किचन कॉन्फीडेन्शियल
उंच, देखणा, स्वयंपाक येणारा पुरुष. नुसताच स्वयंपाक येणारा नव्हे, तर एखादं रेस्तराँ चालवणारा, शेफ असलेला पुरुष हे एक सुंदरसं, अद्भुत स्वप्न असतं. आयुष्यातला काही काळ माझ्या स्वप्नातला राजकुमार हातात फ्रेंच टोस्ट, ऑरेंज जूस आणि कॉफी घेऊन येईल अशी भाबडी आशा मला होती. योगायोगाने त्या काळातच स्वयंपाकासंबंधित अनेक रिअॅलिटी शो सुरू झाले. मास्टरशेफ ऑस्ट्रेलियानं त्याची सुरुवात केली असावी. त्या वेळी पीएचडी करण्यासाठी मीदेखील ऑस्ट्रेलियातच होते. मास्टरशेफची इतकी हवा झाली होती की ट्रेनमध्ये, बसमध्ये, पबमध्ये सगळीकडे त्याबद्दल चर्चा असायची. त्या कार्यक्रमामुळे अशा प्रकारच्या इतर कार्यक्रमांकडे लक्ष जाऊ लागलं. साधारण याच काळात मला अँथनी बोर्डेन (त्याचं आडनाव फ्रेंच असलं तरी त्याला स्वतःला मी ते असंच उच्चारताना ऐकलं आहे) या माझ्या देखणेपणाच्या व्याख्येत बसणाऱ्या आणि स्वयंपाक येणाऱ्या पुरुषाची 'नो रिझर्व्हेशन्स' ही मालिका सापडली. वेगवेगळ्या देशांत जाऊन, तिथल्या खाद्यसंस्कृतीचं, खाण्याशी संबंधीत जागांचं आणि प्रत्यक्ष पाककृतींचं चित्रण त्या मालिकेत असायचं. आणि बोर्डेन त्याच्या कर्णमधुर खर्जातल्या आवाजात त्या गोष्टी सांगायचा. त्या मालिकेचे काही भाग बघून आपण इथे कधीतरी जायला हवं असं वाटायचं. हळूहळू ती मालिका अँथनीसाठी न बघता त्या माहितीसाठी बघितली जाऊ लागली. मधल्या काही वर्षांत या अशा कार्यक्रमांचा टीव्हीवर इतका अतिरेक झाला की त्यातला रसच संपून गेला. पण २०१८ साली अँथनीच्या आत्महत्येची बातमी वाचली तेव्हा एकदम या सगळ्याची आठवण आली आणि धक्काही बसला. त्यानंतर त्याच्या मृत्यूबद्दल झालेल्या उलटसुलट चर्चा, बातम्या ऐकून वाईट वाटलं. अजूनही त्याच्याबद्दल कुठे बातमी वाचली की हळहळायला होतं.
No Reservations
वडिलांकडून फ्रेंच वंशावळ असलेला अँथनी, लहान असताना आई-वडिलांबरोबर फ्रान्समध्ये एका दीर्घ सहलीला गेला. तिथल्या उच्चभ्रू रेस्तराँमधून आणि समुद्रकिनारच्या खेड्यांतून त्याला पहिल्यांदा अन्नाबद्दल काहीतरी वाटू लागलं असं तो 'किचन कॉन्फिडेन्शियल' या त्याच्या आत्मचरित्रपर पुस्तकात सांगतो. हे पुस्तक साधारण इतर आत्मचरित्रं ज्या ज्या कारणांसाठी म्हणून वाचनीय असतात त्यांपैकी एकाही कारणासाठी वाचनीय नाही. एखाद्या आत्मचरित्रातून प्रेरणा घ्यावी असा निरागस हेतू असेल, तर या पुस्तकात कधी हेरॉईन, कधी गांजा, कधी कोकेन अशा अंदाधुंद व्यसनांचे अपराधीपणाचा गंधही नसलेले उल्लेख येतात. या लेखनाला विशेष साहित्यिक मूल्यही नाही; ते पुन्हा पुन्हा सुधारणा करून केलं असेल असं वाटत नाही. ते उत्स्फूर्त आहे. उलट पुस्तकात जागोजागी त्याच्या हस्ताक्षरात काही काही लिहून ठेवल्यासारखं छापलं आहे. त्या बालिशपणाचा थोडा त्रासच होतो. पुस्तकातून अँथनीचं यश जगासमोर येतं असंही नाही. हे पुस्तक म्हणजे त्याच्या सगळ्या अपयशांची जणू नोंदच आहे. त्याच्या आयुष्यातला टीव्ही मालिकांचा सुवर्णकाळ येण्याच्या बरंच आधी हे पुस्तक लिहिलेलं आहे. संबंध पुस्तक वाचूनही तो नक्की चांगला शेफ होता किंवा नाही हा प्रश्नदेखील अनुत्तरित राहतो इतकं अपयश त्याच्या वाट्याला आलं आहे. तरीही आपण ते वाचत जातो याचं एक कारण म्हणजे ते लेखन प्रामाणिक आहे. आणि दुसरं, अँथनीची कधी खुसखुशीत, कधी धारदार, कधी तिखट तर कधी कडवटपणे समोर येणारी विनोदबुद्धी.
गोष्टी लिहिण्यासाठी मागे वळून बघता यायला हवं. स्वतःच्या अनुभवांची गोष्ट लिहिताना ती साधारण कुठेही घरंगळत जाऊ शकते. पण अँथनीची स्वतःकडे बघण्याची दृष्टी साफ आहे. लेखन जरी उत्स्फूर्त असलं तरी त्यातल्या प्रत्येक प्रसंगावर अनेक बाजूंनी विचार करून झाला आहे असं वाटतं. सुरुवातीच्या एका प्रकरणात, फ्रान्समध्ये 'ला तेस्त द बूश' या खेड्यात, तिथल्या एका मासेमाऱ्याच्या होडीतून जाऊन ऑयस्टर (कालवे) पकडून खाल्ल्याची एक आठवण तो सांगतो. त्याच्या आयुष्याला वळण देणारी अशी ती निर्णायक आठवण आहे, आणि ती त्यानं सिनेमातल्या एखाद्या दृश्यासारखी रंगवून सांगितली आहे. वाचताना गुडघाभर, निळ्याशार पाण्यात उतरलेला एक सात-आठ वर्षांचा मुलगा डोळ्यासमोर येतो आणि ऑयस्टर खाल्ल्यावर त्याच्या आजूबाजूला प्रकाशाचं एक वलय आलं आहे असा भास आपल्यालाच होतो. ती आठवण मला काहीशी अतिरंजित आणि आत्मप्रौढीची वाटली होती. पण त्यानंतर आलेल्या एका प्रकरणात, नोकरीसाठी म्हणून दिलेल्या पहिल्या प्रात्यक्षिकाची आठवण त्यानं सांगितली आहे. त्या मुलाखतीला तो पिएर कार्दांचा सूट घालून गेला. त्याच्या आजूबाजूला सराईतपणे काम करणाऱ्या इतर (गोऱ्या नसलेल्या) पुरुषांत तो हात भाजून घेतानाचा, त्या सुटामुळे हैराण होतानाचा आणि परिणामी सगळ्यांनी त्याची यथेच्छ थट्टा केल्याचा प्रसंगदेखील तितक्याच प्रामाणिकपणे लिहिला आहे.
त्याच्या सुरुवातीच्या आठवणी साठच्या आणि सत्तरच्यादशकांतल्या आहेत. आपण आयुष्यात काय करायचं आहे याबद्दल ठाम असा काहीही विचार नसताना, केवळ आपल्याला अन्न शिजवायला आवडतं या एका प्रेरणेने अँथनी रेस्तराँच्या जगात उतरला. तेव्हाच्या आणि आजच्या काळातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे आज विविध माध्यमांमुळे आणि केवळ लोकांच्या हातात असलेल्या सरस कॅमेऱ्यांमुळे आपला अन्नाकडे बघायचा दृष्टीकोनच बदललेला आहे. साठ आणि सत्तरच्या दशकातली अमेरिका इतर संस्कृतींमधून आलेल्या अन्नाबद्दल आज आहे तितकी उत्साही नव्हती. रेस्तराँमध्ये काम करण्यात विशेष असं 'ग्लॅमर' नव्हतं. अमेरिकेत स्थलांतर करून आलेल्या लॅटिन अमेरिकन लोकांचा पहिला थांबा म्हणजे एखादं रेस्तराँ असायचं. तिथे केरवारे करणे, भांडी घासणे, मग भाज्या चिरणे अशी हळूहळू बढतीची कामं करत करत हे लोक 'लाईन कुक' पदावर पोहोचायचे. रेस्तराँच्या स्वयंपाकघरात ताज्या भाज्या, दूध, चीज अशा आरोग्यवर्धक पदार्थांबरोबरच तिथे काम करणाऱ्या शेफआदी लोकांसाठी कोकेनआदी नशापाण्याचा पुरवठाही नियमितपणे होत असे. अनेकदा एक शेफ सतरा तास काम करून दोनचार तासांची झोप घेऊन पुन्हा कामावर परतायचा. अशा प्रकारच्या शिफ्ट करताना ते मधले काही तास निरभ्र आकाशाखाली चांदण्या बघत कोकेनच्या तारेत घालवून अँथनी आणि त्याचे सहकारी परतायचे. एकत्र काम करताना जी मैत्री, जो बंधुभाव निर्माण होतो त्याचे असे अनेक तरल, खट्याळ, विनोदी किस्से या लेखनात वाचायला मिळतात. आपण जे आयुष्य कधी जगणार नाही, आणि संधी मिळाली असती तरीही जगलो नसतो, त्या आयुष्याचा अनुभव अप्रत्यक्षपणे घेण्याचा भित्रेपणा या पुस्तकातून करता येतो.
या विषयातलं व्यावसायिक शिक्षण असायला हवं असा विचार करून अँथनीनं 'कलिनरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका' या विद्यापीठात शिक्षण घेतलं. तिथे प्रवेश घेताना आपण आपल्या ओळखी वापरल्याची कबुली देऊनच तो त्या प्रकरणाला सुरुवात करतो. तिथलं शिक्षण चिकाटीनं पूर्ण करून तो पुन्हा या व्यवसायाकडे परतला. पण त्यानं जिथे काम केलं असं एकही रेस्तराँ म्हणावं तसं टिकलं नाही किंवा तो तिथे टिकला नाही. असं असलं, तरी त्या व्यवसायाबद्दल त्याची स्वतःची अशी काही निरीक्षणं आहेत, जी तो त्याच्या खास शैलीत मांडतो. उदाहरणार्थ, इतर व्यवसायांतून भरपूर नफा कमवून मग वयाच्या पन्नाशीत जवळचे मित्र, "तू खरंतर रेस्तराँ काढायला पाहिजेस" म्हणतात म्हणून रेस्तराँ उघडणाऱ्या लोकांबद्दल लिहिताना अँथनीचे आम्लविनोद बहरतात. मासे, टोमॅटो किंवा चीझ पारखून घ्यावं तसे तो शब्द पारखून घेतो. जगातली बहुतांश रेस्तराँ बंद पडतात हे सत्य आहे. कारण या व्यवसायात तुमचा पैसा पिणारे असे काही मोठमोठाले खर्च असतात जे भागवून तुम्हांला फायदा कमवायचा असतो. तसं घडण्यासाठी तुम्हांला कला, विज्ञान, आणि लोकानुनय यांची सांगड घालत राहावं लागतं. हे माहिती असून या व्यवसायात उतरायला लोक का तयार होत असतील? याचं उत्तर अँथनीकडे आहे.
'..The easy answer, of course, is ego. The classic example is the retired dentist who was always told that he threw a great dinner party. “You should open a restaurant,” his friends tell him. And our dentist believes them. He wants to get in the business - not to make money, not really, but to swan about the dining room signing dinner checks like Rick in Casablanca..'
'..Maybe the dentist is having a midlife crisis. He figures the Bogie act will help pull the kind of chicks he could never get when he was yanking molars and scraping plaque. You see a lot of this ailment - perfectly reasonable, even shrewd businessmen, hitting their fifties, suddenly writing checks with their cock. And they are not entirely misguided in this; they probably will get laid..'
रेस्तराँ उघडण्यासाठी भांडवल पुरवणाऱ्या अशा पामरांची स्वप्नं बऱ्याचदा ते चालवू पाहणाऱ्या शेफ लोकांना मठ्ठ वाटतात. रेस्तराँ बंद पडू लागल्यावर ते चालू राहावं यासाठी मालक जी झटापट करू लागतात त्याचंही काहीसं करुण पण विनोदी वर्णन अँथनी करतो. त्याची कल्पनाशक्ती, शब्दसंपदा आणि त्याचा खास अमेरिकन उद्धटपणा या तिन्हींमुळे त्याचे मुद्दे आपल्यापर्यंत थेट पोहोचतात. पण न राहवून त्या बुडीत गेलेल्या रेस्तराँ-मालकांचीही दया येते. इथेही, अँथनी त्याचं काय चुकलं ते तितक्याच प्रांजळपणे कबूल करतो आणि पुढच्या प्रकल्पाकडे वळतो. या धंद्यातून सातत्यानं नफा कमावणारे लोक कोण असतात? ते नेमकं कुठे आणि किती लक्ष घालतात? त्यांचं खर्चाचं, वेळेचं नियोजन कसं असतं? ते कुणाला हाताशी घेतात? आणि एखाद्याकडून कसं काम करून घेतात याचीही उदाहरणं तो देतो, आणि अशा लोकांकडे तो का टिकला नाही याची कारणंही देतो.
या पुस्तकात दिलेले काही मुद्दे, आजकाल ज्याला 'व्हायरल होणं' म्हणतात, तसे त्या वेळी पसरले होते. एखाद्या चांगल्या रेस्तराँमध्ये आठवड्यातल्या कोणत्या वारी जेवायला जावं? शनिवारी आणि रविवारी सकाळी जो 'ब्रंच' असतो, त्यातला कोणता पदार्थ हमखास आधल्या आठवड्यातला शिळा, शिल्लक माल वापरून शिजवलेला असतो? कोणते सॉस बॅक्टेरियांची पेट्रीडिश असतात? तुम्ही तुमचा स्टेक 'वेल डन' (पूर्ण शिजवलेला) मागवला, तर भटारखान्यात तुमच्याबद्दल काय मत होतं? अशा प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात सापडतात म्हणूनही हे लोकांना फार वाचनीय वाटलं होतं. पण एव्हाना हे सगळं ज्ञान टीव्हीवरच्या कार्यक्रमांत रवंथ करून झालेलं आहे. एका प्रकरणात मात्र आपल्या स्वयंपाकघरातले चाकू कसे असावेत याबद्दल विस्तारानं लिहिलं आहे. ज्यांना स्वयंपाकात ‘जिवंत राहण्यासाठी करायचं कर्मकांड’ याच्या पलीकडे रस आहे, त्यांच्यासाठी ती माहिती उपयुक्त आहे.
अँथनीचे वरिष्ठांशी अनेकदा मतभेद होत असत. पण आपल्या बरोबरच्या, हाताखालच्या लोकांबद्दल त्याला (त्या उद्योगाला झेपेल तितकी) अनुकंपा होती असं त्याच्या लेखनातून जाणवतं. कदाचित त्याची स्वतःचीच मानसिक स्थिती याला कारणीभूत असावी. लिहिता लिहिता मध्येच तोही आपल्या अगदी नाजूक, दुखऱ्या मनःस्थितीबद्दल अंतर्मुख होतो. आणि ते परिच्छेद लिहून झाल्यावर काढून टाकावेसे त्याला कसे काय वाटले नाहीत याचं आश्चर्य वाटतं.
'I was a disgrace, a disappointment to friends and family and myself, and the drugs and the booze no longer chased that disappointment away. I could no longer bear even to pick up the phone; I’d just listen to the answering machine, afraid or unwilling to pick up, the plaintive entreaties of the callers an annoyance. If they had good news, it would simply make me envious and unhappy; if they had bad news, I was the last guy in the world who could help. Whatever I had to say to anybody would have been inappropriate.'
आपण हरवलो आहोत; कदाचित हरलोही आहोत हे स्वतः मान्य करणंदेखील अवघड असतं. ते असं सहज जगासमोर मान्य करण्यातला प्रांजळपणा दुरापास्तच.
पुस्तकात शेवटी टोकियो-सफरीबद्दल एक प्रकरण आहे. ते वाचताना त्याच्या सगळ्या खाद्यप्रवासवर्णनांची आठवण येते. अँथनीच्या लेखनात लहानमोठी अशी असंख्य निरीक्षणं असतात. ती वाचताना डोळ्यासमोर टोकियोचा बाजार उभा राहतो, तिथल्या रस्त्याकडेच्या टपऱ्याही उभ्या राहतात आणि उच्चभ्रू रेस्तराँदेखील उभी राहतात. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर सतरा वर्षांनी, म्हणजे २०१७ साली, 'सीएनएन'नं अँथनीची 'पार्टस् अननोन' ही मालिका प्रसारित केली होती. तिचा प्रत्येक भाग त्या त्या जागांच्या राजकीय, ऐतिहासिक आणि (खाद्य)सांस्कृतिक माहितीनं परिपूर्ण असायचा. 'काँगो'बद्दलच्या भागाची सुरुवात कॉनरॅडच्या 'हार्ट ऑफ डार्कनेस' नं होते. 'म्यानमार'वरच्या भागात ऑरवेल डोकावून जातो. शाकाहारी जेवण इतकं चविष्ट असू शकतं हे मला आधी माहिती असतं, तर मी शाकाहारी लोकांचा इतका दुस्वास केला नसता अशी कबुली अँथनी 'पंजाब'बद्दलच्या भागात देतो. ती पूर्ण मालिकाच पुन्हा पुन्हा बघण्यासारखी आहे. त्या मालिकेचं चित्रीकरण चालू असतानाच, फ्रान्समध्येच अँथनीनं गळफास लावून घेतला. ज्या देशात ऑयस्टर पकडताना त्याच्या या खाद्ययात्रेची सुरुवात झाली, त्याच देशात ती संपली.
अँथनीचं जाणं आठवलं, की पाठोपाठ रॉबिन विलियम्स, मॅथ्यू पेरी अशी नावंही आठवतात. त्यांच्यामुळे आपण किती वेळा हसलो होतो, हसता हसता अंतर्मुख झालो होतो तेदेखील आठवतं. विनोदातून सहज तत्त्वज्ञानात शिरू शकण्याची जादू या लोकांकडे होती. कदाचित, आपलं खरं रूप लोकांसमोर आलं तर त्यांना धक्का बसेल, अस्वस्थ वाटेल म्हणून त्यांनी जगाला सामोरं जाण्याच्या दरवाजाला असा विनोदाचा पडदा लावला असावा. अस्वस्थता, व्याकुळता, मनाचा तळ न गवसण्याची तळमळ अनेकदा विनोदातून व्यक्त होते. आजूबाजूच्या जगाचं निरीक्षण करण्याच्या निमित्तानं स्वतःपासून दूर जाता येत असावं. आपल्या विचारचक्रांतून तेवढीच सुटका करून घेता येत असावी. कोकेन, हेरॉईन अशा पदार्थांचं काम विनोदही करत असावा. अशा लोकांच्या निघून जाण्याची चिरफाड होऊ नये. खरंतर कुणाच्याच जगण्याची किंवा मरणाची चिरफाड होऊ नये. अँथनी बोर्डेनचं असं निघून जाणं दुःखदायक असलं, तरी एखाद्या निवांत दिवशी माध्यमांच्या भडिमाराकडे पाठ फिरवून युट्यूबवरचे त्याचे जुने जुने एपिसोड शोधून बघणारे माझ्यासारखे त्याचे असंख्य चाहते आजही आहेत आणि कायम असतील.