सोशल मीडिया – एक विश्लेषण

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

सोशल मीडिया – एक विश्लेषण
- आशय गुणे

सोशल मीडियाचा उदय होणे ही जागतिक पातळीवरील एक महत्त्वाची घटना आहे. ती अशासाठी, की सोशल मीडियाच्या व्यासपीठांद्वारे जगातील जवळजवळ प्रत्येकाचे जगणे हे लक्षणीयरीत्या बदलले. सोशल मीडियाच्या उदयाआधी जग एवढ्या मोठ्या पातळीवर जोडले गेले नव्हते. इंटरनेट होते, परंतु त्याचा उपयोग माहिती शोधण्यासाठी, मिळवण्यासाठी केला जात होता. सोशल मीडिया अवतरल्यानंतर त्यात अभिव्यक्ती सार्वजनिक करण्याची करण्याची भर पडली. लोकांचं एकमेकांशी जोडलं जाणं हे या माहितीच्या 'शेअर' करण्यामुळे, देवघेवीमुळे शक्य झाले. मात्र या जोडलं जाण्याने उच्चांक गाठला तो साधारण २०११-१२च्या सुमारास, जेव्हा देशात स्मार्टफोनची लाट आली; दर वर्षाला स्मार्टफोनचं मार्केट अजूनही साधारण ७% दरानं वाढत आहे. त्यामुळे माहिती ही डेस्कटॉपशिवाय, थेट फोनद्वारे मिळू लागली. त्यात व्हॉट्सअ‍ॅप या व्यासपीठाची भर पडल्यामुळे माहितीची देवाणघेवाण खाजगीतही शक्य होऊ लागली. तसं पाहिलं तर आधीही ईमेल या माध्यमाद्वारे आपण माहितीची देवघेव करत होतोच. परंतु ती आपली एक औपचारिक ओळख आहे. मात्र सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपमुळे आपली आणखी एक ओळख तयार झाली, ती म्हणजे सोशल मीडियावरचं खातं किंवा व्हॉट्सअ‍ॅपमधला आपला फोन क्रमांक. ही ओळख मात्र बरीचशी अनौपचारिक किंवा मैत्रीपूर्ण स्वरूपाची म्हणता येईल. या ओळखीद्वारे आपण सोशल मीडियाच्या विश्वात विहार करू लागलो. फेसबुक, ट्विटर (आताचे एक्स), इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांतून व्यक्त होऊ लागलो. फेसबुकवर 'वॉल' (पुढे टाइमलाईन व आता फीड) आणि 'ग्रुप्स' किंवा आताच्या इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅपमधील 'चॅनेल' इथला आपला वावर हे याच नवीन ओळखीचा परिपाक आहे. ही नवीन ओळख ईमेलद्वारे निर्माण झालेल्या ओळखीला समांतर उभी आहे व दोन्ही प्रकारच्या ओळखी घेऊन इथून पुढे आपण वावरणार आहोत.

सोशल मीडियाच्या उदयामुळे इंटरनेटची दोन ढोबळ भागांत विभागणी झाली आहे - माहिती शोधणं आणि अभिव्यक्तीची, नोंदींची देवघेव. माहितीशोधासाठी गूगल, डकडकगो, बिन्ग इत्यादी, तर नोंदींच्या देवघेवीसाठी व्हॉट्सॅप, स्नॅपचॅट, एक्स, इन्स्टाग्राम, इत्यादी समाजमाध्यमं वापरली जातात. यूट्यूब, क्वोरा, रेडिट, ब्लॉग यांसारखे जालमंच दोनही भागांना सामायिक आहेत. परंतु या देवघेवीतही या अनेक बदल घडले आहेत.

खरं सांगायचं तर हा इतिहास २००४-०५पासून मांडता येईल जेव्हा 'ऑर्कुट'चा उदय झाला. आणि तिथून पुढे काही वर्षांतच इतर अनेक सोशल मीडिया विकसित होऊ लागले, आपल्या आयुष्याचा भाग होत राहिले. आणि एकोणीस वर्षांच्या या छोट्या कालावधीत आपल्या आयुष्यात सतत काही बदल घडत राहिले. हे बदल इतके लक्षणीय आहेत, की आपला स्वभाव, सवयी, संपर्क करण्याच्या पद्धती याही बदलत गेल्या आहेत. त्या आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक तर बनल्या आहेतच, परंतु त्या आत्मसात करण्याच्या नादात आपण आधी कसे होतो व आता कसे झाले आहोत हे मुद्दाम अंतर्मुख झाल्याशिवाय कळणार नाही. शिवाय विशिष्ट वयोगट या बदलांना कसे सामोरे गेले किंवा जात आहेत हे देखील पाहणं रोचक आहे.

आज वयाची पस्तिशी ओलांडलेली लोकं २००५ साली नव्यानेच सोशल मीडियाला सामोरी गेली, तेव्हा त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं ते लहानपणीच्या वा शाळा-कॉलेजमधल्या विसरल्या गेलेल्या मित्र-मैत्रिणींशी पुन्हा संपर्क साधणं, पुन्हा मैत्री जोडणं. त्या वेळेस ईमेल आणि मुख्यतः 'याहू मेसेंजर' वापरणारीही पिढी होती, जी तेव्हा कॉलेजात शिकत होती किंवा तीत इंटरनेटला सरावलेली विशीतली ते चाळीशीतली लोकं होती. अशा लोकांसाठी इतके दिवस एकमेकांचे ईमेल अ‍ॅड्रेस मागणं व तिथे संपर्क साधणं किंवा याहू मेसेंजरचा आयडी मागणं हाच जुन्या लोकांशी संपर्क पुनःप्रस्थापित करण्याचा मार्ग होता. या लोकांना आठवत असेल, की याहू मेसेंजरवरील 'चॅट रूम्स'मध्ये अनोळखी लोकांशी बोलणं, नवीन ओळखी करणं असे अनेक प्रयत्न होत. 'ऑर्कुट'ने या प्रक्रियेला थोडी विश्वसनीयता प्रदान केली. चॅट रूममधल्या पलीकडल्या व्यक्तीला तिच्याकडे केवळ 'वेब-कॅम' असल्यास पाहता येत असे. अन्यथा ती व्यक्ती तिच्या आयडीद्वारेच ओळखली जायची. 'ऑर्कुट'मुळे संबंधित व्यक्तीचं स्वतःबद्दल लिहिणं, स्वतःच्या फोटोंची देवघेव करणं शक्य झालं व तिथल्या 'कम्युनिटी' या याहू मेसेंजरच्या 'चॅट रूम्स'चं प्रगत व विश्वसनीय रूप बनलं. पुढे याची जागा फेसबुकवर 'ग्रुप'ने घेतली, जे अजूनही अस्तित्वात आहेत.

सोशल मीडियाच्या इथपर्यंतच्या प्रवासात प्रकर्षाने जाणवणारी एक गोष्ट अशी की ऑर्कुट, फेसबुक, आणि काही प्रमाणात ट्विटर (आताचे एक्स) या जालीय जगात लोकं एकमेकांशी जोडली गेल्यावर पुढे त्यांनी आपापल्या आवडी-निवडींनुसार प्रत्यक्ष जगात भेटणं, मैत्री करणं हे अपेक्षित होतं. त्यामुळे ऑर्कुट व फेसबुकवर आपण एकमेकांचे मित्र होतो; फॉलोअर्स नाही. ती प्रथा कालांतराने निर्माण झाली व सोशल मीडियाचा समुदायवाचक चेहराच मागे पडला. पण त्याचं विवेचन थोडं पुढे करू या. आधी ऑर्कुट, फेसबुक व ट्विटर या व्यासपीठांची आणखी एक विशेषता जाणून घेऊ या.

ऑर्कुट आता अस्तित्वात नाही. परंतु फेसबुक आणि ट्विटर (आताचे एक्स) यांवर व्यक्त होताना आपल्याला आधी लिहिण्याची जागा दिसते. आठवा, फेसबुक आपल्याला विचारतं, "What's on your mind?" तिथे उत्तरादाखल मजकूर टंकण्याची आणि त्यासहित फोटो किंवा व्हिडियो जोडायची सोय आहे. तिथे लोकं अजूनही फक्त मजकूर प्रकाशित करत असतात. म्हणजे प्राथमिक भर असतो तो मजकुरावरच. त्याच्या जोडीला फेसबुकची लोकप्रियता ही पस्तीस-चाळीशीपासून ते थेट सत्तरीतल्या वयोगटापर्यंत पसरलेली पाहता या पिढ्यांच्या प्रतिनिधींवर अजूनही लिहिण्याचे व ते वाचण्याचे संस्कार आहेत असं म्हणायला नक्की जागा आहे.

आता याच बाबतीत फेसबुक व ट्विटरनंतर प्रसिद्धी पावलेल्या सोशल मीडियाकडे पाहिलं, तर आपल्याला एकदम विरुद्ध चित्र दिसेल! ही माध्यमं म्हणजे स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, टिक-टॉक (यावर भारतात बंदी आहे), जी आज जगात सर्वांत लोकप्रिय आहेत. इथे मात्र व्यक्त होताना आधी फोटो किंवा व्हिडियो निवडावा लागतो आणि तो प्रकाशित करायचं ठरल्यावर मगच त्यासोबत लेखी मजकूर जोडला जातो. म्हणजे इथे प्राधान्य फोटो किंवा व्हिडियो या दृश्यमाध्यमाला आहे आणि लिखाणाला दुय्यम स्थान! शिवाय मजकूर अजिबातच न लिहिता केवळ हॅशटॅग (# हे चिन्ह) वापरूनही आपला मजकूर प्रकाशित करता येतो. म्हणजे, आपला फोटो किंवा व्हिडियो चर्चेत ठेवण्यासाठी जे कळीचे शब्द आहेत ते नमूद करताना त्या शब्दांआधी # जोडायचं; उदा: #HappyFaces. ही जालीय दृश्यमाध्यमं तरुण पिढीत अतिशय लोकप्रिय ठरली आहेत. आताचे टिनेजर्स व विशीतली मुलं (विशेषतः शहरी), आणि तिशीच्या सुरुवातीला असलेली पिढी यांच्या सोशल मीडिया वापरण्यावर या दृश्यमाध्यमांचेच संस्कार जास्त झाले आहेत. त्यातही आता ही व्यासपीठं (विशेषतः इन्स्टाग्राम) फेसबुकला मागे टाकत आताच्या पस्तीस ते पन्नाशीतल्या वयोगटांतही लोकप्रिय होत आहेत. हा वापर दृश्य माध्यमांकडे कलण्याचा एक थेट परिणाम म्हणजे लिहिण्याच्या क्रियेकडे दुर्लक्ष होऊन ती मागे पडत जाणे! स्मार्टफोन हा अविभाज्य घटक झाल्यापासून कुठेही गेलो, तरी चटकन फोटो टिपून किंवा छोटा व्हिडियो तयार करून तो फार तर एका वाक्याच्या मजकुरासोबत प्रकाशित करायचा असा विचार लोकं करू लागले आहेत. शिवाय आधी लिहिल्याप्रमाणे, या माध्यमांवर तुमचे 'मित्र' नसतात, तर 'फॉलोअर्स' असतात. म्हणजे जो जिव्हाळा फेसबुकवरल्या गोतावळ्यातल्या वावरात अपेक्षित असतो तो पूर्णपणे संपुष्टात येऊन इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवरचा वावर हा अधिक औपचारिक व स्व-केंद्री झाला आहे. ऑर्कुट आणि फेसबुक यांसारख्या व्यासपीठांवर अनुक्रमे ‘Community’ आणि ‘Group’ यांद्वारे एखाद्या विषयाचा आधार घेऊन लोकांचं भेटणं, एकत्र येणं व तसा समुदाय स्थापन होणं यावर भर होता. तशी कोणतीही सोय या दृश्यमाध्यमांत नाही. केवळ आपण कुणाला 'फॉलो' करतो आहोत आणि कुणी आपल्याला 'फॉलो' करून आपली नोंद पाहू शकतं इतकीच सोय आहे. म्हणजे या व्यासपीठांद्वारे सोशल मीडिया हे एक स्व-केंद्री माध्यम म्हणून समोर आलं आहे. 'आपण'कडून 'मी'चा हा प्रवास लक्षणीय म्हटला पाहिजे. शिवाय ही दृश्यमाध्यमं जसजशी लोकप्रिय होत गेली तसतसे सोशल मीडियातून फोटोही मागे पडले व आता त्यांची जागा रिळांनी (reels) घेतली आहे. या रिळांत १५ ते ४५ सेकंदांचा किंवा क्वचित १ मिनिटाचा व्हिडियो असतो. परंतु हा प्रवासही एकदम झाला नाही. त्यालाही एक कालक्रम आहे.


समाजमाध्यमांची उत्क्रांती

इन्स्टाग्राम लोकप्रिय होऊ लागल्यापासून लिखाणाची जागा दृश्यमाध्यमांनी घेतली हे आपण बघितलं. तिथे सुरुवातीला छोट्या आणि मोठ्या अवधीचे व्हिडियो प्रकाशित करायची सोय होती. आजही आपण इन्स्टाग्रामवर 'live' गेल्यानंतर ते सगळं प्रसारण एक मोठा व्हिडियो म्हणून प्रकाशित करूच शकतो. मात्र या माध्यमावर (आणि एकूण सर्व सोशल मीडियावर) लोकांचं गुंतून राहणं, त्यांचा प्रतिसाद, जो त्या नोंदीवर आलेल्या 'लाईक' व 'कॉमेंट'द्वारे मोजतात, तो फोटो व छोट्या व्हिडियोंना जास्त आढळत गेला. याचा थेट अर्थ असा, की इन्स्टाग्राम वापरणाऱ्या लोकांना एखाद्या अल्प कालावधीच्या व्हिडिओत गुंतणं जास्त आवडत होतं हे वारंवार आढळत गेलं. त्यामुळे इन्स्टाग्रामने एक मिनिटांच्या व्हिडियोवर भर देऊन त्यात नावीन्य आणायचा प्रयत्न केला. एव्हाना हे स्पष्ट झालं होतं की सोशल मीडियावरल्या बहुतांश वापरकर्त्यांचा एखादी नोंद लक्षपूर्वक वाचण्याचा वा पाहण्याचा, म्हणजेच तीत गुंतून राहण्याचा अवधी कमी होत चालला आहे. हा चिंतेचा विषय आहे. कारण एवढ्या मोठ्या पातळीवर वाचण्याची क्षमता (जिच्यात लक्ष देणं सर्वाधिक अपेक्षित असतं) कमी होणं व ती दृश्यमाध्यमातही केवळ मिनिटभर टिकणं हे आपला एकूण स्वभाव, वाढता विचलितपणा याच्याशी थेट संबंधित आहे. इन्स्टाग्रामने मात्र आपले प्रयोग सुरू ठेवले व त्यात 'इन्स्टाग्राम स्टोरी'ने भर घातली. एखादा फोटो किंवा १५ सेकंदांचा व्हिडियो ही केवळ 'स्टोरी' म्हणून २४ तासांसाठी प्रकाशित करायची हा त्यांचा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. या स्टोरीला प्रतिसाद म्हणून आपण स्टोरीकर्त्याच्या इनबॉक्समध्ये आपला निरोप पोहोचवू शकतो. स्टोरीमुळे इन्स्टाग्रामवरचा संवाद सार्वजनिक प्रतिक्रियेपासून खाजगी निरोपापर्यंत पोहोचला आणि सोशल मीडियावरलं संभाषण अधिक स्व-केंद्री झालं. परंतु स्टोरीनंतर जो प्रकार इन्स्टाग्रामने विकसित केला व जो आज सर्वाधिक लोकप्रिय व वेळखाऊ म्हणून सिद्ध झाला आहे तो म्हणजे रील्स! या रिळांच्या व्याप्तीचं जाळं इतकं पसरलं आहे, की ती फेसबुकवरही उपलब्ध आहेत व चाळीशी ते सत्तरीतल्या तिथल्या पिढीलाही त्याचे वेड लागलं आहे.

इतकंच काय, यूट्यूबनेही हा कल लक्षात घेऊन 'यूट्यूब शॉर्ट्स' हा व्हिडियोचा प्रकार विकसित केला व तिथेही मिनिटभराचे व्हिडियो प्रकाशित करायची सोय झाली आहे. मात्र या रिळांनी सोशल मीडियाच्या वापरात एक लक्षणीय बदल केला आहे. आपल्या सोशल मीडियाच्या खात्याशी जोडलेलं अल्गोरिदम आपण ज्या प्रकारची रिळं पाहतो त्यांवर लक्ष ठेवून मग त्याच प्रकारची रिळं आपल्याला सतत दाखवत राहतं. मुख्य म्हणजे तशी रिळं पाहण्यासाठी त्या-त्या रिळांशी निगडीत खात्यांना आपण 'फॉलो' करायला हवं अशी कोणतीही अट आता नाही. उदाहरण द्यायचं झालं, तर समजा मी क्रिकेट, फूड ब्लॉगर्स, जुनी हिंदी गाणी, एखादी बॉलिवूड अभिनेत्री, आणि शास्त्रीय संगीत अशी रिळं पाहत राहिलो, तर मला यांच विषयांशी संबंधित रिळं पुढे सोशल मीडियावर चक्कर मारताना दिसत राहतील, जरी मी त्या रिळनिर्मात्यांना 'फॉलो' केलं नसलं, तरीही. आणि सोशल मीडियावर टाकली जाणारी चक्कर ही किती वरचेवर असते हे आपण जाणतोच! त्यामुळे त्या नोंदी आणि त्यांसंबंधित नोंदी मला सदैव दिसत राहतात आणि मी त्या पाहण्याच्या सापळ्यात अधिक अडकत जातो. हे अडकत जाणं जागतिक पातळीवर सर्वांचंच होत चाललं आहे व सोशल मीडियावर चक्कर टाकण्याची वारंवारता सदैव वाढत जात असल्यामुळे आपली सतत रिळं बघण्याची सवयही पक्की होत गेली आहे. परंतु इथे एक गोष्ट अधोरेखित करायची गरज आहे. ती म्हणजे सोशल मीडियामधून 'मित्र' किंवा 'फॉलोअर' यांचं अस्तित्व मागे पडणं! फेसबुकच्या 'मित्र' या संकल्पनेपासून सुरू होऊन 'फॉलोअर'चा टप्पा गाठून आता आपण सोशल मीडियाच्या स्व-केंद्री वापराकडे वळलो आहोत. यात दर २०-३० सेकंदानंतर पुढचं रीळ अवतरणं, त्यात पुन्हा वेगळाच विषय असणं, ते पाहून झाल्यावर लगेचच वेगळ्या विषयाचं रीळ प्रकट होणं असा प्रकार सुरू झाला आहे. परिणामी व्यक्तीचं 'अवस्थांतर' हे केवळ काही सेकंदांवर येऊन पोहोचलं आहे. त्यामुळे सतत अस्थिर-विचलित मन, लक्ष देण्याची क्षमता कमीकमी होणं, व एका विषयात टिकून राहण्याचा अभाव यांत आपण रुतत जात आहोत का असे प्रश्न पडू लागले आहेत.

रिळांनंतर सोशल मीडियाच्या विश्वात सध्या विकसित होणारा प्रकार म्हणजे वाहिन्या (channels). हादेखील स्व-केंद्रित सोशल मीडियाच्या वापरातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. वास्तविक याचा रिळांशी थेट संबंध नाही आणि हा विकसित होण्यात त्यांचा काही वाटाही नाही. परंतु इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप आपल्या खातेधारकांसाठी वाहिन्यांची सोय करत आहेत. या वाहिन्यांची सेवा घेण्याचं ठरवल्यानंतर त्या वाहिन्यांतल्या नव्या नोंदींसंबंधीचे सर्व 'अपडेट्स' संबंधित सेवाधारकाच्या 'पर्सनल चॅट'वर येत राहतात. हा प्रकार जास्त रुळला, तर त्याने सोशल मीडियाच्या वापरला एक वेगळंच वळण येईल. लोकं स्वतःच्या आवडीने रिळं पाहणं सुरू ठेवतील आणि त्यांना आवडणाऱ्या ब्रँड अथवा सोशल मीडिया प्रोफाइलकडून माहिती त्यांच्या स्वतःच्या इनबॉक्समध्ये येत राहील. असं झाल्यास सोशल मीडिया हे एकमेकांशी मैत्री करण्याचं, एकमेकांना जोडलं जाण्याचं साधन न राहता केवळ स्वतःच्या गरजेपुरती माहिती मिळवण्याचे साधन म्हणून समोर येईल. अर्थात गूगल वा यूट्यूबचा उपयोग माहिती मिळविण्यासाठी केला जाईलच; मात्र त्याचबरोबर सोशल मीडियावरील आपल्या आवडत्या व्यक्ती, सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या यांच्याकडून थेट आपल्या इनबॉक्समध्ये माहितीही मिळत राहील. या दोन्ही गोष्टी समांतर सुरू राहतील असा अंदाज आहे.

सोशल मीडियाबाबत झालेले हे विवेचन यूट्यूबच्या उल्लेखाविना अपुरे आहे. ते अशासाठी, की यूट्यूबला सोशल मीडियाचे एक व्यासपीठ मानले जाते. मात्र तरीही ते देवघेव करण्यासाठीचं व्यासपीठ नसून शोधण्यासाठीचं व्यासपीठ आहे. यूट्युबवरील प्रत्येक व्हिडियोच्या खाली देवघेव करण्यासाठी इतर सोशल मीडिया व्यासपीठांचे व ईमेलचे 'आयकॉन' असतात ते याचसाठी. सोशल मीडियात झपाट्याने बदल होत जात ती रिळांच्या टप्प्यावर येऊन पोहोचली असली, तरीही यूट्यूबवर व्हिडियो प्रदर्शित होत राहण्याचे सातत्य अबाधित आहे. इथे ३० सेकंदाच्या 'शॉर्ट्स'ने शिरकाव केला असला, तरी अर्ध्या तासापासून ते अगदी तीन तासाच्या सिनेमापर्यंतच्या व्हिडियोचा प्रेक्षक इथे अजून टिकून आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिवाय यूट्यूब हे प्रत्येक अ‍ॅन्ड्रॉइड फोनमध्ये समाविष्ट असतं. त्याला मुद्दाम 'इन्स्टॉल' करावं लागत नाही. परिणामी गूगलनंतर सर्वाधिक 'सर्च' हा याच व्यासपीठावर होतो. मात्र सोशल मीडियासारखी इथे 'कन्टेन्ट'ची सतत निर्मिती होत असते. तसाच इथे लाईक व कॉमेंटचा प्रतिसादही दिला जातो. आणि सोशल मीडियासारखे इथेही प्रभाव टाकणारे 'इन्फ्लूएंसर' असतात. एकीकडे सोशल मीडियामध्ये सतत होणारे बदल तर दुसरीकडे यूट्यूबने स्वतःची राखलेली प्रासंगिकता आणि गांभीर्य! इथला ग्राहक हा नोंदीं'बद्दल गंभीर आहे, तो कमी विचलित होतो व नोंद कितीही मोठी असली तरीही ती ऐकण्यापाहण्यासाठी तो समर्थ आहे. थोडक्यात काय, तर इथे दीर्घत्व अजूनही टिकून आहे. आणि या व्यासपीठाची प्रासंगिकता पाहता याची उपयुक्तता शाश्वत आहे.

जाता जाता आणखी दोन सोशल मीडियांचा उल्लेख करणं भाग आहे. पहिलं मीडिअम – जिथे दीर्घ लिहिण्यावर भर आहे. आणि दुसरं क्लबहाऊस – जिथे संपूर्ण संभाषण श्राव्य स्वरूपाचं आहे. या दोन्ही माध्यमांची सध्याची लोकप्रियता नेमकी किती हे सांगणं अवघड आहे; मात्र एरवी सोशल मीडियाच्या वाहत्या प्रवाहात हरवत चाललेल्या लिखाण व बोलणं या गुणांचं पुनरुज्जीवन करणं हा या व्यासपीठांचा हेतू आहे. यूट्यूबसारखाच गंभीर वापरकर्ता इथे नांदणं अपेक्षित आहे आणि या व्यासपीठांना येत्या काळात कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

सोशल मीडियाचे दीर्घ विश्लेषण केल्यावर त्याचा एकूणच भारतीय समाजावर काय परिणाम होतो आहे आणि हा परिणाम कोणत्या पातळीवर अधिक आहे हे पाहणं क्रमप्राप्त आहे. यात सर्वांत महत्वाचा घटक आहे आपल्या देशातल्या तरुणांची संख्या, जी जगात सर्वाधिक आहे. त्याचबरोबर साधारण २०११पासून सतत वाढत जाणारा स्मार्टफोनचा वापर हा दुसरा घटक. परिणामी भारतीय समाज हा इंटरनेटचा व त्यामुळे सोशल मीडियातल्या बदलांचा प्रभाव पडलेला जगातला सर्वांत मोठा ग्राहक आहे. लेखात चर्चा केलेले सर्व बदल या समाजाने स्वीकारले असल्याने सोशल मीडियामुळे होणारे सामाजिक व मानसिक बदल हे फार मोठ्या संख्येने होणं अपेक्षित आहे, ही चिंतेची बाब आहे. राजकारण, बॉलिवूड, आणि खेळ (विशेषतः क्रिकेट) हे तीन देशातील सर्वाधिक लोकप्रिय विषय सोशल मीडियावरही आपले सर्वोच्च स्थान राखून आहेत. त्यासोबत खाद्यसंस्कृती, स्टॅन्ड-अप कॉमेडी, रोजच्या घडामोडी, स्थानिक अस्मिता हे विषयही आपलं अस्तित्व दाखवत असतात. प्रत्येकाला आपापल्या सोशल मिडियावरल्या नोंदींद्वारे सर्वाधिक लोकांपर्यंत प्रसार व सर्वाधिक लोकांचं गुंतणं, त्यांचा प्रतिसाद हवा असतो; आणि तो मिळविण्यासाठी अथक परिश्रम सुरू असतात. याबाबतची दोन अगदी ताजी उदाहरणं देता येतील. या वर्षाच्या सुरुवातीला बिल गेट्स भारतात आले होते व त्यांनी Dolly Chaiwala नावाने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या चहा विकणाऱ्या व्यक्तीबरोबर एक रीळ बनवलं. साहजिकच, ही घटना लगेच बातमी म्हणून प्रसिद्ध झाली. शिवाय संबंधित चहा बनवणाऱ्या व्यक्तीला इन्स्टाग्रामवर जवळजवळ ४५ लाख फॉलोअर आहेत. त्यामुळे बिल गेट्ससारख्या व्यक्तीला सोशल मीडियावर झळकण्यासाठी या फॉलोअर-संख्येची मदत झाली. अशा सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींना 'इन्फ्लुएन्सर' संबोधलं जातं, कारण सोशल मीडियावर त्यांचा प्रभाव असतो व त्यांच्याबरोबर जोडीने काम केल्याने आपल्यालाही अधिक लोकांपर्यंत पोहोचता येतं. दुसरे उदाहरण आहे आंतरराष्ट्रीय राजकारणतलं. या वर्षी जून महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची इटलीत भेट झाली. दोघांची आडनावं एकत्रित करून #melodi हा हॅशटॅग इंटरनेटवर खूप गाजला. परंतु त्याचं खोलात जाऊन केलेलं विश्लेषण सांगतं, की यातील बहुतेक सर्व प्रतिसाद (लाईक, कॉमेंट इत्यादी) हा केवळ भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून होता. याचा अर्थ भारतीय पंतप्रधानांना इटलीतल्या वापरकर्त्यांकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला परंतु इटलीच्या पंतप्रधानांना मात्र भारतीय सोशल मीडिया विश्वात झळकता आलं. अर्थात मेलोनींसाठी भारताचे पंतप्रधान हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ठरले!

मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की इन्फ्लुएन्सर वा प्रभाव पाडणारे यांना त्यांच्या संख्यात्मक सामर्थ्यामुळे महत्त्व आहे. त्यांच्याकडे गुणात्मक सामर्थ्य आहे का हा प्रश्न उरतोच. परंतु सोशल मीडियावरील कामगिरी हीच मुळी तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचता यावर, अर्थात संख्याबळावर अवलंबून आहे. याचा थेट परिणाम एखाद्या घटनेबद्दल लोकांचं मत काय किंवा एखाद्या बातमीला प्रतिसाद काय हे ठरवण्यावर होतो, जो फसवाही असू शकतो. अनेकदा वृत्तवाहिन्या सोशल मीडियावरील मतांनाच लोकांचा कल ठरवून मोकळ्या होऊन जातात. त्यातही, लोकांच्या लक्ष देण्याच्या अल्प कालावधीचा फायदा उठवत अनेकदा या वाहिन्या एखादं आकर्षक पण दिशाभूल करणारं शीर्षक देऊन लोकांना उत्सुकतेने बातम्या ऐका-पाहायला वा वाहिन्यांच्या जालपानांवर क्लिक करण्यास भाग पाडतात. असं करतानाच अनेकदा खोट्या बातम्या पसरण्याची शक्यता निर्माण होते; तर बऱ्याचदा या मार्गाने मुद्दाम खोट्या बातम्या पसरवल्याही जातात.

परंतु हे सर्व तोटे सोशल मीडियाच्या व्यासपीठांवर घडतात जिथे मुळात लक्ष देण्याचा कालावधी अल्प आहे. मात्र यूट्यूबसारखं व्यासपीठ जिथे सखोलतेला वाव आहे तिथे अशा प्रकारांना आळा घालता येऊ शकतो. म्हणूनच छापील आणि इ-माध्यमांतल्या अनेक पत्रकारांनी गेल्या काही वर्षांपासून यूट्यूबची स्वतंत्रचा स्वतंत्र दुवा सुरू केली आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांना तिथे चांगला प्रतिसादही मिळत आहे. खरं तर सोशल मीडियावरील व्यासपीठं ही पारंपरिक माध्यमांना छेद देऊन एक नवी क्रांती घडवतील अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने ही व्यासपीठं रिळांमार्गे नफ्याच्या आहारी जाताना दिसत आहेत. यूट्यूब मात्र त्याला अपवाद आहे हे कबूल करावंच लागेल.

आज सोशल मीडियाचे विश्लेषण करताना आपल्यासमोर जवळजवळ वीस वर्षांचा कालावधी आहे. या कालावधीत कधी नावीन्यपूर्ण निर्मितीसाठी, तर कधी लोकांची मागणी भागवण्यासाठी सोशल मीडियाच्या व्यासपीठांवर लक्षणीय बदल होत गेले. सामुदायिक वा मैत्री करण्याच्या पातळीवरून एका स्व-केंद्री उपभोगवादी दृष्टीकोनापर्यंतचा हा प्रवास आहे. हा प्रवास आपल्या सर्वांचा आहे. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचा आहे. परंतु आता हे सारे वयोगट समानरीत्या एका उपभोगवादी पातळीवर येऊन पोहोचले आहेत. मात्र दुसरीकडे यूट्यूबसारखे व्यासपीठ आहे जे उपभोगवादी असूनही सखोलता, गुणात्मकता आणि विस्तृतपणा अजूनही टिकवून आहे. या तीन महत्त्वाच्या बाबींमुळे तिथे संतुलन दिसतं. आणि जिथे संतुलन आहे तिथे मानसिक शांती व स्थैर्य आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उद्या जर जागतिक अशांततेचे नोबेल द्यायचे ठरले तर सोशलमिडीयाचा १ला नंबर लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0