एकदा लेखन संघ सर्वसमावेशक लेखन परिषद आयोजित करण्याचं ठरवतं. लेखन संघाचे खूप वर्षांपासून सगळ्या प्रकारचे लेखन एकाच छताखाली येतील असे वातावरण तयार होण्यासाठी प्रयत्न चालू होते. पण ठराविक लेखनासाठी संघाला ओळखले जायचे. कधीकाळी संघ स्थापनेपासूनच शिक्का बसला होता. अभिजनांचं लेखन म्हणजे संघ. सुखवस्तू वर्गातील लोकांचं लेखन म्हणजे संघ हा शिक्का पुसायचाच असा नवीन संघ वरिष्ठांनी चंग बांधला होता. सगळ्या प्रकारचे लेखन म्हणजे कविता, कथासंग्रह, ललित, चरित्रे, वैचारिक लेख, कादंबरी, दलित, विद्रोही साहित्य, नाटकं, एकांकिका, चित्रपट, श्रुतिका, ऐतिहासिक , प्रवास वर्णने, वृत्तपत्र लेखन वगैरे वगैरे सगळं आणि त्यांच्या मधील सगळे उपप्रकार पण सर्वसामावेशक लेखन म्हणून एकत्रितपणे नांदायला पाहिजे असा प्रयत्न चालू झाला होता. पण सत्ता हाताशी नसल्याने व्यवस्थेचा पाठिंबा मिळात नव्हता. समविचारी लोक सत्तेवर आले की सर्वसमावेशक लेखन परिषद आयोजित करण्याचं कार्य राष्ट्रीय पातळीवर सुरू झाले. कारणही तसंच होतं बहुभाषिक राज्य आणि तिथलं सर्वप्रकारच्या लेखनाला एकत्रितपणे नांदायला एकछत्री अंमल असणं काळाची गरज आहे वगैरे बौद्धिकं जागोजागी वाटली जात होती. त्यासाठी एकदिवसीय चिंतन शिबिरात चर्चा सुरू झाली. एकाने कविता या एकमेव प्रांतात दोन डझन पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांची यादी दिली. अभंग, ओवी, आर्या, दिंडी, पोवाडा, किर्तन, श्लोक, श्रुती, चारोळ्या, दशपदी, सुनीत, छंद, मुक्तछंद, हायकू, त्रिवेणी, नवकविता, विद्रोही कविता, विडंबने, वात्रटिका, महाकाव्य, खंडकाव्य, गाणी, बालगीते, चित्रपट गीते, भक्ती गीते, भावगीते, नाट्यगीते, भावगीते, अंगाई गीत वगैरे वगैरे. एवढं सगळं फक्त कवितेत असतं हे ऐकून बरेचसे नवलेखनवीर अचंबित झाले. तेवढ्यात कथा, कादंबरी, ललित, चरित्रे, निबंध, उपदेशपर लेखन, ऐतिहासिक लेखन, नाटक, एकांकिका, दिर्घांक, नाट्यछटा, चित्रपट, लघुपट, माहितीपट, ई-कंटेट वगैरे ची वर्गवारी उपप्रकारांसकट पुढ्यात आली. नवीन लेखना वरील वीररसयुक्त भाषणबाजी करणारे नवतरुण बुचकळ्यात पडले. कारण ते फक्त ऑनलाईन लेखनाचे भोक्ते होते. एवढी सगळी जंत्री अनेक भाषांमध्येही असेल याबद्दलची कुणकुण एव्हाना लागली होती. एकूणच या सगळ्या गोष्टींचा उहापोह करता करता जेवणाची वेळ झाली. मस्तपैकी पेटपुजा झाल्यावर पुन्हा चिंतन शिबिरात चर्चा सुरू झाली. एवढं सगळं अजस्त्र सर्वसमावेशक लेखन अंतर्गत सामाविष्ट करणार तरी कसं? एकाने भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या लेखनाचा एकछत्री कारभार करणं किती गरजेचं आहे हे तळमळीने विषद केले. मुळातच तळमळीने प्रश्न समस्या मांडण्यासाठी ते फारच निष्णात होते. त्यामुळे त्यांना लेखनप्रचार करण्यासाठी प्रचारक म्हणून प्रतिष्ठेची मोहीम द्यावी असं ठरलं. मग तसं आठी दिशेचे प्रचारक नेमले गेले. तोवर सांस्कृतिकदृष्ट्या सभ्यता, आचार, विचार आणि जीवन पद्धती यावर काथ्याकूट करायचा एका चमूने ठराव मांडला. समरसता, समता आणि एकात्मता यावर पण लेखनाचा प्रभाव असतो वगैरे धष्टपुष्ट बाळकडू मिळाले. तोवर चहापानाची वेळ झाली. मग शिबिर सांगता होण्याआधीचे अखेरच्या सत्रात लेखनसंघ वरीष्ठांनी सगळ्यांनाच उस्फुर्तपणे प्रेरणादायी प्रोत्साहन देण्यासाठी लेखनप्रपंच किती विशाल आणि व्यापक आहे हे ठशीवपणे सांगितले. त्यासाठी आपल्याला समाजातील तळागाळातील लोकांच्या मनात लेखनाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागेल असे बौद्धिक दिले. पण आपण ज्या लेखनाचे सर्वसमावेशक संघटन करू पाहतो ते लेखन लोकांनी वाचणे गरजेचे आहे. त्यामुळे किती वाचक, रसिक वाचक आणि अभ्यासू वाचक आहेत ह्याची नोंद घ्यावी असे प्रतिपादन केले. त्यासाठी वाचक महोत्सव सप्ताह साजरा केला जावा हे ठरले. या महोत्सवात जे जे वाचक येतील त्या त्या वाचकांच्या आवडीचे कोणकोणते लेखनप्रकार लोकांना आकर्षित करतात ह्यासाठी विशेष निरिक्षणे नोंदवली जावीत असा गुप्त आदेश दिला गेला. त्यासाठी विशेष अशी स्वयंसेवकांची फळी उभी केली जाईल असे सांगितले. ह्या वाचक महोत्सवात जास्तीत जास्त जनतेला सामावून घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू झाले पाहिजे असा दंडक काढला गेला. आणि महोत्सवाची सांगता झाली की सर्वसमावेशक लेखनासाठी काय काय करावे लागेल याची चतूःसुत्री ठरवण्यासाठी पुन्हा चिंतन शिबिराचे आयोजन केले जाईल अशी घोषणा केली. अशा तऱ्हेने एकदिवसीय चिंतन शिबीर संपन्न झाले.
वाचक महोत्सव भव्यदिव्य होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू असल्याने सत्तेतील वरीष्ठ फक्त आणि फक्त वाढीव संख्याबळ, संख्यात्मक वाढ आणि गर्दीचा उच्चांक याच कसोटीवर खुष होतात हे माहिती असल्याने समाजातील तळागाळापर्यंत वाचक महोत्सवाची रुपरेषा पोहोचली जावी यासाठी कसोशीने प्रयत्न झाले. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, खाजगी नोकरदार सगळ्यांना वाचक महोत्सव सहभागी होण्यासाठी संदेश पाठवले गेले. मग काय भव्यदिव्य कार्यक्रमांची रेलचेल आखली गेली. डोळे दिपवणारी इव्हेंटबाजी करणं तसं नवंव्यवस्थेला नवीन नव्हतं. त्यासाठी मनोरंजन होईल सदरहू कार्यक्रम वगैरे, खाद्यपदार्थ मेजवानी वगैरे करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी राहिली. महोत्सवात भेट देणाऱ्यांची संख्या शेकड्यांनी, हजारांनी लाखो पर्यंत गेलीच पाहिजे असे सक्तीचे आदेश वरुन आल्याचे समजले. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या शहरात लाखो वाचक महोत्सवात सहभागी झाले अशा बातम्यांचे रकाने भरवले गेले. पुस्तकांचं प्रकाशन, नवनवीन संग्रह, विविध प्रकारच्या विषयांवरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध केली होतीच. प्रदर्शनात भरघोस सवलती दिल्या गेल्या. गावोगावी तसे संदेशवहन झाले होते. वेळ पडली तर विशेष दळणवळण यंत्रणा उभी केली जाईल असेही ठरले होते. काहीही करून किर्तीमान विश्वव्यापी विश्वविक्रम झाला पाहिजे जेणेकरून महोत्सवाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाईल याचीही तजवीज केली होती. हॅशटॅग, ट्रेडिंग, सेलेब्रिटी, सेल्फी पॉइंट, जाहीराती, फ्लेक्स, न्यूज चॅनलचे बाईट्स, रील्स, शॉर्टस्, सोशल मीडिया पोस्ट, पॉडकास्ट वगैरे चा महौल बनवला होता. मेडिया क्रिएटिव्ह हेड पासून प्रिंट मेडिया करस्पॉडंट पर्यंत सगळ्यांना झाडून निमंत्रण दिले गेले. काहीही झालं तरी आपल्या वरीष्ठांना सर्वसमावेशक लेखनासाठी जे जे नोंदणीकृत वाचक उपलब्ध होतील ते करणं गरजेचे होते. त्यावरून सर्वसमावेशक लेखन अंतर्गत एकछत्री अंमल येण्यासाठीची चतूःसुत्री ठरणार होती. अखेरीस सप्ताह संपन्न झाला आणि आवश्यक असणारी अधिकृत आकडेवारी सूचीबद्ध झाली.
मिळालेल्या माहितीनुसार चतूःसुत्री ठरवण्यासाठी पुन्हा एक दिवसीय राष्ट्रीय पातळीवर चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले. तसा आता माहितीचा खजिना उपलब्ध झाला होता. मिळालेली माहिती अचंबित करणारी होती. वाचक महोत्सव सप्ताहात दहा लाख लोकांनी भेट दिली अशी संख्यात्मक माहिती पुढे आली. त्यात कोण कोण सहभागी झाले वयोमानानुसार त्याची संख्या किती, सक्तीचे केले म्हणून आलेले किती, उस्फुर्तपणे आलेले किती आणि कोणत्या प्रकारचे लेखन वाचकांना आकर्षित करते ह्याची विचारणा झाली. हाती आलेल्या माहितीनुसार महोत्सवात भेट देणाऱ्यांमध्ये सर्वाधिक हे शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये मधील मंडळी होती. उस्फुर्तपणे आलेले रसिक वाचक खरेदी करून गेले. त्याची उलाढाल झाली मोठी पण जी पुस्तके खपली त्याची माहिती विषण्ण करणारी आहे. सर्वाधिक विक्री झाली ती अभ्यासक्रमाच्या, परिक्षांच्या पुस्तकांची. धार्मिक पुस्तकांची पण विक्री बऱ्यापैकी झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कथा, कादंबरी, कविता वगैरे साहित्याची पुस्तके खूप कमी प्रमाणात खपली. ऐतिहासिक, वैचारिक लेखनपर पुस्तके केवळ अभ्यासक लोकांनी खरेदी केली. प्रदर्शनात भाषांतरित पुस्तके भरपूर प्रमाणात उपलब्ध केली होती. इतर भाषिक पुस्तके पण उपलब्ध होती. जी काही नोंदणीकृत माहिती प्राप्त झाली होती ती फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच शहरातील महोत्सवाची होती. त्यामुळे अशा त्रोटक माहिती सर्वसमावेशक लेखन एकाच छताखाली आणण्यासाठी अपुरी पडत होती. एक दिड कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात फक्त दहा लाख लोकांनी महोत्सवात हजेरी लावली हे काही सर्वसमावेशक लेखनप्रपंचास अनुकूल नव्हते. अखेरीस असे वाचक महोत्सव सप्ताह वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी वेगवेगळ्या भाषिक पातळीवर करावेत असा सूर आळवला गेला. त्यामुळे त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या माहितीमधून अजून भरीव विश्वसनीय विदा (डेटा) तयार करता येईल असं ठरलं. त्यानुसार पुढील काळात योग्य ती कार्यवाही केली जाईल याची ग्वाही दिली गेली. तत्पूर्वी लेखन संघाच्या वरिष्ठांनी हे वेळीच ताडले की, सर्वसमावेशक लेखन करण्यापेक्षा सजग आणि लेखनास आकर्षित होतील असे गुणात्मक वाचक वाढले पाहिजेत. तरच भविष्यातील वाचकांना लेखन सर्वसमावेशक होणं गरजेचं आहे ह्याची जाणीव होईल. लेखन हजारो वर्षे टिकलेलं आहे. समृद्ध होत गेलेलं आहे. तसे गुणग्राहक वाचकांची निर्मिती झाली पाहिजे. लोकांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत होईल असे प्रयत्न केले पाहिजेत. जनजागृती वाचकांसाठी गरजेची आहे. सर्वसमावेशक लेखनाचा श्रीगणेशा होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागेल याची जाणीव झाली.
© भूषण वर्धेकर
डिसेंबर २०२४
पुणे