माझी वाटचाल - भाग ३ : गोव्यात फेरफटका
माझी वाटचाल (गणिताच्या निमित्ताने)
भाग ३ : गोव्यात फेरफटका
बालमोहन लिमये
1972च्या सुमारास औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या गणित विभागात ‘प्राध्यापक आणि प्रमुख’ (Professor and Head) ही जागा रिकामी झाली होती. तिथे अर्ज करायच्या उद्देशाने मी प्राध्यापक रामनाथन यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटलो. त्यांनी मला उत्तेजन दिले, पण अर्ज करू नको असे सांगितले. मी कोड्यात पडलो, तसे ते म्हणाले की मराठवाडा विद्यापीठानेच तुझ्यासारख्या सुयोग्य गणितज्ञाला ही जागा आपणहून देऊ केली पाहिजे; मी लिहितो तसे तिथल्या कुलगुरूला. मला अशा नेमणुकांचा काहीच अनुभव नसला तरी स्पष्ट दिसत होते की रामनाथन म्हणताहेत तसे मुळीच होणार नाही. ते जरी टाटा इन्स्टिट्यूटमधील गणित शाखेचे सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक असले तरी त्याचे त्या कुलगुरूला काय सोयर-सुतक? शिवाय त्या कुलगुरूवर काही वेगळे दाब-दबाव असणारच. पण मला असे काही बोलून दाखवणे अशक्य होते. व्हायचे तेच झाले, माझी मराठवाडा विद्यापीठात जायची संधी हुकली. या प्रसंगामुळे दिसून आले की टाटा इन्स्टिट्यूटमध्ये बसून बाहेरची सूत्रे हलवता येणे कठीण होते. याच्या उलट दुसरी एक गोष्ट घडली. मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख प्राध्यापक श्रीखंडे यांनी निर्मलाबरोबर निरोप पाठवून मला भेटून जायला सांगितले. निर्मलाला त्यांनी एम. एस्सी.च्या वर्गात शिकवले होते, आणि मुंबई विद्यापीठातर्फेच ती टाटा इन्स्टिट्यूटमध्ये पीएच.डी.चा अभ्यास करत होती. श्रीखंडे यांचा आणि माझाही परिचय झाला होता. भेटल्यावर त्यांनी सांगितले की मुंबई विद्यापीठाने गोव्यातील पणजी या गावी एक केंद्र सुरू केले आहे. वेगवेगळ्या विषयांत पदवीनंतरचे अध्यापन करणे आणि स्वतः संशोधन करणे हे त्याचे दोन मुख्य उद्देश आहेत. तिथे गणितातील प्रपाठकाची जागा भरायची आहे; तू तिकडे गेलास तर तुला रस असणाऱ्या दोन्ही गोष्टी साध्य होतील. ही सूचना अगदी योग्य वेळी आली होती. मी अशा संधीची वाटच पहात होतो. निर्मलाशी विचार-विनिमय करून मी श्रीखंडे यांना माझी तयारी कळवली. रीतसर मुलाखत मुंबईतच झाली. पणजीतील केंद्राचे निदेशक डी. बी. वाघ निवडसमितीचे अध्यक्ष होते. ते गणिताचेच प्राध्यापक होते. समितीत प्राध्यापक श्रीखंडेही होते. माझी निवड होऊन मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवाचे पत्रही आले. टाटा इन्स्टिट्यूटने मला एक वर्षाच्या बिनापगारी प्रतिनियुक्तीवर (on deputation without pay) गोव्याला पाठवायचे ठरवले; मला तिकडून पगार मिळणारच होता.
पुण्या-मुंबईचा परिसर सोडून लांब गोव्याला जायचे होते, वेगळ्या चालीरीतींच्या व भिन्न मानसिकतेच्या लोकांबरोबर राहायचे होते. निर्मलाची पीएच.डी. संपायची होती. आमची मुलगी कल्याणी सव्वादोन वर्षांची होती. पण मनाचा हिय्या करून एका नव्या आयुष्यात शिरायचे ठरवले. महाराष्ट्र टाइम्सचे पहिले संपादक द्वारकानाथ भगवंत कर्णिक याच्या ओळखीचे माधव बीर पणजीला राहत. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. पणजीचे काने-कोपरे ते जाणत होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मित्रा बीर यांनी आम्हाला त्याच्या छत्राखाली घेतले. ते कल्याणीचे बीरकाका झाले.
बीरकाका आणि कल्याणी
त्यांनीच आम्हाला मिरामारच्या समुद्रकिनाऱ्यावरील आदर्श कॉलनीत भाड्याने जागा मिळवून दिली. ती खूप ऐसपैस होती, त्या जागेत नेहमी वापरायच्या खोल्यांखेरीज एक जादा खोली होती. पुण्याहून किंवा मुंबईहून रात्री येऊन पोचलेले पाहुणे, विशेषतः टाटा इन्स्टिट्यूटमधील माझे मित्र, या खोलीत झोपायचे. त्या वेळेला कल्याणी गाढ झोपेत असे. सकाळी उठल्या उठल्या ती विचारायची, ‘आज कोण निजलंय त्या खोलीत?’ इतके जण आमच्या गोव्याच्या घरी राहून गेले.
माझ्या वडिलांना तरुणपणापासून इसबाचा त्रास होत असे, कधी कमी तर कधी जास्त. मुंबईचे प्रख्यात त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरद देसाई आणि त्यांचे पुण्यातील शिष्य डॉ. अरविंद लोणकर बाबांवर उपचार करीत. काही वेळा गुण येई, तर काही वेळा बिलकुल उपयोग होत नसे, कातडीच्या थोड्या भागावर सुरू झालेले इसब बऱ्याच ठिकाणी पसरे, खूप खाज सुटे, रात्री झोप येत नसे. अशा वेळी बाबा हताश होऊन जायचे. हवाबदल केल्याने आराम पडेल, म्हणून डॉ. लोणकरांच्या सांगण्यावरून 1974 साली बाबा लोणावळ्याच्या ‘कैवल्यधाम’मध्ये जाऊन राहिले, परंतु तिथल्या हवामानाचा अपेक्षेप्रमाणे बाबांना फायदा झाला नाही. उलट इसबाचा त्रास वाढलाच, व पंधरा दिवसांतच बाबा पुण्याला परतले. समुद्रकाठच्या हवेने फरक पडेल असे कुणीतरी सुचवल्याने बाबांनी गोव्याला माझ्याकडे येऊन राहायचे ठरवले. बाबांनी पुन्हा आपल्यापासून दूर राहायला जाऊ नये असे आईला वाटत होते. पण नाइलाजास्तव तिने होकार दिला. गोव्यातील आमचे घर समुद्राच्या किनाऱ्यावरच होते. दिवसा नवीन जागेच्या जवळपास हिंडण्यात बाबांचा वेळ चांगला जायचा. शिवाय करमणुकीला आमची मुलगी कल्याणी होतीच. पण रात्रीच्या वेळी बाबांच्या सर्वांगाला कंड सुटायची. ती असह्य झाली की बाबा खाजवत सुटायचे. मग त्या जखमा चिघळायच्या. आग कमी व्हावी म्हणून मी व निर्मला त्यांच्या पायांना, पाठीला बर्फ लावायचो. झोपेत नखाने खाजवले जाऊ नये म्हणून बाबांच्या हातांना बँडेज बांधून ठेवायचो. एके दिवशी सकाळी उठल्यावर बाबा म्हणाले की त्यांच्या स्वप्नात दोन यमदूत आले होते. ते बाबांना म्हणाले ‘चला आता’, परंतु बाबांनी स्पष्ट नकार दिला आणि यमदूतांना परत पाठवले. हे ऐकून मला धास्तीच वाटली. आणखी काही दिवस बाबा आमच्याकडे थांबले, आईसुद्धा गोव्याला येऊन राहिली. पण शेवटी बाबांच्या प्रकृतीबाबत निराश होऊन ते दोघे पुण्याला रवाना झाले. सर्व उपाय करून थकल्यावर आईने नाना मराठे यांना होमिओपाथिक औषध देण्यास बोलावले, व त्या औषधाने बाबांना आराम पडला.
मुंबई विद्यापीठाच्या या केंद्रात एम. ए. व एम. एस्सी.च्या विद्यार्थ्यांना गणित शिकवायला माझ्याशिवाय प्राध्यापक एस.जी. देव आणि सुधाकर पंडित होते. त्या वर्षी माझ्या वाट्याला फलनीय विश्लेषण (Functional Analysis) हा अभ्यासक्रम शिकवायला आला. हा माझ्या चांगल्याच परिचयाचा विषय होता. पण त्याच्या अभ्यासक्रमाला अनुरूप व सहज उपलब्ध होईल असे पाठ्यपुस्तक खूप शोधूनही मला आढळले नाही. मग मला योग्य वाटतील अशा सविस्तर टिपण्या मी लिहू लागलो आणि त्याप्रमाणे शिकवू लागलो. यांतूनच काही वर्षांनी मी लिहिलेले पहिले पुस्तक निर्माण झाले. विद्यार्थी काही खास नव्हते, म्हणून सर्व गोष्टी सोप्या करून सांगाव्या लागत. पण मला ते आवडायचे. मला आठवड्यातून फक्त चार तास शिकवायचे होते. तरी इतर दिवशीही मी आमच्या पदव्युत्तर अध्ययन व संशोधन केंद्रात (Centre for Postgraduate Instruction and Research) जात असे. ह्या केंद्राचे व्यवहार पणजी शहराच्या मध्यवर्ती भागातील 18 जून रस्त्यावरील सुशीला नावाच्या इमारतीत चालत. भौतिकी, रसायनशास्त्र, इतिहास, इंग्लिश असे नानाविध विषय शिकवणाऱ्यांशी संवाद साधायला बरे वाटायचे. रसायनशास्त्रात काम करणारे डॉ. एस.के. पाकणीकर यांचा व माझा जवळून परिचय झाला. ते माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठे असले तरी अगदी खेळीमेळीने वागत. शिवाय ते राहत असलेल्या आदर्श कॉलनीतच आमचे घर होते व त्यांची धाकटी मुलगी कल्याणीच्या बरोबरीची होती. माधव बीरांप्रमाणेच पाकणीकरांचाही आम्हाला सतत आधार मिळत असे, गोव्यातल्या नव्या गोष्टी समजून घेण्यासाठी, त्यांच्यातील बारकावे जाणण्यासाठी.
पणजी शहर तसे लहानच होते. तेव्हा पूर्ण गोव्याची लोकसंख्या जेमतेम साडेआठ लाख होती. पणजीत मुख्यत: सरकारी व खासगी कंपन्यांची कार्यालये आणि दुकाने होती. फारच थोडे लोक पणजीत घर करून राहत. त्यामुळे दिवेलागणीची वेळ झाली की शहरात सगळीकडे सामसूम होऊन जाई, काळोखाने ते भरून जाई. बऱ्याच कालावधीने येणारी बस घेऊन मी करंजळेमधील (Caranzalem) आमच्या घरी पोचत असे. पुढे एकदा पुण्याहून मी बजाज कंपनीची प्रिया स्कूटर विकत घेऊन आलो. तेव्हापासून जा-ये सुकर झाली. घरापासून समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणाऱ्या रस्त्याने दोना पावला (Dona Paula) या नयनरम्य ठिकाणी दहा-बारा मिनिटांत जाता येई. जमिनीच्या समुद्रात शिरलेल्या एका टोकावरील हे ठिकाण पोर्तुगीज कालापासून इतिहासप्रसिद्ध होतेच, पण पाचएक वर्षांपूर्वी तरीच्या धक्क्याजवळील (ferry jetty) एका उंच टेकाव्यावरील दोन पांढरेशुभ्र पुतळे पर्यटकांचे आकर्षण बनले होते.
दोना पावला येथील दोन शुभ्र पुतळे
जवळच राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (National Institute of Oceanography) होती, तसेच काबो राजनिवास हे गोव्याच्या राज्यपालांचे निवासस्थानदेखील. कुठल्याही नवीन ठिकाणी गेले की त्या प्रदेशाचे उत्तम नकाशे मिळवण्याचा मला नाद आहे. तेव्हा मिळवलेला गोव्यातील बारीक तपशील देणारा नकाशा अजूनही मी बाळगून आहे. त्या काळी गूगल मॅप्स (Google Maps) नव्हते.
गोव्याच्या केंद्रात नेमणूक नसली तरी निदेशक प्राध्यापक वाघ यांनी सुचवल्यावरून निर्मलाने प्रक्षेप भूमितीचा अभ्यासक्रम शिकवला. शिवाय तिला मुख्यतः आमच्या पहिल्या मुलीचे, कल्याणीचे, संगोपन करायचे होते आणि पीएच.डी.चा प्रबंध लिहिण्यासाठी प्राध्यापक श्रीधरन यांनी सुचवलेले संशोधन पुरे करायचे होते. तिचा विषय होता बैजिक प्रक्षेप भूमिति (Algebraic Projective Geometry). तिने प्रक्षेप रेषेच्या मूलभूत सिद्धांताचे (the fundamental theorem of the projective line) व्यापकीकरण (generalization) क्रमनिरपेक्ष संरचनांसाठी (commutative structure) अगोदरच केले होते; आता ते क्रमसापेक्ष संरचनांसाठीदेखील (noncommutative structures) करायचे होते. हा एक वेगळाच डाव होता. तो कसा खेळायचा ते कित्येक अयशस्वी सुरुवातींनंतर तिच्या लक्षात आले. मग प्रबंध लिहायला व तो मुंबई विद्यापीठाला सादर करायला वेळ लागला नाही. मी पाहिलेल्या पीएच. डी.च्या प्रबंधांपैकी तो सर्वात छोटा होता, दोन ओळींमध्ये दुप्पट अंतर ठेवून टाइप केलेल्या फक्त 48 पानांचा; दोन ओळींमध्ये जर नेहमीसारखे अंतर ठेवले असते तर तो 30-35 पानांचाच झाला असता. गणितातील पीएच. डी.चा तीनशेहून जास्त पानांचा प्रबंधही मी पाहिला आहे. पण सरतेशेवटी त्या पानांत काय लिहिले आहे हे महत्त्वाचे, किती पाने लिहिली आहेत ते नाही. निर्मलाने क्रमसापेक्ष संरचनांसाठी सिद्ध केलेल्या मुख्य प्रमेयाचा व्यत्यासही खरा असावा असे मला वाटले, व तसे मी दाखवू शकलो. त्यामुळे गृहीत धरलेली गोष्ट व सिद्ध केलेली गोष्ट या समतुल्य किंवा बरोबरीच्या आहेत असे म्हणता आले. या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या होत्या त्याचा ऊहापोह करण्याचे हे ठिकाण नाही, पण या प्रक्रियेची कल्पना यावी म्हणून एक सोपे उदाहरण देतो. समजा कोणी जनुकशास्त्राचे नियम वापरून असे दाखवले की जर घोड्याचा रंग पांढरा असेल तर तो जोरात धावतो. इथे रंग पांढरा असणे हे गृहीत धरले आहे आणि जोरात पळणे हे सिद्ध केले आहे. उलटपक्षी (conversely), समजा कोणी असे दाखवले की जर घोडा जोरात धावणारा असेल तर त्याचा रंग पांढरा असतो. इथे जोरात पळणे हे गृहीत धरले आहे आणि रंग पांढरा असणे हे सिद्ध केले आहे. या दोन सिद्धतांमुळे घोड्याचा रंग पांढरा असणे आणि घोड्याचे जोरात धावणे या गोष्टी समतुल्य किंवा बरोबरीच्या झाल्या. असेच काहीसे आम्ही केले होते प्रक्षेप रेषेबाबत. क्रमनिरपेक्ष संरचनांसाठीही आम्ही दोघांनी तिने केलेले व्यापकीकरण वाढवले. खरे म्हणजे या विषयाची धाटणी व विचारप्रक्रिया बैजिक विश्लेषण (Algebraic Analysis) या माझ्या विषयापेक्षा अगदी वेगळी होती. तरीही निर्मलाच्या विषयात शिरून एकत्र काम करायचे धाडस मी केले, व दोघांनी मिळून दोन शोधलेख लिहिले. 1975 साली आमच्या धाकट्या मुलीचा जन्म झाला, तेव्हा निर्मलाला पीएच. डी. मिळून फक्त चार महिने झाले होते. सारांश, मी व निर्मलाने यांनी आयुष्यात चार संयुक्त निर्मिती केल्या, किंवा आम्हाला चार अपत्ये झाली, दोन मुली आणि दोन शोधलेख!
गोवा म्हटले की लांबलचक समुद्रकिनारे आणि आकर्षक पुलिने (beaches) आलीच. आम्ही आल्याआल्याच माधव बीर आमच्या त्रिकोणी कुटुंबाला गोव्याच्या अगदी उत्तरेकडे असलेल्या बागा नावाच्या एका लहानशा पण स्वच्छ व सहजसुंदर पुलिनावर घेऊन गेले. ते आम्हाला इतके आवडले की आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही तिथेच घेऊन जायचो, कलंगुट किंवा कोलवा या प्रसिद्ध पुलिनांऐवजी. तिथे आलेल्या पाश्चिमात्य पर्यटकांकडे बघून कल्याणीने बीरकाकांना विचारले की ते इतके आखूड कपडे का घालतात. जरासे हसून त्यांनी सांगितले फार उकाडा होतो म्हणून! बीरकाकांनी कल्याणीला कोळंबी (prawns) खायला शिकवले. ते त्यांना दर्याची फळे (fruit de mer) म्हणायचे. गोव्यातील बहुतेक सगळे ब्राह्मण मासळी खातात, फक्त ज्यांना भट म्हणतात ते सोडून. पणजी शहरातील एका खास उपाहारगृहात जाऊन तळलेली मोठी मांसल कोलंबी चाखण्यात औरच मजा येई. त्यांना वाघ्या सुंगटं (Tiger prawns) म्हणत. भरतीच्या वेळी आमच्या घराशेजारच्या मिरामार समुद्रकिनाऱ्याजवळील शेतीभागात पाणी पसरे, व त्याबरोबर छोटे मासेही येत. सकाळी फिरायला जाताना ते मासे बघून कल्याणीला वाटे की ते कुणीतरी भिजत घातले आहेत आणि आता घरी न्यायचे आहेत.
आमचे कुटुंब काही धार्मिक नव्हते. तरीही उत्सुकता शमवण्यासाठी एकामागोमाग ओळीने असणाऱ्या श्रीमंगेश, महालसा, श्रीशांतादुर्गा या सगळ्या प्राचीन देवळांना एकदा भेट देऊन आलो. त्यांच्या प्रवेशद्वाराजवळच्या कमानी व स्तंभ मनात फारच भरत. शांतेरी उर्फ शांतादुर्गा या मातृदेवीने (Mother Goddess) पुराणकाळी विष्णु आणि शिव यांच्यात (म्हणजे त्यांच्या पंथांतील लोकांत) सामंजस्य घडवून आणले होते अशी कथा आहे! मुळातले केळोशी या गावातील मंदिर पोर्तुगीजांनी पाडून टाकल्यानंतर संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत ते पुन्हा पणजीपासून तीस किलोमीटर्सवर कवळे येथे उभारण्यात आले.
शांतादुर्गा मंदिर, कवळे
त्याचप्रमाणे वेल्हा गोवा (Old Goa) या भागातील प्रसिद्ध ख्रिस्ती प्रार्थनामंदिरांची (churches) वारी करून आलो : बॉम जीझसची बॅसिलिका (Basilica de Bom Jesus), से कॅथिड्रल (Se Cathedral), तसेच सेंट कॅथेरिनचे चॅपेल (Saint Catherine Chapel) वगैरे. गोव्यात दोन अतिशय भिन्न संस्कृतींचा मिलाफ झालेला दिसून येतो. वेगवेगळ्या धारणेच्या गोव्यातील लोकांचे संबंध हार्दिक होते, ते सगळे ‘गोंयचे’ म्हणून. मात्र गोव्याच्या बाहेरून तात्पुरत्या आलेल्या माझ्यासारख्या लोकांबाबतचा दुरावा जाणवत असे. इतकेच काय गोव्याचे मुळातले रहिवासी आणि कालांतराने कारवारसारख्या ठिकाणांहून गोव्यात येऊन स्थायिक झालेले यांच्यातही ‘आतले’ आणि ‘बाहिले’ असा फरक होत असल्याचे दिसून येई. याच्या उलट दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. एखाद्या समूहात बोलत असताना महाराष्ट्रीय लोक ‘आमच्याकडे हा सण उत्साहाने साजरा होतो’ असे विधान करतील, पण गोव्यातील कोकणी लोक ‘आपल्याकडे हा सण उत्साहाने साजरा होतो’ असे म्हणताना आढळले, आणि ते मला आवडून गेले. ‘आपला’ हा शब्द ‘आमचा’ या शब्दापेक्षा जास्त समावेशक आहे; यावरूनच तर ‘आपलेपणा’ हा शब्द रूढ झाला आहे. असो.
बॉम जीझसच्या बॅसिलिकामध्ये सेंट फ्रँसिस झेवियर (Saint Francis Xavier) या जेसुइट धर्मगुरूच्या मृत देहाचे अवशेष एका संगमरवरी कबरीच्या आत चांदीच्या पेटीत ठेवले आहेत. दर दहा वर्षांनी ती पेटी उघडली जाते व सगळ्यांना त्यांचे दर्शन घडू शकते. तो योग 1974 साली येणार होता, म्हणून मी काही जास्त माहिती शोधून काढली. अफोंसो द अलबुकर्क (Afonso de Albuquerque) या पोर्तुगीज सेनापतीने 1510 साली आदिलशहाचा पराभव करून गोवा जिंकले. मागाहून आलेल्या फ्रँसिस झेवियर या धर्मप्रचारकाने हिंदूंना धर्मांतर करायला लावून ख्रिस्ती बनवायचा मोठा उद्योग केला. 1552 साली त्याचा मृत्यू झाल्यावर दोन वर्षे झाली तरी त्याच्या देहाचे विघटन झाले नाही अशी दंतकथा सांगतात. मग तो देह गुप्त ठिकाणी ठेवणे ओघानेच आले.
बॉम जीझसची बॅसिलिका, वेल्हा गोवा
जनसामान्यांना काबूत ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी या तथाकथित दैवी शक्तीचा आधार घेणे साहजिक होते. सत्तर वर्षांनी फ्रँसिस झेवियरला संत (Saint) म्हणून पोपने मान्यता बहाल केली. त्याच्या देहावशेषांचे सार्वजनिक दर्शन दुर्मिळ केले की गूढता वाढत जाणारच. मात्र काही पोर्तुगीज राजेरजवाडे, लष्करी अधिकारी व धार्मिक नेत्यांना खासगी दर्शन मिळू शके. सेंट फ्रँसिस झेवियरने गोव्याचे रक्षण करावे, म्हणजे गोवा पोर्तुगीज आधिपत्याखालून जाऊ नये, म्हणून दोनदा त्याच्या देहाचे अवशेष विवृत करून प्रार्थना केल्या होत्या: एकदा 1683 साली मराठ्यांनी गोव्यावर हल्ला केला तेव्हा, आणि दुसऱ्यांदा 1961 साली भारताने गोव्याला स्वतंत्र करताना फौजा पाठवल्या तेव्हा. पहिल्या वेळी पोर्तुगीजांचा धावा ऐकला गेला असे मानले तरी दुसऱ्या वेळी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. गोव्याला स्वातंत्र्य मिळून 13 वर्षे झाल्यावरही चालू 1974 साली सेंट फ्रँसिस झेवियरच्या अवशेषांचे प्रदर्शन कशाला करायचे असे मला वाटून गेले. पण धार्मिक पर्यटनापासून होणारा आर्थिक लाभ कोण सोडणार? त्या वर्षी सुमारे नऊ लाख तीस हजार जणांनी त्या किडकिडीत सांगाड्याचे दर्शन घेऊन, त्याला स्पर्श करून त्याचे चुंबन घेतले.
विद्यापीठीय शैक्षणिक वर्षाच्या दोन टर्म असत, पहिली जुलै महिन्यापासून दिवाळीच्या सुट्टीपर्यंत व दुसरी सुट्टी संपल्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत. दिवाळीच्या सुट्टीत मी काही कारणाने एकटाच पणजीहून मुंबईला गेलो होतो. निर्मलाच्या आईकडे दादरला राहिलो होतो. अधूनमधून कुलाब्यातील टाटा इन्स्टिट्यूटला जात होतो. तिथे कुणीतरी मला सांगितले की आठवड्याभराने पवई येथील आय. आय. टी.च्या गणितविभागात काही सहायक प्राध्यापक (Assistant Professor) नेमण्यासाठी मुलाखती होणार आहेत. माझ्या लक्षात आले की पाच वर्षांपूर्वी इथलीच व्याख्यात्याची (Lecturer) नेमणूक मी नाकारली होती. पण आता परिस्थिती बदलली होती. मीही अध्यापन आणि संशोधन या दोन्ही गोष्टी साधता येतील अशा एखाद्या चांगल्या जागेच्या शोधात होतो. माझी गोव्यातली नेमणूक एकतर तात्पुरती होती आणि जरी केव्हा तरी मी काम करत असलेल्या केंद्राचे गोवा विद्यापीठात रूपांतर होईल, तरी तेव्हा त्याचा आवाका मर्यादितच असेल, त्याचे स्वरूप प्रादेशिक राहील. शिवाय कुठल्याही शैक्षणिक संस्थेच्या सुरुवातीच्या काळात प्राध्यापक मंडळींनासुद्धा बरीच नेहमीपेक्षा निराळी कामे करणे भाग पडते; त्यासाठी खूप वेळ व श्रम वेचावे लागतात. याखेरीज निर्मलाच्या व्यावसायिक मार्गक्रमणाला गोव्यात फारसा वाव दिसत नव्हता, फार तर पीएच. डी. संपवल्यावर तिची कुठल्याशा महाविद्यालयात नेमणूक होऊ शकली असती. आणखी एक गोष्ट मनात आली. रॉचेस्टर व अर्व्हाइन या ठिकाणांप्रमाणे पणजीतही माझे चांगले मित्र होत होते, पण ते हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच. आतले आणि बाहिले असा फरक होणाऱ्या ठिकाणी कायम स्वरूपाचे वास्तव्य करणे कठीणच होते, कारण मला जनसामान्यांपैकी एक असे बनून राहायची ओढ होती. असा सगळा विचार करून मी प्रत्यक्ष पवईला जाऊन तिथल्या गणित विभागाला भेट द्यायचे ठरवले.
दादरहून स्थानीय रेल्वेने विक्रोळीपर्यंत, व तेथून 392 नंबरच्या बसने मी पवईला पोहोचलो. ती एकच बस तिथे जात असे. आय. आय. टी.च्या आवारात शोधतशोधत मी गणित विभागाच्या कार्यालयापाशी आलो. त्यावेळी प्राध्यापक मनोहर नरहर वर्तक नुकतेच विभागप्रमुख झाले होते. त्यांनी माझी विचारपूस केली आणि सांगितले की मला मिळालेली बातमी बरोबर आहे, दोनच दिवसांनी मुलाखती होणार आहेत, परंतु अर्ज करण्याची शेवटची तारीख केव्हाच उलटून गेली आहे. मी खट्टू झालेला बघून ते म्हणाले की हवे असेल तर अजूनही अर्ज भरून द्या, मी तो निवडसमितीपुढे ठेवीन. मला हायसे वाटले व मी अर्ज भरून दिला. मग असे ठरले की मुलाखतीच्या दिवशी मी कुलाब्यातील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये थांबायचे आणि फोनची वाट पाहायची. मी 1969 सालापासून तिथे काम करत असल्याने व तेथूनच प्रतिनियुक्तीवर गोव्याला गेलो असल्याने मला ही सूचना सोयीची होती. दुपारी दोन वाजता मला बोलावणे आले. पवईला पोचेपर्यंत चार वाजून गेले होते आणि शेवटच्या उमेदवाराची – डॉ. कपिल जोशी यांची – मुलाखत चालू होती. नंतर एका जादा उमेदवाराची म्हणजे माझी मुलाखत झाली. नंतर कळले की प्राध्यापक ए.के. डे त्या वेळी नव्यानेच पवईच्या आय. आय. टी.चे निदेशक (Director) बनले होते. त्यांना कुलसचिव (Registrar) जी. एन. वास्वानी यांनी सांगितले की जर निवडसमितीतील सभासदांची हरकत नसेल तर बालमोहन लिमयांची मुलाखत होऊ शकते. प्राध्यापक वर्तकांनी मला संभाव्यताशास्त्रातील (Probability Theory) काही प्रश्न विचारले. इतरांनीही काही प्रश्न विचारले. दुसऱ्या दिवशी मी गोव्याला परतण्याआधीच मला अनौपचारिकरित्या समजले होते की आणखी तिघांसह माझी निवड झाली आहे.
पणजीला पोचल्यावर मी निर्मलाला मुंबईची कहाणी इत्थंभूत सांगितली, पण आणखी कुणाला तिचा पत्ता आताच न लागू द्यायचे ठरवले. पवईहून अपेक्षित पत्राची दोन-अडीच महिने वाट पाहिल्यावर अखेर तीन मार्च 1975 रोजी आय. आय. टी.च्या कुलसचिवांचे आंतर्देशीय पत्र (Inland Letter) मिळाले. त्यात लिहिले होते की मला सहायक प्राध्यापक नेमण्याची निवडसमितीची शिफारस नियंत्रक मंडळाने (Board of Governors) मान्य केली आहे, दरमहा 1250 रुपये पगार व नेहमीचे भत्ते देऊ करून. ती मला पसंत आहे की नाही ते मी कळवावे, व पसंत असल्यास मी केव्हा रुजू होऊ शकतो तेही लिहावे. आता गुप्तता राखायचे काही कारण नसल्याने मी प्रथम माधव बीर व डॉ. पाकणीकर या आमच्या गोव्यातील आधारस्तंभांना या पत्राबद्दल सांगितले. लगेच आमच्या केंद्रात जाऊन निदेशक प्राध्यापक वाघ यांची भेट घेतली. ते म्हणाले की मी त्यांचे केंद्र सोडून जाताना पाहून त्यांना दुःख होत असले तरी व्यावसायिक दृष्टीने माझा पवईला जाण्याचा निर्णय योग्यच आहे. झाले, दुसऱ्याच दिवशी मी आय. आय. टी.च्या कुलसचिवांना पत्र लिहून कळवले की एप्रिलच्या पहिल्या तारखेला मी तिकडे रुजू होईन. त्याचबरोबर गोव्यातील प्रपाठक पदाचा राजीनामा मी प्राध्यापक वाघांकडे सुपूर्द केला. आतापर्यंत मला टाटा इन्स्टिट्यूटकडून आलेल्या तिन्ही नेमणूक पत्रांवर त्या संस्थेच्या कुलसचिवांची सही होती, निदेशकासाठी म्हणून. त्यामुळे आय. आय. टी.तील नेमणुकीची खात्री बाळगून मी गोव्यातले त्यागपत्र देऊन टाकले. आता आवराआवरी करायला सुरुवात करणे जरूर होते. आमचे गोव्यातील वास्तव्य अल्प काळाचेच ठरणार होते तर. आपण एखादी जागा लवकरच सोडून जाणार असे लक्षात आले की माझ्या मनात एक प्रकारची हुरहुर निर्माण होते, त्या जागेबद्दल आत्मीयता वाटायला लागते.
माझे संमती-पत्र जाऊन महिना झाला तरी आय. आय. टी.कडून काहीच प्रतिसाद आला नाही. सहा आठवडे उलटून गेल्यावर एस.टी.डी. (Subscriber Trunk Dialing) टेलिफोन करायचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. चिंतातुर होऊन शेवटी पवईला समक्ष जायचे ठरवले. रात्रभर रेल्वेने प्रवास करून आय. आय. टी.च्या परिक्षेत्रात पोचायला अकरा वाजून गेले. मी थेट निदेशकांच्या कार्यालयात पोचलो. त्यांना भेटायची वेळ मागून घेतली नसली तरी मी त्यासाठी गोव्याहून आल्याचे सांगितले. सुदैवाने त्या दिवशी ते पवईतच होते व त्यावेळी त्यांच्या कार्यालयातच होते. हातातले काम संपल्यावर त्यांनी मला आत बोलावले. मी त्यांना माझ्या आय. आय. टी.तील निवडीसंबंधी कल्पना दिली व नियुक्ती-पत्राची वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यांनी एकच वाक्य उच्चारले. ते म्हणाले, ‘मी तुम्हाला कधीच काही लिहिले नव्हते’. कुलसचिवांचे मला आलेले पत्र मी दाखवू लागलो तर ‘मग त्यांनाच जाऊन भेटा’ असे म्हणून त्यांनी माझी बोळवण केली. मी अवाक झालो, निदेशक व कुलसचिव यांच्यातली ही दुही पाहून. कुलसचिवांकडे गेलो, तर त्यांनी मला योग्य वेळी काय ते कळवू असे मोघम उत्तर दिले. मी हात हलवीत पणजीला परतलो. मला आधी आलेले पत्र पुन्हा एकदा वाचले. त्यात नेमणुकीचे औपचारिक पत्र नंतर पाठवण्यात येईल असे स्वच्छ लिहिले होते. पण ते पत्र कधीच न येण्याची शक्यता भासू लागली. मग घाईघाईने प्राध्यापक वाघ यांना भेटून माझा राजीनामा परत घ्यायचा आहे असे सांगितले. ते म्हणाले की कालच्याच मुंबई विद्यापीठाच्या सभेमध्ये माझा राजीनामा मंजूरही झाला आहे. माझी अवस्था मध्यभागी लोंबकळणाऱ्या त्रिशंकूसारखी झाली. मी टाटा इन्स्टिट्यूटहून काही काळाच्या प्रतिनियुक्तीवर गोव्याला आलो असल्याने परत मूळपदी जाऊ शकत होतो, पण मला टाटा इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडायचे होते ना!
एप्रिल महिन्याच्या मध्याला माझे गोव्याच्या केंद्रातले शिकवणे संपले होते. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यावर पुण्यामुंबईला जायचे होतेच, फक्त सुट्टीपुरते जायचे की सगळे चंबूगबाळे आवरून जायचे हे ठरत नव्हते. शेवटी धीटपणे मी व निर्मलाने गोवा सोडायचे निश्चित केले. मोजक्या परिचितांचा निरोप घेतला. बांधाबांधी करायला वेळ लागला नाही. निर्मला दुसऱ्यांदा गरोदर होती, म्हणून तिला जपून वागावे लागत होते. गोदरेजच्या मोठ्या कपाटांसारखे अवजड सामान ट्रकने मुंबईला पाठवायचे ठरवले. मी, निर्मला आणि आमची तीन वर्षांची मुलगी कल्याणी अशा त्रिवर्गाने आगबोटीने प्रवास केला. कोकण स्टीमर सर्व्हिस या कंपनीच्या कोकणसेवक व कोकणशक्ति नावाच्या बोटी पणजी व मुंबई यांमधील अंतर चोवीस तासात पार करत. वाटेत वेंगुर्ला, सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी, जयगड अशा बंदरांवर प्रवासी छोट्या नावांतून येऊन चढत-उतरत. प्रत्येक दिवशी सकाळी एक बोट पणजीहून मुंबईकडे जायला निघायची व दुसरी बोट उलट मार्गाने मुंबईहून पणजीकडे जायची. मी सुमारे अकरा वर्षांपूर्वी अमेरिकेला जाण्यासाठी मुंबई ते इटालीमधील जिनोआ असा दहा दिवसांचा प्रवास भल्या मोठ्या मार्कोनी नावाच्या बोटीवरून केला होता. त्या मानाने हा प्रवास मला अगदीच किरकोळ भासत होता. पण निर्मला आणि कल्याणी यांना खूप नावीन्य वाटत होते. आमच्या कोकणसेवक बोटीवर सर्व जण माशांचा स्वाद व फेणीचा आस्वाद घेण्यात, आणि हौसी (Housie) नावाचा खेळ खेळण्यात दंग झालेले असत. आमच्याबरोबर झांट्यांच्या कारखान्यातले खारे काजू, जांभळांची मदिरा (Jamun Wine) अशा भेटवस्तू तर होत्याच, पण माझी स्कूटरही मी बरोबर आणली होती.
कोकणसेवक बोट
सकाळी दहाच्या सुमारास माझगावमधील भाऊच्या धक्क्याला बोट लागताच सामान आवरून लगबगीने मी खाली उतरलो. स्कूटरही खाली आणवली व ती सुरू करण्यासाठी पदाघात (kick) केला. नशिबाने ती चालू झाली. कल्याणीसह निर्मलाला टॅक्सीतून तिच्या आईकडे पाठवून दिले आणि मी स्कूटरवरूनच पवई गाठली. माझ्या नेमणुकीचे काय झाले आहे याबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. कुलसचिवांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली तर असे कळले की माझे नियुक्ति-पत्र मी त्यांना दिलेल्या पत्त्यावर दोन दिवसांपूर्वीच पाठवून दिले होते. मी म्हटले की त्याची एक खरी प्रत (true copy) मिळू शकेल का. ती लगेच मिळाली आणि माझा जीव भांड्यात पडला!
(पुढील भाग)
---
बालमोहन लिमये
(balmohan.limaye@gmail.com)
लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर आता गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus). पवईलाच रहिवास.
बालमोहन लिमये यांचे इतर लिखाण
प्रतिक्रिया
गंमत.
सरकारी कागदी घोड्यांचा जाच तुम्हालाही झाला होता, हे वाचून गंमत वाटली. तसं काही कारण नाही; तुमच्या लेखनातून कधीही तुम्ही जगावेगळे आहात असं वाटत नाही. मात्र संशोधन करताना ते जगासाठी उपयुक्त असेल का नसेल याचा फार विचार न करता, हा प्रश्न पुरेसा गमतीशीर आहे का, एवढाच विचार करणाऱ्या माणसालाही सरकारी बाबूगिरीचा ताप होतो; याची गंमत वाटली.
तुमच्याकडे जुने फोटो आहेत, आणि ते बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहेत, याचा आनंदही झाला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वाचायला खूपच छान वाटते आहे ही
वाचायला खूपच छान वाटते आहे ही अनुभव मालिका.
ही सर्व ठिकाणे चांगली परिचयाची असल्याने चित्रही डोळ्यासमोर उभे राहत आहे. पवई आयआयटीमध्ये ज्या काळी कोणीही गेटमधून आत येऊ जाऊ शकत असे अशा काळात अनेकदा तिथे हॉस्टेलवर राहणाऱ्या स्नेही मित्र मैत्रिणींना भेटायला जाणे होत असे. एरवी तिथे विद्यार्थी बनून शिकण्यासाठी जाण्याच्या योग्यतेपासून आम्ही कोसभर दूर...
ते पूर्ण कॅम्पस इतके सुंदर होते की ते केवळ बघायला जाता यावे म्हणून तिकडे कोणाला तरी भेटण्याचे निमित्त देखील केले जात असे. उद्यानाच्या मधोमध एक कॅफे होता असे आठवते.
आता अशी एन्ट्री अगदीच अशक्य झाली आहे. एकूणच संशय आणि सुरक्षिततेची गरज अधिकाधिक तीव्र होत चालली आहे. साहजिक आहे. चालायचेच.
बाकी गोव्यातून मुंबईत परत येताना गोव्याचे ते वातावरण, त्यातून मिरमार दोनापौला परिसरात घर, तिथे राहून नोकरी करण्याची संधी, ती सुसेगात लाईफस्टाईल, ती गोड कोंकणी बोली हे सर्व सोडून परत गर्दीत यावे असे वाटण्यामागे खूपच स्ट्राँग करियर फोर्सेस होते असेच म्हणावे लागेल. तिकडे कशीही का होईना, नोकरी असती तर आपल्याचाने नसते सोडवले ते ठिकाण.
आणखी अनुभव वाचायला आवडेल.