इंग्लिश मॅडम!

केंद्र शासनाच्या सेवेत सरकारी कर्मचा-याच्या तब्येतीला सोसेल इतपत कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम भोईरची बदली झाली. नवीन ठिकाण होतं बेळगाव जिल्ह्यामधल्या हुक्केरी तालुक्यातलं एक गाव. नकाशा तपासल्यावर गावाचं निश्चित ठिकाण समजलं. समक्ष जाऊन राहण्याची वगरे व्यवस्था प्रथम करावी म्हणून तो एकटाच बदलीच्या गावी जाण्यासाठी निघाला.
‘‘मुलांच्या शाळेचंही बघा. शक्यतो गावातच. शहरात एकटी कशी राहतील?’’ पुरुषोत्तमच्या बायकोनं आठवण करून दिली.
गावात जागा सहज मिळून गेली. रात्री जेवण झाल्यानंतर घरमालकाशी गप्पा सुरू झाल्या.
‘‘गाव लहानच दिसतंय. गावातली मुलं शालेय शिक्षणासाठी बेळगावला जातात की कोल्हापूरला?’’
‘‘गावातच असतं की शाळा. कशाला करता हो काळजी, उत्तमरावऽ?’’ पुरुषोत्तमचा उल्लेख पुरुषोत्तम असा केवळ शासकीय दस्तावेजातच होतो. मित्रांनी त्याचा पुष्र्या केला. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी, का कोणास ठाउक, पण त्याच्यातला पुरुष कट करून उत्तमराव असं सुटसुटीत पण भारदस्त पश्चिम महाराष्ट्रीय नामकरण केलं. हुक्केरीकर सावकारांनीसुद्धा त्याच्यातल्या पुरुषाची दखल घेतली नाही.
‘‘अरे वा! कितवीपर्यंत आहे शाळा? म्हणजे फक्त प्राथमिक की माध्यमिकसुद्धा?’’
‘‘धावीपर्यंत असतं की हो. इलेक्शन झालं की जूनेर कालेज काढणार अप्पासाहेबऽ.’’
‘‘कोण अप्पासाहेब?’’
‘‘येमेले हो आमचं. होतंय बघा यंदाच्या खेपेला मिनिष्टरऽ.’’ बेळगावी मराठीत सगळेच स्त्रीपुरुष नपुंसकिलगी! प्रथम कानाला खटकलं, पण नंतर पुरुषोत्तमला सवय झाली.
‘‘विद्यार्थी कसे आहेत?’’
‘‘गावरान पोरगे हो. हुंब असतंच की. घेता का पाऽऽनऽ?’’
‘‘राग मानून घेऊ नका, सावकार. परवाच पेपरमध्ये वाचलं की शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत पासष्ट देशांमध्ये भारत शेवटून दुसरा आला. चीन पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या पंधरा वर्षाच्या मुलांना साधं गणित सोडवता येत नाही आणि व्याकरणदृष्टय़ा शुद्ध वाक्य धडपणे बनवता येत नाही. एकूण भारताची ही सरासरी परिस्थिती आहे. मग गावातल्या शिक्षणव्यवस्थेची काय अवस्था असेल म्हणून विचारलं.’’
‘‘मी काय म्हणतं, सोडा की हो एक पान खाऊनऽ. चालत नाही का तंबाकू?’’
‘‘शाळेचे वर्ग, ग्रंथालय, प्रयोगशाळा व्यवस्थित हवी. शिक्षक-शिक्षिकांची गुणवत्ता चोख हवी. आता तर जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचंही महत्त्व वाढलंय.’’
‘‘काळजीच करायची नाही हो इंग्लिशचं, उत्तमरावऽ. आपल्या शाळेत थेट इंग्लिश मॅडमच आणून सोडलं की हो आमचं अप्पासाहेबऽ. आता बोला. आजूबाजूच्या धा गावात नसतं ते असतं आमच्याकडं.’’
‘‘काय सांगता सावकार? इथल्या शाळेत इंग्लिश मॅडम शिकवतात?’’
‘‘मग? मनात आलं की करूनच सोडणार बघा अप्पासाहेबऽ.’’
‘‘अरे वा! पण तुमच्या या छोटेखानी गावात नवीन इंग्लिश मॅडमचं बस्तान नीट बसलं का?’’
‘‘करतंय कुरकुरऽ. इंग्लिश मॅडम काय आणि कोल्हापुरी चप्पल काय, सारखंच की हो दोन्ही. नवीन असतं तंवर कुरकुरतं. जुनं झालं की मग हवं तसं फिरवून सोडा की हो.’’
इंग्लिश मॅडमला फिरवून सोडून द्यायच्या सावकारी कल्पनेनेच पुरुषोत्तम दचकला. पण या गावात आपल्या मुलांना साहेबाची भाषा साहेबाची मॅड्डमच शिकवणार या माहितीनं सुखावला. कर्नाटकी आडगावात बदली झाली म्हणून कातावलेल्या बायकोला भरघोस दिलासा मिळणार होता. इतक्यात त्याच्या मनात आलं की परदेशी शिक्षिकेचं ओरिजनिल इंग्लिश उच्चार आपल्या मुलांना समजतील की नाही. इकडच्या मुलांचा काय अनुभव?
‘‘जरा जड आहे हो हे नवीन मॅडमऽ.’’ सावकारांनी तोंड वाकडं करत सांगितलं.
‘‘बाई स्थूल आहेत का?’’
‘‘आँ! आहेत, आहेत. अहो, बाय म्हटलं की ते टुमटुमीत असतंच की हो आमच्या गावातलं. त्याचं काय आहे, उत्तमरावऽ, बेळगावी दूध-लोणी-तूप म्हणजे एकदम एक नंबरी बघा. आमचं लेडी टीचरच घ्या हो. येताना किडकिडीतऽ असतं. दोन महिन्यात अंग धरतंय बघा. तरी पण, का केलं हो असलं अडनाडं चवकशी आमच्या बायांचं तुम्ही उत्तमरावऽ?’’
‘‘नाही. तसं नव्हे, सावकार. तुम्ही इंग्लिश मॅडम जड आहेत असं म्हणालात म्हणून सहज विचारलं.’’
‘‘अरे वा! रंगलं की हो दोन मिनिटात आमचं बेळगावी विडा तुमच्या तोंडातऽ. वा! हां, तर आपलं इंग्लिश मॅडम म्हणाल तर खरंच भारी हो. पेलत नाय हो पोरांना अजूनऽ. शिक्षकांचंही घाम निघतं बघा. पाऽपऽ!’’
‘‘पे पे पेलत नाही इंग्लिश मॅडम म्हणजे?’’ पुरुषोत्तम ततपप करायला लागला. सावकारानी हे पाप असंही म्हटलं म्हणजे काहीतरी भानगडीचा मामला असणार हे नक्की.
‘‘पण लावतात जोरऽ. बघू की. जाईल सावकाश जमून हो. नको तिथं घाई केलं तर नुकसानच होतं, उत्तमरावऽ.’’
पुरुषोत्तम डोळे मिटून विचार करू लागला. ठोस काही सुचेना. पण, काही टग्या पोरांच्या नादाला लागून आपली सदगुणी मुलं शिक्षकांच्या साहाय्यानं एका धष्टपुष्ट फिरंगी महिलेच्या वेटलिफ्टिंगचा प्रयत्न करताहेत, आणि ते न जमून धपकन पडताहेत असं चित्र पुरुषोत्तमच्या डोळ्यांसमोर झर्रकन तरळलं.
‘‘त्या मानानं आमच्याकडचं मराठी मॅडम एकदम हलकं बघा. पोरं खुश असतात. पण तुम्हाला इंग्लिश मॅडममध्येच आहे ना इंटरेस्टऽ? झोपा आता. उद्या सकाळी आपण जाऊ बघायला इंग्लिश मॅडमऽ.’’
हा प्रस्ताव पुरुषोत्तमला योग्य वाटला. मॅडमशीच समक्ष बोलून अंतिम निर्णय घ्यावा हे उत्तम!
‘‘सावकार, सकाळी लवकरच निघूया. पायी पायी चालत जाण्याच्या अंतरावर आहे का?’’
‘‘मग? शिक्षण संस्थेचं जागा खूप मोठ्ठं असतं की. आत एका बाजूला इंग्लिश मॅडमसाठी बिल्डिंगऽ बांधून सोडलं बघा अप्पासाहेबऽ. मच्छरदाणीसुद्धा लावलंय बरं का. झोपायच्या खोलीत हो तुमच्या.’’
धास्तावलेला पुरुषोत्तम आता जरा सलावला. थेट इंग्लंडहून आणलेली शिक्षिका आहे. संस्थेच्या आवारातच तिच्यासाठी एक स्वतंत्र बंगला बांधला आहे. गावातल्या मंडळींना आणि मुख्य म्हणजे अप्पासाहेबांना शिक्षणाची खूप तळमळ आहे हेच यातून स्पष्ट होतं असं त्याला वाटलं.
सकाळी सावकार पुरुषोत्तमला घेऊन शाळेकडे गेले. मेन गेटवरचा बोर्ड दाखवून म्हणाले, ‘‘वाचा.’’
‘‘मॉडर्न हायस्कूल.’’ पुरुषोत्तमनं वाचलं.
‘‘आता हे वाचा.’’ आत जाऊन डावीकडच्या इमारतीवरचा बोर्ड दाखवत सावकारांनी आज्ञा केली.
‘‘इंग्लिश मिडियम.’’ पुरुषोत्तमनं वाचलं.
‘‘हे आमचं इंग्लिश मॅडम बरं का. वेलकमऽ. या की आतऽ.’’
पुरुषोत्तमनं कपाळावर हात मारला.
‘‘आणि राइट साइडला जुनं बिल्डिंगऽ दिसतंय ना ते आमचं मराठी मॅडम.’’

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

बेळगाव-निपाणी-सदलगा-बेडकीहाळ अशा सीमारेषेवरील भागातल्या भाषेतला हा गमतीदार किस्सा आवडला. कर्नाटकी प्रभावाखालील मराठी लिहिताना ती अतिशयोक्त होण्याची भीती असते. तसे इथे झाले नाही, हे बघून बरे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हा हा हा!
शेवटपर्यंत तागास तूर लागु दिला नाहित! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उच्चारांमुळे काय काय गडबड होऊ शकते!

आम्हाला एक बेळगावकडचे कुलकर्णी आडनावाचे शिक्षक होते, गणित शिकवायचे. त्यांची आणि माझ्या वडलांची जुनी कुठलीतरी ओळख होती. एकदा तास संपल्यावर काहीतरी शंका विचारत होते त्यानंतर म्हणे, "ते जोशी, तुमचं वडील भेटलं होतं". हे अचानक मराठी कुठून आलं आणि वडील अचानक "भेटलं होतं". ते भेटलं होतं तर मग मी कुठून आलं वगैरे प्रश्न पडले. पण बेळगावी भाषेची गंमत कळल्यावर मुद्दाम कुलकर्णी सरांशी गप्पा मारायला मजा यायची. पुढे इतर काही बेळगावी-मराठी लोकांशी ओळख झाली. वजन कमी करायचं ठरवलेलं असूनही कधी हळूच मिठाई चोरून खावी तशी या लोकांशी इंग्लिशमधून बोलताना मधेच मराठी गप्पा सुरू करायच्या आणि ऐकत बसायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा...लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0