स्नॅपचॅट स्वप्ना
स्नॅपचॅट स्वप्ना
- पापा की परी
प्रकाशकांना भेटायला जाताना भांडारकर रोडवर रियाला डावीकडे ती बँक दिसली, आणि त्या गल्लीत राहणारा तो माणूस आणि त्याच्या घरचा त्या दिवशीचा प्रसंग तिला आठवला. तिच्या काळजाचा ठोका चुकला.
तो चाळिशीचा असेल. अमित नाव होतं. वकील. घटस्फोटित असावा. एकटाच राहायचा. रिया पूर्वी त्याच्याकडे गेली होती. भेटीआधी त्याने एड्सची टेस्ट शेअर करायला सांगितलं होतं आणि स्वतःचीही शेअर केली होती. काँडोम वापर असं सांगायची गरजही भासली नव्हती. एकदम प्लेन व्हॅनिला सेक्स. तासाभरात पैसे घेऊन ती बाहेर. असे क्लायंट रियाला आवडायचे. त्यामुळे त्या दिवशी 'संध्याकाळी येशील का?' असा त्याचा मेसेज पाहताच तिने होकार कळवला होता. पण ती तिथे गेल्यागेल्याच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मोठ्या आवाजात रॉक म्यूझिक लागलं होतं. तिच्या मनातल्या प्लेन व्हॅनिला आवृत्तीत हे बसत नव्हतं. आत आणखी दोघे जण होते. अमितच्याच वयाचे. तसेच प्रोफेशनल दिसणारे. त्यांच्या हातात व्हिस्कीचे ग्लास होते. त्यांच्या परफ्यूम्सचा आणि सिगरेटींचा गोडसर वास घरात पसरला होता. ती घुटमळली. अमितने तिच्या मनातला संभ्रम ओळखला. "माझे मित्रच आहेत. काळजी नको. तुझं तासाचं मीटर चालू ठेव, आणि मी तुला तीन माणसांचे म्हणून तिप्पट पैसे देतो." रियाचा संभ्रम विरघळला. ती आत आली.
अमितने इतर दोघांशी ओळख करून दिली. एक सीए, एक कसला तरी कन्सल्टंट. किमान माहितीची देवाणघेवाण. तिचं स्क्रिप्ट ठरलेलं होतं – ती विद्यापीठात एमए करत होती. साईडचं पूरक उत्पन्न म्हणून हा व्यवसाय. ती आपलं नाव स्वप्ना सांगायची. अमित म्हणाला, "आमचा एक नियम आहे. प्रत्येकाने आपापले मोबाईल बाजूला ठेवायचे. म्हणजे इथून फोटो-व्हिडिओ वगैरे लीक होण्याचा प्रश्नच येणार नाही. तू फोन बंद करून मला दे." तिला हे सेफच वाटलं. तिने बंद करून अमितकडे दिलेला मोबाईल त्याने तिच्यासमोरच एका ड्रॉवरमध्ये ठेवला. ती बसली. फुटकळ गप्पा सुरू होत्या. दोन गड्यांपैकी सीएने तिला व्हिस्की ऑफर केली. तिने घेतली. ते नीट पीत होते. तिने पाणी आणि बर्फ घालून घेतली. रियाला शुद्धीवर राहणं गरजेचं होतं. कन्सल्टंट गड्यासमोर एका छोट्या पेटीत बराच सरंजाम होता. त्यातून कागद, तंबाखू वगैरे काढून तो हाताने सिगरेट वळत होता. त्याने एक सिगरेट वळून तिच्यासमोर धरली. तिने ती घेतली आणि एक झुरका घेऊन पाहिला. तो गोडसर वास तिला आवडला. गप्पा सुरू राहिल्या.
"ही आमची टिंडर-बंबल गँग. आम्ही तिघेही सिंगल आहोत. बाय चॉईस. आणि आम्ही मिंगल पण करतो." (बाकीचे दोघे हसले. ती हसली नाही.)
"आम्हाला कुणालाच रिलेशनशिप नकोय. आमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये त्याला जागाच नाही. अधूनमधून कुणी चांगली मुलगी भेटली तर सेक्ससाठीच भेटतोय हे स्पष्ट करूनच आम्ही पुढे जातो."
"चांगला किंवा वाईट, कसाही एक्सपीरियन्स आला तरी आम्ही ते आमच्यात शेअर करतो. एकदा तर एकच मुलगी आम्हाला दोघांना २-३ दिवसांच्या अंतराने वेगवेगळी भेटली होती. आम्ही आमच्या नोट्स शेअर केल्या तेव्हा आमच्या ते लक्षात आलं."
"आमच्यात काही सीक्रेट्स नसतात. जर मुलीला चालत असेल तर आम्ही सगळे तिला एकत्रही भेटतो. असंच अमितने तुझ्याबद्दल सांगितलं आणि रेटही सांगितला. आम्ही म्हटलं ट्राय करूया!"
तिघेही डिसेंट होते. त्यांच्या अपेक्षा स्वच्छ होत्या. घरात शिरल्यापासून रिया जी थोडी ताणात होती ती थोडी मोकळी होऊ लागली.
जरा वेळाने अमितने सगळ्यांसमोर एकेक गोळी ठेवली. बाकीच्यांनी ती घेतली. तिने अमितकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. "डोन्ट वरी. छान रिलॅक्स वाटेल. जिभेवर ठेव नुस्ती." तिने ती घेतली.
*
रिया जागी झाली तेव्हा बेडरूममध्ये होती. बाहेर सकाळ झालेली होती. अकरा वाजून गेले होते! ती ताडकन उठली. बेड मोठा होता आणि अस्ताव्यस्त होता. तिच्या अंगावर फक्त एक पातळशी चादर होती. तिला कालचं काहीच आठवत नव्हतं. फक्त जमिनीवर जिथे तिचे कपडे होते तिथे रात्री सगळ्यांच्या कपड्यांचा ढीग होता असं दृश्य तिच्या डोळ्यांसमोर आलं. सगळी शरीरं एकमेकांच्यात, आणि कोणाचं शरीर कोणाला नक्की काय काय करत होतं ह्याविषयी तिला काही आठवतच नव्हतं. मंद संगीत, वेगवेगळे पुरुषी वास, कोणाचं तरी मोठमोठ्याने हसणं... डोक्यात सगळा काला झाला होता. ती कपडे करून झटकन बाहेर आली. अमित लॅपटॉपवर काम करत बसलेला होता. तो हसला आणि म्हणाला, "सावकाश, काहीच घाई नाही. बाकीचे दोघे कधीच गेले. मी वर्किंग फ्रॉम होम आहे. तू तुझं आवर, ब्रेकफास्ट कर आणि मग जा. तुझे पैसे आणि मोबाईल त्या ड्रॉवरमध्ये आहेत ते घे." जणू काल विशेष काही झालंच नव्हतं. तिचं डोकं मात्र भणभणत होतं. अंगांग ठणकत होतं. आणि प्रचंड थकवा. ती नुसती मानेने ओके म्हणाली. ऑफिसला खूपच उशीर झाला होता. पण आताच्या तिच्या स्थितीत जाऊन काम करणंही शक्य नव्हतं.
ती बाहेर पडली आणि थेट घरीच गेली. तिच्या डोक्यात प्रश्नांचा थवा होता. काल रात्री नक्की काय काय झालं? आपण काही प्रिकॉशन घ्यायला हवी का? काही टेस्ट वगैरे? आपण जर शुद्धीवर नव्हतो तर टेक्निकली हा बलात्कार झाला का? डेट रेप? पण आपण तर पैसे घेतले. आणि गोळी सगळ्यांनीच घेतली होती. पोलिसांकडे गेलो तर त्यांना आपण काय करतो ते कळेल. मग? आणि सांगितल्यानुसार अमितने पैसे तर व्यवस्थित दिले होते. त्याचं वागणं एकदम नॉर्मल आणि डिसेंट होतं.
त्या दिवशी रिया ऑफिसला गेलीच नाही. 'तिसरी कसम'मधल्या राज कपूरप्रमाणे तिने यावरून धडा घेतला. काहीही झालं तरी आपला स्वतःवरचा ताबा जाईल असं काहीही खायचं-प्यायचं नाही.
हा प्रसंग रियाने प्रकाशकांना पाठवलेल्या ड्राफ्टमध्ये घातला होता, पण संध्याकाळचा जो भाग तिला आठवत नव्हता तो भाग त्यात थोडे आणखी रंग भरून. थोडं बाँडेज वगैरे. वाचकाला उद्दीपित करायला म्हणून नाही, पण तिला वाटलेली भीती, तिला असलेला संभाव्य धोका, तिचे सैल झालेले रिफ्लेक्स आणि 'नाही' म्हणता न आल्यामुळे स्वतःचाच आलेला राग!
*
प्रकाशक देशमुख म्हणून होते. मराठीतले थोडे आधुनिक विचारांचे म्हणून आणि अवनीच्या ओळखीचे म्हणून तिने अवनीमार्फत मॅन्युस्क्रिप्ट त्यांच्याकडे पोचवलं होतं. रियाने त्यांना आधी कधी पाहिलं नव्हतं. त्यांच्या केबिनमध्ये ते आणि एक तिशीचा मुलगा होता. ते पन्नास-पंचावन्नचे असावेत. बायफोकल चष्मा. पांढऱ्या रंगाच्या सिंथेटिक कापडावर ग्रे कलरच्या रेषा असलेला त्यांचा फुलशर्ट आणि खाली ग्रे ट्राउझर्समध्ये ते सत्तरच्या दशकातल्या अमोल पालेकर-विद्या सिन्हावाल्या एखाद्या सिनेमात बँकेतले खडूस मॅनेजर असतील असे दिसत होते. असा माणूस तो बाँडेजवाला प्रसंग वाचतोय ह्या प्रसंगाची कल्पना मनात येताच तिला फुटू पाहणारं हसू तिने गिळून टाकलं. तो तिशीचा मुलगा मुकुल नावाचा त्यांचा संपादक होता. फ्लॅनेलचा शर्ट घातलेला स्मार्ट मुलगा मराठी प्रकाशकाकडे का काम करत असेल असा प्रश्न उगीचच रियाच्या डोक्यात आला पण तो तिने बाजूला फेकून दिला.
आधी त्यांनी कोण कुठली वगैरे जुजबी माहिती विचारली. नाशिकची म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या ओळखीची एकदोन नावं सांगितली. ते सगळे साहित्यिक-सांस्कृतिक-सामाजिक एलिट लोक होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि काय काय. रियाचे वडील बँकेत नोकरी करणारे आणि आई शाळाशिक्षिका. तिला साधं पारंपरिक ब्राह्मणी मध्यमवर्गीय नाशिकच परिचित होतं. पुण्यातलं तर तेवढंसुद्धा माहीत नव्हतं. ती उगीचच थोडी नर्व्हस झाली. तेवढ्यात खरे प्रश्न सुरू झाले.
"तुम्ही हे लिहिण्यासाठी प्रत्यक्ष वेश्यांना भेटलात?"
"अं, मला वाटतं, या मुली जरी प्रॉस्टिट्यूशन करत असल्या तरी वेश्या म्हटल्यावर डोळ्यासमोर जे चित्र येतं त्यापेक्षा त्या वेगळ्या असतात. म्हणजे, बऱ्याचदा त्या कॉलेजमध्ये शिकत असतात आणि त्यांना पॉकेटमनी पुरत नसतो, किंवा त्यांना पूर्ण वेळ नोकरी नसते. त्यांना जी लाईफस्टाईल हवी असते त्यासाठी त्यांना ह्या वरच्या उत्पन्नाचा फायदा होतो. पण तुमच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर 'हो' आहे."
"त्या इतकं मोकळेपणाने बोलल्या ह्याचं मला आश्चर्य वाटलं."
"मी त्यांचा विश्वास संपादन केला हे खरं आहे, पण आजकालच्या तरुण मुलींचा ह्या विषयातला ॲटिट्यूड तसा मोकळा असतो. मी त्यांच्याच पिढीची आहे म्हणून पण थोडा फायदा झाला."
"खरं सांगायचं तर एक मध्यमवर्गीय मुलगी सोशल मीडियाचा वापर करून भर पुण्यात वेश्याव्यवसाय करते हा कादंबरीचा विषय समजला तेव्हा हे खूप सेन्सेशनल, वाचकांना चाळवणारं काही तरी असणार अशी भीती मला वाटली होती. पण हे लिखाण अजिबातच तसं नव्हतं. तुमचा पर्स्पेक्टिव्ह इंटरेस्टिंग आहे. त्या मुलीला एकीकडे त्यात काही तरी नवं अनुभवायला मिळतंय त्याचं फॅसिनेशन आहे, तिला त्यात मजा येतेय आणि एकीकडे ह्या दुहेरी आयुष्याची थोडी शरम आणि आपण खोटं जगतोय की काय ह्याविषयी संदेह वाटतोय. तुम्ही ते चांगलं पकडलंय. ते चॅटरबॅट आणि ओन्ली फॅन्स की काय ते मला काहीच माहीत नव्हतं. मुकुलने ते एक्सप्लेन केलं. वाचकांनाही ते माहीत असेल असं सांगता येत नाही. तुम्ही त्यात तसं थोडं स्पष्ट करणारा मजकूर टाकू शकाल का?"
म्हणजे हे प्रकाशनाला अनुकूल आहेत तर! रियाचा विश्वास बसेना. तिने अर्थात होकार दिला.
"मी वाचलं ते सगळं मला आवडलं असं नाही म्हणणार मी, पण आताच्या तरुण पिढीचं जगणं, त्यांचे प्रश्न वेगवेगळ्या अंगांनी साहित्यात यावेत असं मला वाटतं. तुमचं लिखाण गांभीर्याने केलेलं आहे हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे ही कादंबरी प्रकाशित करायला आम्हाला आवडेल. काही संपादकीय सूचना असतील त्या मुकुल तुम्हाला तपशीलात इमेलवर पाठवेल. उरलेली कादंबरी लिहून व्हायला तुम्हाला किती वेळ लागेल?"
हे रियाच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगाने चाललं होतं. पण तिने तीन महिन्यांची मुदत मागून घेतली. पैशांचा काही मुद्दाच निघाला नाही. पण अवनीने तिला त्याची आधीच कल्पना दिली होती. मराठी प्रकाशक...
बाहेर पडल्यावर रियाला वर्षभरापूर्वीची तिची स्थिती आठवू लागली. शिक्षणासाठी ती पुण्याला आली, इंजिनियरिंग केलं आणि मग आयटीत नोकरीला लागली. सुरुवातीची थोडी वर्षं नोकरीत सेटल होण्यात गेली. अवनी सोडता तिला मित्रमैत्रिणी नव्हते. रिया दिसायला गोरी-घारी-म्हणून-पुण्यात-बरी होती. त्यामुळे अनेक मुलं तिच्या मागे लागत. काहींना थोडे दिवस डेट करून तिने सोडून दिलं. सगळे तिला खूप बालिश, प्रेडिक्टेबल वाटायचे आणि लवकरच त्यांचा तिला कंटाळा यायचा. आई अजून लग्नाच्या मागे लागली नव्हती. पण तिथे पण असेच बालिश, प्रेडिक्टेबल आणि कंटाळवाणे लोक भेटणार आणि त्यांना तशाच 'अनुरूप' मुली हव्या असणार, हे तिला आतापर्यंत तिच्या क्लासमेट्सची आणि कझिन्सची लग्नं जुळताना बघून समजलं होतं. असंच आपलं आयुष्य पण एक दिवस 'मार्गी' लागणार ह्या कल्पनेने तिला डिप्रेस्डच वाटायला लागायचं. दरम्यान तिच्या आणि तिच्या बघण्यातल्या इतर काही लोकांच्या डेट्स, ब्रेकप्स, लफड्यांच्या गोष्टींवरून तिने २-३ कथा लिहिल्या. त्या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. लोकांना त्या आवडल्या. पण आताशा सगळं जगणंच रिकामं, रूटिन होऊन बसलं होतं, मग कथा कुठून सुचणार! सगळ्या फ्रंट्सवर दिवस खूप वाईट चालले होते.
अशात तिच्या पाहण्यात एक स्पॅनिश फिल्म आली. एक लग्न झालेली सुखवस्तू बाई तिच्या रूटिनला कंटाळलेली असते. ती चक्क दिवसाढवळ्या नवऱ्याला काही कळणार नाही अशा बेताने वेश्याव्यवसाय करू लागते. आणि मग तिला भेटलेले चित्रविचित्र क्लायंट आणि त्यातून तिचं काय होतं ते त्यात दाखवलं होतं. रिया ते पाहून हादरून गेली, पण तिच्या डोक्यात एक भयंकर कल्पना वळवळू लागली.
रियाला डेटिंग ॲप्स माहीत होते. तिच्या माहितीत काही मुली ते वापरायच्या. बरेचसे पुरुष आणि थोड्याशाच मुली असलेल्या पुण्यातल्या डेटिंगच्या जगाला मुली हमखास कंटाळायच्या, किंवा आपल्याला हवा तो कार्यभाग साधून नंतर रीतसर 'मार्गी' लागायच्या. पण रियाने एक वेगळा प्रयोग करून पाहायचं ठरवलं. तिने एक फेक प्रोफाईल तयार केली. त्यात तिचा चेहरा किंवा तिची ओळख उघडी पडू शकेल असे इतर कोणतेही डिटेल्स न दाखवणारे पण थोडंस्सं कातडीप्रदर्शन करणारे काही फोटो टाकले. शिवाय 'फुकट्यांना इथे जागा नाही' 'हाय क्लास असाल तरच कॉन्टॅक्ट करा' अशा प्रकारच्या काही सूचक ओळी टाकल्या. तिला वाटलं होतं तसंच झालं. वखवखलेल्या पुरुषांचे अनेक मेसेजेस येऊ लागले. पण तिने अतिशय कठोर निकष लावले आणि ९९% लोकांना ब्लॉक केलं. तिचे निकष असे होते –
- वय किमान ४०
- चांगल्या घरातला
- इंग्लिश चांगलं
- मोबाईल नंबर दिल्याशिवाय जास्त चॅट करायचं नाही
हे निकष लावून जे पास झाले त्यांनी मात्र रियाला आश्चर्याचा धक्काच दिला. हे उद्योग करण्यासाठी तिने वेगळं सिम कार्ड आणि मोबाईल ठेवला होता. हा नंबर ती फक्त तिच्या निकषांमध्ये पास झालेल्या लोकांनाच द्यायची. आपलं नाव 'स्वप्ना देशमुख' असं सांगायची. पण पास झालेले बरेचसे पुरुष तिला आपला नॉर्मल नंबरच द्यायचे. ट्रूकॉलरवरून तिला त्या माणसाचं खरं नाव सहज कळायचं. मग ती त्याच्या फेसबुक/लिंक्डइन वगैरे प्रोफाइल्स शोधायची. पुरेसे उच्चपदस्थ प्रोफेशनल लोक निवडून ती पुढच्या पायरीवर जायची. तिचा रेट सांगायची. इथपर्यंत येताना सुरुवातीलाच कधी तरी त्या माणसाने तिला तिचा फेस पिक विचारलेला असायचा. तिला जरा धाकधूक वाटायची, पण व्हॉट्सॅपवरचं व्ह्यू वन्स फोटोचं फीचर किंवा स्नॅपचॅटवरचे आपोआप नाहीसे होणारे फोटो वगैरे गोष्टी तिला सोयीच्या पडल्या. हॉटेलवर भेटायला मी येणार नाही असं ती स्पष्ट सांगायची. ह्या पायरीवर काही संसारी लोक गळून जायचे. त्यानंतर जे उरायचे ते घटस्फोटित किंवा विधुर तरी असायचे, नाही तर गावात स्वतःचा किंवा माहितीतल्या कुणाचा तरी एखादा रिकामा फ्लॅट असणारे. अशा माणसांना भेटून, त्यांना हवं ते सुख देऊन त्या अनुभवांवर एक कादंबरी लिहायची ही रियाची 'भयंकर कल्पना' होती.
अवनीला तिने पहिल्यापासून विश्वासात घेतलं होतं. तिची भयंकर कल्पना ऐकून आधी अवनी हादरलीच होती. रियाला परावृत्त करण्याचा प्रयत्न पण केला होता. पण तशी ती प्रॅक्टिकल मुलगी होती. तिला बॉयफ्रेंड नव्हता. डेटिंग ॲप्सवरून तिची स्वतःची काही प्रकरणं झाली होती. ती सावळी पण नाकीडोळी नीटस होती. मुख्य म्हणजे रियापेक्षा शार्प आणि नो-नॉनसेन्स होती. रूटिन जगण्यात थोडा विरंगुळा एवढीच तिची डेट्सकडून अपेक्षा होती. पण बहुसंख्य मुलांनी तेवढ्याशातही तिचा अपेक्षाभंग केलाच होता. म्हणून पहिला धक्का ओसरल्यानंतर आणि रिया ठाम आहे हे पाहून अवनीने तिला सपोर्ट केलं होतं. ह्या निमित्ताने पुण्यातल्या बावळट पुरुषांवर जरासा सूड उगवल्याचं समाधान मिळेल हे तिला मदत करण्यामागचं अवनीचं लॉजिक होतं. तिने काही प्रॅक्टिकल सल्ले दिले होते. वरचे निकष त्यातूनच आले होते.
अमित आणि त्याच्या मित्रांचा प्रसंग असाच प्रत्यक्षातून प्रेरित, पण थोडी कलाकुसर करून कागदावर आला होता. सुरुवातीला थोडी स्वप्नाची पार्श्वभूमी, तिला असणारी पैशांची गरज आणि असे आणखी दोन प्रसंग लिहून तिने कादंबरीच्या पहिल्या काही प्रकरणांचा एक ड्राफ्ट तयार केला. आधी अर्थात अवनीला दाखवला. तिला तो आवडला. तिनेच मग देशमुखांचं नाव सुचवलं. कादंबरीतली स्वप्ना देशमुख आठवून त्यांची खिदळाखिदळी पण झाली. पण प्रकाशनासाठी देशमुख हे सेन्सिबल चॉईस होते. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमासाठी लावलेली पुस्तकं, रेसिपीजची पुस्तकं, माहितीपर नॉन-फिक्शन (अच्युत गोडबोलेंवरून प्रेरित), दर वर्षी काही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवण्यापुरतं थोडं वैचारिक आणि थोडं फिक्शन असा त्यांच्या प्रकाशनाचा मोठा पसारा होता. गेली काही वर्षं ते तरुण पिढीला आवडेल असं साहित्य बाजारात आणत होते. त्यांना तसा वाचकवर्गही मिळाला असावा असं फेसबुकवर त्या पुस्तकांची स्तुती करणारे तरुण लोक पाहून वाटत होतं. अवनीच्या एका मित्राची कादंबरी त्यांनी प्रकाशित केली होती. त्याच्यामार्फत संपर्क झाला होता. पण आता तीन महिन्यांत थोडा जोर लावायला लागणार होता. त्यासाठी आणखी लोक भेटणं आवश्यक होतं.
*
"तुला पत्ता सापडायला काही अडचण तर नाही आली?"
"नाही, गूगल मॅप्सवर बिल्डिंग व्यवस्थित सापडली."
"तू कुठून आलीस?"
"मेट्रो घेतली. मग नळ स्टॉपपासून चालत इन्कम टॅक्स लेन."
"अरे वा! पुण्यात पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरतेस! तू राहायला कुठे असतेस?"
रियाला ह्या प्रश्नांचा जरा वैताग येऊ लागला होता. पण त्यातून सुटका नव्हती.
"वनाजजवळ."
"अच्छा. माझा त्या भागाशी कधी फारसा संबंध येत नाही."
'कसा येईल? तुम्ही इथून फार तर पीवायसी क्लबला जात असणार काका.' तिच्या मनातलं उत्तर तिने गिळून टाकलं.
"वाईन चालेल? माझ्याकडे एक चांगली स्पॅनिश रेड वाईन आहे. तुला चालत असेल तर आपण दोघेही घेऊ थोडी."
आपल्यासमोर बाटली उघडून दोघेही त्यातून पिणार असलो तर सेफ असेल असं मानून रियाने होकार दिला. तसंच झालं. वाईन चांगली होती. माणूस सभ्य होता. जोगळेकर. साधारण ५५-६० वयाचा. व्यवस्थित ट्रिम केलेली सॉल्ट-पेपर बिअर्ड. कपडे साधे पण बावळट नाहीत. डोळ्यांत एक चमक होती. वागण्यात पॉलिश. हुशार असावा. बुद्धिजीवी, हायली स्किल्ड प्रोफेशनल. आता रिटायर्ड. बायको मेलेली असणार. फ्लॅटची सजावट क्लासी होती. बायकोने केलेली असणार. रिया मनातल्या मनात कादंबरीतला प्रसंग लिहीत होती.
मागे हळू आवाजात तलतच्या गझल लागल्या होत्या. तिच्या पपांना तलत आवडायचा. पपा गेल्याला दहा वर्षं होऊन गेली. म्हणजे तलत पण दहा वर्षांत ऐकलेलाच नाही. तिला पोटात एकदम कसंनुसं झालं. ती दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत करू लागली आणि जोगळेकरांचं बोलणं ऐकू लागली.
"खूप कमी लोकांच्या आयुष्यात त्यांची आवड आणि त्यांचा व्यवसाय एकच असतात. मी तसा लकी होतो. मूळ सदाशिव पेठ! (हसले) मग शिक्षणासाठी यूकेला गेलो. पीएचडी करून परत भारतात आलो. दिल्लीला जेएनयूत अनेक वर्षं प्राध्यापकी केली. मग रिटायर होऊन परत पुण्यात आलो. दोन वर्षांपूर्वी पत्नी वारली. तू काय शिकतेस?"
"एमए करतेय."
"कोणता विषय? मी इंग्लिश लिटरेचरचा प्रोफेसर आहे. म्हणजे होतो. गरजेनुसार पोस्टमॉडर्न साहित्यसुद्धा शिकवू शकतो." (हसले)
का कोणास ठाऊक, पण त्यांच्यासमोर खोटं बोलायला रियाला ऑकवर्ड होत होतं. खरं सांगायचीही धास्ती वाटत होती. लवकर काम आटपून इथून बाहेर पडलो तर बरं होईल. रिया त्यांच्याजवळ जाऊन बसली. त्यांच्या मांडीवरून हळूच हात फिरवू लागली. पण त्यांनी तिला थांबवलं.
"मला अशा गोष्टींचा फारसा अनुभव नाहीय. मी पहिल्यापासून ह्या बाबतीत खूपच सरळमार्गी होतो. जिच्या प्रेमात पडलो तिच्याशी लग्न केलं. सुखाचा संसार होता आमचा. कधी प्रतारणा करण्याची इच्छा झाली नाही आणि वेळही आली नाही. आता बायको गेल्यापासून एकटं वाटतं. इथे नातेवाईक पुष्कळ आहेत, पण ते सगळे अगदीच मर्यादित मध्यमवर्गीय आयुष्य जगलेले. आणि कडवे हिंदुत्ववादी. माझा त्यांच्याशी काहीच संवाद होऊ शकत नाही. आताशा फार एकटं वाटतं म्हणून मी हा उद्योग केला. तर सांगायचा मुद्दा म्हणजे मी नवखा असल्यामुळे मला एकदम सेक्स करायला थोडं अनइझी वाटतं. आपण थोड्या गप्पा मारू. मग मी कम्फर्टेबल होईन."
मग ते परत तिला तिच्या शिक्षणाविषयी काही तरी विचारू लागले. सेक्स करायला ते कम्फर्टेबल नव्हते, आणि स्वतःविषयी बोलायला रिया.
रियाला गंमत म्हणून ऑनलाइन कोर्स घ्यायची आवड होती. अशाच एका सायकॉलॉजी कोर्समध्ये मायर्स-ब्रिग्ज टाइप्स आणि त्यामागची युंगियन थियरी तिला अभ्यासाला होती. त्यानुसार जोगळेकर एक्स्ट्रोव्हर्ट होते. ते स्वतःविषयी मोकळेपणाने बोलत होते आणि ती स्वतःविषयी ओपन झाली तर त्यांना तिच्याबद्दल कम्फर्ट वाटणार होता. पण एक तर ती पक्की इन्ट्रोव्हर्ट होती. त्यात ती मुलगी होती. वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान. शिवाय ती असा व्यवसाय करत होती. ती कशी स्वतःविषयी पहिल्याच भेटीत ओपन होईल! तिची व्हल्नरेबिलिटी त्यांना समजतच नव्हती का? वयाने एवढा मोठा पुरुष, बुद्धिमान, पण त्याला ही साधी गोष्ट समजू नये? किती टोन डेफ असतात हे ***! आतून तिचा वैताग वाढत चालला होता. खरं तर ती चिडलीच होती. अजब तिढाच होऊन बसला होता. आता काय करावं?
रियाने मोबाईलमध्ये काही तरी मेसेज चेक केल्यासारखं दाखवलं आणि ती म्हणाली, "ओह सॉरी, मला एका अर्जंट कामासाठी जावं लागेल…" आणि ती उभीच राहिली. त्यांना काही बोलायची संधी न देताच ती उठली आणि जवळजवळ पळतच बाहेर पडली.
हा प्रसंग तिने कादंबरीच्या ड्राफ्टमध्ये घातला नाही.
*
आणि मग एक दिवस रियाला ज्याची भीती होती ते संकट तिच्यावर ओढवलंच.
एका प्रतिष्ठित संस्थेतर्फे दर वर्षी साहित्यिक पुरस्कार दिले जायचे. त्यांचा पुरस्कार समारंभ एसेम जोशी हॉलमध्ये होता. देशमुखांनी प्रकाशित केलेल्या एका कादंबरीला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार होता. देशमुखांनी रियाला आमंत्रण पाठवलं आणि यायची विनंती केली. त्यांचे अनेक लेखक तिथे येणार होते. कार्यक्रम अर्थातच खुला होता. ती आणि अवनी गेल्या. बरीच गर्दी होती. देशमुखांनी तिची ओळख त्यांच्या इतर तरुण लेखकांशी करून दिली. तिच्या लक्षात एक गोष्ट प्रकर्षाने आली – सगळे तरुण लेखक सोशल मीडिया वापरत होते. ते तिला आपलं इन्स्टा/फेसबुक दाखवायचे आणि तिला तिचं विचारायचे, रिक्वेस्ट पाठवण्यासाठी. ती सोशल मीडिया वापरायचीच नाही. तिच्यापाशी फक्त व्हॉट्सॅप होतं. पण त्यांना त्यात रस नव्हता. त्यांना फक्त आपापल्या प्रमोशनसाठी फॉलोवर्स वाढवायचे होते. तिला एक तर कधीच सोशल मीडियाचं आकर्षण नव्हतं. नोकरीतले तिचे कलीग्ज किंवा कॉलेजातले ओळखीचे लिंक्डइन वापरायचे, पण तिला त्यातही रस नव्हता. त्यात तिने आपली ही 'भयंकर कल्पना' अमलात आणल्यापासून तर तिला आपला सुगावा कोणाला लागू शकेल असं काहीही इंटरनेटवर ठेवायचं नव्हतं. स्नॅपचॅटवर ती होती, पण ते अर्थातच रिया नावाने नाही.
तेवढ्यात रियाला ते दिसले. जोगळेकर. ते कुणाशी तरी बोलत होते. त्यांनी तिला पाहिलं असेल का? तिचे पाय लटपटू लागले. हृदयाचे ठोके जोरात पडू लागले. कार्यक्रम सुरू व्हायला तर अजून वेळ होता. बरेचसे लोक बाहेरच गप्पा मारत होते. आत फारसं कुणीच बसलं नव्हतं. म्हणजे तिला खुर्चीत बसून स्वतःला लपवणंही शक्य नव्हतं. ती अवनीला म्हणाली, 'चल इथून. लवकर!' तिला पाहताच तिचं काही तरी बिनसलंय हे अवनीच्या लक्षात आलं. कुणालाही काही न सांगता दोघी तिथून बाहेर पडल्या.
जोगळेकरांच्या भेटीबद्दल अवनीला तिने आधी सांगितलं नव्हतं, पण आता सांगणं भाग होतं. सगळं ऐकून झाल्यावर अवनीने तिला इतकं झापलं की ज्याचं नाव ते. बावळट! हा अवनीचा आवडता शब्द होता. अर्ध्या तासात पन्नास वेळा तरी तो तिने वापरला असेल. नेहमीप्रमाणेच तिचे मुद्दे बरोबर होते. 'तू इंजिनियर आहेस हे सांगून काहीच फरक पडत नाही. महाराष्ट्रात लाखो मुली असतील इंजिनियर! अशाच थोड्या गोष्टींबाबत तू थोडी ओपन झाली असतीस तर त्या दिवशीच सगळं नीट झालं असतं! आणि राहता राहिला प्रश्न आज तुला ते दिसण्याचा. अगं आपण पुण्यात राहतो. एक छोटं गावच आहे हे अजून. आणि तू ज्या पद्धतीचे क्लायंट सेफ म्हणून निवडतेस ते बरेचसे ब्राह्मणच निघणार. इथले सगळे ब्राह्मण सगळ्या ब्राह्मणांना ओळखतात. सगळ्यांना सगळ्यांच्या कुंडल्या माहीत असतात. यातलं कुणीच तुला कधीच बाहेर कुठे भेटू नये असं हवं असेल तर तू आपली बुरखा घालून वावर. नाही तर सुटका नाही तुझी. बाकी सगळं सोड, पण एक बेसिक गोष्ट तुझ्या लक्षातच येत नाहीये का? अगं साठीचा रिटायर्ड ब्राह्मण घरी वेश्या आणतो हे लोकांना कळलं तर किती छीथू होईल त्याची! त्यालाच भीती वाटायला हवी आपलं गुपित उघडं पडण्याची. आणि तूच म्हणतेयस की तो एकदम डिसेंट होता. तर तो का उगीच कोणाला सांगायला जाईल तुझ्याबद्दल?' (हा 'बावळट' गाळून काढलेला सारांश)
जाऊ दे जे झालं ते झालं. रियाला वाटलं की आता जोगळेकर प्रकरण संपलं. पण तसं व्हायचं नव्हतं.
*
"तुम्ही परत काँटॅक्ट कराल असं वाटलं नव्हतं. त्या दिवशी मी इथे आले होते तेव्हा असं अचानक निघून जायला नको होतं. माझं चुकलंच."
"माफी मागायचं काहीच कारण नाही. मी पण थोडा विचित्र मनस्थितीत होतो. आणि नंतर जेव्हा पुरस्कार समारंभाला तू दिसलीस तेव्हाही मला शॉक बसला होता. पण ते काहीही असो. माझ्याकडून तुला पुरेपूर हमी आहे की इथे जे होईल ते ह्या भिंतींपलीकडे अजिबात जाणार नाही. आणि आज झालं तसं आपण कुठे समोरासमोर आलो तरी मी तुला ओळख दाखवणार नाही. माझ्यामुळे तू अडचणीत येणार नाहीस. तसा विचारही मनात आणू नकोस."
अवनी म्हणाली होती तसंच झालं होतं. काही दिवसांतच रिया सिनेमा पाहायला गेलेली असताना तिथे जोगळेकर दिसले होते. तिथे त्यांनी काहीच ओळख दाखवली नाही. पण थोड्या वेळाने त्यांचा मेसेज आला होता: परत भेटायला आवडेल का? तिने होकार दिला. त्यांनी त्याच संध्याकाळी घरी बोलावलं.
"आज काय पाहायला आली होतीस सिटी प्राईडला?"
"सचिन कुंडलकरचा नवा सिनेमा. असं काही थिएटरमध्ये टिकत नाही म्हणून फर्स्ट वीकेंडलाच बघून टाकला. मला नंतर ओटीटीवर पाहायला आवडत नाही."
"अच्छा, दिल्लीत असताना मोठी गॅप पडली. म्हणून मला हा नवीन मराठी सिनेमा काहीच माहीत नाही. मला अधूनमधून असं काही रेकमेंड करत जा. मी ती ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म पाहायला आलो होतो."
"तुम्ही एकटेच जाता सिनेमा पाहायला?"
"पत्नी गेल्यापासून. दुसरं कुणी समविचारी परिचयात नाही."
"तुमच्या घराची सजावट छान आणि खूप वेगळी आहे. हा कुणाचा चॉइस?"
"माझाच. माझ्या पत्नीला वेळ नसायचा. ती रिझर्व्ह बँकेत मोठी ऑफिसर होती. मी पडलो प्राध्यापक! त्यामुळे मला वेळ मिळायचा. ह्यातलं बरंचसं फर्निचर दिल्लीत असतानाच घेतलं होतं. असं लाकडी फर्निचर आणि कारागिरी आता मिळणं कठीण झालंय. बाकी पडदे, लँपशेड्स वगैरे इथलेच, आणि पेंटिंग्ज म्हणशील तर परदेशात विकत घेतलेल्या प्रिंट्स आहेत."
त्यांच्या खूप गप्पा झाल्या. ते इतके सभ्य होते की तिच्या वेश्याव्यवसायाबद्दल त्यांनी काहीच विचारलं नाही. पण इतर अनेक चौकशा केल्या. ती कुठे नोकरी करते, अधूनमधून कथा लिहिते वगैरे गोष्टी रियाने सांगितल्या. तिच्या लिखाणाविषयी त्यांना कुतूहल होतं कारण ते साहित्याचेच प्राध्यापक होते. त्यांना कादंबरीबद्दल काही सांगण्यात अर्थ नव्हता. थोडी कम्फर्टेबल झाले की कथा वाचायला देईन असं तिने सांगितलं. टोमणा कळून ते हसले.
नंतर सेक्स पण चांगला झाला. इतर क्लायंट्ससारखे नव्हते ते. तिला सुख मिळावं ही त्यांची जेन्यूईन इच्छा होती. फक्त एक शंका मात्र तिच्या मनात राहिली – आयुष्यभर एकपत्नीव्रत पाळलेला माणूस खरंच इतका कामनिपुण असू शकतो?
*
तिने कादंबरीच्या पुढच्या ड्राफ्टमध्ये त्यांचं पात्र घातलं. थोडेफार फरक करून अर्थात. त्यांचा व्यवसाय बदलला. पुरस्कार समारंभाचा प्रसंग टाळला. पण तिची खरी गोची झाली ती देशमुखांच्या प्रतिक्रियेमुळे.
"ही जी नवी व्यक्तिरेखा घेऊन तुम्ही कादंबरीला एक वळण दिलंय..."
त्यांचं मत सांगताना ते थोडे अवघडले होते. हळूहळू रियाला त्यांची अडचण कळली. जोपर्यंत कादंबरीतली वेश्या क्लायंटमध्ये न गुंतता आपले अनुभव आणि त्यातून आपल्याला पडणारे अस्तित्वविषयक प्रश्न सांगत होती तोवर त्यांना काही अडचण नव्हती. पण इथे एक तरुण मुलगी आपल्या बापाच्या वयाच्या पुरुषात गुंतते आहे हे दाखवणं त्यांना रुचलेलं नव्हतं. ते स्वतः साधारण त्याच वयाचे होते हे कारण असेल का? की आणखी काही?
आता रियाला काही समजेना. तिला हे नवं वळण हवंसं तर वाटत होतं. ते काढावंच असा आग्रह त्यांनीही धरला नव्हता. पण कादंबरीचं अपील कमी होईल असं त्यांना वाटत होतं. म्हणजे तरुणाईची कादंबरी असं जे त्यांच्या डोक्यातलं मार्केट होतं त्याला तडा जात होता. शिवाय, एका वेगळ्याच विश्वावरची कादंबरी होण्याऐवजी ती आता रोमँटिक कादंबरी होऊ लागल्ये असाही त्यांचा आक्षेप होता. त्यांचं लॉजिक तसं चुकीचं नव्हतं. पण काय करावं याचा निर्णय तिला घेता येत नव्हता, आणि हा भाग काढायचा तर त्याऐवजी काय घालावं ह्याविषयी तिला रायटर्स ब्लॉक आला होता.
*
आज कादंबरीचं प्रकाशन होतं. स्नॅपचॅट स्वप्ना. देशमुखांना आपलं मार्केट व्यवस्थित कळत होतं. त्यांनी कादंबरीवर बोलायला दोघांना बोलावलं होतं. तरुण पोरापोरींनी लिहिलेल्या नव्या दमाच्या फिक्शनची स्तुती करणारा जुन्या पिढीतला एक समीक्षक होता. विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रातली एक तरुण प्राध्यापिका होती. नव्या तंत्रज्ञानामुळे खुलं झालेलं नवं विश्व कसे नवनवे नैतिक पेच घेऊन येत आहे, आणि नवी पिढी त्याला कशी सामोरी जात आहे यावर समीक्षक बोलले. तर स्त्रीकेंद्री फिक्शनचे नवे आयाम या कादंबरीने मराठीत प्रथमच कसे खुले केले आहेत हे प्राध्यापिका बोलली. मग रियाचं मनोगत होतं. हे आजचं वास्तव आहे आणि ते मराठी फिक्शनमध्ये आणता यावं यासाठी तिने त्या मुलींना कसं गाठलं, त्यांचा विश्वास कसा संपादन केला, कुठेही त्यांच्या जगण्यावर नैतिक-अनैतिक शिक्का न मारण्याचं भान कसं बाळगलं, त्यातून काही प्रसंग कसे निवडले, मी कशी केवळ भारवाहू वगैरे सांगण्यासाठी तिला एक वेगळीच फिक्शन उभी करायला लागली होती. त्याला पर्याय नव्हता. कारण खरं काय घडलं हे सांगण्याची हिंमत तिच्यात नव्हती.
कादंबरीचा खर्डा पूर्ण होताच रियाने आपली सगळी अकाउंट्स डिलीट करून टाकली होती. ते सिम कार्डही डीॲक्टिव्हेट केलं होतं. प्रकाशकांच्या सांगण्यावरून तिला फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट्स उघडावे लागले होते. त्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, प्रमोशन करणे वगैरे गोष्टी तिच्या जीवावर यायच्या. तिथे परत तिला अवनीची मदत मिळाली होती. अधूनमधून रस्त्याने जाताना झाडं पानं पक्षी वगैरेंचे फोटो काढून ते पोस्ट करणे, मधूनच आवडत्या कवितेतलं किंवा लेखकाचं कोटेशन, कादंबरीचं प्रमोशन करण्यासाठी एखादी पोस्ट, लोकांच्या पोस्ट लाईक करणे, सामाजिक-राजकीय विषय टाळणे, हे सगळं करायला तिला अवनीने शिकवलं होतं. तरुण मुलगी सोशल मीडियावर काहीही म्हणाली की तिला गूळ लावायला पुरुष किती हपापलेले असतात त्याचा तिला अनुभव आला.
जोगळेकर प्रकाशनाला आले होते. त्यांनी रियाला अर्थात ओळख दाखवली नाही.
*
रियाला रायटर्स ब्लॉक आला होता तो काही केल्या जात नव्हता. कादंबरी सोडून द्यावी असं तिला वाटू लागलं होतं. असेच काही दिवस गेले होते. तिच्या जोगळेकरांच्या भेटी नियमित झाल्या होत्या. साधारण दोन आठवड्यांतून एकदा. ते तसे शिस्तीचे होते. एक दिवस तिने धीर करून त्यांना कादंबरीविषयी खरंखुरं सांगितलं. "मला तुझा खर्डा वाचायला आवडेल." ते म्हणाले. तिने त्यांना प्रिंटआऊट आणून दिला (त्यांना इबुक किंवा पीडीएफ वाचायला आवडायचं नाही.) त्यांच्याविषयीचा भाग तिने गाळला होता. दोन दिवसांत वाचून त्यांनी तिला चर्चेला बोलावलं. ही व्यक्तिरेखा अशी का? तिच्यातून तुला काय साधायचं आहे? हा प्रसंग ह्याच्याआधी का? नंतर का नाही? तो तिथेच का घडतो? अमक्या व्यक्तिरेखेला काढून टाकलं तर काय होईल? असे खूप भेदक प्रश्न त्यांनी विचारले. एक प्रकारची परीक्षाच होती ती. मग त्यांनी तिला मार्ग सुचवला.
रियाच्या रेग्युलर क्लायंटपैकी एक सेल्समधला होता. एकदम रोखठोक. काही कटकट नाही. तिच्यावर खूश होता. त्याला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा असं हिंडावं लागायचं. तो तिला नेहमी म्हणायचा की माझ्याबरोबर चल. आपण हॉटेलमध्ये राहू. सगळा खर्च माझा. तिला प्रवासच आवडायचा नाही. त्यात हॉटेलमध्ये कोणासोबत राहायचं म्हणजे नको वाटायचं. आणि तास-दोन तास एखाद्या माणसाबरोबर घालवणं वेगळं आणि दोन दिवस घालवणं वेगळं. अर्थात, दिवसा तर तो कामावर जाईल, म्हणजे फक्त संध्याकाळ आणि रात्रीपुरताच प्रश्न होता. तरीही तिने ही ऑफर स्वीकारली नव्हती. त्याच्या भेटीचा एक प्रसंग कादंबरीत येऊन गेला होता. त्यात त्याचं नाव अविनाश होतं. जोगळेकर म्हणाले "तुझ्या कादंबरीचा क्लायमॅक्स करायला हा उपयोगी पडेल." कसा ते त्यांनी सुचवलं – अविनाशबरोबर परगावी जायचं. रूम त्याच्या नावावर. तिने दिवसभर भटकंती करायची आणि रात्र त्याच्यासोबत. पण एक दिवस काही तरी वेगळं घडवायचं ज्यामुळे त्यांच्यात भांडण होईल. रियाने थोडा विचार केला. ही कल्पना तिला आवडली. ती म्हणाली, मी यावर पुढे काम करून तुम्हाला पुढचा खर्डा दाखवते.
रियाने काढलेला मार्ग जोगळेकरांना आवडला – स्वप्ना अविनाशबरोबर गोव्याला दोन-तीन दिवस जाते. एका संध्याकाळी दारू पिऊन तिचं डोकं दुखायला लागतं. ती सेक्स नको म्हणते. अविनाश चिडतो आणि रागाच्या भरात तिला खोलीबाहेर काढतो. खिशातला मोबाईल सोडता तिचं सगळं सामान आतच. तो तिचा कॉल घेत नाही. ती त्याच्या खोलीच्या दारावर जोरजोरात ठोठावते. आवाज ऐकून हॉटेलचे लोक तिला तिथून घेऊन जातात. ती बाहेर रस्त्यावर. रडत. परगावी. रात्र झालेली. आईला किंवा मैत्रिणीला फोन करायची तिची इच्छा नाही. जरा वेळाने ती शांत होते. पुन्हा हॉटेलमध्ये जाते. मॅनेजरला भेटून घडलेला प्रकार शांतपणे स्वच्छ इंग्रजीत सांगते. माझं पाकीट, आधार, पॅन सगळं आत आहे. मला तेवढंच पाहिजे आहे, हे सांगते. ते मिळालं नाही तर मला पोलिसात जावं लागेल, ह्या प्रकारात बदनामी हॉटेलची होईल, हे सांगते. हॉटेलच्या स्टाफने तिला ब्रेकफास्टला, डिनरला अविनाशसोबत पाहिलेलं असतं. तो तिथे नेहमी यायचा म्हणून त्याला ते ओळखत असतात. तो इतर मुलींना ह्याआधी घेऊन आलेला आहे हे मॅनेजरला कळतं. त्या मुलींची कसलीच नोंद न करता त्याला दर वेळी त्याच्या कंपनीच्या नावावर डबल रूम दिली जात असते. हा सगळा प्रकार ऐकून मॅनेजर चिडतो. तो अविनाशला बाहेर बोलावतो. तोवर अविनाशचा रागही थंड झालेला असतो. मॅनेजरला सगळं कळलं हे समजल्यावर तर तो अगदीच बिच्चारा होतो. रियाचं सामान तिला परत मिळतं. रात्रीपुरती ती तिथेच दुसरी रूम बुक करते. सकाळच्या फ्लाईटने पुण्याला परत. डेटिंग ॲप्सवरची सगळी अकाऊंट्स बंद करून ती नॉर्मल आयुष्य जगू लागते.
हा शेवट अवनीला जरा नापसंत होता. जणू काही वाईट मार्गाला लागलेल्या मुलीला धडा मिळतो, त्या धक्क्यामुळे तिला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतो आणि ती वेश्याव्यवसाय सोडते. असा नैतिक शेवट तिला नको होता. पण जोगळेकरांनी रियाला सांगितलं की खरं तर ती ह्यात शौर्य दाखवते, आलेल्या प्रसंगाला धीराने सामोरी जाते आणि तिला एक्स्प्लॉईट करणाऱ्या पुरुषाला वठणीवर आणते. त्यामुळे अकाऊंट्स बंद करण्याऐवजी फक्त त्याला ब्लॉक करून आपला व्यवसाय चालू ठेवते असं दाखवायला हरकत नाही. रियाने ते मान्य केलं. 'तिसरी कसम'मधल्या राज कपूरचा पाठ अनुसरत ती सुरुवातीसारखीच शेवटीही ह्या घटनेतून कानाला खडा लावते, की इतकं एखाद्यावर परावलंबित्च येईल अशी परिस्थिती टाळायची.
कादंबरीचा पुढचा प्रवास सुरळीत झाला. देशमुखांना हा खर्डा आवडला. आणि अखेर कादंबरी प्रकाशित झाली.
*
जोगळेरांशी रियाच्या भेटी नियमित चालू राहिल्या. साधारण दोन आठवड्यांतून एकदा. तसे ते शिस्तीचे होते.
(ही कथा परकीय कल्पनेवर आधारित आहे.)
प्रतिक्रिया
हुश्श!
नशीब!
नाहीतर, ‘लेखिकेच्या कुटुंबाची रचना माहिती असल्याने त्यातला आत्मचरित्राचे चॅप्टर्स स्मगल करण्याचा प्रकार मला किंचित हसूं आणणारा होता.’ असल्या छापाचा एखादा अभिप्राय (त्यावर पुन्हा ‘तूर्तास इतकंच. वर म्हण्टल्याप्रमाणे किंचित अधिक डिटेल्मधला फीडबॅक देईन.’ असल्या काही मखलाशीसहित) वाचायला मिळतो की काय, अशा विचाराने धडकी भरली होती.
(तुमचे होते नेम्सड्रॉपिंग…)
असो चालायचेच.
कथा गमतीशीर आहे.
जोगळेकर ही कथा वाचत असतील, आणि ते वाचत आहेत हे माहीत असलं ते नक्की कोण हे कुणाला माहीत असण्याची गरज नाही!
(अवांतर - इथेही नबांची प्रतिक्रिया येणार; आणि ती फार ट्यार्पीखेचक नसणार, अशी अटकळ होती. तीही खरी ठरली.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अरे बापरे!
कथा वाचुन असं वाटलं की, आपण आता खरंच आजोबा झालो आहोत!
आवडली गोष्ट.
आवडली गोष्ट.
आवडली.
एखादा सिनेमा नाहीतर वेब सिरीज लय भारी निघू शकेल.
हे वास्तव देखील असू शकते.
हे वास्तव देखील असू शकते. अदूगर मला वाटल कि प्रकाशकाकांना.म्हन्ल मपल्याला तर भेटायला कोनच नाय आल. कव्हाधरुन वाट पघतोय
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.com