश आवाज नक्की कसा काढतो ? तेवढंच कुतुहल!
(अंदाज)
तोंडाने.
अजून कसे?
अय्या!
म्हणजे, तुमच्याकडे चक्क हिंदी/मराठी चॅनेल आहेत? (तुमच्याकडून (ऑफ ऑल द पीपल) ही अपेक्षा नव्हती!)
आमच्याकडचे आम्ही कित्येक वर्षांपूर्वी बंद करून टाकले. मग परवा एकदा सासूसासरे आले होते तेवढ्यापुरते एकदोन महिन्यांकरिता पुन्हा चालू केले होते; सासूसासरे परत गेल्यावर ताबडतोब बंद करून टाकले. (दोन महिने एक से एक भयंकर सीर्यलींचा रतीब चालू होता. सुटलो एकदाचा त्यातून! नि मग त्यानंतर पाहायचे जर नाही, तर मग फुकटचे पैसे तरी कशाला भरायचे?)
(तसे पाहायला गेले, तर आमच्याकडे अमेरिकन चॅनेल जे येतात, त्यांचे पैसेसुद्धा आम्ही फुकटचेच भरतो. कारण, घरात तसे दोन टीव्ही आहेत, परंतु आमच्यात ते ऑन करण्याची पद्धत नाही. खूप पूर्वी पाहायचो, परंतु मध्यंतरी कंटाळून (आणि तसाही पाहायला वेळ होत नसल्याकारणाने) पूर्ण सर्व्हिस बंद करून टाकली होती, त्यानंतर असंख्य वर्षे घरातले दोन्हीं टीव्ही कशालाही जोडलेले नव्हते. मग दीडदोन वर्षांपूर्वी, कधी चुकून वाटले तर काहीतरी पाहायला असावे, म्हणून (आणि मुख्यत्वेकरून इतर सेवांबरोबर पॅकेज डील मिळाला म्हणून) किमानपक्षी अमेरिकन चॅनेल सुरू केले. परंतु, वेळ होत नाही म्हणून म्हणा, किंवा पाहण्यालायक काही असते असे वाटत नाही म्हणून म्हणा, किंवा तत्त्वांत बसत नाही म्हणून म्हणा, किंवा परंपरा आड येते म्हणून म्हणा, टीव्ही ऑन केला जात नाही. असो चालायचेच.)
नाही, नाही!
आम्ही 'स्टार ट्रेक - व्हॉयेजर' किंवा 'अंडर द डोम', किंवा तत्सम काही अमेरिकी मालिका बघताना तो 'टिढीश टिढीश' म्हणतो! क्वचित कधी स्थानिक बातम्या आणि हवामानाचा अंदाज बघतानाही आवाज काढले आहेत. 'साईनफेल्ड' आणि 'कर्ब ...' हे अपवाद आहेत.
आणि हो, तो हे आवाज तोंडानंच काढतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फुकटचे ज्ञान
इथे सर्व च ह्या ग्रहावरील लोक नाहीत असे वाटते.
१) पुरुषांनी पहिले जेवण द्यायचे नंतर स्त्रिया नी जेवायचे.
बस ,ट्रेन मध्ये स्त्रियांना पहिले चढून द्यायचे नंतर पुरुषांनी चढायचे.
काय फरक आहे.
त्या वेळी पुरुष पहिले जेवायचे कारण ते कष्टाची कम स्त्रिया न पेक्षा जास्त करायचे.
२) अंधारी कोंदट स्वयंपाकाची खोली.
आता पूर्ण पृथ्वी च प्रदूषित वातावरणाची शिकार आहे पहिले फक्त स्वयंपाक घर कोंदट होते .
आता पूर्ण पृथ्वी च प्रदूषित आहे .
कुठे जाणार.
३) हिंदी,मराठी टीव्ही चॅनल बघत नाही.
मग जगातील अशी कोणती भाषा आहे त्या भाषेचे चॅनेल तुम्ही बघता.
आणि असे काय दर्जेदार त्या भाषेत कंटेंट असतात.
४)
ज्या देशाशी आपले काही देणेघेणे नाही.
येथील सर्व गोष्टी च फालतु आहेत..
त्या मध्ये बदल घडवून आणायची आपल्याला इच्छा नाही.
मग टीका करण्याचा पण त्या व्यक्ती ल हक्क नाही.
!
लेखातले एक वाक्य अगोदर अनवधानाने नजरेखालून सुटले होते. (कारण शेवटी आम्ही पुरुषच; त्याला काय करणार?)
अतिशय विकृत परंतु दाहक वास्तव! आणि, प्रस्तुत वास्तव डॉक्युमेंट करणारी प्रस्तुत लेखिका ही बहुधा पहिलीच नसावी.
आम्हां हिंदू पुरुषांना हे बहुधा (सांगितल्याशिवाय) कधीच लक्षात यायचे नाही. (किंबहुना, सांगितले, तरीसुद्धा आम्ही त्यावर बहुधा कधीच विश्वास ठेवणार नाही. कारण, अनुभवाचा अभाव! आणि, जिचे जळते, तिलाच कळू शकते!) त्यामुळेच की काय, परंतु, हिंदू परंपरांचा अभिमान बाळगणे आम्हां हिंदू पुरुषांना थोडे सोपे जात असावे.
वर कोणीतरी दिलेल्या उदाहरणातसुद्धा, गडकऱ्यांनी टीका केली खरी, परंतु त्यांची धावसुद्धा सरतेशेवटी, मियाँजींच्या मस्जिदीपर्यंतच्या दौड़ीप्रमाणेच, कोणीतरी पंगतीत लावलेल्या श्लोकाच्या लांबणापर्यंतच गेली! कारण, तेही शेवटी पुरुषच! (शिवाय, तेव्हा त्यांना सपाटून भूक लागली असावी. मनुष्य हा शेवटी स्वार्थी असतो; स्वतःच्या पोटात कोकलणाऱ्या कावळ्यांपुढे कोठल्यातरी परस्त्रीचे दुःख (त्यांच्या लक्षात यदाकदाचित आले असलेच, तर) त्यांना शीतल वाटले असणार, यात काही नवल नाही.)
जिन्हें नाज़ है हिंदुओं पर, वो कहाँ है!
असो चालायचेच. (किंबहुना, हेच तर दुःख आहे!)
जिन्हें नाज़ है हिंदुओं पर, वो कहाँ है!
जिन्हे नाज़ है वो यहीं पे है , बाकि दुम दबाके भाग गए , किसी ओर के लिए अब दुम हिलाते है , जब के वो लोग इनकी तरफ ध्यान भी नही देते
सर्व नास्तिक, डावे
ह्यांच्या मनाचे खेळ आहेत.
मार्केट मध्ये उठाव च नाही अशा लोकांचे आत्म संतुष्टी साठी रचलेले मनोरे
तर ड्रेसकोड म्हणजे बायका साडी नेसणार आणि मुली सलवार, कुडता आणि ओ
स्वतःच स्वतःला ग्रेट समजले की .
सर्व आपल्या कडे च बघतात असा भास होतो.
कोणाकडे इतका वेळ नाही .
कोणाकडे बघण्यासाठी