टूथपिक
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट.
निकिताला एमबीए कॉलेजला ऍडमिशन मिळाली म्हणून (मह्या डबल खूष होता - निकिताला ऍडमिशन मिळाली म्हणून, आणि मुंबईतच ऍडमिशन मिळाली म्हणून) तिने पार्टी अरेंज केली होती. म्हणजे घरीच. फार लोक नाहीत - निकिताच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी, सोसायटीतले मित्र-मैत्रिणी, एवढेच. पंधरासोळा जण.
निकिताचे आईबाबा गावी गेले होते, पण पोरांनी जास्त वाह्यातपणा करू नये म्हणून त्यांनी निकिताच्या चुलतभावाला पार्टीला यायला सांगितलं होतं. गिरीशदादा आमच्याहून सात-आठ वर्षांनी मोठा, पण एकदम फ्रेंडली. म्हणजे आम्ही लहानपणी क्रिकेट खेळताना त्याला बोलवायचो, तेव्हा तो लेफ्टी खेळणार आणि एक-टप्पा आऊट होणार असा रूल त्याने स्वतःच सांगितला होता.
निकिताची पार्टी म्हणजे मह्या घरचं कार्य असल्यासारखा एक्साईटेड झाला होता. डेकोरेशनला मदत करू का असं विचारलं तर निकिता हसू लागली होती. तरी एन्थु कमी होऊ न देता मह्या इतर मदत ऑफर होता. केटरर शोधू का, केक आणू का, गिरीशदादाला रिसिव्ह करायला जाऊ का, वगैरे वगैरे. निकिता मात्र त्याला भाव देत नव्हती.
आणि पार्टीच्या अर्धा तास आधी मी आणि मह्या तयार वगैरे होऊन घरी पत्ते खेळत बसलो होतो तर मह्याला निकिताचा फोन आला.
"ऐक ना महेश, एक गोष्ट विसरून गेले रे. टूथपिकचा बॉक्स आणशील का रे प्लीज येताना?"
"ऑफ कोर्स. ऑफ कोर्स." मह्या फक्त 'आप का हुकूम सर आँखो पर' म्हणायचा शिल्लक होता.
मह्याने ताबडतोब बाईक काढली आणि आम्ही निघालो. कोपऱ्यावरच्या वाण्याकडे बाईक न थांबवता मह्या म्हणाला, "पुढच्या चौकातल्या मोठ्या केमिस्टकडे जाऊया."
मग तिथे गेलो तर मह्याने आयलमधल्या निळ्या टूथपिकचे दोन बॉक्स घेतले.
"यात फ्लॉस करायचा दोरापण असतो, म्हणजे कोणाला कॅव्हिटी असेल तर बरं पडतं," जीपे करताना मह्यानी मला आपणहून एक्स्प्लनेशन दिलं, आणि आम्ही बाहेर पडलो.
"एक मिनिट थांब. इथे आलोय तर मीपण काहीतरी घेतो," मह्याला एवढंच सांगून मी परत दुकानात गेलो आणि माझी खरेदी आटपून बाहेर आलो.
"उशीर होईल रे, चल पटकन," म्हणत मह्याने बाईकला किक मारली.
निकिताकडे पोचलो. काहीजण आले होते, काही हळूहळू येत होते. सगळेजण जमले तेव्हा निकिताच्या दोन मैत्रिणी किचनमध्ये जाऊन ज्यूस वगैरेचे ट्रे घेऊन आल्या. गिरीशदादाने सामोसे आणले होते ते कोणीतरी प्लेटमध्ये काढले. निकिताने किचनमधून मह्याला हाक मारली, तेव्हा मीपण त्याच्याबरोबर गेलो.
"महेश, टूथपिक आणल्यास ना?" निकिताने विचारलं.
"हो हो, ह्या घे," मह्याने केमिस्टची ब्राऊन पिशवी पुढे केली.
निकिताने पिशवी उघडली आणि तिचा चेहरा एकदम पडला.
"या अशा टूथपिक? फ्लॉसवाल्या? अरे हराभरा कबाब खायला या द्यायच्या लोकांना? एक गोष्ट सांगितली तर..." निकिता राग कंट्रोल करायचा प्रयत्न करत होती, पण तिचा चेहरा तापायला सुरुवात झाली होती.
"अग थांब, माझी घरी न्यायची पिशवी मी मघाशी मह्याकडे दिली होती," म्हणत मी दुसरी तशीच पिशवी उघडली. नॉर्मल ब्राऊन टूथपिक बघून निकिताचा जीव भांड्यात पडला.
"आयम सॉरी महेश, रिअली सॉरी," निकिता म्हणाली.
"इट्स टोटली फाईन यार, केवढी धावपळ केलीयेस तू," मह्या म्हणाला.
मी किचनबाहेर सटकलो, आणि पाणी घेण्यासाठी आत येणाऱ्या दीप्तीलासुद्धा काहीतरी सांगून बाहेर थांबवलं.
दोनचार मिनिटांनी हराभरा कबाब आणि चिकन नगेटचे ट्रे घेऊन मह्या आणि निकिताचा जोडा हॉलमधे आला. दोन्ही ट्रेमध्ये मध्यभागी साध्या ब्राऊन टूथपिकचा एकेक बॉक्स डोलात उभा होता.
काळजी वाटायला नको
मह्या आपली काळजी करायला समर्थ असावा.
द्वेष नि मत्सर कशाकरिता? या घटनेवरून??? नि कोणाचा? प्रस्तुत नॅरेटरचा? Firstly, I don’t suppose he’s interested; दुसरे म्हणजे, त्याने तर उलट बाजू सांभाळून घेतली!
मला तर उलट वाटते की मह्या येडा आहे. ती निकिता त्याच्याकडे असल्या कोणत्याही नजरेने पाहात असेल, असे मला वाटत नाही. ती केवळ ‘विशुद्ध मैत्री’च्या भावनेने (whatever that may mean) त्याच्याशी वागते आहे, नि हा लागला आपला कल्पनेचे इमले बांधायला! उद्या ती निकिता दुसऱ्याच कोणाचा तरी — प्रस्तुत नॅरेटरचा नव्हे, तर अशाच रँडम कोणाचा तरी — हात धरून गेली, तरी मला आश्चर्य वाटणार नाही. (किंबहुना, निकिता नक्की कोणाचा हात धरून जाईल, यावर बुकीगिरी करायला हरकत नसावी.) तसे झाल्यास मह्या (स्वतःचा सोडून) नक्की कोणाचा द्वेष करीत बसणार आहे? अं?
तरी मी म्हणतो, की मह्याने निकिताचा नाद सोडावा. पण, आमचे ऐकतो कोण? मह्या एरवी तसा हुशार प्राणी आहे. तो जे काही चित्रविचित्र उद्योग-उपक्रम करीत असतो, ते याला साक्ष आहेत. मग त्याला निकिताच्या approvalची एवढी निकड का भासावी? केवळ ती (१) सोसायटीत राहते, नि (२) मुलगी आहे, म्हणून? बरे, हा तिच्या रेडारवर (असलाच, तर) फार फार तर ‘एक उपयुक्त पशू’ म्हणून असणार. इतका पण नाही भाव द्यायचा कोणाला!
(“तरी मी तुम्हाला सांगतो, महेश, तुम्ही निकिताचा नाद सोडा! हो, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे!”)
पण फ्लॉसवाल्या टूथपिकमुळे पुदिन्याची चटणी निराळी द्यायची गरज नाही, असं काही मह्यानं सांगायचा प्रयत्न केला नाही?
समजा तुम्ही जर निकिता असतात, तर तुम्ही असले काही ऐकून घेतले असतेत काय? उगाच काहीतरी!
(पण, चूक निकिताची आहे. तिला व्यवस्थित स्पेसिफिकेशन द्यायला काय झाले होते? गेला बाजार, कशासाठी हवेत टूथपिक, हे सांगायला नको? मह्याला दोष कसा काय देता येईल? त्याने सांगितलेले काम सूचनेप्रमाणे तंतोतंत केले!)
असो चालायचेच.
ह्म्म्म्म्म...
याबाबत खरेखोटे काय ते देवदत्तच सांगू शकेल, परंतु, यात बिट्वीन द लाइन्स असे निदान मला तरी काही जाणवले नाही. (चूभूद्याघ्या.)
(अवांतरः बाकी, कागदी प्रेमपत्राऐवजी आयफोन वगैरे प्रकार अंमळ फसवे असू शकतात. पहा: 'प्रेमासाठी मीसुद्धा ताजमहाल बांधला असता, परंतु, हाय रे दैवा, मुमताज मिळत नाही' विरुद्ध 'प्रेमासाठी मीसुद्धा ताजमहाल बांधला असता, परंतु, हाय रे दैवा, मुमताज मरत नाही'.)
"म्हणजे कधीकधी केवळ एक कागदी…
"म्हणजे कधीकधी केवळ एक कागदी प्रेमपत्र हवं असतं आणि आपण उगाच आयफोन विकत घेऊन देतो"
यावरनं जुना ईनोद आठवला. एका प्रियकराने प्रेयसीला पाठवलेल्या चिठ्ठितला मजकूर - "प्रिये, मी तुझ्याकडे फुल मागितलं आणि तू मला पुष्पगुच्छ दिला होतास. नंतर कधी मी दोन कागद मागितले होते तर तू मला एक गुलाबी नोटपॅड आणि सुरेखसं पेन आणून दिलं होतंस. शेवटी मी नुसता एक दगड मागितला तर तेव्हासुद्धा तू एक छानसं शिल्प पाठवलंस. प्रिये, कधीपासून आपल्यातल्या या देवाणघेवाणीबद्दलचं एक गुपित तुझ्याकडून जाणून घ्यायचं होतं. अगं, तू काय बहिरी-बिहिरी आहेस की काय?? " :-D :-D
?
दोनचार मिनिटांनी हराभरा कबाब आणि चिकन नगेटचे ट्रे घेऊन मह्या आणि निकिताचा जोडा हॉलमधे आला.
या वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे,
(१) हराभरा कबाब आणि चिकन नगेटचे ट्रे घेऊन (कामाला लावलेला) मह्या हॉलमध्ये आला, आणि
(२) (टूथपिकचा फियास्को केल्याबद्दल) निकिताने (रागाने) मह्याच्या दिशेने भिरकावलेला निकिताचा जोडादेखील त्याच्याबरोबर/पाठोपाठ आला,
असे काहीसे?
वाटलेच!
😁