माझी वाटचाल - भाग ४ : पवईच्या आय.आय.टी.त प्रवेश
माझी वाटचाल (गणिताच्या निमित्ताने)
भाग ४: पवईच्या आय.आय.टी.त प्रवेश
बालमोहन लिमये
आय. आय. टी.कडून 18 एप्रिल 1975 रोजी नियुक्ति-पत्र मिळाल्यावर मी केलेली पहिली गोष्ट म्हणजे टाटा इन्स्टिट्यूटमधील माझ्या फेलो या पदाचा राजीनामा देणे. सहा महिन्यांची तरी पूर्वसूचना देण्याची अट बाजूला ठेवून त्यांनी माझा राजीनामा 1 मेच्या दुपारपासून स्वीकारला. माझी तिथली नियमित पगाराची नोकरी पाच वर्षांपेक्षा तीनच महिने कमी भरल्यामुळे मला त्यांच्याकडून भविष्यनिधीचा (provident fund) लाभ होऊ शकला नाही, फक्त माझे अंशदान (contribution) परत मिळाले. पण ती वेळ असल्या मामुली गोष्टीबद्दल हळहळ करायची नव्हती. शक्यतो लवकर मला नव्या जागी काम सुरू करायचे होते. एप्रिलच्या उत्तरार्धात गुजरातमधील सरदार पटेल विद्यापीठात माझा मित्र प्राध्यापक महावीर वसावडा याने गणित्यांची एक परिषद योजली होती. तिच्यात सहभागी झाल्यावर मी 2 मे रोजी पवईच्या आय. आय. टी.मध्ये रुजू झालो. त्या वेळच्या पदग्रहण प्रतिवेदनात (Joining Report) एक कलम धर्माबद्दल होते. मी कोणत्याच धर्माचा नसल्याने ते कलम मी रिकामे सोडले. पण मला सांगण्यात आले की मी तिथे काही तरी भरलेच पाहिजे. मग मी लिहिले ‘जन्माने हिंदू’ (born Hindu). ते चालून गेले. माझ्या समजुतीप्रमाणे आजकाल अशी सक्ती करता येत नाही.
मला तेव्हा पूर्ण कल्पना नव्हती पण आय. आय. टी.त रुजू व्हायच्या तारखेला बरेच महत्त्व असते, कारण तिच्यानुसार तुमच्या श्रेणीतील तुमची ज्येष्ठता (seniority) ठरते. पदोन्नती (promotion) मिळताना तिचा निश्चितच विचार होतो, पण ती तारीख 2 मे आहे की 5 मे आहे की 2 जून आहे याने काही फरक पडत नाही. शिवाय पदोन्नती काही वर्षांनंतर होण्याची शक्यता असते, लगेच नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे की जिच्यासाठी ज्येष्ठतेचे काटेकोरपणे व ताबडतोबीने पालन केले जाते. ती गोष्ट म्हणजे आय. आय. टी.च्या परिसरात राहायला मिळणारी जागा. जागा कमी आणि कुटुंबे जास्त असल्यामुळे फारच चढाओढ घडते. आम्हाला, म्हणजे मी, निर्मला व आमची तीन वर्षांची मुलगी कल्याणी यांना, सुरुवातीला स्टाफ हॉस्टेलमधली एकच खोली राहायला मिळाली. त्यात पुन्हा निर्मला गरोदर होती. गोव्यातल्या ऐसपैस जागेहून इकडे आल्यावर स्वयंपाकघर, शेजघर, बैठकीची खोली सर्व एकाच ठिकाणी करणे दुरापास्त होते, म्हणून निर्मला कल्याणीला घेऊन तिच्या आईकडे पार्ल्याला राहू लागली व मी त्या एका खोलीत.
त्या काळी श्रीयुत बिजोय कुमार गांगुली ‘संस्था अभियंता’ (Institute Engineer) होते. त्यांच्या कार्यालयाकडे अनेक चकरा मारल्यावर एकदाची मला माझ्या राहत्या खोलीला आतून जोडून असलेली (interconnected) आणखी एक खोली मिळाली, ज्येष्ठतेच्या क्रमानुसारच. मगच निर्मला कल्याणीसह तिथे राहायला आली व आम्ही तिघे एकत्र आलो. गुजरातेतील परिषदेला जाण्याआधी मी आय. आय. टी.त रुजू झालो असतो तर कदाचित दोन खोल्या सुरुवातीलाच मिळाल्या असत्या!
आय. आय. टी.मधील माझा प्रवेश काही सुधेपणाने झाला नाही. राहत्या जागेच्या प्रश्नाखेरीज आणखी एका समस्येचा मला सामना करावा लागला. वैद्यकीय तपासणी होऊन ‘तंदुरुस्त’ असा शेरा मिळेपर्यंत नेमणूक वैध (valid) होत नाही. सर्वसामान्य प्राथमिक तपासणीत डॉक्टर शशी राणे या कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या (Junior Medical Officer) लक्षात आले की माझ्या हृदयाचे ठोके पडताना त्यांत एक जास्त मरमर (murmur) आहे. मग ही मरमर माझ्या कामकाजावर वाईट परिणाम करू शकते का असा प्रश्न उभा राहिला. छातीचे क्ष-किरण छायाचित्र काढले, तर आय. आय. टी.च्या दवाखान्यात येणारे अभ्यागत हृदयशास्त्रज्ञ (visiting cardiologist)) डॉक्टर ओदक यांना माझे हृदय प्रमाणाबाहेर मोठे असल्याचे दिसून आले. माझ्यासाठी हे सगळे आश्चर्याचे धक्केच होते. गेल्या तीस वर्षांत माझ्या किती तरी वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या. माझी आई डॉक्टर असल्याने तिने नेहमीच माझ्या आरोग्याची कटाक्षाने काळजी घेतली होती. शाळा-कॉलेजात मी खोखो आणि आट्यापाट्या खेळत असताना कधीच काही जाणवले नव्हते. अमेरिकेला जाण्यापूर्वी व तिकडे गेल्यावरही कसून वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या. मी मनाने मोठा असल्याचा (गैर)समज बाळगत असलो, तरी माझे हृदयदेखील फार मोठे असल्याचे मला मुळीच माहीत नव्हते! डॉक्टर बिलियंगडी या आय. आय. टी.च्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने (Senior Medical Officer) मला कायमची नोकरी न देता माझी काही वर्षांसाठी तात्पुरत्या करारावर नेमणूक करावी असा प्रस्ताव मांडला. माझ्या या विकृतीमुळेच टाटा इन्स्टिट्यूटमधील माझी नेमणूक कायम स्वरूपाची नव्हती असा संबंध जोडायचा प्रयत्न झाला. आता टाटा इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करणाऱ्या सर्वांच्या नेमणुका, अगदी पूर्ण प्राध्यापकांच्याही, जास्तीत जास्त पाच वर्षांच्या असतात याचा पत्ताही या अधिकाऱ्याला नसावा. मग मात्र मी माझ्या आईचा सल्ला घ्यायला पुण्याला गेलो. तिथल्या डॉक्टर एस.व्ही. गोखले यांनी मला नीट तपासले व माझ्या हृदयात कुठलेलेही भोक त्यांना दिसत नसल्याचे लिहून दिले. मुंबईतील प्रसिद्ध हृद्रोगतज्ज्ञ डॉक्टर के. के. दाते यांनी बारकाईने तपासणी केली, क्ष-किरणशास्त्रज्ञाकडून बेरियम स्वालो (Barium Swallow) नामक चाचणी करवून घेतली, व मी तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा दिला. पण हे सगळे डॉक्टर खासगी असल्याने त्यांच्या शिफारशींचा काही उपयोग झाला नाही. शेवटी मला सेंट जॉर्ज हॉस्पिटल ह्या मुंबईतील सरकारी दवाखान्यामधील हृद्रोगतज्ज्ञ डॉक्टर बाल कृष्ण गोयल यांच्याकडून तपासणी करून घ्यायला पाठवले. त्यांनी एक गोपनीय पत्र लिहून स्पष्ट केले की माझ्या हृदयातील मरमर ही कार्यात्मक (functional) आहे, म्हणजे तो माझ्या हृदयाच्या कामाचाच एक भाग आहे व म्हणून ती निरुपद्रवी आहे. तेव्हा मात्र आय. आय. टी.च्या जेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याला ते मानावेच लागले. या सगळ्या प्रकरणात माझे जवळजवळ सहा महिने फार तणावाखाली गेले. वैद्यकीय तपासणीचा समाधानकारक निकाल मिळाल्यानंतर बऱ्याच काळाने कुणी तरी मला सांगितले की माझ्या बाबतीत झालेला हा घोळ काही प्रमाणात हेतुपूर्वक होता. पण तो काय हेतू होता व कोणाचा हेतू होता हे प्रश्न त्या वेळी मला बुचकळ्यात टाकणारे होते. त्यांची उत्तरे मला नंतर काही अंशी मिळाली.
विभागप्रमुख प्राध्यापक मनोहर वर्तक यांच्याखेरीज गणित विभागातील इतर कोणाचे मी नावही ऐकले नव्हते. त्या वेळी गणित विभागात यामिकी (Mechanics) या विषयात काम करणाऱ्यांचा भरणा होता. त्यांच्यातही पुन्हा दोन गट होते, द्रायु यामिकी (Fluid Mechanics) अभ्यासणारे व स्थायु यामिकी (Solid Mechanics) अभ्यासणारे. ‘गणिताचा अर्क म्हणजे यामिकी’ (The essence of mathematics is mechanics.) असे उद्गार मला ऐकू यायचे. खरे म्हणजे हा विषय ब्रिटिशांच्या काळात गणिताचा भाग समजला जात असला तरी आता त्याला गणिताचा भाग मानणे कालबाह्य झाले होते. जगभरातील गणित विभागांमध्ये नव्या शाखा प्रचलित होत होत्या. आधुनिक गणितातील विश्लेषण (Analysis), बीजगणित (Algebra), संस्थिती (Topology), समचय (Combinatorics) या शाखांचे प्रतिनिधित्व करणारे जवळजवळ कोणीच आमच्या विभागात नव्हते, डॉ. देवीदास पै व डॉ. गिरीश पटवर्धन यांचा अपवाद सोडला तर. मी व माझ्याबरोबर गणित विभागात रुजू होणारे डॉ. मधुसूदन देशपांडे, डॉ. कपिल जोशी आणि डॉ. प्रेम नारायण मात्र गणिताच्या आधुनिक शाखांत काम करणारे होतो. आधीच्या सदस्यांना स्वतः ज्या विषयांत काम केले आहे व अजूनही करतो आहोत त्यांतच रस असणे साहजिक असले तरी नव्या विषयांत हात घालण्याची त्यांची तयारी किंवा कुवत नव्हती. शिवाय त्यांच्यात्यांच्यात हेवेदावे खूपच होते. बऱ्याच जणांना आमच्या आगमनाची विनाकारण भीती वाटू लागली असावी, विशेषत: प्राध्यापक पी. सी. जैन व आर. डी. भार्गव या दुढ्ढाचार्यांना व त्यांच्या पित्त्यांना. त्यामुळे आमचे थंडे स्वागतच झाले. प्राध्यापक भार्गव आणि डॉक्टर बिलियंगडी एका बैठकीतले असल्याने माझ्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल लांबवण्याचा प्रयत्न झाला अशी कुणकुण मला लागली. किंबहुना आमच्या मुलाखती झाल्यानंतर आम्हाला नियुक्ति-पत्रे पाठवण्यात झालेला विलंब अशाच काही दबावाचा परिणाम होता असे बोलले जात होते. फलस्वरूप, आपण आपले काम उत्तम रितीने करत राहायचे व इतर काही फंदात पडायचे नाही असेच धोरण मला ठेवावे लागले. प्राध्यापक जैन व भार्गव यांची गणित विभागातील कार्यालये भली मोठी होती, प्रत्येकी चार खणांची (four bays) व लांब-रुंद खिडक्या असलेली. त्यांच्या तुलनेत माझे कार्यालय एका खोपटासारखेच होते. पण मला त्याची काहीच तमा नव्हती. त्या काळी संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभाग (Department of Computer Science and Engineering) आमच्या विभागाच्या इमारतीतच वसलेला होता. त्यामुळे जागेची टंचाई होती. काही वर्षांनी त्या इमारतीवर दुसरा मजला बांधला व संगणकविदांसाठी नवी इमारत उभी राहिली. मग आम्हा सगळ्या गणितविदांना प्रशस्त कार्यालये मिळाली.
माझ्या पहिल्या सत्रात मला एम. एस्सी. या पदवीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वास्तव विश्लेषण (Real Analysis) हा कोर्स शिकवायला सांगितले होते. हाच कोर्स मी बरोबर अकरा वर्षांपूर्वी रॉचेस्टर विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर वास्तव चल (Real Variables) या नावाने शिकलो होतो. गंमत अशी की दोन्हींचे पाठ्यपुस्तकही तेच होते, वॉल्टर रुडिन (Walter Rudin) यांनी लिहिलेले गणितीय विश्लेषणाची मूलतत्त्वे (Principles of Mathematical Analysis) या शीर्षकाचे. फक्त माझ्या भूमिकेत बदल झाला होता. माझ्या आय. आय. टी.मधील दीर्घकालीन पेशात हा कोर्स मी अनेकदा शिकवला. एकदा कोणीतरी सांगत होते की लिमये सरांना रुडिनचे पुस्तक उलटीकडूनही पाठ आहे. ही अतिशयोक्ती सोडून दिली तरी हे पुस्तक मला अत्यंत प्रिय आहे हे निर्विवाद! मॅग्रॉ-हिल (McGraw-Hill) नामक जगन्मान्य कंपनीने या पुस्तकाच्या 1953, 1964 आणि 1976 साली तीन आवृत्ती काढल्या आहेत, त्यांची असंख्य पुनर्मुद्रणे झाली आहेत व अजूनही होत आहेत, पुस्तकाची निदान दहा भाषांतरे उपलब्ध आहेत, व जगातील शेकडो विद्यालयांत ते पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जात आहे. त्यामुळे त्याला जगप्रसिद्ध म्हटलेच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांत चुका नाहीत. माझ्याकडील 1999 सालच्या मुद्रणप्रतीतील सहा चुका मी शेवटच्या पानावर नोंदवून ठेवल्या आहेत; विशेष म्हणजे ते सगळे फक्त मुद्रणदोष (typographic errors) नाहीत, तर त्यातल्या एका युक्तिवादातच त्रुटी आहे. अगणित गणितज्ञ कसोशीने वाचत असलेले हे पुस्तक सदोष कसे? याचे उत्तर एकच आहे : जवळजवळ कुठलीच गोष्ट पूर्णतः निर्दोष नसते. तेव्हा काहीही पूर्णतः बिनचूक असल्याची फुशारकी न मारणेच श्रेयस्कर! एम. एस्सी. च्या विद्यार्थ्यांना शिकवणे मला काही नवीन नव्हते. वर्गात फक्त वीस जणच असल्याने प्रत्येकाचा प्रतिसाद त्याच्या चेहऱ्यावर दिसायचा. मी जे बोलतोय ते न कळल्याचा भाव दिसला तर मला जास्त स्पष्टीकरण करता यायचे. दुसऱ्या सत्रामध्ये मला बी. टेक.च्या पहिल्या वर्षातील सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गाला शिकवायचे होते. अशा वर्गाला मी रॉचेस्टर, अर्व्हाइन, मुंबई, पणजी यांपैकी कुठेच शिकवले नव्हते, त्याचा काहीच अनुभव नव्हता. पण माझ्याबरोबर रामचंद्र राव हे खंदे प्राध्यापकही तोच कोर्स शिकवणार होते. त्यांच्याही वर्गात तितकीच मुले होती. त्यांनी पाठ्यक्रमाची आखणी करून दिली. कुठल्या व्याख्यानात काय शिकवायचे हेही ठरवून दिले, कारण आम्हा दोघांच्या गाड्या वेगळ्या रुळांवर चालणार असल्या तरी त्या बरोबरीने चालणे जरूर होते. शिकवायचा प्रत्येक तास एका नाट्यप्रयोगासारखा वाटे. शिवाय तीस विद्यार्थ्यांचा एक असे आठ गट करून त्यांच्याकडून वर्गात शिकवलेल्या सिद्धांतांवरचे प्रश्न सोडवून घ्यायचे होते, त्यासाठी आठ शिक्षकांचा एक ताफाही होता. ज्या वर्गात मी व्याख्यान द्यायचो तो रुंदीला बेताचा पण लांबीला खूप होता. तो संस्थेच्या मुख्य इमारतीत (Main Building) असल्याने त्याला एम. बी. असे म्हणत. मी फळ्यावर खडूने लिहिलेला मजकूर शेवटच्या रांगेत बसणाऱ्या मुलांना दिसणे गरजेचे होते, म्हणून मी भल्या मोठ्या अक्षरात लिहायला सुरुवात करायचो. पण दोन-तीन ओळी लिहून झाल्यावर माझ्या अक्षराचा आकार लहान होत जायचा, व नंतर एखाद्या लहान वर्गात शिकवताना जसे आपण लिहितो तसेच आपोआप लिहिले जायचे. कोणी कधी फारशी तक्रार केली नाही, पण मलाच अपराधी वाटायचे. आवाजही भरदार असायला लागायचा नाहीतर शेवटच्या ओळीत तो ऐकू जायचा नाही. व्याख्यानानंतर कॉफीचा एक कप अगदी हवाहवासा वाटायचा. प्राध्यापक रामचंद्र राव मला काही महत्त्वाच्या सूचना करत गेले. एक म्हणजे अभ्यासक्रमाचा फापटपसारा होता कामा नये, त्यातला काही भाग स्वतःला जास्त आवडत असला तरी तो लांबवायचा नाही, सुरुवातीला तयार केलेला आराखडा मध्येच बदलायचा नाही. दुसरे, शिकवताना सर्व विद्यार्थ्यांकडे समान लक्ष पुरवायचे, सगळ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचे, पण शेवटी बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या हिताचा पाठपुरावा करायचा. अशा प्रकारचे कानमंत्र माझ्या आगामी अध्यापनासाठी खूप उपयुक्त ठरले.
विभागप्रमुखाला प्रशासनात मदत करण्यासाठी व वेगवेगळे मतप्रवाह मांडले जावेत यासाठी विभागीय सदस्यांच्या काही समित्या वर्षाच्या सुरुवातीला गठन केल्या जात. संस्थेतील प्रत्येक अभियांत्रिकी विभागात दोन स्थायी स्वरूपाच्या समित्या काम करत, विभागीय पदवीपूर्व समिती आणि विभागीय पदव्युत्तर समिती (Departmental Undergraduate Committee and Departmental Postgraduate Committee). यांपैकी पहिली बी.टेक. या अभ्यासक्रमासंबंधीचे प्रश्न हाताळे व दुसरी एम.टेक. आणि पीएच.डी. या अभ्यासक्रमांसंबंधीचे. वेगवेगळ्या शास्त्र विभागांत या अभ्यासक्रमांखेरीज एम. एस्सी.चा, तसेच मानविकी आणि सामाजिक विज्ञान (Humanities and Social Sciences) विभागात एम.ए.चा अभ्यासक्रम चाले. अकरावीपर्यंतचा शालेय अभ्यासक्रम संपल्यावर बी.टेक. पदवी मिळवण्यासाठी पाच वर्षे लागत, एम.टेक.साठी सात वर्षे लागत. मात्र एम. एस्सी. आणि एम.ए.साठी सहा वर्षे लागत असल्याने ते अभ्यासक्रम पदव्युत्तर असूनही पदवीपूर्व समितीच्या कार्यक्षेत्रात मोडत. ही विसंगती कित्येक वर्षे तशीच राहिली. इतर विभागीय समित्यांपैकी एक महत्त्वाची समिती म्हणजे वेळापत्रक समिती (Time table Committee). ही समिती सत्रभर कुणी कुठला कोर्स शिकवायचा ते ठरवत असे. अर्थात ते ठरवण्याआधी सर्व शिक्षकांना त्यांची पसंती विचारली जाई. तोच कोर्स एकापेक्षा जास्त जणांना शिकवायला हवा असला तर विभागप्रमुखाचा सल्ला घेऊन काही ठराविक नियमांनुसार तो कोर्स कोणी शिकवायचा याचा निर्णय घेण्यात येई. विभागात कोणत्या नवीन सदस्यांची भरती करावी याचा विचार करण्यासाठी एक शोधसमिती काम करे. तिचा आमंत्रक स्वतः विभागप्रमुखच असे व त्याच्या मतांना प्राधान्य मिळे. आय. आय. टी.मधील कुठल्याही विभागाचे प्रमुखत्व फक्त तीन वर्षांसाठी असते. त्यानंतर विभागातील सदस्यांचा कौल घेऊन निदेशकाने दुसऱ्या प्राध्यापकाला पाचारण करायचे असते. ही गोष्ट अनेक दृष्टींनी हितावह होती. पहिले म्हणजे एकाच माणसावर शासकीय जबाबदारीचे ओझे फार काळ पडत नाही. दुसरे असे की निरनिराळे दृष्टिकोण पुढे येण्यास चांगला वाव मिळतो, व लोकशाही कार्यपद्धतीची बीजे बऱ्या प्रमाणात रुजू शकतात. अशा चांगल्या कार्यपद्धती राबवण्यात आय. आय. टी.च्या प्रशासनाचे योगदान मोठे होते.
वर्षभराने स्टाफ हॉस्टेलच्या मागल्या बाजूला एक जोड-इमारत (Staff Hostel Annexe) बांधण्यात आली. आमचे कुटुंब चार जणांचे झाले होते, दुसरी मुलगी अदिती हिच्या आगमनानंतर. आम्हाला त्या जोड-इमारतीत तीन खोल्यांची सदनिका मिळाली. माझ्या बरोबरच ‘कार्यशाळा अधीक्षक’ (Workshop Superintendent) म्हणून रुजू झालेले श्री. भालचंद्र साने यांनाही तशीच सदनिका मिळाली. त्यांची दोन मुले व आमच्या मुली समवयस्क असल्याने ही दोन कुटुंबे जवळ आली. त्या काळी आय. आय. टी.च्या जवळपास कुठलेही नाट्यगृह किंवा चित्रपटगृह नव्हते. पण करमणुकीची गरज सर्वांनाच होती, म्हणून आय. आय. टी.मध्ये काम करणाऱ्यांसाठी एक फिल्म-सोसायटी स्थापन केली होती. तिच्यातर्फे दर आठवड्याला एक हिंदी चित्रपट दाखवण्यात येई, दीक्षान्त सभागृहामध्ये (Convocation Hall). त्या अवाढव्य सभागृहात कितीही माणसे बसू शकत, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय सगळे. शुक्रवारी संध्याकाळी दाखवलेला चित्रपट पुन्हा शनिवारी पाहता येई. प्रवेशमूल्य अगदीच माफक होते. याशिवाय जरा उच्चभ्रू लोकांसाठी एक फिल्म-क्लब होता, परदेशी किंवा कलात्मक चित्रपट दाखवणारा, त्या मानाने लहान असलेल्या व्याख्यान सभागृहात (Lecture Theatre). बस्स, यापेक्षा अधिक मनोरंजनासाठी बसने किंवा उपनगरीय रेल्वेने मुलुंड, घाटकोपर किंवा अंधेरी अशा लांबच्या ठिकाणी जावे लागे.
आय. आय. टी.च्या परिसरात राहायला लागल्यावर तीन-चार वर्षांनी आम्हाला समाधानकारक निवासस्थान मिळाले, तळमजल्यावरील चार खोल्यांचे. ते आय. आय. टी. परिसराच्या बाहेरील रस्त्याच्या जवळ होते, पण रस्त्याला लागून नव्हते, आणि दोघी मुलींना त्यांच्या केंद्रीय विद्यालय (Central School) या शाळेत घरून चटकन पोचता येईल असे होते. त्या शाळेतल्या बहुतांशी मुलांचे पालक आय. आय. टी.त काम करत असले तरी काहींचे पालक भारतीय सेनादलात काम करायचे किंवा केंद्र सरकारच्या दुसऱ्या कुठल्या नोकरीत असत. फारसे कोणी उच्चभ्रू नसल्याने एकंदरीत मध्यमवर्गीय वातावरण होते. अशा वातावरणात आमच्या मुलींना वाढता येणे ही फारच हितकारक गोष्ट होती असे मला आता राहून राहून वाटते. एकदा आमच्या घरी माझा एक वर्गमित्र आला होता, तो वैद्यकीय डॉक्टर होता. त्याला मी मुद्दाम डॉक्टरसाहेब असे सारखे संबोधत होतो. शेवटी तो मला म्हणाला की तू पीएच. डी. झाला आहेस म्हणजे डॉक्टरच आहेस ना. त्यावर मी म्हटले की आम्ही काय कुचकामी डॉक्टर! हे सगळे माझी मोठी मुलगी कल्याणी ऐकत होती. काही दिवसांनी तिच्या वर्गातील आय. आय. टी.च्या बाहेरून येणारी मुले आमच्या घरी आली. गप्पा मारताना त्यांच्यापैकी एकाने बडेजाव मारला की त्याचे वडील डॉक्टर आहेत. लगेच कल्याणीने सांगितले की तिचे वडील नुसतेच डॉक्टर नाहीत तर कुचकामी डॉक्टर आहेत. तिला कुचकामी या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता, पण ज्या अर्थी बाबा स्वतःला कुचकामी म्हणवताहेत, त्या अर्थी त्याचा अर्थ काही तरी विशेष किंवा वरचढ असणार अशी तिची समजूत! माझी हसून हसून पुरेवाट झाली!
त्या काळी अशी प्रथा होती की तळमजल्यावर राहणाऱ्याने आपल्या निवासस्थानाभोवती कुंपण घालून बाग करायची, फक्त ते कुंपण रस्त्यावर येऊ द्यायचे नाही व आधी कुणी घातलेल्या कुंपणापर्यंतच जाऊ द्यायचे. हा ‘कसेल त्याची जमीन’ अशातलाच प्रकार होता, फक्त ती बागेची जमीन निवासस्थान सोडतेवेळी सोडावी लागे. आम्हा दोघांनाही फळा-फुलांत खूप रस असल्याने आमची बाग चांगलीच सजली. आमच्या जवळच आमचे खास दोस्त राहत होते; ते म्हणजे आमच्याच गणित विभागातले मधुकर देशपांडे व कपिल जोशी, यंत्र अभियांत्रिकी विभागातले भालचंद्र साने, व शेजारच्या इमारतीत संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातला दीपक फाटक. दररोज शाळा सुटल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी केव्हाही, सगळ्यांची मुले एका घरातून दुसऱ्या घरात निःसंकोच वावरत. एकदा दारावर येऊन काहीतरी विकणारा माणूस आमच्याकडे आला. आम्ही दोघे नव्हतो, पण घरी अनेक मुले गप्पा मारत बसली होती. त्यांनी त्याला काही नको असल्याचे सांगून पाठवून दिले. आणखी काही ठिकाणी जाऊन तो फाटकांच्या घरी आला. दार उघडताच त्याला तीच सगळी मुले तिथे दिसली. त्याने पुन्हा त्याच घरी शिरल्याबद्दल माफी मागितली. तेव्हा माझी मोठी मुलगी कल्याणी त्याला म्हणाली, `माफी नका मागू, मुले तीच आहेत, पण घर मात्र निराळे आहे’. हे ऐकून त्याने तोंडात बोट घातले असले पाहिजे.
चार मित्र: (डावीकडून) कपिल जोशी, बालमोहन लिमये, दीपक फाटक व भालचंद्र साने
(डावीकडून) प्रतिभा फाटक, निर्मला लिमये, स्वरदा जोशी व हेमा साने, जेवायला वाढायच्या तयारीत
या संदर्भात 1980 सालच्या जून महिन्यातल्या एका घटनेचे वर्णन केल्याशिवाय मला राहवत नाही. सतरा तारखेला संध्याकाळी शेजारच्या इमारतीत राहणारा आदित्य फाटक आमच्याकडे आला व म्हणाला की त्याच्या आई-बाबांनी आम्हाला आइसक्रीम खायला बोलावले आहे. आम्ही दोघे निघायच्या आधीच आमच्या मुली तिकडे पोचल्यासुद्धा होत्या. तिथे भालचंद्र साने यांचे कुटुंबही होते. आदित्यची आई प्रतिभा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांना बोलावले होते. त्या समुदायात एक अनोळखी चेहरा होता. दीपक फाटकने त्याची ओळख करून दिली, त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणारे व धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineeing) विभागात काम करणारे मुकुंद उर्फ नाना दीक्षित यांचा मावसभाऊ म्हणून. नाना दीक्षित उन्हाळ्याच्या सुट्टीला त्यांच्या गावी अकोल्याला गेले होते. मावसभाऊ बँकेच्या परीक्षा देण्यासाठी सकाळीच अकोल्याहून मुंबईत आला होता. पत्ता विचारत तो प्रथम जवळच राहणाऱ्या भालचंद्र सान्यांकडे पोचला. जुजबी चौकशी करून ते त्या गृहस्थाला फाटकांच्या घरी घेऊन गेले. तिथे प्रतिभाने विचारपूस केली, नाना दीक्षितांची खुशाली विचारली. त्या काळी चलभाष (mobile phone) तर दूरच राहो, स्थिरभाषही (land-line phone) फारसे कोणाकडे नसत, नाहीतर नानांशी प्रत्यक्ष बोलणेच झाले असते.
नाना दीक्षित मुंबईत नसणार आहेत हे त्या मावसभावाला माहीत होते व म्हणून त्याने जवळपास कुठे दोन-तीन दिवस राहायची सोय होईल का असे विचारले. आपल्या मित्राचा मावसभाऊ आला आहे तर तो आपल्याकडेच राहणार या हिशोबाने दीपक व प्रतिभा यांनी त्याला आपल्याच घरी राहायला सांगितले. दुपारी सहा वर्षांच्या आदित्यला त्याच्यावर सोपवून ते दोघे आंबे खरेदी करून आले, घरातल्या कपाटाची किल्ली नेहमीप्रमाणे कपाटाला तशीच ठेवून. नंतर आइसक्रीम-पॉटचा दांडा हाताने गोल गोल फिरवून आंब्याचे आइसक्रीम करायलाही त्या मावसभावाने मदत केली. ही सगळी कहाणी ऐकल्यावर तो आमच्यातलाच झाला. कुणी तरी पत्ते खेळायची टूम काढली. सगळे एकत्र खेळू शकतील असा पत्त्यांचा खेळ म्हणजे झब्बू. या खेळात एकेक खेळाडू आपले पत्ते दुसऱ्यांना देऊन टाकून सुटत जातो व सर्वात शेवटी ज्याच्याकडे सगळे पत्ते येऊन बसतात तो झाला झब्बू! आधी कित्येक वेळा मीच झब्बू होऊन तो डाव हरत असे. पण आज खेळलेल्या तिन्ही डावांत मात्र तो मावसभाऊच झब्बू झाला. त्याला आम्ही गमतीने चिडवलेही. खेळत असताना मावसभावाने नाना दीक्षितांच्या लहानपणीच्या मजेदार गोष्टी सुनावल्या. थोडक्यात त्या संध्याकाळी सगळ्यांनी धमाल केली.
दुसऱ्या दिवशी एक परीक्षा देऊन तो मावसभाऊ फाटकांच्या घरी परतला व आणखी दोन दिवस तरी राहायला लागेल असे म्हणू लागला. सुट्टीवर जाताना नाना दीक्षितांनी आपल्या घराची किल्ली फाटकांकडे ठेवली होती. ती सुपुर्द करून त्याला नानांच्या घरीच झोपायला सांगितले, जेवायखायला मात्र खाली येत जा असे बजावले. शेवटच्या दिवशी मावसभावाने लहानग्या आदित्यला फिरायला घेऊन जाऊ का असे विचारले, पण प्रतिभाने पाठवले नाही. बरोबर आणलेले सामान गोळा करून व किल्ली परत देऊन मावसभावाने फाटकांचे आभार मानले. परीक्षांचा निकाल नक्की कळवीन असे सांगून निरोप घेतला. जाताना आदित्यच्या हातावर दहा रुपयांची नोटही ठेवली. सान्यांच्याकडे जाऊन त्यांना कधी अकोल्याला आलात तर भेटून जायला सांगितले.
तळमजल्यावर फाटकांचे घर आणि त्याच्यावर दीक्षितांचे
उन्हाळ्याची सुट्टी संपायच्या सुमारास नाना दीक्षित अकोल्याहून परत आले. दुसऱ्या दिवशी सकाळी वरच्या मजल्याच्या बाल्कनीतून त्यांनी खाली पाहिले, तेव्हा दीपक फाटक त्याच्या घरातून बाहेर बागेत आला होता. त्याला नानांनी हाक मारली तर दीपकने सांगितले की त्यांचा मावसभाऊ अकोल्याहून आला होता व तीन दिवस खाली-वर राहून गेला. नानांनी काही न सांगता फक्त दीपकला वर बोलावले. बसायला सांगून पाणी प्यायला दिले. नाना म्हणाले की त्यांचे दोन्ही मावसभाऊ गेला पूर्ण महिना अकोल्यातच आहेत, कुणीच मुंबईला गेला नव्हता! दीपक स्तंभित झाला, खजील झाला. घरातल्या सर्व गोष्टी शाबूत आहेत का असे विचारता नानांनी सांगितले की ते एकटेच राहत असल्याने फारसे काही घरात नव्हतेच. एक जुना रशियन टेप-रेकॉर्डर दिसत नाहीये आणि त्यांच्या मित्रांनी दुरुस्त करायला दिलेली चार घड्याळे नाहीत. शिवाय नानांनी आय. आय. टी.च्या बाहेरचा त्यांचा फ्लॅट भाड्याने दिला होता त्याचा गेल्या महिन्याचा चेक ड्रॉवरमधून गायब झाला आहे व वटवलाही गेला आहे. हे सगळे नुकसान आपण त्या तथा-कथित मावसभावाला नानांची किल्ली दिल्यामुळे झाले आहे हे जाणून दीपकने तत्काळ भरपाई करायची तयारी दाखवली. नानांनी त्याला सपशेल नकार दिला. तीन-चार आठवड्यांपूर्वी अकोल्याला रेल्वेने जात असताना कोणीतरी भेटले होते आणि सहज गप्पा मारल्या होत्या इतकेच नानांना स्मरत होते.
ही खळबळजनक बातमी वाऱ्यासरशी आम्हा मित्रांच्या घरोघरी पोचली. चोरांची आळंदी म्हणतात ती हीच का अशी थट्टाही ऐकू आली. सान्यांना ही घटना जास्त बोचत राहिली. पत्त्यांच्या खेळात सतत झब्बू होणाऱ्या माणसाने आम्हां सगळ्यांना झब्बू बनवले होते! किती बेमालूमपणे तो वागला होता. फाटकांच्या घरातील काडीही त्याने हलवली नव्हती. सर्वांचा विश्वास संपादला होता, छोट्या आदित्यचाही, आणि आपला कार्यभाग साधला होता. आम्ही कुणी त्याचे नावही विचारले नव्हते, ओळखपत्र पाहणे तर दूरच राहिले. पवई पोलीस चौकीत जाऊन खबर देणे ओघानेच आले. नाना दीक्षितांनी त्यांच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. पोलीस अधिकाऱ्यालासुद्धा चोरी करण्याची ही अभिनव पद्धती अजब वाटली. त्याने सांगितले की पोलीस खात्यात एक कार्यप्रणाली ब्यूरो (Modus Operandi Bureau, MOB) असतो, तिथे अपराध करणाऱ्यांनी अवलंबिलेल्या हर प्रकारच्या युक्त्या-प्रयुक्त्या जाणून घेऊन त्यांच्यावर मात करण्याचे उपाय शोधले जातात. दीपक फाटक व भालचंद्र साने यांनी त्या मावसभावाला जास्त काळ बघितले असल्याने ते दोघे एका हवालदाराबरोबर बसमधून व्ही.टी.जवळच्या (Victoria Terminus) MOBला जाऊन पोचले. तिथे अगणित चोरांचे फोटो लावून ठेवलेले होते, त्यांच्या फसवाफसवीच्या कारवाया कशा चालतात यांची भित्तिचित्रे होती. दोघांनी सर्व हकिकत बारकाईने सांगितली. पण अपराध्याचे नावही माहीत नव्हते. त्याचा पत्ता ‘अकोल्यातली लक्ष्मी आळी’ असा ऐकून तिथला कर्मचारी म्हणाला, ‘विदर्भाच्या प्रत्येक गावात या नावाची गल्ली असते, हा पत्ता काय कामाचा!’ यामुळे प्रस्तुत बाबतीत फारसे काही निष्पन्न होणार नाही हे दिसतच होते. तरीही फौजदारी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते. पवईला परतताना तो हवालदार म्हणाला, ‘तुम्हाला काय सांगू साहेब, हे शिकले-सवरलेले लोक लई बावळट असतात बघा!’ फाटक आणि साने मूग गिळून गप्प बसले. मात्र हा नाट्यमय प्रसंग नाना दीक्षित आणि दीपक फाटक यांचे संबंध अधिक जवळचे व्हायला कारणीभूत झाला. वाइटातूनही कधी कधी चांगले निघते म्हणतात ते असे.
काही दिवसांनी कुणी तरी आमच्या घराची घंटा वाजवली म्हणून मी दार उघडले. आलेला माणूस म्हणाला, ‘मी सान्यांचा मावसभाऊ. मी कोकणातून आलो आहे’. हे शब्द ऐकून मी दचकलो. पण दुसऱ्या क्षणीच त्याने एक आंब्यांनी भरलेली पिशवी दिली आणि तो परत पावली पसारही झाला. माझा जीव भांड्यात पडला. महिन्याभराने नाना दीक्षितांनी आम्हाला त्यांच्या अकोल्याच्या भावाने लिहिलेले एक पत्र दाखवले. भावाने लिहिले होते, ‘तू दीपक फाटककडून काही भरपाई घेतली नाहीस हे योग्यच आहे. झालेली घटना वाईट तर आहेच, पण तुझ्या मित्रांना आवर्जून सांग की तिच्यामुळे तुमचा माणसांवरचा विश्वास गमावू नका’. किती मोलाचे शब्द आहेत हे!
(पुढील भाग)
---
बालमोहन लिमये
(balmohan.limaye@gmail.com)
लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर आता गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus). पवईलाच रहिवास.
बालमोहन लिमये यांचे इतर लिखाण
प्रतिक्रिया
अतिशय रोचक. तुमच्या लेखांची
अतिशय रोचक. तुमच्या लेखांची वाट पाहत असतो.
इन जनरल कोण्या भल्या दिसणाऱ्या माणसावर विश्वास ठेवणे या गोष्टीची पातळी, १९७०-८०-९० अशा दशकांत हळूहळू घसरत गेली असे एक निरीक्षण आहे. १९७० या दशकाबद्दल फार काही बोलता येत नाही पण १९८० - ८५ या काळात कोंकणात मी ज्या शहरात किंवा गावात राहत होतो तिथे अनोळखी लोकांवर देखील सर्रास विश्वास टाकला जात असे. याचे एक ठळक उदाहरण आठवते ते म्हणजे एकदा एका एसटी प्रवासात प्रथमच भेटलेले एक कुटुंब. केवळ बसमध्ये झालेल्या गप्पांवरून ते नवरा बायको आणि वयाने बऱ्यापैकी मोठा मुलगा असे तिघे थेट आमच्या घरीच मुक्कामाला आले. माझ्या आईबाबांनी पण त्यांना तसे राहू दिले आणि पाहुणचार केला. यावर कडी म्हणजे त्यांचे कुलदैवत जाकादेवी, किंवा आडिवऱ्याची देवी, जी असेल ती, शिवाय गणपतीपुळे आणि एकूण आसपासच्या गावांत (परगावांत) त्यांना फिरवून आणायला मला एकट्याने त्यांच्या सोबत पाठवले. मी चौथी पाचवीत असेन. मला जागांची माहिती होती पण बाकी त्या प्रवासात तेच माझे सर्वस्वी गार्डियन होते.
असा विश्वास टाकणे आता किमान मेट्रो सिटीत आणि नव्या काळात कल्पनेत देखील शक्य नाही.
एकूण कोणीही आऊचा काऊ म्हणून जरी दारात येऊन ठाकले तरी त्यांना आसरा देण्याची पद्धत रूढ होती.
तुमच्या अनुभवावरुन हे सर्व आठवले. शिवाय चिंवी जोशींची माझे दत्तक वडील ही कथाही आठवली.