मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (6)

माझ्यात जाणीव आली कुठून?

आपण कालकुपीत बसून आपला जन्म होण्यापूर्वीच्या काळात जायचे ठरविल्यास आपण त्यावेळी कुठे होतो, हे सांगता येईल का? पुन्हा एकदा कालकुपीत बसून आपल्या मृत्यूनंतरच्या भविष्यकाळात फेरफटका मारण्याचे ठरविल्यास आपण कुठे आहोत, हे तरी सांगता येईल का? स्पष्ट सांगायचे तर आपण कुठेही नाही. एके दिवशी आपल्या तुटपुंज्या आयुष्याची काही कारण नसताना सुरुवात होते व विनाकारण समाप्तही होते. किती गुंतागुंत व गोंधळ? फक्त आयुष्याचा विचार करण्यासाठी जाणीव नावाची चीज असल्यामुळे असले भंपक प्रश्न आपल्याला सुचत असावेत, असेही वाटण्याची शक्यता आहे. या विश्वाप्रमाणे आपली जाणीवसुद्धा शून्यातून अस्तित्वात येते; वाढत जाते; प्रगल्भ होते; गुंतागुंतीच्या जंजाळात फसते; आश्चर्याचा धक्का देते; चित्रविचित्र, विस्मयकारक गोष्टी करून घेते आणि मृत्यूनंतर नष्ट होऊन जाते.

तरीसुद्धा यासंबंधी आपल्याला अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात. मुळात ही जाणीव नावाची चीज अस्तित्वात आहे का? शून्यातून ती कशी काय जन्म घेऊ शकते? ही जाणीव मृत्यूनंतर कुठेतरी असण्याची शक्यता आहे का? मुळात ही जाणीव म्हणजे नेमके काय असते?

या व यासंबंधातील इतर अनेक प्रश्नांना उत्तर शोधणे तितकेसे सोपे नाही. तुम्हाला कुणीतरी कुत्रा असणे म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारल्यास तुमची प्रतिक्रिया काय असू शकेल? कदाचित तुम्हाला कुत्र्याचे भुंकणे, राखण करणे, ईमान राखणे या गोष्टी आठवतील. परंतु या प्रश्नाचे हे उत्तर होऊ शकत नाही. त्या सर्व कुत्र्याबद्दलच्या बाह्य गोष्टी आहेत. मुळात कुत्र्याला आपले कुत्रेपण कशात आहे हे कधीतरी कळू शकेल का? कदाचित यातूनच जाणीव या संकल्पनेचे रहस्य उलगडता येऊ शकेल.

जाणिवेची उकल करण्यासाठी नसवैज्ञानिक व तत्त्वज्ञ एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत, असे वाटते. एकाला जाणीव हे मेंदूचे वैशिष्ट्य असून मेंदूतील चेतापेशींची कार्यपद्धती समजून घेतल्यास जाणिवेसंबंधीचा तिढा सुटेल, असे वाटत आहे. परंतु दुसऱ्याला मात्र याबद्दल दाट शंका आहेत. त्याच्या मते ते तितकेसे सोपे नाही. फक्त जाणीव ही मेंदूतून उद्भवते, याबद्दल त्यांच्यात एकमत आहे. कुत्र्याचे कुत्रेपण समजून घेण्यासाठी कुत्र्याच्या मेंदूच्या अभ्यासातून काही कळणार नाही याविषयी मात्र टोकाची मते आहेत. म्हणूनच जाणीव हा एक न सुटणारा गुंता आहे व (आजतरी!) वैज्ञानिकरीत्या याबद्दल कुठलेही ठाम विधान करता येत नाही. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी त्यासंबंधातील काही छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्यास उत्तर मिळण्याची शक्यता वाढू शकेल.

खोलात जाऊन याविषयी प्रयोग केल्यास मेंदूतील स्थित्यंतरावरून जाणीवजागृतीचे संकेत मिळतात, हे लक्षात येईल. जाणीव होत असताना मेंदूवरील काही ठिकाणचे पृष्ठभाग कार्यरत होतात व जाणीव नसताना सुप्तावस्थेत जातात. मेंदूच्या frontal आणि parietal lobe असलेला भाग आपण मुद्दामहून डोळ्यांची उघड-मीट करताना कार्यरत होताना दिसतात. काही अपरिचित शब्दांचा अर्थ शोधतानासुद्धा मेंदूचा काही पृष्ठभाग उद्दीपित होतो हे वैज्ञानिकांच्या लक्षात आलेले आहे. जाणिवेशी संबंध नसलेल्या अनुभवांची प्रक्रिया visual cortex या मेंदूच्या भागावरून होत असते. परंतु जेव्हा ही माहिती जाणिवेच्या पातळीवर जाते तेव्हा मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींचे जाळे कार्य करू लागतात.

परंतु या विधानावर अनेकाचा विश्वास नाही. हे जाळे जाणिवेचे स्पष्टीकरण देत आहे की जाणिवांबद्दलचे संकेत देणारी व्यवस्था आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरीसुद्धा जाणीव ही संकल्पना मेंदूशी निगडित आहे याबद्दल दुमत नाही. जर हेच खरे असेल तर आपल्या जन्माच्या वेळी ही जाणीव – त्याचे प्रमाण अत्यंत कमी असले तरी – अस्तित्वात असते असे म्हणता येईल. मृत्यूनंतर या जाणिवेचे काय होते या प्रश्नाला लौकिकार्थाने मेंदूचा मृत्यू झाल्यानंतर स्व-भान ही गोष्ट अस्तित्वात असू शकणार नाही हेच उत्तर असू शकेल.

या गोष्टी संभवनीय नसतीलही. परंतु अशक्यातल्या नाहीत. मुळात जाणीव ही अत्यंत गुंतागुंतीची माहितीसंकलनाची प्रक्रिया असून त्याचा संबंध मेंदूशी असतो. भविष्यकाळात मेंदूप्रमाणे माहितीचे संकलन करू शकणारे व त्या माहितीचे योग्य विश्लेषण करत निर्णय घेऊ शकणारे एखादे मशीन तयार करणे शक्य झाल्यास हे मशीन जाणीव व स्व-भानसुद्धा हुबेहूब तयार करू शकेल. व हे मशीन तुमच्या (वा तुमच्या मेंदूच्या) मृत्यूनंतरही कार्यरत राहील.

तरीसुद्धा या मशीनला कुत्र्याचे कुत्रेपण कशात आहे (किंवा तुमचा स्वभाव म्हणजे नेमके काय) हे कधीच सांगता येणार नाही!

क्रमशः

या पूर्वीचे
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (1) , प्रश्न (2), प्रश्न (3), प्रश्न (4), प्रश्न (5)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे काहीसं ‘कि त्वम् असि?’ सारखं झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0