Skip to main content

पाणी घेऊन आलेत ढग

पाणी घेऊन आलेत ढग
आता पाऊस येईल बघ

वार्‍यावरती होउन स्वार
धूळ घेईल गिरक्या फार
आभाळ करेल धडालधूम
वीज करेल झगमग झगमग
आता पाऊस येईल बघ

कोकीळ घेईल लंबी तान
नाचेल मोर छान छान
बेडूक करेल डराव डराव
मजाच मजा येईल मग
आता पाऊस येईल बघ

हिरवे हिरवे होईल ऊन
वारा गाईल हिरवी धून
मातिला येईल हिरवा पूर
हिरवे होईल सारे जग
आता पाऊस येईल बघ

- ग्लोरी

ऋषिकेश Wed, 06/06/2012 - 14:08

आलाच!
पहिल्या पावसाच्यादिवशी अतिशय समयोचित कविता :)

'न'वी बाजू Wed, 06/06/2012 - 16:05

पहिली ओळ 'पाणी घेऊन आलेत ढग' अशी (किंवा तत्सम कशीतरी) बदलता येईल काय?

अन्यथा, पहिल्या दोन ओळींतील कार्यकारणभाव काहीसा अत्यंत चमत्कारिक असा सूचित होत आहे.

(अर्थात, तो तसा चमत्कारिक असणेच अपेक्षित असल्यास काहीही म्हणणे नाही.)

उर्वरित कविता ठीक आहे.

धनंजय Thu, 07/06/2012 - 01:51

रोचक रचना आहे. "पिऊन"बाबत 'न'वी बाजू यांच्याशी सहमत आहे.

कविता समयोचित आहे.
*माझ्या मनात मात्र कोकिळाच्या गाण्याचा पावसाच्या आगमनाशी संबंध तितकासा घट्ट नाही. चातक (किंवा पपीहा) हे पावसाळी वाटतात. वसंतऋतूशी अधिक संबंध आहे.*

*शिवाय कोकिळाचे कुहु-उ ऐकताना मला "लंबी तान" अशी फारशी भासत नाही.*

*बालकवितेत पाच ओळींची कडवी, ही रचना मोठी आश्चर्यकारक आहे.
क-क (धृ); ख-ख-ग-क-क ; च-च-छ-क-क ; ... ही यमकरचना सुद्धा कल्पक आहे. कडव्यातली मधली ओळ बिनयमकी ठेवण्याचे धाडसही लक्षणीय! "झगमग" हे "बघ"साठी यमक मला उच्चारायला जड जाते आहे.
*

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/06/2012 - 02:31

In reply to by धनंजय

बघ या शब्दाचा उच्चार 'बऽघ' असा होतो त्यामुळे झगमग आणि बघ हे यमक थोडं रोचक वाटलं.
'न'वी बाजू यांची सूचना मलाही पटली.

पण कविता आवडली.

मंदार Thu, 07/06/2012 - 16:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बघ या शब्दाचा उच्चार 'बऽघ' असा होतो त्यामुळे झगमग आणि बघ हे यमक थोडं रोचक वाटलं.

दुसर्‍या झगमगचा उच्चारही 'झगमऽग' असाच करावा लागतोय. :)

छान कविता आहे.

अमुक Sat, 09/06/2012 - 22:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला याच्या नेमके उलट वाटले.
'झगमग झगमग' हे '....झग्मग-झग्मग' असे म्हटले तर 'आता पाऊस येईल बघ्' (घ पाय मोडून) असे म्हणणे लयीला अधिक जवळचे वाटले. तसेच 'मजाच मजा' हे देखील 'मज्जाच मज्जा' असे वाचले तर जास्त मज्जा येते असा अनुभव. बाकी ही रचना करताना कुठली लय अभिप्रेत होती, हे ग्लोरीच स्पष्ट करू शकतील.