काट्याच्या अणिवर
काट्याच्या अणिवर
काट्याच्या अणिवर वसति तीन गांव। दोन ओसाड, एक वसेचिना।।
वसेचि ना तेथें आले तीन कुंभार। दोन थोटे, एक घडेचि ना।।
घडेचि ना त्यानें घडलीं तीन मडकीं। दोन कच्ची, एक भाजेचि ना।।
भाजेचि ना त्यांत रांधले तीन मुगे। दोन हिरवे, एक शिजेचि ना।।
शिजेचि ना तेथे आले तीन पाहुणे। दोन रुसले, एक जेवेचि ना।।
जेवेचि ना त्याला दिल्या तीन म्हसी। दोन वांझा, एक फळेचि ना।।
फळेचि ना तिला झाले तीन टोणगे। दोन मेले, एक वांचेंचि ना।।
वांचेंचि ना त्याला आले तीन रुपये। दोन खोटे, एक चालेंचि ना।।
चालेंचि तेथे आले तीन पारखी। दोन आंधळे, एक दिसेंचि ना।।
दिसेंची ना त्याला मारल्या तीन बुक्क्या। दोन हुकल्या, एक लागेंचि ना।।
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव। सद्गुरूवाचूनि कळेचि ना।।
मला या भारुडाचा अर्थ जाणून हवा आहे.
मी माझा एकूण अध्यात्माचा (शून्य) व्यासंग आणि शब्दसंपदा या जोरावर काही अर्थ लावायचा प्रयत्न केला. त्यावरून मला असं वाटतं की या काव्याला शब्दखेळापलीकडे अजून खोल असा काही अर्थ नाही. आंतरजालावर बघितलं तर तीन कुंभार = ब्रम्हा, विष्णू , महेश असंही काही दिसलं. इथे बरेच व्यासंगी लोक वावरत असतात म्हणून इथे देत आहे.
नखुल्या बाई नखुल्या
नखुल्या बाई नखुल्या
चंदनाच्या टिकुल्या
एक टिकली उडाली
गंगेत जाऊन बुडाली
गंगेला आला लोंढा
भिजला माझा गोंडा
गोंड्याच्या पदरी काडी
भिजली माझी साडी
साडीच्या पदरी रूपया
भाऊ माझा शिपाया
शिपायाने केली बायको
बायको गेली शेताला
विंचू चावला नाकाला
विंचवाची केली भाजी
ती खाल्ली मामीने
मामीला आली ओकारी
मामाने दिली सुपारी
सुपारी गेली गडगडत
मामी बसली बडबडत.
किंवा
अडक्याचे तेल आणले
सासूबाईंचे न्हाणे झाले
मामंजींची शेंडी झाली
उरले सुरले झाकून ठेवले
ते येऊन मांजराने सांडले
वेशीपर्यंत ओघळ गेला
पाटलाचा रेडा वाहून गेला
किंवा
मालाडचा म्हातारा शेकोटीला आला
किंबहुना. आयको आयको ..
किंवा..
अकलेचा कांदा पुरला तर
मातीखाली हुरला तर
त्यातुन वेल आली तर
त्यावर चढल्या पाली तर
होईल काय
होईल काय
पाण्यावरती येईल साय
अकलेचा कांदा चिरला तर
नाकात वास शिरला तर
त्याची भाजी केली तर
खाउन आजी मेली तर
होईल काय होईल काय
पाण्यावरती येईल साय
...
(पहिले कडवे)
पालींची बदनामी थांबवा!!!!!!
(दुसरे कडवे)
आजी मेल्याचे दुःख नाही, परंतु पाणी सोकावते.
ज्ञानेश्वरांचे नाव आहे.
ज्ञानेश्वरांचे नाव आहे. त्यावरून विचार आला की यात उल्लेखिलेले रुपये हे चलन गेल्या चारशे वर्षांत रूढ झाले असे वाचले होते. इतक्या पूर्वी देखील रुपये होते हे रोचक आहे.
गुड क्याच!
चांगले निरीक्षण! कदाचित, 'तुका म्हणे'च्या नावावर अर्वाचीन कवी (शक्यतो पुल्लिंगी पौगंडी उत्तरशालेय गटातले, वगैरे) काय नाही नाही ती कवने प्रसवून प्रसृत करतात, तद्वत, प्रस्तुत कवन/भारूड/हे-जे-काही-असेल-ते हे नंतरच्या काळात कोणीतरी प्रसवून ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवून दिले असू शकेल काय? (ते काय ते 'प्रक्षिप्त' की कायसेसे म्हणतात ना, तशातली गत?)
तसेही, प्रस्तुत कवनातील 'ज्ञानदेव' म्हणजे तेराव्या शतकातले ज्ञानेश्वर, की विसाव्या-एकविसाव्या शतकातले ज्ञानदेव आणखी कोणीतरी, याबद्दल काही खात्रीलायक माहिती उपलब्ध आहे काय? (झालेच तर, 'मक्त्या'च्या ओळीत 'ज्ञानदेवा'प्रमाणेच 'सद्गुरू' ('सध्गुरू'?) यांचाही नामोल्लेख होतो, हीदेखील बाब लक्षात घेण्याजोगी आहे.)
(तरी नशीब, त्या दिवशी ज्ञानदेवांचा उपास नसावा. नाहीतर, 'भाजेचि ना त्यांत रांधले तीन मुगे। दोन हिरवे, एक शिजेचि ना।।' या पंक्तीत, मुगांच्या ऐवजी बटाटे शिजविले असते!)
किंवा साबुदाणे.
किंवा साबुदाणे.
...
साबूदाण्यांचा उल्लेख करणार होतो, परंतु, साबूदाणे शिजविते कोण? प्रथम बटाटा उकडून, मग शेंगदाण्याचे कूट घातलेले भिजविलेले साबूदाणे त्यात मिसळून मिरच्यांच्या फोडणीमध्ये परतत नाहीत काय?
(रताळ्यांचा उल्लेख कदाचित चालला असता. रताळी ही भाजून किंवा कीस तळून (झालेच तर 'स्वीट पोटेटो फ्राइज़' बनवून) खाता येतात, तद्वत, उकडूनही खाता येतात.)
असो चालायचेच.
तुम्हाला असेच वाटले असेल,
तुम्हाला असेच वाटले असेल, म्हणजे साबुदाणा तुम्ही याच कारणाने रद्द केला असेल हे आधीच कळले होते.
अगदी तांत्रिक मुद्दा काढायचा तर साबुदाणा खीर, कांजी, चीक असेही पदार्थ असतात.
!
ज्ञानेश्वर बॅचलर होते हो! इतके कष्ट घेतील? (निवृत्ती-सोपानांचे तेच.)
(नाही म्हणायला, त्यांच्याबरोबर मुक्ताबाई होती म्हणा. परंतु, (१) अनुभवी नसावी. (The spirit is willing, but the flesh is weakवाला किस्सा.) आणि, (२) समजा येत असले हे सारे पदार्थ बनवायला, तरीसुद्धा, या तीन उंडग्यांकरिता इतके कष्ट उपसायला अडले होते तिचे खेटर!)
.
काट्याची अणी म्हणजे काय?
परंतु, एकंदरीत, पराकोटीचे डिप्रेशन आलेल्या अवस्थेत (आणि, पराकोटीचे डिप्रेशन येण्याचे प्रसंग ज्ञानेश्वरांच्या१ आयुष्यात थोडके नसावेत!) ज्ञानेश्वरांनी हातास लागलेल्या पहिल्या कागदावर/भूर्जपत्रावर/भिंतीवर२ खरडलेले काहीबाही असावे, अशी शंका येते. तुम्हाला (किंवा मला) त्याचा अर्थ न समजल्यास नवल नाही. किंबहुना, खुद्द ज्ञानेश्वरांना त्याचा अर्थ समजला असल्यास ते (१) ज्ञानेश्वरांनी भिंत चालविणे३, तथा (२) ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेणे४ यांच्या कोटीतील महदाश्चर्य ठरावे. थोडक्यात काय, गुरुवर्य वुड्डहौससाहेबांनी म्हटल्याप्रमाणे, It's like Shakespeare; Sounds impressive, but does not mean a thing.
(हं, आता, ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत कवन रेड्याकडून गाऊन घेतले असते, तर कदाचित आम्ही त्यांना मानले असते. पण, उगीच? असेच? नुसतेच?)
तेव्हा, कशाला उगाच त्याचा अर्थ शोधण्याच्या फंदात पडता? आडातच मुळात जो अर्थ नाही, तो पोहऱ्यात येईल कोठून?
(परंतु, एकंदरीत पाहिले असता, प्रस्तुत भारूड काय, किंवा तुम्ही किंवा गविंनी उद्धृत केलेली इतर काव्ये काय, यातून एकंदरीत, 'मराठी माणसाने काहीही जरी करायला घेतले, तरी त्याचे ओमफस होणे हे ठरलेलेच!'५ ही जी काही टिपिकल मराठी डिफीटिस्ट वृत्ती आहे, तिचे दर्शन होते खरे. (हा एक समान धागा तिन्हींमध्ये आहे, आणि तो साहजिक आहे. तिन्ही रचना मराठीत आहेत.) परंतु, त्यापलिकडे याला काही अर्थ असावासा वाटत नाही. (अर्थात, अर्थ लावायचाच म्हटला, तर ओढूनताणून काहीतरी कसातरी लावता येईलच६, म्हणा... लोकमान्यांनी म्हटल्याप्रमाणे७, दिडकीची भांग घेतली, की वाटेल तितक्या कल्पना सुचतात!८ त्यामुळे... चालायचेच!))
------------------------------
१ म्हणजे, हे जर खरोखरच तेराव्या शतकातल्या ज्ञानेश्वरांनी लिहिले असेल, तर. अत्रैव इतरत्र गविंनी लक्षात आणून दिलेला 'रुपयां'चा मुद्दा विचारार्ह आहे.
२ ज्ञानेश्वरांचे भिंतीवर भारी प्रेम!
३ काही वेगळ्या अर्थाने याचे plausible explanation देणे शक्य आहे, हे आम्ही इतरत्र (प्रात्यक्षिकासह) सिद्ध केले आहे.
४ याच्याही plausible explanationचा प्रयत्न करणे अगदीच अशक्य नसावे.
५ किंवा, अन्तू बर्व्याच्या शब्दांत, 'दिवाळ्याचा अर्ज मागवून ठेव म्हणावे आत्तापासून!'५अ
५अ उद्धृताची चूभूद्याघ्या.
६ नि कोणीतरी तो लावेलच.
७ प्रस्तुत उक्ती, आणि ते 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही.' हे महावाक्य, लोकमान्यांनी उच्चारले, असे समजण्याची पद्धत आहे. असो.
८ अध्यात्म, अध्यात्म म्हणजे तरी दुसरे काय?
.
अणिवर = टोकावर
>>तेव्हा, कशाला उगाच त्याचा अर्थ शोधण्याच्या फंदात पडता?
आता हे काव्य माझ्या आयुष्यात आलं आहे. त्याला काही गहनगंभीर अर्थ असला तर तो शोधून न काढता मला मरायचं नाहीये.
हे आणखी एक
रिक्षांच्या मागे (सुद्धा) 'गणी गण गणात बोते' लिहून लोक आत्यंतिक कूट वागतात. लगे हाथ त्याचाही अर्थ सांगून टाकलात तर फार छळणार्या प्रश्नातून सुटका होईल.
मग मीही मरायला मोकळी.
गण गण गणात बोते हा मोठ्यांचा
गण गण गणात बोते हा मोठ्यांचा आलामंतर कोलामंतर छू! आहे
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
?
पण तो रिक्षाच्या मागे का?
आईचा आशिर्वाद भाउंची कृपा तसे
आईचा आशिर्वाद भाउंची कृपा तसे गण गण गणात बोते. तो खरडफळा आहे
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
ठीक/एक बारीक दुरुस्ती
ठीक. हे पटण्यासारखे.
ठळक केलेला शब्द आर्शिवाद असा लिहिण्याची परंपरा आहे. (‘आई तुझा आर्शिवाद’.) अर्थात, ट्रकवाल्यांच्या परंपरा आणि रिक्षावाल्यांच्या परंपरा यांत फरक असल्यास कल्पना नाही. (चूभूद्याघ्या.)
सदगुरु
ज्ञानदेवांनी असे चमत्कृतीपूर्ण काव्य केले त्याचे कारण, लोकांचे लक्ष वेधुन घेऊन त्यांना अध्यात्माचे महत्व पटवुन देणे हेच असावे. सर्वाचा निष्कर्ष हा शेवटी सद्गुरु शिवाय ग्यान मिळत नसते, हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रकार वाटतो. त्यांत काही गहन अर्थ त्यांना अभिप्रेत असेल असे वाटत नाही. आणि असे लिहिण्याची त्यांच्या फ्यामिलीत तशी संवयच असावी, म्हणुनच, संत मुक्ताईंची ' मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी' असली काव्ये आम्ही आशाबाईंच्या तोंडुन लहानपणापासून ऐकली.
मुंगी व्यायलीही आहे एके ठिकाणी.
मुंगी व्याली शिंगी झाली
मुंगी व्याली शिंगी झाली दूध तिचे किती |
सतरा रांजण भरुन गेले प्याले बारा हत्ती || १ ||
आम्ही लटिके न बोलु वर्तमान खोटे || धृ ||
लटिकें गेले कटके तेथे गाडग्या एवढे राळे |
उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी येवढे डोळे || २ ||
शेळी करी घुसळण तेथे मांजर काढी लोणी |
उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या गोणी || ३ ||
पाण्यात कासव गीत गाय वनात कोल्हा नाचे |
सावज मनी संतोषला खोकड पुस्तक वाचे || ४ ||
कांतणी घरी लग्न लागले सरडा कणीक कांडी |
बागुल वंध्या कण्या परणी घुबड मांडे रांधी || ५ ||
बाभुळीचे खोडी माशाने केले कोटे |
सशाने सिंह ग्रासिला बेडूक आले लोटे || ६ ||
विष्णु दास नामा म्हणे ऐसी त्यांची ख्याती |
लटिकें म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती || ७ ||
संत नामदेव
मुंगी
माझ्या एका आत्याला लहानपणी मुंगी हे टोपणनांव पडले होते. आणि तिच्या मुलीला लहानपणी सगळे 'चिंगी' म्हणत. म्हणून त्या चिंगीला आम्ही हे 'मुंगी व्याली चिंगी झाली' असे म्हणुन चिडवत असु!
.
हे नामदेवमहोदय तेराव्या-चौदाव्या शतकांतील हिंदुस्थानाऐवजी विसाव्या शतकाच्या अंतिम दशकांतील आणि/किंवा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकांतील अमेरिकेत जर उदयास येते, तर ‘फॉक्स न्यूज़’ नामक चित्रवाणीवाहिनीवर नाव काढते. काळ आणि स्थळ चुकले.
(काय रॉ टॅलेंट आहे!)
!!!
हा म्हणजे, ‘सब बच्चे लोग, एक हाथ से ताली बजाओ। जो नहीं बजाएगा, उस की माँ मर जाएगी!’, त्यातलाच प्रकार झाला!
कित्ती ते सेल्फ-प्रमोशन! तेही एक वेळ ठीक आहे, परंतु… ऑड्यन्सला धमकावून??????
.
अगदी! कुणी खूप फेकू लागलं की त्याला आपणच
"लटिकें म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती "
हे ऐकवायचं असतं अशी पद्धत आहे.
लिंक
https://purentrue.wordpress.com/%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%82%e0%a4%97%e0%...
ही लिंक उघडून वाचून बघा, बर्यापैकी माहिती आहे.,
.
ही वाचलेली आहे. यातच तीन कुंभार = ब्रम्हा, विष्णू आणि महेश असा अर्थ लावला आहे. ते काही मला विशेष पटलं नाही.
काट्याच्या टोकावर गाव कसं वसेल? पहिल्या ओळीपासूनच ती असंगत आहे. पण आता त्यात देवाला आणायचं ठरवलं की ती निरर्थकता+असंगती आपल्याला अद्भुतरम्य करून टाकता येते. अजून थोडे प्रयत्न केल्यास त्यातून ईश्वरप्राप्तीदेखील होऊ शकते. देव मानणाऱ्यांच्या आणि न मानणाऱ्यांच्या आयुष्याला एकसारखाच काहीही अर्थ नसतो असा अर्थदेखील काढता येईल. किंवा हे जग क्षणभंगुर आहे. आपलं अस्तित्त्व खरंतर अस्तित्त्वच नाही वगैरे.. काहीही.
काट्याच्या टोकावर गाव कसे वसेल?
युद्धापूर्वी समेटाचा अखेरचा प्रयत्न, म्हणून, कौरवांनी पांडवांना फक्त पाच गावे द्यावी, असा एक प्रस्ताव कृष्णाने मांडला होता. त्यावर, 'पाच गावे तर सोडूनच दे, परंतु, सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनसुद्धा देत नाही जा!' म्हणून दुर्योधनाने त्यास धुडकावले होते.
(म्हणजे, सुईच्या अग्रावर पाच गावे मावू शकत नसावीत, असे मानावयास प्रत्यवाय नसावा. इथवर ठीक.)
आता, काट्याचे टोक हे सुईच्या टोकापेक्षा (तुलनेने) बरेच मोठे असावे, असा अंदाज वर्तविता यावा. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे, सुईच्या टोकावर पाच गावे जरी मावू शकत नसली, तरी, काट्याच्या टोकावर तीन गावे वसू शकणारच नाहीत, असे विधान ठामपणे करणे हे (अपुऱ्या विद्यामुळे) कठीण आहे.
आणखी थोडा विदा हवा.
(आणि, 'गाव' म्हणजे 'मानवी वस्ती' अशाच अर्थाने असले पाहिजे, असे थोडेच आहे? Microbial coloniesबद्दल बोलायचे झाल्यास काट्याच्या टोकावर तीनच का, वाटेल तेवढी गावे वसतील! (काट्याने ओरखडल्यावर धनुर्वाताचे इंजेक्शन घ्यायला सांगतात, ते काय उगीच? धनुर्वाताच्या जंतूंची किती 'गावे' वसलेली असू शकतील त्या एवढ्याश्या काट्याच्या टोकावर, हे मी का तुम्हाला सांगायला पाहिजे!))
असो चालायचेच.
महाभारत गीता रामायण इत्यादी
आपली सगळी महाकाव्य असंगातीनं भरलेली आहेत असं मला लहानपणापासून वाटतं. म्हणून मी त्यांचा नाद लहानपणीच सोडून दिला. माझा मुलगाही माझी गादी चालवतो. माझ्या आईनं लॉकडाऊन चालू असताना त्याच्याकडून (तेव्हा वय वर्ष ५) गीता पाठ करून घ्यायचा प्रोजेक्ट हाती घेतला होता. गीता काय आहे हे सांगताना कृष्णार्जूनांची आणि प्रसंगाची ओळख आई करून देऊ लागली. त्यावर लगेच आमच्या पोराने
"इतकं मोठं युद्ध चालू आहे. दोन्हीकडे सैन्य आहे. तर हा अर्जुनाला कविता का सांगत बसला आहे?" असा अतिशय भौतिक प्रश्न विचारला होता. त्यापुढे अर्जुन आपल्या नातेवाईकांना मारायला तयार नाही हे ऐकून, "त्याचं बरोबर आहे! कृष्ण त्याला का मारायला सांगतो आहे लोकांना?" असा प्रश्न विचारला. बहुतेक त्यानंतर गीता पठण बंद झाले.
एकाच वयाचे शंभर कौरव गांधारीला कसे झाले?
आपल्याला हव्या त्या देवाचे desirable traits बघून त्याच्यापासून मूल घडवण्याचं काय प्रोसिजर होतं?
Mahabharat is full of women with astonishing fecundity.
त्यामुळे सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन ही त्यामानाने फारच जमिनीवरची कल्पना आहे.
पण एकूणच भारतीय लोकांना असंगतीचं वावडं नाही. आपण एका गाण्यात, बाहेर उघड्यावर नाचत असताना ४ वेळा कपडे बदलून येणाऱ्या हिरोईन बघत लहानाचे मोठे झालो आहोत. माउंट टिटलिसवर ऑर्केस्ट्रा कुठे लपवून ठेवला आहे जो आपल्याला दिसत नाही? गाणं गाताना त्यांच्या तोंडातून वाफ का येत नाही? शिफॉनची साडी नेसून नाचल्याने पुढच्या शॉटमध्ये बाईला न्यूमोनिया का होत नाही?
असे प्रश्न आपल्याला तरी कुठे पडतात?
… (अतिअवांतर)
मला त्याहूनही मूलभूत शंका आहे(त).
१. गांधारीला जर एकसमयावच्छेदेकरून शंभर कौरव झाले, तर तिची डेलिव्हरी किती वेळ चालली असेल?
२. <पार्श्वभूमी>तुम्ही कधी पूर्वीच्या काळातल्यासारख्या घड्याळांच्या दुकानात गेला आहात की नाही, कल्पना नाही. (किंबहुना, आता तशी घड्याळांची दुकाने असतात की नाही, याबद्दलही खात्री नाही.)
अशा दुकानांत, भिंतीवर जेथे जेथे म्हणून जागा सापडेल, तेथे तेथे वेगवेगळ्या प्रकारची (विकायला ठेवलेली) घड्याळे डिस्प्लेसाठी टांगून ठेवलेली असत. (त्याव्यतिरिक्त, दुरुस्तीकरिता म्हणून आलेली घड्याळेसुद्धा (भिंतीवर टांगण्याच्या प्रकारातली असल्यास) या इतर घड्याळांसोबत त्याच भिंतींबरोबर गुण्यागोविंदाने नांदत. थोडक्यात, घड्याळांच्या दुकानांच्या भिंती या तऱ्हेतऱ्हेच्या घड्याळांची वस्तुसंग्रहालये असत.)
मात्र, इतकी सारी घड्याळे जरी कोणालाही सहज दिसतील अशा रीतीने टांगून ठेवलेली असली, तरीसुद्धा, वेळ सांगण्याच्या दृष्टीने ती एकजात निरुपयोगी असत. कारण, त्यांतील प्रत्येक घड्याळ हे (चालू स्थितीत असले, तरीही) दिवसातली कोठलीतरी (random, आणि वर्तमान वेळेशी काहीही संबंध नसलेली) वेळ दाखवे. शिवाय, प्रत्येक घड्याळातली वेळ वेगळी. एका घड्याळात पावणेदहा वाजलेले असले, तर दुसऱ्यात बारा वाजून सदतीस मिनिटे, तर तिसऱ्यात चार वाजून त्रेपन्न मिनिटे. वगैरे वगैरे. आणि, घड्याळांच्या कोठल्याही दुकानात थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसे.
मात्र, या ‘पॅटर्न’मागे काही कारणमीमांसा असू शकेल, याची शंका (आपल्या ‘पूर्वापार अशीच पद्धत आहे’-संस्कृतीत) बऱ्याच काळापर्यंत आलेली नव्हती.
असा विचार करून बघा. दुकानात शंभर घड्याळे आहेत. घड्याळजीने समजा ती सर्व अचूक वेळ दाखवतील, अशा पद्धतीने लावून ठेवायची, असे ठरविले. आता, कितीही प्रयत्न केला, तरीसुद्धा ही सर्व घड्याळे अगदी मायक्रो- किंवा नॅनोसेकंदांपर्यंत अचूक अशी एकच वेळ दाखवतील, अशी लावणे हे (मानवी क्षमतेच्या मर्यादांमुळे) अशक्य आहे. त्यांनी दर्शविलेल्या वेळांमध्ये काही नॅनो-, मायक्रो- किंवा मिलिसेकंदांचा, झालेच तर कदाचित काही सेकंदांचासुद्धा, फरक हा कितीही म्हटले तरी राहणारच. (शिवाय वेगवेगळ्या घड्याळांच्या गतीतील सूक्ष्म फरकांमुळे हा फरक कमीजास्त होत राहणार.)
आता समजा, की या शंभर घड्याळांपैकी पन्नास घड्याळे ही टोल्यांची आहेत. दुपारी बारा वाजता (किंवा अगदी सकाळी दहा किंवा अकरा वाजतासुद्धा) ही पन्नास घड्याळे जर एकसमयावच्छेदेकरून, परंतु काही मायक्रो-, मिलि-, अथवा सेकंदांच्या phase differenceने, बारा (किंवा दहा, किंवा अकरा) टोले देऊ लागली, तर घड्याळजीच्या डोक्याची किती (आणि किती वेळाकरिता) मंडई होईल!
(थोडक्यात, घड्याळजीच्या मनःशांतीकरिता दुकानातील घड्याळांच्या वेळा stagger करण्याचा प्रघात आहे.)<पार्श्वभूमी/>
आता, हे सगळे महाभारत मी इथे नक्की कशासाठी सांगितले?
शंभर कौरवांची डेलिव्हरी चालू असताना, येणारा प्रत्येक कौरव जर थोड्या phase differenceने ‘ट्यांऽ’ करू लागला, तर गांधारीच्या आणि तिच्या सुइणीच्या डोक्यांच्या काय मंडया झाल्या असतील?
(तरी बरे, त्या काळात हल्लीच्यासारखी नवऱ्याने डेलिव्हरी रूममध्ये उपस्थित राहण्याची पद्धत नव्हती. नाहीतर धृतराष्ट्रसुद्धा त्या आवाजाने पकला असता — वाचला! असो चालायचेच.)
घड्याळ लॉजिक दोषाने युक्त
घड्याळ लॉजिक दोषाने युक्त वाटते.
अकरा बारा टोले थोड्या फेज डिफरन्सने पडले तरी एखाद दोन मिनिटे रेंगाळतील. त्यांचा एकत्रित आवाज मोठा असेल हे मात्र मान्य.
अशी खूप टोले पडण्याची वेळ नऊ, दहा, अकरा, बारा वाजताच जरा जास्त त्रासदायक असेल. बाकी वेळी, उदा. एक, दोन, तीन, चार इत्यादि वाजता ते अधिक सुसह्य असतील. आणि जी काय पीडा व्हायची ती दर तासाभराने एकदाच काही सेकंद होऊन टळून संपेल.
.. आता अगदीच रँडम वेळा लावून ठेवून काय होईल ते पाहू.
कोणत्याही वेळी कोणतेही एक घड्याळ उठून कितीही टोले मारते आहे. ते संपताच दुसरे एक (किंवा अनेक) घड्याळ/ ळे जागृत होऊन ठणाणा करत/ते आहे / त . कधी एक, कधी बारा.
असे सतत चालू असण्यापेक्षा तासाला एकदा बरे ना? दुपारी एक ते चार झोपण्याची पंचाईत नको.
.
“Cowards die many times before their deaths; The valiant never taste of death but once.”, huh?
१. तुम्हाला पुढचा जन्म घड्याळजीचा मिळो, तथा
२. पुढच्या जन्मी तुमचे घर मुंबई विमानतळाच्या नजीक असो, आणि, (तुमच्यासारख्या लोकांना भोगावा लागतो, तो त्रास एकदाच काय तो भोगावा लागावा, म्हणून) ‘मुंबई विमानतळावरून उडणारी वा मुंबई विमानतळावर उतरणारी नव्वद टक्के आंतरराष्ट्रीय उड्डाणे ही, (आजच्यासारखी रात्री बारा ते तीन या वेळांदरम्यान वाटेल तेव्हा न उडता वा उतरता) बहुतांशी सर्व रात्री बाराच्या ठोक्याला उडली वा उतरली पाहिजेत (आणि उरलेली तुरळक ही काही एकसमयावच्छेदेकरून रात्री एकाच्या ठोक्याला, काही रात्री दोनच्या ठोक्याला, तर काही रात्री तीनच्या ठोक्याला उतरली पाहिजेत)’ असा सरकारी फतवा निघो,
अशा तुम्हाला दुहेरी हार्दिक शुभेच्छा!
(‘जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे.’)
जाता जाता: तुमची भूमिका ही ‘झटका’वादी बोकडाची आहे. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ म्हणणाऱ्या दत्ताजी शिंद्याच्या (सांस्कृतिक) वारसांस हे शोभत नाही!
(अर्थात, ‘भवसागर तरून एकदाचा काय तो पार केला, की (आपण) मोकळे!’-संस्कृतीच्या पाइकांकडून याहून वेगळी अपेक्षा ती काय करणार, म्हणा! ‘It’s not the destination, it’s the journey’ हे आम्हां हिंदूंना ज्या दिवशी उमजेल, त्या दिवशी जगबुडी होईल!)
असो चालायचेच.
"खवचट" दिली.
"खवचट" दिली.
तुमच्या घराच्या आसपास अत्यंत रँडम वेळी भांडणारे आणि अतिविचित्र आवाजांची रेंज असलेले शंभर बोके एकासमयावच्छेदेकरून पैदा होवोत अशा तुम्हालाही सदिच्छा..
आभारी आहे!
(तेवढीच कंपनी.)
(कुत्री भुंकली असती, तर अधिक आवडले असते, परंतु चलो, मांजर ही सही!)
हा हा हा!!
हा प्रश्न मलाही पडला होता. पण मी असा विचार केला की इवलीइवली शंभर बाळं एका दोन पायावर चालणाऱ्या स्त्रीच्या गर्भात वाढून वाढून अशी किती वाढणार आहेत? त्यामुळे डिलिव्हरीवेळी सगळ्या बाळांनी भरलेली तिची amniotic sac च थेट बाहेर आली असेल. मग आपल्या संस्कृतीत आधीपासूनच ज्ञात असलेले (मातीची मडकी/लो टेंपरेचर भट्टी) इंक्युबेटर वापरून त्यांना पुढील तीन महिने सुश्रुत वगैरे लोकांच्या देखरेखीखाली शिशुअतिदक्षता विभागात ठेवलं असेल (neonatal ICU).
किंवा हल्ली प्रियांका चोप्रा वगैरे लोक जशी गर्भाशय भाडेतत्त्वावर घेतात तशी धृतराष्ट्र आणि गांधारीनं नव्याण्णव स्त्रियांची फुकट वापरली असतील कारण राजाचा गर्भ वाढवणे हे पुण्याचं काम. पण तरी त्या सगळ्या एकाच वेळी व्यायला असल्या तर शंभर सुईणी तयार ठेवणे वगैरे अवघडच. आणि प्रत्येक खोलीबाहेर जाऊन पुत्रदर्शन घेताघेता धृतराष्ट्राचे नक्कीच २५-३० हजार पावलांचे कार्डियो झाले असेल.
एकाच वेळी शंभर अंडी (खरंतर त्यापेक्षा जास्त) तयार करण्यासाठी गांधारीनं कदाचित आजच्या क्लोमिड किंवा तत्सम गोळ्यांचा आजच्या हजारपट डोस घेतला असेल.
किंवा हे सगळं दैवी शक्तीने घडवून आणलं असेल. शेवटी तेच सोपं आहे. मंत्र म्हणा, लगेच पोटात फिटस तयार! मला अशी शक्ती कुणी दिली असती तर मी मंत्र म्हणून प्लुटो ग्रहाचं मूल जन्माला घातलं असतं. प्लुटो मला फार कूल वाटतो.
100 कौरव
गांधारीलाच हे १०० पुत्र झाले हे लोकांना सांगायला असेल. प्रत्यक्षात, दुर्योधन, दु:शासन हे जुळे गांधारीचे आणि बाकी ९८ दासीपुत्र असतील.
!
कौरव हे (मॉडिफाइड) तंदूर पद्धतीने वाढविले गेले, ही संकल्पना रोचक (तथा मनोरंजक) आहे.
!!
धृतराष्ट्र जन्मांध होता हो! विसरलात काय एवढ्यात?
(आणि, भाडेतत्त्वावरच्याच गर्भाशयांकरिता प्रत्येकी स्वतंत्र खोल्या ठेवल्याच असत्यान् धृतराष्ट्राने, असे सांगवत नाही. कदाचित, जनरल वॉर्डावरसुद्धा भागवले असते. शेवटी, कौरवांचा बाप तो!)
आणि समजा, एवढे करून जर गर्भधारणा झालीच नसती, तर… जाऊ दे! स्पेक्युलेशन इथेच थांबवतो. Period.
:D
लेखनाच्या नादात धृतराष्ट्र आंधळा होता हे विसरले. कदाचित पोरं बघायलाही त्यानं संजयाला पाठवलं असेल.
>>कदाचित, जनरल वॉर्डावरसुद्धा भागवले असते. शेवटी, कौरवांचा बाप तो
How primitive!
यावरून आठवलं जहांगीर हॉस्पिटलमध्ये बाळंत व्हायला प्रायव्हेट खोली जरी घेतली तरी कळा द्यायला एक छोटी ante chamber आहे. मी तिथे १६ तास कळा न देता काढले. माझ्यानंतर आलेल्या प्रत्येक बाईचं निरीक्षण केल्याने बहुतेक माझ्या होत्या नव्हत्या त्याही कळा निघून गेल्या. आमच्या डॉक्टरचा एक गुजराती रेसिडेंट होता. तो तिथे बसून बायका बायकांमध्ये कळा देण्यासाठी चुरस लावत होता. "देखो वो पेसंट को कितने अच्छे पेन्स आ रहे है. ऐसे चाइए अपने को.इतना दर्द होता है तब्भी बच्चा होता है!"
(सुपरअवांतर) प्लुटो...
याकरिता जे काही करावे लागत असावे (असे वाटते; चूभूद्याघ्या), त्यास Plutonic relationship असे संबोधता यावे काय?
(बादवे,
प्लुटो आता ग्रह नाही म्हणतात. असो चालायचेच.)
हो ना! कमाल तापमान ५५ अंश केल्व्हिन (-२१८.१५ अंश सेल्सियस) तथा किमान तापमान ३३ अंश केल्व्हिन (-२४०.१५ अंश सेल्सियस) म्हटल्यावर…
.
ट्रम्प डिबेट जिंकला.
(असे फॉक्स न्यूज़वर सांगताहेत म्हणे.)
तुकाराम
तमाशा संतांघरी। निर्गुणपुरी।।
गावांवर एक बाभुळ। खाली शेंडा वरती मूळ।
खाली कळस वर देउळ। गत आहे न्यारी।।
फुलाआधी गुंफिला तुरा। याचा अर्थ करी चतुरा।
कोण पुरा असेल चतुर। खोवील शिरी।।
घोडा रोवुन बांधिला खुंट। नगाऱ्यावर चढविला उंट।
कोण पुतळा असेल बळिवंत। अर्थ विचारी।।
दिवा वाऱ्या घालितसे मेण। ह्याचा घ्याहो तुम्ही अनुभव।
तुका वैकुंठीचा राव। गत असे न्यारी।।
'तमाशा संतांघरी'... (अवांतर)
'तमाशा' या मराठीत घुसलेल्या मूळ उर्दू/फारसी(की अरबी?१ चूभूद्याघ्या.) शब्दाचा अर्थ 'दृश्य' (विशेषेकरून, 'प्रेक्षणीय दृश्य' किंवा '(आवर्जून) पाहण्याच्या लायकीचे दृश्य') असा काहीसा आहे. मराठीत त्याचा अर्थ 'लोकनाट्य' असा जो आपण घेतो, तो बहुधा आपण नंतर लावला असावा काय?२
किंबहुना, 'तमाशा'चा मराठीतील अर्थ मोल्सवर्थ पुढीलप्रमाणे नोंदवितो:
या सर्व विवेचनामागील मतलब, 'तमाशा संतांघरी' असे वाचल्यावर 'संतांच्या घरी बाई तुणतुण्यावर नाचली' असे जे एक दृश्य आपोआप डोळ्यांसमोर उभे राहाते, त्याऐवजी, या वाक्प्रचाराचा साधासुधा अर्थ 'संतांच्या घरचे दृश्य' असा घेता यावा काय?
(अर्थात, पुढचे सगळे वर्णन वाचल्यावर, a diverting exhibition हे वर्णन योग्यच वाटते. असो चालायचेच.)
--------------------------------------------------
तळटीपा:
१ फारसीच असावा. कारण (उर्दूत) 'तमाशा' करणारा हा 'तमाशगीर' असतो, तर 'तमाशा' पाहणारा 'तमाशाई'१अ. अरबी असता, तर (सेमिटिक भाषांच्या ट्रायकॉन्सोनंटल रूट्सवाल्या फीचराच्या फंड्यास अनुसरून) 'तमाशा' करणारा हा (बहुधा) 'तामिश', तर 'तमाशा' पाहणारा हा (बहुधा) 'मुतम्मिश' किंवा 'मुतामिश' (किंवा असाच काहीतरी) झाला असता. (पुन्हा, चूभूद्याघ्या.) त्यामुळे, 'तमाशा' अरबी खासा नसावा. आता, उर्दूत आहे, पण अरबीत नाही, तर मग येणार कोठून? (उर्दूचे शब्दागार हे काही अंशी अरबी, अत्यल्प अंशी तुर्की, आणि बव्हंशी फारसी, यांची हिंदीच्या तत्कालीन स्थानिक बोलींशी सरमिसळ होऊन बनलेले आहे.) तुर्की असण्याची शक्यता खूपच कमी, आणि स्थानिक हिंदी बोलींतला तर वाटत नाही. म्हणजे फारसीतलाच असावा बहुधा, असा तर्क ठोकून देण्यास प्रत्यवाय नसावा.१ब, १क
१अ पाहा: 'ख़ुद ही लगा के आग तमाशाई बन गए'.
१ब अरबी ही सेमिटिक भाषा आहे; मात्र, फारसी ही सेमिटिक भाषा नाही. (इंडो-इरानियन आहे. संस्कृतच्या मावसघराण्यातील.)
१क ('तमाशा') हा शब्द मराठीत फारसीतून आला, असे मोल्सवर्थ सांगतो. (खातरजमा!)
२ शब्द एका भाषेतून दुसऱ्या भाषेत येताना अनेकदा त्यांस नवे अर्थ प्राप्त होऊ शकतात. (उदाहरणादाखल, फारसी/उर्दूतील 'जुलाब' मराठीत येताना त्यास काही नवीन अर्थ प्राप्त होतो.२अ)
२अ मात्र, या उदाहरणात, मूळ अर्थात नि या नव्याने प्राप्त झालेल्या अर्थात कार्यकारणभाव आहे. जसे की, फारसी/उर्दू जुलाब प्यायल्याने मराठी जुलाब होतो.
हाय काय अन नाय काय!
Existential crisis मुळे हैराण झाल्यावर असे काही बाही लिहून इतरांना वात आणण्याने त्याकाळी सुद्धा दिलासा मिळत असणार!
असेच काही नाही...
म्हणजे, ज्ञानेश्वरांना existential crisis असू शकणे हे समजण्यासारखे आहे. आम्हाला तशी काही अडचण नाही.
मात्र, काहीबाही लिहिण्याने आमचा वेळ चांगला जातो. (इतरांना त्याने वात येत असल्यास त्याची पर्वा आम्ही करत नाही. किंवा, केलीच, तर आम्ही ते आमचे यश समजतो.)
(आणि हो, दिलाश्याबद्दल कल्पना नाही; मात्र, त्याने आम्हाला प्रचंड समाधान मिळते, एवढे निश्चित!)
सांगण्याचा मतलब, काहीबाही लिहून इतरांना वात आणण्यामागे existential crisis हीच एकमेव प्रेरणा असू शकते, असे काही नाही. स्वत:चा वेळ जात नसणे, हीदेखील असू शकते.
(ज्ञानेश्वरांना existential crisis असणे हे अशक्य नाही.१ मात्र, त्यांच्या काहीबाही लिहिण्यामागील प्रेरणा ती होती, की त्यांचा निव्वळ वेळ जात नव्हता, याचा तपास तुम्ही केला आहेत काय?)
--------------------------------------------------
१ नाहीतर, उगाच का त्यांनी समाधी घेतली?१अ
१अ 'भिंत चालविली – tick. रेड्याकडून वेद वदविले – tick. आता आयुष्यात करण्यासारखे यापुढे राहिले काय? यापुढे जगण्यास प्रयोजन काय?' असा विचार त्यांनी केला असणे हे अगदीच अशक्य नाही. असो चालायचेच.
कन्नड संत पुरंदरदास यांची कृती
काही वर्षापूर्वी हे भारुड मिसळपाव या संस्थळावर वाचलेले आठवते. त्यावेळी याच अर्थाचे कन्नड संत कवी पुरंदरदास यांचेही एक पद आहे व त्याच स्वैर भाषांतर केलेलेही आठवते.
काट्याच्या टोकावर दोन तळे बांधली
दोन रिकामी, व एक भरले नाही ||
न भरलेल्या तळ्याला तीन गवंडी आले
दोघे लंगडे, व एकाला पाय नाही ||
पाय नसलेल्या गवंड्याला तीन म्हैस दिले
दोन दूध न देणारे, व एकाला वासरू नव्हते ||
वासरू नसलेल्या म्हशीला तीन सोन्याचे नाणे मिळाले
दोन खोटे, व एक चालत नाही ||
न चालणाऱ्या नाण्यासाठी तिघे आले
त्यात दोन आंधळे, व एकाला दिसत नव्हते ||
न दिसणाऱ्याला तीन गावांचे दान मिळाले
दोन गावं पडकी, व एका गावात शेतकरीच नव्हता ||
शेतकरी नसलेल्या गावी तीन कुंभार आले
दोघांचे हात कापलेले व एकाला हातच नाही ||
हात नसलेल्या कुंभारानी तीन मडकी भाजली
दोन फुटके व एकाला तळच नव्हते ||
बिनतळाच्या मडक्यात तीन तांदळाचे दाणे टाकले
दोन अर्धवट शिजले व एक शिजलाच नाही ||
न शिजलेल्या शितासाठी तीन नातेवाइक आले
दोघे खायला तयार नव्हते व एकाला भूक नव्हती ||
या सगळ्यांचा अर्थ फक्त पुरंदर विठलच जाणे
इतर कुणालाही ते कळणार नाही ||
कदाचित या पदाच्या ओळीतील अर्थ खालीलप्रमाणे असण्याची शक्यता आहेः
काट्याच्या टोकावर दोन तळे बांधली
दोन रिकामी, व एक भरले नाही ||
काट्यांचे टोक म्हणजे जीव. तीन तळे म्हणजे आपले शरीरदेह, सूक्ष्म शरीरातील लिंगदेह व जीवदेह. ही तळे चांगले कर्म न केल्यामुळे पुण्याने भरलेच नाही.
न भरलेल्या तळ्याला तीन गवंडी आले
दोघे लंगडे, व एकाला पाय नाही ||
न भरलेल्या तळ्यात तीन गवंडी आले. गवंडी म्हणजे बालपण, यौवन व म्हातारपण. बालपणी व म्हातारपणी कर्माचरण जमत नाही. यौवनात शक्ती असूनही मन तयार होत नाही. चंचल मनाला चांगले कर्म करण्यास पायच फुटत नाही.
पाय नसलेल्या गवंड्याला तीन म्हैस दिले
दोन दूध न देणारे, व एकाला वासरू नव्हते ||
तीन म्हैस म्हणजे व्यामोह - बायको, मुलं व संपत्ती. दूध न देणाऱ्या म्हशी म्हणजे बायको व मुलं. ते कधीच तुमच्या कर्मात सहभागी होत नाहीत. ते आपले नसतात. त्यांचा वेगळाच जीव असतो. आपल्या संपत्तीवर आपला अधिकार असतो. मनात आणल्यास गरीबांना, निर्गतिकांना दान-धर्म करून पुण्य संपादन करता आले असते. मोक्षप्राप्तीसाठी थोडेसे तरी दान करता आले असते. परंतु मन नावाचा वासरूच तेथे नसतो.
वासरू नसलेल्या म्हशीला तीन सोन्याचे नाणे मिळाले
दोन खोटे, व एक चालत नाही ||
वासरू नसलेली म्हैस म्हणजे आपली संपत्ती व ऐश्वर्य. दोन खोटे नाणे स्वतःवर खर्च केले. व तिसरा चालत नसल्यामुळे दानधर्मच कधी केला नाही.
न चालणाऱ्या नाण्यासाठी तिघे आले
त्यात दोन आंधळे, व एकाला दिसत नव्हते ||
न चालणाऱ्या नाण्यासाठी आलेले दोन आंधळे म्हणजे संचित कर्म व प्रारब्ध कर्म न दिसणारे म्हणजे आगामी कर्म. संचित कर्म हे पूर्व जन्मातील पापाचे फळ. प्रारब्ध कर्म हे पूर्व जन्माची फळ भोगण्यासाठी. आगामी कर्म म्हणजे या जन्मात केलेल्या पाप पुण्याचा हिशोब.
न दिसणाऱ्याला तीन गावांचे दान मिळाले
दोन गावं पडकी, व एका गावात शेतकरीच नव्हता ||
न दिसणाऱ्याला मिळालेले गाव म्हणजे राजस, तामस व सात्विक गुण. राजस व तामस गुणापासून काहीही उपयोग नाही व सात्विक गुण कधीच वाढले नाही.
शेतकरी नसलेल्या गावी तीन कुंभार आले
दोघांचे हात कापलेले व एकाला हातच नाही ||
सात्विक कर्म नावाच्य गावी तीन कुंभार म्हणजे हर, ब्रह्म व हरी. हर व ब्रह्म फक्त हरीच्या आज्ञेचे पालन करणारे हात नसलेले. हरी आपल्याला सहाय करणारा. परंतु त्याला आपल्याला चांगले कर्म केल्याबद्दल सहाय करण्यासाठी हातच देऊ शकणार नाही.
हात नसलेल्या कुंभारानी तीन मडकी भाजली
दोन फुटके व एकाला तळच नव्हते ||
हात नसलेला कुंभार म्हणजे हरी. तीन मडके म्हणजे ज्ञान, भक्ती व वैराग्य. ज्ञान व वैराग्य हे फुटलेले मडके व तळ नसलेले मडके म्हणजे भक्ती. व ही भक्ती आपल्यात नाही.
बिनतळाच्या मडक्यात तीन तांदळाचे दाणे टाकले
दोन अर्धवट शिजले व एक शिजलाच नाही ||
सात्विक भक्ती, राजसिक भक्ती व तामसिक भक्ती म्हणजे तीन तांदळाचे दाणे. राजसिक भक्ती व तामसिक भक्तींचा काही उपयोग नाही. सात्विक भक्ती शिजली असती. परंतु आपण शिजवायलाच ठेवले नाही.
न शिजलेल्या शितासाठी तीन नातेवाइक आले
दोघे खायला तयार नव्हते व एकाला भूक नव्हती ||
तीन नातेवाइक म्हणजे आपला जीव गण, राक्षस गण व देव गण. आपल्यातील चांगले व वाईट गुण खाणारा आपलाच जीव. परंतु आपल्या जिवाला सात्विकतेची भूकच नसते.
भूक नसलेल्या नातेवाइकाला मारले तीन फटके
दोन वाया गेले व एक लागलाच नाही. ||
जीव हा भूक नसलेला नातेवाइक. त्याला आध्यात्मिक मार, निसर्गाचे मार व इतर जीवाकडून होणारा (किरकोळ) मार. या तिन्हीमधील दोनावर आपले नियंत्रण नाही व आपल्यातील आध्यात्मिकतेवर नियंत्रण असूनही तो मार कधीच लागलाच नाही.
या सगळ्यांचा अर्थ फक्त पुरंदर विठलच जाणे
इतर कुणालाही ते कळणार नाही ||
या सगळ्यांचा अर्थ फक्त पुरंदर विठलच जाणे. इतर कुणालाही ते कळणार नाही
इतर काही प्रतिसादात उल्लेख केल्याप्रमाणे ज्ञानेश्वराच्या नावाने हे भारुड (वा वात्रटिका) खपविण्याचा प्रयत्न झाला असावा. कदाचित हा एकनाथांचा भारुड असावा. ज्ञानेश्वर (१२७५-१२९६) १३ व्या शतकातील तर कर्नाटक संगीताचा आद्य जनक मानले गेलेले पुरंदरदास (१४८४-१५६४) १५ व्या शतकातील संत. एकनाथ (१५३३-१५९९) १६ व्या शतकातील संत. ज्ञानेश्वरांनी अशा "क्रिप्टिक" रचना फारशा केल्या नसाव्यात (निदान केल्याचे ऐकले/वाचले नाही) परंतु एकनाथांनी मात्र भरपूर केलेल्या आढळतील.
मूळ कन्नडमधील संदर्भ
काट्याच्या अणिवर
हे भारूड नाही. अभंग आहे. अशी कोडी घातलेली असतात त्यांना 'कूटाचे अभंग' म्हणतात. तशा मराठीतल्या बऱ्याच रचना संत नामदेवांच्या नावावर आहेत. वरील अभंग ज्ञानेश्वरांचा म्हणून प्रसिद्ध असला तरी मुळात तो नामदेवांचा आहे. 'काट्याच्या अणिवर तीन गावे वसणे' हि अशक्यप्राय गोष्ट आहे त्याचा आणखी अशक्य असा कल्पनाविस्तार करत पुढे हे कूट त्यांनी वाढवत नेले आहे. ब्रह्मज्ञान कसे सूक्ष्म आणि ते व्यावहारिक उपमांतून समजावून देणे कसे अवघड हे नामदेव सांगताहेत. हे ज्ञान सांगण्याला भाषा तोकडी पडते असे जवळपास सगळ्या संतांचे एकमत आहे. संत कबीर म्हणतात 'आतम अनुभव ग्यान की, जो कोई पूछै बात। सो गूंगा गुड़ खाइके, कहै कौन मुख स्वाद।।' म्हणजे मुक्या माणसाने गूळ खाल्ला तर तो त्या गोडीचे वर्णन जसे करू शकणार नाही तसेच आत्मानुभवाचे वर्णन करता येत नाही, किंवा समुद्र मापायला जाणाऱ्या मिठाच्या बाहुलीचे उदाहरण ज्ञानेश्वरांनी दिले आहे. गुलबर्ग्याचे सूफी संत ख्वाजा बंदानवाझ गेसूदराज यांनी दक्खनेत आल्यावर त्यांच्या एका ग्रंथात हेच कोडे वापरले होते असे वाचल्याचे आठवते (तो ग्रंथ दक्खनी भाषेत आहे) म्हणजे हे कूट निदान १४व्या शतकापूर्वीइतके जुने असावे.
रोचक...
'हे कूट' म्हणजे नक्की कोणते? काट्याच्या अणीचे, की मुक्याने गूळ खायचे? की समुद्र मापायला जाणाऱ्या मिठाच्या बाहुलीचे?
काट्याच्या अणीच्या कूटाबद्दल जर म्हणत असाल, तर मग त्यातल्या 'रुपया'च्या उल्लेखाचे स्पष्टीकरण कसे द्यावे? (रुपया हा सर्वप्रथम शेरशाह सूरीने चलनात आणला, असे वाचलेले आहे. (चूभूद्याघ्या.) शेरशाह सूरी हा पंधराव्या-सोळाव्या शतकांतला. त्याचा राजकीय उदय हा पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून पुढे.)
की, ख्वाजा बंदानवाझ गेसूदराज यांनी आपल्या कोड्यात दुसऱ्या कोठल्या चलनाचा उल्लेख केला होता? (आणि, ज्ञानेश्वरांनी बदलून तेथे रुपया घातला? (किंवा, रादर, नामदेवांनी. कारण, ज्ञानेश्वरांच्या काळातसुद्धा रुपया नव्हता! शिवाय, नुकतेच गुगलून पाहिल्यावर, ख्वाजा बंदानवाझ गेसूदराज हे ज्ञानेश्वरांच्या नंतरच्या काळातले, असे कळले. त्यामुळे, ज्ञानेश्वरांनी त्यांचे कोडे उचलून बदलले, हे शक्य नाही. असले, तर ते नामदेवांनीच. कदाचित ख्वाजा बंदानवाझ गेसूदराज यांनी ज्ञानेश्वरांच्या कल्पनेतून प्रेरणा घेतली असेल, किंवा कदाचित त्यांना स्वतंत्रपणे तीच कल्पना सुचली असू शकेल. त्याने फरक पडत नाही. मुद्दा इतकाच, की चलनबदल जर यांपैकी कोणी केला असला, तर तो नामदेवांनीच केला असणे शक्य आहे. असो.))
की, आपण दुसऱ्या कोठल्या कूटाबद्दल (कदाचित, मुक्याने गूळ खायच्या कूटाबद्दल, किंवा समुद्र मापायला जाणाऱ्या मिठाच्या बाहुलीच्या कूटाबद्दल) बोलत आहा?
(अतिअवांतर: 'गेसू-दराज़'... रोचक (टोपण?)नाव आहे. ('केसांनी शिवणारा'???))
--------------------------------------------------
बाकी,
हे(च एक काय ते, पटण्याजोगे) plausible explanation वाटते.
General principle म्हणून पटण्यासारखे.
(पण मग, आत्मानुभवाचे वर्णन करणे आणि/किंवा व्यावहारिक उपमांतून ते समजावून देणे हे जर अशक्य असेल (and I am ready to accept that), तर मग, why even bother? असा प्रश्न राहतोच. या सगळ्या अभंगरचनेमागील प्रयोजन काय मग?)
Wait a second!
नामदेव हेसुद्धा शेरशाह सूरीच्या अगोदरचे. म्हणजे, त्यांनीसुद्धा तेथे 'रुपया' घातला असणे शक्य नाही!
(नामदेव हे ज्ञानेश्वरांच्या बऱ्यापैकी समकालीन. (१२७०-१३५० हा त्यांच्या आयुष्याचा कालावधी गणला, तर) ज्ञानेश्वरांच्या थोडेसेच अगोदर जन्माला आले; मात्र, ज्ञानेश्वरांच्या पुष्कळ नंतर वारले. शिवाय, त्यांच्या आणि ख्वाजा बंदानवाझ गेसूदराज यांच्या आयुष्याच्या कालावधीत काहीसा ओव्हरलॅप दिसतो, परंतु ख्वाजा बंदानवाझ गेसूदराज हे किंचित नंतरच्या पिढीतले असावेत.)
(मात्र, नामदेवांच्या आयुष्याच्या कालाबद्दल विद्वानांत मतभेद आहेत (आणि, १२०७-१२८७, किंवा १३०९-१३७२, किंवा १४२५च्या आसपास, अशीही काही पर्यायी मते आहेत), असेही कळते. त्यामुळे, सगळेच मुसळ केरात!)
असो चालायचेच.
(सर्व माहिती विकीपीडियावरून.)
तैलबुद्धि आहात तुम्ही 'नवी बाजू'
'काट्याच्या अणिवर तीन गावे वसणे' हे कूट वापरले आहे.
नामदेवांच्या अभंगात 'होन' या चलनाचा उल्लेख आहे. 'घेईचना त्याने आणले तीन होन ॥ दोन खोटे एक चालेचिना ॥'
'गेसू-दराज़' हे नाव त्यांचे केस गुढग्यापर्यंत लांब होते म्हणून त्यांच्या गुरू शेख नासिरुद्दीनकडून (हे निजामुद्दीन औलियांचे शिष्य होते) त्यांना मिळाले होते. तेच प्रसिद्ध झाले.
Dadaism ? प्रस्थापित संस्कृत सुभाषितांवर आधारित त्याच प्रकारची प्राकृत रचना करण्याचा प्रयत्न ? Experimenting with Forms ?
आपण कयासच करू शकतो.
+१
खरंतर पेपरात वगैरे काही द्यायचं असेल तर आधी ऐसी वर पोस्टावं. नबांच्या नजरेखालून गेलं की सगळं ट्रोलप्रूफ होतं. कारण खुल्या इंटरनेटवर इतके बुद्धिमान ट्रोल कुठे असायला?
?
म्हणजे होन हे नाणे साधारण कधीपासून प्रचलित आहे?
शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात, शिवाजीमहाराजांनी (शिवराईबरोबरच) होन हे नाणे चलनात आणल्याबद्दल वाचल्याचे आठवते. अर्थात, याचा अर्थ या नावाचे एखादे नाणे त्यापूर्वी कधीतरी कोठेतरी चलनात असूच शकत नाही, असा निश्चितच नव्हे. मात्र, गूगलशोधाअंती याबद्दल काही अधिक माहिती हाती लागू शकली नाही.
उपरोल्लेखित तिन्ही विभूती (ज्ञानेश्वर, नामदेव, तथा ख्वाजा बंदानवाझ गेसूदराज) या शिवाजीमहाराजांच्या कित्येक शतके अगोदरच्या, म्हणून अधिक कुतूहल, इतकेच.
आभार!
विंदांनी या प्रकारच्या रचानांचा त्यांच्या बालकवितांमध्ये उपयोग केला आहे. त्यांचा अर्थ काय हे बाजूला जरी ठेवलं तरी एखाद्या लहान मुलाला या रचना (अर्थात काही शब्दांचे अर्थ सांगून) गमतीच्या वाटतात. पण तुम्ही सांगता तोच अर्थ बरोबर वाटतो आहे.
मला जाणवलेला व्यावहारिक व अ-अध्यात्मिक अर्थ
पहिल्या ओळीत काही अद्भुत, अशक्य गोष्ट दिली आहे. नंतर वेगवेगळ्या अपयशी प्रयत्नांची यादीच आहे. शेवटच्या ओळीतून उलगडा होतो.
एखादे नवीन कौशल्य शिकताना असा अनुभव येतो. सुरुवातीला आपण नवीन असताना इतर जण तेच काम आत्मविश्वासाने उत्कृष्टपणे करताना पाहून आपण अचंबित होतो. पूर्ण क्षमता नसताना, योग्य मार्गदर्शकाशिवाय करुन पाहिलेले प्रयत्न फसतात. म्हणून सुरुवातीला तरी एखादा गुरु / मार्गदर्शक आवश्यक असतो. (हा अनुभव सद्गुरुवाचुन कळेचिना).
कौशल्य मग ते कोणतेही असो: वाहन चालवणे, स्वयंपाक करणे, वाद्य वाजवणे, सर्जरी करणे इ. इ. थिऑराॅटिकल शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकल कौशल्य शिकताना मार्गदर्शक सोबत असणे जास्त गरजेचे असते.