शाळेतल्या काही आठवणी

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ललित #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

शाळेतल्या काही आठवणी
- Sandipan

मागे एक सिनेमा पाहिला होता 'किल्ला' नावाचा. कळत्या नकळत्या वयातल्या मुलाला आईच्या बदलीमुळे गाव आणि शाळा बदलावी लागते आणि त्यामुळे त्याच्या भावविश्वात जी उलटापालट होते ती संयतपणे या सिनेमात दाखवली आहे.

मॉडर्न हायस्कूल, साखराळेमुळे साधारण तसंच काही माझ्याबाबतीतही झालं होतं. गावात बालपण आणि जवळच शाळा असं मस्तपैकी चाललं असताना अचानक वडलांनी “टेक्निकल एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन” म्हणून सातवीनंतर मला मॉडर्न हायस्कूलला टाकले. खरं तर मला सध्याची शाळा, गाव, मित्र वगैरे वगैरे सोडून अजिबात जायची इच्छा नव्हती. परंतु वडलांपुढे काही चाललं नाही; पण का कोण जाणे मीही त्यावेळेला टोकाचा विरोधही केला नाही. असो.

तर अशा पद्धतीनं मी मॉडर्न हायस्कूलला दाखल झालो.

हळूहळू शाळा-अभ्यास-खेळ यांमध्ये नाईलाजानं का होईना रमू लागलो. ज्या टेक्निकलसाठी आलो होतो त्याचाच इलेक्ट्रिकल मेंटेनन्स असा ट्रेड घेतला. आणि प्रॅक्टिकल करताना असं लक्षात आलं की वायरचे जॉईंट मारायला काय आपल्याला जमत नाही. वायरिंग करताना ठोकाठोकीपण काही जमत नव्हती. प्रत्यक्ष काम न करता कागदावरमात्र सगळं जमायचं. इंजिनियर होण्यासाठीची हीच तर पायाभरणी झाली होती की काय अशी शंका येते.

तर हळूहळू मित्र होऊ लागले. घरातून भांडून सायकलवरूनच यायचं, असा हट्ट करून घेतला. त्यामुळे अजूनही मला आठवतं की भली मोठी २४ इंची सायकल घेऊन, त्यावर नळीच्या खालून पाय घालून हाफ पॅडलिंग करून शाळा गाठायची. शाळेची गंमत काही वेगळीच होती; किंवा गावातून खेड्याकडे माझा प्रवास झाल्यामुळे मला तशी वाटली असेल. माझ्या गावच्या शाळेत म्हणजे इस्लामपूर हायस्कूलमध्ये असताना जास्तीत जास्त मित्र हे पांढरपेशा घरांतून आलेले होते; पण मॉडर्न हायस्कूलला मात्र वर्गातली पोरं म्हणजे... रानावनात वाढलेली, मोकळी हवा खाल्लेली पोरं.

तसे वर्गात आपसूकच तयार झालेले काही ग्रुप होते. राष्ट्रवादी काँग्रेससारखा कॉलनीतल्या मुला-मुलींचा उच्चभ्रू ग्रुप. साखराळे आणि आसपासच्या खेडेगावांतून आलेल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांचा ग्रुप; राष्ट्रीय काँग्रेससारखा. आणि बीजेपीसारखे इस्लामपुरातून आलेले आमच्यासारखे बिगरशेतकरी काही. आमच्यामध्ये ना शिवसेनेसारखी दांडगाई होती ना मनसेचा तात्त्विकपणा!!

आणि इथली विशेष बाब म्हणजे गांधी टोपी. खरं तर गांधी टोपीची लाजच वाटायची. पण शाळेचा नियम. शाळा सुटल्यावर सायकल मारत मारत घरी जाताना जुन्या शाळेतली मुलं-मुली आम्हांला टोपीत पाहायचे आणि हसायचे. त्यावेळी लाज वाटायची. मग आम्ही इस्लामपूर यायच्या आधीच टोपी काढत असू आणि खिशात टाकत असू.

अर्थातच टोपीचा एक फायदा आहे, असं मला चार-पाच दिवसांतच एकानं सांगितलं. मी म्हणालो काय? तर त्यानं प्रात्यक्षिक करून दाखवलं. खेळून दमल्यानंतर डोक्यावर टोपी असताना हाताचे दोन्ही तळवे डोक्यावर ठेवून तशीच टोपी खाली घ्यायची आणि पूर्ण तोंड पुसायचं आणि तशीच पटकन पुन्हा डोक्यावर ठेवायची. रुमालाची वेगळी गरजच नव्हती! !सुरुवातीला मला हे अनहायजेनिक वाटलं परंतु मी कालांतराने यात पारंगत होत गेलो!

आज आठवायला गेल्यावर सगळ्या आठवणी थोड्याशा धूसर वाटतात पण काही आठवणी मात्र कॅमेऱ्याच्या फ्लॅशसारख्या चमकून जातात. त्यांपैकी ही एक.

फुलपॅन्ट पुराण

मुलांची मूळ मागणी ही होती की गांधी टोपीलाच तिलांजली द्यावी तसेच हाफपॅन्टऐवजी फुलपॅन्ट करावी.

शाळकरी मुलं

हा विषय निघाला दहावी निम्मी झाल्यावर. अर्थातच या असंतोषाची बीजं एक-दोन वर्षं आधीच रूजत असावीत. परंतु हळूहळू विषय पेटत गेला आणि त्यानं उग्र स्वरूप धारण केलं.

अ-तुकडी-ब-तुकडी अशा मिटिंगा झाल्या, की आपण संप करायचा. आणि संपाचं स्वरूप म्हणजे काय तर प्रार्थना झाल्यानंतर वर वर्गाकडे जायचंच नाही. आपल्या जागेवरच उभं राहायचं आणि आपला निषेध नोंदवायचा.

त्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. सगळीकडे कागद फिरू लागले. माझ्याकडे सहीला कागद आल्यानंतर मी म्हणालो, “आता दहावीला सहाच महिने राहिले आहेत तर तेवढ्यासाठी कशाला खर्च? नंतर आहेच की फुलपॅन्ट.” पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. तर भांडणं झाली. मी सही करत नाही, असं लाल राजाला कळलं. लाल राजा म्हणजे वर्गातला एक पिळदार शरीरयष्टीचा आडदांड मुलगा होता. मला बाकीच्या मित्रांनी सांगितलं होतं की तो रानात नेऊन मारतो झाडाला बांधून. मी घाबरून गेलो होतो मनातून, पण माझा हट्ट सोडला नव्हता.

त्या दिवशी जेवण करत असताना निरोप आला की तुला लाल राजानं बोलावलं आहे. मी रागात होतो. मी उलटा निरोप पाठवला की काम असेल तर मला त्यानं येऊन भेटावं. नंतर लाल राजा आणि त्याची गँग येऊन माझी कॉलर पकडून मला धमकी देऊन गेली. खरंच मनातून भीती बसली होती की कुठल्या रानात नेऊन मारतील का काय आपल्याला! त्यानं तशा इतर मुलांबरोबर केलेल्या स्टोऱ्या मुद्दामहून मला रंगवून सांगितल्या.

काही मवाळ मित्रही माझं मतपरिवर्तन करण्यात गुंतले होते. त्यांनी मला बाजूला घेतलं आणि समजावून सांगितलं, “अरे संदीप, तू अजून लहान आहेस. बघ बरं, तुझ्या पायावर अजून केसही आले नाहीत. म्हणून तू फुलपॅन्टसाठी नाही म्हणत आहेस. पण तू आमचे पाय बघ!” पायांवर केस येणं हा फुलपॅन्ट मागण्याचा क्रायटेरिया कसा काय होऊ शकतो हे मला त्यावेळी पटलं नाही. परंतु पाचवीच्या मुलांपासून ते दहावीच्या मुलांपर्यंत सह्या असलेलं कागदाचं बाड तयार झालं. मला वाटतं, ते आमची मागणी आहे म्हणून शाळेत सबमिटही केलं गेलं.

आता संपासाठी आवश्यक होतं ते प्रार्थनेची घंटा संपल्यानंतर वरच्या वर्गात न जाणं. पण इथेच खरी मजा झाली. माझी उंची कमी असल्यामुळे आणि दहावीला असल्यामुळे उजवीकडच्या पहिल्या रांगेत मी उभा असायचो. आणि प्रार्थना संपल्यावर बेल झाली की वर जायची सूचना मिळताच पटकन वर्गात जायला पुढे जायचो. त्यामुळे बाकीच्या मुलांना नाईलाजाने माझ्या मागे यावं लागायचं. मी असं करू नये आणि तिथेच थांबावं, आणि मग ह्या विषयाला एकदाची वाचा फूटेल, असं एकंदरीत प्लॅनिंग होतं. परंतु मी ते प्लॅनिंग साधारण आठवडाभर फेल करत होतो. त्या काळातच मला, ‘उद्या तू जायचं नाही, जागेवरच थांबायचं; नाही तर पाहा’, अशा स्वरूपाच्या धमक्या यायला लागल्या. एक दिवस काय झालं काय माहीत! मी त्या दिवशी पुढे उभा नव्हतो, की स्वतःहूनच थांबलो, की कुठे तरी मागं उभारलो होतो. पण बरोबर संप झाला. कुणीच जागचे हलले नाहीत. पहिलीच रांग न गेल्यानं संपूर्ण शाळाच तशी उभी राहिली. बेल दिली तरी मुलं का जात नाहीत, म्हणून सर प्रचंड रागावले. परंतु पूर्ण ग्राउंडवरची मुलं तशीच उभी राहिली.

मग पाहिलं तर बहुतेक समोर प्रार्थना घ्यायला हजारे सर होते आणि त्यांच्या हातात सगळ्या मुलांनी सह्या केलेल्या कागदांचं बाड. त्यामुळे सर्व सरांना हा विषय समजला असणार. मग सरांनी "पाचवीच्या मुलांपुढे तुम्ही हाच आदर्श ठेवणार काय... गांधी टोपीची लाज वाटायचं कारणच काय... अभ्यासात लक्ष न देता हे कुठले चाळे... " अशा स्वरूपाचं काही तरी सात्विक भाषण करून चक्क सर्वांच्या समोर त्या सह्यांच्या कागदांना आग लावली. (काडेपेटी कुठून आली की सर सिगरेट सोडत असावेत अशी शंका नंतर कधीतरी आली होती.!)

अशा तऱ्हेनं आयुष्यातील पहिला लोकशाही संप जुलमी सरकारनं मोडून काढला आणि वर दोन-दोन छड्या देऊन वर्गात पाठवलं. एकीकडे फुलपॅन्टचा खर्च वाचला म्हणून मला त्यावेळी थोडासा आनंद झाला होता . परंतु स्टाईल मारायला मिळणार नाही याचं दुःख दुसरीकडून वाटत होतं.

अर्थातच या संपाची परिणती नेमकी काय झाली, आपल्याला फुलपॅन्ट मिळाली की नाही, गांधी टोपी रद्द झाली की नाही, का आपण सहा महिन्यासाठी फुलपॅन्ट घातली, हेही आता नीट आठवत नाही. परंतु या निमित्तानं मी बरेच दुश्मन तयार करून ठेवले आणि मनात म्हणालो, “हे मला कधीतरी गाठून मारणार”; आणि मुलंही मी कधी तावडीत सापडतो याची वाट बघत होती.

अर्थात याचं कारण म्हणजे माझे वडील. "नेहमी पहिल्या-दुसऱ्या नंबरांत येणारा मुलगा मी या शाळेत घातला आहे तर शाळेचीही काही कर्तव्यं आहेत की नाहीत मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी", अशा अर्थाचा दबाव मुख्याध्यापकांवर वडील अधूनमधून येऊन टाकत असत. त्यामुळे मला कुठल्या मुलानं काही म्हणलं किंवा कसली मामुली जरी धमकी दिली तरी मी लगेच वर्गशिक्षक किंवा मुख्याध्यापकांकडे जाऊन तक्रार करत असे. मग मला माफक संरक्षण मिळत असे.

*

कॅमेऱ्याच्या फ्लॅशप्रमाणे चमकून जाणारी दुसरी आठवण म्हणजे स्काऊट आणि गाईड. आम्हांला विशेष टोपी, बेल्ट आणि गळ्यात घालायचा रुमाल मिळायचा. स्काऊट आणि गाईडचे वेगवेगळे उपक्रम असायचे. खरी कमाई असा एक उपक्रम होता, त्यामध्ये आपण स्वतः पैसे कमवून आणायचे असं टार्गेट असायचं. खरी कमाई करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य व्हायचं नाही. सायकल दुकानदाराला जाऊन विचारलं, “पंचर काढायला हाताखाली थांबू शकतो का” किंवा किराणा मालाच्या दुकानात जाऊन विचारलं होतं “काही काम आहे का”; पण कोणीही कामावर तात्पुरतंसुद्धा ठेवले नाही. (बेरोजगारीचा सिलसिला असा लहानपणापासूनच आहे!) मग घरातूनच पैसे घेऊन वेगवेगळ्या लोकांच्या नावे वेगवेगळी कामं केली असं दाखवून तब्बल पन्नास रुपये शाळेमध्ये जमा केले. त्यासाठीच्या आपण दिलेल्या कारणांमध्ये कोणतं सत्कर्म केलं ते लिहावं लागायचं. आणि हमखास बरेच जण लिहायचे की आंधळ्याला रस्ता पार करून दिला! साठे सर एकदा म्हणाले, “पण एवढे आंधळे कुठून आले?” पण त्यांनाही आतली गोम माहीत होती. हे दर वर्षी असे होत असणार. अशा तऱ्हेनं खोट्या कमाईचीच खरी कमाई करून वेळ मारून न्यावी लागत असे.

आमच्या स्काऊट आणि गाईडची टीम एकदा चार दिवसांसाठी ट्रीपला गेली होती. सायकलवर सगळं सामान बांधायचं; आपण स्वतःच तंबू ठोकायचा; स्वतः स्वयंपाक करायचा; त्यासाठी लागणारं सर्व साहित्य घ्यायचं आणि पूर्णपणे स्वावलंबी जीवन जगायचं, असा एकंदरीत उपक्रम होता. शाळेच्या पुढे दहा-बारा मैलांवर ताकारी नावाचं गाव होतं, त्यापुढे कुठे तरी गेली होती आमची ट्रिप. आम्ही सगळेजण सकाळ सकाळी शाळेत जमून, सायकलींवर सगळं सामान बांधून, ग्रुपनं दुपारी दोन वाजेपर्यंत पोहोचलो होतो. नंतर तिथे तंबू ठोकून स्वयंपाक करायला लागलो होतो.

वेगवेगळे ग्रुप करण्यात आले होते. आमच्या ग्रुपमध्ये नंदकिशोर आमचा कॅप्टन होता. बरोबर महेश, संजय इत्यादी होते. अचानक कळलं की आपल्या संघाला काही नाव द्यायचं आहे. सर्व संघांनी गजराज, अश्वराज, व्याघ्र अशी भारदस्त नावं ठेवली. परंतु आम्हांला काहीच सुचलं नाही. त्यामुळे आम्हांला श्वानसंघ असं नाव देण्यात आलं. रात्री शेकोटी कार्यक्रमाला जमताना आपापल्या संघाच्या नावाप्रमाणे आवाज काढत सर्वांनी एकत्र जमायचं असायचं. बाकी संघ वाघ-सिंहाची डरकाळी फोडत; हत्तीच्या चित्काराचे आणि घोड्याच्या खिंकाळण्याचे आवाज काढत एकत्र यायचे. अशावेळी आम्ही मात्र भो-भो करत श्वानाप्रमाणे एकत्र जमायचो. त्यात नंबर वगैरे काढायचे होते. अर्थातच आमचा नंबर काही आला नाही.

रानात सोडलेल्या पाण्यावर भर दुपारी कपडे धुवायला जात असताना मित्रांनी अडवलं. “शाळेत असताना सरांच्या लय पुढंपुढं करून आमची नाव सांगतोस… आता कुठे जाशील? आता तुला कोण वाचवेल?” असं विचारल्यावर मी पण घाबरून गेलो होतो. पण जरा दमदाटी करून मला सोडून देण्यात आलं.

नंतर चार वाजता कोणीतरी महत्त्वाचे राष्ट्रीय नेते वारले म्हणून अचानक आमची मोहीम रद्द करण्यात आली. राष्ट्रीय नेते वारल्याचं खरंच दुःख झालं कारण बाकी काही असलं तरी त्या उपक्रमात फार मजा यायची. स्वयंपाक करणं, तंबू ठोकणं, एकत्र काम करणं, यांमुळे चांगली मैत्री होत होती. रात्री एकत्र झोपत असल्यामुळे गप्पांची देवाणघेवाण व्हायची.

*

जुनी शाळा वगैरे सगळं सुटलं होतं आणि मी मॉडर्न हायस्कूलवासी झालो होतो. परंतु अधूनमधून एखादा झटका यायचा. प्रश्नमंजुषा कार्यक्रमाला नाव नोंदवायचं असा सरांचा एकदा खूप आग्रह झाला आणि मी वैतागून गेलो होतो. मला आणखी काही विशेष अभ्यास करायची इच्छा नव्हती. पण घरातून आणि शाळेकडून, दोन्हींकडून जबरदस्ती सुरू झाली. एक दिवस सायकलवरून शाळेला येत असताना शाळेच्या रोडवर कडेला एका शेतात वडाच्या झाडाखाली ग्रुपन मुलं खेळत असलेली दिसली आणि मी पण तिथे रमून गेलो. एक आठवडा तिथेच काढला! घरी सांगायचो, शाळेत जातो आणि शाळेत आधीच सांगून ठेवलेलं असायचं की आजारी असल्यामुळे मी आठवडाभर येणार नाही. दररोज सकाळी डबा वगैरे घेऊन बाहेर पडायचो शाळेच्या वेळेत. वडाच्या झाडाला दप्तर अडकवायचं आणि तिथल्या पोरांबरोबर खेळत दिवस काढायचा. तिथेच डबा खायचा आणि वर्गातली बाकीची पोरं घरी जाताना दिसली की त्यांच्या मागोमाग सायकलने निघायचं. नंतर प्रश्नमंजुषा वगैरे स्पर्धा आटोपल्यानंतरच रीतसर हजर झालो!!

*

असाच दुसरा एक झटका मला अनपेक्षितपणे बसला. टेक्निकलचे काही तास वगळता मुलामुलींची तुकडी एकत्रच असायची. आणि आमच्या वर्गातल्या दहा-बारा मुली कायम ग्रुपनंच फिरायच्या. एक दिवस मधल्या सुट्टीत मी व्हरांड्यातील कट्ट्यावर निवांत पाय हलवत बसलो होतो. आणि मुलींचा ग्रुप आत वर्गात असताना एका मुलानं मुलींना टोमणा मारला, "आज जास्तच नखरा केला आहे", अशा अर्थाचा. त्यावर मुली एकदम चिडल्या आणि एकदम माझ्याकडेच मुलींचा ग्रुप चालत आला. आणि मला म्हणाल्या, "पायातली सँडल बघितली नाही का?" पहिल्यांदा मी तर अवाकच झालो. नंतर लगेच मला एकदमच राग आला. त्या रागात मी काहीच बोलू शकलो नाही. त्यामुळे माझा चेहरा चोरी पकडल्यासारखा झाला आणि त्यामुळेच सर्वांची खात्री पटली की मीच टोमणा मारला असावा. मी भानावर यायच्या आतच मुलींचा ग्रुप पुन्हा वर्गात गेला. खरं तर, 'तो मी नव्हतोच' असं मी नंतरही सांगू शकलो असतो. परंतु मुलींबरोबर बोलण्याचं तेवढं धाडस कुठलं. पण तो विषय बराच वेळ डोक्यात राहिला होता.

*

शनिवारी सकाळी लवकर शाळा सुटायची त्यावेळेला एकदा अभिजीतनं बोलवलं होतं, “आमच्या कॉलनीत क्रिकेट खेळायला ये”, म्हणून. म्हणून मग शाळा सुटल्यावर परस्पर मी तिकडेच गेलो. आणि संध्याकाळी चार-पाच वाजेपर्यंत तिथेच खेळत राहिलो. तिकडे दुपारी घरात माझी वाट बघत होते. मी आलो नाही म्हणल्यानंतर तास-दोन-तास वाट बघून आईनं नाईलाजानं एसटीनं शाळा गाठली. तिथल्या शिपाई काकांना घेऊन शाळेचे वर्ग, राम मंदिर, वर्कशॉप इत्यादी परिसर पालथा घालून कॉलनीच्या ग्राउंडवर आली. तेव्हा मी तिथे सापडलो. मग मोठ्यानं झापत झापत माझी मिरवणूक घरापर्यंत निघाली. रात्रीही वडलांनी रागावून विचारलं, की कोण असा तुझा मित्र होता की ज्याच्या सांगण्यावरून तू घरची न काळजी करता गेलास? "अभिजीत मोहनराव पाटील" असं पूर्ण नावात उत्तर दिल्याचं अजूनही आठवतं!!

शनिवारी सकाळी लवकर शाळा सुटल्यानंतर संजयच्या – म्हणजे चेंज्याच्याही – घरी गेल्याचं आठवतं. एकदा नाही तर दोन-तीनदा. त्यावेळी त्याच्या घरातल्यांनी केलेला लाड अजूनही आठवतो. त्यावेळी अनुभवलेलं रानात सकाळी दहाच्या दरम्यान पडलेलं कोवळं ऊन अजूनही मनाच्या एका कप्प्यात आहे!! जणू तसे कोवळे ऊन आजपर्यंत पुन्हा कधी पडलंच नाही.

*

आमच्या शाळेत एकदा इन्स्पेक्शन होतं. त्यावेळी आमचे वर्गशिक्षक साठे सर होते. ते मराठी शिकवायचे. इन्स्पेक्शनसाठी शाळेची तयारी ते करत होते. "आम्ही शाळेत लायब्ररी चालवतो आणि मुलांना अवांतर पुस्तकं वाचायला देतो", असे चेकिंग करणाऱ्या अधिकाऱ्याला दाखवायचं होतं म्हणून त्यांनी शाळेतील बंद पडलेली लायब्ररी सुरू झाल्याचं दाखवून प्रत्येकानं दोन-दोन पुस्तकं वाचली आहेत, अशा पद्धतीचे रेकॉर्ड तयार केला! दोन-तीन मुलांची टीम एक-दोन दिवस तेच काम करत होती. मग पुस्तक घेतल्याच्या आणि परत केल्याच्या एन्ट्र्यांवर सर्वांनी सह्या करायच्या होत्या. 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलपटे उचलणार नाही अगदी ह्या धर्तीवरच नव्हे', परंतु मी जरा घाबरतच सांगितलं, “मी पुस्तक वाचलं नाही त्यामुळे मी सह्या करणार नाही.” त्यावर साठे सरांनी "लय मोठा शहाणा आला, इकडे दे त्याची मी सही करतो", असं म्हणून माझ्या सह्या मारल्या व माझ्या प्रामाणिकपणाचा क्षणार्धात निकाल लावला!!

*

बाकी काही असले तर तरी आमचे एक एक शिक्षक मात्र अवलिया होते. तळमळीनं शिकवायचे. आपल्या शाळेतला मुलगा बोर्डात यावा, निदान केंद्रात यावा यासाठी धडपडायचे. ज्यादा तास घ्यायचे आणि तेही कोणतीही एक्स्ट्रा फी न घेता, हे विशेष. सलगर सर बीजगणित भूमिती शिकवताना फळ्याकडे बघून लिहीत असताना मागे न पाहता वेगवेगळ्या मुलांची नावे घेऊन “अरे लक्ष दे, लक्ष दे” करायचे. त्यांच्या तालात "ए प्लस बीचा वर्ग बरोबर ए स्क्वेअर प्लस... दंगा नको. . टू ए बी प्लस बी स्क्वेअर गप बसा!" आठवलं की हसू येतं.

मला वाटतं हिंदीला शिंदे सर होते. ते प्रत्येक वाक्य वाचून दाखवायचे आणि त्यावरच एक एक प्रश्न तयार करायचे आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मुलांना ते प्रश्न विचारायचे. उदाहरणार्थ हिंदीच्या धड्यात आलेल्या "प्रतिक्रिया जीवन की कसोटी है" या वाक्यावर ते "जीवन की कसोटी कौन सी है?"आणि "प्रतिक्रिया जीवन की क्या है?"आणि "प्रतिक्रिया किसकी कसोटी है?" असे प्रश्न त्यांच्या तालात विचारायचे!!

इंग्लिशच्या शिर्के सरांना मी एकदा शंका विचारली होती; तेव्हा त्यांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी सांगितलं की संध्याकाळी घरी ये माझ्या. मग मी घरी गेलो असता पाहिलं तर ते स्वतःच्या हातानं स्टो वगैरे पेटवून स्वयंपाक करत होते. सगळा स्वयंपाक करतकरतच त्यांनी मला पुन्हा शिकवलं. तब्बल महिना-दोन-महिने. एक प्रकारचा एक्सट्रा क्लास घेतला. आणि तेही कोणत्याही मोबदल्याशिवाय. इतक्या तळमळीनं शिकवणारे कोणी आता भेटत नाहीत. आणखीन एक दुसरे शिक्षक मोरे सर होते, ते इस्लामपूर मध्ये राहत, त्यांनी मला पोहायला शिकवलं.

अशा सगळ्या शिक्षकांनी आमचे शाळेतले दिवस समृद्ध केले. शिवाय मुलांचं मानसशास्त्र विषय वगैरे त्यावेळी प्रचलित नसल्यामुळे आपल्याला बरी वाईट दुनियादारी शिकवली!!

एकंदरीत काय, यानिमित्तानं बऱ्याच मित्र-मैत्रिणींच्या, शाळेतील शिक्षकांच्या, आणि एकंदरीत शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला. सगळ्यांबरोबर शिकताना सर्वांसोबत खेळलेले खेळ, केलेली मजा, झालेली भांडण, पून्हा सगळं विसरून शाळेत, अभ्यासात आणि खेळात रमण्याचे ते दिवस हीच खरे तर शाळेची गंमत आहे.

बऱ्याच आठवणी आहेत, पण ‘थ्री ऑफ अस’ सिनेमातल्या डायलॉगप्रमाणे, “स्कूल की यादें अब पिछले जनम जैसी लगती है।” आठवणी धूसर झाल्यात आणि पाचवी-सहावीतल्या इस्लामपुरातल्या आठवणी आणि आठवी ते दहावीमधल्या मॉडर्न हायस्कूलमधल्या आठवणी एकमेकांत मिक्स होऊन गेल्यात. त्यामुळे लिहिताना बराच गोंधळ उडाला!! पण या निमित्ताने थोड्या काळासाठी का होईना रिक्रिएट झाल सगळं.

***

field_vote: 
0
No votes yet