मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (7)

माणसात ‘स्वत्व’ (self) असे काही असते का?

आपण जेव्हा झोपतो तेव्हा ती नाहीशी होते. जागे होतो तेव्हा परत आपोआप आलेली असते. काही वेळा स्वप्नात येते. काही वेळा स्वप्नच गायब झालेले असतात. हे शरीर माझेच आहे व मीच त्याचे नियंत्रण करत आहे याची जाणीव देणारे असे काही तरी आपल्यात असावे. त्यामुळे आपण आपली वेगळी ओळख पटवून देत असतो. हीच ओळख आयुष्यभर आपली सोबत करते; काही वेळा अनुभवांच्या आठवणीतून व काही वेळा भविष्यात डोकावून. हे सर्व एखाद्या गाठोड्यासारखे वाटते. तेच कदाचित आपल्यातील ‘स्व’ची जाणीव असू शकेल.

गेली हजारो वर्षे या ‘स्व’ ची चर्चा चालू आहे. हे स्व खरोखरच अस्तित्वात असते की निव्वळ भास? अस्तित्वात असल्यास ते कसे आहे, कुठे आहे?
स्वची संकल्पना व अस्तित्वाचे सातत्य कदाचित तत्त्वज्ञांचे विषय असावेत. त्याचा संबंध जाणीव व स्वभान यांच्याशी येत असल्यामुळे आपल्याला त्याची स्पष्ट कल्पना नाही. त्यामुळे आपली आयडेंटिटी कशा प्रकारे प्रकट करून देता येईल हा एक वेगळाच प्रश्न आहे. आजकाल आपण प्रशासनाच्या हातातील बाहुली असल्यामुळे आपल्या बोटांचे ठसे, डोळ्यातील बाहुलींचे फोटो त्यासोबत असलेले सांकेतिक कोड क्रमांक इत्यादी बायोमेट्रिक डाटावरून आपले अस्तित्व सिद्ध होत आहे. सायबर जग व CCTV आपली ओळख करून देत आहे. त्यामुळे आपली आयडेंटिटी इतर कुठल्याही घटकापेक्षा क्रमांकाच्या स्वरूपात असते. इंटरनेटचा वेग वाढत असल्यामुळे आपण आपली ओळख’ लपवत सेकंड लाइफच्या दिशेने प्रवास करत आहोत. ऑन लाइन जगात भरपूर काही करता येत असल्यामुळे आपला वेळ छान जात आहे (व त्याचबरोबर खिसाही रिकामा होत आहे).

या स्वविषयी अनेक तात्त्विक सिद्धान्त रूढ असून हे सिद्धान्त सर्वस्वी वेगवेगळे निष्कर्ष काढत आहेत. एका टोकाला बौद्धसिद्धान्त असून त्या मताप्रमाणे स्व असे काहीच नसून ते केवळ संवेदना व विचारांचे गाठोडे असते. याच्याच विरुद्ध टोकाला कार्ल पॉपरसारखे तत्त्वज्ञ असून त्यांच्या मते स्व ही एक स्वतंत्र जाणीव असून आपल्या मेंदूशी संगनमत करत मेंदूतील क्रिया-प्रक्रियांचे नियंत्रण करत असते. आधुनिक वैज्ञानिक संशोधन मात्र बौद्ध सिद्धान्ताला पुष्टी देत आहे. स्व ही स्वतंत्र संवेदना नसून आपल्या मेंदूतील प्रक्रियेतून उमटलेली ती जाणीव आहे.

एका तज्ज्ञाच्या मते स्वत्व तीन प्रकारांत अस्तित्वात आहे: एक, शारीरिक स्वत्व (ज्याचा संबंध शारीरिक प्रक्रियेशी जोडला जाऊ शकतो), दुसरा मानसिक स्वत्व (ज्याचा उगम आपल्या अनुभवांच्या आठवणीवरून व इतरांच्या स्वत्वाशी आलेल्या संबंधांतून होतो) व तिसरा उच्चपातळीवरील संवेदनातून व्यक्त होणारा स्व (ज्याचा संबंध शारीरिक व मानसिक स्वत्वाशी असतो).

मेंदूतील क्रिया-प्रक्रियांमधून या तिन्ही प्रकारांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शारीरिक ‘स्व’ची जागा मेंदूतील कॉर्टेक्सच्या जवळ पास कुठेतरी असावी. ज्ञानेंद्रियांकडून आलेल्या माहितीच्या आधारे आपले स्थान व शारीरिक ‘स्व’ची ओळख येथे निश्चित होते. काही उलट सुलट माहिती कॉर्टेक्समध्ये गेल्यास चित्रविचित्र भास होऊ लागतात.

एक मात्र खरे की मेंदूच्या कुठल्या भागावरून स्वत्वाचे नियंत्रण होत आहे हे अजून कळले नाही. मेंदूच्या प्रतिमाचित्रावरून कॉर्टेक्सच्या खालच्या बाजूला हे केंद्र असावे असे वाटते. परंतु काही संशोधकांना मेंदूच्या इतर भागातही हे केंद्र असू शकेल, असे वाटते. मेंदूच्या पृष्ठभागावरील बहुतांश ठिकाणी ‘स्व’ची जाणीव होताना दिसते. त्यामुळे मेंदूमध्ये हा ‘स्व’ कुठेही असू शकेल किंवा कुठेही नसेलसुद्धा! याचाच अर्थ हा भास असू शकेल. मेंदूची ही चलाखी असेल. आपल्याला उगीचच आपल्यात स्वत्व आहे व हे स्वत्व आपल्या संवेदना जागृत असेपर्यंत न बदलणारे आहे असे वाटत आहे.

मेंदूतील विकारावरूनसुद्धा स्वत्व बदलत असते हे कळून चुकले आहे. दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा रुग्ण काही करण्याच्या प्रयत्नात असताना त्या कार्याशी आपला काही संबंध नाही अशीच त्याची मानसिकता असते. कदाचित हेच मानसिक आजाराचे लक्षण असावे. इतर प्रकारच्या मनोरुग्णाच्या बाबतीतही अशाच प्रकारचा अनुभव येत आहे. शारीरिक क्रिया व त्यासंबंधी मनात उमटलेले विचार यांचा अर्थाअर्थी संबंध नसल्यासारखीच त्यांची वागणूक असते. अनेक वेळा आपल्या बालपणीच्या आठवणीत वा मोठेपणाच्या आठवणीत विसंगती असते हेही लक्षात आले आहे. आठवणीतील घटनाक्रम बदलता येतात, आठवणी खोट्या ठरवता येतात. घटनांचे वर्णन आपल्या बदलत्या विचारानुसार बदलत जातात.

आपण आपल्या स्वला कितीही चिकटून बसण्याचा प्रयत्न केला तरी ती कायम बदलत असते. एका वर्षापूर्वी आपण जसे होतो तसे आज नाही व एका वर्षानंतरही नसणार. मेंदूची ही चलाखी आपल्यात आपली अशी स्वतंत्र स्व आहे असे उगीचच भासवत असते.

क्रमशः
या पूर्वीचे
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (1) , प्रश्न (2), प्रश्न (3), प्रश्न (4), प्रश्न (5) , प्रश्न Diablo

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet