अहं अस्मि
अहं अस्मि
- शिरीन.म्हाडेश्वर
दिसायला छान होता निकोलस. तिशीतला असावा. बंद खोलीत दिव्याच्या मंद प्रकाशात तिच्या एकाच पायावरची चादर त्यानं सरकवली आणि हलक्या हातानं तिचे पाय दाबायला लागला.
"प्रेशर ठीक आहे?"
"अंऽऽऽ हो. म्हणजे अजून थोडं प्रेशर सुद्धा चालेल खरं तर", तिनं अडखळत म्हटलं.
एखाद्या आज्ञाधारक माणसासारखं त्यानं प्रेशर किंचित वाढवलं. तिला हवं होतं तितकंच. त्याचे पुरुषी कणखर हात आता आवडावेत असे लागायला लागले होते. थोड्या वेळापूर्वी अवघडून आकसून धरलेले स्नायू हळूहळू शिथिल सोडत तिथल्या निलगिरीच्या वासात आणि संथ झुळुझुळू वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजात ती आता विसावायलाही लागली.
मागच्या वर्षी खास पन्नासावा वाढदिवस म्हणून नवऱ्याने वर्षभराची मेंबरशिप भेट दिली तेव्हापासून दर महिन्याला या स्पामधे तिचा बॉडी मसाज ठरलेला होता.
"खूप थकवा आल्यासारखं वाटतंय. रविवारही आहे. आज दुपारी जरा मसाजला जाऊन यावं म्हणते." धुतलेल्या कपड्यांचा ढीग घड्या घालायला म्हणून ती सोफ्यावर नवऱ्याच्या बाजूला येऊन बसली.
"हल्ली वरचेवर दमायला होतं मला. काल पुरणपोळ्यांचा घाट घातला आणि ओट्याकडे नेहमीपेक्षा थोडं जास्त वेळ काय उभी ऱ्हायले तर लगेच पाय कसे सुजले बघ!"
सलवार घोट्याच्या वर सरकवून तिनं स्वतःचे सुजलेले पाय दाखवले. नवऱ्याची टीव्हीवर खिळलेली नजर जराही वळली नाही. त्यापुढचं तिचं बोलणं ऐकल्या न ऐकल्यासारखं करत त्यावर तो "हं, बरं" जोडत राहिला. 'संवादा'तलं त्याचं अनौत्सुक्य जाणवायला तिला अंमळ जरा उशीरच लागला. जेव्हा उमजलं तेव्हा बोलणं थांबवून तिनं स्पाचा नंबर लावला.
"आजची मसाजची अपॉइंटमेंट हवी होती."
नाव, नंबर, मेंबरशिपचा तपशील असे नित्याचे सोपस्कार झाल्यानंतर तिकडून उत्तर आलं,
"आज दुपारी साडेचारची मिळेल. आत्ताच एक कॅन्सलेशन झालं. रविवार आहे ना, त्यामुळे बाकीचे सगळे स्लॉट्स भरलेत. पण अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही नेहमी साराकडून मसाज घेता ती सुट्टीवर आहे. दुसरं कुणी चालेल का?"
"साडेचार चालेल. पण दुसरं कोण?"
"निकोलस आहे. चालेल? ए ग्रेड थेरपिस्ट आहे "
निकोलस म्हणजे पुरुषाचं नाव. ती क्षणभर अडखळली. तिला तसं स्पष्ट विचारून घ्यावंसं वाटलं. पण असं विचारलं तर ते अगदीच बावळटासारखं वाटेल म्हणून तिनं ओठांवर आलेली शंका आवंढ्याबरोबर गिळून टाकली. बाकी लक्ष नसलं तरी नवऱ्यालाही 'मेल थेरपिस्ट' हमखास ऐकू जाणार. नकोच.
"सारा कधी परत येणारेय?"
"ती दोन आठवडे नाहीये. तुम्हाला मेल थेरपिस्ट चालणार नसेल तर दुसरी अपॉइंटमेंट बघू का?"
"नाही नाही, तसं काही नाही. तुम्ही जी आहे म्हणालात ती चालेल."
तिनं त्रोटक उत्तर देऊन कॉल बंद केला. आज नाही तर उद्या दुसरी कुणी फीमेल थेरपिस्ट आहे का असाही प्रश्न तिला विचारता आला असता. पण कुठेतरी एका परपुरुषीय स्पर्शाच्या नवलाईनं तिने अपॉइंटमेंट नक्की करून टाकली. मनात विचारही आला, कसं वाटत असेल एखादा परका माणूस स्पर्श करतो तेव्हा?
"आता प्रेशर ठीक आहे?"
निकोलसनं पुन्हा खात्री केली आणि जराशानं तिचा डोळा लागायचा राहिला. एका अर्थी तिला हायसंच वाटलं. फक्त अंतर्वस्त्रामध्ये असताना नवरा सोडून इतर कुणा माणसाबरोबर बंद खोलीत असायचा उभ्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग. मुलांच्या जन्माच्या वेळी निवडलेली डॉक्टरसुद्धा बाईच. मग हायसं नेमकं कशासाठी वाटलं हा तिचा तिलाच प्रश्न पडला. आपल्या झोपेचा फायदा घेऊन यानं.. छे छे! खरंतर हायसं वाटलं ते प्रत्येक वेळी झोप लागल्यावर आपण लाज वाटावी असं एकसुरी घोरायला लागतो ते अशा उमद्या माणसासमोर टळलं म्हणून.
ती त्याच्याकडे एकटक पाहतेय हे त्याला जाणवलं तसं मंद स्मित करत त्यानं तिचा पाय आता तीस चाळीस अंशांत वर उचलला, तिची टाच स्वतःच्या खांद्यावर टेकवली आणि पोटऱ्यांकडून घोट्याकडं मसाज करू लागला. आपल्या पायापाशी उभं राहून पाय चेपणारा असा विलक्षण देखणा, उंचापुरा, निळ्या डोळ्यांच्या ग्रीक देवतेसारखा पुरुष बघून क्षणभर तिला वाटलं, पैसे सुद्धा काय चीज आहे नाही! फेकला की काय म्हणावं ते मिळतं. हा असा मोहक राकट आश्वासक स्पर्श. स्पर्शात जराशीही भेसळ नसलेली नजर.
त्या नजरेत प्रेम नाही मिळत म्हणा. पण नवऱ्याच्या नजरेत तरी हल्ली कुठे असतं आपल्या भाबड्या कल्पनेतलं "प्रेम"! अगदी तो मिठीत घेतो, पाठीवरून बोटं घरंगळवत, उंचवटे चाचपडतो तेव्हाही कुठे असतं प्रेम? त्या स्पर्शात अभिप्रेत असलेला अर्थ शंभरातील एकशे पाच वेळा लखलखीत स्पष्ट असतो आणि त्याबद्दल त्याला जराही वावगं वाटत नाही. मागे एकदा लवकर जेवणं आटोपून, किचन आवरून बेडरुममधल्या खिडकीत निवांत वारा घेत उभी होते, तर पाठीमागून मिठी मारत नवरा जवळ आला. वाटलं हे प्रेम नाहीतर काय! 'क्षण एक पुरे प्रेमाचा' म्हणतात तसा त्याच्या हजार चुकांना माफी मिळवून देणारा, मुठीत पकडून ठेवावासा वाटण्यासारखा क्षण. त्याच्या छातीला पाठ टेकवत आणि कमरेभवतीच्या हातांच्या विळख्यावर दोन्ही हात विसावून म्हटलं, 'बोलूयात का रे निवांत?' दिवसभरातलं किती काय काय बोलायचं होतं. दिवसभरातलं. मागच्या आठवड्यातलं. महिन्यातलं. वर्षभराचं. मागच्या किती तरी वर्षांचं. एकत्र साचलेलं. बिनसलेल्या कितीएक गोष्टींमधले मोकळे सुटलेले धागे विणूया का रे एकत्र बसून? पण 'बोलायचं' म्हटल्यावर विसरलेलं काहीतरी आठवल्यासारखा लगेच हात सोडवत तो बेसमेंटमध्ये निघून गेला. क्षणिक सुखासाठी वेळेची एवढी मोठी गुंतवणूक करायची? ती ही आपल्यासारख्या रंगारूपानं अतिसाधारण असणाऱ्या हक्काच्या बायकोमध्ये?
वेळेची गुंतवणूक वगैरे राहू दे पण 'छान दिसतेस' असं तो शेवटचं कधी म्हणाला हे सुद्धा आठवत नाही. सावळा चेहरा, त्यात पन्नाशीच्या उंबरठ्यावर सुरकुतलाय. कमरेवर, मांड्यांवर स्ट्रेच मार्क्स उमटलेत. मेनॉपॉझनंतर अजूनच इथून तिथून सुटलंय अंग. त्याच्या कल्पनेतल्या सुंदर, कामुक प्रेयसीत आणि आपल्यात लक्ष लक्ष योजनं तफावत आहे. इतकी तफावत की कधी आरशासमोर उभं राहून काजळ टिकली लावताना त्याची नजर आरशातल्या प्रतिमेवर पडली तरी आपलं आपल्यालाच ओशाळल्यासारखं व्हावं. हा सख्खा नवरा आजूबाजूला असला तर साधं साडी नेसतानाही कमरेवरच्या वळ्या दिसतील म्हणून हनुवटी आणि मानेच्या चिमटीत पदर पकडला जातो. तोसुद्धा मग बघितल्या न बघितल्यासारखं करून तिथून निघून जातो. त्याच्या जवळ गेलं की स्वतःमधली अपुरेपणाची कमीपणाची जाणीव अस्वस्थ करत राहते. 'पोट जरा कमी करायचं बघ. जीन्स घालतेस तेव्हा साईडने बाहेर येतं' असं एकदा मॉलमध्ये फिरताना सहज म्हणजे अगदी जाताजाता म्हणाला होता त्यालाही आता आठ-दहा वर्षं होतील. त्यानंतर आजतागायत दिवा मालवल्याशिवाय त्याच्याजवळ जाता आलं नाहीये.
या 'आपल्या पायापाशी उभं राहून तळवे चेपणाऱ्या' परक्या माणसाकडे मात्र अशी लाज वाटत नाहीये. त्याच वळ्या, तेच स्ट्रेच मार्क्स घेऊन याच्यासमोर जराही संकोच वाटत नाहीये. याच्या नजरेत अपेक्षा नाहीत म्हणून? पारखणं नाही म्हणून? माणूस म्हटलं की दुसऱ्या माणसाला वाचणं जोखणं हे आलंच. चेहऱ्यावर दाखवलं नाही तरी मनात विचार केला असेल ना यानेही. एकापेक्षा एक शिल्पासारखी कोरून काढलेली शरीरं पहिली असतील याने. पण त्याच्या पारखण्याचा आपल्याला तसूभरही फरक पडत नाही म्हणून?
संगीताची धून बदलली आणि निकोलसनं तिचा हात हातात धरला तशी ती पुन्हा अवघडली. नुकत्याच जन्मलेल्या एखाद्या पाडसाला अलगदपणे उचलावं अशा नजाकतीनं त्यानं तिचा हात आडवा उचलला आणि तिच्या हाताचा तळवा स्वतःच्या छातीवर टेकवला. त्याच्या हृदयाचे ठोके हातांना जाणवावेत एवढ्या अंतरावर असताना आपली बोटं त्याच्या शर्टाच्या बटणाशी चुकून एखादा चाळा तर करणार नाहीत या भीतीनं तिनं हात अगदी ताठ धरून ठेवला. हळूहळू निकोलस तिच्या खांद्यापासून मनगटापर्यंत लयबद्ध फटकारे देण्यात मग्न झाला तसा तिने आपला हात सैलसर सोडला. बोटांमध्ये बोटं गुंफून त्यानं तिचं मनगट वर्तुळाकार फिरवलं तसे तिचे डोळेही जडावले.
वेळ संपली तशी निकोलसने तिच्या दोन्ही खांद्यांवर हलकंसं थोपटलं आणि गहिऱ्या ग्लानीतून ती भानावर आली.
"आरामात तयारी करा. बाहेर वाट बघतो"
विकतचं असलं तरीही त्याचं तिच्याशी इतक्या आदरानं वागणं तिला अपार आवडलं होतं. ही निव्वळ एक देवाणघेवाण असली तरी सुखावणारी होती! अशा आदराची अपेक्षा हक्काच्या नात्यांमधून हळूहळू विरतच जात असावी का? नात्यात ज्यांचं माप झुकतं, ती माणसं दुसऱ्या व्यक्तीला नको तितक्या उंचावर नेऊन स्वतःमधला 'अहं' मागे सारत जात असतील का? समोरच्याकडून स्वीकारलं जाण्याच्या हट्टात स्वतःला हरवून बसत असतील का? स्वतःशी अनोळखी होतील इतपत? हे बदलायला हवं. अहं अस्मि, मी आहे म्हणून हे भोवतालचं जग आहे हे माणसांनी मनावर गोंदवायला हवं.
"घरी कधी येतेयस? आज रात्री जेवायला काय आहे?" नवऱ्याचा मेसेज आला तशी तिनं उबर मागवली. घरी आल्यावर मात्र लगेचच जेवणाचं न बघता किंवा मागच्या दोन तासांतला पसारा आवरायला न घेता तिनं आधी गॅसवर चहा करायला ठेवला. बरोबर मारी बिस्कीट आणि वाटीवर तिखट शेव घेऊन, खुर्चीवर पाय सोडून आपल्या आवडीची गाणी ऐकत आरामात अर्ध्या तासांनंतर ती रात्रीच्या स्वैपाकासाठी किचनकडे वळली. आधी ठरवलेला नवऱ्याच्या आवडीचा मेक्सिकन टाकोचा बेत रद्द करून स्वतःच्या आवडीची ताकाची कडी, मऊ भात आणि बटाट्याच्या काचऱ्या केल्या. अहं अस्मि. मला जे हवंय ते महत्त्वाचं. बाकी सगळं गेलं खड्ड्यात!
*
रात्री जेवणं झाल्यावर आवराआवर करून ती त्यांच्या झोपायच्या खोलीत आली तेव्हा नवरा नेहमीप्रमाणे पलंगावर पहुडून फोनमध्ये गुंतला होता. सतत नाखूश असलं तर असं लग्न हवंच कशासाठी असं एकदा तिने मोठ्या बहिणीला चरफडत विचारलं तेव्हा बहीण म्हणाली होती की शरीराच्या सुद्धा गरजा असतात, त्या पुरवायला आपलं माणूस नको का! शरीराची आणि मनाची गरज यात नेहमीच मोठा गोंधळ होतो आपला. मन दुखावलेलं असताना शरीराची वेगळी गरज बिरज विसरायलाच होते. आज मनाला जरा बाजूला ठेवून बघूया. दुखावलेल्या भावना, नवऱ्याच्या अपेक्षा, परवाचा वाद, कशाकशाचीही सरमिसळ न करता आज फक्त स्वतःसाठी, आपल्या शरीराच्या गरजेसाठी या माणसाला भेटून बघूया.
तिनं खोलीचं दार बंद केलं, आरशासमोर उभं राहून केस मोकळे सोडले, हलकंसं सुवासिक क्रीम चोपडलं. नवऱ्याचं लक्ष गेलं तेव्हा हसून नाइटी काढून पलंगाच्या शेजारच्या खुर्चीवर फेकली आणि त्याच्या बाजूला येऊन रजईमध्ये शिरली. नवरा एकदम सरसावून ताठ उठून बसला. तिचं असं वागणं त्याला अपरिचित होतं. नेहमीच्या बुजऱ्या, आढेवेढे घेत निरुत्साहानं जवळ येणाऱ्या, कारणांची यादी पुढे करणाऱ्या बायकोपेक्षा पूर्ण वेगळं. त्याच्या हातातला फोन काढून घेऊन पुढे सरसावत तिनं सूचक नजरेनं नवऱ्याच्या डोळ्यांत पाहिलं. ही मनमोकळी आवृत्ती पेलण्यासाठी कुठेतरी आपणच कमी पडू की काय असा डळमळीत करणारा विचारही त्याच्या मनात क्षणभर येऊन गेला.
"आता बोलायचंय, गप्पा मारायच्यात वगैरे म्हणणार नाहीस ना?" ती मानेनंच 'नाही' म्हणाली तसं 'सुटलो बुवा' असे अविर्भाव करत त्यानं विचारलं, "गोळी घेऊन येऊ? अर्धा पाऊण तास लागेल. तोपर्यंत फोनवर बघूया काहीतरी. चालेल?"
ती पुन्हा मानेनंच 'हो' म्हणाली तसा तो उठून औषधांच्या ड्रॉवरकडे वळला. मग पाणी आणायला बाहेर किचनकडे. कदाचित पहिल्यांदाच ती आपल्या नवऱ्याला सलग इतका वेळ पाहात होती. आधी जवळून. मग लांबून. तो पाणी घेऊन आला. गोळी घेऊन झाल्यावर बेडरुमच्या दाराकडून पुन्हा कपाटाकडे गेला. ती पाहातच होती.
किती विरळ झालेत याचे केस. पाचेक वर्षांत टक्कल पडेल. छाती कशी ओघळलीये. सरळ काटक्यांसारखे हात पाय. ना बलदंड बाहू ना निकोलससारखं पिळदार घोटीव शरीर!
"काय बघायचं? 'कॉमेडी दंगा'चा नवीन एपिसोड आलाय. तो लावू की... पॉर्नहब लावू?" त्यानं डोळा मारत विचारलं.
तिची नजर आता अगदी जवळून त्याच्या चेहऱ्यावरून फिरली. याच्या दातांमधल्या फटी किती वाढल्यात. असा खी खी करत हसतो तेव्हा अजूनच दिसतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आलीत. आपल्या बेताच्या सौंदर्यासाठी ह्या माणसाचं अप्रूव्हल मागत आलो आपण इतकी वर्षं? ह्या??
"सांग ना, काय बघायचं?"
"तू म्हणशील ते!" तिला कॉमेडी दंगा किंवा पॉर्नहब दोन्हीतही विशेष स्वारस्य वाटत नव्हतं. म्हणजे पॉर्नहब चाललं असतं तसं, पण याच्याबरोबर पाहावंसं वाटायला शरीरात कुठेही फुलपाखरं येत नव्हती. त्यापेक्षा एकटीनं काय वाईट! काहीच कनेक्ट वाटत नव्हता. मघाचा स्वप्रेमातून, स्वतःच्या शरीराच्या गरजेसाठी उगवलेला आवेगही झपाट्यानं ओसरत चालला होता.
त्यानं कॉलेजच्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवरची एक क्लिप शोधून लावली. क्लिपमधला माणूस निकोलससारखाच दिसत होता. देखणा धिप्पाड आखीव रेखीव.
"ही चालेल की दुसरी लावू? बघ तुझा नवरा किती मॉडर्न आहे! बायकोला काय हवं काय नको ते स्वतःहून विचारतोय." याच्या अंगाला घामाचा किती वास येतोय. स्पर्शही चिकचिकीत. कानावरच्या, भुवयांच्या केसांमध्येसुद्धा चांदी दिसतेय. गालांवर पहिल्यापासून एवढी ठोकणं होती?
तिला आता एकदम अजीर्ण वाटू लागलं. क्लिप संपायला अजून वीस मिनिटं होती. गोळीचा इफेक्ट व्हायला साधारण तितकीच. मग पुढे एक मिनिट. फार फार तर दीड.
न राहवून तिनं पलंगाशेजारच्या नाईटलॅम्पची दोरी खेचली आणि दिवा मालवला. मनात काउंटडाऊन सुरूच राहिला. पुढच्या महिन्याचा मसाज घ्यायला अजून किमान चार आठवडे होते.
प्रतिक्रिया
.
दिवाळी वर्षातून एकदाच येते, हे हिंदुधर्माचे मराठीभाषकांवर अनंत उपकार आहेत.
(प्रस्तुत लेखाचा जनक आयडी हा स्त्रीसदृश आहे (चूभूद्याघ्या.), याला मी जबाबदार नाही.)
असो चालायचेच.
पण, पण, पण ....
अंक काढणाऱ्यांतले बहुतेकसे लोक नास्तिक आहेत. मुहूर्त वगैरेंच्या फार फंदांत न पडणारे आहेत!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
?
मग मुळात ‘दिवाळी अंक’ काढण्यामागचे प्रयोजन काय?
(‘मग मुळात हा लेख दिवाळी अंकातच काय म्हणून छापला?’ हा प्रश्न त्याच्या कितीतरी नंतर यावा. (‘मुळात हा लेख काय म्हणून छापला?’ हा प्रश्न पूर्णपणे अलाहिदा.))
खरं आहे, दिवाळी वर्षातून
खरं आहे, दिवाळी वर्षातून एकदाच येते ते बरं; नाहीतर फटाके, फराळ, आणि दिव्यांचा खर्च वेळी अवेळी कोण झेलणार! बाकी आपल्या प्रतिक्रियेची कथा विषयाशी संदर्भसंगतता नसली तरीही आपण दरवर्षी आवडीनं साजिरी प्रतिक्रिया देता त्याबद्दल विशेष धन्यवाद.
लेखन आवडले.
लेखन आवडले.
ही पोचपावती लेखका/नासाठी
ही पोचपावती लेखका/नासाठी महत्वाची आहे. धन्यवाद.